वाल्मिक थापर : या वाघाची गर्जना आता शांत झाली आहे, पण तरीही त्याचा प्रतिध्वनी सदैव उमटत राहणार आहे…
संकीर्ण - श्रद्धांजली
आरती कुलकर्णी
  • वाल्मिक थापर ( जन्म - १९५२, निधन - ३१ मे २०२५)
  • Fri , 06 June 2025
  • संकीर्ण श्रद्धांजवी वाल्मिक थापर Valmik Thapar वाघ Tiger

‘‘रणथंबोरच्या जंगलात सकाळी जीपने एक फेरफटका मारून येऊन मी जोगीमहलच्या बाल्कनीमध्ये रेंगाळत होतो... एवढ्यात ‘चेंगिझ’ एका सांबराचा पाठलाग करत सरोवराच्या काठापाशी येऊन पोहोचला. रणथंबोरचा बलाढ्य वाघ होता तो. ते शिंगंवालं सांबर आणि चेंगिझ यांच्यात सरोवराच्या पाण्यात अशी काही झटापट झाली की, तळ्यात जोरदार फवारे उठले. त्याचा फायदा घेत सांबर मोठी उडी घेऊन पाण्यातून निसटून गेलं. चेंगिझची शिकार हुकली होती, पण त्याचा रुबाब कायम होता. सांबर त्याच्या हातून सुटून जाताना सरोवराच्या काठावर अनेक प्रकारचे चित्कार उमटले. तळ्याकाठच्या झाडांवरची माकडं, रानातले मोर यांच्यासह आणखीही काही पक्षी त्या गजरात सामील झाले होते... चेंगिझने एक हलकासा विराम घेतला. डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं आणि आपणच निर्माण केलेल्या या गदारोळातून तो सरोवराकाठच्या गवतात दिसेनासा झाला. रणथंबोरच्या सरोवरावर रंगलेल्या एका महानाट्याचा मी साक्षीदार झालो होतो... !”

रणथंबोरच्या वाघांचं असं जिवंत दर्शन घडवणारे व्याघ्रतज्ज्ञ वाल्मिक थापर आता आपल्यात नाहीत.  पण या वाघासारख्या माणसाने गेली पाच दशकं वाघांच्या संवर्धनासाठी, भारतीय वाघांचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. ‘टायगर मॅन ऑफ इंडिया’ अशी वाल्मिक थापर यांची ओळख होती. जंगलामध्ये पायी फिरून एवढे वाघ पाहिलेला मी जगातला एकमेव माणूस असेन, असं ते अभिमानाने म्हणायचे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लघुपटनिर्माते असलेले वाल्मिक थापर १९७६मध्ये दिल्लीहून ट्रेनचं तिकीट काढून राजस्थानमधल्या रणथंबोरला गेले. तेव्हा ते अवघे २३ वर्षांचे होते. ते सांगतात, ‘‘पहिल्याच भेटीत मी या जंगलाच्या प्रेमात पडलो. याच जंगलात मी पहिल्यांदा वाघ पाहिला तेव्हा त्याच्या पट्टेरी आकृतीचं ओझरतं दर्शन मला झालं होतं. त्याचे पट्टे माझ्या डोळ्यांत, मनात, श्वासात भिनत गेले. नंतर हाच वाघ मी तिथे तब्बल ३० दिवसांनी पाहिला. त्या काळी जंगलात सहजासहजी वाघाचं दर्शन होत नसे.’’

रणथंबोरच्या जंगलाचे संचालक फतेहसिंग राठोड यांच्याशी वाल्मिक थापर यांची भेट झाली आणि त्यांना गुरू मिळाला. फतेहसिंग यांनी त्यांना ‘पद्मिनी’ वाघिणीची अनेक रहस्यं सांगितली. याच पद्मिनी वाघिणीचा पाठलाग करताना वाल्मिक थापर यांचं वाघांचं संशोधन सुरू झालं. 

वाघ शिकारीसाठी दबा धरून बसतो आणि त्याच्या भक्ष्यावर झडप घालतो. तो चित्त्यासारखा भक्ष्याचा पाठलाग करत नाही, हे सगळ्यांना माहीत होतं. पण रणथंबोरच्या जंगलात वाघ भक्ष्याचा पाठलाग करत सरोवरात उतरत असे. त्याच्या अशा शिकारीचं छायाचित्रण वाल्मिक थापर यांनीच पहिल्यांदा केलं आणि जगाला वाघाच्या अनोख्या क्षमतेचं दर्शन घडलं. याच जंगलात पायी फिरून वाघाचा माग घेताना एकदा एका वाघाने वाल्मिक थापर यांच्या डोक्यावरून झेप घेऊन ती वाट ओलांडली होती! कितीतरी वेळा त्यांचा वाघांशी असा थेट सामना झाला आहे. ‘आम्हाला घाबरवण्यासाठी वाघाने बऱ्याचदा आमच्यावर हल्ल्याचा पवित्रा घेतला, पण कधीही हल्ला केला नाही,’ असं ते सांगत.

रणथंबोरचे ढाणे पट्टेरी वाघ, वाघिणी आणि त्यांच्या बछड्यांच्या रोमहर्षक कहाण्या थापर यांनी नोंदल्या आहेत. बछड्यांचा जन्म झाल्यानंतर वाघीणच त्यांचं संगोपन करते. त्यांना शिकार करायला शिकवते. पण याच जंगलात वाल्मिक थापर यांनी वाघ, वाघीण आणि त्यांचे बछडे असं छायाचित्र काढलं होतं. ‘मी कुटुंबवत्सल वाघही पाहिला आहे,’ असं ते म्हणत.

वाघाच्या गुहेमध्ये बछड्यांच्या जन्मापासून त्यांचं शिकारीचं प्रशिक्षण, पावसाळ्याआधी आणि नंतर पुन्हा जंगलात हद्दी आखण्याच्या त्यांच्या सवयी, याबद्दलची निरीक्षणं वाल्मिक थापर यांनी ‘माय टायगर फॅमिली’ या लघुपटात सांगितली आहेत. याच कुटुंबातल्या दोन सदस्यांची त्यांच्या कातडीसाठी आणि वाघनखांसाठी झालेली शिकारही त्यांनी पाहिली आहे...

१९३०च्या सुमाराला भारतात ४० हजार वाघ होते. पण शिकारीमुळे वाघांची संख्या घटत चालली होती. १९७३मध्ये वाघांना वाचवण्यासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ची स्थापना झाली. वाघांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली. वाघांसाठी भारतभरात अभयारण्यं घोषित करण्यात आली. हा मान रणथंबोरलाही मिळाला.

वाल्मिक थापर सांगतात, ‘‘फतेहसिंग राठोड मला म्हणायचे, एक दिवस रणथंबोर जगाच्या नकाशावर येईल. जगभरातून लोक इथे वाघ बघायला येतील. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप हसू यायचं. फतेहसिंग... हे १९७७ आहे. या जंगलात आपण दोनदोन महिने वाघ बघत नाही.कसे येणार लोक?  फतेहसिंग काही बोलत नसत. तू बघत राहा... एवढंच म्हणत.’’

‘प्रोजेक्ट टायगर’ घोषित झाल्यानंतर रणथंबोर खऱ्या अर्थाने आकार घेऊ लागलं. जंगलात वाघासाठी काम सुरू झालं. सरोवरातून जलपर्णी काढण्यात आली. इथे राहणाऱ्या एक हजार गावकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांना बाहेर नेऊन राहायला जागा देण्यात आली. हे काम अजिबात सोपं नव्हतं, पण फतेहसिंग यांनी वाघ आणि या जंगलातली माणसं या दोघांनाही विश्वास दिला. रणथंबोरच्या जंगलात वाघ निर्धास्तपणे फिरू लागले. रणथंबोरच नव्हे, तर भारतभरातल्या जंगलात १९९०पर्यंत वाघांची संख्या ४ हजारांवर गेली होती!

.................................................................................................................................................................

वाल्मिक थापर यांच्या ‘My Tiger Family With Valmik Thapar’ या लघुपटाचा ट्रेलर

https://youtu.be/HMqiYfK22Y4?si=TfJQQf7dx6-CO_e0

प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी वाल्मिक थापर यांची बीबीसीसाठी घेतलेली मुलाखत 

https://youtu.be/SIPgjNZesrw?si=eW4rGxxGOcIaq26R

.................................................................................................................................................................

वाघांवर संशोधन करत असतानाच वाल्मिक थापर अथकपणे लेखन, छायाचित्रण, लघुपटांचं काम करत राहिले. ‘लिव्हिंग विथ टायगर्स’, ‘द सिक्रेट लाइफ ऑफ टायगर्स’, ‘सेव्हिंग वाइल्ड इंडिया’ अशी १४ पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. बीबीसीने भारताच्या वन्यजीवनावर ‘लँड ऑफ द टायगर’ ही मालिका केली त्या मालिकेचे वाल्मिक थापर सूत्रधार होते.

दऱ्याखोऱ्यांमधल्या निबीड जंगलातून कॅमेरा फिरत येतो... लांबरुंद पंखांच्या गरुडाची भरारी टिपतो, गूढ संगीत ऐकू येत असताना त्या गरुडाच्या नजरेतून जंगलाकडे, झाडांच्या दाटीकडे आपण पाहतो, तेव्हा विस्मयचकित व्हायला होतं. अशाच डोंगरकड्यावरून वाघासारखंच रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले वाल्मिक थापर भारतातल्या जंगलांची कहाणी सांगतात, तेव्हा आपल्याही मनात वाघासारखी हिंमत येते.

वाल्मिक थापर यांना वाघांसाठी झटणारी ‘वन मॅन आर्मी’ असं म्हणत असत. त्यांचा हा प्रवास एकांड्या शिलेदारासारखा असला, तरी या यात्रेत त्यांनी जगभरातल्या लोकांना सहभागी करून घेतलं होतं. वाघांसाठी नेमलेल्या अनेक कृतीदलांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. वाघाच्या संरक्षणासाठी बड्याबड्या लोकांशी पंगा घेतानाही ते मागेपुढे पाहत नसत.

राजस्थानच्या ‘सरिस्का नॅशनल पार्क’मधून सगळे वाघ गायब झाले, तेव्हा वाघांच्या संवर्धनासाठी एक कृती दल बनवण्यात आलं. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पुढाकार घेऊन व्याघ्रतज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. सरिस्कासारखी स्थिती दुसऱ्या जंगलांमध्ये येऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता. आपल्या जंगलांमध्ये वन्यजीव आणि आदिवासी यांच्यात सहजीवन असावं, असं या कृतीदलाच्या अध्यक्ष सुनीता नारायण यांचं मत होतं. पण वाल्मिक थापर यांनी त्याला कडवा विरोध केला. वाघाला वाचवायचं असेल, तर जंगलातले काही भाग फक्त वाघांसाठीच असले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘लिव्ह द टायगर अलोन’ हा त्या वेळी त्यांनी लिहिलेला एक लेखही खूप गाजला होता. नंतर मात्र वाल्मिक थापर यांनी लोकांच्या सहभागातून वाघांचं संवर्धन या संकल्पनेचा स्वीकार केला.

वाघ हा भारतीय जंगलांचा आत्मा आहे, असं सांगताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येई. वाघाच्या जंगलातून भारतातल्या ३०० नद्यांचा उगम होतो. वाघ आणि वाघाचं जंगल नष्ट झालं, तर आपलं जीवनच धोक्यात येईल, असं ते कळकळीने सांगायचे. वाघ महत्त्वाचा आहे, तसंच आपल्या अंगणातली छोटीशी चिमणी सांभाळण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे, गिधाडांसारख्या निसर्गाच्या रक्षकांना आपण राखलं पाहिजे, हेही ते सांगत. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

वाल्मिक थापर व्याघ्रतज्ज्ञ होते, पण एकूणच वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांच्या शब्दाला मान होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातल्या ‘कुनो नॅशनल पार्क’मध्ये चित्ते आणण्याचा प्रकल्प सुरू केला, त्यालाही वाल्मिक थापर यांनी भीडभाड न ठेवता विरोध केला. आफ्रिकेतले चित्ते आणि आपल्याकडे आधी असलेले आशियाई चित्ते यांच्यात फरक आहे. दक्षिण आफ्रिका, नामिबिया इथलं हवामान आणि आपल्याकडचं हवामान वेगळं आहे. हे चित्ते इथे तगू शकणार नाहीत, असं त्यांचं थेट म्हणणं होतं. चित्त्यांच्या नव्या प्रकल्पापेक्षा वन्यजीव आणि माणूस यांच्यातल्या संघर्षावर उपाय काढण्यासाठी आपण झटलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. 

वाल्मिक थापर त्यांच्या भूमिका अतिशय आक्रमकपणे मांडत. ते फटकळ आणि हेकेखोर आहेत, अशी टीका त्यांच्यावर होत असे. त्यालाही त्यांचं ठाम उत्तर होतं. ‘‘वाघाला वाचवा, जंगलं वाचवा, असं मी तुम्हाला गुळमुळीत शब्दांत सांगत राहिलो, तर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचणारच नाही, पण हेच मी आक्रमक होऊन, ठामपणे आणि मोठ्या आवाजात सांगितलं तरच तुम्ही लक्ष देणार आहात, हे मला माहीत आहे. त्यासाठी मला वाईटपणा घ्यावा लागला तरी बेहत्तर!’’ असं ते डोळ्यात डोळे घालून सांगत असत.

वाल्मिक थापर यांच्या निधनानंतर जगभरातल्या वन्यजीव तज्ज्ञांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण त्यांच्यासोबत वाघाची अनेक जंगलं पालथी घालणारे ज्येष्ठ व्याघ्रतज्ज्ञ डॉ. उल्हास कारंथ यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ते म्हणतात, ‘‘या वाघाची गर्जना आता शांत झाली आहे, पण तरीही भारताच्या जंगलांमध्ये त्याचा प्रतिध्वनी सदैव उमटत राहणार आहे....”

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी मुक्त पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......