माझ्या आयुष्यात आलेल्या ‘सोयऱ्यां’नी मला जे काही दिलं, ते मांडण्याचा हा प्रयत्न…
ग्रंथनामा - झलक
सदानंद कदम
  • ‘सांगाती : स्मरणझुला एका जिप्सीचा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 16 February 2022
  • ग्रंथनामा झलक सांगाती : स्मरणझुला एका जिप्सीचा Sangati सदानंद कदम Sadanand Kadam

‘सांगाती : स्मरणझुला एका जिप्सीचा’ हे सदानंद कदम यांचं व्यक्तिचित्रांचं पुस्तक नुकतंच मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालं आहे. यात गो. नि. दांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकार, रणजित देसाई, ब. मो. पुरंदरे, सुहास शिरवळकर, शिवाजी सावंत, कॅ. लक्ष्मी सहगल, उषा मेहता, ग. प्र. प्रधान, टी. एन. शेषन, अटल बिहारी वाजपेयी, शांता शेळके, नारायण सुर्वे, प्राचार्य राम शेवाळकर, मेधा पाटकर, विश्वास पाटील, शिवाजीराव भोसले अशा ४८ मान्यवरांच्या व्यक्तिचित्रांचा समावेश आहे. या पुस्तकाला कदम यांनी लिहिलेलं हे मनोगत…

..................................................................................................................................................................

आपलं आजचं आयुष्य हे केवळ आपलं नसतं. ते घडवण्यात अनेक महानुभावांचा हातभार लागलेला असतो. आई-वडिलांपासून ते शिक्षक आणि समाजापर्यंत. समज आल्यानंतर आपल्या वाटचालीत सहभागी होतात, ते इथले प्रतिभावंत आणि सामाजिक क्षेत्रांत काम करणारे जाणते. आजचे ‘आपण’ म्हणजे या सर्वांची देण. आपल्या जडणघडणीत जसे ‘सगे’ असतात, तसेच ‘सोयरे’ही. माझ्या आयुष्यात आलेल्या अशा सोयऱ्यांनी मला जे काही दिलं ते मांडण्याचा हा प्रयत्न. त्यांनी जे काही दिलं त्यातलं थोडंच आत उतरलं असलं तरी तेवढ्यानंही माझ्या जगण्याला अर्थ आला. आजवरची सगळी वाटचाल आनंदाची झाली. यात सगळ्यात जास्त वाटा होता आणि आहे तो ग्रंथांचा. वाचनाचं वेड लागलं ते सहावी-सातवीत असताना. सांगली जिल्हा नगर वाचनालय आणि वि. स. खांडेकर वाचनालय यांनी माझं ते वेड अगदी जीवापाड जोपासलं. वय वाढत गेलं तसं अनेक ग्रंथ आयुष्यातच नव्हे तर घरातच राहायला आले. आता मी पुस्तकांच्या घरातच वावरत असतो.

पुस्तक घरात यावीत म्हणून अनेक उद्योग केले. अगदी लेथ मशीनवर काम करण्यापासून ते सांगलीत कोंबड्या खरेदी करून त्या जयसिंगपुरात नेऊन विकण्यापर्यंत. शिलाई वर्ग चालवण्यापासून मग पुढे शिक्षकाची नोकरी करण्यापर्यंत. हाती पैसा येऊ लागला आणि त्यातून पुस्तकं घरात यायला लागली. विषयांचं बंधन कधीच नव्हतं मला. या आकाशाखाली असतील ते सगळे विषय जाणून घ्यायची उत्सुकता. आज अशा सगळ्या विषयांवरची सहा-सात हजार पुस्तकं मला माझ्या घरात माझी सोबत करत असतात. त्यांची संख्या वाढतेच आहे, माझी समज वाढली की नाही, हा प्रश्न मात्र कायम आहे. जसं वाचण्याचं वेड लागलं तसंच भटकण्याचं. त्यातही बोट धरायला मिळालं ते दुर्गसम्राट गोपाल नीलकण्ठ दांडेकर आणि निनादराव बेडेकर यांचं. आणखी काय हवं? राज्यभरातले गडकोट अनेकदा भटकून झाले. अनेकांच्या आयुष्यात त्यांना नेऊन सोडलं. राजगड-रायगड आजवर २५७ वेळा झाला. जन्माला आल्याचं सार्थक झाल्याची भावना. मग जे पाहिलं ते इतरांना सांगायची उर्मी आली. त्याला कारणीभूत ठरले शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ही सगळी वाट दाखवली ती पुस्तकांनी. मग ती लिहिणारी माणसं कशी आहेत? कशी दिसतात? कशी बोलतात? हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढीस लागली. त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला. त्यांना ऐकण्यासाठी कुठंही आणि कधीही भटकू लागलो. त्यांची बोलणं ध्वनीमुद्रित करून घेऊ लागलो. त्या ध्वनिमुद्रिकांचीही संख्या आता दोन-अडीच हजारांवर गेलेली. अनेक लेखक केवळ पत्रांमधूनच नाही तर प्रत्यक्षात आयुष्यात आले. घरचेच झाले. वपुंपासून ते सुहास शिरवळकरपर्यंत अनेकांशी मैत्र जुळलं. ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंतापासून इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंतची अनेक वडीलधाऱ्या माणसांनी आजवर इथंपर्यंत आणलं. ‘पद्मश्री’ पद्मजा फेणाणी-जोगळेकरसारखी ‘दीदी’ आता सतत सोबतीला असते. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपासून सगळ्या वक्त्यांनी आधीच मला आपलंस केलेलं. त्यांच्या अनेक ध्वनिफिती आजही मला काही ना काही शिकवत असतात. मला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. दिशा दाखवत असतात.

या माणसांनी दाखवलेल्या रस्त्यावरून चालतांना देशाचा इतिहास जाणून घेण्याची ओढ लागली. मिळेल ते वाचून काढलं. ‘समग्र नेताजी’ते शिशिरकुमार बोस यांच्याकडून मागवले. सुभाषचंद्र बोस नजरकैदेतून निसटले, तेव्हा त्यांना देशाबाहेर नेऊन सोडणारे हे त्यांचे पुतणे. मग हयात असलेल्या क्रांतिकारकांना भेटण्याचं ठरवलं. क्रांतिवीर नागनाथअण्णा, क्रांतिअग्रणी गणपतराव लाड यांच्यापासून सगळ्यांना अनेकदा भेटलो. त्यांना ध्वनिचित्रफितीवर उतरवून घेतलं. हे सुरू असतानाच ‘रुद्रवाणी’च्या जीवनराव किर्लोस्करांनी ‘आझाद हिंद’च्या कर्नल लक्ष्मी सेहगल यांना आयुष्यात आणून सोडलं. मग कानपूर गाठलं. त्यांच्या सहवासात राहिलो. बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत रेडिओ केंद्र चालवणाऱ्या उषा महेतांशी बोलता आलं. अटल बिहारी वाजपेयी या ‘जननायका’च्या स्मरणशक्तीचा अनुभव घेता आला. प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाचं आयुष्य या सगळ्यांमुळं समृद्ध झालं.

या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतानाच मी यांच्या सहवासात घालवलेले क्षण माझ्या मित्रांना ऐकवत होतो. तेव्हा मित्र म्हणायचे, ‘तुमचं भाग्य म्हणून तुम्हाला ही माणसं जवळून अनुभवता आली. आम्हाला तुम्ही त्यांच्या आठवणी सांगता. या लिहून काढल्या तर त्या इतरांनाही समजतील. तेव्हा हे सारं लिहाच. आठवणींच्या त्या ‘झुल्या’वर एकटेच झुलत बसू नका. तो आनंद इतरांनाही मिळू द्या’. काहींनी तर तगादाच लावला. यात सगळ्यात पुढे होते ते शिक्षक मित्र चंद्रकांत कुमार पाटील. पण इतर पुस्तकांच्या लेखनामुळं आणि व्यापामुळं ते मागं पडत होतं. तेव्हा त्यांनी एक मार्ग सांगितला. रोज एक माणूस समाज माध्यमावर लिहायचा आणि तो मजकूर मित्रांना पाठवायचा. लोकांना तो कितपत आवडतो हे पाहून मग पुढं ठरवू असं दोघांचं मत पडलं. तो उद्योग १५ मे २०२१ पासून सलग ४७ दिवस केला. मजकुरासोबत त्या व्यक्तींची छायाचित्रं आणि पत्रंही टाकू लागलो. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

अटल बिहारी वाजपेयींवरील लेखाला तर राज्यभरातून प्रतिक्रिया आल्याच पण बाहेरूनही. रायपूर, जबलपूर, बेंगळूरू आणि थेट दिल्लीमधूनही. वाजपेयींची लोकप्रियता अजूनही किती टिकून आहे  याचा तो पुरावा होता. त्यांच्यासोबत सर्व परदेश दौऱ्यात सहभागी असलेले दिल्लीचे श्रीराम जोशी तर आता मित्रच झाले आहेत. असाच प्रतिसाद शंतनुराव किर्लोस्कर आणि गोपाल नीलकंठ दाण्डेकर यांच्यावरील लेखांना आला. बाबासाहेब पुरंदरे आणि जीवनराव किर्लोस्कर तर घराघरांत गेले. अशोकजी परांजपे आणि राजा गोसावी नव्यानं समजले. अर्थातच ही सगळी किमया होती ती त्या त्या व्यक्तींच्या ठिकाणी असलेल्या ‘जिंदादिल माणसां’ची. या मान्यवरांच्या आत टिकून असलेल्या ‘माणसा’ला दिलेली ती मनापासूनची दाद होती. माझं काम फक्त त्यांच्यामधलं ते ‘माणूस’पण शब्दांत मांडण्याचं. तेवढंचं मी केलं. अगदी मनापासून.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अर्थातच माझी ही मांडणी म्हणजे त्या त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्र नव्हे याची मला जाणीव आहे. या माणसांचा मला आलेला अनुभव, माझ्या वाट्याला आलेली ती माणसं मी शब्दांत मांडली. इतरांचा अनुभव वेगळाही असू शकेल. मला ही माणसं कशी दिसली आणि यांच्या सहवासानं मला नेमकं काय दिलं, हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. ही सगळी माणसं मोठी आहेतच. ती सांगायला माझ्यासारख्याची काय गरज? या सगळ्या मोठ्या माणसांत दडलेला, सामान्यांना सहसा न दिसणारा ‘माणूस’ शोधण्याचा मी प्रयत्न केला.

मला स्वारस्य होतं ते तो ‘माणूस’ शोधण्यात. त्यांच्याविषयी उठणाऱ्या किंवा उठवल्या गेलेल्या बाजारगप्पांत मला कसलाही रस नव्हता. माझ्या हाती लागलेला तो अस्सल माणूस शब्दांत उतरवण्याची धडपड म्हणजे हा ‘झुला’. माझ्या स्मरणांचा. आठवणींच्या त्या झुल्यावर आजही मी झुलत असतो. या माझ्या ‘सोयऱ्यां’चं बोट धरून वाटचाल करत असतो. माझी वाटचाल आनंदाची का झाली, त्याला कोण कोण कारणीभूत ठरलं हे सांगण्याचा हा प्रयत्न.

‘सांगाती : स्मरणझुला एका जिप्सीचा’ - सदानंद कदम

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

पाने - २७८

मूल्य - ३९५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......