या अनुवादामुळे आपल्याला शिवचरित्राकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल…
ग्रंथनामा - झलक
सदानंद कदम व दीपा बोरकर-माने
  • ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 24 November 2021
  • ग्रंथनामा झलक भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास The travels of the Abbé Carré in India and the Near East बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे Barthélemy Abbé Carré

शिवकाळात महाराष्ट्रभर फिरलेल्या बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाच्या ‘The travels of the Abbé Carré in India and the Near East’ या प्रवासवर्णनाच्या पहिल्या खंडाचा मराठी अनुवाद ‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ (खंड १ – १६७२-१६७४)’ या नावानं नुकताच सदानंद कदम, दीपा माने-बोरकर यांनी केला आहे. अक्षर दालन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला लेखकद्वयांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

मराठी मुलखात जन्मलेल्या प्रत्येकाच्याच श्वासासोबत असतात ते तीन शब्द- ‘छत्रपती शिवाजी महाराज’. वाढत्या वयात सह्माद्रीतील गडकोट आणि शिवचरित्रातील पराक्रमाच्या कथा आपल्या सगळ्यांच्याच नसानसांत भिनत जातात. ‘राजा शिवछत्रपती’ हाच आपला श्वास होतो. ज्या राजाची धवलकीर्ती जगभरातल्या अनेक देशातल्या अनेक भाषांत समकालात नोंदवून ठेवली गेली आहे, असा या भूमीतला हा एकमेव महापुरुष … एकमेवाद्वितीय!

यथावकाश आपल्या आयुष्यात ‘इतिहास’ येतो, पण आपण गुंतून जातो ते पराक्रमाच्या कथा ऐकण्यात आणि वाचण्यात. तिथंच आपण रेंगाळतो आणि मग या महापुरुषाचं चरित्र समजून घेण्यास एक प्रकारची मर्यादा पडते. आपण झापडबंद होतो आणि मग सुरू होतं ते अपुत्या अभ्यासावर आधारलेलं आपलं प्रतिपादन. आजकाल सर्वदूर दिसत असलेल्या वादांची मूळं दडली आहेत ती तिथंच. म्हणूनच भाषेची बंधनं न पाळता, उपलब्ध सर्व प्रकारच्या साधनांतून इतिहासातली व्यक्तिमत्त्वं समजून घ्यायला हवीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

याचाच एक प्रयत्न म्हणजे बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे याचं हे प्रवासवर्णन. फ्रेंच सरकारचा हा प्रतिनिधी. त्याचं नाव कानावर पडलं ते साधारण १९८५च्या सुमारास. शिवकाळात महाराष्ट्रभर फिरून गेलेला हा माणूस. हळूहळू त्यानं नोंदवलेली शिवाजी महाराजांविषयीची काही वाक्यंही कानावर पडू लागली. वाढत्या वयाबरोबर कॅरेविषयीची उत्सुकताही वाढीस लागली. त्यानं लिहिलेल्या फ्रेंच भाषेतल्या त्या प्रवास वर्णनाचे काही भाग हाती आले, अद्याप काही भाग यायचे आहेत, पण ते समजून घेण्यात मुख्य अडचण येत होती ती भाषेची. त्यामुळे हाती पडलेले काही भागही घरातल्या ग्रंथालयाची शोभा वाढवत राहिले.

यथावकाश त्याचा इंग्रजी अनुवादही वाचावयास मिळाला. साधारण १९९५च्या दरम्यान आमचे ज्येष्ठ मित्र इतिहास संशोधक ‘शिवभूषण’कार निनादराव गंगाधरराव बेडेकर यांच्यासोबत कॅरे आणि त्यानं केलेल्या नोंदीविषयी अनेकवार चर्चा करण्याचा योग आला. कॅरेचं हे लेखन मराठीत आणाच असा त्यांचा सततचा आग्रह. अनेक कारणांमुळे हे काम मागं पडत गेलं, पण आज त्यातला पहिला भाग पूर्ण होतोय. ते पाहायला निनादराव नाहीत, हे आमचं दुर्दैव. हा अनुवाद आम्ही त्यांनाच अर्पण करत आहोत.

दरम्यानच्या काळात एक फ्रेंच जाणकार भेटला. त्याच्यामुळे फ्रेंच शब्दांचे उच्चार आणि अर्थ समजून घेता आले. त्याच्या मदतीमुळे आणि इंग्रजी अनुवादाचा आधार घेत हे काम पूर्ण करता आलं. तो फ्रेंच भाषेचा अभ्यासक म्हणजे निरंजन प्रकाश माने. त्यांच्यामुळे या अनुवादाला गती आली आणि हे काम पूर्ण होऊ शकलं, म्हणून आम्ही त्याचे आभारी आहोत.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

हे करत असतानाच डॉ. सुरेंद्रनाथ सेन आणि सर जदुनाथ सरकार यांनी इंग्रजीत आणलेला कॅरेही सोबतीस होताच. गेले वर्षभर आम्ही कॅरेमय झालो होतो. त्यांना समजून घेत होतो. त्यांच्या काळात साधारण सहा परकीय प्रवासी या देशात येऊन गेले होते. त्यापैकी अनेकांनी आपले अनुभव लिहूनही ठेवले आहेत. आपल्या मराठी मुलुखात येऊन गेलेल्या त्या लोकांनी शिवाजीराजांविषयी आपली मतं नोंदवून ठेवली आहेत. पण त्यात सर्वांत जास्त लिहिणारा माणूस आहे बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे. शिवाजीराजांविषयीच्या त्याच्या नोंदी वाचताना महाराजांचं ध्येय, प्रशासन आणि कामाची पद्धत नव्यानं समजत होती. ती आपल्याही लक्षात यावी म्हणून हा अनुवाद.

कॅरे त्याच्या सम्राटांचे काही आदेश आणि गोपनीय कागद भारतात घेऊन आला होता. इथल्या त्यांच्या प्रशासनाला ते द्यायचे होते. भारतात त्याचा प्रवेश झाला तो सुरतमध्ये. तिथून मग बलसाड, पारनेरा मार्गे तो दमणमध्ये आला. पुढे नारगोळ, उंबरगाव, बोरीवली, डहाणू, तारापूर, माहीम, केळवे, दांतीवरे असं करत करत तो बसैनला पोहोचला. हे बसैन म्हणजे आजची वसई. वसईत काही दिवस राहून तो अष्टमीत आला. तिथून गोरेगाव, विन्हेरे, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खारेपाटण, बांदे या मार्गे तो आजच्या डिचोलीत गेला. गोव्यात काही दिवस राहून तो विजापूरात गेला. इथपर्यंतची त्याची कहाणी या भागात आली आहे.

त्याचा हा प्रवास वाचत असताना तत्कालीन राजकीय परिस्थिती तर ध्यानी येतेच, शिवाय तत्कालीन समाजजीवनही. १६७२च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्मातल्या नेसरीजवळच्या एका छोट्याशा वाडीवर एक स्त्री प्रवाशांच्या राहण्या-जेवण्याची सोय करत होती, हे ध्यानात येतं. असा स्वतंत्र व्यवसाय करणारी त्या काळातली ती स्त्री हा खरंच अभ्यासण्याचा विषय आहे. त्या काळात वसईत तयार होणारी साखर ही इराण आणि अफगाणिस्तानात निर्यात होत होती. हे वाचलं की, भारतातल्या साखर उद्योगावर नवा प्रकाश पडतो. त्या काळात मुंबईत हॉटेल आणि खानावळ होती यात नवल काय… कारण तशी सोय तर अगदी हुक्केरीतही होती आणि तिचा लाभ अ‍ॅबे कॅरेनं घेतला होता, हे आपल्याला समजतं. एकूणच त्या काळातही हा व्यवसाय किती भरभराटीला आला असेल, हे लक्षात येतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कॅरेजवळ काही घड्याळं होती आणि त्यापैकी काही गजराची घड्याळं होती, हे वाचताना आज नवल वाटतं. त्याची पालखी वाहून न्यायचं काम इथल्या लोकांनी केलं, तेव्हा त्यांना किती मजुरी मिळायची हे वाचताना त्या वेळचं अर्थकारणही ध्यानी येतं. इतक्या लांबवरून हिंदुस्थानात आलेल्या या कॅरेनं एका जत्रेचं आणि जत्रेतल्या गमतीजमतीचं वर्णन वाचताना आपण आजच्याच एखाद्या जत्रेत फिरून आल्याचा अनुभव येतो, इतकं ते प्रत्ययकारी आहे. इथल्या लोकांचं राहणीमान आणि जेवण, यावरही तो प्रकाश टाकतो. भाकरी आणि भाजी कशी करत होते, याचं त्यानं केलेलं वर्णन मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

या सगळ्या प्रवासात त्यानं इथल्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलेलं आहे. शिवाजीराजांची सुरतेवरची दहशत, त्यांची सिद्दीशी झालेली लढाई, त्यांचं प्रशासन आणि त्यांचं वेगळेपण त्यानं अगदी मोकळेपणानं नोंदवलं आहे. त्या वेळच्या धर्मकारणावरही प्रकाश टाकला आहे. कारण मुळात तो एक ख्रिस्ती धर्मपंडित होता. अ‍ॅबे होता. ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करणाऱ्यांना एक खास प्रकारचा झगा घालायची अनुमती मिळते. तशी ती बार्थलेमी कॅरेलाही होती. असा झगा परिधान करणाऱ्याला म्हणतात- अ‍ॅबे. म्हणून तो होता बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे.

अर्थात तो एक परकीय प्रवासी होता. त्याच्या राजकीय कामासाठी हिंदुस्थानात आला होता. या भागातून जात असताना त्याच्या चौकस नजरेला जे दिसत होतं, ते जसं त्यानं लिहून ठेवलं आहे, तसंच जे कानावर पडेल तेही. त्यामुळेच त्यानं लिहिलेल्या काही घटना या कालानुक्रमानुसार नाहीत. त्यापैकी काही ऐतिहासिक सत्याशी जुळतही नाहीत. उदा. त्यानं शिवाजी महाराजांच्या गोवळकोंड्याच्या लढाईविषयी लिहिलं आहे. तशी लढाई झालीच नव्हती. साहजिकच आहे त्याची ती नोंद ऐकीव माहितीवर आधारित आहे. अशा घटना अगदी थोडक्या आहेत, पण आहेत. शिवाजी महाराज हे विजापूर दरबारात कधीकाळी मंत्री होते असंही तो लिहितो. ज्याला कसलाही आधार नाही. अशा काही घटना सोडल्या, तर त्याचं लेखन सहसा ऐतिहासिक सत्याची कास सोडत नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

बार्थलेमी कॅरेच्या या प्रवासवर्णनात इतिहास, भूगोल, पर्यावरण, शेती, लोकजीवन आणि तत्कालीन महत्त्वाचे लोक यांच्याही नोंदी आहेत. या सगळ्या नोंदी अगदी तारीखवार आहेत. त्या नोंदीत त्यानं स्वत:बद्दल फारसं लिहिलं नसलं तरी त्याच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख होतेच. तो धर्मश्रद्ध माणूस होता, पण तत्कालीन भारतातल्या जातीयतेबद्दल आणि इथल्या लोकांच्या धर्मश्रद्धांबद्दल त्याचं लिखाण हे उपहासात्मक असल्याचं दिसतं. हे सगळे लेखन तत्कालीन आहे आणि कॅरे यांची ती वैयक्तिक मतं आहेत, अनुवादकांची नाहीत, हे वाचकांनी लक्षात ठेवायला हवं.

हा अनुवाद करत असताना कुणा व्यक्तीच्या अगर धर्माच्या भावना दुखावण्याचा अनुवादकांचा हेतू नाही, हे लक्षात घ्यायला हवं. २४६ वर्षांपूर्वीच्या या एका फ्रेंच माणसाच्या नोंदी आहेत. त्यात त्यानं सतराव्या शतकातील स्त्रियांचं जीवन कसं होतं, हेही नोंदवून ठेवलं आहे. या माणसाला किमान सात भाषा अवगत होत्या. फ्रेंच, स्पॅनिश, इंग्रजी, इटालियन, लॅटिन आणि पर्शियन भाषेत तो बोलू शकत होता, लिहू शकत होता. हा अनुवाद वाचत असताना या सगळ्या गोष्टी वाचकांनं ध्यानी घ्याव्यात अशी अपेक्षा आहे.

बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे याच्या प्रवासवर्णनाच्या केवळ पहिल्या भागाचाच हा अनुवाद आहे. यात उल्लेख केलेल्या गावांची नावं शक्यतो फ्रेंच उच्चाराला अगदी जवळ जातील अशी नोंदवली आहेत. अर्थातच आत्ता ती नावं काहीशी बदललीही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उदाहरणार्थ तेव्हाचं कुर्ग आज कुर्द किंवा कुर्ददाह या नावानं ओळखलं जात असावं. तशीच गत हामा या शहराची. पण या अनुवादात आलेली नावं मूळ फ्रेंच उच्चारानुसारच दिली आहेत. दुसत्या भागात शिवाजीराजांबद्दल आणि संभाजीराजांबद्दल स्वतंत्र प्रकरण आहे. शिवाय स्वराज्यात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोंडीची माहितीही. यथावकाश त्या भागाचाही अनुवाद आपल्यापुढं आणण्याचा मानस आहे.

हा अनुवाद आपल्या हाती देता आला तो बार्थलेमी अ‍ॅबे कॅरेनं हे सगळं लिहून ठेवल्यामुळे आणि लेडी फॉसेट यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादामुळे. ‘द ट्रॅव्हल्स ऑफ द अ‍ॅबे कॅरे इन इंडिया अ‍ॅन्ड द निअर इस्ट’ या लेडी फॉसेटकृत इंगजी पुस्तकाचा हा अनुवाद. या दोघांचेही आम्ही ऋणी आहोत. त्याचबरोबर डॉ. सुरेंद्रनाथ सेन आणि सर जदुनाथ सरकार यांनी केलेला कॅरेचा इंग्रजी अनुवादही आमच्या उपयोगी पडला. त्यांचेही आम्ही ऋणी आहोत.

या अनुवादामुळे आपल्याला शिवचरित्राकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळेल, यात शंकाच नाही.

‘भारत आणि पूर्वेकडील देशातील प्रवास’ (खंड १ – १६७२-१६७४) – बार्थलेमी अ‍ॅबे कॅरे,

मराठी अनुवाद-संपादन – सदानंद कदम, दीपा माने-बोरकर,

अक्षर दालन, कोल्हापूर,

पाने – ३७६ (हार्ड बाउंड),

मूल्य – ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......