इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षे संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक-संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे
ग्रंथनामा - झलक
चंद्रकान्त पाटील
  • वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या ‘कोलाहल’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 11 September 2021
  • ग्रंथनामा झलक वसंत दत्तात्रेय गुर्जर Vasant Dattatreya Gurjar कोलाहल Kolahal वाचा प्रकाशन Vacha Prakashan तुला प्रकाशन Tula Prakashan अशोक शहाणे Ashok Shahane दिलीप पुरुषोत्तम चित्रे Dilp Purushottam Chitre

कवितासंग्रह प्रकाशित करणं आता सहजसाध्य आणि किरकोळ बाब झाली आहे. साठच्या दशकात हे घडणं फार कठीण होतं. ही कोंडी फोडण्याचं धाडसी काम ‘वाचा प्रकाशना’नं औरंगाबादसारख्या त्या काळच्या अविकसित शहरातून केलं होतं. नंतरच प्रस्थापित प्रकाशनांनी आपली कठोर आणि बंदिस्त व्यवस्था सैल करायला सुरुवात केली. शिवाय कवींना आणि कवीमित्रपरिवारांनाही स्वतंत्रपणे संग्रह प्रकाशित करायला बळ मिळालं. यातून समाजाच्या सर्व थरांतून कविता समोर येऊ लागली आणि काही लक्षणीय कवी-कवयित्री समोर आल्या. मात्र हळूहळू कवितासंग्रहांची संख्या बेसुमार वाढली. दुष्काळानंतर पूर यावा तशी अवस्था झाली. बहुसंख्य कवींच्या सोप्या आणि बाळबोध समजुतीमुळे चांगल्या-वाईटाचा मूल्यनिर्णयच हरवला गेला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

साठच्या दशकानंतर तीन-चार दशकं उलटून गेल्यावरही यात फारसा फरक पडला नाही. गर्दीपासून दूर राहणाऱ्या आणि आपलं स्वत्व जपणाऱ्या कवी-कवयित्रींचे संग्रह निघणंही आधीसारखंच कठीण झालं होतं. सबब मी २००५ मध्ये फक्त कवितेसाठीच असणारं ‘तुला प्रकाशन’ काढायचं ठरवलं. ‘वाचा प्रकाशन’ हा व्यवस्थेच्या विरोधात असणाऱ्या समविचारी मित्रांचा सांघिक प्रकल्प होता. त्या वेळी त्यातल्या माझ्यासकट सगळ्यांचीच आर्थिक स्थिती जेमतेमच होती. ‘तुला प्रकाशना’च्या वेळी मात्र मी एकटाच होतो. माझी आर्थिक स्थिती बरी होती. हाती निवृत्त झाल्यानंतरचा पैसा होता, मला भविष्याची काळजी नव्हती. श्री. अण्णा लाटकरांचं आणि त्यांच्या ‘कल्पना मुद्रणालया’चं प्रेम पाठीशी होतं. त्या वेळी मी श्रीधर नांदेडकर यांचा पहिला कवितासंग्रह ‘सूफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावर’, अनुराधा पाटील यांचा ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ हा चौथा संग्रह आणि कविता महाजन यांचाही पहिलाच संग्रह ‘तत्पुरुष’, हे तीन संग्रह प्रकाशित केले होते. फक्त कवितासंग्रहांसाठीच असलेलं ‘तुला प्रकाशन’ अव्यावसायिक होतं. त्यातून आर्थिक लाभाची मुळीच अपेक्षा नव्हती. पुस्तक निर्मितीच्या दृष्टीनं देखणं असावं एवढीच अपेक्षा होती. म्हणूनच आधी काढलेल्या प्रतीचा कागद जरासा हलका होता, म्हणून तिन्ही संग्रहांच्या प्रत्येकी सहाशे प्रती रद्द करून तेवढ्याच प्रती पुन्हा नव्यानं छापून घेतल्या होत्या. हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत आहे. त्या तिन्ही पुस्तकांची पहिली आवृत्ती लवकरच संपली, आणि काही अपरिहार्य कारणांमुळे मी ‘तुला प्रकाशन’ही बंद केलं. नंतर माझं औरंगाबादही सुटलं.

दरम्यान विख्यात हिंदी कवी गजानन माधव मुक्तिबोध यांची जन्मशताब्दी २०१७मध्ये होती. तेव्हा मुक्तिबोधांची दीर्घ कविता ‘अंधरे में’चा ३० वर्षांपूर्वी मी केलेला मराठी अनुवाद, त्या कवितेवरचं माझं भाष्य आणि मुक्तिबोधांचा परिचय अशी एक ८० पानांची निशुल्क पुस्तिका मी प्रकाशित केली; तिच्यावर प्रकाशनाचं नाव ‘तुला प्रकाशना’ऐवजी ‘अव्यावसायिक प्रकाशन’ असं छापलं होतं.

आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा ‘तुला प्रकाशना’तर्फे वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा ‘कोलाहल’ हा संग्रह प्रकाशित करण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे (avant-grade) कवी आहेत. त्यांचा पहिला संग्रह ‘गोदी’ १९६७मध्ये, दुसरा संग्रह ‘अरण्य’ १९७२मध्ये आणि तिसरा संग्रह ‘समुद्र’ १९७९मध्ये निघाला होता. त्यानंतर ४१ वर्षं झाली तरी त्यांचा एकही संग्रह आला नाही. इतक्या आघाडीच्या कवीचा सुमारे ४१ वर्षं संग्रह निघू नये आणि त्याविषयी कुणाला साधी खंतही वाटू नये, हे आपल्या साहित्यिक-संस्कृतीच्या हलकेपणाचंच लक्षण आहे. कवितेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना आठवत असेल की, बा. सी. मर्ढेकरांनंतर विसाव्या शतकातील मराठी कवितेचं वळणच बदलून टाकणारे एक महत्त्वाचे कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा पहिलाच संग्रह १९६०मध्ये प्रकाशित झाल्यानंतर सुमारे १८ वर्षं दुसरा संग्रह निघाला नव्हता, आणि निघाला तोही ‘वाचा प्रकाशना’कडूनच (‘कवितेनंतरच्या कविता’)!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

दरम्यानच्या काळात वसंत गुर्जर यांच्या संबंधात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या : पहिली घटना म्हणजे अशोक शहाणे यांनी ‘प्रास प्रकाशना’तर्फे गुर्जर यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता १९८३ साली पोस्टर कविता म्हणून छापली आणि ती बरीच गाजली, वादग्रस्त झाली. थोड्याच काळात दुर्मीळही झाली. या कवितेवर अश्लीलतेचा खटला झाला, तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि देशभर गाजला. नंतर दुसरं म्हणजे ‘खेळ’ या नियतकालिकाचा २०वा अंक वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्यावर केंद्रित केला गेला होता. तो २०११मध्ये म्हणजे सुमारे १० वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता.

गुर्जर यांच्या ‘कोलाहल’मध्ये सुमारे ११६ कविता आहेत आणि चार-पाच कवितांचा अपवाद वगळता सर्व कविता वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. एखाद्या कवीच्या एकूण काव्यगत व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्यासाठी नियतकालिकांतून आलेल्या कविता फारशा उपयुक्त नसतात; त्या सर्व कविता एकत्र संकलित होऊन समोर येणं आवश्यक असतं. आता या संग्रहामुळे गुर्जर यांच्या एकूण कवितेचं पुनर्मूल्यांकन होऊन त्यांचं मराठी काव्यपरंपरेतलं स्थान निश्चित करता येईल.

एक विलक्षण योगायोग म्हणजे ‘तुला प्रकाशना’च्या आधीच्या तिन्ही संग्रहांचं प्रकाशन २००५मध्ये मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद इथं वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या हस्तेच झालं होतं.

हा संग्रह प्रकाशित होण्यासाठी ज्यांची मदत झाली, त्यांत निशिकांत ठकार, श्रीधर नांदेडकर, वसंत आबाजी डहाके, नितीन दादरावाला, अरुण खोपकर, दिलीप वि. चव्हाण (पुणे), प्रफुल्ल शिलेदार आणि ‘तुला प्रकाशना’च्या पहिल्या संग्रहापासून ऋणानुबंधित श्रीमती हेमा बेहेरे यांचे आभार मानणं निव्वळ यांत्रिक आणि औपचारिक होईल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

अखेरीस हा संग्रह काढण्यासाठी वसंत दत्तात्रेय गुर्जर तयार झाले हे महत्त्वाचं आहेच. त्यांचे आभार अनिवार्य आहेत. या प्रसंगी मला राजा ढाले, तुळशी परब आणि सतीश काळसेकर यांची तीव्र आठवण होते आहे, हेही नमूद करतो.

एवढंच या प्रसंगी.

‘कोलाहल’ – वसंत दत्तात्रेय गुर्जर,

तुला प्रकाशन, औरंगाबाद,

पाने – १८४ (मोठा आकार),

मूल्य – ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......