प्रसिद्ध इतिहासकार, विचारवंत आणि विदुषी डॉ. रोमिला थापर यांच्या Voices of Dissent : An Essay या मूळ इंग्रजी दीर्घनिबंधांच्या पुस्तकाचा नुकताच ‘असहमतीचे आवाज’ या नावाने पत्रकार मिलिंद चंपानेरकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. पपायरस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील उपोद्घाताचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
तत्त्वतः असहमतीचा अर्थ होतो व्यक्तीचे वा व्यक्तींचे दुसऱ्यांसोबत मतभेद असणं किंवा अधिक सार्वजनिक स्तरावर पाहता, जीवनपद्धती नियत करणाऱ्या काही संस्थांशी मतभेद असणं. अतिप्राचीन काळापासून लोकांनी असहमती व्यक्त केलेली आहे; विरोधी मत मांडताना वादविवाद केलेले आहेत; किंवा असहमती असल्याचं एकमताने मान्य केलेलं आहे; किंवा प्रसंगी, त्यातून सहमतीचा मार्ग काढलेला आहे. हा सर्व जीवनाचा आणि जगण्याचा भागच आहे. आपलं दैनंदिन जीवन प्रभावित करणाऱ्या संस्थांपैकी बहुतांश संस्थांना एक दीर्घ इतिहास राहिलेला आहे; त्यांतल्या बऱ्याचशा संस्था भिन्न-भिन्न प्रकारे विकसित झालेल्या आहेत. आपली अशी कल्पना झालेली असते की, अशा संस्थांच्या कार्यपद्धतींबाबत प्रश्न उपस्थित करणं, ही अगदी अलीकडच्या काळातील गोष्ट असावी, परंतु आता आपल्याला याची जाणीव होण्यास सुरुवात झालेली आहे की, तसं नाहीये; त्यांच्या कार्यपद्धतींबाबत प्रश्न उपस्थित करणं ही गोष्ट पूर्वापार सुरू आहे – खरं तर, अनेक शतकांपासून.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
चिकित्सेमुळे, प्रश्न उपस्थित केल्यामुळे वा केवळ एखाद्या वेगळ्या भावनोद्रेकाला वाट करून दिल्याने मतमतांतरांचं वैविध्य निर्माण होत असतं आणि असहमती ही गोष्ट अशा व्यापक वैविध्यपूर्णतेचा भाग असते. असहमतीचे आणखीही काही आकृतिबंध असू शकतात; त्यांचं महत्त्व मी कमी लेखतेय असं नाहीये. महत्त्वाचं हे आहे की, भूतकाळाचा आणि संस्कृतीचा वारसा लाभल्याचा आपण दावा करतो आणि सद्य:काळात तर त्याबाबत जयघोषही करत असतो, परंतु आपला भूतकाळ व संस्कृती यांबाबतच्या धारणा करून घेत असताना ज्या गोष्टी आपण नजरेआड केल्या आहेत, त्यांकडे बारकाईने पाहण्याचा माझा प्रयत्न आहे. असं सर्व असताना भूतकाळ रचला जात राहतो आणि तो रचण्यासाठी ज्या संकल्पनांचा वापर केला जातो, त्या संकल्पनाही त्याचप्रकारे रचल्या जात आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी जुन्या आणि नव्या सूचक गोष्टींचा वेध घेणं आवश्यक ठरतं. असहमतीच्या परिणामी, हिंसक आणि अहिंसक असे निषेध होतात आणि असहमतीबाबत पूर्णांशाने चिकित्सा साधायची, तर निषेध होण्यामागील परिस्थितीची चिकित्सा करणं भागच असतं. मात्र, माझा हेतू अहिंसक अशा असहमतीचे जे आवाज आहेत ते - प्रतीकात्मकरीत्या - ऐकू येण्याजोगे ठरावे असा आहे.
असहमती ही काही आधुनिक काळातील संकल्पना नाहीये, परंतु असहमतीचे विविध आकृतिबंध ओळखणं ही गोष्ट मात्र या काळासाठी नवी आहे. हेसुद्धा तितकंच खरं की, खऱ्या अर्थाने उदारमतवादी, लोकशाहीवादी असलेल्या समाजात असहमती व्यक्त करणारे प्रश्न उपस्थित केले गेले, तर भुवया उंचावल्या जात नाहीत; उलट अशा प्रश्नांची कसून तपासणी करणं, त्यांची चर्चेद्वारे तड लावणं, अशा गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं. प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आता सार्वजनिक आहे आणि कुणीही नागरिक तो अधिकार बजावू शकतो. पूर्वी असा अधिकार समाजातील केवळ सामर्थ्यवानांना होता, परंतु आता हा अधिकार सर्व नागरिकांना आहे – किमान तत्त्वतः तरी. पूर्वीच्या काळी अशा अधिकाराबाबत वारंवार वाद जरूर व्हायचे, परंतु सहसा ते सार्वजनिकरीत्या वादाचे मुद्दे बनत नसत – जसे आजच्या काळात होतात. त्यामुळे आज असहमती सामाजिक जीवनाच्या मध्यवर्ती कशी आहे, ते ओळखण्याची आणि समजून घेण्याची जबाबदारी अंशतः तरी आपल्यावर येते. असहमती वा विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार असण्यात हे अनुस्यूत असतं की, जिथे यथायोग्य वाटेल तिथेच आपण त्या अधिकाराचा वापर करावा. असहमती व्यक्त करण्याच्या आकृतिबंधांमध्ये जरी बदल झालेला असला, तरी ऐतिहासिकदृष्ट्या असहमतीची अभिव्यक्ती अव्याहतपणे सुरू आहे. ही जी अव्याहतता आहे, तिचा मी काही उदाहरणांद्वारे वेध घेऊ इच्छिते.
प्रत्येक आधुनिक समाजात आपले विचार मुक्तपणे अभिव्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि असहमती व्यक्त करण्याचा अधिकार हा या अधिकाराचा भाग असतो. असहमती व्यक्त करण्याचा अधिकार विवादास्पद ठरत आला असला, तरी समाज पुढे जाण्याच्या दृष्टीने तो महत्त्वाचा ठरतो. आपली इच्छा काही असली, तरी भारतीय समाज – अर्थात, अन्य अनेक समाजांप्रमाणे – कधीच थोडेफार अंतर्विरोध असलेला वा कोणतेही अंतर्विरोध नसलेला, एकसाची, सुसंवादी अस्तित्व असलेला असा नव्हता. असहिष्णुता, हिंसा आणि विचार-कल्पनांच्या भेदामुळे उद्भवणारे संघर्ष अशा गोष्टींमध्ये आपलाही सहभाग राहिलेला आहे. पूर्वीच्या काळी असहमती व्यक्त करणारे आवाज अनेक होते आणि त्यांचा उद्गार इतका व्यापक स्तरावर होता की, किंबहुना आज ते मान्य करायची आपली तयारीही होणार नाही.
ऐतिहासिक परिभाषेत सत्ता व मालकी प्राप्त असलेले आणि सत्ता व मालकी नसलेले (म्हणजे जमीन, संपत्ती, कर्मकांड किंवा कशाही संदर्भात), अशा द्विकांमध्ये (‘बायनरीज’मध्ये) सामाजिक संबंध अवगुंठित केले गेले होते आणि आजही बरेच वेळा ते तसे केले जातात. राजा आणि प्रजा, सरंजामदार आणि गुलाम, कारखानदार आणि कामगार, वसाहतदार आणि वसाहतीतील रयत अशा अनेक संज्ञा-युग्मांद्वारे हे संबंध आपल्याला ओळखीचे झालेले आहेत. गेल्या दोन शतकांत जे जबरदस्त बदल घडून आले, त्यांमध्ये असा समाज पुढे आला जो उद्योगीकरण, भांडवलशाही, तंत्रज्ञानावर मध्यमवर्गाचं नियंत्रण, श्रमशक्ती प्रदान करणारा कामगार, कृषि-उत्पादन ज्यावर अवलंबून असतं, तो शेतकरी आणि अशाच प्रकारच्या इतर काही संज्ञांच्या भाषेत बोलू लागला. अशा नव-समाजाला एकत्र बांधून ठेवण्याच्या उद्देशाने ज्या अनेक बाबी महत्त्वाच्या मानल्या गेल्या होत्या, त्यांपैकी एक म्हणजे, राष्ट्रवाद; किंवा आपण एकाच देशातील लोक आहोत अशी जाणीव व त्या जाणीवेपोटी येणारी राष्ट्रीयत्वाची भावना. त्यायोगे मोठा बदल घडून येणं अनुस्यूत असतं – म्हणजे, त्यायोगे असे वेगळ्या प्रकारचे संबंध उत्क्रांत होऊ शकतात की, समाजाचं कार्य कसं चालावं, ते त्याद्वारे सुनिश्चित होऊ शकेल, असं गृहीत धरलेलं असतं आणि त्यायोगे बदल घडून येणं अनुस्यूत असतं. राष्ट्राच्या कार्यामध्ये सर्वांत महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे, नागरिक या नात्याने लोक आणि त्यांनी मिळून निर्माण केलेली राज्यसंस्था यांमधील संबंध. त्यामुळेच नागरिकांचे अधिकार आणि राज्यसंस्था यांमधील उभयपक्षी संबंधांना आज महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे.
इतिहासाच्या या टप्प्यावर राज्यशासनाच्या प्रकारांत लक्षणीय बदल घडून आले – पूर्वीची राजेशाही गेली आणि त्याऐवजी लोकशाही शासनांचा उदय संभवला. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला समान दर्जा अभिप्रेत असल्याने लोकशाही ही धर्मनिरपेक्षच असू शकते. लोकशाही असलेल्या देशांतील संस्थांमध्ये समाजातील विविध घटकांचं प्रतिनिधित्व असतं आणि प्रत्येक घटकाला समान दर्जा प्राप्त असतो. ही गोष्ट धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी आणि राष्ट्रवादी अशा सर्वांचं एकात्मीकरण करण्यास साहाय्यभूत ठरते. असहमतीचा अधिकार आणि सामाजिक न्यायाची मागणी या खऱ्या लोकशाहीच्या संकल्पनेच्या गाभ्याशी असलेल्या गोष्टी आहेत. कारण त्यात सर्व नागरिकांचा समावेश असतो आणि त्या सर्वांनाच कायदेशीरदृष्ट्या समान दर्जा प्राप्त असल्याने, लोकशाही ही धर्मनिरपेक्ष असण्याव्यतिरिक्त अन्य काही असूच शकत नाही.
अशा मोठ्या ऐतिहासिक बदलांना आधुनिक काळाच्या चिन्हकांपैकी काही चिन्हकं असं मानलं गेलेलं आहे. मात्र, सुरुवातीला असहमतीची सामान्य लक्षणं जाणून घेणं, असहमती कशाबाबत आहे ते ओळखणं यांबाबतच्या चर्चेने मी सुरुवात करू इच्छिते. एखाद्या गोष्टीबाबत असहमती असणारे नेहमीच स्वतःहून आपण विरोधी मताचे असल्याचा जाहीरपणे उद्घोष करून सांगत नाहीत. काही वेळा तर असंही असतं की, आपलं विरोधी मत किती तीव्र आहे, त्याबाबत त्यांना स्वतःलाही पूर्ण जाणीव नसते. असहमती सहजपणे जाणून घेण्याच्या काही पद्धतींपैकी एक म्हणजे, समाजातील कुणाचं अस्तित्व ‘अन्य’ म्हणून मानलं जातं, त्याची नोंद घेणं. त्यामुळे ‘अन्य’ ओळखणं आणि त्याचं असहमतीशी असलेलं सान्निध्य जाणून घेणं सोयीस्कर होतं.
परंतु याबाबत पुढे काही लिहिण्याआधी मी आणखी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते. असहमतीची संकल्पनाच पश्चिमेकडून भारतीय समाजात आयात केली गेलेली आहे, असं जे आजकाल वारंवार म्हटलं जातं, ते मला पूर्णतः अमान्य का आहे ते स्पष्ट करते. वास्तविक असं म्हणणारे मुळात लोकशाहीच्या विरोधात असतात, पण ते तसं उघडपणे मान्य करणार नाहीत. काही जणांनी डोळ्यांसमोर अशी एक कल्पना करून घेतलेली असते की, भारताचा भूतकाळ अगदी निष्कलंक होता आणि त्यामुळे त्यात विरोधी मताची आवश्यकताच नव्हती. अशाच लोकांकडून उपरोक्त युक्तिवाद केला जातो. भूतकाळाबाबत त्यांची जी मनोवांच्छितं असतात, त्यावर आधारित कल्पनांतूनच असे विचार निपजतात. त्यांआधारे केली गेलेली भव्य-उदात्त उपलब्धींची, दोषरहिततेची वर्णनं अतिशयोक्त होती आणि आहेत; आणि ज्या कुणी त्यासाठी योगदान केलं, त्या सर्वांनाच ती पूर्णतः मान्य असलेली अशी संस्कृती होती, असं दर्शवून त्यांनी तिला सभ्यता आणि ‘उच्च संस्कृती’ असं संबोधलं आणि संबोधतात.
जेव्हा एखादा समाज नवोन्मेषी आकृतिबंधांपासून प्रेरणा घेऊन अनेक शतकं विशिष्ट मार्ग आक्रमतो आणि प्रत्यक्षात महान उपलब्धींचा कळस गाठतो आणि पुढे जातो, तेव्हा त्या संस्कृतीने अति-आधुनिकतेचा अपवादात्मक क्षण गाठल्याचं म्हटलं जातं. संस्कृतीबाबत साररूपाने मांडणी करणाऱ्या वर्चस्वप्राप्त संस्कृतीला आधीच्या संस्कृतींपेक्षा श्रेष्ठ मानलं गेलं. दावे असे केले गेले की, पूर्वी याच संस्कृतीचा सर्वांनी स्वीकार केला होता – सुसंवादाच्या काळात आणि थोडाफार विसंवाद असतानाही; विचार-कल्पनांच्या क्षेत्रात आणि सामाजिक कृतींच्या प्रांतातही. विशिष्ट अशा संस्कृतीचे स्वभावविशेष विशद करताना ज्या प्रदेशात ती रुजली, त्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं; ज्या एका भाषेत प्रामुख्यानं तिचं सर्वोत्तम साहित्य आणि त्या संस्कृतीतील विचार लिहिले गेले त्या भाषेवर, ज्या एका धर्माने तिला ओळख दिली त्या धर्मावर आणि ज्यांनी तिच्या कार्य-पद्धतीला रचना प्रदान केली गेली, त्या कायदे-नियमांवर लक्ष केंद्रित केलं गेलं.
अशा प्रकारे जगातील सभ्यता-संस्कृतींबाबतचं एक सुखावह स्वरूपातील चित्र एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात चितारलं गेलं.
काही जण असे होते, ज्यांनी संस्कृतींचं असं चित्र अचूक नसल्याचं सूचित केलं. आपल्या लिखाणात त्यांनी आदर्श संस्कृती अस्तित्वात होत्या असं मान्य करून टाकलं, परंतु त्याच वेळी आव्हानं आणि प्रतिसादांच्या नमुनेदार रचनांद्वारे अशा संस्कृती निर्माण केल्या गेल्या आणि समाजाकडून त्या उचलून धरल्या गेल्या, असं मात्र नमूद केलं. इतरांनी संस्कृतींचं उदयास येणं आणि उतरणीस लागणं या गोष्टी ऐतिहासिक चक्राचा एक अपरिहार्य भाग कसा आहे, त्याबद्दल लिहिलं. अर्थात, अशी भाष्यं आणि विरोधी मतप्रतिपादनं व असहमती यांत काही साधर्म्य नसलं, तरी त्यांत त्याबद्दलचं सूचन मात्र दिसून येतं. काहींनी असं सूचित केलं की, संस्कृतींनी कळसाध्याय गाठल्याचं मानता येईल इतक्या उपलब्धी आपण साध्य केलेल्या आहेत, असे जेव्हा स्पष्ट दावे केले, तेव्हा संस्कृतीच्या आधारभूत वैशिष्ट्यांबाबत काही पर्यायी विचार पुढे आले. त्यांतील पर्यायी मतं आधी अस्तित्वात असलेल्या विचारांना अप्रत्यक्षपणे पूरक अशा रूपात असू शकतात किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करणारी असू शकतात. अशी दुसऱ्या प्रकारातील प्रश्न उपस्थित करणारी मतं प्रस्थापित पारंपरिक विचारांशी असहमती दर्शवणारी वा त्यांचा विरोध करणारी असू शकतात. कुणी एखाद्या संस्कृतीची व्याख्या कोणत्याही प्रकारे करो, त्या अंतर्गत असहमतीचं - ‘अन्य’चा (‘दि अदर’चा) दृष्टिकोन या स्वरूपात - अस्तित्व होतं, हे ओळखणं महत्त्वाचं आणि मूळ संस्कृतीबाबत अंतर्दृष्टी देणारी समज प्राप्त होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं ठरतं.
जरी ब्रिटिशांनी भारताचं वसाहतीकरण केलं होतं आणि आधुनिक काळात या देशाला वसाहतमात्र दर्जा दिलेला होता, तरी यजमान भारतात पूर्वीच्या काळी (संस्कृतीला) आवश्यक अशी सर्व अभिलक्षणं असलेली संस्कृती होती, असं इतिहासकारांनी म्हटलेलं आहे. त्या दृष्टीने पाहायचं तर प्राधान्याने गुप्त राजवटीचा व त्यानंतरचा लगतचा काळ लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. भारतीय सभ्यता-संस्कृतीचं वर्णन करताना असं म्हटलं गेलं की, इथे एक एकमेवाद्वितीय असा समाज होता, जो शांतताप्रिय, अहिंसक लोकांचा, सर्वांबाबत सहिष्णू असलेला आणि सर्वोच्च आदर्शांना समर्पित असा होता. मात्र असहमतीच्या सुरांबद्दल त्यात फारसा उल्लेख नाही. तरीदेखील, शांतीची आणि सहिष्णुतेची आवाहनं केली गेल्याबद्दलचे भारताच्या भूतकाळातील जे अनेक प्रसंग त्यात दिलेले आहेत, त्यावरून अंदाज करायचा तर आपल्याला असं दिसून येतं की, इतरत्रच्या समाजांप्रमाणे भारतीय समाजही असहिष्णू होता आणि हिंसेमध्ये सहभागी होता. अर्थात, भूतकाळाबद्दलची (शांतिप्रिय व सहिष्णू असल्याची) अशी प्रतिमा जोपासणं ही गोष्ट तशी जगभरातील अनेक राष्ट्रवाद्यांमध्ये सामायिक असल्याचं दिसून येईल - मग ती आपापल्या मातृभूमीच्या संदर्भात असेल; किंवा एखाद्या विशिष्ट अशा गुणवैशिष्ट्याच्या संदर्भात असेल - म्हणजे, एखादं गुणवैशिष्ट्य हे आपल्याच संस्कृतीचं द्योतक असल्याचं ते सांगतात. जसं की, ‘नेग्रीट्युड’ची (नीग्रोपणाची) संकल्पना, ज्यायोगे पूर्वीच्या आफ्रिकन राष्ट्रवादी चळवळींना दिशा प्राप्त झाली.
स्वारस्याची गोष्ट अशी की, ज्या ज्ञानाच्या मूलाधारावर एखादी सभ्यता-संस्कृती अस्तित्वात येते, ते ज्ञानही वारंवार आक्षेपांना, प्रश्नांना सामोरं जावं लागल्यावरच प्राप्त झालेलं असतं. जे काही पारंपरिक आणि पुराणमतवादी असतं, त्यावर प्रश्न उपस्थित केले जातातच, आणि त्यामुळे जी भिन्न-विभिन्न मतं व्यक्त गेली जातात, त्यायोगे विचार-विश्व निर्माण होतं. पूर्वीच्या काळातील सभ्यता-संस्कृतींमध्ये साध्य केल्या गेलेल्या उपलब्धींमुळे काही कालखंड ‘सुवर्ण-युगं’ म्हणून मानले जातात; त्या कालखंडांमध्ये जे विविध विचार-प्रवाह अस्तित्वात आले होते, ते विविध प्रवाह जरी एकमेकांसमोर ठेवून पडताळून पाहिले, तरी हीच गोष्ट स्पष्टतेने दिसून येईल. त्या काळाला अभिजनवादाचा (‘क्लासिसिझम’चा) काळ असंही म्हणता येईल. परंतु अभिजनवाद म्हणजे नवप्रवर्तन नसतं; बरेच वेळा असं होतं की, आधीच्या कालखंडातच (विचार-विमर्षाची) एक प्रक्रिया सुरू झालेली असते आणि त्याची परिणती पुढील कालखंडात दिसून येते. काळाच्या इतर टप्प्यांवर वा इतर संदर्भांत ते परिणत रूपातील विचार अभावानेच आढळतात, असं नसतं - होतं असं की, एका विशिष्ट युगात ते सहजपणे एकत्र जुळून येतात वा ठळकपणे पुढे आणले जातात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आता, याबाबत काही जण असा प्रश्न विचारू शकतात की, विरोधी विचारांचे लोक आणि सत्ताधिकारी यांमध्ये संवाद घडवून आणणं हा त्या विशिष्ट अशा कालखंडाचा गुणधर्म असतो का? अगदी हीच गोष्ट ज्ञान संवर्धनासाठी आवश्यक असते आणि ज्ञानाला मूलाधार प्रदान करणारी ठरू शकते – आणि तरीही तिला सभ्यता-संस्कृतीची संस्थापना करणारी असं म्हटलं जाऊ शकतं.
वाद-विवादाच्या चौकटीत युक्तिवाद करण्याचे काही अधिक सूक्ष्म असेही उपयोग आहेत. विरोधी मत काय आहे ते लोकांसमोर मांडण्यातून प्रतिवाद काय असू शकतो याचं, आणि अशा स्वरूपाचा प्रतिवाद केला जाण्याची शक्यता आहे याचंसुद्धा सूचन होतं – अशा मांडणीतून प्रतिपक्षाचा युक्तिवाद फेटाळला/दुर्लक्षिला गेला पाहिजे, असं नेहमीच गरजेचं नसतं. ‘पूर्वपक्ष’पर युक्तिवादांची उदाहरणं संकलित केली गेली, तर आपल्याला विरोधी मतांची अधिक चांगली कल्पना येऊ शकते. मात्र ज्ञान कधीच अपरिवर्तनीय आणि स्थिर नसतं, कारण नवे पुरावे आणि चिकित्सेच्या किंवा मीमांसेच्या नव्या पद्धती पुढे आल्या, की त्यात बदल घडून येणं अटळ असतं. म्हणूनच सतत प्रश्न विचारत राहणं हे आवश्यक होतं आणि आहे.
‘असहमतीचे आवाज’ - मूळ लेखिका : रोमिला थापर
मराठी अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
पपायरस प्रकाशन, कल्याण
पाने : १८३
पुठ्ठा बांधणी (हार्ड कव्हर) किंमत - ३०० रुपये
कागद बांधणी (पेपरबॅक) किंमत - २५० रुपये
संपर्कासाठी नंबर - ९७६९४४९६९४
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment