आगरकरांविषयी विशेष सहानुभूती असूनही लेखकांनी टिळकांना जास्तीत जास्त समजून घेऊन जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे
ग्रंथनामा - झलक
सदानंद मोरे
  • ‘लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 02 August 2021
  • ग्रंथनामा झलक लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर महात्मा गांधी सावरकर न्या. रानडे

काल, १ ऑगस्ट २०२१ रोजी लोकमान्य टिळकांची १०१वी पुण्यतिथी साजरी झाली. त्यानिमित्ताने साधना प्रकाशनाने प्रा. ग. प्र. प्रधान - अ. के. भागवत लिखित ‘लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी’ या (१९५६) इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. अवधूत डोंगरे यांनी केलेल्या या अनुवादाला प्रसिद्ध अभ्यासक -संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचे हे संपादित संस्करण...

..................................................................................................................................................................

१.

२३ जुलै १८५६ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सरसेनापती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिवस. कालगणनेप्रमाणे इ.स. २००६ हे टिळकांच्या जन्माचे १५० वे वर्ष फारशा उत्साहाने साजरे झाले होते, असे म्हणता येत नाही, पण १९५६ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष मात्र यथोचित रीतीने साजरे झाले होते, असे म्हणता येते. उदाहरणच द्यायचे झाले तर २००६ध्ये काँग्रेस पक्षाने यानिमित्त काही विशेष उपक्रम राबवल्याचे आठवत नाही. १९५६मध्ये मात्र अखिल भारतीय काँग्रेस समितीने टिळकांचे इंग्रजी चरित्र लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शि.ल. करंदीकर, त्र्यं.वि. पर्वते यांनी आपापली टिळकचरित्रे दाखल केली. हे दोन्ही लेखक टिळक परंपरेतील मानले जातात. पर्वते यांनी तरुण असताना कॉ. डांगे यांच्याबरोबर टिळकपक्षाचे राजकारणही केले होते. वयाने व अनुभवानेही ते ज्येष्ठ होते. ग.प्र. प्रधान आणि अ.के. भागवत या लेखकांबाबत तसे म्हणता येत नाही. हे दोघे तेव्हा अगदीच तरुण म्हणजे पस्तिशीच्यात आत होते. यापेक्षा ते टिळकांच्या परंपरेतील नव्हते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. (याशिवाय याचदरम्यान ‘केसरी’चे लंडनमधील प्रतिनिधी द.वि. ताम्हणकर आणि केंद्रीयमंत्री डी.पी. करमरकर यांनी लिहिलेली चरित्रे स्वतंत्रपणे प्रसिद्ध झाली होती.) काँग्रेस समितीत या तीन चरित्रांमध्ये डावे-उजवे ठरवता येईना, म्हणून ते दहा हजार रुपयांचे बक्षीस तिघांना वाटून दिले. पर्वते आणि करंदीकर यांची चरित्रे प्रसिद्ध झाली, याचे कारण तेव्हा त्यांचा बऱ्यापैकी बोलबाला होता. करंदीकर, पर्वते (व ताम्हणकरही) पत्रकार होते. करंदीकरांचे सावरकर चरित्र प्रसिद्ध होते. त्या तुलनेत इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या प्रधान-भागवतांना तसे प्रस्थापित म्हणता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी लिहिलेले टिळक चरित्र काहीसे मागे पडले. तथापि ‘जयको’ या प्रकाशन संस्थेने ते छापायचे मान्य केले, पण ते निम्मे करून! लेखकद्वयीला ते मान्य नव्हते. शेवटी एकतृतीयांश मजकूर कमी करण्याबाबत तडजोड झाली व ते प्रकाशित झाले. तथापि प्रकाशकांनी त्याची भरपाई, बारीक टाईप वापरून पृष्ठसंख्या मर्यादित ठेवीत, करायची ती केलीच! आनंदाची गोष्ट म्हणजे जयको प्रकाशनाने २००८ मध्ये, पूर्वी वगळल्या गेलेल्या एकतृतीयांश मजकुरासह मूळ चरित्र प्रकाशित केले, ते ६०० पानांचे झाले. सुदैवाने ते पहायला प्रधान हयात होते, दुर्दैवाने भागवत मात्र नव्हते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मराठी माणसाच्या दृष्टीने त्याहीपेक्षा आनंदाची बाब म्हणजे १ ऑगस्ट २०२० या टिळकांच्या मृत्युशताब्दीचे औचित्य साधन ‘लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी’ या प्रधान-भागवतांच्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याचे काम ‘साधना प्रकाशना’ने हाती घेतले आणि १ ऑगस्ट २०२१ रोजी म्हणजे टिळकांच्या १०१व्या मृत्युदिनी प्रकाशित होत आहे. या अनुवादाचे शिवधनुष्य अवधूत डोंगरे यांनी समर्थपणे पेलले आहे याची प्रारंभीच नोंद करतो. हा अनुवाद पहायला लेखकद्वयी आपल्यात नाहीत याची खंत वाटते.

अवधूत डोंगरे यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर ओळीला ओळ आणि शब्दाला शब्द देत म्हणजे यांत्रिकपणाने केले नाही, हे आवर्जून नमूद करायला हवे. त्यांनी मूळ पुस्तकाव्यतिरिक्त टिपांची भर टाकून ते अद्ययावत केले आहे. मधल्या काळात डॉ.य. दि. फडके यांनी केलेले संशोधन, त्याप्रमाणेच मी ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथात पुरवलेला नवा तपशील यांची दखल घेत डोंगरे यांनी मूळ चरित्रातील रिकाम्या जागा भरून काढल्या आहेत.

करंदीकर तसेच पर्वते (आणि अर्थातच करमरकर व ताम्हणकर) एकीकडे आणि भागवत व प्रधान दुसरीकडे अशी चरित्र लेखकांची तुलना केली तर एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो. पहिल्यांदा उल्लेख केलेले चरित्रकार टिळकांचे भक्त म्हणता यावेत, इतके टिळकांबद्दल पूज्यताभाव बाळगणारे होते, तसे भागवत-प्रधान यांच्याविषयी म्हणता येत नाही. वैयक्तिक जीवनात प्रधानसरांचा कल टिळकांपेक्षा आगरकरांकडे अधिक होता, असे आपण म्हणू शकतो. त्यांनी ‘आगरकर लेखसंग्रह’ संपादित केला असल्याचे आपण जाणतो. उदारमतवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणून त्यांची ओळख आहे. ती टिळकांच्या विचारांच्या जवळ जाणारी नसल्याची जाणीव त्यांना स्वत:लाही होती.

पुढे १९६९मध्ये महात्मा गांधींची जन्मशताब्दी आली, तेव्हा परत एकदा प्रधान आणि भागवत यांनी एस.एस.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीत महात्मा गांधींवर ज्याला ‘रॅपीड रीडर’ म्हणतात, असे एक पुस्तक सिद्ध केले. भागवतांनीही गांधीवादी असलेल्या आचार्य स.ज. भागवतांच्या लेखांचे संपादन करून ग्रंथ प्रसिद्ध केला होताच. त्यानिमित्ताने त्र्यं.वि. पर्वते यांनीही ‘गांधीपर्व’ प्रसिद्ध केले. शि.ल. करंदीकर हे सरळ सरळ सावरकरवादी म्हणजे टिळक-सावरकर अशी संगती व सातत्य मानणारे. याउलट पर्वते, कॉ. डांगे यांना अनुसरत टिळकांकडून समाजवादाकडे येऊ पाहणारे. करंदीकरांना गांधीवादाचे वावडे, पण पर्वत्यांना ते नव्हते. म्हणून तर १९३७मध्ये सावरकर रत्नागिरी येथील सक्तीच्या क्षेत्रसंन्यासातून सुटले तेव्हा ‘त्यांनी मार्क्सच्या समाजवादी प्रणालीचा अंगिकार करून पुढील राजकारण करावे’ असे वाटणाऱ्या पर्वत्यांनी लिहिले, ‘‘कोणत्याही कारणास्तव जे या मताला विरोध करतील, ते मनुष्य जातीचे, मानवी संस्कृतीचे व तिच्या अधिकाधिक विकासाचे शत्रू ठरतील. सावरकारांच्या पुरोगामीत्वाची कसोटी ते या मताचे विरोध ठरतात की अभिमानी ठरतात, यावरून निश्चित होईल.’’ करंदीकरांची सावरकरांकडून अशी अपेक्षा असणे शक्य नव्हते. अर्थात सावरकरांनी पर्वत्यांऐवजी करंदीकरांचीच अपेक्षा पूर्ण केली, असे म्हणावे लागते.

प्रधानसर ना टिळक-सावरकर या पठडीतील, ना टिळक-मार्क्स या परंपरेतले. लोकशाही समाजवाद्यांना मार्क्सवाद जितका मान्य असतो, तितकाच त्यांना ते समाजवादी असल्याने मान्य होताच. त्यामुळे त्यांची स्थाननिश्चिती करताना मी त्यांना ‘आगरकरवादी-मार्क्सवादी’ म्हणू शकतो. आगरकरी बुद्धिवादाची व व्यक्तिवादाची सांगड मार्क्सच्या समाजवादाशी घातली की, जे रसायन तयार होते ते. कदाचित यामुळे समाजवादी पक्षात फाटाफूट झाल्यानंतर प्रधानांनी एसेम जोशींबरोबर जाण्यापेक्षा नानासाहेब गोरे यांच्या गटात जाणे पसंत केले असावे!

२.

प्रधान आणि भागवत यांनी टिळकचरित्र लिहायचे ठरवले, तेव्हा आपल्या आधुनिक व आगरकरी कल असलेला चिकित्सक दृष्टिकोन आड येईल की काय, अशी शंका त्यांना वाटली होती व ती त्यांनी प्रास्ताविकात व्यक्तही केली होती. ‘‘आपल्या सुरुवातीच्या काळातील आदर्शांचा नव्या दृष्टीने विचार करणं काही वेळा अस्वस्थकारक असतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अज्ञात पैलू आणि त्यांच्या मर्यादाही समोर आल्याने आपणास स्वत:च्या प्रत्येक गतकालीन मतांची वैधता शंकास्पद वाटायला लागते. लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा आणि कार्याचा अभ्यास सुरू करताना आमच्याही मनात अशीच भीती होती.’’

प्रधान आणि भागवत यांची ही भीती यथार्थ व स्वाभाविकच म्हणावी लागते. स्वत: हे दोघे समवयस्क लेखक, बाल्य व किशोरावस्थेत असताना त्यांना सर्वत्र टिळकांचा प्रभाव दिसला असणार. थोडे मोठे झाल्यावर आगरकर आणि गांधी यांच्या परिप्रेक्ष्यातून पाहताना टिळकांच्यातील काही बाबी त्यांना खटकल्या असणार.

पण त्यांची भीती नि शंका टिळकांचा अभ्यास करताना विरून गेल्याचे ते सांगतात. कारण ‘‘व्यक्ती आणि नेता म्हणून टिळकांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुढंगी होतं की, अभ्यास पूर्णत्वाला जाईपर्यंत आम्हाला आमच्या प्रारंभिक साशंकतेचा पूर्ण विसर पडला होता. हे काम करीत असताना आम्ही जणू काही टिळकांच्या काळातील बौद्धिक व राजकीय वातावरण जगत होतो.’’

प्रधान-भागवतांनी या एका संक्षिप्त वाक्यात चरित्रलेखनाच्या पद्धतीचे जणू सूत्रच सांगितले आहे. गतकालीनांच्या चरित्रलेखनाच्या वेळी आपण आपल्या काळातील मूल्ये व मोजपट्ट्या घेऊन आपल्या अगोदरच्या अशा काळातील लोकांना लावायच्या प्रयत्न करतो की, ज्या काळात ही मूल्ये व या मोजपट्ट्या अस्तित्वातच नव्हत्या. कदाचित त्यांच्या काळातील समस्याही आपल्या काळातील समस्यांपेक्षा वेगळ्या असणार. अगदी प्रस्तुत चरित्रग्रंथाचे उदाहरण घेतले तरी ज्या काळात ते लिहिले गेले, तो काळ स्वातंत्र्याचा होता. म्हणजे पारतंत्र्याची मुख्य समस्या आता (१५ ऑगस्ट १९४७) संपली होती. पारतंत्र्यातील दु:खे, त्रास, अवहेलना, शोषण आता प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय राहिला नव्हता. त्यामुळे पारतंत्र्याच्या गतसमस्येशी झगडण्यापेक्षा आजच्या दारिद्रय, विषमता अशा समस्यांचा मुकाबला करणारे अधिक महत्त्वाचे वाटू लागले होते. टिळकांचे उपयुक्ततामूल्य संपले असे वाटू शकेल, पण फुले-आगरकर यांच्यासारख्यांचे आजही आहे. कारण त्यांनी ज्या समस्या मांडल्या व ज्यांचे निराकारण करण्याची प्रयत्न केले, त्या अद्याप शिल्लक आहेत.

असे वाटणे हा मनुष्यस्वभाव आहे. आणि तसेही मृतांच्या समस्यांपेक्षा जिवंत असणाऱ्यांच्या समस्यांना महत्त्व द्यावे लागते. पण त्यामुळे चरित्रलेखकांना आणि एकूणच इतिहासकारांना आपल्या स्वत:च्या काळावर मात करावी लागते. आपल्या काळाला विसरून गतकालात प्रवेश करावा लागतो. गतकालीन चरित्रनायकाच्या मनात प्रवेश करणे, हे ऐकायला चांगले वाटत असले तरी ते एवढे सोपे नसते. खरे तर शक्यही नसते. ‘परकायाप्रवेश’ हा शब्द तसा आलंकारिक अर्थाने घेणेच उचित ठरते. गतकालात प्रवेश करणे मात्र काही प्रमाणात नक्कीच शक्य असते. वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांच्या आधारे आपण त्या काळाची पुनर्रचना करू शकतो आणि त्या काळात वावरणारी माणसे कसे वागत असतील, याची कल्पना त्या माणसांच्या मनोव्यापारावरून नव्हे तर त्या काळाच्या ज्ञानावरून (आपणही त्यांच्यासारखीच माणसे असल्यामुळे) करू शकतो. प्रधान आणि भागवत जणू याचप्रकारे आपल्या काळाचे ओझे खांद्यावरून खाली उतरवून ‘टिळकांच्या काळातील बौद्धिक वातावरणात’ जगले म्हणून त्यांची शंका गेली, भीती गेली व एका चांगल्या चरित्रग्रंथाची सिद्धी त्यांच्या हातून होऊ शकली.

ते असे का करू शकले असतील, याचे एक स्पष्टीकरणही त्यांच्याच प्रास्ताविकातून मिळू शकते. ‘‘आधुनिक महाराष्ट्राचे राजकीय तत्त्वज्ञ दिवंगत आचार्य शं.द. जावडेकर यांच्या मार्गदर्शनाचा असामान्य लाभ आम्हाला झाला. त्यांनी आमच्या बुद्धीला चालना दिली, आमच्या काही मूल्यधारणांमध्ये दुरुस्ती केली, आणि टिळक व त्यांचा काळ याबद्दल एक परिप्रेक्ष्य विकसित करायला आम्हाला मदत केली.’’

‘आधुनिक भारत’ लिहिणाऱ्या आचार्य जावडेकरांना एक व्यापक आणि ऐतिहासिक आकलनशक्ती होती. टिळकांकडून गांधींकडे आलेली आणि त्यासाठी सावरकरांना नाकारणारी काही उच्चवर्णीय मांडणी महाराष्ट्रात होती, त्यांच्यात जावडेकर महत्त्वाचे होते. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे, स.ज. भागवत अशी नावेही घ्यावी लागतात. या मंडळींचे वैशिष्ट्य यशवंतराव चव्हाणांच्या आठवणीच्या आधारे सांगता येते. गांधी व सावरकर यांच्या विचारांची समीक्षा करताना सावरकरांवर कठोर टीका करणारी ही मंडळी सावरकरांच्या ‘कमला’सारख्या काव्याचे रसग्रहण तितक्याच तन्मयतेने व सहृदयतेने करीत. जावडेकरांनी या दोन लेखकांच्या ज्या मूल्यधारणांमध्ये सुधारणा, दुरुस्ती केली त्यांचा संबंध त्यांच्या बुद्धिवादी व समाजवादी मूल्यधारणांशी असणार हे निश्चित. आणि त्याचबरोबर ‘टिळक आणि त्यांचा काळ याबद्दल एका परिप्रेक्ष्याचा विकास’ तितक्याच महत्त्वाचा मानायला हवा. त्यामुळे हे लेखक आपल्या काळाच्या बंधनातून मुक्त होऊन टिळकांच्या काळात प्रवेश करू शकले.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मी सांगतो त्या मुद्द्याचे प्रत्यंतर घ्यायला चरित्राचे पहिले प्रकरणसुद्धा पुरेसे व्हावे. टिळकांच्या बालपणाकडे लेखकांनी लक्ष वेधले आहे. बालपणी टिळकांवर सर्वाधिक प्रभाव टाकून गेलेल्या संकल्पना व ठसे उमटवून गेलेल्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल. या संकल्पनांनी त्यांची मनोरचना घडली आणि त्यांच्या नंतरच्या आयुष्यातील पुस्तकं, माणसं व घडामोडींचं मूल्यमापन करण्यासाठीचे मानदंड त्यांना त्या काळात मिळाले. त्यांच्या विचारांना विशिष्ट दिशा मिळण्यामागे तारुण्यातील मैत्रीसंबंधाची उल्लेखनीय भूमिका होती. यातून त्यांच्या पुढील कृतीची वाटही स्पष्ट झाली.

मैत्रीसंबंधांनी लेखकांना अर्थातच गोपाळ गणेश आगकरांबरोबरची मैत्री प्रकर्षाने अभिप्रेत आहे. ‘‘तत्कालीन समस्यांना दोघांनीही परस्परांहून भिन्न प्रतिसाद दिला. बालपणातील त्यांच्यावर पडलेले भिन्न प्रभाव, त्याचप्रमाणे त्यांच्या भिन्न स्वभाववृत्ती यामागची मुख्य कारणे होत.’’

पण हे झाले प्रतिपादनाचे सार. चरित्रकार पुरेसा तपशील पुरवायला चुकत नाहीत. त्यासाठी त्यांनी १९५६ पूर्वी उपलब्ध असलेल्या जवळपास सर्व साधनांचा उपयोग करून घेतला आहे. त्यात न.चिं. केळकर यांचे त्रिखंडात्मक टिळक चरित्र तर केंद्रस्थानी असणार, यात शंका नाही. इतर लहान-मोठी उपलब्ध चरित्रंही त्यांनी तपासली होती. आणि सर्वांत मुख्य मुद्दा म्हणजे टिळकांचे निकटवर्ती अनुयायी स. वि. बापट यांनी तीन खंडांमध्ये संग्रहित केलेल्या टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिकांचाही त्यांनी योग्य तेथे उपयोग करून घेतला आहे. (हे तिन्ही खंड नुकतेच परममित्र प्रकाशनाने पुनर्मुद्रित केले आहेत.)

याच ठिकाणी अनुवादकाच्या जागरूकतेचे उदाहरण पहावयास मिळते. टिळकांच्या स्पष्टोक्तीमुळे व तोडून बोलण्याच्या स्वभावामुळे त्यांचे त्यांच्या महाविद्यालयीन स्नेह्यांनी वाल्टर स्कॉट यांच्या ‘केनिलवर्थ’ या कादंबरीतील ‘ब्लंट’ या पात्राचे नाव पाडले होते. असे पूर्व चरित्रकारांनी नोंदवले आहे. खरे तर हे पात्र मुळात Blunt नसून Blount आहे. मराठी चरित्रकारांनी ‘ब्लंट’ असे छापल्यामुळे प्रधान-भागवतांनी प्रस्तुत इंग्रजी चरित्रात हे नाव Blunt असे छापले. अनुवादक डोंगरे यांनी मात्र मुळातील साधने तपासून ते उच्चाराबरहुकूम ‘ब्लाऊंट’ असे असण्याची दुरुस्ती वाढीव टिपांमध्ये केली आहे.

तत्कालीन परिस्थिती, महापुरुष आणि त्यांच्या कल्पना यांचा टिळकांवर कसा परिणाम झाला, याचे सूक्ष्म विश्लेषण करताना इतर चरित्रकाराप्रमाणे हे लेखकद्वय चिपळूणकरांना अवास्तव महत्त्व देताना दिसत नाहीत. उलट इतरांनी ज्यांना टिळकांचे (किंवा टिळकांना त्यांचे) प्रतिस्पर्धी मानून कमी महत्त्व दिले, त्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या टिळकांवरील प्रभावाला प्रधान-भागवत अधोरेखित करतात. बरोबरीने ते दादाभाई नवरोजी यांनाही योग्य ते स्थान देतात. चिपळूणकरांनी भले लोकांचा स्वाभिमान चेतवला असेल आणि त्या लोकांमध्ये टिळकांचाही समावेश असेल; परंतु सांविधानिक आंदोलनाची वाट आधीच कोणी तयार करून ठेवली असेल तर ती रानड्यांनी, असे प्रधान-भागवत यांचे निरीक्षण आहे आणि ते योग्यच आहे.

मात्र याच स्थानी लेखकांचा आगरकरी कलही स्पष्ट होताना दिसून येतो. टिळकांनी रानडे-आगरकरांचा श्रद्धाभाव आपल्यात येऊ दिला नाही, याची नोंद घेताना त्यांना टिळकांवरील आगरकरांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. वस्तुतः हा काही आगरकरांचा प्रभाव नसून टिळक आणि आगरकर या दोघांवरील मिल-स्पेन्सरचा संयुक्त प्रभावाचा भाग आहे. टिळक-आगरकर यांचा पुढील विकासक्रम असेच सांगतो की, टिळक या प्रभावातून बाहेर पडले, पण आगरकर पडू शकले नाहीत. टिळक  मिल-स्पेन्सर यांना ओलांडून पुढे जातात, आगरकर जात नाहीत. ते गेले असते तर कदाचित टिळकांच्या प्रभावामुळे असे म्हणण्यास जागा झाली असती. त्यामुळे ‘‘आगरकरांच्या प्रभावामुळेच टिळकांनी आत्ममुक्तीच्या संकल्पना आणि मानवतेच्या नि:स्वार्थी सेवेची इहवादी संकल्पना यांचा संयोग साधला असावा,’’ हे चरित्रकारांचे विधान अतिशयोक्त आहे. हा संयोग टिळकांनी साधला, हे खरेच आहे. पण तो भगवत्‌गीतेच्या प्रभावामुळे, आगरकरांच्या नव्हे.

आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगरकरांनी ज्या पाश्चात्त्य ग्रंथांचे वाचन केले होते, त्या सर्व ग्रंथांचे वाचन टिळकांनी केले होते, उलट टिळकांनी भारतीय परंपरेतील जेवढे ग्रंथ वाचले होते, तेवढे आगरकरांनी वाचले नव्हते. आमची मूळ प्रकृती म्हणजे भारतीय आर्यत्व न सोडता आम्हाला पाश्चात्त्य सुधारणांचा स्वीचार करायचा आहे, असे जरी अगरकर म्हणत असले तरी भारतीय आर्यत्व म्हणजे नेमके काय, हे सांगण्याइतपत त्यांची तयारी तेव्हा झालेली नव्हती हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच एवढ्या प्रतिज्ञेच्या पलीकडे जाऊन काही स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नसावा.

आणि आणखी एक मुद्दा सांगावयाचा झाल्यास मिल-स्पेन्सर यांचा प्रभाव हा त्या काळात स्वाभाविक व सार्वत्रिक होता. सुशिक्षित तरुणांमध्ये तर तो युगधर्म बनला होता. बंगालमध्येही अशीच परिस्थिती होती. या दोघांची महत्त्वाच्या बहुतेक पुस्तकांची भाषांतरे मराठी भाषेत झाली होती. भाषांतरकरामध्ये धों.के. तथा अण्णा कर्वे या तरुणाचाही समावेश होता. अण्णा स्त्रीशिक्षणाकडे वळले ते याच प्रभावामुळे.

३.

टिळकांच्या पूर्वायुष्यातील शाळेची स्थापना, ‘केसरी’- ‘मराठा’ पत्रांची सुरुवात या घटनांचा पुरेसा उहापोह करून लेखक करवीर छत्रपती प्रकरणात दोघांना झालेल्या शिक्षेचीही चर्चा करतात. मग येते ती डी.ई. सोसायटीतील भाऊबंदकी. पण ही भाऊबंदकी एकटी येत नाही. तिला जोडूनच ‘केसरी’- ‘मराठा’ पत्रांमधील भाऊबंदकी आहे आणि तिचे संदर्भ तेव्हा घडत असलेल्या सामाजिक संघर्षात रुतलेले आहेत. या दोन्हींचा परामर्श लेखकांनी तेव्हाच्या उपलब्ध साधनांचा पुरेसा वापर करून घेतला आहे. त्यातील काही अज्ञात मुद्दे नंतरच्या काळात डॉ. य.दि. फडके यांनी प्रकाशात आणले.

टिळक आणि आगरकर यांच्यातील वादाचे विवेचन करीत असताना लेखकांनी टिळकांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बालविवाहाच्या समस्येमधील सरकारी हस्तक्षेपाला टिळकांचा विरोध असला तरी त्यांनी ‘बालविवाहाच्या व्यवस्थेचे समर्थन कधीच केले नाही. उलट या व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम होत असल्याचे मान्य केले,’’ हे ते आवर्जून सांगतात. याउलट या वादात टिळकांबरोबर आलेल्या मंडळींना ‘‘बालविवाह प्रतिबंधक कायद्याला असलेला टिळकांचा विरोध तेवढा मंजूर होता. ही मंडळी कट्टर रूढीवादी होती. त्यांना स्थितिशील अवस्था टिकून राहायला हवी होती, ही वस्तुस्थिती आहे. टिळकांनी बालविवाहाचा जोरकसपणे धिक्कार केला असता आणि स्वत:ची भूमिका निसंदिग्धरीत्या मांडली असती तर त्यांना तेव्हा मिळाला तसा सनातनी लोकांचा पाठिंबा मिळाला नसता.’’

लेखकांचे वाक्य पूर्ण करायचे असेल तर त्यात घालावी लागणारी भर अशी- आणि सनातनी नसणाऱ्या लोकांनी त्यांना तेव्हा पाठिंबा दिला नसता. म्हणजे आपण परत त्याच पेचात अडकतो. सामाजिक सुधारणांची निकड वाटणारी मंडळी राजकीय स्वातंत्र्याच्या बाबतीत तितकी उत्साही नव्हती. आणि राजकीय स्वातंत्र्य हवे असणारी मंडळी सामाजिक सुधारणांच्या बाबतीत तितकी उत्साही नव्हती. आता ही परिस्थिती काही टिळकांनी निर्माण केली नव्हती. ती होती आणि ती मान्य करूनच आपली वाट निर्माण करावी लागणार होती. आणि भले प्रधान-भागवत म्हणतात त्याप्रमाणे टिळकांनी आपली भूमिका नि:संदिग्धरीत्या मांडली नसेल, त्यांची या संदर्भातील कृती पुरेशी बोलकी होती. टिळकांनी आपल्या मुलींची लग्ने सनातत्यांना मान्य असलेले वय उलटून गेल्यावर लावली आणि त्यांना पुरेसे शिक्षणही दिले.

डेक्कन सोसायटीमधील वाद आणि टिळकांचा राजीनामा हे प्रकरण लेखकांनी अत्यंत नाजूकपणाने हाताळले आहे. ‘‘या टप्प्यावर टिळकांच्या आचरणात व उपदेशात अंतर्विरोध दिसत असला तरी, पूर्णत: शैक्षणिक कार्यासाठी समर्पित करून घेण्याच्या तत्त्वावर त्यांची खरोखरीच श्रद्धा होती हे मान्य करायला हवे.’’

टिळकांनी सादर केलेल्या राजीनामा पत्राबद्दलचे लेखकांचे मतही असेच चिंतनीय आहे.‘‘हे निवेदन केवळ तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या कायदेतज्ज्ञाने केलेल्या युक्तिवादापुरते मर्यादित नाही. एका आदर्शवादी व्यक्तीच्या श्रद्धेची हेलावून टाकणारी अभिव्यक्ती त्यात आहे.’’

याच काळातील टिळकांच्या सहसा दुर्लक्षित कृतीकडे ‘उल्लेखनीय’ म्हणून लक्ष वेधण्याचे काम प्रस्तुत चरित्रग्रंथ करतो. ‘‘ड्युक ऑफ कनॉट भारतात आले असता टिळकांनी सैनिकी प्रशिक्षणाची संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. त्यांच्या प्रस्तावाला ड्युकने मंजुरी दिली आणि प्रस्तावित सैनिकी शाळेचे नाव ड्युक वरून असावे या सूचनेवरही सहमती दर्शवली.’’ या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली नाही, हा भाग वेगळा. मुद्दा असा आहे की, देशाला खरोखरंच स्वातंत्र्य मिळाले तर त्याच्या रक्षणासाठी प्रशिक्षित सैन्य बळाची उणीव नसावी, या दूरदृष्टीने टिळक विचार करीत होते.

आगरकरांविषयी विशेष सहानुभूती असूनही लेखकांनी टिळकांना जास्तीत जास्त समजून घेऊन जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे. आगरकर आदर्शवादी होते आणि टिळकांची धाटणी अधिक वास्तवाभिमुख होती हे त्यांचे तुलनात्मक मत योग्य वाटते. ‘‘टिळकांना स्वतःची ऊर्जा राजकीय प्रश्नांवर केंद्रित करायची होती आणि देशाच्या तत्कालीन परिस्थितीचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा घेतला तर टिळकांची चतुर व्यवहारबुद्धी समर्थनीय ठरते!’’ हा त्यांचा या संदर्भातील निवाडा आहे.

४.

‘टिळकांच्या राजकीय जीवनामध्ये लक्षणीय विकास दिसून येतो’ हे लेखकांचे निरीक्षण मला महत्त्वाचे वाटते. हा विकास असेही दाखवतो की, टिळकांनी आपल्या व्यक्तित्वाला कधीही ‘फॉसिल’ बनू दिले नाही. ते परिस्थितीशी सतत संवाद करीत, तिला प्रतिसाद देत राहिले. (प्रधानांच्या या मताचाच पुढे य.दि.फडके यांनी आणखी विस्तार केलेला दिसून येतो.) येथे लेखकांनी आपला मुद्दा सशस्त्र क्रांतिकारकांच्या संदर्भात स्पष्ट केला आहे. स्वातंत्र्यासाठी तळहातावर शीर घेऊन हिंसाचाराचा अवलंब करणाऱ्या देशभक्त तरुणांना आणखी उचकावण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. ते स्वत: बहुसाधनवादी असल्यामुळे हिंसेच्या मार्गाला तत्त्वत: मुदलातच त्याज्य व अनैतिक मानत नाहीत. मात्र अशा प्रकारच्या सशस्त्र क्रांतीसाठी पुरेशी तयारी नसताना पतंग दिव्यावर झेपावत आत्माहुती देतो, तसे हौतात्म्य पत्करायला ते मान्यता देत नसत. अशा प्रकारच्या फुटकळ असंघटित कृत्यांनी काही विशेष साधणार नाही, हकनाक बळी मात्र जातील. म्हणून ते असे काही करू इच्छिणाऱ्यांचा हिरमोड करीत असले तरी संघटित स्वरूपाच्या क्रांतीचे प्रयत्न त्यांना मान्य होते व अशा प्रयत्नांना त्यांनी बळ दिले असल्याचेही मानले जाते. तथापि सद्य:स्थितीत अशी क्रांती घडवून आणता येणार नाही, या वास्तवाची त्यांना जाणीव होती. गीतेतील, ‘दैवं चैवात्र पंचमम्‌ हा सिद्धांत त्यांना पुरतेपणी ठाऊक होता. आणि तरीही पन्नास टक्के तयारी झाली तर उरलेल्या पन्नास टक्क्यांसाठी दैवावर अवलंबून राहण्याचा धोका पत्करायची त्यांची तयारी असे. पण अर्थात अशी तयारी नाही हेही त्यांना समजत होते. ‘साधनाम्‌ अनेकता’ हे त्यांनी हिंदू धर्माचे एक लक्षण मानले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीलाही हे लागू होते अशी त्यांची धारणा होती. गांधींचा व त्यांचा मतभेद होता तो याच संदर्भात. गांधी निरपवाद निरपेक्ष अहिंसेचे पुरस्कर्ते मानले जात. टिळक साधनसापेक्षता मानीत. आणि त्यामुळे त्यांचा गांधींच्या सत्याग्रहरूपी अहिंसात्मक मार्गाला विरोध असण्याचे कारण नव्हते. साध्याने साधनाचे समर्थन करता येते हा नैतिक मुद्दा व त्याला धरून साधनाची निवड करता येते. पण ही निवड करताना भोवतालच्या परिस्थितीचाही विचार करावा लागतो. परिस्थिती हे साधनाचे व्यावहारिक समर्थन झाले. गांधींचे या संदर्भातील विचार कान्ट या जर्मन नीतीवेत्त्याच्या निरुपाधिक आदेशासारखे वाटतात.

प्रस्तुत ग्रंथ जरी चरित्रात्मक असला आणि चरित्रग्रंथामध्ये चरित्रनायकाच्या कृतींवर भर देण्यात येत असला तरी चरित्रकारांनी त्यांच्या वैचारिक भूमिकेच्या चर्चेला पुरेशी जागा दिली आहे. विशेषत: टिळकांच्या नीतिशास्त्रीय भूमिकेला. गीता हे नीतिशास्त्र असून तिची मांडणी पाश्चात्त्य नीतिशास्त्राच्या चौकटीत व परिभाषेत करायला हवी, या भूमिकेतून टिळकांनी ‘गीतारहस्य’ लिहिले. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

या ग्रंथात टिळकांच्या ज्ञानसाधनेची व ग्रंथकर्तृत्वाची पुरेशी चर्चा करण्यात आली आहे. टिळक हे जरी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेते मानले जात असले तरी राजकीयदृष्ट्या पाहिले असता, त्यांचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय होता. आणि नैतिकदृष्ट्या विचार केला तर तो वैश्विक होता, असेही लेखक सुचवतात. टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढा हा जागतिक स्वातंत्र्यलढ्याचा भाग मानला व त्या पद्धतीनेच आशियाई राष्ट्रांकडे पहिले हे ते निदर्शनास आणतात.

योगायोगाने मला टिळकचरित्र लिहिण्याची संधी मिळाली असल्यामुळे, टिळकांवरील बहुतेक साधनग्रथांचे वाचन मी केले आहे. त्यावरून निश्चितपणे असे म्हणू शकतो की, भागवत-प्रधानांचा प्रस्तुत चरित्रग्रंथ वेगळ्या आणि स्वतंत्र भूमिकेतून लिहिला आहे. त्यामुळे त्याचे स्थान अबाधित आहे. दुसरे असे की, त्यांनी टिळकविचारांचे विवेचन करताना आंतरराष्ट्रीय भूमिकेतून व आशिया खंडाला केंद्रस्थानी ठेवून केले आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीतही ते उपयुक्त ठरेल.

एका दर्जेदार चरित्रग्रंथाला केवळ तो इंग्रजी भाषेत असल्यामुळे मराठी वाचक मागील ६५ वर्षे त्याला वंचित झाला होता. ही उणीव प्रस्तुत भाषांतरामुळे आता भरून निघाली आहे. त्यासाठी अनुवादक आणि प्रकाशक यांना पुनश्च धन्यवाद.

‘लोकमान्य टिळक’ - ग. प्र. प्रधान - अ. के. भागवत,

साधना प्रकाशन, पुणे

पाने - ६२०, मूल्य - ६०० रुपये

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......