अजूनकाही
कर्कविज्ञानातील काही निर्णायक क्षणांची रोमांचक गाथा म्हणजे ‘कर्कविज्ञानाची गोष्ट’ हे डॉ. आनंद जोशी व शेखर देशमुख यांचे पुस्तक. ते नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला डॉ. आनंद जोशी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना संपादित स्वरूपात…
..................................................................................................................................................................
लेखक जेव्हा त्याच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितो, तेव्हा ते त्याचे मनोगत असते. या प्रस्तावनेकडे तसे पहायला हरकत नाही. मी मुंबई विद्यापीठातून एम.डी. मेडिसीन झाल्यानंतर जवळजवळ अर्धशतक ‘कन्सल्टंट फिजिशियन’ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहे. त्या वेळी सुपर-स्पेशिअलिटीज नव्हत्या. आज माझी पुढची पिढी सुपर-स्पेशॅलिस्ट झाली आहे. ज्ञानाची व्याप्ती वाढती आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू केला; तेव्हा स्टेथॉस्कोप, ‘इसीजी’ मशीन (इलेक्ट्रोकार्डिओग्राम), एक्स-रे आणि पॅथॉलॉजीमधील मूलभूत चाचण्या एवढीच साधनसामग्री होती. डॉक्टर म्हणेल, ती पूर्वदिशा आणि तो सांगेल, ते निदान, अशीच जवळजवळ स्थिती होती. हळूहळू हे सगळे बदलत गेले. अल्ट्रा सोनोग्राफीपासून विविध प्रकारचे स्कॅन्स आणि अनेक पॅथॉलॉजिकल चाचण्या, तसेच शरीरांतर्गत चाचण्या - उदा. ‘कोरोनरी अँजिओग्राफी’ अशा ‘इनव्हेजिव टेस्ट’ - उपलब्ध झाल्या.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
जेनेटिक्स आणि आँकॉलॉजी या दोन विषयांची त्या वेळच्या एम.डी.च्या पुस्तकात जुजबी प्रकरणे होती. गेली ५० वर्षे मी ‘हॅरिसन’ या पाठ्यपुस्तकाची प्रत्येक नवी आवृत्ती विकत घेत आलो आहे. सुरुवातीला एक खंड असायचा, त्याचे दोन खंड केव्हा झाले, हे कळले नाही. प्रत्येक आवृत्तीमध्ये जेनेटिक्स आणि आँकॉलॉजीवरील प्रकरणांची पृष्ठसंख्या वाढत गेली. आज या दोन विषयांत प्रचंड ज्ञान निर्माण झाले आहे. एम.डी.नंतर आणखी तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर ‘डी.एम.’ ही पदवी मिळते. हे त्या विषयातील सखोलतेचे, व्यापकतेचे दर्शक आहे. असे जरी असले, तरी समाजामध्ये आँकॉलॉजी अर्थात कर्कविज्ञानाबाबत गैरसमजही आहेत. तेव्हा कर्कविज्ञान म्हणजे काय, ते कसे विकसित झाले, त्याचे सध्याचे स्वरूप काय, हे सांगण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
कोणतेही विज्ञान फलदायी व्हावयाचे असेल, तर अशी माहिती सर्वदूर पसरणे-पोहोचणे गरजेचे असते. म्हणून हे विचार मराठीतून मांडले आहेत. कर्कविज्ञान कसे विकसित होत गेले, हे दाखवणे हाच खरा या लेखनामागचा हेतू आहे.
ज्ञान हे प्रवाही असते, म्हणूनच ते विकसित म्हणजे, उत्क्रांत होत जाते. येथे क्रांतीपेक्षा उत्क्रांती महत्त्वाची असते. अज्ञान हा मानवाचा अदृश्य शत्रू असतो. विज्ञानाचे महत्त्वाचे अंग म्हणजे, याचे भान असणे. हे भान विज्ञानाला कसे येते, हे पाहणे मनोहारी, त्याच वेळी उदबोधक असते. शंका घेणे हा विज्ञानाचा स्थायीभाव आहे. या शंका घेण्यामुळेच अज्ञानाचे भान राहते. एखादा वैज्ञानिक म्हणेल, तीच पूर्वदिशा, असे विज्ञानात होत नाही. त्या अर्थाने विज्ञानाचे स्वरूप हे ‘पुराव्यावर आधारित’ आहे, असे म्हणायला हरकत नाही. हे सगळे सांगायचे कशासाठी, तर कर्कविज्ञान ही जादू नाही. सद्य:स्थितीतल्या ज्ञानानुसार, माहितीनुसार डॉक्टर रुग्णावर उपचार करतात. त्यात त्रुटी राहतात. अशा त्रुटी का राहतात, हे सामान्यांना कळणे महत्त्वाचे आहे. म्हणजे, रुग्ण आणि त्याचे नातेवाईक उपचारांबाबत रास्त अपेक्षा ठेवतात.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
‘कर्करोग’ असे निदान झाले, म्हणजे रुग्ण आणि त्याचे निकटवर्ती हादरून जातात. भीती, विविध भावना तसेच प्रश्न मनात खदखदू लागतात. त्यातील एक भावना म्हणजे, ‘अरे बापरे!’ हा धक्का. ‘डिसबिलिफ आणि डिनायल’ – निदानाबाबत अविश्वास, ‘हे मला कसे होईल?’ ही भावना सामायिक आहे, वैश्विक आहे. पण याचमुळे मनात वादळ घोंगावते. हे वादळ शांत व्हायला काही काळ जावाच लागतो. या काळामध्ये रुग्ण आणि त्याचे सगेसंबंधी यांना योग्य माहिती मिळाली, तर मन स्थिरावयाला मदत होते.
कर्करोगापैकी पन्नास टक्के कर्करोग बरे होण्यासारखे असतात, अशी जरी आकडेवारी असली, तरी प्रत्येक रुग्णाला आपण कोठे आहोत, याबद्दल संशय असतो. तो कमी करण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे कर्कविज्ञानाची माहिती असणे. माहिती-ज्ञान हे अवघे जीवन उजळून टाकणाऱ्या प्रकाशासारखे असते. या प्रकाशामुळे मनापुढचा काळोख दूर व्हायला मदत होते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्रस्त करणारा प्रश्न म्हणजे ‘मीच का?’ या समस्येचे उत्तर देण्याचा प्रयत्न कर्कविज्ञान करते. पण प्रत्येकाच्या बाबतीत समर्पक उत्तर मिळेलच, असे नाही. हे उत्तर शोधण्यासाठी अनेक चाचण्या कराव्या लागतात. या चाचण्यांतून उत्तर मिळण्याचा संभव असतो. हा काळ रुग्णांसाठी परीक्षा घेणारा असतो, याची जाणीव कर्कतज्ज्ञांना असते.
रुग्णाची कौटुंबिक पार्श्वभूमी, तसेच आनुवंशिकता, त्याची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, वैयक्तिक जीवनशैली, व्यसने, लठ्ठपणा, त्याला असलेले इतर विकार, बालपणापासून आजपर्यंतचा त्याच्या तब्येतीचा इतिहास, यात कोठेतरी रुग्णाच्या या प्रश्नाचे उत्तर दडलेले असण्याची शक्यता असते. प्रत्येकाची ‘आरोग्यरेखा’ मातेच्या उदरात असल्यापासून सुरू होते. आईच्या पोटातील नऊ महिनेसुद्धा महत्त्वाचे असतात. रुग्णाला आज झालेल्या रोगाची पाळेमुळे इतकी खोलवर असतात. या सगळ्याचा आढावा घेणे महत्त्वाचे असते. प्रत्येक रुग्णकथा वेगळी असते. पण त्यात काही साम्य आणि काही भेद असतात. म्हणून प्रत्येक कथा ही विज्ञानात भर टाकणारी असते. प्रत्येक कथेतून कर्कविज्ञान शिकत असते. म्हणून या पुस्तकाचे स्वरूप रुग्णकथा आणि त्याला अनुसरून कर्कविज्ञान असे ठेवलेले आहे. या नुसत्या रुग्णकथा नसून त्या ‘ज्ञानकथा’ आहेत. या कथा रोजच्या जीवनातील आहेत, तसेच कर्कविज्ञानाच्या इतिहासातीलही आहेत. वाचकांनी त्या नजरेने या कथांकडे पाहावे, असे मला वाटते. या विषयाची वैज्ञानिक माहिती मी देणार आहे. यातील काही माहिती दै. ‘दिव्य मराठी’त २०१४-१५मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांच्या आधारे आलेली आहे आणि त्याबाबतच्या गोष्टी माझे सहलेखक श्री. शेखर देशमुख सांगणार आहेत.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
तसे पाहता विज्ञान ही उत्क्रांत आणि प्रगत होत जाणारी नित्य घटना आहे. या घटनेतल्या प्रत्येक क्षणाला रोमहर्षक गोष्टी लगडलेल्या आहेत. आजवर बहरून आलेले कर्कविज्ञानरूपी झाडही त्याला अपवाद नाही. येथे प्रत्येक नव्या शोधात, नव्या कामगिरीत, यशात आणि अपयशातही रोमहर्षक गोष्ट दडलेली आहे. माणसाला तर जन्मापासूनच ‘गोष्ट’ या गोष्टीने नादावले आहे. एका पातळीवर गोष्ट ही माणसाच्या कल्पनाशक्तीचा भन्नाट आविष्कार आहे, गोष्टीने माणसाचे रंजनही घडवून आणले आहे. प्रसंगोपात त्याला कठीणसमयी आत्मिक बळ पुरवले आहे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती अन ज्ञानाचे अभिसरणही घडवून आणले आहे.
या पुस्तकातसुद्धा कर्कविज्ञानाच्या आजवरच्या इतिहासातल्या दोन ओळींत, दोन वाक्यांत दडलेल्या चित्तवेधक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टी माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे, संयम, जिद्द आणि सृजनशीलतेचे विहंगम दर्शन घडवणाऱ्या आहेत. या गोष्टींमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेची, प्रज्ञा-प्रतिभेची लख्ख प्रतिमा उमटली आहे. त्यातून कर्कविज्ञानाचा मानवी चेहरा वाचकांच्या नजरेपुढे येण्यास मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे.
आपल्याला कर्करोग झाला आहे, हे सत्य उमगल्यानंतर अनेकांमध्ये आचार-विचारांचे अंतर्बाह्य परिवर्तन घडून येते. जगाकडे निरपेक्ष भावनेने बघण्याची दृष्टी विस्तारते. अलीकडच्या काळात इंग्लिश भाषेत जॉन डायमंड (सी : बीकॉज कॉवर्डस गेट कॅन्सर), लान्स आर्मस्ट्राँग (इटस नॉट अबाउट दी बाइक), रँडी पॉश (दी लास्ट लेक्चर), पॉल कलानिधी (व्हेन ब्रेथ बिकम एअर), युवराज सिंग (दी टेस्ट ऑफ माय लाइफ), मनीषा कोईराला (हिल्ड), लिसा रे (क्लोज टु दी बोन); तर मराठीत दिनकर गांगल (कॅन्सर डायरी), डॉ. अरविंद बावडेकर (कॅन्सर माझा सांगाती), जयंत एरंडे (कर्करोग, मूळ लेखक एस.एम. बोस), डॉ. सुलोचना गवांदे (कर्करोग : माहिती आणि अनुभव) असे अनेक अभ्यासक-लेखक-कलावंत-क्रीडापटू मानवी जगण्याचा नवा अर्थ घेऊन समोर आले आहेत. भूतकाळात अलेक्झांडर सोल्झेनित्सिन (दी कॅन्सर वॉर्ड), सूझान सोंटॅग (इलनेस अॅज मेटाफर) यासारख्या नामवंत लेखक-लेखिकांनी कर्करोगाच्या संबंधाने जगण्याचा तत्त्वज्ञानात्मक वेधही घेतला आहे. सिद्धार्थ मुखर्जींसारख्या कर्करोगतज्ज्ञाने कर्करोगाचा साद्यंत इतिहास (दी एंपरर ऑफ ऑल मॅलडीज) उलगडला आहे. थोडक्यात लेखनकलेच्या अंगाने मांडण्यात आलेल्या गोष्टी कर्कविज्ञानाला दर वेळी नवीन झळाळी देत आल्या आहेत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
सरतेशेवटी, एखाद्याला कर्करोग ग्रासतो ही शरीरातल्या असंख्य पेशीपेशींमधली क्रिया-प्रतिक्रियांच्या साखळीतून घडून येणारी जैविक प्रक्रिया आहे. एका शरीरात अनेक सूक्ष्म-अतिसूक्ष्म जिवांचा अस्तित्वासाठी चाललेला तो संघर्ष आहे. मागच्या जन्मीचे पाप, या जन्मीचे भोग याच्याशी कर्करोग होण्याचा सूतराम संबंध नाही, हे विज्ञानाधारित सत्य वाचकांपर्यंत पोहोचावे, हा या पुस्तक लिखाणामागचा उद्देश आहे. वाचक आमच्या या प्रयत्नास प्रतिसाद देऊन हा उद्देश सफल करतील, ही खात्री आहे.
‘कर्कविज्ञानाची गोष्ट’ – डॉ. आनंद जोशी, शेखर देशमुख,
राजहंस प्रकाशन, पुणे,
पाने – २००, मूल्य – २५० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment