भंवर मेघवंशी लिखित ‘आय कुड नॉट बी हिंदू’ या इंग्लिश पुस्तकाचा ‘मी हिंदू असू शकत नाही’ हा लेखक-संपादक शेखर देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद ‘मधुश्री पब्लिकेशन’तर्फे नुकताच प्रकाशित झाला. वर्तमानातल्या धर्मकेंद्री राजकारणातून आलेल्या दुंभलेपणाची पाळेमुळे उघड करणाऱ्या प्रस्तुत पुस्तकाला प्राचार्य हिंमाशू पंड्या यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्याचा हा अंश...
..................................................................................................................................................................
‘‘माझी आणि माझ्या कुटुंबाची कहाणी लोकांचे मनोरंजन करणारी कधी नव्हतीच. ते तर भारतातले ज्वलंत वास्तव होते.
नव्या देशात गेल्यानंतर सुदैवाने मला काही नवे मित्र आणि मैत्रिणी लाभल्या. त्यांच्यामुळेच स्वअस्तित्वाचे भान जागे झाले. तोवर माझ्या कुटुंबीयांवर अन्याय झाला होता. आम्ही तो सहनही केला होता. नव्हे, आम्हाला तसे सहन करणे भाग पडले होते. पुढे त्या अन्याय-अत्याचाराने बरबटलेल्या भूतकाळातूनच कागदावर उतरवता येतील, दुसऱ्याला सांगता येतील, अशा वास्तवदर्शी कहाण्या आकारास येत गेल्या.’’
- ‘अँट्स अमाँग एलिफंट्स’ - सुजाता गिडला (अमेरिकास्थित अनिवासी भारतीय लेखिका)
हिंदी भाषकांच्या जगतामध्ये आजवर असा एक गैरसमज पोसला गेलेला आहे की, चरित्र किंवा आत्मचरित्र हे मुख्यतः महान वा थोर लोकांचेच असते. याच थोर लोकांनी आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाला दिवाणखान्यात मांडण्यात येणाऱ्या एखाद्या शोभिवंत वस्तूंप्रमाणे आम्हा वाचकांपुढ्यात मांडले आहे. मागे एका सुपरिचित कवीमहोदयांनी तत्कालीन पंतप्रधानांशी आपली जवळीक असल्याचे सांगत एका कार्यक्रमात पंतप्रधानांच्या घरी आलेल्या इतर थोर आमंत्रितांचा दाखला देताना, डायनिंग टेबलाच्या उजव्या बाजूला कोण थोर बसले होते आणि डावीकडे कोण बसले होते, याची साग्रसंगीत गोष्टच सांगितली होती. इतकेच कशाला, एका विख्यात समीक्षकाने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी, आपण अमूक साहित्यिकाला तमूक पुरस्कार कसा मिळवून दिला, अमूक महोदयांना तमूक विद्यापीठामध्ये कसे नोकरीस लावले, हे सगळे अगदी रंगवून-रंगवून सांगितले होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आत्मचरित्रात थोडेफार आत्मप्रेम, थोडीफार आत्मस्तुती एकवेळ समजूनही घेता येऊ शकते, परंतु ही आत्मस्तुतीदेखील नाही. ही तर व्यवस्थेच्या यंत्रणेत, व्यवस्थेला अपेक्षित असलेले अंग होऊन प्रचलित खाचेत सामावून जाण्याची शरणागत गोष्ट आहे. त्यामुळे ज्या आत्मचरित्रामध्ये लेखकाने जगलेला काळ आणि त्याच्या आसपासचा समाज या दोहोंचे प्रतिबिंब उमटत नाही, जे आत्मचरित्र आयुष्याला स्पर्शून गेलेल्या इतरांना आपल्यात जाणीवपूर्वक सामावून घेत नाही, त्या कथनाला अर्थ तो काय राहतो? शेवटी, अमूक, तमूक आणि ठमूक यांच्याशिवाय तुम्ही-आम्ही हे आत्मचरित्र वाचायचे तरी कशाला?
मात्र, दलित आत्मकथांनी या दृष्टीकोनात अमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आत्मचरित्राच्या नावाखाली वैयक्तिक सुख-दुःखाचे कढ काढणार्या हिंदी जगताला या दलित आत्मकथांनी खरा अर्थ मिळवून दिला आहे. ‘स्व’च्या माध्यमातून या आत्मकथांनी अन्याय-अत्याचाराविरोधात लाखो लोकांना बंड करण्याची प्रेरणा देणाऱ्या दलित समाजाच्या व्यथा-वेदना जगापुढे मांडल्या आहेत. त्यातही ओमप्रकाश वाल्मिकी, शिवराज सिंग बेचैन, कौशल्या बैसंत्री आणि सुरजपाल चौहान यांच्यासारख्या लेखकांनी लिहिलेल्या अस्सल आत्मकथांनी हिंदी जगतातले चित्र पालटून टाकले आहे.
याच मालिकेत आता भंवर मेघवंशी यांचे आत्मकथन आपल्या पुढ्यात उलगडत आहे.
एरवी, दलित आणि स्त्री आत्मकथांमध्ये समकालीन राजकीय संदर्भ तसे अभावानेच आढळतात. ते एका अर्थाने स्वाभाविकही आहे म्हणा! याचे एक कारण, त्यांचे जगणे मनाचा कोंडमारा घडवून आणणाऱ्या ज्या सामाजिक स्थितीत बंदिस्त झालेले असते, बहुतांशी त्याच्याशीच संबंधित तपशील आत्मकथेत येत असतात. त्या संदर्भाने पाहता, मेघवंशी यांचे हे कथन आगळे आहे. आपण या आत्मकथनास डॉ. तुलसीराम यांच्या शोषित दलित समाजाचे नागडे सत्य जगापुढे आणणाऱ्या ‘मुर्दहिया’च्या रांगेत सहज बसवू शकतो. मेघवंशी हे स्वतः लोकचळवळीतले कार्यकर्ता, पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या या आत्मकथनात राजस्थानातल्या गेल्या तीन दशकांतल्या बदलत्या राजकीय स्थितीगतीचेही आपल्याला दर्शनही घडत जाते.
या पुस्तकाचे शीर्षक जितके लक्षवेधी आहे, तितकेच ते सूचकही आहे. त्यावरून लेखकावर लहानपणासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विलक्षण प्रभाव होता, हे सहजपणे ध्यानात येते. अर्थातच, हा प्रभाव प्रत्यक्षात इतका गहिरा होता की, बाबरी मशीद विध्वंसाच्या काळ्या अध्यायाचाही ते एक सक्रीय भाग बनले होते, हेही वास्तव त्यातून पुढे येते. मात्र, हा त्यांचा भूतकाळ आहे आणि आता तो खूप मागे पडलेला आहे. मेघवंशी आता वंचित-शोषित वर्गांच्या मानवी हक्क आणि अधिकारांसाठी लढा देणारे राजस्थानातले लढाऊ बाणा असलेले आघाडीचे कार्यकर्ता म्हणून प्रसिद्धीस आले आहेत. मानवी हक्क-अधिकारासंदर्भातले त्यांचे म्हणणे, त्यांचे विचार सर्वदूर गांभीर्याने ऐकले जाताहेत. त्यांचा हा संघर्षमय प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच रोमांचक आहे.
प्रस्तावनेचे वाचन झाल्यानंतर हा रोमांचक प्रवास तुम्ही स्वतः अनुभवणार आहातच. त्यामुळे इथे आत्मकथेचे सार सांगण्याची चूक मला जराही करायची नाही. तुमच्या मनातली अधिरता आहे, तशीच ठेवून एक-दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मात्र मी येथे नक्कीच चर्चा करणार आहे.
आपल्याकडे, वाचक हा सर्वज्ञानी, सर्वसाक्षी असतो, असे एक मिथक नेहमी पसरवले जाते. परंतु, मेघवंशी यांची ही आत्मकथा वाचल्यानंतर तुम्हाला वाचक म्हणून अशा भयावह वास्तवाचे दर्शन घडेल, जे तुम्हाला यापूर्वी ठाऊक नव्हते. अशा वेळी हे खात्रीपूर्वक म्हणता येते की, तुम्ही सवर्ण कुटुंबातले आहात आणि कमालीच्या सुरक्षित वातावरणात वाढलेले आहात. अशात, हा तुमच्यासाठी डोळे उघडणारा, दृष्टी विस्तारणारा आगळा अनुभव ठरू शकतो. पण असे घडताना माझे हेही म्हणणे आहे की, आत्मकथनातून दृग्गोचर होणाऱ्या शोषण, अत्याचार आणि आत्मवंचनेच्या वेदनेशीही एकरूप होण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहावा. मात्र, ही आत्मकथा वाचल्यानंतर ‘हे तर आपल्याही आयुष्यात घडले आहे’, असे तुम्हाला वाटले, तर याचा अर्थ तुम्ही नक्कीच वंचित समाजाचा एक भाग आहात, असा आहे. म्हणूनही ही आत्मकथा वाचणे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.
दलित आत्मकथनात अत्याचाराच्या घटनांचे चित्रण ही स्वाभाविक नि अपरिहार्य बाब आहे. परंतु मला विचाराल, तर हे चित्रण सहानुभूती मिळावी, आपली कुणीतरी कीव करावी, यासाठी केले जात नाही. खरे तर झालेल्या अपमानाबद्दल लिहिता येणे, अपमानाचे प्रसंग कथन करणे, हेच मुळात लेखकाच्या पातळीवर मोठे धाडस ठरते. संबंधित लेखकामध्ये असे धाडस कधी येते, तर संवेदनशील लेखकाच्या मनामध्ये दीर्घकाळ संघर्ष-संवाद सुरू असतो. प्रश्नांचे गुंते तयार होत असतात. या आत्मसंवादातूनच त्याला याची जाणीव होत जाते की, त्याने अनुभवलेली वेदना ही केवळ त्याची एकट्याचीच नाहीये, तर हा अमानुषतेची पातळी गाठणाऱ्या जातीव्यवस्थेचा त्याच्यासारख्या असंख्यांना मिळालेला मोठाच अभिशाप आहे.
या आत्मकथेत एक अत्यंत करुण प्रसंग आलेला आहे. प्रस्तुत प्रसंग भंवर मेघवंशी यांच्या मनातून रा. स्वं. संघ उतरल्याचा निर्णायक क्षण होता, असेही आपण म्हणू शकतो. हा प्रसंग डोळ्यांत पाणी आणणारा, निःशब्द करणारा आहे. या प्रसंगाने दिलेल्या वेदनेने भंवर मेघवंशी यांना इतके डसले की, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचाही प्रयत्न केला.
इथे अचानक मला रोहितची आठवण येते. रोहित म्हणजे, हैदराबाद विद्यापीठात वसतीला असलेला आंबेडकरवादी विद्यार्थी रोहित वेमुला. बोलून-चालून रोहितने आत्महत्या केली होती. परंतु ती आत्महत्या नव्हती, तर एक संस्थात्मक हत्या होती. रोहित या संस्थात्मक हत्येचा बळी ठरला होता, तर भंवर मेघवंशी संस्थात्मक हत्येपासून थोडक्यात बचावले होते.
देशात असे अनेक रोहित वेमुला आहेत, जे रोज कणाकणाने मरताहेत. कारण झालेल्या अपमानाला ते आपले विधिलिखित किंवा सामाजिक मापदंड मानत आले आहेत. या पार्श्वभूमीवर भंवर मेघवंशी यांचे हे आत्मकथन म्हणजे, वेदनेपासून सुरू झालेली आणि विद्रोहापर्यंत जाऊन पोहोचलेली लक्षवेधी संघर्षयात्रा आहे. ही संघर्षयात्रा शोषितांच्या व्यथेला कारणीभूत ठरलेले वर्णवादी कारस्थान उघड करत, खऱ्याखुऱ्या शोषकांचा मुखवटा खेचून काढणारी आहे. आपल्याकडच्या ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रीच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाला ‘इभ्रत लुटणे’ यासारखे शब्द योजले आहेत, तर दलितांची सर्वांसमक्ष बेअब्रू करणाऱ्यांना ‘दबंग’ म्हटले आहे. आमची भाषासुद्धा सरंजामदारी व्यवस्थेची संगत करणारी आहे. अशा प्रसंगी या स्थितीला जबाबदार असणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेऊन, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकणाऱ्या अस्सल अस्मितेची खूप आवश्यकता आहे.
मेघवंशी यांचे हे आत्मकथन नेमकी निकड भागवताना दलितांमधल्या अस्तित्वाला आकार आणि अर्थ देणारी अस्मिता जागवते. याचमुळे वंचित समाजातल्या तरुण पिढीने ही आत्मकथा वाचणे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.
अर्थात, इथे एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार होणेही तितकेच गरजेचे आहे. जर संबंधित घटना घडलीच नसती, तर भंवर मेघवंशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच राहिले असते का? इतिहासकार ई. एच. कार यांनी म्हटले आहे की, ‘कोणतीच घटना अशी अचानक घडत नसते. घटनेला धग देणारी परिस्थिती निर्माण होते, तेव्हाच ती घटना पूर्णांशाने आकार घेते. आपल्याला तो केवळ योगायोग भासतो, परंतु तसा तो नसतो.’ ते समजून घेण्यासाठी मेघवंशी यांचे आत्मकथन सर्वांत उत्तम उदाहरण ठरावे.
‘मी हिंदू असू शकत नाही, ही भंवर मेघवंशी यांची दलित अस्मितेची टप्प्याटप्प्याने जाणीव होत तिचा स्वीकार करण्याच्या संघर्षमय प्रवासाची चित्तवेधक गाथा आहे. पुस्तकाच्या प्रारंभीची काही प्रकरणे तुम्ही वाचली तर तुम्हाला हे ध्यानात येईल की, मुस्लीम समाजाबद्दल ते अशा भाषेचा वापर करतात, जी भाषा त्या वेळेसच्या त्यांच्या कट्टर नि कडवट विचार आणि कृतीतून आलेली होती. हा त्यांचा प्रांजळपणा आहे. ते आपल्यातले वैगण्य न लपवता तेव्हाचे कट्टरपंथी भंवर आणि नंतर हळूहळू मतपरिवर्तन झालेले मानवतावादी भंवर यांचे दर्शन घडवत जातात.
या सगळ्यांत आपण भंवर यांना सवाल करताना, शंका उपस्थित करताना आणि मग आपल्यावर अन्याय होणे स्वाभाविकच आहे, असे समजून समाधान मानतानाही पाहतो. परंतु, हळूहळू मनातले बंड उफाळून येते, बुद्धीला पडणार्या प्रश्नांची संख्या वाढत जाते आणि अन्यायाची ओळख पटवून देणारी अस्मिताही त्यांच्या मनात फुलत जाते. ही दलित अस्मितेची जाणीव करून देणारी घटना जशी आधी घडायची नव्हती, तसेच मनात अस्मिता फुलल्यानंतर घटनेने आकार घेणेही मेघवंशी यांच्या संदर्भाने थांबवता येण्यासारखे नव्हते.
दलित अस्मितेचे नेमके आकलन झाल्यानंतर भंवर हे खऱ्या अर्थाने भूतकाळाच्या ओझ्यापासून मुक्त झाले. याचमुळे मुख्यतः त्यांचा संघर्ष केवळ व्यक्तिगत स्वरूपाचा राहिला नाही. दलित अस्मितेचा खरा अर्थ जातकेंद्री सुडाच्या अंधाऱ्या मार्गावरून बाहेर पडणे, असाही आहे. मी इथे भंवर मेघवंशी यांच्या या आत्मकथनातले वाक्ये उदधृत करू इच्छितो- ‘‘मी वाट्याला आलेल्या वेदना आणि पदोपदी झालेल्या अपमानाचे निमित्त करून कुणाविरोधात वैयक्तिक पातळीवरचे शत्रूत्व न राखता सामाजिक समता, अस्मिता आणि प्रतिष्ठेचा सामुदायिक लढा देण्याचे निश्चित केले. त्याचसोबत हीदेखील प्रतिज्ञा केली की, आता यापुढे रा. स्वं. संघ आणि संघ परिवाराशी संबंधित संस्था-संघटनांच्या ढोंगी विचारांचे भाषण, लेखन आणि प्रत्यक्ष कार्याद्वारे हरतऱ्हेने विरोध करत राहीन.”
या वाक्यांतला दृढनिश्चय पाहिला तुम्ही? निःसंशय भंवर मेघवंशी हे ध्येयनिष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्यातल्या या ध्येयनिष्ठेचे, दृढनिश्चयाचे एक कारण हेदेखील आहे की, देशापुढील संघाच्या धोक्याची कल्पना इतरांपेक्षा त्यांना अधिक सुस्पष्टपणे आलेली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातले कितीतरी बहुमोल क्षण निष्ठापूर्वक संघाच्या कार्यास दिले आहेत.
या आत्मकथनातला हासुद्धा एक महत्त्वाचा पैलू आहे. तो म्हणजे, ज्याला आपण ‘फर्स्ट हँड अकाउंट’ म्हणतो, तसा हा संघाच्या बहुतांशी गोपनीय असलेल्या कार्यपद्धतीचा घेतलेला अंत्यस्थ वेध आहे. त्यांनी अशा अनेक कुजबूज पातळी झालेल्या चर्चांना अत्यंत प्रामाणिकपणे वाचकांपुढ्यात आणले आहे. ते सगळे वाचल्यानंतर आजकाल व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषी आणि विखारी संदेश-प्रतिक्रियांचा उगम कुठे आहे, याचाही आपल्याला सहज उलगडा होण्यासारखा आहे.
नथुराम गोडसेची असलेली जवळीक नाकारून संघ त्यापासून स्वतःला कसे दूर ठेऊ शकला, कोणत्या हतबलतेतून संघावर आंबेडकरांना प्रातःस्मरणीय ठरवण्याची वेळ आली, आणि आंबेडकरांच्या समतावादी विचारांची संघाला किती धास्ती आहे, याचाही इथे आपल्याला अंदाज घेता येतो. तसेही संघ जेव्हा समरसतेची हाक देतो, तेव्हा त्या समरसतेचा अर्थ, वर्णव्यवस्थेने पूर्वापार ठरवून दिलेले काम प्रत्येक जातीने गपगुमान करत राहावे, असाच असतो. परंतु, इतके सगळे धोके स्पष्टपणे दिसत असूनही असंख्य तरुण, त्यातही दलित आणि आदिवासी समाजातून येणारे तरुण दरदिवशी संघाच्या जाळ्यात अकडत राहतात. याचे एक कारण, संघाची मनोमन इच्छा हिंदूंच्या हितापेक्षा सवर्णांचे वर्चस्व अबाधित ठेवण्याकडेच अधिक राहिली आहे, हे कटू वास्तव त्यांच्या अद्यापही पुरते ध्यानात आलेले नाही, हे आहे.
म्हणूनच ते कटू वास्तव निर्भिडपणे समोर ठेवणे, या आत्मकथनाचे एक वैशिष्ट्य ठरले आहे. भंवर मेघवंशी यांच्यातल्या विद्रोहाला विवेकवादी विचारांचे कोंदण लाभलेले आहे. त्यांची ही जीवनकथा आपल्याला वेदनेतून विद्रोहाकडे आणि विद्रोहाकडून विचारांकडे घेऊन जाणारी आहे.
पुस्तकातल्या उत्तरार्धात निवेदनाच्या ओघात अशा अनेक व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा उल्लेख आलेला आहे, त्यावरून हिंदू राष्ट्रात दलित-आदिवासींचे स्थान किती नगण्य आहे, याची होत जाणारी जाणीव अस्वस्थ करणारी आहे. अर्थातच, आत्मकथन हे काही एखादे टिपण वा लेख नाही. तसेही चिकित्सा किंवा विश्लेषणसुद्धा अनेकदा आत्मकथनाचे प्रवाहीपण रोखू शकते. परंतु, हे एका कार्यकर्त्याने लिहिलेले आत्मकथन आहे. त्यामुळे यात एका पाठोपाठ एक दलित अत्याचारापासून जातीय दंगलींपर्यंतच्या घटना येत-जात राहतात. त्या मांडताना भंवर मेघवंशी ज्या नेमकेपणाने विश्लेषण करत जातात, ते वाचून तुमचा तुम्हालाच शोध लागतो की, समस्येचा स्रोत कुठल्या फांदीत नव्हे तर झाडाच्या मुळांमध्ये आहे. दोषाचे मूळ कुठल्या सुट्या भागांमध्ये नाही, कॉम्प्युटरच्या मदरबोर्डमध्ये आहे.
तुम्हाला हे लक्षात येते, तेव्हा तुम्हाला याचीही जाणीव होते की, ‘राक्षस’ म्हणून दिली जाणारी शिवी भंवर यांना का सन्मान भासते आणि का म्हणून ते ‘आपका स्वर्ग आपको मुबारक, हम तो खुशी सें नरक जाने वाली गाडी में सवार है!’ असे म्हणण्याचे धैर्य राखतात.
एक शेवटचा मुद्दा. आपल्याला भूतकाळात शिरून नायक-नायिकांचा शोध घेण्याची एक समाज म्हणून विचित्रशी सवय जडलेली आहे. इतिहासातल्या गौरवगाथा आपल्या समाजाला नेहमीच भूरळ घालत आल्या आहेत. शिवाय नायक-नायिका (अर्थात, आता तर समाजाची दिशाभूल करण्यात बदनाम झालेली ‘व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटी’ भूतकाळातल्या नायकांचे कपोलकल्पित कारनामे कसेही करून खोदून काढत लोकांमध्ये पसरवत आहे.) भूतकाळातल्या असल्यामुळे त्यांनी चुकीची कामे करून आपला भ्रमनिरास करण्याचा धोकाही तसा संभवत नसतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
परंतु, हे वास्तव आपण लक्षात असू द्यावे, जेव्हा कधी कोणता देश वा समाज परिवर्तनाच्या मार्गावर असतो, तेव्हा तो आपल्या नायक वा नायिकांची निवड भूतकाळातून नव्हे, तर वर्तमानातून करत असतो. इतिहास ज्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवतो, तो खांदे आपोआप सशक्त होत जात असतात. हेही आपण ध्यानात असू द्यावे की, भारतात समतेचा लढा देणाऱ्यांचा मुख्य शत्रू ब्राह्मणी पितृसत्ता हाच आहे.
आता हा लढा एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. माझा हा विश्वास आहे की, ज्याप्रमाणे मार्क्सवादी विचारधारेत क्रांतीचे नेतृत्व कामगारवर्गाकडे असेल असे गृहितक मांडले गेले, त्याचप्रमाणे भारतातल्या ब्राम्हणी पितृसत्ताक व्यवस्थेविरोधातला लढा आपण दलित, आदिवासी, महिला, अल्पसंख्य समूहाच्या नेतृत्वात खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. इथे, या टप्प्यावर मी माझा नायक निवडला आहे.
त्या नायकाचे नाव अर्थातच, भंवर मेघवंशी आहे!
‘मी हिंदू असू शकत नाही’ - भंवर मेघवंशी
मराठी अनुवाद – शेखर देशमुख
मधुश्री पब्लिकेशन, पुणे
पाने - २२४
मूल्य - २५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5383/Mi-Hindu-Asu-Shakat-nahi
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment