शिरीष कणेकर : ‘तुम याद रहोगे हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!’
संकीर्ण - श्रद्धांजली
आ. श्री. केतकर
  • शिरीष कणेकर
  • Sun , 08 June 2025
  • संकीर्ण श्रद्धांजली शिरीष कणेकर Shirish Kanekar

सिनेमा, क्रिकेट आणि विनोदी सदरलेखन करणारे प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांची ६ जून रोजी जयंती साजरी झाली, तर २४ जुलै रोजी त्यांची दुसरी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

चिंतामणी मधुकर कणेकर, हे नाव वाचून तुम्हाला चटकन काही उमगणार नाही. हा कोण संप्रति नवा पुरुषावतार, असा प्रश्न पडेल, पण ‘शिरीष कणेकर’ म्हटलं, तर लगेच तुम्हाला तुमचा लाडका सिनेमा, क्रिकेट आणि विनोदी सदरलेखन करणारा लेखक, ‘स्टँड अप कॉमेडी’ हा प्रकार मराठीत प्रथमच आणणारा, देशोदेशी अनेक प्रयोग करून तेथील प्रेक्षकांची, वाचकांची दाद मिळवणारा अष्टपैलू गुणी कलाकार आठवेल. त्याचं लेखन वाचताना, प्रयोग बघताना, पोट दुखेपर्यंत हसताना या लेखक / कलाकाराचं वय काय, हा प्रश्नच कधी मनात यायचा नाही.

पण विचार करायला लागलं की, आठवतं की, ‘अमृत’ मासिकात त्याचा ‘जॉर्ज गन : एक लहरी फलंदाज’ हा क्रिकेटवरील पहिला लेख आला होता, ते वर्ष होतं जानेवारी १९६४. म्हणजे जवळजवळ साठ वर्षांपूर्वी! तेव्हां त्याचं वय जेमतेम २१ होतं. तिथपासून वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्याची लेखणी तितकीच ताजीतवानी होती. शेवटच्या काळात ‘सामना’ दैनिकात दर रविवारी त्याचं ‘शिरीषायन’ हे सदर प्रसिद्ध होत होतं. ते वाचताना त्याच्या लेखणीचं ताजेपण प्रकर्षानं जाणवे.

त्याचा जन्म पुण्याचा, बरंचसं लहानपण तिथलंच. त्याचं पहिलं पुस्तक ‘क्रिकेटवेध’ (१९७७) आणि दुसरं चित्रपट गीतांबाबतच्या लेखांचं ‘गाये चला जा’ (१९७८) ही पुस्तकं प्रकाशित झाली ती पुण्यातच; (या दोन पुस्तकांवरूनच कळतं की, प्रख्यात समीक्षक नेव्हिल कार्डसप्रमाणे शिरीषही क्रिकेट आणि संगीताचा प्रेमी होता.). ‘इंडियन एक्सप्रेस’चा वार्ताहर म्हणून त्यानं नोकरी सुरू केली, तीही पुण्यातच. असं त्याचं पुण्याशी घनिष्ठ नातं.

पुण्यातील लहानपणाच्या आणि नंतरच्या काळातल्या अनेक आठवणी आपण त्याच्या लेखांत वाचल्या आहेत. पुण्यातील साधारण वर्षभराच्या कामानंतर त्याची बदली मुंबईला मुख्य कचेरीत झाली. तिथंही त्याचं लेखन होतच होतं. इंग्रजी वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून नोकरी आणि लेखन प्रामुख्यानं मराठीत, असं हे अजब मिश्रण. मुंबईत त्याला ‘एक्सप्रेस समूहा’चं ‘लोकसत्ता’ हे दैनिक होतंच, पण इतरही अनेक संपादक त्याचे लेख प्रसिद्ध करायला उत्सुक होते. त्यानं पत्रकारिता केली ती मात्र फक्त इंग्रजीमध्ये. ‘इंडियन एक्सप्रेस’नंतर ‘डेली’, ‘फ्री प्रेस जर्नल’, ‘सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी’मध्ये.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नोकरी संपवून त्यानं मुक्त पत्रकारिता सुरू केल्यानंतर तर त्याचे लेख प्रसिद्ध करण्याची उत्सुकता किती वृत्तपत्रांना, नियतकालिकांना आणि प्रकाशकांना होती, ते प्रकर्षानं जाणवलं. त्यानंही त्याच्या परीनं त्यांचे प्रस्ताव मान्य केले. त्याचे लेख प्रसिद्ध करणारी दैनिकं, साप्ताहिकं, नियतकालिकं यांची यादी बहुधा त्याच्या वयाच्या जवळपास असावी. त्यात मराठीतील बहुतेक अव्वल दैनिकं, साप्ताहिकं आणि मासिकांचा समावेश आहे. त्याच्या ‘गाये चला जा’ व ‘यादों की बारात’ या पुस्तकांचे आणि अनेक लेखांचे गुजराlr आणि हिंदीतील अनुवादही मराठीएवढेच वाचकप्रिय झाले आहेत. त्याचबरोबर त्याच्या ‘यादों की बारात’ या लोकप्रिय लेखमालिकेचं प्रसारण इंग्रजीमधून संकेतस्थळावरवरही झालं आहे.

बरेच लेख तयार झाले आणि ते वाचकांनाही आवडत गेले, त्यामुळे त्यांची पुस्तकं बनणं स्वाभाविक होतं आणि तशी ती प्रकाशित झालीही. त्याचे प्रकाशकही बरेच आहेत. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर अगदी विनासायास पुस्तकांचं अर्धशतक पार केलं. ‘लता’ हे त्याचं सर्वांत ताजं पुस्तक. त्याच्या पुस्तकांत चित्रपट, क्रिकेट, सिनेसंगीत यांबरोबर व्यक्तिचित्रं, रहस्यकथा, प्रवासवर्णनं, सदरांद्वारे केलेलं ललितलेखन, एकपात्रीचं अनुभव कथन, एकपात्रीची संहिता आणि समग्र संकलन यांचा समावेश आहे. त्याचं आत्मचरित्रपर पुस्तकही वाचकांना आवडलं होतं.

या पुस्तकांच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. उपलब्ध नसणाऱ्या काही पुस्तकातील लेख इतर पुस्तकांत समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘वेचक शिरीष कणेकर’ २००१मध्ये प्रकाशित झालं आणि दोनच वर्षांनंतर साठी गाठल्यानंतर (तेव्हा एक कार्यक्रम अनेक बड्या कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात झाला होता), त्यानं आत्मवृत्तपर - आत्मचरित्र नाही – ‘डॉ. कणेकरांचा मुलगा’ हे पुस्तक लिहिलं. त्या वेळी प्रस्तुत लेखकानं ‘डॉ. कणेकरांचा मुलगा आणि डॉ. कणेकरचा बाप’ असा लेखही लिहिला होता.

स्वतःबाबत लिहिणं ही एकप्रकारे लेखकाची परीक्षाच असते, कारण त्याला त्यात काय सांगायचं आणि काय नाही, हा विचार करावा लागत असावा. शिरीषनं मात्र स्वतःची ओळख खऱ्या अर्थानं करून दिली आहे. त्यानं स्वतःच्या स्वभावाबाबत सांगताना प्रांजळपणे आपले दोषही सांगितले. त्याबरोबर स्वतःवरील विनोदही आपल्याच चालीत केले. त्याची दोन उदाहरणे, ‘माहीमचा द्वाड पोरगा’ या ‘गोतावळा’ या पुस्तकातील लेखातील -

“आपण वयाच्या मानाने खूपच तरुण दिसतो असा शिरीषचा आणखी एक स्वतःविषयी गोड (गैर)समज आहे. अनेक थपडा खाऊनही तो या मताला घोरपडीसारखा चिकटून बसलाय. तो लिहितो : पुण्यातील एका लग्नात एका गृहस्थाने त्याला त्याच्या कॉलेजात जाणाऱ्या मुलीकडे पाहून निरागसपणे विचारले होते, ही तुमची नात का?  शिरीष सटपटला. मुलीकडे बघायचं धैर्य त्याला झालं नाही. तिने मात्र कर्तव्य भावनेनं ही घटना वऱ्हाडात पसरवली. दूरदशर्नवरील एक खरीखुरी तरुण वृत्त-निवेदिका त्याला एकदा म्हणाली, अय्या तुमचा मुलगा डॉक्टर आहे? एवढा मोठा मुलगा आहे तुम्हाला? वाटत नाही. शिरीषने घरी आल्या आल्या आपल्याला मिळालेला कॉम्प्लिमेंट सांगितला. पोट दिसलं नाही वाटतं तिला? शिरीषची मुलगी कम नात दुष्टपणे म्हणाली. पांढरे केसदेखील दिसले नाही. आंधळीच दिसते. बातम्या कशा वाचते कोण जाणे! मुलीची आई जास्तच दुष्टाव्याने म्हणाली.” यावरून वाचकांना अंदाज येईल.

केवळ लेखनावर समाधान न मानता त्यानं मराठीत ‘स्टँड अप कॉमेडी’ हा एकपात्री प्रकार रंगमंचावर प्रथमच सादर केला. मुंबईतील दीनानाथ नाट्यगृहात, ७ नोव्हेंबर १९८७ रोजी. नाव ‘माझी फिल्लमबाजी’. त्यानंतर ‘फटकेबाजी’, ‘कणेकरी’ हे त्याचे स्टँड अप कॉमेडीचे प्रयोग महाराष्ट्रासह इतर राज्यांत आणि अनेक देशांत गाजले. त्या कार्यक्रमांचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकण सारं काही शिरीषचंच. त्यानिमित्तानं केलेल्या परदेश दौऱ्यांच्या अनुभवावरून त्यानं प्रवासवर्णनं लिहिली. तिकडे त्याला भेटलेले अनेक जण त्याचे सुहृदच बनले. त्यातल्या काहींबाबत आपण त्याच्या सदरांत वेळोवेळी वाचलंच आहे. एक महत्त्वाची नोंद म्हणजे त्याच्या या कातरवेळीचे प्रयोग मात्र केवळ परदेशातच झाले. आपल्याकडे गंभीर प्रकार फारसे आवडत नसावेत, असं त्याला वाटत होतं की, काय, कोण जाणे.

लता मंगेशकरबरोबरचं त्याचं वेगळंच नातं होतं. वयातील फरक त्यांच्या या नात्यात कधीच आडवा आला नाही. त्यांच्यात झालेली संभाषणं वाचताना अनेकांना त्याचा हेवा नक्कीच वाटला असेल. कारण अशा महान गायिकेबरोबर एवढं मोकळेपणानं, अगदी बरोबरीच्या नात्यानं विनासंकोच गप्पा करणं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम, आपुलकी आणि बरोबरीच्या नात्यानं गेलेल्या अनेकविध विषयांवरील गप्पा, असं हे आगळं नातं. तीही अगदी काहीही संकोच न करता मनमोकळेपणानं त्याच्याशी गप्पा मारत असे. त्या वेळी दोघांनाही वेळेचं बंधन नसे.

त्याची आता अमेरिकेत असलेली मुलगी श्वेता तर लहानपणापासून लताला ‘माय फ्रेंड’ असंच म्हणायची आणि लताला ते मनापासून आवडायचं. त्यावरून ती शिरीषला श्वेतावर रागावूनही देत नसे. याच अधिकारानं तिनं श्वेताच्या लग्नात ‘नो प्रेझेंटस प्लीज’, ही सूचनावजा विनंती धुडकावून तिला सुंदर प्रेझेंट दिलं, अन म्हणाली- ‘मी तिची खास फ्रेंड आहे. मला तुमच्या सूचना लागू पडत नाहीत.’ ही हकीगत त्याच्याच शब्दांत वाचायला हवी. एकदा  त्याला सहज म्हटलं की, ती तर तुझी गॉडमदर आहे. त्याला ते मनापासून आवडलं.

सख्ख्या आईच्या आठवणी नसल्याचं त्याचं दुःख त्याच्या लेखनातून जाणवत राही. अनेकदा डोळ्यांत पाणी आणे. कदाचित या प्रकारे आईची माया मिळतीय, याचं त्याला नक्कीच समाधान मिळत असावं. दीर्घकाळ अमेरिकेत असणाऱ्या त्याच्या मुलानं, डॉ. अमरनं त्याला अनेक दुर्मीळ गाणी पाठवली. ‘हे ऐका’ वगैरे तो अधिकारानं सांगे/लिही. कारण त्यालाही चित्रपट संगीताची आवड आणि जाण होती. स्मरणशक्ती तर अशी की, अनेकदा शिरीष काही आठवलं नाही, तर त्याचीच मदत घेई. खुद्द लतालाही ‘मला आशाच जास्त आवडते’, असं सांगणाऱ्या अमरच्या सुगरण आईलाही लता, आशा, सुनील गावस्कर अशांची दाद मिळाली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

शेवटच्या काळात आता येणारे, गप्पा करणारे इतकंच काय फोन करणारेही कमी झालेत, याचं त्याला वाईट वाटे. खरं तर अशा गप्पांच्या मैफली हे त्याचं ‘टॉनिक’ होतं. अनेकदा तो आजारी असताना भेटायला गेलं की, त्याचं आजारपण कुठं जायचं कुणास ठाऊक! कदाचित सध्या तो अनेकदा काही ना काही त्रास असल्याचं सांगतो त्याला हेच, गप्पाष्टकांना दुरावल्याचं कारण असावं. कुणा दोस्ताचा फोन आला की, त्याला खूप समाधान वाटे. त्याच्या बोलण्यातूनही ते जाणवतं. प्रत्यक्ष भेटण्याची उणीव अशी फोननं भरून काढली जाई.

वयपरत्वे त्याच्या लेखनात थोडा हळवेपणा, सततच्या प्रकॄतीच्या तक्रारींमुळे निराशा, काळजी, बिछडे सभी बारी बारी या गाण्यात म्हटल्याप्रमाणे सोडून गेलेले अनेक स्नेही पुन्हा दिसणार नाहीत, म्हणून हळहळ दिसे. पण त्याचे वाचक त्याला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्नही करत. मग तोही नव्या जोमात पूर्वीच्याच ताजेपपणानं लिही. वाचकांना हसवण्याचा त्याचा धंदा सुरू ठेवी.

त्याच्या जेष्ठपणानं त्याला आशीर्वाद देता येत नसे आणि आता ‘जीवेत शरद शतम’ अशा सदिच्छा व्यक्त करून उपयोग नाही! त्याच्या ‘फिल्लमबाजी’च्या भाषेत थोडे शब्द बदलून म्हणायचं, तर ‘तुम याद रहोगे हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!’

.................................................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......