‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’ आणि ‘पधारो म्हारो देस’ या साहित्यकृतींतील अनुभव घेण्याची आणि अनुभव आविष्कृत करण्याची पद्धत स्वतंत्र वाट चोखाळणारी आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजशेखर शिंदे
  • ‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’ आणि ‘पधारो म्हारो देस’ या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 23 July 2021
  • ग्रंथनामा शिफारस रणधीर शिंदे Randhir Shinde मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा MadhyaPradeshci Sahityayatra विष्णू पावले Vishnu Pavle पधारो म्हारो देस Padharo Mharo Des

प्रवासवृत्ती

साहित्य अकादमी, नवी दिल्ली ही संस्था भारतीय भाषांतील साहित्यनिर्मितीला पोषक वातावरण निर्माण करण्याचे, आंतरभारतीचे स्वरूप समजावून सांगण्याचे प्रयत्न अव्याहतपणे करत असते. लेखकाच्या उदयोन्मुख काळात अनुभवाचा परीघ पसरत जाऊन व्यापक व्हावा, आपला देश-प्रदेश लेखकाने नीट न्याहाळावा, प्रादेशिक भाषा-संस्कृतींचा परिचय करून घ्यावा म्हणून तरुण लेखकास ‘प्रवासवृत्ती’ (Traveler Grant) देते.

मराठीत १९८०पासून बऱ्याच मराठी तरुण लेखकांस साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती मिळालेली आहे. मागील दशकात प्रा. रणधीर शिंदे (प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि विष्णू पावले (कोल्हापूर) यांना ही प्रवासवृत्ती मिळाली होती. अकादमीच्या नियमानुसार आजवर झाले तसे अहवाल सादर केल्यानंतर रणधीर शिंदे यांनी प्रवासाच्या अनुभवावर छोटेखानी पुस्तक लिहिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विद्यार्थी असलेल्या विष्णू पावल्यांनीही पुस्तक लिहिले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

प्रवासाच्या अनुभवातील अनन्यत्व अंतर्गत आणि बहिर्गत अशा दोन्ही स्वरूपातील असते. बहिर्गत अनुभव हे स्थळाशी, प्रसंगांशी, घटनांशी, वस्तू-वास्तू या दृश्यमान रूपांतून येतात. त्याचे शरीरमनावर काही प्रभाव जाणवतात. अंतर्गत अनुभव मनाशी निगडीत असतात. मन दृश्यमानता आणि स्मृती अशा दुहेरी दृश्यपटलावर असते. एक प्रत्यक्षातील, दुसरे स्मृतितील – मनःपटलावरील. या दोन दृश्यांत मनलंबक दोलायमान असतो. समोरील दृश्यमानता स्मरणपटलावरील दृश्यमानतेत समानता शोधण्यात मन गुंतलेले असते. याचा प्रत्यय ‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’ आणि ‘पधारो म्हारो देश’ या दोन्ही पुस्तकांतून येतो.

मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा

‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाच्या शीर्षकात ‘साहित्ययात्रा’ हा शब्द योजून यात्रेची मर्यादा आणि यात्रेचे स्वरूप साहित्यापुरते निश्चित केले असल्याचे स्पष्ट सूचित केले आहे. आशय-अनुभवाचे स्वरूप वर्णनपर आहे. रोजनिशीत दिवसभरातील गोष्टी नोंदवून ठेवल्याने नंतर त्या नोंदींवर संस्कार करून ‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’ हे पुस्तक तयार झाले आहे. या नोंदी वस्तुनिष्ठ झालेल्या आहेत. स्वतःला आणि इतर अनुभवाला मिटवून केलेल्या या नोंदी आहेत. त्यात एकूण साहित्ययात्रेचे आखीव-रेखीव नियोजन ध्यानात येते. लेखकाने प्रवासवृत्तीच्या प्रयोजनाच्या पूर्ततेशी स्वतःला बांधून घेतल्याचेही स्पष्ट होते. लेखक साहित्ययात्रेला निघेपर्यंत दहा वर्षे प्राध्यापकी आणि अभ्यासू समीक्षक म्हणून नावारूपाला येऊ लागलेले होते. मोठ्या विद्यापीठातील प्राध्यापक असल्याचे वलय नावापुढे होते. याचा एक फायदा या साहित्ययात्रेच्या दरम्यान झाला.

२४ नोहेंबर ते ०६ डिसेंबर २०१७ या काळातील ‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा' म्हणजे रेखीव प्रवासनोंदी. नव्हे एकंदर प्रवासही आखणीनुसारच, कुठेही गोंधळ न होता, शोधकतेने व्यक्ती-संस्था शोधत केलेली ही साहित्ययात्रा आहे. ग्वाल्हेर, भोपाल, इंदौर, उज्जैन, देवास या शहरात चंद्रकांत देवताले, शशिकांत सावंत, राजेश जोशी, उदयन वाजपेयी, संगीता गुदेचा, सनत्कुमार व्यास, चंद्रप्रसाद  मौर्य, कमलाकर चोचके, कुंदा जोगळेकर, अर्पणा पाटील, केशव कान्हेरे, गणेश मतकर, सतीश यांच्याकडून ‘मेहमाननवाज़ी’ अनुभवली.

यात बरीच मराठी नावे दिसतात. ही मंडळी मध्य प्रदेशात गेली आणि तिथेच स्थिरस्थावर झाली. बहुतेक मराठी माणसांकडून लेखकाला दुहेरी फायदा झाला. तो असा की, या मराठी लोकांकडून मध्य प्रदेशाच्या सांस्कृतिक जीवनाची चांगली ओळख करून घेता आली. त्यासोबत मराठी भाषा व साहित्याविषयीही त्यांची मते, त्यांची वाङ्मयाभिरूची आजमावता आली. तसेच तेथील लोकांची कलाभिरूची, कलासक्ती जाणून घेता आली. मध्य प्रदेशाच्या सांस्कृतिक जीवनात भर घालणार्‍या, सांस्कृतिक उंची वाढवणाऱ्या शिंदे पॅलेस, ग्वाल्हेर किल्ला, भगवान - महावीरांचे कोरीव शिल्प, भारत भवन, तुकोजी होळकर महाल, शिंद्यांची छत्री, गोपालकृष्ण मंदीर, होळकर संस्थान, भारत भवनातील ‘वागर्थ’मधील हस्तलिखिते, मासिके, चित्रप्रदर्शन (कालिदास संग्रहालय - भारत भवन), कमल सरोवर यांचाही आस्वाद घेता आला. या सार्‍यांतून सांस्कृतिक अन्वय शोधण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसतो.

१. भोपाळमधील ‘भारत भवन’ हे भारताचा आणि मध्य प्रदेशाचा सांस्कृतिक वसा जपण्याच्या दृष्टीची निशाणी झाली आहे. साहित्य, नाटक, चित्र, शिल्प आणि संगीत या शाश्वत कला जपणारी आणि त्यांचे संवर्धन करणारी संस्था म्हणून भारत भवनकडे पाहिले जाते. या भवनाचे लेखक अत्यंत बारकाईने निरीक्षण करताना दिसतो. भारत भवनाच्या ‘वागर्थ’ विभागात देशविदेशातील श्रेष्ठ अशा कवींच्या पांडुलिपीतील - हस्ताक्षरांतील कविता पाहून लेखकाला ते कवी तिथे असल्याचा भास होतो. भारत भवनातील ‘रुपंकर’ या आदिवासी लोककलासंग्रह विभागात गौड, मंडला, वारली, खैरागड या आदिवासी अभिजात चित्रशैलींचा प्रभाव आणि मुरलीधरन, डी.जे. जोशी, सुधीर पटवर्धन, मनजित बावा, गुलाब मुहमद शेख, रामचंद्रन, प्रभाकर बारवे, अपर्णा कौर, सय्यद हैदर या जगदविख्यात चित्रकारांच्या मूर्त-अमूर्त शैलीतील चित्रांचा प्रभाव पडतो आणि तिथल्या तिथे लेखकाला रसग्रहण करावेसे वाटते. चित्रे मनात इतकी रुतून बसतात की, सर्वत्र जणू चित्रेच दिसायला लागतात. भेटायला आलेल्या प्राध्यापक बाईचे चित्र अल्पशब्दांत  रेखाटले आहे : “दूरवरूनच येताना दिसल्या. लगेच लक्षात आल्या. लाल रंगाचा लांबवर फुलाफुलांचा झब्बा, रंग गोरा, उंच बांधा सडसडीत, डोळ्यांत काजळ, कानात डुलणारे कर्णपूल.” रुपंकर विभागातील प्रख्यात चित्रकारांच्या चित्रांपेक्षा ईश्वराची ही चित्राकृती लेखकाला जरा जास्त भावलेली दिसते!

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७

..................................................................................................................................................................

२. चौकसबुद्धी, बारीक नजर आणि बोलण्यात आतुरता असेल तर प्रवाश्याला अनुकूल असे बरेच घडते. ग्वाल्हेर चौकात माधव महाविद्यालय दिसले म्हणून आत जाऊन बंद पडलेल्या मराठी विभागाची माहिती घेणे, कल्याणकर नावाच्या शारीरिक शिक्षणसंचालकाकडून शहरातील मराठी संस्था, मराठी माणसे यांची माहिती घेणे, हे उत्सुकतेपोटी घडते. प्रवासी सतत उत्सुक असला पाहिजे. यामुळे ग्वाल्हेरमध्ये अरविंद धारप चालवत असलेलल्या अभिनव विद्यामंदिर शाळेत मराठी संस्कृतीची आठवण म्हणून धारपांनी वर्गखोल्यांचे शिवाजी, रामदास, सावरकर असे नामकरण केल्याचे नमूद केले आहे. प्राचीन अभारतीय प्रवासी भारतात येऊन अशी कुठे कुठे दडलेल्या नोंदी प्रवासग्रंथात करून ठेवल्या आहेत. त्याच वृत्तीचे काहीसे दर्शन ‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’मध्ये घडते.

३. जाणकाराने हेतुपुरस्सर केलेल्या प्रवासाला काही अंशी आंतरभारतीचे रूप येते. त्याने पुढल्या पिढीतही सलोख्याचे संबंध निर्माण होतात. म्हणून असा प्रवास आंतरभारतीच्या विणेतील एक धागा बनतो. इंदौरमधील डॉ. देवीप्रसाद मौर्य यांची भेट आंतरभारतीचा एक धागा जोडणारी आहे. ते गणिताचे प्राध्यापक आणि वेदोपनिषदाचे गाढे अभ्यासक. भारतीय जीननशैलीचा, धर्मशास्त्राचा, ईहवादी तत्त्वज्ञानाचे मिथक, कल्पनेचे सामग्र्याने ध्यास घेणाऱ्या मौर्यांचे आ. ह. साळुंखे यांच्याशी सौहार्दपूर्ण नाते आहे. ज्या ज्या लेखक-लेखिकांना सदर लेखनाने भेटले ते सर्वजण लेखकांशी पर्यायाने महाराष्ट्राशी, शिवाजी विद्यापीठाशी, जोडले गेले. अरविंद धारपांच्या कार्याची माहिती त्यामुळे होऊ शकली. इंदौरच्या सनत्कुमार व्यासांचे गोदुताई परुळेकर, नारायण सुर्वे, सतीश काळसेकर, अविनाश सहस्त्रबुद्धे यांच्याशी घरोब्याचे नातेसंबंध  होते. हे सर्व टाके प्रदेशाला प्रदेश आणि अंतर्गत दोन वेगळ्या शैलींना जोडणारे  ठरतील.

४ . रसिकता हा एक महत्त्वाचा विशेष या प्रवासनोंदीत आहे. शिस्तशीर समीक्षकाची विमर्शादृष्टी डोळ्यांत भरणारी आहेच, शिवाय अनेक गोष्टी आस्वादण्याची रसिकता लेखकाच्या ठायी आहे. रसिकतेमुळे प्रवासनोंदी गद्याला लालित्याचे अंगही आले आहे. शिक्षकी पेशाला आणि संशोधनचतुर ‘डोळ्याला’ चुकवून मध्य प्रदेशाने आपल्या थंडाईचे विरजन लावलेच! त्या प्रसंगाचे अतिशय प्रत्ययकारी वर्णन केले आहे. उज्जैनस्थित डॉ. शशिकांत सावंतांकडे उतरल्यावर सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडून अकराच्या सुमारास दूध, गुलाबी द्रव्यगाळ आणि मेंदीरंगाच्या ओल्या गोळ्याचा छोटासा तुकडा असे मिसळून केलेली थंडाई सर्वजण घेतात पाहून लेखकालाही प्यावीशी वाटते. ती थंडाई घेऊन सावंतांच्या घरी गेल्यानंतर मनःस्थितीचे केलेले चित्रण : “शरीर हलके तरंगल्यासारखे भासत होते. सबंध देहात हलकीशी संथ मंद थरथर लहरत होती. सबंध घर छतासह उंच वर्तुळाकार झोके घेत होते. ही वर्तुळे आपल्याला मध्यभागी ठेवून वेगाने घुमवत होती. पाळण्यात सतत झुलल्याचा भास होत होता. उंच कड्यावरून जमिनीकडे वाऱ्याच्या झोताबरोबर तरंगतो आहोत, त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या‍ लाटा थडथडत आहेत, हृदयाचे ठोके वाढले, शरीरातील रक्त थयथय करू लागले” यासह अनेक खाद्य पदार्थांचे, बसमधून दिसणाऱ्या शेतांझाडांचे, पिकांचे, माणसांचे सुंदर ललितपूर्ण वर्णने आहेत.

पधारो म्हारो  देस

‘पधारो म्हारो देस’ हे काव्यात्म शीर्षक ‘पोएटिक जस्टिस’ सूचित करते. नुकताच एम.ए. झालेला आणि एक कवितेचे पुस्तक व काही कथा प्रकाशित असलेला लेखक म्हणजे विष्णू पावले. रणधीर  शिंदे यांचा एम.ए.चा विद्यार्थी. अर्धवेळ बेकार असणारा, बुजरा आणि नोकरी धड नसल्याने ओळख देण्याचा न्यूनगंड असलेला हा तरुण लेखक वेगळा प्रदेश, वेगळी माणसे, स्थळे न्याहाळण्यासाठी बाहेर पडतो. लेखकांच्या भेटगाठीसाठी निघालेला, निश्चिततेचा अभाव, तयारीचा मागमूस नाही. राजस्थानी साहित्याचा दांडगा अभ्यास आणि ग्रहपूर्वग्रह असे काहीही नसलेले कोरे मन अगदी वाट फुटल्याप्रमाणे राजस्थानमध्ये चौदाएक दिवस संचार करतो. लेखकांच्या भेटीगाठी हा राजमार्ग सोडूनही जमेल तसे कोठेही जाऊन पाहणे आणि परत आपण कशासाठी आलो आहेत, हे मनाला समजावून सांगत प्रवास करणारा हा नवलेखक मंदिरांना भेट देणे प्रवासवृत्तीत बसत नाही, असा समजही करून घेतो. ठरवून न करता समोर दिसते म्हणून पाहत जाणे, या स्वभावामुळे संवेदनशील मन अधिक विभोर झालेले दिसते.

‘पधारो म्हारो देस’ या पुस्तकास रूढ संकल्पनेनुसार प्रवासवर्णन म्हणता येईल, परंतु प्रवासवर्णनापेक्षा प्रवासकथन म्हणणे सयुक्तिक आणि योग्य वाटते. या पुस्तकात लेखकाच्या अनुभवाचा भाग बराचसा आहे. कथनान घडलेल्या हकीकतीचे कथन असते. तसे कथनात वर्णनात्मकतेचाही भाग असतोच. जे पाहिले, भावले त्याचे वर्णन केले जाते. आणि कथनात घटिते आणि स्वानुभव यांच्या अनुषंगाचे सांगणे असते. हे पाहता ‘पधारो म्हारो देस’ पुस्तकास प्रवासकथन संबोधणे योग्य वाटते.

‘पधारो म्हारो देस’ म्हणजे आतिथ्याचे आवतन. हे राजस्थानी लोकगीतातील एक चरण आहे. ४ जानेवारी ते १५ जानेवारी २०१४ या मधील दिवसांचे राजस्थानच्या प्रवासाचे कथन यामध्ये आहे. राजस्थान साहित्य अकादमी, भारतीय लोककला मंडळ, प्रतापसिंह स्मारक मोती मगरी (उदयपूर), राणी पद्मिनी किल्ला, फत्तेसिंह संग्रहालय (चित्तोडगड), केंद्रीय विश्वविद्यालय, अजमेर प्रेस क्लब, अजमेर पोस्ट ऑफिस, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा (जयपूर) या संस्थास्थळांना आणि दीपक जोशी, के. के. शर्मा, प्रमोद भट्ट, कवी रामदयाल मेहरा, महेंद्र भाणावत, भगवतीलाल व्यास (उदयपूर), अब्दुल जब्बार बासरिवादक रामेश्वरलाल पांडे, रमेश मयंक, शिवमृदुल, पत्रकार भुवनेश व्यास (चित्तोडगड), माणिकराव साळुंखे (के विश्वविद्यालय, अजमेर), हेतू भारद्वाज, गोविंद माथूर, विजय नारायण चित्रे, उमा, संपादक दुष्यंत (जयपूर), अशा लेखक-लेखिका-कवी यांना भेटी दिल्या, त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला. असंख्य माणसांशी, त्यांच्या स्वभावाची जानपेहचान झाली. या साऱ्या व्यक्ती, प्रसंगघटनांच्या हकीकतीचे कथन सुरम्य, सुललित केले आहे.

१. हे कथन ‘स्व’ शी संवाद करत, ‘स्व’चे  निवेदन देत साकारलेले आहे. बोलीत म्हणजे बोलत बोलत एखाद्या घटनेचे सर्वार्थाने साद्यंत कथन करणे शक्य होते. तसे कथन इथे झालेले दिसते. ‘स्व’शी संवाद, आत्मनिवेदन, पूर्वससूरींच्या पूर्वावार वेगवेगळ्या शैलींचे उपयोजन, यामुळे या कथनाला अद्भुत असे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक प्रसंगात नाट्यकाव्य आणि कथाकाव्य यांचे मिश्रण दिसते. कथकाच्या कथनबोलीत चिरेबंदी, सुघड आणि प्रौढ मराठीचे वळण दिसते. ही कथन परंपरेची तंत्रे आहेत. त्यांचे अतिशय बेमालूम उपयोजन कथकाने केले आहे.

या प्रवासकथनात अप्रतिम वर्णने आहेत. कल्पिताचे वर्णन करणे सोपे असते. परंतु दृश्याचे वर्णन करणे कठीण. वस्तू, मनःपूत सौंदर्य आणि शब्द यांचे पद्मबंध झाले की वर्णनात जिवंतपणा येतो. वर्णनासाठी परंपरेतील रूढ पोवाडा, महानुभावी बोली, अभंग ओवी, कथा आणि लोकलयींचे उपयोजन केले आहे. कथकाच्या भाषाजाणिवेत हे सारे मुरलेले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

प्रवासाच्या सुरुवातीला मुंबईत मित्राकडून फुटपाथवरच्या म्हातारीची कथा ऐकली. आक्राळविक्राळ  पसरलेल्या महानगरात काय घडते याचे वर्णन पोवाडाच्या आशयकथन शैलीत केले आहे : “फूटपाथवर एक म्हातारी एकटीच राहणारी. तिच्या सारखेच दुसरे दोन भणंग तरुण तिच्याजवळ. त्या भणंगांची ती माँ बनली. ती देईल तेवढं खात. म्हातारीचा पोटमारा व्हायचा. एक दिवस दोघांनी ढोसली. त्यांना नसती बुद सुचली. त्यांची सूद सांडली. त्यांनी म्हातारीला मारली. आळीपाळीने त्या देहाशी संग केला.” छोटी छोटी वाक्ये, त्यातील ठाशीवपणा आणि जिव्हाळ्याला हात घालण्याची पद्धत पोवाड्यातील आहे. पोवाडाकथनाची आंतरलय या कथनात आहे. स्वातंत्र्यसैनिक विष्णू बाळा यांच्या शिवारातीलच असल्याने विष्णूबाळा यांच्या चरित्रकथनाचा पोवाडा ऐकत लहानाचा मोठा झालेल्या लेखकाच्या मनावर पोवाड्याचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे पोवाड्याची लयसंगती अनेक प्रसंगवर्णनात आहे.

अनेक ठिकाणच्या वर्णनात प्रसन्न प्रासादिकता आणि राणीवपणा जाणवतो. राजस्थानच्या पहिल्या दर्शनाच्या वर्णनात प्रसन्नता खुलवलेली आहे : “राजस्थानच्या भूमीत ‘पहिलं पाऊल ठेवलं!’ एव्हाना सूर्य नारायणानं आपली बाळपावलं टाकायला सुरुवात केली. तांबड्या किरणाचं हसू राजस्थानच्या भूमीला खुलवायला लागलेलं आणि या भूमीचा झालेला नेत्रस्पर्श अंतरी सुखावत होता. दूर फार दूर एका पहारावर चित्तोडगडवरला विनयस्तंभ इतिहासाची कीर्तिगाथा काळाच्या छाताडावर कोरत उभा होता!” वर्णनामध्ये कोमल शब्दांची खैरात आणि सुरेख कल्पनांची दिलखुलास उधळण झालेली आहे.

राजस्थान लोककलामंडळातील रंगपांचालिक खेळाचे (बाहुल्या) वेगवेगळ्या बाजारहाटांचे, गडांचे, जैनमंदिरांचे, रिक्षावाल्यांचे, ऐतिहासिक स्थळावरील बघ्यांचे, वेगवेगळ्या शहर-गावांचे फार सुंदर वर्णने केले आहे. माधोपूरच्या बाजारात उंटाच्या कातडीचे बूट खरेदी करताना विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील चकमकीचे अत्यंत प्रत्यकारी वर्णन आहे. त्यांमधील नाट्य ‘रडू’ – विक्रेता, ‘कडू’ - खरेदीदार या दोघांतून दाखवले. चित्तोडगडाचे पद्मिनी राणीच्या किल्ल्याचे, फरसबंदीचे, तिथल्या माकडांचे, विजयस्तंभाचे, पाणीव्यवस्थेचे वर्णन अगदी चित्ररेखाटनाप्रमाणे दिसते.

चित्तोडगडाच्या बुरुजाच्या तटालगतच्या झाडाचे वर्णन महानुभावीय शैलीत आहे : “तटालगत वनराई. त्यात एक तांबूसलाल आणि पांढरी लव असलेला निष्पर्ण वृक्ष... नि:संग गोसावियाचे रूप घेऊनिया वनी : आरक्तलाल : साकाळली रक्तरंगी पर्णे धारण करूनिया दुसरा : एक : जैसा पाहाता लो अलग : एक आरकत : एक विरक्त : झाडे : जैसे भावबंद : कोणी  दबा धरून : कोणी हसे : एका झाडाचा शेंडा झोका घेई : पाही : तो वानर बैसलासे : पुढे विशाल भूदेश: मग बरे.” अशा वैविध्यपूर्ण कथन, वर्णनशैलीमुळे प्रवासकथन अत्यंत रोचक, सुरस झाले आहे.  

२. या कथनात कथकाच्या निरतिशय प्रांजळ स्वभावाचे स्वच्छ चित्र उमटलेले आहे. कथकाचे निर्विकार मन ‘स्व’शीच संवाद साधत असल्याने ‘स्व’ला कथनात आणले. ‘स्व’चा झाडा घेणे कथकाला अगत्याचे, आवश्यक वाटले. कथकाने स्वतःवर नर्मविनोद केले आहेत. विनोदासह परप्रदेशात स्वतःवर गुदरलेल्या संतापजनक गोष्टी सांगायला संकोच केलेला नाही. हा कथकाच्या मनाचा मोठेपणा उजळता झालेला आहे. उदयपूरला के. के. शर्मा यांच्याशी संवाद साधताना प्रश्नच आठवेनात. तेव्हा के. के. शर्मा मुलाखतीला येण्यापूर्वी प्रश्न काढून यायला पाहिजे होते, ही खरी सुनावतात. ते त्याला मान्य होते. कथकाच्या स्वभावात नुसते दुर्मुखलेपणच नाही तर संकोचीपणा, आदरभावाची अनाठायी वृत्ती, यामुळे दबून जाण्याचे प्रसंगही आहेत. उदयपूरमध्ये महेंद्र भाणावत महोदय औद्धत्यपूर्ण वाक्ताडन करतात. चितोडगडला तर शिवमृदुला, अब्दुल जब्बार हे प्रतिभावंत घरी आलेल्या (मृदुलांच्या) तरुण पाहुणा लेखकाच्या चारित्रावरच प्रश्न उपस्थित करू लागतात : “कोई मुसाफिर लगता हैं। ऐसाही कहीं दिन काँट रहाँ होगा। याकी हमारे किताबें लेकर वहाँ अपनी भाषा में अपने नामपर छपवाने का इरादा तो नहीं उसका? किंतु हमारी रचनाएँ क्यों मांग रहाँ है वह?” 

कवी अब्दुल जब्बार - “मुझेही ऐसाच लग रहा है।”

शिवमृदुल (शिवमृदुल श्री गिरीधरीलाल टेलर) - “दोहपर को इसके पास पुरा पैसा भी नहीं था। दिनभर भुखा रहाँ है।”

या दुड्डाचार्य प्रतिभावंतांनी चारित्र्यावरच हल्ला चढवल्यानंतर मराठी भाषेची, मराठी माणसांची अस्मिता जपण्यापाठी शेपटाची करवत उभी करतो, “नागाच्या शेपटीवर पाय पडला होता आणि अखेर मीही  नागाच्या भूमीत राहणारा! बत्तीस शिराळ्यातलं स्फुल्लिंग काही अंशी पाठकण्यात! मग मी झिटीतच साहित्य अकादमीनं जाहीर केलेल्या प्रवासवृत्तीचं पत्र त्या दोघांच्या पुढ्यात धरलं. शिवमृदुलजी नरमाईनं म्हटले, ‘गलत मत समझिये |’ तेवढ्यावरच त्यांची तहान भागली नाही. पुन्हा प्रश्नांची घागर आडात टाकली : ‘मग तुझ्या कविता म्हणून दाखव. सादर केलेल्या तुकड्यांचा हिंदीमध्ये आशय समजावून सांग’. मी सांगितला. ‘अरे, हा कच्चाबच्चा नहीं हैं’ अशी अपूर्व स्निग्धता शिवमृदुलजींच्या चेहऱ्यावर पसरली.”

३. थोरामोठ्यांना भेटून त्यांच्याकडून अमृतकण शोधत असताना शांतपणे सामान्यांच्या कृतीकडे पाहत स्वतःत तो व्यापकत्व घेण्याची, शोषण्याची आतल्या आत धडपड दिसून येते. शिवमृदुलांनी घरी शंका घेऊनही पोटभर जेऊ घातले. म्हणून त्यांच्या सौभाग्यवतींच्या पायावर डोकं टेकवून त्या बाईतील अबोल, अव्यक्त घेण्याचीच ती कृती. के.के. शर्मांनी ‘तोंडानं पाणी प्यायलास तरी काही हरकत नाही, आमच्याकडे शिवताशिवत पाळत नाहीत’, असे म्हटल्यानंतर राजस्थानने महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंना सोडले नसल्याची आठवण होते. महर्षी जयपूरच्या दौऱ्यावर असताना एका ब्राह्मणाने त्यांना सोवळे नेसायला लावून मोरीजवळ बसवून भोजन दिले होते. स्पृश्यास्पृश्यता राजस्थानमध्ये अजूनही चालते, हा अनुभव दलितत्वाच्या विद्रोहाची कारणे तरुण लेखकास अंतर्मुख करणारी ठरली.

राजस्थानमधील मराठी मंडळाकडून काही जाणून घेण्यासाठी लेखकाने अजमेरच्या मराठी मंडळाच्या व्यवस्थापक शोभा खानापूर यांना सतरांदा फोन लावूनही त्यांनी फोन उचललाच नाही. जयपूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या विजय नारायण पित्रे यांच्या अनुभवाची तऱ्हा आणखी वेगळीच. मकर संक्रमणाच्या दिवसी महाराष्ट्र मंडळाला भेट दिली. पित्र्यांनी येऊन मंडळाची काही जुजबी माहिती दिली. म्हणाले, “पावले, तुम्ही जयपूरला यायला चुकीचा दिवस निवडला. आज तुम्हांला सणांमुळे कुणीच गाठ पडणार नाहीत. तुम्हाला चहा द्यायचा होता, पण चहागाडीवाला आज सणामुळं आलाच नाही. चला, घरी पाहुणे आले आहेत, त्यांच्यासोबत थांबायला हवं”, म्हणून निघून गेले. जयपूरला कुलगुरूंच्या निवासस्थानी शिवाजी विद्यापीठातील इंग्रजी दोन प्राध्यापक भेटतात. ते दोघे आपला विद्यार्थी इतक्या लांब काय करायला आला आहे, ही साधी चौकशी करण्याची तसदी न घेता निघून गेले. ‘गैरोंने अपनाया, अपनोंने सजा दी’ असेच.

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू नि आता केंद्रीय विद्यापीठाचे (राजस्थान) कुलगुरू असणाऱ्या प्रो. माणिक साळुंखे सर या प्रवाश्याला आपुलकीने जवळ करतात. इथे राहून बाकीचा प्रदेश फिरून घेण्याचे सांगतात. जयपूर शहरातील लेखक-कलावंतांची नावे सांगून त्यांना भेटण्याचेही सुचवतात.  

४. ‘स्व’ शी संवाद आणि ‘स्व’चे निवेदन ही या कथनाची अपूर्वता आहे. यामुळे ‘पधारो म्हारो देस' हृदगताचे जाणि हृदयतेचा स्पर्श झाला आहे. ‘स्व’शी संवाद आणि ‘स्व’चे आत्मनिवेदन गद्य–पद्य  दोन्ही रूपात आहे. उदयपूरला भगवतीला व्यासांचे घर प्रसिद्ध अशा बोहरा मस्जिदीजवळ असूनही सापडायला उशीर झाला, तेव्हा लेखकराव व्यास चिडून म्हणाले, “आपको आना हैं तो आ जाओ। नहीं तो चले जाव।” या आदेशावरचा ‘स्व’शी झालेला संवाद - “गार गार बोलानं झाला पंत ठार. सोडून जाण्यासारखं केलं काय? आत्माराम पुन्हा उठला पेटून. शिराळचा शेषशायी जागा सोडून. आता जवळ उरलं काय? आपलेच पाय आपलेच पाय! तहान नाही भूक नाही. चहाचीही तल्लफ नाही. महाराष्ट्राला पुन्हा तोंड नाही. अकादमीत होईल बोंब. खडून टाकले जातील कोंब. ‘तुम युवक हो या और कोई? असं का म्हणाले व्यासजी? मन आले निश्चयासी. ‘घ्यायचीच!’ पुनः पुन्हा म्हणालो. पहाडवरल्या निमची माते पाव गं! आंबामाते धाव गं!” हा आत्मसंवाद इकडे तिकडे पत्ता विचारण्यापेक्षा-  ‘मन झाले ग्वाही, मनियले नाही बहुमता’ असा कृतनिश्चय होण्याचा, बुजरेपणावर आघात करण्याचा आहे .

अजमेरचा पीर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीला चादर न पांघरताही पावल्याची आत्मानुभूती आल्याची सांगितले आहे. मुसलमान बांधवांसारखे नमाज अदा करताना मध्यमवयस्क बाईच्या उरोजाला हात लागला. त्या बाईनं एक क्षण डोळ्यांत बघितलं. ‘‘आता आपलीही कारण नसताना इथंच कबर  बांधली जाणार... छाती धडधडली. होऊ नये ती चूक अनाहूतपणे घडली. क्षणात डोळ मिटलं. ओठांची हालचाल होईलसं पुतपुतणं मान ठेवलं. काहीतरी दुवा मागत असल्याचा तो फक्त भास... खैर डोळ उघडलं, तर ती स्त्री दर्शन घेताना माझी भावना वासनेत रूपांतरीत झाली नव्हती म्हणून हा दुर्धर प्रसंग टळला. ख्वाजाजी इथंच पावले असते...” या निवेदनात पापभिरूपतेची भावना प्रकट झालेली आहे.

कथ्थक नवसर्जनाचा ध्यास घेणाऱ्यातला आहे. रोजच्या रोज -दिसामाजी काहीतरी लिहावे, या वृत्तीचा आहे.  सर्जनाला झाकोळाची अवस्था येते, तेव्हा मन अस्वस्थ होते. सर्वत्र  शांतता असूनही ती  लाभदायी ठरेनासी होते. केंद्रीय विद्यापीठ (बांद्रा – सिंद्री) त्याच्या विस्तीर्ण आवरातील घनगंभीर शांतताही खायला उरते. कवितेतून ‘स्व’ - शोध घेऊ लागतो : “मग हमंतुमनं लिहू लागलो। आटली  आटली बुद्धी गोठली।… थांबलो थांबलो भांवावलो।। रमेना गमेना मन। आलो इथे कशाकारणा।.... काय करू। काय करू काय।। आला तसा गेला दिस। बसुन काढला खास। काही वाटेना जीवास। काय करू काय।। आत्मशोधासाठी करू काय?” हा प्रश्न अस्वस्थ करताना दिसतो मग अलगदपणे एकेक पान बाजूला सारून काट दिसू लागते.

परतीचा प्रवास सुरू झाला. कथकाला सुचलेल्या ओळी या संपूर्ण प्रवासाचे मावंदं घातल्यासारखेच आहे. लेखकाने किती माणसे पाहिली? केवढी गर्दी? मुंबई, रेलप्रवासी, उदयपूर, चित्तोडगड, जयपूर अजमेर, ख्वाजा चिश्ती, पद्मिनी महाल, विद्यापीठ, अनेक लेखकांची घरे या सर्वांपासून मिळालेले भालेबुरे अनुभवांनी समृद्ध झालेले सश्रद्ध मन “आगा तुचि धन्य । माझा पांडुरंग | मानवी अंतरंग ।दाखविले || --- मज व्यापकत्व। ऐसा अमृतानुभव। उद्धारी माझे कूळ। दृढ एकमात्र।--- काय दिव्य घुटी। अनुभव पेज | लाभो निर्व्याज। मायपण।।” सर्वसाक्षी ईश्वराशी साधलेला हा आत्मसंवाद आहे.

या आत्मसंवादात साहित्य अकादमीने दिलेल्या प्रवासवृत्तीची परिणती काय? फलश्रुती कशात झाली हाही आत्मशोधही घेतला आहे. त्या पंधरवड्याची फलश्रुती स्वतःत आलेल्या व्यापकत्वात दिसून येते- “मज कळो आले | जगाचे जीवन | हा अनुभव । दिव्य ऐसा’

५. या प्रवासकथनाच्या बोलीभाषेला प्रसन्न परिमळाचे मृदूल रूपडे लाभले आहे. सुंदर प्रमाणभाषा  याहून वेगळी नसतेच. अर्थपूर्ण, आशयघन, अनवट अशा शब्दांची लयलूट अगदी खैरात झालेली आहे. कथनाची नित्याची बोली वाटले. कितीतरी प्रसन्न, सुंदर सुकुमार शब्द मनान भरतात. ‘येसंसरी’ (यशस्वी ), ‘दाळकांड’, ‘नेत्रमुजारी’, ‘गाधनेत्री’, ‘सूर्यास्तमान’, ‘किनाट’, ‘सूर्यनारायणची बालपावलं’, ‘साजावा’, ‘साजिवंत’, ‘दिलविता’, ‘दिलदर्या’, ‘आबूट शब्द’, ‘नित्रास’, ‘वायगोळा’ (वायुगोळ), ‘पाटानं पाय बांधले’, ‘कुलपत चालणे’, ‘सुखसाळ’, ‘यवनचाळ’, ‘मायेचा चांदवा’, ‘अंडं भुरळलं’, ‘दगडांधता’, ‘चाळबाळे’, ‘रंगाहारी’, ‘ऱ्हायलेतो’, ‘लाव्हसरणी’,‘खोडगील’, ‘वर्गसोबत’, ‘सशेगाद’, ‘आरक्षणाचं ताम्रपट’ (रीझर्व्हेशन-रेल्वेचे), ‘खरवीज’ (खरवस), ‘बत्तरबाळ्या’, ‘घंगऱ्या’, ‘अनुभूतीचं परिष्कणकरण’, ‘हौसेनं लूक बदलला’, असे कितीतरी शब्द अवघ्या १५७ पृष्ठांत सापडतात.

हे कथन असल्याने बोलीतील आवेगही ध्वनित केला आहे : कदमदरकदम - गुमास्ता ‘चरणचाल’, ‘ओळखपत्रानागगावअमुकतमूलवडालसूण’, ‘सूटबूटटायहायफाय’ असे एका श्वासातील, एका दमातील सामासिक शब्दरूपे बोलीचे प्रवाहीपण दाखवतात. यामुळे एक प्रकारची लयसुद्धा साधली आहे. तिला ‘आवेगी लय’ म्हणता येईल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

प्रवासामुळे त्यांच्या जीवन आकलनात, दृष्टीकोनात त्या नंतर झालेल्या बदलाबाबत लेखक सांगतो – “साहित्य अकादमीच्या या प्रवासवृत्तीनं मला माझी जागा दाखवली. अहंमतेचा धुंदुर्मास विरला. माणूस समजून घ्यायचा परीघ विस्तारला. या एकांतानं गांभीर्याला गर्भ ऱ्हायला. लेखनासाठीच्या एकाग्रतेचं माहात्म्य मनात मुरलं. सर्जनासाठी अधिकचं बळ मिळालं. लिहिणाऱ्यानं कान आणि डोळं उघडं ठेवून वावरावं हे समजलं. आपल्याला आकळतं त्याप्रमाणं लिहावं आणि जमिनीवर पाय ठेवायला शिकवलं. आपल्याबी ‘पल्याड’ माणसं, साहित्य, संस्कृती, समान असतात हे कळालं. नाहीतर मी उनाडपणातच उंडारलो असतो. पुढारपणातच वहावलो असतो.” (पधारो म्हारो देस, १५७)

सारांश, ‘मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा’ आणि ‘पधारो म्हारो देस’ या साहित्यकृतींतील अनुभव घेण्याची आणि अनुभव आविष्कृत करण्याची पद्धत स्वतंत्र वाट चोखाळणारी आहे. कथनात प्रांजळपणा आणि चोखंदळपणा आहे. या दोन लेखकांनी प्रवास करून मराठी भाषेची, मराठी माणसांची विश्वासार्हता वृद्धिंगत करून दोन प्रदेशांना भाषासंस्कृतीला उजाळा देत जोडून घेतल्याचे या कथनांमधून स्पष्ट दिसते. एका अर्थाने साहित्य अकादमीचा उद्देश या लेखकद्वयांनी सफल केला आहे.

..................................................................................................................................................................

मध्यप्रदेशाची साहित्ययात्रा - रणधीर शिंदे

ब्लॅक पब्लिशर्स, सोलापूर,  एप्रिल २०१५

.............................................................

पधारो म्हारो  देस - विष्णू पावले

अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे,  २०२० 

..................................................................................................................................................................

लेखक राजशेखर शिंदे सोलापूरच्या डी.बी.एफ. दयानन्द कला व शास्त्र महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.

srajshekhar215@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......