या लेखकाला जडलेल्या ‘पुस्तकनादा’ची लस प्रत्येकाने टोचून घ्यायला हवी, असं हे पुस्तक वाचल्यानंतर वाटत राहतं…
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
विकास पालवे
  • ‘पुस्तकनाद’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 28 August 2021
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक पुस्तकनाद Pustaknad जयप्रकाश सावंत Jayprakash Sawant

मराठी साहित्यविश्वात मुख्यतः अनुवादक म्हणून प्रसिद्ध असलेले जयप्रकाश सावंत हे एक उत्कृष्ट गद्य लेखकदेखील आहेत. त्यांच्या गद्यलेखनाचे नवे पुस्तक ‘पुस्तकनाद’ नुकतेच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झाले आहे. सावंत यांनी बहुतकरून ‘ललित’ मासिकातल्या ‘पुस्तक गजाली’ या सदराअंतर्गत लिहिलेले आणि इतर नियतकालिकं, वर्तमानपत्रं यांतून प्रकाशित झालेले लेख या पुस्तकात संग्रहित करण्यात आले आहेत. सगळेच लेख पुस्तकं, नियतकालिकं, विविध भाषा-संस्कृती यांतले लेखक यांच्याविषयी साधकबाधक चर्चा करणारे आहेत. हे लेख पूर्वप्रकाशित असले तरी ते पुस्तकात घेताना त्या त्या विषयासंदर्भात नव्या, अद्ययावत माहितीची जोड देऊन ते अधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचं लक्षात येतं. त्यामुळे त्यांचं संदर्भमूल्य वाढलं आहे.

वाचनाच्या ओघात प्राप्त झालेला आनंद, वैविध्यपूर्ण माहिती इतरांसोबत वाटून घेण्याची तीव्र असोशी एखाद्या मित्राशी संवाद साधावा अशा शैलीत लिहिलेल्या या लेखांत जाणवत राहते. एक नोंद करण्याजोगी गोष्ट म्हणजे लेखन करत असताना वा नियतकालिकांतून प्रकाशित झालेलं लेखन ग्रंथरूपात घेताना कोणी जर त्या लेखन विषयासंदर्भात अधिकची माहिती पुरवली, लहानसा संदर्भ जरी लक्षात आणून दिला आणि ती माहिती वा तो संदर्भ लेखात असायला हवा, असं त्यांना वाटलं, तसेच इतर भाषांतल्या शब्दांच्या उच्चारांसाठी कोणी मदत केली असेल तर त्याची नोंद ते न विसरता कृतज्ञतापूर्वक करतात. ज्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती नाही वा आपला अभ्यास नाही, त्यांविषयी तसा स्पष्ट उल्लेख करतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

उदाहरणार्थ, ‘फुटपाथवरचे स्वर्ग’ या लेखात ते एके ठिकाणी लिहितात, की ‘मला इंग्रजी भाषेतली कविता फारशी समजत नाही’ किंवा ‘भाषांतरित साहित्याची आरंभकालीन समीक्षा’ या लेखात ते लिहितात, की ‘... या काळातलं साहित्य हा माझा वाचनासाठी आवडीचा विषय असला, तरी तो माझ्या अभ्यासाचा नाही. या लेखाच्या निमित्ताने जो थोडाफार अभ्यास करू शकलो तो परिपूर्ण नाही आणि त्यात निश्चितच त्रुटी असतील.’ यातून त्यांच्या विनम्र वृत्तीचा परिचय होतो.

या लेखसंग्रहातील दोन लेख पाश्चात्त्य नियतकालिकांविषयी आहेत. १९१२ साली शिकागो इथे कवितेसाठी सुरू झालेल्या ‘पोएट्री’ या मासिकाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या दोन पुस्तकांविषयी ‘कवितेसाठी अकल्पनीय देणगी’ हा लेख लिहिलेला आहे. या मासिकाची सुरुवात कशी झाली, वेगवेगळे कवी त्याच्याशी कसे जोडले गेले, अटीतटीच्या काळात ते कसं तगून राहिलं, यांविषयी महत्त्वाच्या घटनांची नोंद सावंत यांनी या लेखात केली आहे.

‘बुक कलेक्टर : इयन फ्लेमिंग’ या लेखात ‘द बुक कलेक्टर’ या त्रैमासिकाची ओळख करून दिली आहे. या त्रैमासिकाचं स्वरूप कसं आहे, हे सांगतानाच त्यात येणाऱ्या पुस्तकांविषयीच्या रोचक नोंदीही दिल्या आहेत. सावंत यांच्या लेखांचं वैशिष्ट्य असं की, पाश्चात्त्य कवी वा नियतकालिकं यांविषयी लिहिताना तो विषय व प्रसंगानुसार मराठी वाङ्मयीन व्यवहाराविषयीदेखील ते टिप्पणी करतात.

सावंत यांचे लेख प्रामुख्याने पुस्तकांविषयी असले तरी त्या त्या पुस्तकाच्या लेखकाचे चरित्रात्मक तपशीलही विपुलतेने आढळतात. होर्हे लुई बोर्हेस या स्पॅनिश लेखकावर तर सलग तीन लेख वाचायला मिळतात. ‘बोर्हेसचं आत्मकथन’ या लेखात ‘ऑटोबायोग्राफिकल एसे’ या बोर्हेस यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा परिचय करून दिला आहे. बोर्हेस यांचं संक्षिप्त स्वरूपातील चरित्र असं स्वरूप या लेखाला आलं आहे. बोर्हेस यांचं अफाट वाचन, पुस्तकांवरचं प्रेम आणि लेखनावरील निष्ठा यांच्या पार्श्वभूमीवर सावंत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात.

अल्बेर्तो मँग्वेल या लेखकाला बोर्हेस यांच्या सहवासात काही वर्षं व्यतीत करण्याची संधी मिळाली होती. त्या अनुभवांवर आधारित ‘विथ बोर्हेस’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकाचा परिचय त्यांनी ‘बोर्हेसच्या सहवासात मँग्वेल’ या लेखात करून दिला आहे. यातून बोर्हेस यांच्या वाचनासंदर्भातल्या आवडीनिवडी, त्यांची अंधत्व आल्यानंतरची कविता निर्मितीची प्रक्रिया, त्यांचं मृत्यूविषयीचं चिंतन या सगळ्याचा धांडोळा घेण्यात आला आहे.

‘अनुवाद, ओरांगउटान, बोर्हेस वगैरे वगैरे...’ या लेखाच्या पूर्वार्धात बोर्हेस यांना कथानकातील एक पात्र म्हणून केंद्रस्थानी आणलेल्या एका कादंबरीचा परिचय करून दिला आहे, तर उत्तरार्धात ‘इनव्हिजिबल वर्क : बोर्हेस अँड ट्रान्सलेशन’ या पुस्तकाचा हवाला देऊन बोर्हेस यांची अनुवादासंबंधीची आगळीवेगळी मतं दिली आहेत. या मतांच्या पार्श्वभूमीवर कादंबरीतील अनुवादासंबंधीच्या कथानकाविषयी वाचले असता गंमत वाढते. सावंत यांनी या लेखात कादंबरी आणि समीक्षात्मक पुस्तक यांची उत्तम सांधेजोड केल्याचं लक्षात येतं.

वॉल्टर बेंजामिन या लेखकाच्या पुस्तक-संग्राहक या अंगावर प्रकाश टाकणारा ‘पुस्तक-संग्राहकांच्या कथा’ हा लेख आपल्यामागे आपल्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहाचं काय होणार, या चिंतेत असलेल्यांनी वाचायला हवा असा आहे. कारण याच लेखात निकोलस बास्बेन्स या लेखकाच्या ‘अ जेण्टल मॅडनेस’ या ग्रंथातील पुस्तक संग्राहकांचे काही किस्सेही दिले आहेत.

‘अँडरसन, फॉकनर आणि हेमिंग्वे’ हा लेख लेखकांच्या उदार आणि कोत्या अशा दोन्ही वृत्तींचं दर्शन घडवणारा आहे. ‘वेटिंग फॉर बेकेट’ हा लेख तर एखाद्या रहस्यकथेसारखा उलगडत जातो. त्यातून सॅम्युअल बेकेटच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा तर परिचय होतोच, शिवाय आपल्या आवडीच्या लेखकाचं साहित्य मिळवण्याची असोशी एखाद्याला कशा तऱ्हेने झपाटून टाकू शकते, याचाही प्रत्यय येतो.

‘एका श्रेष्ठ नाटकाचा श्रेष्ठ अनुवाद’ हा लेख नोबेल पारितोषिक विजेता लेखक लुइगी पिरांदेल्लोच्या ‘सिक्स कॅरक्टर्स इन सर्च ऑफ अॅन ऑथर’ या नाटकाचा माधव वाटवे यांनी केलेल्या अनुवादाच्या पुस्तकाचा परिचय करून देणारा आहे. या लेखात नाटकाच्या प्रयोगाविषयी न लिहिता फक्त संहितेचं विश्लेषण केलेलं आहे.

‘नबोकव, भाषा आणि स्पीक मेमरी’ या लेखात व्लादीमिर नबोकव या लेखकाच्या ‘स्पीक मेमरी’ या आठवणींवजा पुस्तकाची ओळख करून दिली आहे. या पुस्तकातील लेख नबोकवने केव्हा लिहिले, कोणत्या भाषेत लिहिले आणि पुढे पुस्तकरूपात प्रकाशित झाल्यानंतरही त्यात कसकसे बदल होत जाऊन अद्ययावत आवृत्ती कशी तयार झाली, याचे कथन करण्यात आले आहे.

‘मार्केझच्या पत्रकारितेच्या शाळेची एक गजाल’ हा लेख प्रत्येक होतकरू पत्रकाराने वाचायला हवा अशा स्वरूपाचा आहे. या लेखातून कादंबरीकार म्हणून ख्यातकीर्त असलेल्या मार्केझच्या पत्रकारितेकडे गंभीरपणे पाहण्याच्या वृत्तीचा परिचय होतो. ‘अलिप्ततेचा अंत’ हा लेख १९३०-४०च्या दशकातील एकाधिकारशाही राजवट असणाऱ्या लिस्बनमध्ये घडणाऱ्या राजकीय घटनांना कवेत घेणाऱ्या कथानकावरील इटालियन लेखक अंतोनियो ताबुक्की याच्या ‘परेरा मेन्टेन्स’ या कादंबरीची सविस्तर समीक्षा करणारा आहे.

‘चित्र-प्रदेशात अॅलिस’ या लेखात ‘अॅलिस इन वंडरलँड’ या कादंबरीच्या वेगवेगळ्या प्रतींचा संग्रह करणाऱ्या जोएल बिनेरबॉम याची ओळख करून दिली आहे, तसेच या कादंबरीच्या मराठीत झालेल्या भाषांतरांचाही मागोवा घेतलेला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘ ‘पॅरिस रिव्ह्यू’मधल्या मुलाखतींतून’ या लेखात ते ‘पॅरिस रिव्ह्यू’ या नियतकालिकाची थोडक्यात माहिती देऊन त्याचं खास वैशिष्ट्य असलेल्या मुलाखतींच्या सदराची ओळख करून देतात. या मुलाखतींची पुढे अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. त्यांपैकी ‘लॅटिन अमेरिकन रायटर्स अॅट वर्क’ या पुस्तकात प्रकाशित झालेल्या मुलाखतींतील वेगवेगळ्या लेखकांच्या जीवनातील निवडक रोचक किस्से, त्या त्या लेखकांची इतर समकालीन लेखक, मातृभाषा, त्यांना आवडणारे साहित्यप्रकार तसेच आवडती पुस्तकं यांबाबतची मतं सावंत यांनी या लेखात उद्धृत केली आहेत.

‘इंग्रजीतलं ‘मेरा हमदम मेरा दोस्त’ ’ हा लेखही अशाच स्वरूपाचा आहे. यातही ‘द कंपनी दे केप्ट’ या पुस्तकाचा गोषवारा देऊन त्यातील मार्मिक भाग दिला आहे. ते या सगळ्याचा संदर्भ बऱ्याचदा आपल्या समाजातल्या परिस्थितीशी जोडून घेतात. त्यामुळे परक्या भूमीतील लेखकांविषयी, तिथल्या वाङ्मयीन संस्कृतीविषयी वाचतानाही सतत एक आपलेपणा जाणवत राहतो.

पाश्चात्त्य वाङ्मयीन व्यवहारातील प्रकाशक-संपादक यांच्या पातळीवर होणाऱ्या लेखकांच्या लेखनावरील न्याय-अन्यायाची चर्चा ‘ ‘कुजकट समीक्षे’चं संकलन’ आणि ‘... आणि कुजकट साभार परत’ या दोन लेखांत आली आहे. लेखकांचं साहित्य साभार परत करताना तिथले संपादक त्यासोबत टिप्पणी जोडतात. काही लेखक पुस्तकांची परीक्षणं करताना अतिशय जहाल भाषेचा उपयोग करतात. सावंत यांच्या म्हणण्यानुसार यांतील काही लेखन हे त्या त्या साहित्यकृतीचं समर्पक वर्णन करणारं असतं, तर काही वेळा संपादक, समीक्षक, परीक्षणं लिहिणारे यांचे काही लेखकांबाबतचे, साहित्यकृतींबाबतचे अंदाज साफ चुकलेलेही दिसतात. या दोन्ही अंगांची ओळख करून देणारे अनेक रंजक किस्से देत सावंत पाश्चात्त्य प्रकाशन आणि समीक्षा व्यवहारावर दृष्टिक्षेप टाकतात.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सावंत हे मुख्यतः अनुवादक आहेत. त्यामुळे भाषांतराविषयीच्या त्यांच्या लेखांना एक विशेष महत्त्व आहे. त्यांनी ‘चार हातांचं संगीत’ या लेखात मूळ लेखक आणि भाषांतरकार यांच्या परस्परसंबंधातून साकारणाऱ्या भाषांतराविषयी, कधीकधी त्यामुळे उद्भवणाऱ्या कज्जे-खटल्यांविषयी अॅलिस कॅप्लन यांच्या एका लेखाचा व इतर पुस्तकांचा आधार घेत विवेचन केलं आहे.

‘भाषांतरित साहित्याची आरंभकालीन समीक्षा’ हा लेख एकोणिसाव्या शतकातील उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रकाशित झालेल्या भाषांतरित साहित्याच्या समीक्षेचा अभ्यासपूर्ण आणि विस्तृत आढावा घेणारा आहे. त्या काळात भाषांतरित साहित्याची किती परखडपणे आणि बारकाईने अभ्यास करून दीर्घ परीक्षणं लिहिली जात होती, याची कल्पना हा लेख वाचल्यानंतर येते.

सावंत यांची अनुवादित पुस्तकांच्या होणाऱ्या समीक्षेकडून असलेली अपेक्षादेखील चिंतनीय आहे. ‘...अनुवादाच्या समीक्षेत, कुठल्या मूळ कृतीचा अनुवाद झाला आहे, तिचं त्या मूळ भाषेतल्या साहित्यात काय स्थान आहे आणि त्या अनुवादामुळे मराठी भाषेतल्या साहित्यात काही गुणात्मक भर पडली आहे का, या साऱ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा.’ (पृ. १९६)

पुस्तकांच्या आधीच्या काळातील किमती, त्या लेखनात आलेले पैशांचे उल्लेख हे सगळं आता इतक्या वर्षांनंतर वाचताना फार नवलाईचं वाटतं, अशी भावना ‘पैशाची किंमत’ या आगळ्यावेगळ्या लेखात व्यक्त झाली आहे. या लेखात सावंत यांनी नोंदवलेलं एक मत निश्चितच मननीय आहे की, पूर्वी किमती इतक्या कमी असूनही पुस्तक छपाईचा, कागदाचा दर्जा उत्कृष्ट असायचा, पण अलीकडच्या काळातील पुस्तकांच्या बाबतीत मात्र हे दिसत नाही.

एखादं पुस्तक अनपेक्षितपणे हाती लागल्याच्या अनुभवांचं कथन करणारा ‘फुटपाथवरचे स्वर्ग’ हा लेख अप्रतिम आहे. त्यांनी लेखाच्या सुरुवातीला अ. का. प्रियोळकर यांच्या ‘प्रिय आणि अप्रिय’ या पुस्तकातील प्रियोळकर यांना योगायोगाने, अवचित पुस्तकं मिळाल्याच्या दोन घटना दिल्या आहेत. त्यानंतर खुद्द त्यांना स्वतः आलेले अशा तऱ्हेचे रंजक, मजेदार अनुभव वाचायला मिळतात. लेखाच्या पुढल्या टप्प्यात ते इराकमधील ‘अल मुतनब्बी’ नामक पुस्तक बाजाराविषयीची अगदी ताज्या संदर्भांनी युक्त अशी माहिती देतात.

या लेखसंग्रहातील शेवटचा लेख हा इतर लेखांच्या तुलनेत काहीसा दीर्घ आहे. औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी भवानराव ऊर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या द्विखंडात्मक आत्मचरित्राचा अभ्यासपूर्वक आढावा ‘एक मुलखावेगळं आत्मचरित्र’ या लेखात घेतलेला आहे. ‘स्वतःसकट कोणाच्याही दोषांवर मुळीच पांघरुण न घालणारं हे असाधारण आत्मचरित्र आहे’ असं सावंत यांनी या लेखात लिहिलं आहे. त्यांची ही भावना किती सार्थ आहे, याची प्रचीती हा लेख वाचल्यानंतर येते.

जयप्रकाश सावंत यांचं पुस्तकप्रेम अनेकवार विविध लेखांतून झळकत राहतं. काही वेळेस थोडंसं विषयांतर करून ते पुस्तकाच्या सौंदर्याविषयी भाष्य करायला विसरत नाहीत. उदाहरणार्थ, ‘इंग्रजीतलं ‘मेरा हमदम मेरा दोस्त’ ’ या लेखात ते लिहितात, की ‘... तुम्ही पुस्तकाच्या एकूण रूपावर, निर्मितीवरही प्रेम करणारे असाल तर या प्रकाशनाचं एकतरी पुस्तक तुमच्या संग्रहात असायला हवं. त्याचा कागद, मुद्रण, आवरण या गोष्टी तर पाहण्यासारख्या असतातच. पण विशेष म्हणजे आवरणाखालचा पुठ्ठा आणि त्याच्या बांधणीसाठी वापरलेलं कापड यांची रंगसंगती इतकी मनोहर असते की, पुस्तक निव्वळ हाताळणं हासुद्धा एक सुखद अनुभव असतो.’ (पृ. ११०-१११)

रस्त्यावर पुस्तकं विकणाऱ्यांकडे अनपेक्षितपणे एखादं पुस्तक मिळालं की, नव्या पुस्तकांच्या चकचकीत दुकानातून पुस्तक घेण्यापेक्षाही अधिक आनंद पदरी पडतो आणि काही वेळा घ्यायच्या राहून गेलेल्या वा हुकलेल्या पुस्तकांच्या राशी अजूनही स्वप्नात येत राहतात, असं त्यांनी ‘फुटपाथवरचे स्वर्ग’ या लेखात लिहिलं आहे. या विधानांवरून त्यांच्या पुस्तकांनी पुरत्या नादावलेल्या स्वभावाची ओळख होते.

‘एका श्रेष्ठ नाटकाचा श्रेष्ठ अनुवाद’ या लेखाची सुरुवात पाहा : ‘पुस्तकव्यसनी माणसाच्या घरात पुस्तकं सतत येत राहतात, इतर व्यसनाधीन माणसांप्रमाणे त्याचीही राहण्याची जागा लहानशीच असते आणि तिच्यात पुस्तकांसाठी केलेल्या सर्व सोयी सतत अपुऱ्या पडत असतात. अशा वेळी नव्या आलेल्या पुस्तकांना जागा करून देण्यासाठी, आधी घेतलेली पुस्तकं सहज हाताला येणार नाहीत, अशा अडचणींच्या जागी हलवावी लागतात. पण काही जिवाभावाची पुस्तकं मात्र कधी या हलवाहलवीला बळी पडत नाहीत. ती आपल्यासोबत आहेत याची एक उबदार जाणीव असतेच, शिवाय ती वाचायची हाक केव्हाही येण्याची शक्यता असते – संपूर्ण नाही, तरी त्यांतले काही आधारासारखे वाटणारे भाग पुनःपुन्हा वाचायचे असतात.’ (पृ. १८२-८३)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

सावंत यांच्या अशा विधानांतून पुस्तकांचं त्यांच्या जीवनातलं अढळ स्थान अधोरेखित होतं आणि त्यांच्या या अशा लेखनशैलीमुळे पुस्तकांची परीक्षणं असणाऱ्या या लेखांतही एक ताजेपणा अनुभवायला मिळतो. त्यांनी ज्या ज्या पुस्तकांवर लिहिलं आहे ती पुस्तकं मिळवून वाचण्याची मनाला ओढ लागते. गणेश विसपुते यांनी मलपृष्ठावर लिहिलेल्या मजकुरात उल्लेख केल्याप्रमाणे ‘सुजाण आणि जिज्ञासू वाचकाचं भान प्रगल्भ करण्यासोबतच ते अधिक प्रशस्त करणारं हे लेखन आहे.’

सावंत यांना हे लेखन करणं त्यांच्या पुस्तकनादामुळे साध्य झालेलं आहे. त्यांना जडलेल्या पुस्तकांच्या नादाची लस प्रत्येकाने टोचून घ्यायला हवी, असं हे पुस्तक वाचून झाल्यानंतर वाटत राहतं.

‘पुस्तकनाद’ : जयप्रकाश सावंत,

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

मूल्य – ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......