अजूनकाही
डॉ. शरद प्रभुदेसाई यांचे वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टीकोन देणारे ‘जरामरण’ हे पुस्तक नुकतेच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीन प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
जन्म झाल्यानंतर बाल्यावस्था, तारुण्य, म्हातारपण व मरण या जीवनातील विविध अवस्था असतात आणि त्या कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाला भोगाव्याच लागतात. या अवस्थांमधील ‘मरण’ हे अटळ आहे. वैद्यकीय ज्ञान अजून तरी मरणावर विजय मिळवू शकलेले नाही आणि तसा विजय मिळवेल असे वाटत नाही. मरणावर विजय मिळवणे फारच किचकट व कठीण आहे, याचे भान वैद्यकीय तज्ज्ञांना आहे. बाल्यावस्था व तारुण्यामध्ये अपघाती मरण आले, तरच म्हातारपण म्हणजेच ‘जरा’ भोगावे लागत नाही. प्रत्येक माणसाला आपण ‘अ-जरा’ व ‘अमर’ असावे असे वाटते, पण हे वाटणे मृगजळच राहते.
बालपण व तारुण्यामध्ये उत्साही जीवन माणसाने उपभोगलेले असते. या अवस्थांमध्येच शरीरात उत्साह, जोम व रग असते. त्यामुळे धडाडी असते. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची हिंमत असते; पण जसजसे वय वाढते, तसतसा हा जोम, हा उत्साह कमी होत जातो. बर्याचदा मानसिक जोम, उत्साह असतो, पण त्याला शरीर साथ देत नाही आणि या सत्याची जेव्हा जाणीव होते, तेव्हा पाय मागे येतात. मग मनही माघार घेते. नुसता मानसिक उत्साह कमी होत नाही. मनाच्या उत्साहाला शरीर योग्य साथ देत नाही, त्यामुळे काहीच चालत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
याचदरम्यान आता आपले मरण जवळ आले याचेही भान माणसाला होते आणि तो आणखीनच ढेपाळतो. मरणाच्या विचाराने तो कासावीस होतो. त्यातच एखादा मानेचा आजार पाठी लागला की, परिस्थिती आणखी नाजूक होते. आजार गंभीर असेल तर मरणाची आराधनाच करावी, असे वाटते; पण त्याच वेळी आपणास मरण येणार, हे सत्य स्वीकारणे त्याला फारच कठीण जाते. जिवाची घालमेल होते.
मग माणूस वैद्यकीय तज्ज्ञांचे साहाय्य घेतो. उपचाराने आजारावर मात करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. काहीअंशी तो त्यात सफल होतो; पण हे सर्व खरे असले तरी ‘जरामरणा’साठी माणसाने मनाची तयारी करायलाच हवी, नाही का? जी गोष्ट अटळ आहे, तिला कसे सामोरे जायचे याची आखणी त्याने करायला हवी. म्हातारपणातील व्यक्तिगत व सामाजिक समस्यांना कशा प्रकारे तोंड द्यायचे याचे भान त्याला हवेच. असेही एक दिवस म्हातारे होऊन आपण मरणार मग या नको त्या उठाठेवी कशासाठी? अशी भूमिका घेतली तर त्याच्या दु:खात अधिक भर पडण्याची शक्यता! हल्ली विभक्त कुटुंबव्यवस्थेमध्ये आपली मुले व नातेवाईक किती प्रमाणात उपयोगी पडतील हा प्रश्नच असतो. ती तशी उपयोगी पडण्यासाठी त्यांचेशी आपले संबंध सलोख्याचे असावेत, यासाठी सकारात्मक प्रयत्न केल्यास म्हातारपणी त्यांचे उत्तमोत्तम सहकार्य मिळू शकते. विभक्त कुटुंब संस्थेमध्येही नातेसंबंध अबाधित ठेवल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.
काही वेळा पैसा असल्याने माणसाला आत्मविश्वास असतो. पैशांच्या बळावर माझे कोणावाचून काही अडणार नाही असे त्याला वाटते. आपल्या सेवेसाठी नोकर ठेवून सर्व व्यवस्थित होईल असे त्याला वाटते; पण योग्य प्रकारचे नोकर मिळणे व त्यांचे व्यवस्थापन करणे यासाठी तरी कोणीतरी जवळचा माणूस लागतोच. मग हा जवळचा माणूस आपला मुलगा, मुलगी, भाऊ, जावई, मित्र कोणीही असू शकतो; म्हणजे शेवटी एक सत्य स्वीकारायला हवे, माणसाची जागा पैसा घेऊ शकत नाही. पैशांमुळे आलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे जवळच्या माणसांशी हटकून वागणार्या म्हातार्यांची काय अवस्था होते, हे आपण अनुभवले असेलच.
दुसर्या बाजूने विचार केल्यास, या माणसांची घरातील ‘उपयुक्तता’ कमी कमी होत जाते. त्यांच्यावर घरातील जबाबदार्या टाकणे शक्य होत नाही. उतारवयात अशा माणसांना सांभाळण्यासाठी खास व्यवस्था करावी लागते. काही वेळा ही मंडळी तर्हेवाईक असतील तर उपद्रव होऊ शकतो व त्यांचेबरोबर असणार्या तरुणांचे हाल होतात. पूर्णपणे परावलंबी म्हातार्या माणसांची शुश्रूषा करणे फारच कठीण असते. रोज रोज तेच तेच काम करत अशा कामाची कायमची बांधिलकी कंटाळवाणीच असते. अर्थात, तसे स्पष्टपणे कोणीच कबूल करत नाही किंवा बोलून दाखवत नाही; पण सेवा करणार्या तरुणांचे अंतर्मनात तेच भान असणे स्वाभाविक आहे.
‘आपणही कधीतरी म्हातारे होणार, आपल्यालाही असाच आधार म्हातारपणी लागणार’ याचे भान तरुणांनाही असायला हवे. याचे भान ठेवूनच घरातील वयस्करांची सेवा ना-हरकत करायला हवी. या आदर्श विचारानुसार ‘आधार होणे’ हे महत्त्वाचे नाही का?
विविध आजारांना वैद्यकीय उपचार उपलब्ध असल्याने माणसाचे वयोमान वाढत आहे; म्हणून बर्याच माणसांची तब्येत ८० वर्षांपर्यंत ठणठणीत असते. थोडक्यात, समजूतदारपणे वागल्यास घरातील काही कामांची जबाबदारी ही माणसे पेलू शकतात; पण त्यासाठी घरातील सर्वांमध्ये सुसंवाद असणे गरजेचे असते, नाहीतर स्वातंत्र्याच्या हव्यासापोटी आजी-आजोबा व त्यांची मुले व नातवंडे एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. नातवंडांना सांभाळण्यासाठी आजी-आजोबा मुलाच्या घरी जातात किंवा आई-वडिलांची ख्यालीखुशाली समजून घेण्यासाठी मुले त्यांचेकडे जाताना दिसतात; पण समजूतदारपणा दाखवून एकत्र राहात नाहीत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अशा एक ना अनेक गोष्टी म्हातारपणाबद्दल सांगता येतील. म्हातारपणाला ‘दुसरे बालपण’ असे म्हटले जाते. म्हातारपणाची बालपणाशी केलेली तुलना योग्य असली, तरी एका बाबतीत फरक जाणवतो. बाळाला दमदाटी केलेली चालते, ते केलेली दमदाटी विसरूनही जाते; पण वयस्करांना अशा प्रकारे लहान मुलासारखे कह्यात ठेवणे शक्य नसते. या वयस्करांनी त्यांच्या कर्तृत्वावर आयुष्य जगलेले असते. त्यामुळे दमदाटी सोडाच काही गोष्टी सुचवणे हेही शक्य नसते. बाळाचे वय वाढते तसे ते जास्तीत जास्त स्वावलंबी होत असते. त्याउलट, वयस्कराचे वय वाढते तसे त्यांचे परावलंबित्व (शारीरिक व मानसिक) वाढत असते. त्याचे भान त्यांना बर्याच वेळा नसते; म्हणूनच म्हातारपणाला बालपणाची दिलेली उपमा मर्यादित स्वरूपाची आहे.
अशा या म्हातारपणाच्या विविध बाबींचा परामर्श आपण घेणार आहोत.
जरामरण – डॉ. शरद प्रभुदेसाई
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पाने – ८६,
मूल्य – १२५ रुपये
हे पुस्तक २० टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5319/Jaramaran
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment