ज्यांना एकापेक्षा जास्त भाषा येतात, ते सहजतेनं द्विभाषिक कोट्या करू शकतात!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 24 September 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध पेकावी Peccavi फेतकोम्प्ली Fait accompli पन Pun पॅरनोमइझिआ paronomasia आणि अ‌ॅक्सिझमस Accismus

शब्दांचे वेध : पुष्प सत्तेचाळिसावे

आजचे शब्द : पेकावी, Peccavi, फेतकोम्प्ली, Fait accompli, पन, Pun, पॅरनोमइझिआ, paronomasia आणि अ‌ॅक्सिझमस, Accismus

आजची सुरुवात पावणे दोनशे वर्षांपूर्वीच्या विनोदापासून. ब्रिटिश अंमलाखाली असलेल्या भारतात घडलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या घटनेवर हा विनोद आधारित आहे. त्या काळचा इतिहास ज्यांना (थोडाफार) माहीत आहे, अशा वाचकांना तो जास्त आवडेल. हा विनोद म्हणजे एक फार ‘इंटलिजंट पन’ किंवा अतिशय उच्च दर्जाची कोटी किंवा श्लेष आहे. अनेक लोकांना खूप दिवस ती कोटी खरीच वाटत होती, पण ती एक वदंता आहे, हे नंतर उघड झालं.

या तथाकथित ‘पन’(pun)चं श्रेय (जनरल सर) चार्ल्स जेम्स नेपिअर या ब्रिटिश अधिकाऱ्याला दिलं जातं. त्याचा जन्म १० ऑगस्ट १७८२, मृत्यू २९ ऑगस्ट १८५३. तारुण्यात त्यानं युरोपात तसंच अन्य काही देशांत अनेक लष्करी कारवायांत भाग घेतला. त्यानंतर १८४२मध्ये वयाच्या साठाव्या वर्षी त्याला भारतात पाठवण्यात आलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘बॉम्बे आर्मी’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या भूदलाच्या एका विभागात तो मेजर जनरल या हुद्द्यावर रुजू झाला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आताच्या पाकिस्तानात असलेला सिंध प्रांत हा त्या काळी एक स्वतंत्र देश होता. तिथले लोक ब्रिटिशांच्या भारतातल्या आक्रमक धोरणांमुळे बेचैन होते. या सिंध्यांच्या आपसातही कुरबुरी सुरू असायच्या. ब्रिटिशांना सिंध जिंकायची घाई नव्हती, पण तिथे शांतता रहावी असं त्यांचं मत होतं. त्यामुळे पहिल्या अँग्लो-अफगान युद्धानंतर सिंधच्या काही भागात एकदा सुरू असलेल्या स्थानिक लोकांच्या बंडाळीचं निमित्त काढून त्यांनी चार्ल्स नेपिअरच्या नेतृत्वाखाली मुंबईहून तिथे सैन्य पाठवलं. आधी त्याच्याकडे ती बंडाळी शमवणं आणि शांतता प्रस्थापित करणं एवढंच काम होतं. या पठ्ठ्यानं तिथला गडबड-गोंधळ तर थांबवलाच, पण काही दिवसांच्या प्रयत्नांनंतर आपल्याला दिलेल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन १७ फेब्रुवारी १८४३ रोजी सुरू झालेली एक लढाई जिंकून त्यानं पुढे अख्खा सिंध प्रांतच गिळंकृत करून टाकला आणि तिथं ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. स्थानिक लोकांनी त्याला फारसा विरोध केला नाही, हे विशेष. हे ब्रिटिशांना मिळालेलं अनपेक्षित घबाड होतं.

आता पुढची (कल्पित) कहाणी अशी आहे की, आपली मोहीम (जरा जास्तच) फत्ते झाली, हे आपल्या वरिष्ठांना कळवण्यासाठी नेपिअरनं त्यांना एक टेलिग्राम पाठवला. त्यात त्यानं लॅटिन भाषेतला ‘PECCAVI’ एवढा एकच शब्द लिहिला. ही एक ‘पन’ होती. त्या काळचे ब्रिटिश अधिकारी लॅटिन, ग्रीक, फ्रेंचसह अनेक भाषांमध्ये प्रवीण असायचे. त्यामुळे आपलं मनोगत व्यक्त करायला त्यानं लॅटिनचा आधार घेतला, यात काही नवल नाही. कारण त्याच्या वरिष्ठांनाही ती समजत असणारच. कदाचित त्याला यातून आपली विनोदबुद्धी प्रकट करायची असेल किंवा आपण किती हुशार आहोत, हे दाखवून द्यायचं असेल. जे काय असेल ते, पण त्यानं त्या एका शब्दाच्या टेलिग्राममधून आपला अहवाल वरिष्ठांना पाठवून दिला.

‘Peccavi’ म्हणजे काय? याचा अर्थ ‘मी पाप केलं, मी अपराध केला’ असा होतो. म्हणजेच आपल्या पापाची कबुली देणं, मी चुकलो असं सांगणं. इंग्रजीत १५५३ पासून तो धार्मिक व्यवहारांमध्ये वापरात येऊ लागला. लॅटिनमधल्या peccareपासून तो तयार झाला आहे. त्या भाषेत याचंच peccō हे क्रियापद वापरलं जातं. त्याचं हे प्रथमपुरुषी एकवचनी कर्तरी प्रयोगातलं रूप. काही भाषाविद peccō या शब्दाचं मूळ प्रोटो इंडो-युरोपिअन या अतीप्राचीन रचित भाषेतल्या ped या धातूत शोधतात. त्याचा अर्थ चालणं आणि चालता चालता अडखळणं, पडणं, असाही होतो.

थोडक्यात ‘पाय घसरला’, ‘पाऊल वाकडं पडलं’, इत्यादी. आपल्या संस्कृतमधला ‘पद्’ हा शब्द या ‘ped’चा आप्तेष्ट आहे. Peccant, Peccable हे इंग्रजी शब्ददेखील याच peccare आणि peccō यांच्याशी संबंधित आहेत. अर्थ एकच- पाप करण्याची प्रवृत्ती असणारा, स्खलनशील. Peccadillo म्हणजे एखादी क्षम्य, साधारण चूक. आणि Impeccable म्हणजे संस्कृतमधला ‘अनघ’ - पापहीन, शुद्ध, पवित्र. अघ (पाप) हीन.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याचा नेपिअरच्या विजयवार्तेशी काय संबंध? त्याचं उत्तर असं आहे की, इंग्रजीत ‘ध’ हा उच्चार नाही. त्यामुळे ते ‘Sindh’ला ‘सिंध’ असं न म्हणताना त्याचा ‘Sinned’ (सिन्ड) या शब्दाशी मिळताजुळता उच्चार करतात. Sinned म्हणजे पाप केलेला, पाप केलं, इत्यादी. मी पाप केलं म्हणजे I have sinned. म्हणजेच पेकावी. आता हुशार नेपिअरनं या ‘sinned’वर कोटी केली. ‘मी सिंध जिंकला, मला सिंध मिळाला’, हे सांगण्यासाठी त्यानं ‘I have Sindh’ या अर्थानं ‘peccavi’ हा एकच शब्द दुहेरी अर्थानं वापरून आपल्या वरिष्ठांना चकित केलं. दिलेल्या जबाबदारीपेक्षा जास्त काही तरी करून मी चूक केली, असंही त्याला सुचवायचं असेल. अर्थात ही चूक ब्रिटिशांच्या फायद्याची आणि एक प्रकारची ‘फेताकोम्प्ली’ होती. त्यामुळे त्यांनी आधी नेपिअरवर (लंडनमध्ये ब्रिटिश संसदेत) टीका तर केली, पण नंतर त्याचा गौरवही केला.

(‘फेताकोम्प्ली’ किंवा फेतकोम्प्ली (Fait accompli) हा इंग्रजीत वापरला जाणारा एक फ्रेंच वाक्प्रचार आहे. घडून गेलेली आणि आता जिच्यात पुन्हा बदल होऊ शकत नाही, अशी एखादी घटना वा गोष्ट, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच accomplished fact. सिंध प्रांत (इतक्यातच) जिंकायचा नाही, असं धोरण असूनही नेपिअरनं तो जिंकला. ही घटना एकदा घडून गेल्यावर आता घड्याळाचे काटे उलटे फिरवून पुन्हा पूर्वस्थिती परत आणणं हे शक्य नव्हतं. म्हणून ब्रिटिशांनी ही फेताकोम्प्ली मान्य केली.)

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

याच आख्यायिकेला आणखी दोन मनोरंजक पदर आहेत. चार्ल्स नेपिअरच्या या (तथाकथित) लॅटिन श्लेषाचा प्रभाव कॉलिन कॅम्पबेल आणि लॉर्ड डलहौझी या अन्य दोन ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांवरही पडला असं सांगितलं जातं. १८५७-५८च्या पहिल्या स्वातंत्रयुद्धात (म्हणजेच शिपायांच्या बंडात) कॉलिन

कॅम्पबेलनं लखनौ शहराचा ब्रिटिशांसाठी जेव्हा पुन्हा ताबा मिळवला, तेव्हा त्यानं ‘Nunc Fortunatus Sum’ अशा शब्दांचा वापर करून वरिष्ठांना तारेद्वारे खबर दिली. या लॅटिन शब्दांचा अर्थ ‘We Are in Luck Now’ (आमचं सौभाग्य आहे) असा होतो. ब्रिटिश लोक ‘लखनौ’ शहराचं स्पेलिंग ‘Lucknow’ असं करायचे. त्यामुळे आम्ही लखनौमध्ये आहोत, हे सांगण्यासाठी त्यानं ही कोटी केली असं म्हटलं जातं.

त्याच्याच थोडं आधी म्हणजे सात फेब्रुवारी १८५६ रोजी लॉर्ड डलहौझीनं अवध राज्याच्या नबाबाला -- वाजिद अली शाहाला पदच्युत करवून त्याचं राज्य खालसा केलं होतं. या मोहिमेच्या सफलतेची बातमी डलहौझीनं आपल्या वरिष्ठांना ‘Vovi’ या एकाच लॅटिन शब्दाचा समावेश असलेल्या तारेनं दिली होती, असं ऐकिवात आहे. ‘Vovi’चा अर्थ ‘I have vowed’, मी वचन दिलं, शपथ घेतली. हा शब्दही peccavi प्रमाणेच प्रथमपुरुषी एकवचनी कर्तरी प्रयोगातलं रूप असून त्याचं मूळ रूप voveō वचन देणं असं आहे. ब्रिटिश लोक अवधचा उच्चार ‘औड’ (Oud(h)) असा काहीसा करत आणि तो (I've) vowedशी मिळताजुळता असल्यानं त्यानं यावर कोटी करून नुसतं ‘vovi’ असं लिहिलं. त्याचा अर्थ I've Oudh, मला औध मिळालं, असा करायचा.

या तीनही कहाण्या इंग्रजीत ज्यांना ‘अपॉक्रफल’ (apocryphal) म्हणतात, म्हणजे ज्यांच्या सत्यतेविषयी संदिग्धता आहे अशा, कदाचित मनगढंत, काल्पनिक, कपोलकल्पितदेखील, आहेत. प्रारंभ पेकावीच्या आख्यायिकेपासून झाला. त्यात कालांतरानं ‘लक नाऊ’ आणि ‘वोवी’ या आख्यायिकांची भर पडली. बाकीच्या दोन्ही दंतकथांच्या व्युत्पत्तीचं रहस्य गुलदस्त्यातच आहे, पण पेकावी ही कोटी कशी जन्माला आली, हे नंतर शोधून काढण्यात आलं.

‘पंच’ नावाचं विनोदी नियतकालिक इंग्लंडमध्ये तेव्हा नुकतंच प्रकाशित होऊ लागलं होतं. त्याच्या १८ मे १८४४ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात ‘Foreign Affairs’ या शीर्षकाखाली ही कोटी छापून आली होती. खरं तर कॅथरिन विंकवर्थ (Catherine Winkworth) या मुलीनं ती लिहिली होती. पण ‘पंच’मध्ये तिचं नाव आलं नाही. उलट, ही जणू काही आपल्या एखाद्या वार्ताहरानं भारतातून पाठवलेली बातमी आहे, अशा थाटात त्यांनी ती छापली. हा एक प्रकारचा चावटपणा होता, एक एप्रिलला करतात तशी ही एक खोडी होती. पण ती खपून गेली आणि खरोखरच नेपिअरनं असा टेलिग्राम पाठवला होता, असं वाचक मानू लागले. लवकरच सर्वदूर ही खोटी बातमी खऱ्या बातमीसारखी पसरली आणि त्यामुळे साम्राज्यप्रेमी ब्रिटिशांच्या लेखी नेपिअरचा भाव एकदमच वधारला.

बऱ्याच वर्षांनी कॅथरिन विंकवर्थचं नाव पुढे आलं आणि ही कोटी तिचंच बाळ आहे, हे पंचनं मान्य केलं. पण त्यामुळे या बातमीबद्दल लोकांना वाटणारं आकर्षण तसूभरही कमी झालं नाही, हे विशेष.

कॅथरिन विंकवर्थ (१८२७-७८) ही एक हुशार शालेय विद्यार्थिनी होती. नेपिअरवर संसदेत टीकास्त्र सोडलं जात असताना ती आपल्या शिक्षकांना म्हणाली की, खरं म्हणजे नेपिअरनं ‘पेकावी’ अशा एकाच शब्दात आपला अहवाल वरिष्ठांना द्यायला हवा होता. (मी सिंध जिंकला/पण ही माझी चूक होती, अशा दुहेरी अर्थानं.) शाळेत यासाठी तिचं खूप कौतुक झालं. नंतर शिक्षकांच्याच सांगण्यावरून तिनं हा विनोद ‘पंच’ साप्ताहिकाकडे पाठवला. पुढचं तुम्ही आता जाणताच.

कॅथरिन विंकवर्थच्या मूळ लेखनाचं श्रेय जरी ‘पंच’च्या खोडीमुळे नेपिअरला मिळालं असलं तरी त्यानं तिचं महत्त्व कमी होत नाही. हे एक misattributionचं (चुकीच्या व्यक्तीला श्रेय देण्याचं) उदाहरण आहे, एवढंच. पण अजूनही बऱ्याच लोकांना हा सत्य इतिहास माहीत नसल्यानं ते नेपिअरच्या दंतकथेवरच विश्वास ठेवतात.

Peccavi ही एक कोटी किंवा श्लेष किंवा pun आहे, हे आपण जाणतोच. ‘pun’ला ‘पॅरनोमइझिआ’ (paronomasia) असंही म्हणतात. (अनेक वचन paronomasias.) हा मूळ ग्रीक शब्द असून तिथून तो लॅटिनमार्गे १५७७च्या आसपास इंग्रजीत आला. ग्रीकमध्ये para- म्हणजे ‘beside’ (expressing alteration), बाजूला, शेजारी + आणि onomasia म्हणजे ‘naming’ नामकरण. मूळ एक अर्थ असताना पर्याय म्हणून दुसरा थोडासा बदललेला अर्थ शेजारी आणून बसवणं असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. Paronomazein म्हणजे ‘to alter slightly, to call with slight change of name’.

‘सेंच्युरी डिक्शनरी’च्या मते Pun आणि paronomasia यांना अनेकदा समानार्थी समजलं जातं. परंतु त्या दोघांचाही आकृतीबंध आणि परिणाम वेगवेगळे असतात. Pun म्हणजे एकाच शब्दाच्या वा उच्चाराच्या दोन अर्थांवर केलेला शब्दच्छल. यातून विनोदनिर्मिती होते. Paronomasiaमध्ये मात्र ‘जवळपास’ (पण पूर्णपणे नाही) सारख्याच उच्चाराच्या शब्दांवर खेळ केला जातो. यातून इच्छित परिणाम तर साधतो, पण तो विनोदी असेलच असं नाही.

‘Per angusta ad augusta’ या लॅटिन वाक्यात ‘अँगस्टा’ आणि ‘ऑगस्टा’ हे जवळपास सारख्या उच्चाराचे शब्द वापरलेले आहेत. पहिल्याचा अर्थ आहे कष्ट, संकट, अडचणी; दुसऱ्याचा अर्थ आहे थोरपण. म्हणजेच थोरपण हे सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी आधी कष्ट घ्यावे लागतात. हे झालं Paronomasiaचं उदाहरण. या वाक्यात विनोद नाही.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

आता ही विनोदी ‘पन’ बघा-

एका राजाच्या दरबारात एक विदूषक होता. तो रोज राजाला हसवायचा, त्याची करमणूक करायचा. त्यासाठी तो सतत कोट्या करत असे. त्याच त्या कोट्या रोज ऐकून एकदा राजा इतका चिडला की, त्यानं कोट्या करणं बंद कर, असं विदुषकाला सांगितलं. तरीही दुसऱ्या दिवशी त्यानं काहीतरी कोटी केलीच. राजाला राग आला. त्यानं विदुषकाला फाशी द्यायचा हुकूम सोडला. पण ऐन वेळी राजाला त्याची दया आली आणि तो म्हणाला की, यापुढे कधीही कोटी करणार नाही, असं कबूल कर, तरच तुझी फाशी थांबवतो. पण विदूषक पडला सवयीचा गुलाम. त्या बिकट प्रसंगीही तो अत्यानंदानं ओरडला, ‘महाराज, no noose is good news’. या पांचट punमुळे बिचाऱ्याला खरंच सुळावर लटकावं लागलं. Noose म्हणजे ‘फांसी का फंदा’. फाशी द्यायच्या दोराचा मानेभोवती अडकवण्याचा लूप. News (न्यूज) म्हणजे बातमी. नूझ आणि न्यूज या शब्दांवर खेळ करून केलेली कोटी विदुषकाला चांगलीच भोवली.

प्राचीन काळापासून इंग्रजी, मराठी, संस्कृतसह जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये अनेक लेखकांनी Pun आणि paronomasia यांचा वापर केलेला दिसून येतो. प्राचीन रोमन नाटककार प्लोटस हा उत्कृष्ट कोट्या आणि शब्दच्छलासाठी प्रसिद्ध होता. आल्फ्रेड हिचकॉकच्या मते ‘Puns are the highest form of literature’.

या उलट काही लेखक Pun हा विनोदाचा सर्वांत फालतू प्रकार मानतात. ते ‘Pun’कडे वळूनही बघत नाहीत.

पुलंनी भरपूर कोट्या केल्या. पी. जी. वुडहाऊसनं मात्र त्या मानानं फारच कमी ‘Pun’ केल्या आहेत. पण ज्या केल्या त्या फारच उत्कृष्ट दर्जाच्या होत्या. मात्र त्या जशाच्या तशा मराठीत आणता येणं अशक्य आहे.

ज्यांना एकापेक्षा जास्त भाषा येतात, ते सहजतेनं द्विभाषिक कोट्या करू शकतात. लेखकांप्रमाणेच स्टेज, सिनेमांत काम करणारे विनोदवीरही चांगल्या आणि वाईट कोट्या करण्यात माहीर असतात.

समर्थांनी ‘टवाळा आवडे विनोद’ असं म्हटलेलं आहे. त्याचा संदर्भ वेगळा होता. त्यामुळे या उक्तीचा अर्थ शब्दशः न घेता तुम्हाला कुठे चांगली कोटी किंवा ‘पन’ आढळली तर न लाजता जरूर हसा.

....................................................

आजचा पस्तुरी (lagniappe) शब्द : ‘अ‌ॅक्सिझमस’ (Accismus)

तुम्हाला आग्रहाचे किती प्रकार माहीत आहेत? तसे बरेच आहेत, पण सगळ्यात मस्त आग्रहाचा प्रकार आहे, ‘पखवाजी आग्रह’. पखवाज वादकाचे दोन्ही हात पखवाजाच्या दोन्ही टोकांवर काम करत असतात आणि मधला भाग मोकळा असतो, तशा प्रकारे जेवणाच्या पंक्तीत वागणे. समजा एखाद्या लग्नात जेवण्याच्या पंक्तीत वधूपक्षाकडली कोणी तरी महिला लाडू किंवा जिलब्यांचं ताट घेऊन फिरते आहे, वरपक्षाकडच्या लोकांना ‘घ्या, घ्या’ असा आग्रह करते आहे. पाहुण्यांमधला एक गडी खवय्या आहे. आत्तापर्यंत दहा-बारा लाडू तो खाऊन चुकला आहे. तरीही त्याला अजून खायची इच्छा आहे, पण आजूबाजूचे लोक काय म्हणतील या शंकेनं तो त्या बाईच्या आग्रहाला आधी ‘नाही’ म्हणतो. मग हळूच तो एखाद्या पखवाजवाल्याप्रमाणे आपले हात ताटाच्या बाजूला नेऊन हलवत तोंडानं ‘नको नको’ असं म्हणतो. त्या वेळी त्याच्या दोन्ही हातांमधल्या रिकाम्या जागेतून ती हुशार बाई दोन-तीन लाडू त्याच्या ताटात टाकते आणि निघून जाते. हा नको म्हणायचं सोंग करतो आहे, हे तिला कळलेलं असतं. ती गेल्यावर हा पठ्ठा शेजारच्याला सांगतो, ‘मी तर नाहीच म्हणत होतो. तिनंच जबरदस्तीनं वाढलं. आता ते टाकून तर नाही देता येणार ना?’ आणि मग तो त्या लाडवांचा आनंदानं फडशा पाडतो.

हा झाला ‘पखवाजी आग्रह’. जेवणावळ सोडून आयुष्यात इतरही अनेक प्रसंगी पखवाजी आग्रहांना बळी पडणारे किंवा तसं दाखवणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. एखादी गोष्ट मनातून खूप हवी असूनही हे लोक सारखं ‘नाही, नाही, नको, नको’ म्हणून तिला आधी नकार देतात आणि मग ‘फक्त तुम्ही म्हणता म्हणून, तुमच्या आग्रहाखातर, बरं’, असं म्हणत तिचा स्वीकार करतात. या खोट्या, कृतक, ढोंगी नकाराला इंग्रजीत ‘Accismus’ असं म्हणतात.

बोलण्यातला आणि प्रत्यक्ष कृतीतला फरक (विरोधाभास) या (आजकाल विस्मरणात गेलेल्या) शब्दातून व्यक्त होतो. आता याला सद्गुण समजायचं की, दुर्गुण हे ज्याचं त्यानं ठरवायचं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अ‌ॅक्सिझमसची काही उदाहरणं :

राजाविरुद्ध बंड करून ऑलिव्हर क्रॉमवेलनं इंग्लंडची सत्ता बळकावली, तेव्हा त्यालाच राजेपद देण्याचा त्याच्या साथीदारांचा आग्रह त्यानं नाकारला. पण राजा नाही तरी प्रोटेक्टर म्हणजे संरक्षक असं बिरूद धारण करून तो शेवटी सत्ताधीश झालाच.

कोल्हा आणि आंबट द्राक्षं या गोष्टीतल्या कोल्ह्याला द्राक्षं खायची तीव्र इच्छा तर असते, पण तिथवर उडी पोहचत नाही म्हणून तो ‘हट्, ही तर आंबट द्राक्षं आहेत’ असं म्हणून तिथून निघून जातो.

एखादा नेता ‘मी या पदाला, मानाला लायक नाही’ असं म्हणत म्हणत तो बहुमान स्वीकारतो.

‘अ‌ॅक्सिझमस’ हा एक भाषालंकार आहे. ग्रीक भाषेतल्या ‘ἀκκισμός’पासून लॅटिनमध्ये  हा शब्द तयार झाला. इंग्रजीत तो तसाच वापरला जातो. Acco नावाच्या ग्रीक बाईच्या या अशाच प्रकारच्या खोट्या वागण्यावरून हा शब्द बनला, असं म्हणतात.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......