ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित यांचा ‘आम्ही काय रं चिखुल खावा?’ हा कथासंग्रह येत्या रविवारी, २२ ऑगस्ट २०२१ रोजी डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला पंडित यांनी लिहिलेलं हे मनोगत...
..................................................................................................................................................................
कथाकथनाची आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. विविध अनुभवांतून जात असताना सर्व संबंधित घटकांचे सूक्ष्म निरीक्षण व त्याला कल्पनाशक्तीची दिलेली जोड, यातून कथा तयार होतात. या कथा म्हणजे ज्ञानाचा साठा असतो. यांच्यातून संस्कृती आकाराला येते. हे फक्त भारतीय संस्कृतीच्या बाबतीत खरे आहे असे नाही. जगभरात हेच आणि असेच घडत असते. याच पद्धतीने ज्ञान साठा तयार होत असतो व संक्रमित होत असतो. सुरुवातीला मौखिक असलेली ही परंपरा लेखनाचा शोध लागल्यानंतर वेगाने पसरू लागली.
कथाकथन आणि कथालेखन यांच्या मुळाशी असतात घटना, त्या घटनांमध्ये समाविष्ट असलेल्या किंवा असे म्हणता येईल की, त्या घटनांना कारणीभूत असलेल्या व्यक्ती, तत्कालीन परिस्थितीतून जन्माला आलेले विविध घटक, निर्माण झालेले ताणतणाव आणि त्यांना प्रतिसाद म्हणून बदलणारे व्यक्तींचे वर्तन. या सगळ्याचे जे सार निघते ते ज्ञान.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मी ज्या कथा या पुस्तकात सांगणार आहे, त्या सत्यकथा आहेत. त्या केवळ घटनाक्रम म्हणून मांडून त्यांचे तात्पर्य वाचकांना सांगायचे की, त्या गोष्टी स्वरूपात मांडून तात्पर्य काढण्याचे काम वाचकांवर सोडायचे, या दोन पर्यायांतला दुसरा पर्याय मी निवडला आहे. या सत्यघटना आहेत आणि जशा घडल्या तशाच लिहिल्या आहेत. या घटना म्हणजे माझ्या समाजकार्याच्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके होत्या, असे मला वाटते. अभ्यासक्रमातील पुस्तकी ज्ञानापेक्षा बरेच काही जास्त, प्रत्यक्ष प्रमाणाने शिकवणाऱ्या आणि घोकंपट्टीची गरज नसणाऱ्या या घटना, या गोष्टी माझ्या स्वतःच्या आयुष्यातील मैलाचे दगड आहेत, असे मी मानतो, कारण यांच्यातूनच माझी शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली. यांच्यातूनच मी अनुभव घेतला, माझी जाणीव विकसित झाली आणि त्या अर्थाने बघितले तर त्या माझ्या गुरुस्थानी आहेत, असे आपण म्हणू शकतो.
कामाला सुरुवात केली, तेव्हा आमच्या कल्पना आदर्शवादावर आधारित, भाबड्या वगैरे होत्या, असे म्हणता येईल. आदर्शवाद किंवा भाबडेपणा वाईट आहे, असे म्हणायचे नाही. या गोष्टी मुळात तुमच्याकडे असणे आणि तुम्ही त्या जपणे महत्त्वाचेच. फक्त वास्तवाच्या चटक्यांनी त्या तावूनसुलाखून निघाल्या की, त्यातून शहाणपण जन्माला येते आणि ते जास्त महत्त्वाचे. अर्थात त्या शहाणपणाचे करायचे काय, या प्रश्नाच्या उत्तराला दोन फाटे फुटतात. आपण मानतो तसे जग नाही, म्हणून आपल्या श्रद्धांनाच तिलांजली द्यायची किंवा वास्तव बदलण्यासाठी आपल्या मूळ प्रेरणेशी प्रामाणिक राहून यथाशक्ती प्रयत्न करत रहायचे, हा प्रश्न वैयक्तिक आहे आणि अर्थातच उत्तरदेखील. तुम्ही काम करायचे की दुकान चालवायचे, हे तुम्हीच ठरवायचे.
आम्ही कामाला सुरुवात केली, आम्ही म्हणजे मी व माझी पत्नी विद्युल्लता - त्यामागे जनता पक्षाच्या फसलेल्या प्रयोगाची पार्श्वभूमी होती. माननीय जयप्रकाश नारायण यांच्या ‘दुसऱ्या स्वातंत्र्या’च्या संकल्पनेवर श्रद्धा ठेवून आम्ही आणीबाणीविरोधी आंदोलनापासून ते जनता पक्षाची स्थापना व जनता पक्षाच्या सरकारने सत्तेची सूत्रे हातात घेणे, या सर्व घडामोडींमध्ये सहभागी होतो. अंतर्गत कलहामुळे ते सरकार कोसळले. देशात मूलभूत बदल घडतील, ही आमची आशा अनाठायी होती, हे उशीरा का होईना, लक्षात आल्यानंतर आम्ही त्या प्रवाहापासून दूर झालो खरे, पण देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायचे आहे, ही आमची प्रेरणा हरवली नव्हती. सामाजिक काम करण्याचा विचार आम्ही निश्चित केला आणि त्यानुसार कामाला सुरुवात करायची म्हणून विरारजवळील दहिसर हे ओळखीचे खेडे निवडले.
आपल्याला समाजासाठी काहीतरी उपयुक्त करायचे आहे, समाज बदलण्यासाठी काम करायचे आहे, ही धारणा घेऊन कामाला सुरुवात केली. समाजाला आपल्या विचारांच्या व आदर्शांच्या साच्यात बसवण्याची ती धडपड होती. आपण बदल करायला सांगितला म्हणून लोक बदलत नाहीत, समाज बदलत नाही, हे शहाणपण यायचे होते. आपली शक्ती अपुरी असते. आपण एकहाती बदल घडवून आणू शकत नाही. बदलाची प्रेरणा लोकांच्या मनात जागृत करणे एवढेच आपण करू शकतो आणि हे काम देखील सहज होत नाही. कारण ही प्रेरणा केवळ उपदेशाने जागी होत नाही. काम करणाऱ्याला हे कळण्यासाठी वास्तवाचे चटके सहन करावे लागतात, बरीच उमेदवारी करावी लागते. आम्हालादेखील ही उमेदवारी करावी लागली.
सुरुवातीला आमचे काम अगदीच बाळबोध म्हणावे असे होते. अर्थात ते नैसर्गिक पण होते. तो प्रयोगाचा काळ होता. बालवाडी, रुग्णसेवा केंद्र स्थापन करून त्या माध्यमातून, लसीकरण, खरुज निर्मूलन हे उपक्रम सुरू केले. आदिवासींच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी शेळी प्रकल्प, डुक्कर संगोपनदेखील करून बघितले. हे प्रयोग फसले, पण त्यामुळे काय करायचे नाही किंवा कुठे काय चुकू शकते, याचा अंदाज आला. शहाणपणाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडले.
या सुरुवातीच्या प्रयोगाच्या कालखंडातच एका घटनेने आमची कामाची दिशा ठरली. युवकांसाठी घेतलेल्या खेळांच्या स्पर्धेतून ‘वेठबिगारी’ हा प्रकार आमच्या नजरेस आला एवढेच नव्हे, तर वेठबिगारी हा अपवाद नसून नियम आहे आणि ही प्रथा दृढमूल करण्यामागे आपल्यातीलच लोक आहेत, हेदेखील समजले.
खेळांच्या स्पर्धांच्या सरावासाठी काही तरुण येत नसत. त्यांच्या न येण्यामागचे कारण शोधायला गेलो, तेव्हा लक्षात आले की, ते सगळे ‘लग्नगडी वेठबिगार’ आहेत. त्यांचे मालक एरवी आमच्या कामाचे कौतुक करत असत, पण या कौतुकाला मर्यादा होत्या. त्यांच्या हक्काच्या वेठबिगारांनी कसे जगावे, हे ठरवायला ते समर्थ होते. वेठबिगारांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेणे, हे त्यांच्या कामांच्या व्याख्येत बसणारे नव्हते.
इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आदिवासी आणि जंगल यांचे नाते पूर्वापार परस्परपूरक आहे. जंगल आदिवासींना जगवत असते व आदिवासी जंगलांची काळजी घेत असतात. या नात्यावर प्रथम ब्रिटिशांनी कुऱ्हाड चालवली. आदिवासींच्या जीवनाचा आधार असलेल्या जंगलांचे आणि आदिवासींचे नाते नष्ट करण्याचे काम ब्रिटिश काळापासूनच सुरू झाले होते. दुर्दैवाने आपण ती परंपरा पुढे चालवली. यात जसा ब्रिटिशांचा स्वार्थ होता, तसा आपलाही स्वार्थ होता. जंगलापासून तुटलेला, उदरनिर्वाहाचे एकमेव हुकमी साधन हिरावून घेतलेला आदिवासी गुलाम म्हणून आपल्याला वापरायला मिळाला.
हे लग्नगडी वेठबिगार तयार करण्याची प्रक्रिया अगदी लहानपणापासून पद्धतशीरपणे राबवली जायची. पूर्णपणे निराधार असलेल्या आदिवासींना गुलाम म्हणून जगण्याची सवय अगदी लहानपणापासून लावली जायची. लहान असताना बकऱ्या चारणे... थोडे वय वाढले की, एक वेळचे जेवण व दोन जोड कपड्यांच्या मोबदल्यात बैल चारणे... अजून थोडे मोठे झाले की, मालकाच्या शेतातील नांगर हाकायला सुरुवात करणे... नांगर हाकायला लागला की, त्याला ‘नांगऱ्या’ म्हणत. नांगऱ्या झाला म्हणजे मुलगा वयात आला. मग माय-बाप-सरकार या तीनही भूमिका बजावणारा मालक त्याच्या लग्नाची तजवीज करायचा. लग्न ठरले की, मालकच बस्ता बांधायचा. हा खर्च २००० ते ५००० रुपयांपर्यंत व्हायचा.
लग्नाआधी आपली पत निर्माण करण्यासाठी काम करायचे. आपल्या कामाने मालकाला खुश करायचे. मालक खुश झाला की, तो लग्न लावून देणार. लग्नाचा सगळा खर्च मालक करणार. त्या खर्चाच्या मोबदल्यात नवरा आणि बायको दोघेही आयुष्यभरासाठी मालकाकडे राबणार. मालक त्या बदल्यात कपडे आणि भात देणार. वर्षभरात दोन बनियन, कंबरेला गुंडाळायचे दोन रुमाल आणि महिन्याला सव्वा मण म्हणजे अंदाजे वीस किलो भात मिळणार. अशा प्रकारचे हे वेठबिगार लग्नगडी. यांनी वेळेचे कुठलेही बंधन न पाळता दिवसा-रात्री मालक सांगेल तेव्हा तो पुरे म्हणेल तोपर्यंत काम करायचे. तसा करारच करून घेतला जायचा. एकदम कायदेशीर. जामीनदार वगैरे असलेला कायदेशीर करार. मालकाने सांगितलेल्या कुठल्याही कामाला, कोणत्याही सबबीखाली नकार देण्याचे स्वातंत्र्य नाही. भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेले संचार स्वातंत्र्य हा करार काढून घेत असून हे लग्नगडी वेठबिगार मालकाच्या पूर्वपरवानगीशिवाय कुठेही जाऊ शकत नसत.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आम्ही भरवत असलेल्या क्रीडा स्पर्धांना हे लग्नगडी वेठबिगार येणे कसे शक्य होते? त्यांचे मालक आमचे कौतुक करत असत, आपल्या मुलांना आमच्याबरोबर राहण्यासाठी उत्तेजन देत असत आणि वेळप्रसंगी कार्यक्रमासाठी आर्थिक मदतदेखील देत असत. ते आमचे आश्रयदाते होते. अर्थात अशी मदत केली की, कार्यक्रमाप्रसंगी त्यांना स्टेजवर बोलावणे, त्यांचे आभार मानणे आणि त्यांचा सत्कार करणे हे ओघानेच यायचे. आम्ही त्यांच्या मर्जीनुसार व प्रचलित सामाजिक घडी न मोडता काम करावे एवढीच त्यांची अपेक्षा होती. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्ही त्यांचे मिंधे झालो आहोत, अशी त्यांची समजूत होती. अर्थात हा त्यांचा गैरसमज होता, हे त्यांना हळूहळू पुढे कळणार होते.
इथून पुढे आमचे खरे काम सुरू झाले. पूज्य साने गुरुजी आणि माननीय जयप्रकाशजी ज्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईविषयी बोलत होते, ती हीच होती. या वेठबिगारांची सर्व मूलभूत स्वातंत्र्ये हिरावून घेण्यात आलेली होती. लग्नासाठी घेतलेल्या कर्जापोटी मालकाकडे नवरा आणि बायको दोघांनीही दिल्या जाणाऱ्या कपड्यांवर आणि फेकलेल्या तुकड्यांवर आयुष्यभर राबायचे. कामाला वेळेचे बंधन नाही. मालकाने बोलावले की, कामाला जायचे आणि तो थांब म्हणेपर्यंत काम करत रहायचे. मुळात फिटलेल्या कर्जाचा हिशोब मागण्याची हिंमत नाही आणि अशिक्षित असल्याने हिशोब दाखवला तरी समजणार नाही. शिवाय यांची पोरे थोडी मोठी झाली की, तीदेखील आधी बकऱ्या, मग बैलांमागे आणि मग नांगर धरण्याइतकी मोठी झाली की, लग्नगडी होणार. शाळा आणि शिक्षणाचा संबंध येतोच कुठे? पिढ्या मागून पिढ्या हे दुष्टचक्र चालूच राहणार.
आतापर्यंत आमचे सगळे नीट चालले होते. दहिसर गावात माझे नातेवाईक राहत होते. मामा गावाच्या मंदिराचे पुजारी होते. त्यांना गावात मान होता आणि त्यांच्यामुळे मला व विद्युतला मान होता. आम्ही आतेभावाकडे भाडे देऊन राहत होतो. चांगल्या घरांतले तरुण आमच्याबरोबर काम करत होते. इथे ‘चांगले घर’ याचा अर्थ आहे गावातले बडे जमीन मालक. या सगळ्यांचे उत्तम सहकार्य आम्हाला लाभलेले होते. आरोग्य शिबिराला जागा, डॉक्टरांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था, क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा साहित्य… म्हणजे आम्ही जे जे काम करत असू त्या कामासाठी लागणारी प्राथमिक मदत आम्हाला गावातल्या प्रस्थापितांकडून मिळायची. आमच्या सेवावृत्तीचे, उपक्रमांचे आणि आमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करताना लोक थकत नसत.
आता मात्र हे सगळे चित्र पालटायला सुरुवात झाली. आम्ही जोवर वरवरचे दिखाऊ काम करत होतो, तोवर सगळे नीट चालले होते. मूलभूत समस्येला हात घातल्यावर वातावरण वेगाने बदलू लागले. आम्ही या बदलाच्या खुणा समजून घेण्यात कमी पडलो. आपण चांगले काम करतो आहोत आणि चांगल्या कामात सुरुवातीला अडथळे येतातच, असे स्वतःला सांगत राहिलो. प्रस्थापितांनी कायम केलेली शोषण व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला तर काय होते, याचा अनुभव आम्ही अजून घेतलेला नव्हता.
माझा स्वभाव पहिल्यापासून जिद्दी आहे. एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की, मी तिला जळूसारखा चिकटून राहतो. विद्युतचा स्वभावही असाच आहे. ‘वेठबिगारी’ या विषयाने आमच्या मनात घर केले. त्याशिवाय आम्हाला दुसरे काही सुचेना. आम्ही सतत या वेठबिगारांशी या विषयावर बोलू लागलो. पण तोपर्यंत आमच्याशी गप्पा मारणारे आदिवासी आता मात्र आम्हाला टाळू लागले. आम्ही कोणाला भेटायला गेलो, तर मागच्या दाराने पळून जायला लागले. आम्हाला नसली तरी त्या आदिवासींना या विषयाच्या गांभीर्याची कल्पना होती. दुसरीकडे जमीन मालकांच्या दृष्टीकोनातही फरक पडू लागला होता. वातावरण धुमसू लागले होते. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात ठिणगी पडली आणि वणवा पेटला.
झाले ते असे. मी स्वतः रचलेली एक कविता म्हणजे गीत त्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात म्हटले. गीताचे बोल पुढीलप्रमाणे होते -
ही जिद्द आहे मोठी, ही अवघड तशी कसोटी ।
संसदचे कंकण हाती, हे गाव बदलण्यासाठी ।।
एक हजार कर्जासाठी, गडी जीवनभर हो कसती ।
हा हिशोब सांगा कुठला, मजुरांच्या दुनियेवरती ।।
ही जाणीव त्यांना देऊ, अन्याया वाचा फोडू ।
हा जुलूम सहने नाही, व्हा सज्ज संगरासाठी ।।
करी कंकण हे बांधियले, तर मागे हटणे नाही ।
हे जगणे मरणे आता, हा देश बदलण्यासाठी ।।
‘व्हा सज्ज संगरासाठी’ असे मी आदिवासींना उद्देशून म्हटले होते, पण ते मनावर मात्र घेतले जमीन मालकांनी. त्यांनी युद्धाला सुरुवातच करून टाकली. एके दिवशी आम्ही वैतरणा स्टेशनवरून गावात येत असताना आमच्यावर हल्ला झाला. मी, विद्युल्लता व विषया भावे असे आम्ही तिघेजण होतो. आम्हाला बेदम मारहाण झाली. आम्हाला मारहाण होत असताना ओळखीचे लोक बघत होते, पण कोणीही मदतीला आले नाही. माझ्या मामांनी तर आमच्यावर बहिष्कार टाकला. ज्या आतेभावाच्या घरी आम्ही भाडेकरू म्हणून राहत होतो, त्याने आमचे सामान बाहेर फेकून दरवाजाला कुलूप लावून टाकले.
हा आमच्यावर झालेला पहिला हल्ला. यानंतर असे अनेक हल्ले झाले आणि ते झेलून आम्ही पुढे जात राहिलो. शारीरिक हल्ले, खुनाचे प्रयत्न, बदनामी, बहिष्कार, आर्थिक नाकेबंदी या सगळ्या प्रकारांचा आम्ही सामना केला. या पहिल्या हल्ल्यानंतर मात्र एक झाले- जे आदिवासी आम्हाला टाळत होते ते जवळ आले. आमच्या पहिलीच्या पुस्तकातला पहिला धडा आम्ही शिकलो. ‘बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची’ हा तो धडा. जमीन मालकांसोबत राहून आम्ही आदिवासींवरील अन्याय दूर करण्याच्या गोष्टी करत होतो, तोपर्यंत आदिवासींना आमच्याविषयी विश्वास वाटणे कसे काय शक्य होते? आम्ही मार खाल्ला आणि तरीही आमचा विचार सोडला नाही, हे आदिवासींनी बघितले. आमच्या या कृतीने त्यांच्या मनात आमच्याविषयी विश्वास निर्माण झाला.
१९७९ साली आम्ही कामाला सुरुवात केली. चार दशके उलटून गेली. ‘विधायक संसद’ आणि ‘श्रमजीवी’ व ‘समर्थन’ या संस्था तसेच ‘श्रमजीवी कामगार संघटना’ ही तळागाळातील कष्टकऱ्यांची कामगार संघटना यांच्या माध्यमातून आम्ही गेली ४० वर्षे काम करत आहोत. या दीर्घ कालखंडात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडल्या. या चार दशकांमध्ये उपेक्षा, पराकोटीचा विरोध आणि स्वीकार या सर्व पायऱ्या आम्ही पार केल्या. पण संघर्ष अजून संपलेला नाही, हे वास्तव आहे.
‘पाटील बावा, पाटील बावा, आम्ही काय रं चिखुल खावा?’ ही घोषणा आम्ही मुक्त केलेल्या वेठबिगारांचे शेतमजुरांमध्ये रूपांतर झाल्यानंतर या आदिवासी मजुरांना किमान वेतन मिळावे म्हणून छेडलेल्या लढ्यातील लोकप्रिय झालेली घोषणा होती. सदर पुस्तकाचे नाव या घोषणेवरूनच घेण्यात आले आहे. हा लढा आमच्यासाठी महत्त्वाचा होता, कारण या लढ्यातून आमचा सामाजिक पाया विस्तारण्याचे काम सुरू झाले. अल्पसंख्य असलेले आदिवासी वेठबिगार आदिवासी नसलेल्या भूमिहीन मजूर वर्गात सामील झाले आणि कमिान वेतनाचा लढा आम्ही या विस्तारित वर्गासाठी लढलो. याच लढ्यातून आम्हाला आमच्या पुढच्या कामाचा रस्ता मिळाला. वेठबिगार, शेतमजूर ते जमीन मालक ही स्थित्यंतरे याच लढ्यामुळे आम्हाला बघता आली.
हा लढा भूकेचा आहे हे वास्तव आहे. निरक्षर आदिवासींच्या जमिनी बळकावून त्यांना वेठबिगार करायचे, दलितांना गावकुसाबाहेर ठेवायचे आणि त्यांचे जगणे गावगाड्याच्या गरजा भागवण्याशी जोडून टाकायचे आणि कृष्णवर्णीयांना गुलाम म्हणून जगणे भाग पाडायचे. हे आदिवासींच्या बाबतीत घडले, आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या बाबतीत घडले आणि दलितांच्या बाबतीतही घडले. मी ही तीन उदाहरणे घेतली, कारण आमचा कामाच्या निमिताने यांच्याशी संबंध आला आणि या पुस्तकात या तीनही घटकांच्या कथा आहेत.
हे पुस्तक मी झपाटल्यासारखा लिहीत गेलो. लिहिणे पूर्ण झाल्यानंतर लक्षात आले की, या पुस्तकाचा पट मोठा आहे. हे पुस्तक एका नव्हे तर आदिवासी, दलित आणि कृष्णवर्णीय अशा तीन घटकांविषयी बोलते आहे. आदिवासी आणि दलित इथले तरी आहेत, पण कृष्णवर्णीय हे तर भारतीय नाहीत. पण या पुस्तकाला वैश्विक परिमाण आहे आणि ते ‘भुके’चे आहे.
या पुस्तकात खूप कथा आहेत. लबाड व लाचखोर तलाठ्याकडून ‘उलट्या पिसाची कोंबडी’ वसूल करणाऱ्या चिमाची गोष्ट इथे आहे. ‘दुसरीकडे काम शोधतो’ म्हणून संतापून मालकाने ज्याचा जीव घेतला त्या झिपरू मुकणेची गोष्ट इथे वाचायला मिळेल. गावाने सक्तीने म्हारकी करायला लावलेला बी.ए. पास गोरख इथे तुम्हाला भेटेल. ‘काळ्या रंगाला बदनाम करू नका’ म्हणून ठणकावून सांगणारा अमेरिकेतील कृष्णवर्णीय तरुण कमाऊ मचेरिया इथे तुमच्याशी गप्पा मारेल. अमेरिकेतील कृष्णवर्णीय तरुणांमध्ये तळमळीने काम करणारा सार्जंट डेल्सी डेव्हीस इथे तुमचे लक्ष वेधून घेईल. भारताच्या माजी सरन्यायाधीशांसमोर मातंग जमातीची कैफियत निर्भयपणे मांडणारा अभंग हा मातंग तरुण तुम्हाला या पुस्तकांच्या पानांत भेटेल.
या आधी उल्लेख केल्याप्रमाणे या कथा वेगवेगळ्या आहेत, पण त्यांच्या मागील सूत्र समान आहे. समाज आहे, तिथे शोषण आहे, शोषण व्यवस्था आहे, शोषक आहेत आणि शोषित आहेत. नावे वेगळी पण सूत्र मात्र एकच- ‘भूक’. सगळे शोषण ‘भूक’ या एका गोष्टीभोवती फिरते. माणसाचे भूक भागवण्याचे मार्ग बंद करून त्याला आपल्या हुकुमतीत ठेवायचे, हवे तसे राबवून घ्यायचे, ही प्रथा मानवी संस्कृतीइतकीच प्राचीन आहे. पोटाची भूक भागवण्याचे मार्ग बंद करणे हे शोषणासाठी आवश्यक असलेले पहिले हत्यार आहे. पोटाची भूक भागवण्याचे सगळे मार्ग हिरावून घेऊन माणसाला परावलंबी केले की, तो अगतिक होतो आणि गुलाम बनायला तयार होतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
म्हणूनच या गोष्टींना भुकेच्या एका समान सूत्रात गुंफणारी ‘आम्ही काय रं चिखुल खावा’ ही कथा या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे आणि तिचेच नाव या पुस्तकाला दिलेले आहे.
कविवर्य वसंत बापट यांनी म्हटले आहे-
स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य?
जोवरी सुखाचा घास नसे सर्वांना
जोवरी न होतील अवघ्या उन्नत माना
तोवरी न मानू स्वतंत्र आपुला देश
तोवरी राहू दे अंगावर रणवेश
‘जोवरी सुखाचा घास नसे सर्वांना’ ही या कवनातली सर्वांत महत्त्वाची ओळ आहे. ही भुकेची लढाई आहे. ही खऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
‘आम्ही काय रं चिखुल खावा?’ - विवेक पंडित
डिंपल पब्लिकेशन, मुंबई
मूल्य - ३०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment