धुळे जिल्ह्यातील रावेर या लहानशा खेड्यात एका कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या, रोजंदारीवर पडेल ते काम करून भाषाशिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या ओढीने वेगवेगळ्या देशांतील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकलेल्या, भाषा आणि तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी जग पालथे घालणाऱ्या, तत्त्वज्ञानासारख्या गहन आणि गंभीर विषयाच्या अभ्यासाने समृद्ध झालेल्या प्रा. शरद बाविस्कर यांचं ‘भुरा’ हे आत्मकथन नुकतंच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…
..................................................................................................................................................................
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रंग देण्याचा प्रयत्न करणे आणि कॅनव्हॉसचा आकार जेवढा वाढवून देता येईल तेवढा वाढवून देणे. शिक्षण म्हणजे मुलामुलींच्या हातात रेडिमेड पेंटिंग देणे नव्हे. शिक्षणाविषयी जी स्पष्टता मला २०२०मध्ये आली, ती १९९७मध्ये सुद्धा होती, असं म्हणणं तथ्यसंगत नसेल. तेव्हा एवढंच माहिती होतं की, ज्या परिस्थितीत फसलेलो होतो त्या परिस्थितीतून सुटका करून घ्यायची आणि अशा जगात शिरायचं होतं, जिथं माणूस म्हणून पूर्णत्वाची ओळख पटेल. पूर्णत्व म्हणजे काय ह्या विषयीसुद्धा अस्पष्टता होती, पण ज्या परिस्थितीत होतो, ती पूर्णत्वास पूरक नाही एवढं मात्र स्पष्ट होतं. शिक्षण हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे, याची मात्र पूर्णपणे खात्री होती. सर्वार्थाने सुटका. केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे. २००२ नंतर जेव्हा माझ्याबरोबरीची पोरं पैसे कमवायच्या नादात मला सांगत असत की, पैसा सब कुछ होता है मेरे यार वगैरे वगैरे!, तेव्हासुद्धा मी शिक्षणाची वाट सोडली नाही. खरं तर माझी आर्थिक परिस्थिती त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट होती; पण मी मात्र शिक्षणाची वाट सोडायला तयार नव्हतो. बरीच वर्षे परिस्थितीनुसार वाटचाल कधी खडतर तर कधी अंधारमय वाटली. मला शिक्षणाची वाट स्पष्टपणे दिसायला लागली, जेव्हा मी १९९९ मध्ये जयहिंदला दाखल झालो आणि ती सुखकर वाटायला लागली, जेव्हा २००५ मध्ये जेएनयूच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि अपेक्षित कक्षेत पोहोचल्यासारखं वाटलं जेव्हा प्रतिष्ठित शिष्यवृत्ती घेऊन २००७मध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी युरोपला गेलो.
१९९६मध्ये इंग्रजी या समस्येवर मात कशी करावी आणि ‘त्या’ जगात कसं शिरावं, एवढाच विचार करत होतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
माझ्या नजरेत इंग्रजी अशी डाकीण आहे की, जी अपवाद वगळता जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या गेटपर्यंतसुद्धा पोहोचू देत नाही. आपल्या समाजात इंग्रजी म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे इंग्रजी एवढं साधं आणि सोपं समीकरण करून ठेवलेलं दिसतं. स्वत:च्या भाषेच नोटबंदी मान्य करून ज्ञानार्जनासाठी अगोदर ज्ञानाचा चलन म्हणजे ज्ञानभाषा इंग्रजी शिकावी लागते. माणसाने इंग्रजीच काय, तर इतर महत्त्वाच्या भाषासुद्धा शिकायला पाहिजेत, पण सर्वसामान्यांची भाषा बाद करून इंग्रजीच्या हवाली पोरांना करणं ज्यांच्याकडे अनुकूल वातावरण नाही, हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि ह्या मूर्खपणाला आपली व्यवस्था सर्वस्वी जबाबदार आहे. आपल्यासारख्यांसाठी शैक्षणिक प्रवास इतका वेदनादायी ठरतो की, काही अपवाद वगळता बहुसंख्य हुशार मुली-मुलं इंग्रजीचे शिकार होऊन बाहेर फेकले जातात. नंतरच्या काळात इंग्लंडमध्ये काही शोधनिबंध लिहीत असताना माझ्या अभ्यासात आलं की, चेकोस्लोव्हाकिया, साऊथ कोरिया, कातालोनी यासारख्या छोट-छोट्या प्रांतांनी त्यांच्या लोकभाषेत सर्वस्तरीय शिक्षण देऊन शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर भर दिला आहे. माझ्या मते कुठल्याही समाजाचं लोकशाहीकरण शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर अवलंबून असते. शिक्षणाचे लोकशाहीकरण तेव्हाच शक्य आहे, जेव्हा लोकभाषांचा वापर सर्व स्तरांवर आणि सगळ्या ज्ञानशाखांसाठी केला जाईल. दुर्दैवाने, भारतीय शिक्षणाचं अपरिमित नुकसान दोन विकृतींनी केलेलं दिसतं. एका विकृतीला वाटतं- इंग्रजीतच खरं शिक्षण शक्य, तर दुसऱ्या विकृतीला वाटतं की, संस्कृतमध्येच सर्व ज्ञान. ह्या अन्यायी व्यवस्थेसमोर एका व्यक्तीचं काही चालत नाही, कारण एका व्यक्तीचा व्यवस्थेविरुद्ध एकाकी विद्रोह म्हणजे निव्वळ वेडेपणा आणि विखुरलेल्या व्यक्तींचा विखुरलेला विद्रोह तेवढाच निरर्थक.
त्या काळी ह्या व्यवस्थेत शिरण्यासाठी स्वतःला इंग्रजीच्या हवाली करायचंठरवलं. भाषा म्हणजे शब्दांची गोळाबेरीज, अशी भाबडी समजूत डोक्यात असल्यामुळे इंग्रजीची डिक्शनरी पाठ करून टाकायचा विचार मनात आला. नववीत मला एक बारकीशी डिक्शनरी बक्षीस मिळाली होती, जी घरच्या एका बोखल्यात जुन्या वह्यांमध्ये धूळ खात पडली होती. डिक्शनरीतले सगळे शब्द तोंडपाठ केले तर कदाचित इंग्रजी आपलीशी वाटेल, असा विचार करून डिक्शनरीला त्यानंतर सतत खिशात ठेवायला लागलो. रोज दुपारी काम संपल्यानंतर क्रेनच्या मागे जाऊन डिक्शनरी वाचत बसायचो. जेव्हा दिनेशभाऊच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने मला विचारलं, ‘‘कॉलेजला परत जाण्याचा विचार आहे का?’’
‘‘हो, बारावीचं वर्ष सुरू होईस्तोवर इथं काम करायचं आहे.’’ मी उत्तर दिलं.
‘‘म्हणजे इथं कायम काम करायचा विचार दिसत नाही?’’ त्याने परत प्रश्न केला.
‘‘हो, हे काम टेम्परवारी आहे.’’ मी इंग्रजी शब्दाचा वापर करून उत्तर दिलं.
‘‘टेम्परवारी नाही, टेम्पररी म्हणायचं.’’
माझ्या उच्चारातली चूक दाखवत जणू त्यानं माझ्या निर्णयाचं समर्थन केलं असावं, असं मला त्याच्या हावभावात जाणवलं. मला दिनेशभाऊ शिकलेला वाटायचा. कदाचित, माझी शिक्षणाविषयी असणारी गोडी त्याला आवडली असावी, कारण त्याने नंतर कामात मला बरीच सूट दिली.
जेव्हापासून खिशात डिक्शनरी बाळगायला लागलो, तेव्हापासून मला मानसिकदृष्ट्या असं वाटायचं जणू काही मी तिथला नाहीच. म्हणून कदाचित तिथल्या बऱ्याच न आवडणाऱ्या गोष्टी मनाला लावून घेत नसे. नंतर सोबत काम करणाऱ्या पोरांबरोबर मिसळण्याचा प्रयत्नदेखील करायचं बंद केलं. सवयीमुळे म्हणा किंवा मानसिक तयारीमुळे, तीन-चार महिन्यांत एकूणच सर्व गोष्टी सुसह्य वाटायला लागल्या होत्या. बऱ्याचदा पोरं रात्री पिक्चर पाहायला जात असत. मला अशा कुठल्याही गोष्टींमध्ये रस नव्हता.
‘बॉर्डर’ पिक्चर रीलीज झाला तेव्हा पोरं दुपारपासूनच हा पिक्चर पाहण्याचा प्लॅन करीत होते. मालक पोरांना रावेरला घरी जाण्यासाठी क्रेन घेऊन जाण्याची परवानगी देत असे. बॉर्डर ‘प्रभाकर’मध्ये लागला होता. क्रेन बाराफत्तरजवळ लावली. तिथून प्रभाकर दोन पावलांवर. रात्रीची वेळ असल्याने तिथं गाडी लावारिस सोडून सगळेच पिक्चर पाहायला जाऊ शकत नव्हते; पण बॉर्डरविषयी सगळ्यांना एवढी हुरकी भरली होती की, दहा-बारा पोरांमधून कोणीच मागे थांबून गाडी सांभाळायला तयार नव्हतं. तशी मला कल्पना होती की, गाडी सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच येईल. स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्नकरत म्हणालो, ‘‘सगळे दोन-दोन रुपये काढा, मी सांभाळतो गाडी.’’ सगळ्यांनी दोन-दोन रुपये मला दिले आणि बॉर्डर पाहायला निघून गेले. त्यादरम्यान मी गाडीच्या केबिनमधला लाइट लावून डिक्शनरी वाचत बसलो.
क्रेन सर्व्हिसमध्ये मॅनेजर म्हणून मला पाच-सहा महिने झाले असतील. गाड्यांवर बाहेर कामाला जाण्याची इच्छा असूनदेखील मला ऑफिसमध्येच कामं करावी लागत होती.
एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमध्ये चार-पाच गिऱ्हाईक आले. गिऱ्हाईकांना पटवून शेठ लोकं ऍडव्हान्स पैसे खिशात कसे पाडायचे, हा प्रकार माझ्यासाठी फार मनोरंजनाचा असायचा. यासाठी त्यांनी अनुभवजन्य कौशल्य विकसित केलं होतं जे कुठल्याही एमबीएच्या पुस्तकात रेडीमेड सापडणार नाही. त्यातल्या त्यात शेजारीच दुसरं क्रेनचं दुकान असल्याने गिऱ्हाईकांसाठी जास्तीचे पर्याय उपलब्ध होते म्हणून सगळं मोठ्या खुबीने करावं लागत होतं. मी चहा वगैरे वाटून रोज बाजूलाच बसून ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असे.
गिऱ्हाईकांना खुर्चीत बसवत शेठ म्हणाला, ‘‘शरद, मस्त चार स्पेशल आन रे.’’
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
शेठने त्या गिऱ्हाईकांना पटवणं सुरू केलं आणि चहा मागवून गिऱ्हाईकांना पाजणं, हे सगळं पटवण्याचाच भाग असे, म्हणजे चहा येईपर्यंत गिऱ्हाईक शेठच्याच ताब्यात. नेहमीप्रमाणे मी चहा वाटून बाजूला जाऊन बसलो. थोड्याच वेळात लक्षात आलं की, गिऱ्हाईकांना बेस्ट डील देऊन आणि ऍडव्हान्स पैसे घेऊन शेठने काँट्रॅक्ट फायनल केला होता. गिऱ्हाईक म्हणजे सोनगीर फाट्याजवळचे शेतकरी होते. शेताच्या बांधावरील तोडलेल्या झाडांना ट्रकमध्ये क्रेनच्या मदतीने लोड करायचा काँट्रॅक्ट होता. गिऱ्हाईक फार घाईत होते, कारण त्याच संध्याकाळी काम सुरू करायचं होतं.
पण, आमच्या शेठची पंचाईत अशी की, सगळ्या गाड्या बाहेर गेल्या होत्या. फक्त एक गाडी, तिचा ड्रायव्हर आणि एक फोरमन शिल्लक होता. फोरमन म्हणजे ज्याला कामाचा भरपूर अनुभव आणि जो जुगाड वगैरे लावून कितीही अवघड काम कमीत कमी खर्चात करणारी व्यक्ती. बरेच क्रेन सर्व्हिसचे ड्रायव्हर वयस्कर होते. त्यांचं काम म्हणजे क्रेनच्या गाडीला कामाच्या जागी पोहोचवणं आणि मनात आलं तर कामात हातभार लावणं, नाहीतर बिडी ओढत लांबूनच गंमत बघणं. शेठला कुठल्याही परिस्थितीत काँट्रॅक्ट हातातून जाऊ द्यायचा नव्हता. ड्रायव्हर आणि फोरमन होते; पण सोबत लागणारा हेल्पर नव्हता. शेठ माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘शरद, हो तयार आणि जा यांच्या सोबत. उद्यापर्यंत मी कुणाला तरी पाठवतो.’’ हे ऐकल्यावर भारी वाटलं, कारण पहिल्यांदा ऑफिसच्या बाहेर पडणार होतो. गाड्यांवर बाहेर कामाला जाणं म्हणजे मॅनेजर ह्या उपद्रवी गोष्टीपासून सुटका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरगावी गाड्यांवर काम केल्याने वरकमाईची शक्यता असे. क्रेन सर्व्हिसवर काम करणाऱ्या पोरांचा पगार तसा कमीच असे; पण वरकमाई असल्यामुळे कुणी सहजासहजी क्रेनचं काम सोडत नसे. वरकमाई म्हणजे कामानंतर मिळणारा चहापाणी आणि अपघात झालेल्या गाड्यांमधून पोरं भंगार वगैरे बर्याच गोष्टीसुद्धा चोरत असत. बऱ्याचदा तर काही नमुने अपघात झालेल्या गाडींमधून चांगल्या वस्तू तोडून फोडून आणत आणि पैसे बनवत असत. शेठने मला ही संधी देताच, १७-१८चा पाना उचलला, गाडीखाली घुसलो आणि जॉइंटचे नटबोल्ट तपासले आणि गाडीचं ऑइल-पाणी चेक केलं. आमचा ड्रायव्हर पेपरने गाडीचे काच पुसत होता.
‘‘मनापा द्या. मी करस साफ. असा चमकाडसूना, गाडीले काच शेत कानही, असं वाटी.’’ ड्रायव्हरच्या हातातून पेपर घेत म्हटलं. अनुभवी ड्रायव्हरांनासमोर काचांवर एक डागसुद्धा सहन होत नसे. स्वतःची उपयुक्तता सिद्ध करायची जणू काही मला घाई झाली असावी. वाटायचं की, असं पुढेपुढे काम केल्याने मला गाड्यांवर कामाला पाठवलं जाईल आणि त्यामुळे मॅनेजरकीचा शिक्का जाईल आणि इतरांसारखं मलापण समान पद्धतीने वागवलं जाईल. मला ठाऊक होतं की, फोरमेन आणि ड्रायव्हर फार महत्त्वाची लोकं. त्यांनी जर ठरवलं तर माझी मॅनेजरकी संपू शकणार होती, म्हणून मी पुढेपुढे सगळं काम करायला लागलो.
गाडी निघाली. मी केबिनमध्ये न बसता मागे बसलो. त्यामुळे एकांतात थोडी डिक्शनरी वाचायला मिळणार होती. सोनगीर फाट्याला आलो. सोनगीरफाटा म्हणजे मुंबई-आग्रा हायवेवर तीन-चार ढाबे, टायरची, गॅरेजची दुकानं आणि काही टपऱ्या. तिथं जाऊन आम्हाला कळालं की, काही कारणास्तव काम दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू करावं लागणार होतं. फोरमनने शेठला फोन लावला. शेठने सोनगीर फाट्यावर रात्र काढून सकाळी लवकर कामाला सुरुवात करायला सांगितलं. मग, रात्री एका ढाब्यावर शेवभाजी खाऊन पानटपरीवरून पान घेतलं आणि गाडीच्या मागे ढिमऱ्यावर जाऊन निवांतपणे पान चघळत बसलो. झोपायची वेळ झाली होती.
बाकी सगळे नेहमी बाहेरगावी कामाला जात असत म्हणून त्यांच्याकडे स्वतःच्या गोधड्या होत्या. क्रेनवरच्या गोधड्या म्हणजे कधी न धुतलेल्या, कुठंही लोळवलेल्या, ग्रीस ऑइल वगैरे वगैरेचा उग्र वास येणाऱ्या. त्यातल्या त्यात माझ्याकडे स्वतःची गोधडी नव्हती, कारण मॅनेजर ते हेल्पर ही बढती अचानक आणि तात्पुरती होती.
ड्रायव्हरने एक जुनी गोधडी काढून दिली आणि म्हणाला, ‘‘कोणी शे माहीत नही, पण आजपूरती वापरी ले.’’
‘‘राहू दे. काय जास्त थंडी नही वाटी ऱ्हायनी.’’ त्या भरपूर वास येणाऱ्या गोधडीकडे पाहत म्हणालो.
‘‘तूनी इच्छा!’’ ड्रायव्हर उदासीनतेने मला म्हणाला.
मी जेव्हा गाडीच्या पायदानात पेपर अंथरून झोपायची तयारी करायला लागलो, तेव्हा ड्रायव्हर परत म्हणाला, ‘‘आयक् मन्ह, बारावाज्यानंतर थंडीकुथाडी, मंग तवय कुडकुडशी. आसं कर पायले पेपर गुंडाय आणि मोज्या चढाई ले. आजिबात थंडी वाजाव नही.’’
त्याने सांगितल्याप्रमाणे पायांना पेपर गुंडाळून मोजे चढवून, गुडघे पोटातघालून झोपण्याचा प्रयत्न केला; पण मच्छरांनी आणि डोक्यातील विचारांनी बारा-एक वाजेपर्यंत झोपू दिलं नाही. जेमतेम झोप लागली, असं शरीराला वाटलं तेवढ्यात सकाळी-सकाळी शेजारच्या टपरीवरून एक अहिराणी गाणं कानावर पडायला लागलं.
‘नवरा मारस वं. मारस वं,
मनी माय भलताच मारस वं.
हुंडा मांगस वं. मांगस वं,
मनी माय हुंडा मांगस वं.’
ते गाणं पडूनच पूर्ण ऐकलं आणि मग उठलो. शेजारच्या ढाब्यावर जाऊन तोंडावर पाणी मारलं. बाजूच्या निंबाच्या झाडावर चढून एक फान्टी तोडली आणि दातून करत बसलो. तेवढ्यात सगळे उठले. चहा-पाणी केलं आणि गाडी काढून आम्ही शेत शोधायला लागलो. एकूणच माझ्या कामावर फोरमन आणि ड्रायव्हर खूश होते म्हणून त्यांनी मलाच तीन दिवस त्यांच्यासोबत काम करू दिलं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
काम झाल्यावर शेतमालकाने आम्हाला २०० रुपये चहापाणी दिलं. माझ्या वाट्याला ५० रुपये आले. भारी वाटलं, की माझीसुद्धा वरकमाईला सुरुवात झाली होती आणि मॅनेजरच्या कामापासून सुटकेची शक्यता वाढू लागली होती.
नंतर बाहेरगावी गाड्यांवर कामांसाठी माझा विचार केला जाऊ लागला होता. जेव्हा पावसाळा सुरू होतो, तेव्हा क्रेन सर्व्हिसवाल्यांची चांदी असते, कारण भरपूर गाड्यांचा अपघात होतो. ओल्या रस्त्यांमुळे बऱ्याच गाड्या रस्त्याबाहेर फेकल्या जातात. एकदा असाच एक आंब्याने भरलेला ट्रक चाळीसगाव हायवेवर मेहुणबाऱ्याजवळ वरकणीत फेकला गेला होता. आम्ही क्रेन घेऊन तिथं पोहोचलो.
‘‘महाराज, अवघड काम दखाई ऱ्हायनं.’’ आमचा ड्रायव्हर बिडी ओढत आणि वरकणीत उताणा पडलेल्या गाडीकडे पाहून म्हणाला.
‘‘दखूत काही तरी जुगाड लाइसन. आईड्यामा सयड्या मारणा पडी.’’
आमचा फोरमन आम्हाला धीर देत म्हणाला. फोरमन लोकं म्हणजे नेहमीच आशावादी आणि सतत मालकाला खूश करण्याच्या भानगडीत असणारी मंडळी.
‘‘येनी गांडना सयड्या!’’ फोरमनला अशी शिवी देत आमच्यातील वयस्कर हेल्पर वरकणीत उतरला आणि पालथ्या पडलेल्या गाडीजवळ जाऊन उभा राहिला. आमच्या अनुभवी हेल्परला लक्षात आलं होतं की, एका लहान क्रेनने आंब्याची गाडी बाहेर येणार नव्हती आणि कामात भरपूर हाल होणार होते म्हणून तो शेठ आणि फोरमनवर चिडलेला दिसला.
‘‘साला, च्युत्या बनाडाना धंदा शेतस.’’ तो परत चिडून म्हणाला. क्रेन सर्व्हिसमध्ये दोन-तीन अनुभवी आणि वयस्कर लोकं होते, जे फारच खडूस असल्यामुळे शेठ लोकं त्यांना सहजासहजी फोरमन म्हणून पाठवत नसत. मी आपला गाडीवरून ढिमरे खाली फेकत त्यांच्यातला वाद ऐकत होतो. नंतर रस्त्याच्या कडेला एक मोठं ढिमरं ठेवून त्याच्यावर जाऊन बसलो. फोरमन गाडीच्या अवतीभवती चक्कर मारत गाडी बाहेर खेचण्याचा जुगाड शोधत होता. तेवढ्यात खडूस वयस्कर हेल्परने मात्र उताणा पडलेल्या आंब्याच्या गाडीत शिरून आंब्याची एक मोठी गोन्टी भरून गाडीत लपवून ठेवली.
‘‘वरकणी खोल शे. गाडीले डायरेक्ट वर वढता येवाव नही. आसं करूत, गाडीले शिधी करीसन वरकणीमा वढत वढत पुढे लई जावूत. पुढे वरकणी एवढी खोल नही शे.’’ हा जुगाड जेव्हा फोरमनने आम्हाला सांगितला, तेव्हा ड्रायव्हर आणि तो वयस्कर हेल्पर त्याच्यावर परत चढले.
‘‘अरे, जठे मोठी क्रेन नी गरज व्हती तठे पैसा वाचाडाना भानगडमा शेठनीधाकटी क्रेन काबं धाडी?’’ ड्रायव्हरनेसुद्धा कुरबुर करायला सुरुवात केली. ‘‘वरकणीमा गारा दखा का?’’ वयस्कर हेल्पर परत चिडून म्हणाला; पण काहीही केलं तरी फोरमनचं ऐकावंच लागत होतं, कारण बाहेरगावी कामावर गेल्यावर तोच बॉस असे. आम्ही सगळे लागलो कामाला. अगोदर पालथ्या पडलेल्या गाडीला तिच्या पायावर उभं केलं. गाडी जिथं होती तिथून ओढत ओढत वरकणीच्या उथळ भागापर्यंत जिथून गाडी वर खेचता येणार होती, त्यात बरंच अंतर दिसलं. त्यातल्या त्यात आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे सगळीकडे गाराच गारा होता. लाव ढिमरे, खेच गाडी. लाव ढिमरे, खेच गाडी, असं करत करत आम्ही गाडीला बरंच अंतर खेचून आणलं होतं; पण त्यापेक्षा कितीतरी जास्त अंतर शिल्लक असल्यामुळे सगळ्यांचीच चिडचिड वाढत होती. थोडा वेळ बसून सगळ्यांनी गाडीतून आंबे काढून खाल्ले. परत तेच काम. लाव ढिमरे, खेच गाडी आणि लाव ढिमरे खेच गाडी, असं आम्ही दुपारी ३ वाजेपर्यंत करत राहिलो. त्यातल्या त्यात वरून पाऊस सुरू झाला. ढिमरे उचलणं अवघड झालं होतं, कारण ढिमरे हातातून निसटायला लागली होती. पावसामुळे गाडी जास्तच खोल रुतायला लागली होती. आम्ही सगळे फोरमनवर भयंकर चिडलो. सगळ्यांना भुका लागल्या होत्या. भयंकर थकलेलो होतो. डबे उघडले आणि भाकऱ्यांकडे न पाहताच भाकरी तोडायला लागलो.
‘‘माले वाटस शेठले फोन करना पडी! पाणीमुळे गारा वाढी गया. मोठी गाडीबलावनी पडी.’’ फोरमन शेवटी त्याची चूक मान्य करत म्हणाला.
‘‘सक्कायपाईन तेच तर भूकी ऱ्हायनू. तू आयकंस कोठे! आते मनं तोंड नकोउघाडू. मना तोंडमा येतीस मंग इसड्या गाया. साला भाडखाऊ पैसा वाचाडाना फंदामा आपली मारी लेतंस!’’ तो वयस्कर खडूस हेल्पर परत शिवीगाळ करायला लागला. शेठला परिस्थिती कळवल्यावर त्याने मोठी क्रेन पाठवली. मग, आंब्याच्या गाडीला सरळ वरकणीतूनच वर खेचली, टोचन लावलं आणि धुळ्याला एका गॅरेजमध्ये आणून सोडली. तोपर्यंत रात्रीचे अकरा-बारा वाजले असतील. शरीर एवढं भयंकर थकलेलं होतं की, माझी जेवायचीसुद्धा इच्छा नव्हती. फक्त जाऊन पडायचं होतं, कारण झोपेने डोळे जड पडत होते; पण बाकीच्या मंडळींना भूक लागली होती म्हणून आम्ही मोहाडी फाट्यावरील वालचंद बापूच्या हॉटेलात जाऊन खिचडी वगैरे खाल्ली आणि नंतर क्रेनच्या ऑफिसमध्येच पेपर अंथरून झोपलो. झोपताना माझ्या डोक्याजवळच वापरलेल्या आणि सडलेल्या ऑइलचे डब्बे होते. त्या सडलेल्या ऑइलचा उग्र वास झोपू देत नव्हता. दिवसभर ढिमरे उचलून-उचलून शरीर भयंकर दुखत होतं. त्यामुळे लिव्हरला सूज तर नाही येणार ना, ही भीती मनात येऊन गेली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
‘‘साला भाडखाऊ, पैसा वाचाडाना फंदामा आपली मारी लेतंस,’’ हे त्यावयस्कर हेल्परचं वाक्य परत डोक्यात येऊन गेलं. विचार केला की, त्या खडूस हेल्परच्या वाक्यात तथ्य आहे, कारण अशा कामांमध्ये जग आपली मारूनच घेतं आणि आपल्या परिस्थितीत काडीमात्र बदल होत नाही; पण जर का शिक्षणात स्वतःचीच एवढी मारून घेतली, म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर थोडाफार बदल निश्चित होऊ शकेल. शिक्षणाकडे लवकर वळायला पाहिजे, असा मनाशी पक्का निश्चय केला. खरं तर आपण जेव्हा अशा बिकट परिस्थितीतून जात असतो, तेव्हा फार तीव्रतेने निश्चय करत असतो. मात्र जेव्हा परिस्थिती सुसह्य होत असते, तेव्हा मात्र निश्चयातील तीव्रता विसरतो आणि फक्त निश्चयाचीच आठवण ठेवतो. तीव्रतेशिवाय निश्चय वांझोटा असतो, हे मला नेहमीच वाटलं आहे. त्यानंतर दोन-तीन महिन्यांत अकरावीच्या परीक्षा होत्या. काही काळ शेजारच्या वायरिंगच्या दुकानात काम केलं आणि अकरावीची परीक्षा दिली. अकरावी पास झालो. खरं तर अकरावीत पास केलं जात असे.
‘भुरा’ – शरद बाविस्कर,
लोकवाङ्मय गृह, मुंबई
मूल्य – ५०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment