अनिल अवचटांनी मध्यमवर्गाच्या भावविश्वाला ‘नाही रे’ची किनार दिली, हे मला त्यांचे सर्वांत मोठे योगदान वाटते!
संकीर्ण - श्रद्धांजली
हेरंब कुलकर्णी
  • अनिल अवचट (जन्म - १९४४, मृत्यु - २७ जानेवारी २०२२)
  • Fri , 28 January 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली अनिल अवचट Anil Awachat

अनिल अवचट यांनी आपल्याला काय दिले? त्यांनी ‘नाही रे’ वर्गाला आवाज दिला. मराठी साहित्याची कक्षा रुंदावली. प्रत्येक समाजघटक कसा जगतो हे समजले. गरीब म्हणजे काय, ही आमची समज त्यांनी अधिक सखोल केली. त्या माणसांचे जगण्याचे ताणेबाणे, प्रश्न, वेदना वेगळ्या रितीने पोहोचवली. विकासाच्या प्रक्रियेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण केले. विकास म्हणजे नेमका कोणाचा विकास, या प्रश्नावर त्यांनी सर्वांना बोलणे भाग पाडले, ही अवचटांच्या लेखनाची ताकद आहे.

आपल्या सुखासीन आयुष्याला त्यांनी अपराधीभाव  दिला, पण आनंदाने जगताना आजूबाजूला इतके भीषण वास्तव आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यातून मध्यमवर्ग कृतिप्रवण झाला व अनेक सामाजिक चळवळींचा पाठीराखा बनला. हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम अवचटांच्या लेखनाचा आहे. अन्यथा हमाल कसे जगतात, त्यांच्या शरीराची कशी चाळणी होते, याचा आपण कधी विचार केला असता? निपाणीच्या रात्रीच्या अंधारात भाकरी खात चाललेल्या महिला आपल्याला कधी दिसल्या असत्या? मराठवाड्यातून पुण्यात आलेले दुष्काळग्रस्त कुठे राहतात, कसे जगतात, हे आपल्याला समजले असते? गर्द आणि व्यसनाने तरुणही कसे उदध्वस्त झाले, हे आपल्याला कोणी सांगितले असते? दूर, बिहारमध्ये जाऊन खेड्यापाड्यातील हत्ती पाळून रोज मणभर धान्य खाऊ घालणारे सरंजामदार आणि अन्नाच्या कणभर घासासाठी तडफडून मेलेली महिला, आपल्याला कोणी दाखवली असती? अवचट यांनी आपल्या भावविश्वात ही सारी माणसे आणून बसवली. आपल्या आत्मकेंद्रित मनाची कवाडे त्यांनी लाथा घालून उघडली, हे त्यांचे योगदान आहे

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अवचटांचे एक स्कूल महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आणि लेखकांमध्ये निर्माण झाले, हा परिणाम मला जास्त महत्त्वाचा वाटतो. नंतरच्या काळात त्यांची ‘रिपोर्ताज शैली’ महाराष्ट्राच्या अनेक लेखकांनी वापरली. प्रत्यक्ष समाजघटकात जायचे आणि तेथील प्रश्न तपशीलवार मांडायचे, ही चित्रमय शैली वापरून महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकांत अक्षरशः शेकडो लेख आले. त्यातून अनेक समाजघटकांचे प्रश्न पुढे आले. आज वेगवेगळ्या समाजघटकांवर माहितीपट बनत आहेत. त्याच्यावरही अवचटांचा प्रभाव आहे. वृत्तपत्रातले  फिचर त्यांच्या शैलीत लिहिली गेली.

१९९०नंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्रांच्या आवृत्त्या निघाल्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील माणसांची दुःखं यायला लागली. छोट्या छोट्या व्यावसायिक समाजघटकांची दखल ‘अवचटी शैली’मध्ये मांडणारे ग्रामीण वार्ताहर मोठ्या संख्येने येऊ लागले. त्यातून व्यक्तिचित्रवर्णन घडू लागले. या परिणामाचा तपशीलवार अभ्यास करण्याची गरज आहे.

अवचटांनी मध्यमवर्गाच्या भावविश्वाला ‘नाही रे’ची किनार दिली, हे मला त्यांचे सर्वांत मोठे योगदान वाटते. आज मध्यमवर्ग वेगाने आत्मकेंद्रित होत आहे. ९८०च्या दशकात अशी स्थिती नव्हती. तेव्हा मध्यमवर्ग आणि गरीब माणसे यांच्या आर्थिक स्तरात फारसे अंतर नव्हते. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक चळवळींत काम करणारे आणि त्यांचे नेतृत्व करणारे प्रामुख्याने मध्यमवर्गीयच होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्र सेवा दल या दोन्ही परिवारांत मध्यमवर्गीयच होते. साने गुरुजींच्या प्रभावातून मोठा वर्ग शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्याची जोडला गेला होता. आणीबाणीत तुरुंगात गेलेले बहुसंख्य मध्यमवर्गीय कुटुंबातील होते, हे विशेषत्वाने नमूद करायला हवे.

सामाजिक चळवळीत प्रत्यक्ष सक्रिय असणाऱ्या माणसांना अवचटांच्या लेखनाने एक कार्यक्रम दिला. या माणसांचे दुःख दूर करण्यासाठी माणसे सक्रिय झाली. त्यातून अनेक संघटना उभ्या राहिल्या. त्या संघटनांच्या कामात मध्यमवर्गीय सहभागी झाले. समाज आपल्या आजूबाजूच्या इमारतींमध्ये दिसतो, तितकाच नसतो, त्या पलीकडच्या झोपडपट्ट्या हाही समाजच असतो, असे आकलन उंचावण्याचे काम अवचटांच्या लेखनाने केले. त्यातून अनेक कृती कार्यक्रम अमलात आले, ही त्यांच्या लेखनाची ताकद होती.

.................................................................................................................................................................

डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://bit.ly/2FJw7OZ

.................................................................................................................................................................

अनिल अवचट यांच्या पुस्तकांनी मध्यमवर्गीयांच्या मनात गरीब माणसांविषयी कणव निर्माण केली. त्यामुळे गरिबांचे प्रश्न पुढे आणण्यासाठी अशा प्रकारचे लेखन आपणही करत राहावे, असे वाटायचे. ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ (समकालीन प्रकाशन) या अहवालाच्या निमित्ताने अवचटांना भेटलो. त्यांना या अभ्यासासाठी वाचलेल्या, पाठ केलेल्या आकडेवारीच्या साहाय्याने वेगवेगळे अहवाल आणि आकडेवारी असे सांगत होतो. सगळे झाल्यावर अवचट म्हणाले, ‘मला आकडेवारी वगैरे काही समजत नाही रे. आकडेवारी घेऊन तू काय करणार आहेस? प्रत्यक्ष गरीब माणसांकडे जा, त्यांच्याशी बोल. अहवाल आणि आकडेवारी सांगायला तज्ज्ञ आणि सरकार आहे की!’

त्यानंतर मी तयार केलेल्या प्रश्नावल्या काढल्या. प्रत्येक गरिबाला विचारायच्या पंचवीस प्रश्नांची यादी त्यांच्या समोर ठेवली. ते पुन्हा हसायला लागले. म्हणाले, ‘मुलाखत घ्यायला गरीब माणूस काय सेलिब्रिटी थोडाच आहे? आपला मित्र भेटल्यावर आपण प्रेमाने चौकशी करतो आणि सहज गप्पा सुरू होतात. त्याच्या अडचणी, सुखदुःख कळते. त्याप्रमाणे गरीब माणसाशी सहज बोलायला सुरुवात करायची. सगळे प्रश्न आपोआप पुढे येतात. प्रश्नावली, औपचारिकता यातून काहीच घडत नसते.’

मग त्यांनी मला लेखनाच्या काही टिप्स दिल्या. ‘गरिबाच्या घरी गेल्यानंतर खुर्चीवर बसायचे नाही, तो बसला असेल तिथेच बसून बोलायचे. वही-पेन कधीच काढायचा नाही, कारण अगोदरच ते लोक भयग्रस्त असतात. त्यामुळे आपली कोणीतरी माहिती घेत आहे, अशी भावना त्यांच्या मनात येता कामा नये. अनौपचारिक गप्पा मारायच्या. अशा प्रकारे त्यांच्याकडून माहिती घ्यायची. एकातून दुसरे प्रश्न उलगडत जातील. नंतर मग संध्याकाळी तू हे सगळे लिहून काढायचे.’

मी म्हणालो, ‘दिवसभर खूप जणांना भेटल्यानंतर संध्याकाळी ते सगळं लिहून काढताना बऱ्याच गोष्टी विसरल्या जातील.’ त्यांचे डोळे चमकले. म्हणाले, ‘जे विसरशील ते विसरण्याच्याच योग्यतेचे होते असे समजून सोडून द्यायचे. जे तुमच्या हृदयाला स्पर्श करते, ते कधीही विसरले जात नाही. तेव्हा त्याचा विचार करू नकोस.’

दारिद्र्यावर संशोधन करणारे हजारो संशोधक आणि प्राध्यापक असतील, पण समाजमनात अवचटच का रुतून बसले, याचे उत्तर मला मिळाले. अहवाल वाचताना दरिद्री माणसांची संख्या दिसते आणि अवचट वाचताना गरीब माणसांचे चेहरे दिसतात. ही त्यांची ताकद या निमित्ताने पुन्हा उमजली. त्यांनी मला निघताना वाचण्यासाठी ‘पूर्णिया’ दिले. ज्या माणसांवर तुम्हाला लिहायचे ती तुमच्या स्नेहाचा विषय असली पाहिजेत आणि त्यांनी तुम्हाला मित्र म्हणून स्वीकारले पाहिजे, तरच ते त्यांच्या अंत:करणातले दुःख तुम्हाला सांगतील, हे त्यांनी सांगितले.

आज अवचटांच्या शैलीत लिहिण्याची सर्वांत जास्त गरज आहे. ते लिहीत होते, त्या वेळी त्याला प्रतिसाद देणारा समाज आजूबाजूला होता. त्या माहितीच्या आधारे आंदोलन कार्यप्रवण होत होते. मी एकदा त्यांना विचारले होते, ‘तुमची पुस्तके जर आज आली असती, तर इतका परिणाम साधला गेला असता का?’ तेव्हा ते नुसते हसले होते. आज आव्हान मोठे आहे. ज्या मध्यमवर्गाने चळवळ जगवली, तो आज उच्च मध्यमवर्गात सरकतो आहे किंवा ती आकांक्षा मनात ठेवून पावले टाकतो आहे. ‘मी, माझे कुटुंब’ हा व्यक्तिवाद खूपच वाढला आहे. सामाजिक चळवळ, सामाजिक विचार रोडावत गेल्यामुळे तरुणांचे सामाजिक भान विकसित करणारे ‘स्कूल’ नाहीसे झाले आहे. त्यामुळे तरुण मुलांना गरिबांविषयीची कणव निर्माण होण्याच्या शक्यता मावळत आहेत... कुटुंबातूनही नाही अन समाजातूनही नाही. परिणामी नव्या पिढीला दारिद्र्याचे ताणेबाणे समजेनासे झाले आहेत. प्रश्नच पोहोचत नाही, तर उत्तरे तर दूरच राहिली!

समाजातून गरिबी हटली नसेल, पण माध्यमांतून हटली आहे. पूर्वी चित्रपटांचा नायक गरीब माणूस असायचा. राज कपूर, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट गरीब माणसाभोवती फिरायचे. श्रीमंतांशी संघर्ष करणारा नायक गरिबांना आपला प्रतिनिधी वाटायचा. कपूर-बच्चन यांच्या लोकप्रियतेत या गरीब माणसांच्या टाळ्या जास्त होत्या. पण गेल्या काही वर्षांत वाढत गेलेल्या मध्यमवर्गाने सर्वच माध्यमांवर कब्जा केला आणि त्यांच्या मनोरंजनाचे व जगण्याचे विषय माध्यमांनी मांडावे, अशा प्रकारची अपेक्षा आणि सुप्त दहशत निर्माण केली.

परिणामी चित्रपट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व पारंपरिक माध्यमे यातून गरिबांचे चित्रण कमी व्हायला लागले. जो आपला ग्राहक आहे, त्याच्याच जगण्याशी संबंधित बातम्या आणि चित्रपट यायला लागले. व्यक्तिवाद वाढत गेला आणि त्याचे प्रतिबिंब या माध्यमांमध्येही पडले. त्यामुळे विकासाची नवी चकचकीत परिभाषा हीच माध्यमांमधून प्रतिबिंबित व्हायला लागली. त्यात महाराष्ट्रातील नागरीकरण वेगाने वाढत गेले. १९७१ साली जितकी महाराष्ट्राची लोकसंख्या होते, तितकी माणसे आज फक्त शहरांत राहत आहेत. नागरीकरण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे नकळत शहरांचे प्रश्न अधिक मोठ्या आवाजात मांडले जाऊ लागले. त्यातून शहरातल्या नागरी सुविधा आणि तेथील मध्यमवर्ग यांच्या अडचणी, प्रश्न याच केंद्रस्थानी आल्या. लोकप्रतिनिधींची शहरी भागातील संख्याही वाढते आहे. तेही विधिमंडळामध्ये शहरी भागाचेच प्रश्न मांडू लागले. त्यामुळे मेट्रो आणि शहरातली उड्डाणपूल ही विकासाची परिभाषा ठरली. या सर्वांचा परिणाम म्हणजे गरिबांचे प्रश्न अधिक तीव्र झाले, परंतु त्यांचा आवाज व्यक्त करणारी माध्यमे मात्र आकुंचित होत गेली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशा स्थितीमध्ये अवचटांसारखे रिपोर्ताज लिहिणारे मोठ्या संख्येने निर्माण होणे, हेच त्यावरील उत्तर आहे. हल्ली हातात मोबाईल आल्यामुळे प्रत्येक जण पत्रकार झाला आहे. अवचटांना दिवाळी अंकांची, साप्ताहिकांची वाट बघायला लागायची. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही संधी उपलब्ध झाली आहे. अशा स्थितीत मध्यमवर्गाने गरिबांच्या वेदना सतत मांडत राहून प्रशासनावर दडपण निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून मध्यमवर्गाला ‘नाही रे’ वर्गाचे प्रश्न समजतील आणि त्या प्रश्नांबाबत सामाजिक संवेदनशीलता निर्माण होईल. लोक त्या प्रश्नांशी जोडले जातील, चळवळींचे पाठीराखे बनतील. किमान एक सहानुभूतीदार मध्यमवर्ग निर्माण होईल.

अवचटांच्या काळातील प्रश्न काळा-पांढऱ्यात विभागलेले असल्याने अधिक सोपे होते. आज ‘भारता’त ‘इंडिया’ आणि ‘इंडिया’त ‘भारत’ अशी व्यामिश्र रचना झाली आहे. हितसंबंधांचा गुंता नीट कळत नाही, बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्या थेट आदिवासी भागातील जल-जंगल-जमिनीवर आक्रमण करत आहेत. अशा काळात अधिक अभ्यासपूर्ण रितीने वंचितांचे प्रश्न पुढे आणण्याची गरज आहे. जे लढत आहेत, त्यांच्या पाठीशी मध्यमवर्गाचे बळ उभे करणे, ही आजची गरज आहे. आणि नेमक्या अशा काळात अवचट आपल्यातून निघून गेले आहेत…

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

अनिल अवचट : उपेक्षित विषयांना समाजमनाच्या पृष्ठस्तरावर आणणारा लेखक

अनिल अवचट खरंच आपले कोण लागतात? त्यांचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे?

डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!

बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!

तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!

.................................................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......