सोलापूरच्या लोकमंगल साहित्य पुरस्कार २०२०-२१चा समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रकार व लेखक अंबरीश मिश्र अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी विजेत्या लेखकांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर केलेलं चिंतनीय भाषण...
..................................................................................................................................................................
मित्रहो,
सोलापूरला फारसं येणं होत नाही; तीनेकदा आलो असेन. तरीही सोलापूर मनात कुठंतरी सणाणत असतं. ‘काशीस जावे, नित्य वदावे’ असं आपल्याकडे म्हणतात; तसं माझं सोलापूरविषयी होत असतं. आज योग जुळून आला.
सोलापूरला एक पीळ आहे. एक पोत आहे--टेक्सश्चर. शाहीर रामजोशी इथले, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, चित्रकार अब्दुल करीम आलमेलकर, कवि कुंजविहारी इथले. सुंद्री-वादक सिधराम जाधव सोलापूरचे; फैय्यझताई, सिनेअभिनेत्री शशीकलासुद्धा. पॉली उम्रीगर इथं शिकले म्हणतात. येता-जाता काळानं सोलापूरच्या ओंजळीत मूठभर मोती टाकले, असं वाटतं.
२००५ साली इथं आलो होतो. शंकरराव मोहिते-पाटील पुरस्कार स्वीकारायला. माझं भाग्य असं थोर की, कार्यक्रमाला त्र्यं. वि. सरदेशमुख आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. खूप प्रेमानं बोलले. सरदेशमुखसर बोलत होते, मी ऐकत होतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मला सरदेशमुखसर एखाद्या ग्रीक तत्त्ववेत्त्याप्रमाणे वाटले. भव्य नि भारदस्त, निश्चयी नि निश्चळ, कणखर नि करुणामय, गूढ नि गाढ. त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो, तेव्हा सोलापूरचं स्निग्ध आकाश थोडं खाली झुकून मला म्हणालं, ‘पोरा, आता तुझं कुणीच वाकडं करू शकत नाही. तू एका तपस्वी लेखकाला भेटलाएस.’
आज हा पुरस्कार वितरणाचा सोहळा लोकमंगल वाचनालयातर्फे होतोय. ही आनंदाची बाब आहे. पुरस्कार विजेत्या लेखकांचं अभिनंदन करतो. तुम्हांला पुरस्कार प्रदान करण्याचा योग मला लाभला, मला आनंद झाला. हा आनंद माझ्या झोळीत टाकल्याबद्दल लोकमंगल वाचनालयाचे आभार मानतो.
लोकमंगल वाचनालयाची मोठी समृद्ध परंपरा आहे. सोलापूरच्या विचारसृष्टीत या संस्थेचं असाधारण महत्त्व आहे. आज वाचनालयानं लेखकांचा सन्मान केलाय. हे म्हणजे झाडानं आपल्याच फुला-पानांना गोंजारण्यासारखं.
या सोहळ्यामुळे तुम्हां सगळ्यांना भेटता आलं--शोभाताई बोल्ली, नीतीन वैद्य, शिरीष देखणे, पुरस्कार विजेते लेखक, साहित्यिक संस्थांचे प्रतिनिधी, आणि सोलापूरचे तुम्ही रसिक वाचक इथं उपस्थित आहात. सुख-सुख म्हणतात ते याहून काय वेगळं असतं?
काही मुद्दे लिहून आणलेत, थोडक्यात मांडतो. तुम्ही शांतपणे ऐकाल अशी आशा आहे.
माणूस लिहू कसा लागला? तो आधी काय लिहायचा? काही इतिहासकार, मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात की, माणूस आधी हिशेब-ठिशेब लिहायचा किंवा दानपत्र. अमूक अमूक जमीन अमक्याला दिली किंवा देवळाला दान दिली, त्याची नोंद, असं. व्यापारी लोक लिहून ठेवायचे की, अमक्या-अमक्याला इतकं इतकं कर्ज दिलं. हे पहिलं लिखाण.
आजच्या लेखकानं लिहिताना विचार करावा. आपल्यावर कुणाकुणाचं कर्ज आहे? महर्षी व्यास, श्रीचक्रधरस्वामी, ज्ञानेश्वरमाऊली, तुकाराम, प्रेमचंद, राम गणेश गडकरी, बालकवी, शेक्सपियर, टॉलस्टॉय, दस्तएवस्की. हे कर्ज फेडायचं तर आपल्याला चांगलं लिहिलं पाहिजे. म्हणजे या सगळ्यांच्या ऋणातून मोकळं होऊ, अंशत: तरी.
लिहिताना माझ्या मनात हा कर्जफेडीचा विचार सतत असतो.
गेली चाळीसेक वर्षं लिहितोय. ‘सत्यकथे’त पहिली कविता छापून आली १९७५ साली तेव्हा एकोणीस वर्षांचा होतो. आज २० पुस्तकं माझ्या नावावर आहेत. तरीही मी साहित्यिक आहे, हे म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. साहित्यिक, लेखक हे मोठे शब्द आहेत. मी लेखन करणारा माणूस आहे. जमेल तसं लिहितो.
मी का लिहितो? लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो. मी हे सांगितलंच पाहिजे असं प्रकर्षानं वाटतं म्हणून लिहितो. पक्षी का गातो? त्याला गावंसं वाटतं म्हणून. पक्ष्याला गाण्याचा आग्रह केला, तर तो गाणार नाही आणि थांब म्हटलं, तर तो थांबणार नाही. लोक आपले नित्य जीवनव्यवहार पार पाडत असतात, पक्षी गात असतो. हे सगळं अगदी सहजपणे घडत असतं.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
लेखन हे मेहनतीचं काम आहे. लेखक आणि रस्त्याची कामं करणारा मजूर यांत विशेष फरक नाही. दोघं कष्ट करतात. एक दगडं फोडतो, दुसरा शब्द फोडतो नि आतला गर शोधतो. रोज पाचशे शब्द लिहिल्याशिवाय रात्री जेवायचं नाही, असा सॉमरसेट मॉमचा नियम होता म्हणतात! म्हणजे एका अर्थी लेखन ही ‘रोजगार हमी योजना’च.
लेखनाचे दोनच प्रकार असतात- चांगलं नि वाईट, असं हेमिंग्वे म्हणतो. वाईट लेखनाचं पीक उदंड असतं. जगभरातल्या संस्कृतींचं पहा. भरताड लिखाणच जास्त असतं. अन् ते गरजेचं असतं. वाईट लिखाण समोर असेल तर कसं लिहू नये, हे लेखकाला समजेल.
लेखन चांगलं असो वा वाईट, लेखन करणारा सच्चा नि इमानदार असतो, असला पाहिजे. वाईट लिखाण करणारा लेखकसुद्धा प्रामाणिकपणे वाईट लेखन करत असतो. इथं एक सांगितलं पाहिजे की, मी लेखक म्हणतो तेव्हा लेखन करणारे स्त्री-पुरुष असं मला अभिप्रेत असतं.
गेल्या काही वर्षांत मराठीत बरेच तोतया लेखक घुसलेत. तोतया लेखक चतुर नि धंदेवाईक असतो. लोकांच्या उग्र भावनांना डिवचतो. जुनाट समजुतींना कुरवाळतो नि लोकप्रिय होतो. इतिहासाचा चिखल करतो. हे लिखाण हंगामी स्वरूपाचं, चटपटीत नि चंचल असतं; posey असतं.
पूर्वी असे तोतया लेखक-कलावंत असायचे, पण त्यांना कुणी विचारत नसे. अलीकडे मात्र या मंडळींना प्रतिष्ठा मिळू लागलीए. एका क्षेत्रात भरपूर यश मिळवायचं नि त्या पुण्याईवर लेखनप्रांतात शिरकाव करायचा, अशी या तोतया मंडळींची स्ट्रॅटजी असते.
काही लेखक प्रकाशकांना पैसे देतात नि आपलं लिखाण छापून आणतात, असं ऐकतो. हे खरं असेल तर येणाऱ्या काळात धनदांडगे बिल्डर्स, सरकारी काँट्रॅक्टर, तस्कर मंडळी यांना प्रतिभासंपन्न लेखक म्हणून मिरवता येईल. आणि काही तर साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होतील. आपल्याला अजून पुष्कळ वाईट पाहायचंय.
हल्ली विशुद्ध साहित्यापेक्षा वृत्तांत लिखाणाला बरे दिवस आलेत. राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र, जागतिक घडामोडी, पर्यावरण वगैरे विषयांचा सांगोपांग वृत्तांत देणाऱ्या पुस्तकांना खूप मागणी आहे.
त्याचप्रमाणे रक्तदाब किंवा मधुमेहावर रामबाण इलाज काय, केस गळण्याचं कसं थांबेल, म्हातारपणासाठी पैशाची गुंतवणूक कशी करायची वगैरे पुस्तकंही बाजारात पाहायला मिळतात. परंतु या पुस्तकांचा जीव छोटा असतो. त्यांना शेल्फ व्हॅल्यू (shelf value) नसते.
१९८०च्या दशकात भारतानं श्रीलंकेत सैन्य पाठवण्याचा निर्णय का घेतला, हे एकदा व्यवस्थित समजलं की, वाचकापुरता हा विषय संपतो. काहीही केलं तरी आपल्याला टक्कल पडणारच आहे, हे बोडकं सत्य एकदा स्वीकारलं की, केसगळतीवरची पुस्तकं निरुपयोगी ठरतात.
या उलट ‘काढ सखे गळ्यातून तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’ ही कुसुमाग्रजांची कविता दीर्घकाळ आपली सोबत करते. कारण तिच्या तळाशी एक खोल उर्मी लकाकत असते, जीवनाची पूर्णता धगधगत असते.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
लेखक लिहितो म्हणजे नेमकं काय करतो? लेखकाचं मन तुडुंब भरलेलं असतं. त्या थळथळणाऱ्या पाण्याला शिस्त कशी लावायची, आपल्या अनुभवाचे कालवे कसे काढायचे, असे प्रश्न लेखकाला बेचैन करत असतात. नि तो लिहायला बसतो.
लेखनाचं तंत्र, शब्दकळा; प्रतिमा नि रूपकांचा समर्पक उपयोग, शैली ही क्राफ्टची एक स्वतंत्र ब्यादही असते. लेखकाच्या मनात काहीतरी सुटत असतं, जुळत असतं. हे सतत घडत असतं. चांगलं लेखन ही एक प्रक्रिया असते, हा एक प्रवास आहे नि तो विलक्षण चैतन्यदायी असतो.
मी अद्याप प्रवासात आहे.
लेखकानं इतर लेखकांशी आपली तुलना करू नये; समकालीन लेखकांशी तर नाहीच, पण पूर्वसुरींशीही करू नये. लेखक लहान की मोठा, लोकप्रिय की अज्ञात हा प्रश्न गैरलागू आहे. लेखकाकडे आरपार मन असेल; अनुभव घेण्याची ताकद नि इमान असेल आणि तो अनुभव कागदावर मांडण्याची, बैठक मारून लिहिण्याची ऊर्जा नि तयारी असेल तर तो ‘अक्षरपंढरीचा वारकरी’ आहे असं समजावं.
विख्यात हिंदी कवी दुष्यंतकुमार उत्तम गजला लिहायचे. एकदा एका रसिकानं त्यांना मिर्झा गालिबबद्दल विचारलं. तर दुष्यंतकुमारांनी मोठं मार्मिक उत्तर दिलं. ‘मी मिर्झा गालिबएवढा मोठा नाही, श्रेष्ठ नाही हे खरंय; पण गालिबकडे विलक्षण उत्कटता होती. तीच नि तेवढीच उत्कटता माझ्यापाशी आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही. मला गालिबच्या तोडीचं लिहिता येत नाहीए. येईल कधीतरी,’ असं दुष्यंतकुमार म्हणाले.
मीदेखील हेच म्हणतोय. चांगल्या लिखाणाची ओढ अजून संपलेली नाही. ‘विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा’ हा ध्यास माझ्या मनाला रोज नवी उभारी देत असतो.
लेखक नि इतर कलावंत यांच्यात एक मोठा फरक आहे. चित्रकाराकडे रंग-रेषा नि कॅन्वस असतो; गायकाकडे स्वर, साथसंगतीला कलावंत असतात. सजलेला रंगमंच, दिव्यांचा झगमगाट. नृत्य म्हणजे तर चाकूच्या लवलवत्या रेशिमपात्याचे सुंदर, सौष्ठवपूर्ण नि लयदार विभ्रम. साथीला गायन, मृदंग किंवा पखवाज, घुंगरू.
लेखकाचं नशीब असं भरजरी नसतं. मिळेल ती जागा नि हाती येईल तो कागद. विजय तेंडुलकरांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बसून आपल्या एका नाटकाचा - बहुधा ‘अशी पाखरे येती’ - दुसरा अंक लिहून काढला असं ऐकतो.
असं म्हणतात की, तेंडुलकर खिडकीपाशी बसले होते. वाऱ्याचा एक मोठा झोका डब्यात मुजोरपणे शिरला आणि तेंडुलकरांचे सगळे कागद खिडकीबाहेर पसार झाले. तेंडुलकर पुढच्या स्टेशनवर उतरले, आख्खा ट्रॅक चालत गेले नि रूळांवर पडलेले कागद त्यांनी गोळा केले.
इतर कलावंत - चित्रकार, नर्तक, गायक - हे एकांतात रियाझ करतात आणि रसिकांसमोर ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी प्रकट होतात. त्यांना तिथल्या तिथे दादही मिळते.
लेखक मात्र एकांडा असतो. लोकल ट्रेनमध्ये बसून तेंडुलकर जेव्हा लिहीत होते, तेव्हादेखील त्या गर्दीत ते लेखक म्हणून एकटेच होते. रेल्वेच्या त्या गच्च भरलेल्या डब्यात एखाद-दुसरा तेंडुलकरांचा वाचक हजर असावा. पण ना तेंडुलकरांना तो ठाऊक, ना वाचकाला तेंडुलकर गाडीत बसलेत याची कल्पना.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
लिहिणारा लेखक एकटा नि वाचणारा वाचकही एकटाच असतो. दोघं परस्परांना पाहू शकत नाहीत, कदाचित ते एकमेकांना ओळखतही नाहीत. असं असूनही ते दोघं आपापसात एक कट रचतात.
कट असा की, असं समजा की, सोलापूरला राहणाऱ्या लेखकाला इंदूरच्या वाचकाचं पत्र येतं- तुमचं पुस्तक आवडलं किंवा नाही आवडलं, वगैरे. म्हणजे शेकडो मैलांचं अंतर कापून आणि जात, धर्म, पंथ या भेदांच्या पलीकडे जाऊन लेखक आणि वाचक हे दोन अनोळखी जीव परस्परांच्या संगनमतानं मुक्तीचा अनुभव घेतात, एकमेकांशी बोलतात. त्या क्षणी तो गुप्त कट सुफळ, संपूर्ण होतो. दोन ठिपके जोडले जातात आणि लेखनसंस्कृतीचा एक बहुपेडी पट तयार होतो. सोलापूरच्या कवी कुंजविहारींना बंगालच्या रविंद्रनाथांची भूल पडते, हे महत्त्वाचं आहे.
लेखक-वाचकाला जोडणारा दुवा म्हणजे भाषा. याचा अर्थ भाषा फार मोठं काम करत असते. तोंडातून एक शब्दही न काढता. लेखक लिहितो तेव्हा तो आपल्या भाषेचं थोडंसं ऋण फेडत असतो. म्हणून मराठीत एखादं पुस्तक प्रकाशित झालं की, खरा आणि निरपेक्ष आनंद मराठी भाषेला होतो. हे सगळ्यांच भाषांबाबत खरं असतं.
लेखकाचं दुर्धर दुखणं म्हणजे शब्द. सगळे अनुभव मांडायचे ते केवळ शब्दांच्या मदतीनं. आणि शब्द तर वापरून वापरून गुळगुळीत, गिळगिळीत झालेले असतात. शब्द लेखकाला गुंगवतात, चकवतात नि फसवतात. आनंद देतात, धीर देतात, उचकवतात. आंजारतात, गोंजारतात; प्रसंगी कानफटवतात. काही शब्द नवा जन्म घेतात तर काही जुनाट जन्मच भोगत राहतात.
‘शब्द बापुडे केवळ वारा’, असं कवी वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी म्हटलंय. पण लेखक सच्चा नि प्रामाणिक असेल तर त्याच्या लेखणीची बासरी होते आणि तिच्या देहातून वाहणारा वारा काळाची सुनीतं गाऊ लागतो. त्या क्षणाची वाट पाहणं नि तोवर सातत्यानं लिहीत राहणं हाच लेखकाचा धर्म आहे. आर. के. नारायण म्हणायचे : ‘बोटं गळेपर्यंत मला लिहायचंय’.
लेखकाला वाचकामुळे पूर्णत्व येतं. वाचकसुद्धा लेखकाशिवाय अर्धामुर्धाच राहतो. मात्र लिहीत असताना लेखकाला वाचकाची लुडबुड वा दहशत खपत नाही. लहान मूल दिवसभर मनसोक्त हुंदडत, बागडत असतं तेव्हा त्याला कुटुंबातल्या वडिलधाऱ्यांची अजिबात पर्वा नसते. रात्री मात्र त्याला आजी, आई किंवा बाबाची ऊबदार मिठी हवी असते. लेखक-वाचक नातं हे काहीसं असं आहे.
खरं तर लेखक हा बालकाप्रमाणे असतो. म्हणजे तसा तो असला पाहिजे. ‘लहानपण देगा देवा’ हाच लेखक-कलावंतांचा जीवनमंत्र असतो. लहान म्हणजे बालिश किंवा पोरकट नाही. लहान म्हणजे निरागस, प्रसन्न नि जीवनसन्मुख. जीविताच्या कुतुहलानं फडफडणारं कोवळं मन. जसा ‘पथेर पांचाली’तला छोटा अप्पू.
मिर्झा ग़ालिबनं म्हटलंय :
बाज़ीचा-ए-अतफ़ाल है दुनिया मेरे आगे
होता है शब-ओ-रोज़ तमाशा मेरे आगे
(हे जग म्हणजे भातुकलीचा खेळ, दिवस-रात्र माझ्यासमोर जगाचा हा तमाशा सुरू असतो.)
दुनियेचा तमाशा बघायचा नि तो समजून घ्यायचा तर दृष्टी सम्यक् नि उदार हवी, अंत:करण विशाल हवं. मनाची ठेवण संवेदनशील हवी. जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष हे भेद लहान मुलांना समजत नाहीत. त्यांना जग, अवतीभवतीचा परिसर, माणसं समजून घ्यायची असतात. लेखक नेमकं हेच करत असतो.
एक-दोन मुद्दे थोडक्यात मांडतो नि माझं म्हणणं संपवतो. पहिला मुद्दा की, लेखकानं समाजसुधारणेच्या फंदात पडू नये. ते त्याचं काम नाही. समाजसुधारक ‘असावं, नसावं’ असं म्हणत असतो; तर ‘आहे, नाही’ ही लेखकाची भाषा असते.
समाजसुधारकाचं आतडं समाजात गुंतलेलं असतं; लेखक हा तटस्थ असतो. ‘Cast a cold eye on life, on death. Horseman pass by’ असं विख्यात ब्रिटिश कवी वुइल्यम बटलर येट्सनं म्हटलंय ते खरंय. जीवन आणि मरणाकडे एक थंडगार (तटस्थ) दृष्टीक्षेप टाकून घोडेस्वारानं पुढं जायचं असतं.
हिंडणारा-फिरणारा वारा लोकांना दिसत नाही, पण त्याचा स्पर्श समजतो. तसं लेखकाचं असतं. तो लोकांत मिसळतो, विरघळून जातो. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, संवेदनशीलता, तीव्र अनुभूती, कल्पनाशक्ती यांच्या बळावर तो मानवी आयुष्याची पुनर्मांडणी करतो आणि वाचकांना एक समग्र, नि:स्सीम नि व्यामिश्र अनुभव देतो. या तर्कहीन, असंबद्ध जगाला मानवी सुख-दु:खाची ऊब देतो; काळाच्या विस्तीर्ण माळावर संस्कृतीची बीजं रुजवतो. स्वत: मात्र नामानिराळा राहतो; कुठे गुंतत नाही.
याचा अर्थ समाजात घडणाऱ्या अन्याय अन् विषमतेविषयी तो बेफिकिर असतो, असं नाही. लेखकानं समाजाचं दु:ख पचवावं, जिरवावं. उमाळे काढत, उसासे टाकत लिहू नये. भावनांची दलदल करू नये.
दुसरं, लेखकानं राजकारणापासून दूर राहावं. राजकारणाची भाषा वेगळी असते नि लेखकाची भाषा वेगळी असते. लेखकानं काय लिहावं, भाषा कशी वापरावी यावर कुणीही फतवे काढू नयेत. ना पुरोगाम्यांनी, ना प्रतिगाम्यांनी. आपले अनुभव मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य लेखकाला असतं, असलं पाहिजे.
मित्रहो, काळ फार कठीण आलाय. आपलं सांस्कृतिक भावजीवन अधिकाधिक बकाल होऊ लागलंय. मूल्यांची पडझड अव्याहत सुरू आहे. समाजावर धर्म नि जातीच्या संकुचित जाणिवांचा अंमल आहे; दुसरीकडे, लोक तंत्रज्ञानाच्या रेट्याखाली चिरडले जाताहेत. या सगळ्यांवर उतारा म्हणून की काय, पण लोकांना मनोरंजन, भपकेबाजी नि चैनबाजीचं जबरदस्त व्यसन जडलंय. माणसाला माणूस पारखा झालाय. खरं-खोटं यांतला फरकच कळेनासा झालाय.
जागतिकीकरणामुळे भारतदेश आर्थिक महासत्ता होईल तेव्हा होईल, पण आज परिस्थिती अशी आहे की, निसर्ग, लोकसंस्कृती, कला आणि भाषा या सृजनाच्या अत्यावश्यक घटकांना अवकळा आलीए आणि मनोरंजनाची पीडा आपल्यामागे लागलीए.
खरं तर मनोरंजन ही गोष्ट वाईट नाहीए. इंग्लंड देशात सोळाव्या शतकात व्यापार-उद्योग आणि मर्चंट बँकिंगमुळे एक नवा मध्यमवर्ग उदयाला आला. या वर्गाची करमणूक व्हावी म्हणून शेक्सपियरनं ‘मॅक्बेथ’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लिअर’ ही नाटकं लिहिली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
परंतु, कला आणि जीवनमूल्यांशी फारकत घेतली की, मनोरंजनाचा दर्जा वेगानं घसरतो. परिणामी, समाजजीवन थिल्लर नि भेसूर दिसू लागतं. आज आपलं असं झालंय. इवेंट मॅनेजमेंट कंपन्या, कॉर्पोरेट सेक्टर नि प्रसारमाध्यमांनी स्वस्त नि हिडीस मनोरंजनाचा मायाजाल आपल्यावर टाकलाय. केशराच्या शेतात गाढवं धुमाकूळ घालताहेत.
अशा वेळी चांगल्या लिखाणाची चाह असणाऱ्या लेखकानं काय करायचं? त्यानं लिहायचं. आणि त्यानं ‘असायचं’. जस्ट बी. लेखकाचं ‘असणं’ हीच फार महत्त्वाची बाब आहे. या कठीण काळात लेखकाला मातीची ओल कायम ठेवायची आहे. म्हणजे येणाऱ्या पीढीच्या लिखाणाला नवा बहर येईल.
आर. के. नारायण म्हणतात तसं, ‘बोटं गळून पडेस्तोवर लिहायचं’.
आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलंत. आपले आभार मानतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment