अजूनकाही
हिंदीतील एक मान्यवर, प्रख्यात कवी कुमार अंबुज यांच्या ११२ कवितांचा मराठी अनुवाद ‘इथपर्यंत येताना : निवडक कविता’ या नावानं नुकताच प्रकाशित झाला आहे. वर्णमुद्रा पब्लिशर्सने प्रकाशित केलेल्या या संग्रहांतील कवितांचा अनुवाद राजा होळकुंदे यांनी केला आहे. या संग्रहाला त्यांनी लिहिलेलं हे मनोगत…
..................................................................................................................................................................
मराठीत अनुवादाची दीर्घ परंपरा आहे. अनेक लेखक, कवी, अनुवादकांनी अनेक भाषांतील श्रेष्ठ साहित्याचे अनुवाद केलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेतील एक लक्षणीय कवी कुमार अंबुज यांच्या कवितांचा मी अनुवाद करीत होतो. हे पुस्तक त्याचीच निष्पत्ती आहे.
कुमार अंबुज यांच्या पाच-सहा कवितासंग्रहांतील काही निवडक कवितांचा हा मराठी अनुवाद आहे. हिंदी भाषेतील श्रेष्ठ कवी विष्णु खरे यांच्या भेटीचा अनेकदा योग आला. औरंगाबाद येथे ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या वतीनं एक चर्चासत्र आयोजित केलं गेलं होतं. तिथं विष्णु खरेंसोबत मलाही एक शोधपत्र वाचायचं होतं. दुसऱ्या दिवशी चर्चासत्राची सुरुवात होणार होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे चर्चासत्र रद्द करण्यात आलं. भरपूर वेळ होता. त्यामुळे संपूर्ण दिवस विष्णुजींसोबत राहायला मिळालं. त्यांच्यासोबत असणं, बोलणं, संवाद करणं ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट होती. विष्णुजींचा व्यासंग, अभ्यास जागतिक पातळीवरच्या कवितेला कवेत घेणारा होता. ते अनेक कवींबद्दल बोलत असायचे. हिंदी-मराठी भाषांतील कवितेबद्दलही बरीच चर्चा होत राहिली. या संवादात त्यांनी ज्या कवींची नावं घेतली, त्यात कुमार अंबुज हे नाव सतत येत होतं. त्यामुळे कुमार अंबुज यांच्याबद्दलचं माझं कुतूहल वाढत गेलं.
..................................................................................................................................................................
..............................................................................................................................................................
काही दिवसांनी सटाणा इथं प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी अनुवादावर दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित केलं होतं. मी एच.एस. शिवप्रकाश या कन्नड नाटककाराच्या ‘महाचैत्र’ या एका बहुचर्चित कन्नड नाटकाचा अनुवाद करीत होतो. त्यामुळे मलाही निमंत्रित करण्यात आलं होतं. तिथंही दोन दिवसांच्या चर्चासत्रानंतर संध्याकाळी व रात्री प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक अरुण कमल आणि खरेंसोबत गप्पा मारत चर्चा करीत राहणं फार आनंददायी आणि विचारप्रवर्तक होतं. चर्चेत नेहमी कविता अग्रस्थानी असायची. त्यांनी सहज विचारलं, ‘सध्या तू काय करतो आहेस?’ मी ‘कुमार अंबुजच्या कवितांचा अनुवाद करतोय’ असं सांगितलं. तेही म्हणाले की, ‘अंबुजच्या कवितांचे अनुवाद व्हायला पाहिजेत.’ त्यानंतर आम्ही अनेकदा मुंबई-पुण्यात व इतरत्र भेटत राहिलो.
१९७३ साली मराठवाडा साहित्य परिषदेचं मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या मासिकाचे हिंदीतून मराठीत अनुवाद केलेल्या कवितांचे लागोपाठ दोन विशेषांक निघाले होते, ते वाचले होते. या अनुवादाच्या निमित्ताने ते पुन्हा वाचले. या सर्व कवितांचे अनुवाद चंद्रकांत पाटील यांनी केले होते. नंतर १९९०-९१ साली ‘समकालीन हिंदी कविता’ या शीर्षकाचं त्यांचंच पुस्तकही आलं. त्यामुळे मला एकूणच हिंदी कवितांची समग्र पार्श्वभूमी समजावून घेता आली. तेव्हापासून आजतागायत मी हिंदी कविता किंवा एकूणच हिंदी साहित्याशी बांधला गेलो आहे. मराठी कविता तर माझ्या विशेष आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहेच.
माझी आणि कुमार अंबुज यांची पहिली भेट पुण्यात झाली. सविस्तर चर्चा झाली. नंतर त्यांनी त्यांच्या काही नव्या कविताही पाठवल्या. त्यातल्या काही कवितांचे अनुवादही या संग्रहात आहेत.
महत्त्वाच्या हिंदी कवींच्या कवितेचे मला जाणवणारे विशेष म्हणजे भाषा आणि अभिव्यक्तीची सहजता, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची सखोल जाणीव, कवींच्या अनुभूतीची व्यापकता, तसेच जाणिवेचा अतिशय विस्तारलेला परीघ, निश्चित जीवनदृष्टी, शिवाय विवेकनिष्ठा आणि भावगर्भता यांचं संतुलन. प्रत्यक्ष जगण्यातील लहानसहान व सामान्य गोष्टींचा विसर पडत नाही. ज्या गोष्टींकडे सर्वसामान्यांचे लक्ष जात नाही, त्या गोष्टी, हिंदी कवींच्या विशेषत: चंद्रकांत देवताले, विष्णु खरे, कुमार बुज इत्यादींच्या काव्यनिर्मितीच्या महत्त्वाच्या प्रेरणा ठरतात. उदाहरणार्थ, रघुवीर सहाय यांची ‘व्यावहारिक लोग’, केदारनाथ सिंह यांच्या ‘जूते’, ‘धूप में घोडे पर बहस’, चंद्रकांत देवताले यांच्या ‘बालम ककडी बेचनेवाली लडकियाँ’, ‘एक निंबू के पीछे’, विष्णु खरे यांच्या ‘जो टेम्पो में घर बदलते हैं’, ‘लडकियों के बाप’, आलोक धन्वा यांची ‘छतोंपर लडकियाँ’, राजेश जोशी यांची ‘बिजली सुधारनेवाले’ इत्यादी.
..................................................................................................................................................................
एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.
ई-मेल - SAF.CPM@outlook.com
पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw
आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.
..................................................................................................................................................................
हे अनुवाद करण्यासाठी मान्यता देताना कुमार अंबुज यांची एकच अट होती की, अनुवाद पूर्ण झाल्यावर चंद्रकांत पाटील यांना दाखवून घ्यावेत.
साधारणत: ७०-८०च्या दशकात आणि नंतरही मोठ्या प्रमाणावर खेड्यातून शहराकडे अनेक कवी स्थलांतरित झाले. कुमार अंबुजही त्यांच्यापैकीच एक आहेत. आपली खेड्यातली पाळंमुळं कुमार अंबुज यांनी नुसतीच जपली नाहीत, तर त्यांचे सूक्ष्म तपशील आणि खास भाषिक बारकावे आपल्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त केले आहेत. मात्र त्यांची कविता नुसतेच तपशील मांडत नाही, आपल्या विशिष्ट बांधिलकीमुळे आणि चिंतनामुळे त्यांना अस्सलपणा आणि जिवंतपणा मिळवून देते. त्यांच्या कवितांना बौद्धिक, भावनिक आणि सौंदर्यात्मक उंची प्राप्त करून देतात. कुमार अंबुज यांच्या कवितांतून निर्माण होणाऱ्या जाणिवांबद्दल असलेल्या माझ्या मतांपेक्षाही वाचकांना त्यांच्या कवितांतून जाणवणारे अनुभव अधिक महत्त्वाचे आहेत.
शेवटी कुमार अंबुज यांच्या कवितेविषयी विष्णु खरे यांचे शब्द उसने घेऊन असे म्हणता येईल : “हिंदीतील काही थोड्या कवींमधील कुमार अंबुज एक जबाबदार कवी आहेत. त्यांनी आपल्या सर्जनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच स्वत:वर एक वस्तुनिष्ठ संयम आणि आपली निर्मिती, तसेच त्याच्या अंतिम परिणामावर गुणवत्तापूर्वक दृष्टी ठेवली आहे. त्यांच्या रचनेत एक नॅनो सघनता, एक नि:संदिग्धता आहे. त्यांच्या दीर्घ कवितेतूनही अनावश्यक, सैलसर स्पंजासारखी एखादी ओळसुद्धा काढणे कठीण आहे. त्यांच्या शब्दांतून आणि विरामचिन्हांतूनही फार कमी काढले किंवा बदलले जाऊ शकते. अभिव्यक्ती आणि भाषेच्या स्तरावर अशी स्वयंशिस्त बहुआयामी नैतिकतेतून आणि बांधीलकीतूनच निर्माण होत असते. केवळ हिंदी कवितेतच नाही तर इतर सर्व वाङ्मयप्रकारांतही ही प्रवृत्ती दुर्मीळ होत चालली आहे. अंबुज यांच्या कवितेचं असणं केवळ एक उत्कृष्ट सर्जनशीलताचा नाही, तर कठोर शुचिर्भूतताही आहे.”
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
या संग्रहातील काही अनुवादित कविता ‘मुक्त शब्द’, ‘कवितारती’ आणि ‘युगवाणी’मधून पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत. त्या संपादकांचे आभार.
हल्ली इतर भाषांतून आणि विशेषत: हिंदीतून मराठीत अनुवाद फक्त साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या संग्रहांचेच होतात. कारण ते संग्रह साहित्य अकादमी आयतेच प्रकाशित करते. कुमार अंबुज यांच्या संग्रहाला अकादमी पुरस्कार मिळाला नसल्याने हे पुस्तक कोण प्रकाशित करील, याची घोर चिंता होती. मात्र कवितेवर उत्कट प्रेम करणारे व स्वत: कवी आणि अनुवादक असलेले आमचे स्नेही मित्र श्रीयुत मनोज पाठक यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याबद्दल विशेष आस्था दाखवली व तात्काळ संमती दिली. त्यांचे हार्दिक आभार.
आदरणीय निशिकांत ठकार सरांनी या संग्रहाच्या मलपृष्ठावरचा मजकूर लिहिला आहे. आभाराऐवजी त्यांच्या ऋणात राहणंच मला आवडेल.
‘इथपर्यंत येताना : निवडक कविता’ – संपादन व अनुवाद – राजा होळकुंदे
वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव
पाने – २००, मूल्य – ४०० रुपये
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment