गुलाबाला ‘गुलाब’ म्हटलं काय किंवा ‘काटेकोरांटी’ वा ‘कोबी’ म्हटलं काय, त्याचा सुगंध बदलत नाही. पण माणसांच्या बाबतीत मात्र असं सहसा होत नाही! (उत्तरार्ध)
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 19 July 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध Doctrine of Coverture ऑनमॅस्टिक्स Onomastics ऑर्थोनिम Orthonym स्युडोनिम Pseudonym

शब्दांचे वेध : पुष्प एक्केचाळिसावे

आजचे शब्द : निकनेम, पेट नेम, बुगो नेम, आणि पॅरेकबेसिस

'What’s the use of their having names,’ the Gnat said, ‘if they won’t answer to them?’

‘No use to them,’ said Alice; ‘but it’s useful to the people who name them, I suppose. If not, why do things have names at all?’

सुप्रसिद्ध आंग्ल लेखक Charles Dodgson उर्फ Lewis Carroll याच्या ‘Through the Looking-Glass’ या कादंबरीतलं हे उद्धृत आहे. नाव घेऊन हाक मारल्यावरही जर कोणी ‘ओ’ म्हणत नसेल तर त्याच्या नावाचा उपयोगच काय, असा प्रश्न चिलटाला पडतो. त्यावर अ‌ॅलिस म्हणते की, त्याला आपल्या नावाचा उपयोग नसेलही, पण ज्यानं ते नाव दिलं, त्याला त्याचं महत्व वाटत असेल. असं नसतं तर वस्तूंना, प्राण्यांना, जागांना, माणसांना नावं दिलीच कशाला असती?

नावांचा महिमा अपार आहे, हे आपण या लेखाच्या पूर्वार्धात मागच्या वेळी पाहिलं. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून वेगळी आहे, हे अधोरेखित करण्यासाठी नाव किंवा नाम दिलं जातं. पण वस्तूंना आणि प्राण्यांना असलेली नावं आणि माणसांना दिलेली नावं यांच्यात अंतर आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पहिल्या प्रकारची नावं सामान्य श्रेणीत येतात. मनुष्यांची नावं ही विशेष नामांच्या प्रकारात येतात. वस्तूंना आणि प्राण्यांना माणसानंच नावं दिलेली आहेत. (‘बायबल’नुसार प्राण्यांना नावं देण्याचं काम देवानं पहिला मानव अ‌ॅडमवर सोपवलं होतं.) पण खरी बात अशी आहे की, बकरीला बकरी म्हणा किंवा डुक्कर, तिला स्वतःला त्यानं काही फरक पडणार नाही. कारण तिला हे माहीतच नसतं की, ती बकरी आहे. ते आपल्याला ठाऊक असतं. माणसांच्या नावांत मात्र असं करता येत नाही. ज्याचं जे नाव आहे, त्याच नावानं तो ओळखला जातो आणि नावात बदल केला तर त्याला त्याचा फरकही पडतो. ‘माधव’ला तुम्ही ‘माधवी’ नाही म्हणू शकत.

व्यक्तीवाचक म्हणजे पर्सनल नावांची सुरुवात कशी आणि नक्की का झाली, हे ठामपणे सांगता येत नसलं तरी आपण तर्क करू शकतो. मानवी समाज जसा जसा उत्क्रांत होत गेला आणि गुफा मानवानं कात टाकली, तसतसं नागरीकरण होऊ लागलं. आपण सगळे प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत आणि आपली जात मानव आहे, हे एकदा कळल्यावर एका मानवाला दुसऱ्या मानवापासून वेगळं दाखवायला व्यक्तीवाचक नावांची लेबलं किंवा ओळखवाचक टॅग तयार झाले, आणि कालांतरानं जगभरच्या सर्व मानवी समाजांमध्ये ही पद्धत रूढ झाली. देश वेगळा, भाषा वेगळी, धर्म वेगळा, रीतीरिवाज वेगळे, पण नामकरणाची परंपरा सगळीकडेच सापडते.

प्रत्येक नावाला काही तरी अर्थ असतो - काही नावं निरर्थकही असू शकतात. फक्त त्या नावाचा ध्वनी (उच्चार) आवडला म्हणूनही काही नावं आजकाल दिली जातात. आपल्या मुला-मुलींना नाव देताना सध्याच्या काळात पालकांना खूप विचारही करावा लागतो. नाव चांगलं आणि वेगळं तर हवं, पण त्यामुळे पुढे त्या मुलाला त्रासही व्हायला नको, हे त्यांना लक्षात घ्यावं लागतं. कोणतेही केशव कर्वे आताच्या जमान्यात आपल्या मुलाचं नाव ‘धोंडो’ असं ठेवणार नाहीत. शाळा-कॉलेजात सवंगड्यांच्या नावांवर खूप विनोद केले जातात. एखाद्याचं पहिलं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव यांच्या आद्याक्षरांवरून जर काही अजब, हास्यास्पद, किंवा असभ्य अशा अर्थाचा शब्द किंवा उच्चार तयार होत असेल तर त्याला चिडवायचा, त्याची थट्टा करायचा हा चान्स शाळेतली टारगट मुलं अजिबात सोडत नाहीत. अशी किती तरी उदाहरणं आपल्याला माहीत असतात.

मकरंद अशोक देव असं नाव असलेल्या मुलाला त्याच्या इंग्रजी स्पेलिंगच्या आद्याक्षरांवरून ‘MAD’ असं टोपणनाव मिळतं. एकाचं नाव त्याच्या संस्कृतप्रेमी पालकांनी मोठ्या हौशीनं ‘लघ्वेंद्र’ (लघु+इंद्र) असं ठेवलं होतं. मित्रांच्या गराड्यात तो बिचारा शाळा सुटेपर्यंत ‘लघव्या, लघवी’ या नावानं ओळखला जात होता. H. E. Bates या इंग्रजी लेखकाप्रमाणं ज्या ज्या इंग्रज-अमेरिकन मुलांचं आडनाव बेट्स असतं, त्याला शाळेत ‘मास्टर’ हे टोपणनाव मिळतंच मिळतं. (कारण त्यातून masturbates म्हणजे तो हस्तमैथुन करतो, असा अर्थ ध्वनित होतो.)

अशा या चित्रविचित्र नाव-आडनावांच्या मिश्रणांमुळे लहान मुलांना काय काय मानसिक क्लेष सहन करावे लागतात, यावर शेल सिल्वरस्टीन नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन कवीनं लिहिलेली ही विनोदी कविता वाचा. यात सू नावाच्या मुलाचं मनोगत सांगितलं आहे. सू हे सुझन (Susan) या मुलीच्या नावाचं छोटेखानी रूप आहे. या मुलाच्या वडिलांनी तो मुलगा असूनही त्याचं नाव सू ठेवलं होतं आणि त्याचा त्याला जन्मभर त्रास झाला. (पुढे हीच कविता जॉनी कॅश या गायकानं गाण्याच्या स्वरूपात नावारूपाला आणली.) हा सू म्हणतो -

My daddy left home when I was three

And he didn’t leave much to Ma and me,

Just this old guitar and an empty bottle of booze.

Now, I don’t blame him cause he run and hid,

But the meanest thing that he ever did

Was before he left, he went and named me “Sue”!

Well, he must’ve thought that it was quite a joke

And it got a lot of laughs from lots of folk.

It seems I had to fight my whole life through.

Some gal would giggle and I’d get red

And some guy’d laugh and I’d bust his head.

I tell you, life ain’t easy for a boy named “Sue”!

 

Well, I grew up quick and I grew up mean;

My fist got hard and my wits got keen.

I’d roam from town to town to hide my shame.

But I made me a vow to the moon and stars

That I’d search the honky-tonks and bars

And kill that man that gave me that awful name.

(उर्वरित कडवी वाचण्यासाठी या दुव्याला भेट द्या- http://holyjoe.org/poetry/shel2.htm

जॉनी कॅशच्या गाण्याचं रेकॉर्डिंगही याच ठिकाणी उपलब्ध आहे.)

‘बेट्स’ला ‘मास्टर’ हे टोपणनाव जसं मिळालं, त्याचप्रमाणे लाखो इतर टोपणनावं जगभरात दिली जातात. काही टोपणनावं विनोद निर्मितीसाठी असतात, काही एखाद्याला खिजवण्यासाठी (बहुधा त्याच्या काहीतरी शारिरीक व्यंगावरून) दिली जातात, काही समोरच्याच्या एखाद्या लकबीवरून किंवा वैशिष्ट्यावरून दिली जातात. बरीच टोपणनावं प्रेमानं पण दिली जातात. मग हळूहळू ही टोपणनावंच प्रचलित होतात आणि त्या व्यक्तीचं मूळ नाव मागे पडतं. जाड भिंगाचा चष्मा लावणाऱ्याला ‘सोडा वॉटर बॉटल’, साधा चष्मा लावणाऱ्याला ‘भोकन्या’ किंवा ‘ढापण्या’, लठ्ठ मुलाला ‘ढेरपोट्या’, ही नेहमीची परिचित उदाहरणं आहेत.

गुन्हेगार, चोर भामट्या लोकांमध्ये अशी टोपणनावंच जास्त चालतात. दिवाकर नेमाडे या नावाचे एक रहस्यकथा लेखक होऊन गेले. त्यांच्या कथांमध्ये अशा प्रकारची टोपणनावं असलेली अनेक (काल्पनिक) गुन्हेगार मंडळी आहेत. त्यातली संत सखू नावाची एक बाई मला फार आवडायची. मुंबईच्या फोरास रोड, गोलपीठा, कामाठीपुरा या भागात कुठे तरी गांजा, चरस, भांग अशा नशिल्या वस्तू विकण्याचा तिचा एक कुप्रसिद्ध अड्डा होता.

पी. जी. वुडहाऊसच्या एका कादंबरीत ‘सूप स्लॅटरी’ (Soup Slattery) नावाचा निष्णात तिजोरीफोड्या आहे. त्याच्या कार्यपद्धतीवरून त्याला सूप हे टोपणनाव मिळालं होतं. पोलीस किंवा पोलिसांचे खबरेसुद्धा या चोरमंडळींना त्यांच्या टोपणनावांनीच ओळखतात.

स्युडोनिमलाही आपण टोपणनावच म्हणतो, पण ती खरं तर टोपणनावांपेक्षा वेगळी असतात. स्युडोनिम म्हणजे कृतक नाव. ते आपलं आपण धारण करतो. टोपणनावं ही दिली जातात. दुसरा कोणीतरी ती देतो. शाळेतल्या बहुतेक सर्व शिक्षकांना मुलं टोपणनावांनी ओळखतात. आणि वर्षानुवर्षं ती वरपासून खालपर्यंत सगळ्या मुलांमध्ये पसरत जातात. ते शिक्षक निवृत्त झाल्यावरही त्यांची तीच ओळख कायम राहते. माझी शाळा संपून आज जवळपास पन्नास वर्षं झाली आहेत. पण आम्ही जुने शाळकरी मित्र जेव्हा एकत्र येतो, तेव्हा आमच्या शिक्षकांची आठवण त्यांच्या टोपणनावांनीच काढतो. यात अनादर अजिबात नसतो, कुचेष्टाही नसते. खरं तर पुन्हा कधीच परत न येणाऱ्या भूतकाळातल्या सुखद क्षणांना केलेला तो प्रेमाचा सलाम असतो!

या अशा टोपणनावांना इंग्रजीत ‘निकनेम’ (nickname) म्हणतात. यासाठी hypocoristic name किंवा moniker असे पर्यायी शब्ददेखील वापरले जातात. आपल्या मुलांना त्यांच्या खऱ्या नावानं हाक न मारता अनेक आईबाप टोपणनावांनीच बोलवतात. दिनकर उर्फ भाऊ, प्रभाकर उर्फ बाबू, लक्ष्मण उर्फ तात्या, अरविंद उर्फ बाळ, यासारखी लाडाची अनेक नावं माझ्याच कुटुंबात आहेत. अनेकदा नावांचं संक्षिप्त रूप केलं जातं. यात रॉबर्टचा ‘बॉब’ होतो, मार्गारेटची ‘मेग’ होते, मनालीची ‘मना’ होते आणि अनिरुद्धचा ‘अना’ होतो. ही सगळी लाडाची नावं म्हणजे ‘पेट नेम्स’ (pet names) आहेत. ही hypocorism ची उदाहरणं आहेत. प्राचीन ग्रीक भाषेत ὑποκόρισμα (hypokorisma) म्हणजे 'to call by pet names' किंवा लाडक्या नावानं हाक मारणं. स्थूल अर्थानं ही निकनेम्सच आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘निकनेम’ या शब्दाची व्युत्पत्ती मजेशीर आहे. याचा मूळ अर्थ ‘जास्तीचं नाव’ असा होता. १३०३पासून तो वापरात आहे. पण त्या वेळी त्याचं स्पेलिंग ekename असं केलं जायचं. Eke या शब्दाचा अर्थ ‘सुद्धा’, ‘जास्तीचा’, ‘भर पडणं’, असा होतो. आता E या स्वरानं तो सुरू होतो, म्हणून त्याच्याआधी an हे आर्टिकल लागतं- An ekename. पंधराव्या शतकात त्याचं ‘a nekename’ असं स्वरूप तयार झालं. या प्रकाराला भाषाशास्त्रात ‘misdivision of the syllables’ असं म्हणतात.

आपल्या नेहमीच्या वापराच्या ‘एप्रन’च्या स्पेलिंगमध्ये देखील असंच परिवर्तन झालेलं आहे. मुळात हा शब्द ‘napron’ होता आणि त्याच्या आधी a हे आर्टिकल लागायचं. पुढे misdivision of the syllables मुळे a napron चं an apron झालं. अशी अनेक उदाहरणं इंग्रजीत आहेत. कालांतरानं या nekename च्या स्पेलिंगमध्ये बदल झाला आणि nickname हे स्पेलिंग प्रचलित झालं.

बंगालीभाषिकांमध्ये तर लाडाच्या नावांना फार महत्व आहे. जवळपास प्रत्येक बंगाली व्यक्तीला खऱ्या नावाव्यतिरिक्त एखादं पेटनेम असतं. खऱ्या नावाला ते लोक ‘भालो नाम’ (चांगलं नाव) म्हणतात, तर लाडाच्या नावाला ‘डाक नाम’ म्हणतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं डाक नाम ‘पोल्टू’ असं होतं. रवींद्रनाथ ठाकुरांना ‘रोबी’ म्हणत. सत्यजीत राय हे ‘माणिकदा’ या नावानं प्रसिद्ध होते. अनेकदा ही डाक नावं हास्यास्पददेखील असतात. त्यामुळे आपलं डाक नाम सांगायला बरेच लोक संकोच करतात. टुल्टुल, पोंचू, भोडाई, मॅमॉनी, खोका, पुचकी, लाल्टू, गुल्ली… ही अशी मजेशीर डाक नावं फक्त बंगाली लोकच ठेवू शकतात.

जपानमधल्या ‘बुगो’ (Bugō) नावांची वेगळीच कहाणी आहे. जपान हा देश मार्शल आर्ट्स (निःशस्त्र युद्ध कला)साठी प्रसिद्ध आहे. ही स्वसंरक्षणासाठी वापरली जाणारी कला आहे. ज्युडो, कराटे यासारखे अनेक असे कलाप्रकार तिथे पूर्वापार चालत आले आहेत. या कलांमध्ये पारंगत असलेल्या लोकांची ओळख त्यांच्या खऱ्या नावांऐवजी ‘बुगो’ नावांनी करून दिली जाते. बु म्हणजे मार्शल (युद्धसदृश) आणि गो म्हणजे नाव. जपानी लिपीत लिहिलेल्या या (मला तरी अगम्य असलेल्या) नावांचं मराठीकरण या लेखात करणं शक्य नाही.

प्राचीन रोमन साम्राज्यातही टोपणनावांची प्रथा होती. तिथल्या कोणत्याही व्यक्तीला तीन नावं असत. त्यातलं तिसरं नाव म्हणजे हे टोपणनाव. त्याला ते ‘कॉग्नोमन’ (cognomen) म्हणायचे. पुढे यातला ‘टोपण’ हा भाव निघून गेला आणि मग सरसकट ही सगळी तिसरी नावं आडनावं म्हणून प्रचारात आली.

आपल्याकडे उर्दू, हिंदी, पंजाबी आणि फारसी भाषेत लिहिणारे कवी एखादं ‘तख़ल्लुस’ नाव धारण करतात. हादेखील टोपण नावांचाच प्रकार आहे. आपल्या शायरीत ते या तख़ल्लुसचा नाममुद्रेसारखा वापर करतात. हा शब्द अरेबिक भाषेतला असून त्याचा खरा अर्थ मुक्त होणं किंवा सुरक्षित होणं असा होतो. ही आहे काही सुप्रसिद्ध तख़ल्लुसधारी कवींची नामावली -  मिर्झा असदुल्ला खान ‘ग़ालिब’,  फैज़ अहमद फैज़ ‘फैज़’, अल्ताफ हुस्सेन ‘हाली’, सिकंदर अली मोरादाबादी ‘जिगर’, बहाद्दुर शाह ‘ज़फर’, मीर तकी ‘मीर’.

व्यक्तींच्या टोपणनावांसारखीच टोपणनावं जागांनाही देण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ, नागपूरला ‘ऑरेंज सिटी’ म्हणतात आणि न्यू यॉर्कला ‘बिग अ‌ॅपल’. मला वाटतं एवढं नामपुराण पुरे झालं!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आजचा पस्तुरी किंवा lagniappe शब्द आहे – ‘पॅरेकबेसिस’ (Parecbasis)

म्हणजे असं की, समजा तुम्ही एखाद्या हमरस्त्यावरून वेगानं आपली कार चालवत कुठे तरी लाँग ड्राईव्हला जाता आहात. लांब, सरळ रस्ता आहे. अगदी एखाद्या बॉलिवुड अभिनेत्रीच्या गालांसारखा गुळगुळीत. थोड्याच वेळात तुम्ही मुक्कामाला पोहचणार आहात. आणि अशा वेळी अचानक तुम्हाला पाटी दिसते : डायव्हर्शन, डीटूर, वळण मार्ग. समोर काही तरी अडथळा आलेला असतो, कदाचित अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात पुढच्या रस्त्याचा काही भाग वाहून गेला असेल. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी तो हमरस्ता सोडून दुसऱ्या एखाद्या वाकड्या आणि कदाचित लांबच्या मार्गानं पुढचा प्रवास करावा लागणार आहे. मूळ रस्त्यावर तुम्ही केव्हा आणि कुठे परत येणार याची काही खात्री नाही. याल की नाही, हेही माहीत नाही. या उलट कधी कधी गफलतीनं दिशा चुकल्यानं, तुमच्या कारमधल्या जीपीएस प्रणालीनं ऐन वेळी दगा दिल्यानं योग्य मार्गानं जायच्याऐवजी तुमची गाडी कुठे भलत्याच रस्त्यावर भरकटू शकते. अशा वेळी तुम्हाला जर ‘पॅरेकबेसिस’ हा शब्द आठवला तर तुमचा शब्दसंग्रह खूप चांगला आहे, हे नक्की.

पॅरेकबेसिस म्हणजे मूळ रस्ता सोडून इतरत्र भरकटणं. पॅरा म्हणजे बियाँड - पलीकडे. बेसिस म्हणजे मूळ. एकबेसिस म्हणजे मूळ सोडून इतरत्र (पलीकडे) जाणं. ग्रीक भाषेत तो παρέκβασις असा लिहिला जातो. या शब्दाचा वापर ‘ऱ्हेटरिक’ (rhetoric)  म्हणजे संभाषण किंवा वक्तृत्वशास्त्रात केला जातो. वक्ते, प्रवचनकार, हरदासबुवा, वकील, राजकारणी लोक, आणि लेखक (विशेषतः समीक्षक) यांसारख्या अनेक विद्वानांना मूळ विषय सोडून भरकटण्याची खोड असते. त्यांना बहुधा आपलाच आवाज ऐकण्याची आवड असते. किती बोलू आणि किती नाही, असं त्यांना होतं. त्यांच्या चार शब्दांचे चारशेच काय, चार हजार शब्द झाले तरी त्यांना चालतं. त्यांना दहा मिनिटांची वेळ दिली असते - ते दोन तासही बोलू शकतात. मुंबईहून पुण्याला थेट दृतगती महामार्गानं जाण्याऐवजी ते नाशिकमार्गेसुद्धा जाऊ शकतात. मूळ विषय असतो भलताच आणि यांचं वाक‌्जहाज जातं दुसरीचकडे. यालाच ‘डायग्रेशन’ म्हणतात. म्हणजेच ‘पॅरेकबेसिस’.

ऑक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशात या शब्दाच्या स्पेलिंगबद्दल ही नोंद सापडते -

“Though the sense is clear, it is interesting that almost all early uses evidenced involve transmission errors.”

१५८४ला हा शब्द parecuasis असा लिहिला जात होता; १५८९मध्ये Parecnasis असा, तर १५९९मध्ये pareonasis, आणि १६७८मध्ये parechasis असाही तो लिहिलेला आढळतो, असं या शब्दकोशात वाचायला मिळतं.

ऑक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशावरून आठवलं. मी विद्यार्थी असताना माझ्या कॉलेजच्या लायब्ररीत माझी पहिल्यांदा या शब्दकोशाची ओळख झाली. त्या वेळी आमचे जे ग्रंथपाल होते, ते मला अजूनही आठवतात. ते धोतर नेसायचे. एका ठराविक दुकानातूनच ते धोतर विकत घेत. किती वेगवेगळ्या प्रकारची धोतरं तिथे मिळायची म्हणून सांगू. माझे एक आजोबा मात्र खादीचीच धोतरं वापरायचे. ते पक्के गांधीवादी होते. महात्मा गांधी...

अरे, आत्ता लक्षात आलं की, मी पण ‘पॅरेकबेसिस’ करतो आहे! मूळ विषय सोडून भरकटलो. जाऊ द्या, इथेच थांबतो.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......