‘भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लीम’ : रोहिंग्यांच्या उद्ध्वस्त जगाचा कानोसा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शेखर देशमुख
  • ‘भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लीम’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 04 November 2021
  • ग्रंथनामा शिफारस रोहिंग्या Rohingya बौद्ध धर्म Buddha Dharma म्यानमार Myanmar

खरे तर रोहिंग्या मुस्लिमांच्या विस्थापनाचा प्रश्न अगदी अलीकडे प्रतलावर आलेला आहे. परंतु, त्याची तीव्रता किती मोठी आहे, या प्रश्नाशी जोडला गेलेला इतिहास किती गुंतागुंतीचा आणि भयावह वाटावा असा आहे, याची जाणीव फार थोड्यांना झालेली आहे. तसे पाहता, भारतीय उपखंडातून ब्रिटिश माघारी गेल्यानंतर विशेषतः दक्षिण आशियाई देशांनी सातत्याने सामाजिक-राजकीय अस्थिरता, अस्वस्थता अनुभवली आहे. विशिष्ट अंतराने लोकशाहीपुढे धोके निर्माण झाल्याचेही आपल्याला दिसले आहे. मात्र, प्रस्तुत पुस्तकाद्वारे रोहिंग्यांच्या समस्येचा मागोवा घेताना लेखक अरुण वाहूळ यांनी म्यानमार आणि आसपासच्या देशांचा जो काही इतिहास तपासला आहे, त्याचे आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा वेध घेणाऱ्या अभ्यासकांच्या दृष्टीने मोल आहेच, परंतु सामान्य माणूस, सामान्य वाचकांच्या संवेदनांचा परीघ विस्तारण्यासही त्यामुळे मोठी मदत होणार आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

परंपरेने चालत आलीय म्हणून लोकशाही व्यवस्था गृहित धरून चालत नाही. याचा प्रत्यय अतिरेकी राष्ट्रवादाच्या आहारी गेलेल्यांनी या वर्षाच्या प्रारंभी अमेरिकी संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर साऱ्या जगाला आला. याचप्रमाणे सर्वच धर्म शांती-अहिंसेचा पुरस्कार करतात, त्यामुळे त्या-त्या धर्माचे अनुयायी शांती, अहिंसा आणि सौहार्दाची मूल्ये जपणारे असतात, किंवा असतीलच असेही गृहित धरून चालत नाही, याचा धडाही हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकास मिळतो.

बहुसंख्याकवादी राजकारणाचे बळी

जिथे जिथे बहुसंख्याकवादी राजकारण पेट घेते, त्या-त्या देशांची राजकीय घडी व्यवस्थित असली, तरीही सामाजिक-सांस्कृतिक घडी बिघडलेली असते. गेल्या अर्धशतकाचा भारतीय उपखंडातल्या देशांचा इतिहास तपासला तर, हेच चित्र कमी-अधिक प्रमाणात आपल्या आसपासच्या प्रत्येक देशांत दिसते. उदाहरणार्थ, भारतातातल्या बहुसंख्याकवादी राजकारणाने देशाचे नागरिक असलेल्या मुस्लिमांना एका कोपऱ्यात ढकलले आहे. पाकिस्तानात हीच वेळ हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदिया समूहांवर आलेली आहे. श्रीलंकेत सिंहलींच्या बहुसंख्याकवादी राजकारणाने अल्पसंख्याकांना अस्थिरतेच्या खाईत लोटल्याचाही इतिहास ताजा आहे. अफगाणिस्तानात बहुसंख्याकवादी तालिबानी गटांनी हिंदू, बौद्धांना वारंवार लक्ष्य केले आहे. बांग्लादेशात हिंदू आणि रोहिंग्यांना बहुसंख्याकवादी राजकारणाचे फटके बसत आले आहेत.

म्हणजेच, त्या-त्या देशात बहुसंख्याक असलेल्या धर्मियांनी इतरांवर अन्याय-अत्याचार केले आहेत. एका देशातले बहुसंख्याक (उदा. पाकिस्तान-बांगला देश) दुसऱ्या देशात अल्पसंख्य (उदा. म्यानमार, भारत) आहेत, तिथे अत्याचार सहन करत आहेत. त्यामुळे थोड्याफार फरकाने सर्वच धर्माचे अनुयायी धार्मिक शिकवणीला फाटा देऊन कडव्या राष्ट्रवादाचा अवलंब करत आपल्यातल्या हिंसक मनोवृत्तीचे दर्शन घडवत आले आहे. याचे दाखले जसे वर्तमानात मिळत आहेत, तसेच ते इतिहासातही नोंदले गेले आहेत. अगदी हिटलरच्या नाझी राजवटीपासून युगांडाच्या इदी अमीनपर्यंत आणि चिलीचा हुकूमशहा नेता पिनोशेपासून कंबोडियाच्या पोलपॉटपर्यंतच्या कालखंडात विशिष्ट समूहाविरोधातल्या हिंसेचे बीभत्स रूप जगाने यापूर्वी अनुभवले आहे.

मिथकाचे रुजणे

अनुषंगाने, बौद्ध धर्माचे सगळेच अनुयायी शांती-अहिंसेचा पुरस्कार करणारे असतात, हे खरे तर एक मिथक आहे, याची जाणीव प्रस्तुत पुस्तकात आलेल्या रोहिंग्यांवरच्या अत्याचाराच्या कहाण्या वाचताना होत राहते. याच सोबत, अनेक घटना-प्रसंग नजरेखालून घालताना आपल्या देशातल्या गतइतिहासातल्या, वर्तमानातल्या घडामोडींशी तुलना करण्याचा मोहदेखील आपल्याला आवरत नाही. लेखकाने पुस्तकात नमूद केले, त्याप्रमाणे म्यानमारमध्ये १९१७-१८ या कालखंडात बौद्ध अस्मिताकेंद्री राष्ट्रवाद रुजला. खरे तर त्याच सुमारास आपल्याकडेसुद्धा हिंदू आणि मुस्लीम अस्मितेच्या मुद्द्याला (हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग) धग मिळू लागली होती. देशात राहण्यास अपात्र ठरवण्यासाठी रोहिंग्यांना नागरिकत्व सूचमिध्ये समाविष्ट केले गेले नाही, हे वाचताना आपल्याकडच्या एनआरसी-सीएए प्रक्रियेचे आणि त्यानंतर उमटलेल्या अहिंसक-हिंसक प्रतिक्रियांचे तपशील आठवत राहतात. मशिदीत शस्त्रास्त्रे लपवली आहेत, मदरशात देशविरोधी कारवाया रचल्या जात आहेत, अशा संशयावरून बौद्ध भिक्षूंनी म्यानमारमधल्या मशिदींवर हल्ले केल्याच्या कितीतरी घटना या पुस्तकात लेखकाने पुराव्यासह नोंदल्या आहेत, त्या वाचताना आपल्याकडेही याच मानसिकतेतून मुस्लिमांना वेळोवेळी लक्ष्य केले गेल्याचे स्मरण होत राहते.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

म्यानमारच्या लष्करी शासनाने बहुसंख्याक बौद्धांची बाजू घेत, रोहिंग्यांच्या विवाहावर आणि अपत्य जन्मावर बंधने आणणारा कायदा केल्याचे वाचताना, आपल्याकड अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपशासित राज्यांनी ‘लव-जिहाद’चे कारण पुढे करून अध्यादेशाद्वारे ‘अँटी कन्वर्शन लॉ’ (प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्वर्शन बील-२०२०) लागू केल्याचे आठवत राहते. एका ठिकाणी म्यानमारमधल्या कट्टरवादी नेत्याच्या तोंडचे ‘बौद्ध असणे म्हणजेच लोकशाहीवादी असणे’ हे वाक्य वाचल्यानंतर तर ‘हिंदू हा देशभक्तच असतो’ हे इतर धर्मियांबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या संघधुरिणांच्या एका वक्तव्याची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

समूळ उच्चाटनाचा विखारी अजेंडा

रोहिंग्यांना मुळांसकट उखडून टाकण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून म्यानमारच्या निवडणुकांत एकाही पक्षाने (अगदी आन सान स्यू की यांच्या एनएलडी पक्षानेदेखील) मुस्लीम उमेदवार दिला नाही. त्यामुळे म्यानमारच्या संसदेत रोहिंग्यांचे प्रतिनिधित्व करणारा एकही लोकप्रतिनिधी नाही, हे लेखक वाहूळ यांनी या पुस्तकाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. तेव्हा भारतातल्या विद्यमान सत्ताधारी पक्षाने गत लोकसभा निवडणुकीत एकाही मुस्लिमास उमेदवारी दिली नाही, या वास्तवाकडे आपले लक्ष वेधले जाते. मत मिळवण्याच्या क्षमतेवर उमदेवारी अवलंबून असते, त्यात जात-धर्माचा प्रश्न नसतो, अशी मखलाशी आपल्याकडचे सत्ताधारी करत असले तरीही त्यातले एका धर्माला निवडणुकांच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा छुपा अजेंडा लपून राहत नाही.

थोडक्यात, देश कोणताही असो, बहुसंख्याकवादी राजकारणाची दिशा साधारण एकच असते, त्या दिशेने चालताना होणाऱ्या हिंसेची प्रतवारी साधारण एकसारखीच असते, हेही इथे आपल्या लक्षात आल्यावाचून राहात नाही.

बरबादीचे सूचन

जिथे आपल्या कितीतरी पिढ्या मातीत मिसळल्या, त्याच देशाच्या सत्ताधारी व्यवस्थेने, तिथल्या बहुसंख्याक समाजाने लाखो रोहिंग्यांना बेदखल करून टाकले, हजारोंच्या हत्या घडवून आणल्या, त्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या रोहिंग्यांच्या सद्यस्थितीची आपल्याला कल्पनाही करवत नाही, अशी सध्याची अवस्था असल्याचे सूचन पुस्तकात वारंवार आले आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

रोहिंग्या म्यानमारमध्ये तर उपरे ठरलेच, पण ज्या बांगलादेशात त्यांनी आश्रय घेतला, तिथेदेखील त्यांच्या वाट्याला जनावरासमान जीणे येत आहे. बांगला देशने कॉक्सज् बझार इथल्या शिबिरांतून रोहिंग्या शरणार्थींना ‘भाशान छार’ (बंगाली भाषेत याचा अर्थ निर्मनुष्य, अधांतरी बेट) बेटावर नेऊन सोडल्याच्या बातम्या मध्यंतरी वृत्तपत्रांत झळकल्या होत्या. सरकारने तिथे त्यांच्यासाठी वसाहत उभारली आहे. इतरही काही सोयीसुविधा दिलेल्या आहेत, परंतु मानवाधिकार संघटनांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. कारण, पुराच्या काळात या बेटाचा ८० टक्क्यांहून अधिक भाग पाण्याखाली जाण्याचा आजवरचा इतिहास आहे. इथली जागा कमालीची दलदलीची आहे. असे असताना ‘तुम्हाला बांगलादेशात राहायचे असेल तर आम्ही म्हणतो, तिथेच राहिले पाहिजे’, असा बांगलादेशी सरकारचा पवित्रा राहिला आहे. आगीतून फुफाट्यात अशी ही अवस्था आहे.

एका समूहाला जन्माचे ठिकाण असलेल्या देशानेही आपले म्हणू नये आणि इतरांनी उपकाराच्या ओझ्याखाली दाबून जगणे असहाय्य करावे, हे सारे कल्पनेपलीकडले आहे, याची जाणीव पुस्तक वाचताना आपल्याला सातत्याने होत राहते. ‘भूमीच्या शोधात’, ‘बौद्धधर्माचा क्रूर चेहरा’, ‘नरसंहार’, ‘बहिष्कृत’ आणि ‘उपसंहार’ या पाच प्रकरणांतून आकडेवारी, अहवाल आणि इतिहासात नोंदल्या गेलेल्या घटना-प्रसंगांच्या आधारे लेखक वाहूळ यांनी आपल्याच शेजारी देशांत घडणाऱ्या मानवी शोकांतिकेचे सर्वंकष दर्शन घडवले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या पुस्तकास ज्येष्ठ संपादक, राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांची मर्मग्राही प्रस्तावना लाभली आहे. केतकर यांनी स्थलांतर आणि विस्थापनाच्या समस्येचा वैश्विक पट उलगडताना माणसांमधल्या आदिम प्रेरणांचा माग काढला आहे. सहिष्णू आणि अहिंसावादी म्हणवणाऱ्या समाजाच्या ढोंगावर नेमके बोटही ठेवले आहे.

या पुस्तकामुळे वाचकांच्या मनातले अनेक समज-गैरसमज दूर होतील. महत्त्वाचे म्हणजे, दूरवरच्या या संघर्ष-समस्येशी आपला प्रत्यक्ष संबंध नसला तरीही, आपल्या देशात बहुसंख्याक म्हणून आपण कसे वागत आहोत, याची जाणीव करून देणारा आरसा या पुस्तकाच्या रूपाने वाचकांच्या हाती आलेला आहे. त्यात आपले प्रतिबिंब पाहण्याची हिंमत राखता आली, तरीही एक माणूस म्हणून खूप काही साधण्यासारखे आहे.

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १५ ऑक्टोबर २०२१च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘भूमीच्या शोधात रोहिंग्या मुस्लीम’ - अरुण वाहूळ

लोटस इंडिया प्रकाशन, औरंगाबाद

मूल्य – २७५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......