शरद पवार बोलले खरं, पण...
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • सोनिया गांधी आणि राहुल गांधी
  • Sat , 18 September 2021
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress सोनिया गांधी Sonia Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP

मध्यंतरी ‘काँग्रेस : पक्ष की समृद्ध अडगळ?’ हा मजकूर लिहिला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यानं (मेलद्वारे) दिलेली प्रतिक्रिया अशी होती- “काँग्रेस पक्षाचे भवितव्य संकटात आहे आणि त्याबाबत काँग्रेसने काय करायला हवे, यासंबंधी सतत काही ना काही लिहिले-बोलले जातेय. सर्व भाषांतल्या वृत्तवाहिन्यांवर अधूनमधून चर्चा झडतात. त्यात काँग्रेस पक्षातर्फे कोणीच भाग घेत नाही. याला ‘रिकामी उठाठेव’ म्हणायचे का?

या संदर्भात मला एक चुटका आठवतो. एका पार्टीत बरेच स्त्री-पुरुष एकत्र आलेले असतात. त्यातल्या एका प्रतिष्ठित गृहस्थाच्या विजारीची झिप उघडी असल्याचे त्याच्या एका मित्राच्या लक्षात येते. तो त्याला थोडे बाजूला घेऊन जातो आणि त्याच्या कानात सांगतो, ‘मित्रा, तुझी झिप उघडी आहे, ती बंद कर.’ त्यावर तो गृहस्थ उतरतो, ‘ते तू कशाला सांगायला हवे? मला माहीत आहे.’ काँग्रेस पक्षाची अवस्था याहून वेगळी नाही.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

माझा तो मजकूर वाचून एकेकाळी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘‘आमच्या पक्षाची इतकी काळजी तुम्ही लोक करत होतात, म्हणून आम्ही निवडणुका लढवण्यात आणि सत्तेत राहण्यात मग्न राहिलो. त्या काळात काँग्रेसची देशावर असणारी पकड ढिली कशी झाली, हे समजलंच  नाही. आता परिस्थिती हाताबाहेर गेलीये, हेच खरं!’’ 

--------------------

हे आठवण्याचं कारण, देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसवर केलेली बोचरी टीका हे आहे. जमीनदारचा पडका वाडा, (त्यांनी ‘हवेली’ हा शब्द वापरला आहे!) असं काँग्रेसच्या सद्यअवस्थेचं वर्णन शरद पवार यांनी केलेलं आहे आणि ते अचूक आहे, त्यात काही गैर नाही. मात्र असं असलं तरी या अवस्थेला जबाबदार कोण कोण आहे, याचीही प्रामाणिक कबुली शरद पवार यांनी जर दिली असती तर ते योग्य ठरलं असतं, पण पवार नेहमी मुद्दामच काही तरी बोलायचं बाकी ठेवतात, तसंच याही वेळी घडलं आहे आणि असं घडणं हा पवार यांच्या बाबतीत योगायोग कधी नसतो, असाच आजवरचा अनुभव आहे.

आधी काँग्रेसबद्दल बघूयात. त्यासाठी त्याच जुन्या मजकुराचा आधार घेऊन मग शरद पवार यांच्याकडे जाऊयात. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान असणारा, पंतप्रधानपदी राहिलेल्या दोघांच्या प्राणाचं बलिदान दिलेल्या, सत्तेत तब्बल सहा दशकं राहिलेल्या, या देशाला विकासाच्या वाटेवर नेणार्‍या आणि अगदी गाव-खेड्यापर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून हा पक्ष अधिकाधिक व्यक्तीकेंद्रीत होत गेला, गांधी कुटुंब तसंच काही नेते आणि त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित झाला, पक्ष-संघटनेची वीण उसवली आणि कार्यकर्ता पक्षापासून दुरावत गेला. कधी काळी संसदेच्या सभागृहात कायम बहुमतात असणार्‍या या पक्षाला गेल्या दोन निवडणुकांत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्याइतक्याही जागा संपादन करता आलेल्या नाहीत, इतकी या पक्षाची वाताहत झालेली आहे. गेल्या साडेतीन-चार दशकांत या पक्षाची रीतसर संघटनात्मक बांधणी झालेली नाही. त्यासाठी आवश्यक असणार्‍या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत आणि दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत ‘तेच ते’ नेते आहेत, नवीन कार्यकर्त्यांची ताज्या दमाची मोठी फौज उभारली गेलेली नाही.

त्यातच गेल्या सुमारे सव्वादोन वर्षांपासून या पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही आणि तो नसल्याचं कोणतंही सोयरसुतक या पक्षाच्या नेत्यांना, तसंच नेतृत्व करणार्‍या गांधी घराण्याला नाही, अशी चारही बाजूंनी मोडकळीस आलेल्या वाड्यासारखी अवस्था सध्या पाहायला मिळते आहे.

याचं एक कारण म्हणजे या पक्षाला शीर्षस्थानी आवश्यक आहे, तसं खंबीर नेतृत्व सध्या नाही. जे शीर्ष-नेतृत्व ‘गांधी’ घराण्याचं आहे, ती एक अपरिहार्य अगतिकता असल्याचं आजवर समजलं गेलं, पण आता त्या गांधी नावाचा करिष्मा ओसरू लागलेला आहे, असं म्हणण्यास खूप वाव असल्यासारखे निवडणुकांचे निकाल आहेत.

श्रीमती सोनिया गांधी यांना नेतृत्व सोडायचं आहे, असं दिसत नाही आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरही पक्षावरची पकड ढिली होऊ देण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असा हा तिढा आहे. आहे त्या नेतृत्वाच्या भोवती बहुसंख्येनं स्वार्थी, बेरके, जनाधार नसलेल्या आणि जुनाट विचारांच्या (Fossil), खुज्या उंचीच्या नेतृत्वाचा भरणा आहे. या बहुसंख्य नेत्यांची मानसिकता पराभूततेची आणि नव्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करणारी आहे. या बहुसंख्य नेत्यांना शीर्ष-नेतृत्व म्हणून कुणी तरी गांधी हवे आहेत, पण त्या ‘गांधी’ची पूर्ण हुकमत मात्र नको आहे, असा हा अवघड गुंता आहे. यामुळे पक्षाची स्थिती आणखी वाईट होत चाललेली आहे. अलीकडच्या काळात भाजपशी लढण्यात राहुल गांधी यांच्याशिवाय त्या आघाडीवर अन्य कुणीच दिसत नाही. सर्व विरोधी पक्षांना या लढाईसाठी एकत्र आणण्यातही काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे.

पक्षाला उभारी देण्याऐवजी, राहुल गांधी यांना बळ प्राप्त करून देण्याऐवजी काँग्रेस नेते कसे बेजबाबदार वागत आहेत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मध्यंतरी २३ नेत्यांनी केलेल्या बंडाकडे पाहायला हवं. इतकी वर्षं पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची ऊबवूनही यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता अन्य कोणीही नेता किमान त्याच्या तरी राज्यात तरी पूर्ण जनाधार मिळवू शकलेला नाही, याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या नेत्यांनी दाखवलं नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गेल्या सहा-सात वर्षांत राहुल गांधी देशभर फिरून नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे नेते का सहभागी झाले नाहीत, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला असता तर हे सर्व नेते निरुत्तर झाले असते. राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हतं, तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले, विविध संसदीय अस्त्रांचा वापर करून किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली, याही प्रश्नांची उत्तरे जर या नेत्यांनी दिली असती, तर चांगलं झालं असतं.

राहुल गांधी यांचे काही आरोप अंगलट आले, हे खरं आहे, राजकारणात असं घडतच असतंही, पण त्याचसोबत राहुल यांच्यामागे यापैकी किती नेते पूर्ण ताकदीने उभे राहिले हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य नेत्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे. राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाच्या असतातच, पण त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली, हेही त्याइतकंच महत्त्वाचं असतं. अशा भूमिकांतून त्या नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून निघत असते. काँग्रेसच्या या बहुसंख्य नेत्यांनी या काळात स्वीकारलेल्या मौनी भूमिकेमुळे भाजपला अप्रत्यक्षपणे बळ मिळालं, हे विसरता येणार नाही.

आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राहणं शक्य नसताना श्रीमती सोनिया गांधी यांनी पुन्हा हंगामी अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं. कोणत्याही दबावाला बळी न पडता सोनिया गांधी यांनी एक तर राहुल गांधी यांच्याकडे झुकणारा त्यांचा कल स्पष्ट सांगायला हवा होता आणि राहुल गांधी यांची रीतसर निवड होईपर्यंत एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपवून दूर होणं इष्ट ठरलं असतं किंवा गांधी घराण्याला या पदाचा कोणताही मोह नाही, हे एकदा निक्षून सांगून टाकत पक्षाच्या सर्व कटकटीतून मुक्त होत अन्य इच्छुकासाठी पक्षाच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करुन द्यायला हवा होता. पुन्हा हंगामी का असेना पद स्वीकारून, हे पद ‘गांधी घराण्या’तच ठेवू इच्छितात, असा संदेश श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडून दिला गेला आहे.

--------------------

वरील विवेचन लक्षात घेता, काँग्रेसची विद्यमान अवस्था पडक्या वाड्यासारखी झालेली आहे, या शरद पवार यांच्या म्हणण्यासही सहमत होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.  मात्र असं असलं तरी, शरद पवार यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे का? काँग्रेसचा हा वाडा पडू नये, यासाठी डागडुजी करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का? काँग्रेसच्या या अवस्थेला त्यांच्यासारखे पक्ष सोडून गेलेले अनेक काँग्रेस नेतेही जबाबदार आहेत, हे शरद पवार यांना माहिती नाही का? या ज्येष्ठ नेत्यांच्या यादीत शरद पवार यांच्यासोबत मोरारजी देसाई, जगजीवनराम, ब्रह्मानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण, प्रणब मुखर्जी, शंकरराव चव्हाण, नारायणदत्त तिवारी, अर्जुन सिंह, नसिकराव तिरपुडे, ममता बॅनर्जी, जगन मोहन रेड्डी अशा असंख्य अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचा त्याग करून स्थापन केलेल्या या सर्वांच्या नवीन पक्षात काँग्रेस हे नाव आहेच. म्हणजे काँग्रेस या नावाशिवाय हे नेते त्यांचं राजकीय अस्तित्व राखूच शकलेले नाहीत, हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे.

शरद पवार काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते आणि त्यांच्या पक्षाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी देशाच्या राजकारणातील आजही त्यांचं स्थान अत्यंत मोलाचं आहे, यात शंकाच नाही. ज्या काँग्रेस पक्षानं शरद पवार यांना तीन वेळा मुख्यमंत्रीपद, एकदा देशाचं संरक्षण मंत्रीपद आणि दीर्घकाळ कृषी मंत्रीपद दिलं, त्या काँग्रेस पक्षाच्या किमान महाराष्ट्रातील आजच्या पडक्या अवस्थेला शरद पवार हेही जबाबदार नाहीत का? नक्कीच आहेत!

पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी १९७८साली शरद पवार यांनी राज्यात ‘पुलोद’ प्रयोग करताना काँग्रेस पक्ष फोडला (महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खंजीर प्रयोग’ म्हणून ही पक्षफूट ओळखली जाते!) तेव्हापासून काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एकहाती वर्चस्वाला लागलेली उतरती कळा अजून थांबलेलीच नाही... आजवरच्या राजकीय आयुष्यात शरद यांच्यासारखा दिग्गज नेता चार वेळा काँग्रेस सोडून गेला. त्यामुळे काँग्रेसच्या चिरेबंदी वाड्याला  नुसते तडे गेले नाहीत, तर काँग्रेस नावाच्या महाराष्ट्रातील हवेलीचे बुरुज ढासळले आहेत, यांचा विसर शरद पवार यांना पडावा हे आश्चर्यच म्हणायला हवं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

पहिल्यांदा १९७० साली पक्षात फूट पडली, तेव्हा पक्ष फोडून शरद पवार (तेव्हा देशात ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेस आणि महाराष्ट्रात रेड्डी-चव्हाण (यशवंतराव) काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) काँग्रेसमधे गेले, मग त्यांनी समांतर काँग्रेसच्या तंबूत आश्रय घेतला. त्यानंतर ‘पुलोद’ स्थापन करताना त्यांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केली आणि सोनिया गांधी यांच्याशी पंगा घेऊन त्यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचा सवतासुभा निर्माण करून राज्यातली काँग्रेस खिळखिळी केली आणि इतक्या वेळ काँग्रेसच्या हवेलीला गंभीर क्षती पोहोचवूनही पवार यांना स्वबळावर राज्यात सत्ता कधीच प्राप्त करता आली नाही.  प्रत्येक वेळी त्यांना सत्ताप्राप्तीसाठी काँग्रेससोबतच हात मिळवणी करावी लागली. म्हणजे राज्यात न काँग्रेस वाढली न (महा)राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष झाला आणि यात शिवसेना तसेच भाजपचा फायदा झाला हे विसरता येणार नाहीच.

काँग्रेसचा वाडा निश्चितच पडका झालेला आहे, पण तो तसा होण्यात देशभरातील शरद पवार यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांचाही हातभार लागलेला आहे, हे विसरून चालणार नाही. शरद पवार यांनी त्याचीही कबुली कधी तरी द्यायला हवी. म्हणूनच म्हणायला हवं की, काँग्रेसबाबत शरद पवार जे बोलले आहेत, ते अर्धसत्य आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......