८ ते १८ या वयोगटातल्या मुलांना ‘इंटरनेटच्या धोक्यां’पासून वाचवायचं असेल, तर त्यांच्याशी ‘संवाद’ गरजेचा आहे आणि ‘माध्यमशिक्षण’ही
ग्रंथनामा - झलक
मुक्ता चैतन्य
  • ‘ ‘पॉर्न’ खेळ’ : पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा चक्रव्यूह’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 24 November 2021
  • ग्रंथनामा झलक ‘पॉर्न’ खेळ’ : पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा चक्रव्यूह Por Porn Khel मुक्ता चैतन्य Mukta Chaitanya गेमिंग Gaming पॉर्न Porn

इंटरनेट, स्मार्ट फोन आणि गतिमान डेटा यांच्यामुळे पॉर्न आणि गेमिंग यांचं व्यसन तरुण मुलांना, विशेषत: ८ ते १८ या वयोगटातील मुलांना मोठ्या प्रमाणावर लागत आहेत. मुलांमधल्या पोर्नोग्राफी आणि गेमिंगच्या या दुनियेचा वेध मुक्त पत्रकार मुक्ता चैतन्य यांनी ‘ ‘पॉर्न’ खेळ’ : पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा चक्रव्यूह’ या पुस्तकातून घेतला आहे. नुकत्याच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

इंटरनेट, स्मार्ट फोन आणि गतिमान डेटा हाताशी उपलब्ध असल्यानं काय ‘पब्लिक’ ठेवायचं आणि काय खासगी, हे ठरवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अगदीच सोपं झालं आहे. तरीही अनेक मोठी माणसं आणि टीनएजर ते करताना दिसत नाहीत. गेल्या १०-१५ वर्षांत पॉर्न आणि गेमिंगला घेऊन अनेक प्रकारची संशोधनं जगभर सुरू आहेत. यात सतत पॉर्न बघण्याचा आणि गेमिंगचा मेंदूवर काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी न्यूरॉलॉजिकल अभ्यास होत आहेत. या सगळ्याचे वर्तणुकीवर काय परिणाम होताहेत, भावनिक आणि मानसिक वाढीवर काय परिणाम होताहेत, इतकंच नाही तर ‘कॉग्नेटिव्ह’, म्हणजेच आकलनविकासावर होणारे परिणाम यांचा अभ्यास सुरू आहे. परदेशात ‘पॉर्न रिकव्हरी फोरम’ उभे राहिले आहेत, जिथे सतत पॉर्न बघणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाते. गेमिंगच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी पुनर्वसन केंद्रं उभी राहत आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गेमिंगच्या व्यसनापासून मुलांना वाचवण्याच्या हेतूनं चीनने मुलांच्या गेमिंगवर निर्बंध आणले आहेत. २०१९मध्ये त्यांनी कायद्यात अशा काही तरतुदी केल्या आहेत, ज्यानुसार मुलांना सोमवार ते गुरुवार फक्त दीड तास गेमिंगची परवानगी होती आणि शुक्रवार ते रविवार तीन तास. शिवाय, मुलांना स्वत:च्या खऱ्या ओळखीनं गेमिंग करणं बंधनकारक केलं गेलं. गेमिंगवर किती पैसे खर्च करायचे, याबाबतही नियम आहेत. वयानुसार २८ ते ५७ डॉलर खर्च करण्याची परवानगी आहे. रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेत १८ वर्षांच्या खालची मुलं गेमिंग करू शकत नाहीत, असेही नियम लागू केले गेले आहेत. २०२१मध्ये आणलेल्या निर्बंधांत सोमवार ते गुरुवारचा दीड तासही रद्द केला गेला आहे आणि मुलांना फक्त शुक्रवार ते रविवार रात्री ८ ते ९ या वेळेत गेमिंग करता येणार आहे. म्हणजे आठवड्याला तीन तास गेमिंगला परवानगी देण्यात आली आहे.

चीनच्या या निर्णयावर उलटसुलट चर्चा सुरू असली तरी, ते जात्यात असले तर आपण सुपात आहोत, हे विसरून चालणार नाही. आपल्याकडेही गेमिंग आणि पॉर्न यांचं अ‍ॅडिक्शन झपाट्यानं वाढतंय. या पुस्तकाच्या विविध प्रकरणांमध्ये त्याविषयीचे तपशील वाचायला मिळतीलच.

पॉर्न आणि गेमिंगच्या व्यसनाची समस्या फक्त प्रौढ स्त्री-पुरुषांपुरती मर्यादित नाही, हे मला कामाच्या निमित्तानं अनेकदा जाणवून गेलं होतं. साधारण १४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा मी ‘गेमिंग अ‍ॅडिक्शन’ या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्या वेळी जागोजागी गेमिंग पार्लर दिसायची. तिथल्या अंधाऱ्या क्युबमध्ये तरुण मुलं खच्चून भरलेली असायची. पत्रकारितेत येऊन सहाएक वर्षं उलटली होती. त्या अंधाऱ्या गेमिंग पार्लरांमध्ये चालतं काय, हे बघण्याची उत्सूकता होतीच. त्यातून आधी बातमीदारीसाठी, मग कुतूहल म्हणून आणि त्यापुढे अभ्यास म्हणून मी गेमिंगकडे बघायला लागले.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

१३-१४ वर्षांपूर्वी त्या गेमिंग पार्लरांमध्ये विशीतला एक तरुण भेटला होता. गेमिंग केलं नाही तर हातपाय थरथरतात म्हणणारा. गेमिंग पार्लरसाठी घरून पैसे मिळाले नाहीत किंवा पॉकेटमनी संपला तर घरात चोऱ्या करणारा. त्याच वेळी कुठेतरी मनात नक्की झालं होतं की, हा विषय दिसतो तितका सोपा आणि साधा नाहीये. तोवर गेमिंगचं जग हातातल्या मोबाइलवर आजच्याइतकं आलेलं नव्हतं. मात्र ते येणार याची कुणकुण लागलेली होती. स्मार्टफोनवर गेमिंग आल्यानंतर माणसांची आयुष्यं बदलणार, याची जाणीव होती आणि तेव्हापासून एक अभ्यासक या नजरेतून या विषयाकडे मी बघायला सुरुवात केली.

तेच पॉर्नच्या बाबतीत. इंटरनेट डेस्कटॉपपुरतं मर्यादित होतं, तोवर पॉर्नचं जग मोठ्यांपुरतं किंवा ज्यांना स्वत:चा वैयक्तिक संगणक सहज उपलब्ध आहे किंवा तसा स्वतंत्र वेळ मिळू शकतो त्यांच्यापुरतंच मर्यादित होतं. इंटरनेट कॅफेमधून मोठ्या प्रमाणावर पॉर्न बघितलं जायचं. कामाच्या निमित्तानं इंटरनेट कॅफेमध्ये जाता जाता लक्षात आलं की, तिथे नववी-दहावीची मुलंही मोठ्या प्रमाणावर असतात. पुढे पुढे इंटरनेट कॅफेमध्ये जायचं तर आयडी सक्तीचे झाले. पण तोवर घराघरात संगणक, स्मार्ट फोन आणि स्वस्त डेटा प्लॅनही आले. मग लहान मुलं आणि टीनएजर पॉर्न साईटपर्यंत पोचण्याआधी या साइटसच मुलांपर्यंत पोहचल्या!

युरॉलॉजिस्ट हॅरी फिस त्यांच्या ‘न्यू नेकेड’ या पुस्तकात म्हणतात, “इंटरनेटनं सगळं सोपं आणि सहज उपलब्ध करून टाकलं आहे. लैंगिकतेबद्दलची उत्सूकता, क्वचित मिळणारं नावीन्याचं सुख नियमित करून टाकलं. केव्हाही, कधीही, कुठेही हे सुख मिळवता येतंय, पण त्यातली तरलता जाऊन हा राक्षस माणसांच्या मानगुटीवर बसलेला आहे.”

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गेमिंगबद्दलही हेच म्हणता येईल. खऱ्या आयुष्यात जे करता येत नाही, ते सगळं गेमिंगमध्ये करण्याची संधी मिळते. ही संधी सवयीत आणि सवय व्यसनात बदलायला वेळ लागत नाही. म्हणूनच ८ ते १८ या अतिशय संवेदनशील वयोगटाबरोबर काम करायचं, असं मी ठरवलं. ‘अरुण साधू अभ्यासवृत्ती’नं मला अधिक व्यापक अभ्यास करायची संधी मिळाली. संशोधनात्मक काम करता आलं. अर्थात, अचानक उदभवलेल्या करोना महामारीनं माझ्या संशोधनाच्या कामात, विशेषत: ‘जमिनी’ कामात (फील्ड वर्ख) अडथळे आणले. पण गेली १०-१२ वर्षं मी जो अभ्यास करते आहे, त्यातून तयार झालेले संपर्क आणि या विषयाच्या खोलीचा अंदाज असल्यानं ‘न्यू नॉर्मल’ ऑनलाईन पद्धती वापरत मी माझा अभ्यास पुढे नेला. त्यासाठी प्रश्नावली बनवली. ‘गुगल फॉर्म’ची मदत घेऊन फेसबुकवरून ही प्रश्नावली जाहीर केली. त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी त्यांचे अनुभव लिहून पाठवले. मार्च २०२०मध्ये कोविड महामारी यायच्या आधी मला शहरी आणि ग्रामीण भागांतल्या काही शाळा आणि महाविद्यालयांत तरुण-तरुणींशी संवाद साधण्यासाठी जाता आलं. गप्पा मारता आल्या. मुलांच्या जगात काय सुरू आहे, याचा अंदाज येत होता. आणि पाठोपाठ महामारी आली.

महामारीनं भारतातल्या ‘पॉर्न बूम’ला आणखी मोठ्या स्तरावर नेलं. ‘गेमिंग इंडस्ट्री ’कधी नव्हे इतकी वाढली. सगळी मुलं घरात डांबली गेली, शाळा-कॉलेजच्या निमित्तानं सगळ्या मुलांच्या हातात गॅझेटस आली. स्वत:ची किंवा आई-बाबांची. मुलांना मोबाइल आणि लॅपटॉप मिळाला आणि या दोन्हीमुळे मुलांचं, टीनएजरचं आयुष्य सर्वार्थानं बदलून गेलं.

मार्च २०२०आधी मुलं गेमिंग करत नव्हती का? पॉर्न बघत नव्हती का? अर्थातच, तसं नाहीये. बघत होतीच, गेमिंगचं व्यसन आधीही होतंच. परंतु या सगळ्यांचं प्रमाण महामारीनंतर अचानक वाढलं. मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षक, मुलांबरोबर काम करणारे कार्यकर्ते, डॉक्टर यांच्याशी झालेल्या संवादांतून अनेक महत्त्वाच्या नोंदी मिळत गेल्या. अनेक पालकांनी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांची निरीक्षणं शेअर केली. प्रत्यक्ष मुलांशी तर संवाद साधलाच, शिवाय पालक, शिक्षक, समुपदेशक, कायदेतज्ज्ञ, सायबर पोलीस अशा अनेक व्यक्तींची आणि या विषयात काम करणाऱ्या संस्थांची मदत घेतली. मुलाखती घेतल्या. त्याच्या आधारानं खोलवर जाता आलं, व्यापक पाहता आलं. ‘अरुण साधू अभ्यासवृत्ती’च्या निमित्तानं हे सारं पुस्तकरूपानं मांडते आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

या संपूर्ण अभ्यासात मला जाणवलेल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ‘तंत्रज्ञान’ वापरता येतंय, ‘माध्यम’ वापरता येत नाहीये. एखाद्या सोशल मीडियावर स्वत:चं प्रोफाइल तयार करणं, इंटरनेट सर्फिंग करणं, एखाद्या साईटवर फेरफटका मारणं, गेमिंग करणं म्हणजे ‘माध्यम’ वापरता येतं असं म्हणता येणार नाही. फार तर आपण असं म्हणू शकतो, त्या माध्यमाचं ‘तंत्रज्ञान’ आपण वापरायला शिकलो आहोत. आपल्याला तांत्रिक फीचर्स वापरता येतात. ‘माध्यम’ वापरणं हे त्यापेक्षा भिन्न असतं. जिथे माध्यमांच्या चांगल्या-वाईट होणाऱ्या परिणामांची माहिती असते, किमान तोंडओळख असते; ‘माध्यमभान’ असतं, जे ग्राहक आणि वापरकर्ते म्हणून आपल्यात अजून विकसित झालेलं नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

उदा. आपण ‘व्हॉटसअ‍ॅप’ वापरतो म्हणजे ते ‘तंत्रज्ञान’ वापरतो. आपल्याला ‘व्हॉटसअ‍ॅप’ डाउनलोड करता येतं, ग्रूप बनवता येतात, फॉरवर्ड करता येतं. म्हणजेच तांत्रिक फीचर्स वापरणं जमतं. ज्या दिवशी काय फॉरवर्ड करायचं आणि काय नाही याचं ‘भान’ येईल, त्या दिवशी आपण ‘माध्यमशिक्षित’ होण्याच्या दिशेनं प्रवासाला सुरुवात केली असं म्हणता येईल. आबालवृद्ध सगळेच आज तंत्रज्ञान वापरायला शिकले आहेत, त्याचं आपल्याला कौतुक आहे. मात्र ‘माध्यमशिक्षणा’ची तीव्र गरज या संशोधनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झाली, असं मला आवर्जून सांगावं लागेल. जर ८ ते १८ वयोगटातल्या मुलांना ‘इंटरनेटच्या धोक्यां’पासून वाचवायचं असेल, तर त्यांच्याशी ‘संवाद’ जसा गरजेचा आहे, तसंच ‘माध्यमशिक्षण’ही.

‘ ‘पॉर्न’ खेळ : पोर्नोग्राफी आणि गेमिंगचा चक्रव्यूह’ – मुक्ता चैतन्य

ग्रंथाली, मुंबई,

पाने – १४०,

मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......