अजूनकाही
आफ्रिकन लेखक न्गुगी वा थियोन्गो यांची ‘मातीगारी’ ही जगप्रसिद्ध कादंबरी. तिचा नितीन साळुंखे यांनी मराठी अनुवाद केला असून तो नुकताच मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाला आहे. या अनुवादाच्या निमित्तानं लिहिलेलं हे मनोगत...
..................................................................................................................................................................
न्गुगी वा थियोन्गो हे केनियातले आफ्रिकन लेखक. त्यांनी लिहिलेली ‘मातीगारी’ ही कादंबरी गिकुयू या भाषेत १९८६ साली प्रकाशित झाली. या कादंबरीने केनियन समाजात एक अभूतपूर्व वादळ निर्माण केलं आणि या कादंबरीच्या नायकाने उपस्थित केलेले प्रश्न लोकांच्या तोंडी आले. नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की, कादंबरीचा नायक मातीगारी हे एक पात्र न राहता एका वास्तविक लोकनेत्याच्या रूपात लोकांत ओळखले जाऊ लागले. केनियाच्या सरकारने मातीगारीला अटक करण्याचे फर्मानही जारी केले होते. जेव्हा त्यांना कळले की, मातीगारी हा वास्तविक प्राणी नसून एक फिक्शनल पात्र आहे, ज्याने लोकांचे मन आणि मस्तिष्क भारावून टाकले आहे. हे कळल्यावर त्यांनी बाजारातून सर्व प्रती जप्त केल्याच, मात्र घराघरांतूनही ही कादंबरी जप्त केली गेली.
अन्याय्य सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या लेखकासमोर, त्याच्या साहित्यासमोर सत्ता घाबरते आणि त्या साहित्यिकावर बंदी आणते, त्याच्या अटकेचं वॉरंट काढते; पण सत्ता एखाद्या कादंबरीतल्या पात्राला घाबरते, हे उदाहरण एकमेवाद्वितीयच आहे! (फक्त यावरूनही या कादंबरीचं आणि लेखकाचं सामर्थ्य लक्षात यावं!)
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आपल्याकडील एक महत्त्वाचे लेखक प्रेमचंद यांनी म्हटल्याप्रमाणे ‘साहित्यिकांचा उद्देश मैफिली सजविणे किंवा मनोरंजनाच्या सामानाची जुळवाजुळव करणे हा नाही. देशभक्ती अथवा राष्ट्रभक्तीच्या मागे चालणारे सत्यही नाही, तर त्याच्या पुढे चालणारी मशाल आहे.’ न्गुगीचा नायक सत्य आणि न्यायाच्या शोधात मशाल घेऊन फिरतो आहे आणि सत्ताधारी वर्गाने निर्माण केलेल्या भांडवलशाहीधार्जिण्या देशभक्ती व राष्ट्रवादाच्या चर्चाविश्वासमोर, मिथकासमोर प्रश्न उपस्थित करतो आहे, ही गोष्ट केनियन सरकारला बोचली. साहित्य काय प्रकारचे वादळ निर्माण करू शकते, याचे एक आदर्श उदाहरण या कादंबरीच्या रूपाने आमच्यासमोर आले.
हिंदी पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत वरिष्ठ पत्रकार मित्र आनंदस्वरूप वर्मा यांच्या समकालीन ‘तीसरी दुनिया’ या नियतकालिकाच्या निमित्ताने आफ्रिकन, नेपाळी, दक्षिण आशियाई साहित्याशी, राजकारणाशी परिचय झाला. वसाहतवाद आणि भाषा, संस्कृतीचे राजकारण समजून घेण्याच्या निमित्ताने न्गुगी यांच्या इंग्रजी व हिंदी पुस्तकाचे वाचन व त्या क्रमात ‘मातीगारी’ ही कादंबरी आम्हाला मिळाली.
जेव्हा न्युगी यांनी इंग्रजीत न लिहिता, स्वत:च्या मातृभाषेतच लिहायचा निर्णय जाहीर केला, तेव्हा या लेखकाबद्दलचा आदर आणि उत्सुकता आणखीनच वाढली.
मातीगारी वाचल्यावर वसाहतवादाचं आधुनिक स्वरूप तर उलगडत गेलंच, पण वसाहतवादाशी आणि कॉर्पोरेटीकरणाशी, अमानवी असलेल्या भांडवलवादाशी चाललेल्या युद्धातले पवित्रे भूगोल, भाषा, भवताल आणि संस्कृतीप्रमाणे बदलायला हवेत, हेही लक्षात आलं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
२०१४च्या नंतरच्या काळात देशभर बदलत गेलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या हत्येची कथा सांगणारी कादंबरी आम्हाला अधिकच प्रासंगिक वाटू लागली. कादंबरीच्या सुरुवातीला न्गुगी यांनी केलेलं निवेदन आणि संपूर्ण कादंबरी वाचल्यानंतर आम्हाला असे का वाटले, याची प्रचिती आपणासही येईल, याचा आम्हाला विश्वास नव्हे, तर खात्री आहे.
१९४७ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर अण्णा भाऊ साठे, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ इत्यादी लोकांच्या कवितेतून उमटणारा प्रतिध्वनी ‘मातीगारी’त आपल्याला ठिकठिकाणी ऐकायला येतो हे आणि तो आजही अत्यंत प्रासंगिक ठरतो आहे, असे वाटून आम्ही ही कादंबरी मराठीत आणण्याचा निर्णय घेतला. मित्र नितीन साळुंखे यांनी आपल्या ‘किमान आणि नेमक्या प्रवाही शब्दात कमाल आशय पोहचवणाऱ्या’ प्रभावी शैलीत ‘मातीगारी’चा उत्कृष्ट अनुवाद केलेला आहे. परिशिष्ट म्हणून आनंदस्वरूप वर्मा यांनी हिंदी आवृत्तीला लिहिलेली प्रस्तावना व न्गुगी यांची एक अनुवादित मुलाखत प्रकाशित करत आहोत.
आंतरराष्ट्रीय लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’चे अधिवेशन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने सप्टेंबर २०१८मध्ये पुण्यात भरवण्यात आले होते. या अधिवेशनला न्युगी यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यात त्यांचे एक व्याख्यानही होते. त्यानिमित्ताने त्यांची एक इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली जुनी मुलाखत मराठी भाषेत अनुवादित करून ‘असंतोष’ ह्या वेब अनियतकालिकावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या मुलाखतीचा अनुवाद डॉ. दीपक बोरगावे यांनी केला आहे.
प्रत्यक्षात न्गुगी यांना भारत सरकारने व्हिसा नाकारल्याने ते या अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
‘मातीगारी’चे वाचन, कादंबरीच्या वाचनाने दिलेले झपाटलेपण ते मराठी भाषेत या कादंबरीचे प्रकाशन हे एक वर्तुळ बऱ्याच हातांच्या प्रयत्नाने पूर्ण होते आहे, याचे समाधान आहे. मैत्री पब्लिकेशनच्या संचालक मोहिनी कारंडे या नेहमी म्हणायच्या की, तुम्ही न्गुगी यांच्याबद्दल असे बोलताय जसे की, तो तुमच्या नात्यातला आहे... सर्वहारा जनतेच्या शोषणमुक्तीची व स्वमुक्तीची आस असे वैश्विक नातेसंबंध वृद्धिंगतच करत असते…
‘मातीगारी’ - न्गुगी वा थियोन्गो
मैत्री पब्लिकेशन, पुणे
मूल्य - २५० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment