अजूनकाही
शास्त्रीय संगीताचे अभ्यासक डॉ. अनिल गोविलकर यांचं ‘गीत गंधार - एक संगीत मैफल’ हे पुस्तक अलीकडेच संधिकाल प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आणि शास्त्रीय गायिका डॉ. अनुराधा डबली यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
संगीतज्ञ अनिल गोविलकर यांचे ‘गीत गंधार’ हे पुस्तक वाचलं. शास्त्रीय संगीतातील राग -रागिण्यांबाबत एक वेगळा दृष्टीकोन ठेवून त्यांचे सुगम रूप वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. फार प्राचीन काळापासून मौखिक परंपरेने, वर्तमानात आपल्यापर्यंत पोहोचलेले हे ‘संगीत-संचित’, हिंदुस्थानी संगीताचं समृद्ध आणि वैभवशाली वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या रागांच्या जडणघडणीत, निर्मितीत कितीतरी शास्त्रकार, गायक कलाकार यांचे अनमोल योगदान आहे.
धृपद, धमार, ख्याल, तराणा, टप्पा, ठुमरी,नाट्यगीत अशा वेगवेगळ्या प्रकारांमधून, शास्त्रबद्ध रागसंगीत श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतं. शास्त्रीय संगीत समजण्यासाठी, त्यातील रागसौंदर्य अनुभवण्यासाठी वेगळ्या पातळीची समज, शिक्षण असावं लागतं. संगीतोपासना, साधना करावी लागते. परंतु आपल्या अनेक संगीत दिग्दर्शकांनी आकलनाच्या दृष्टीने श्रोत्यांना अवघड वाटणारे शास्त्रीय संगीतातले राग, चित्रपट संगीतातील किंवा इतर सुगम संगीतातील गीतरचनांसाठी योजून सगळ्यांसाठीच तो अवघड मार्ग सुकर केला आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अर्थ, रस, भावपूर्ण अशा शब्दांच्या गीतांमधून, रागाधारित सुरावटी गुंफून फार सुंदर रीतीने राग संगीताचा दुवा श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आहे. वेगवेगळ्या रागांवर आधारित अशी कितीतरी गाणी आजमितीस आपल्या हृदयात ठाण मांडून बसली आहेत. त्या गाण्यांच्या साहाय्याने आपण आज सवयीने राग ओळखायलासुद्धा शिकलो आहोत.
गोविलकर आणखी काही पावले पुढे टाकतात. वेगवेगळ्या रागांच्या सुरावटी कुठल्या गाण्यात कशा विहरत आहेत, शब्दार्थानुसार त्यातील भावनेचा कसा परिपोष करत आहेत, त्यांच्या मर्यादा, गाण्यातील आशयघन शब्द, सौंदर्यस्थळं विशिष्ट सुरावटींच्या साहाय्याने कशी उठावदार झालेली आहेत, याची मीमांसा करताना, गाण्यांसोबत योजलेल्या वाद्यवृंदाचेही ते अभ्यासपूर्ण विवेचन करतात. त्याबाबत सुसंबद्ध, समर्पक भाष्य करतात. त्यामुळे आधी ऐकलेली गाणी एका वेगळ्या वेशात पुन्हा डोळ्यांसमोर उभी राहतात. ती गाणी सहज ऐकण्यापेक्षा समजून ऐकण्याचा आनंद घेता येतो.
गाण्याचं मार्मिक विश्लेषण करताना उपयोगात आणलेली लेखनशैली काही वेळा क्लिष्टतेकडे झुकणारी वाटते खरी! पण त्या वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक, पारिभाषिक संज्ञांच्या अनुपस्थितीत, गीताचं विवेचनात्मक रसग्रहण, अधुरं, अपूर्ण वाटलं असतं हेही पटतं! आणि रुळलेली किंवा गुळगुळीत नसलेली अशी त्यांची अनवट, हटके भाषाशैली आवडून जाते. कवी, लेखकांच्या साहित्यिक विधानांची पेरणी, आपल्या विधानांच्या पुष्ट्यर्थ, लिखाणात केल्यामुळे लिखाण अधिक रंजक झालेलं आहे.
अहिर भैरव, तोडी, ललत, भटियार, पहाडी, भीमपलास, पिलू, गौड सारंग, चारुकेशी, मधुवंती, अभोगी, मारवा, अशा कितीतरी रागांवर आधारित बनलेली गाणी शोधताना, मांज खमाज, आरभी, झिंझोटी, मांड असे कमी संपर्कात येणारे रागही त्यांनी निवडले आहेत. अशा रागांमधली गाणी शोधली आहेत, असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.
सुपरिचित यमन, पहाडी हे राग एकापेक्षा अधिक गाण्यांमधून आपल्याला भेटतात. मात्र रागाचे सूर तेच असले तरी त्यांचे उपयोजन, वावर, वापर, गीतकाव्यातील शब्दांच्या भावार्थाप्रमाणे, संगीत प्रकारानुसार वेगवेगळा कसा आहे, हेसुद्धा त्यांच्या तळमळीच्या अभ्यासपूर्ण सांगण्यातून ते वाचकांच्या लक्षात आणून देतात.
उदाहरणार्थ ‘यमन’ रागामधील गाणी- ‘जाहल्या काही चुका’ हे रूपक तालातील भावगीत, ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ ही केहरवा तालातील कव्वाली, ‘आपके हसीन रुख पे आज नया नूर हैं’ हे पाश्चात्य ठेक्याचं पियानो गीत, यातून वावरणारे ‘यमन’ रागाचे स्वर तेच असले तरी गीतानुरूप आपलं परिधान बदलताना दिसतात. एखाद्या स्त्रीचं प्रसंगानुरूप (लग्नप्रसंग, समारंभ, बाजारहाट, कार्यालयीन कामकाज, माता, गृहिणी, इत्यादी) वेगवेगळ्या भूमिकांमधलं वागणं, वावरणं जसं भिन्न भिन्न असतं, तसंच या रागाशी संबंधित निरनिराळी गीतं ऐकताना सुरांच्या विविध छटा उलगडत जातात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
वेगवेगळ्या रागांची व्यवच्छेदक लक्षणं, माहिती आवडत्या गाण्यांच्या माध्यमातून जाणून घेण्याची जिज्ञासा असणाऱ्या नवोदितांसाठी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आणि संगीताच्या जाणकारांसाठीसुद्धा ‘गीत गंधार’ हे पुस्तक एक वरदान आहे. गोविलकर यांनी पुस्तकासाठी भरपूर मेहनत घेतल्याचं जाणवतं. त्यांचा शास्त्रीय संगीताचा व्यासंग, अभ्यास लिखाणातून वारंवार प्रत्ययास येतो.
‘शब्दप्रधान गायकी’त ‘स्वरप्रधान’ गायकी कशी आणि किती प्रमाणात संक्रमित झाली आहे, हे सप्रमाण सांगतानाच संगीतकारांच्या, गायक कलाकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत शैलींचा लेखाजोखाही ते मांडतात. आवश्यक तेथे पारिभाषिक संज्ञांचा वापर केला आहे. सर्वसाधारण वाचकांशी, संगीत रसिकांशी पुस्तकाद्वारे सुसंवाद साधण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल याची खात्री आहे. संगीत विश्वातील सर्व स्तरातून या पुस्तकाचं स्वागत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करते.
‘गीत गंधार’ - डॉ. अनिल गोविलकर
संधिकाल प्रकाशन, मुंबई
मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment