इ. स. ५०० ते १५०० या कालखंडात ‘आशिया’ हा विस्मयजनक, एकसंध आणि सर्जनशील प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठी पाच शहरे आशियात होती आणि ती शहरे पाच मोठ्या साम्राज्यांचे केंद्रस्थान होती. त्यातील दिल्ली, बीजिंग आणि दमास्कस ही शहरे आजही त्यांचा मोठेपणा टिकवून आहेत, तर दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे आज केवळ भग्नावशेष उरले आहेत. याच आशियातील गणितींनी ‘शून्य’ आणि ‘बीजगणिता’चा शोध लावला. येथील खगोलशास्त्रज्ञांनी ‘ग्रह-तार्यांचा अधिक अचूक वेध घेताना नौकानयनासाठी उपयुक्त ‘उन्नती-दिगंशमापका’चा किंवा ‘वेधयंत्रा’चा शोध लावला. कवी आणि लेखकांनी हृदयस्पर्शी साहित्याची निर्मिती केली. तत्त्ववेत्यांनी आजही प्रभावी असलेल्या विचारधारा आणि कायद्यांची रचना केली. यावरील साहित्य व ग्रीक आणि रोमन ज्ञानग्रंथांचे अनुवाद, तत्कालीन कैक मोठ्या ग्रंथालयांचा गाभा होते.
आशियात दूरवर विस्तारलेल्या व्यापारीमार्गांवरून आधी उदयास आलेल्या बौद्धधर्माचा आणि नंतरच्या इस्लामचा प्रसार झाला. त्याचप्रामाणे रेशीम, मोती, मसाले, औषधे, काच अशा चैनीच्या गोष्टींचे आणि तांदूळ, साखर अशा रोजच्या पदार्थांचे दळणवळण वाढले. मध्यपूर्वेपासून चीनपर्यंत चालणारी आणि सगळीकडच्या व्यापार्यांना ज्ञात आणि मान्य असलेली चलने आणि पतव्यवस्था आशियात अस्तित्वात आली. या काळातील कलानिर्मितीने आज जगभरातील संग्रहालये संपन्न झाली आहेत. येथील वास्तूकलेचे सौष्ठव आणि त्यातील जटिलता आजही भेट देणार्यांना अचंबित करते.
या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण इ. स. ५०० ते १५०० या कालखंडात महान आशियाई जगतात जगलेल्या, नोकरी-व्यवसाय आणि प्रवास केलेल्या एकेका माणसाच्या स्मृतिग्रंथावर आधारित आहे. प्रकरणाच्या सुरुवातीला त्या माणसाच्या प्रवासाचा काळ दिलेला आहे. या निर्भयी आणि साहसी माणसांनी समुद्र सफरी केल्या, वाळवंटे तुडवली आणि सर्वोच्च पर्वतांच्या खिंडी पार केल्या. दक्षिण रशियातील ‘बुल्गर’ ते आग्नेय आशियातील ‘बुगी’ अशा वैविध्यपूर्ण जमातींमधील लोकांबरोबर आपल्याला अवगत नसलेल्या भाषांमधून व्यवहार करणे त्यांना साध्य झाले होते.
अशा वातावरणात तग धरणे आणि आपली उन्नती करणे त्यांना कसे जमले असेल? त्यांच्यापैकी काहींचे नातेवाईक आणि मित्रमंडळी आशियात सर्वत्र पसरलेली होती. इतरांना त्यांच्या प्रवास-मार्गावर पसरलेल्या मठांचा आणि विश्रामगृहांचा आधार मिळत असे. आशियातील विविध दरबारांमधील रीतीरिवाज, दरबारी आदब आणि मानमरातबाच्या पद्धती सारख्या असल्याचे बर्याच जणांना जाणवले. या गोष्टी आत्मसात केल्यामुळे त्यांना दरबारांमध्ये प्रवेश मिळवणे सुकर झाले. कटिबंधातील विविध वनस्पती, विविध कायदे, शोध किंवा वास्तुशास्त्र, अशा गोष्टींविषयीचे या प्रवाशांकडे असलेले ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासू वृत्ती; त्यांना भेटलेल्या लोकांमध्ये असल्याचे, त्यांना जाणवले. त्यांच्या स्मृतिग्रंथांमुळे आपल्यालाही तांड्यांबरोबर आणि जहाजांवरून प्रवास केल्याचा अनुभव येतो. त्यांनी सहन केलेली रक्त गोठवणारी थंडी आणि त्यांचा थकवा यांची जाणीव होते. त्यांच्या आशाआकांक्षांचे आणि मनातील भीतीचे आपण साक्षीदार होतो आणि या मध्ययुगीन महान आशियाई जगताच्या श्रीमंतीने आणि आश्चर्यकारक प्रगतीने आपण भारावून जातो.
हा सगळा इतिहास नोेंदवणारे पुस्तक म्हणजे ‘When Asia Was the World’. डॉ. स्टुअर्ट गार्डन यांच्या महत्त्वाच्या पुस्तकाचा ‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होते…’ या नावाने र. कृ. कुलकर्णी यांनी मराठी अनुवाद केला आहे. हे पुस्तक नुकतेच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील हे एक प्रकरण…
..................................................................................................................................................................
इ. स. ५०० ते १५०० या कालखंडातील आशियाई जगत म्हणजे मोठ्या साम्राज्यांचा आणि मोठ्या राजधानीच्या शहरांचा प्रदेश होता. आग्नेय आशियात श्रीविजय, पगान, अंकोर, चम्पा आणि दाई को व्हिएत अशी राज्ये होती. चीनमध्ये राजघराणी बदलत गेली; पण उर्वरित आशियाबरोबर त्याचे संबंध दृढ होते. भारतातही दिल्ली येथील कुशाण, सलतनती, आणि मोगल, दक्षिणेकडील चोला आणि विजयनगर अशी साम्राज्ये होती. मध्य पूर्वेत, अब्बासिद खिलाफत होती. मध्य आशियात इतिहासातले सगळ्यात मोठे चंगीझखानाचे आणि नंतर तैमूरचे साम्राज्य होते. यापैकी बर्याच साम्राज्यांची लोकसंख्या संपूर्ण पश्चिम युरोपपेक्षाही जास्त होती.
आशिया म्हणजे विभिन्नतेने नटलेले विशाल जगत होते. येथे वाळवंटे होती आणि पर्वतराजीही होती. येथे निबिड मोसमी पर्जन्य अरण्ये होती आणि कोरडे गवताळ प्रदेशही होते. येथे प्रचलित असलेल्या संस्कृती आणि भाषा यांच्यामध्ये चक्रावून टाकणारे वैविध्य होते. येथे स्थानिक पातळीवरील धर्म होते आणि प्रचंड प्रदेश व्यापणारे बौद्ध, इस्लाम आणि हिंदू असे धर्मही होते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
परंतु, हे महान जगत अनोखे असण्याचे कारण होते, येथे पसरलेले दळणवळणाचे जाळे. यातील एकमेकांना छेदणार्या मार्गांवरून नोकरदार, बुद्धिवंत, गुलाम, नव्या कल्पना, धर्म आणि विविध वनस्पती यांचे भ्रमण होत असे. हजारो मैल अंतरांवरही नातेसंबंध पसरलेले असत. व्यापार्यांसाठी कांस्याच्या पुनर्वापरातून तयार झालेल्या जड वस्तूंपासून सगळ्यात तलम रेशमापर्यंतच्या विविध मालांना बाजारपेठा उपलब्ध होत्या.
या जगताचा अंदाज येण्यासाठी सोबतच्या नकाशात पुस्तकातील विविध प्रकरणांमधील प्रवाशांनी अनुसरलेले मार्ग दाखवले आहेत. यात जे छेदबिंदू आहेत ते दोन किंवा अधिक प्रवाशांनी भेट दिलेली शहरे दर्शवतात. चीनपासून मध्य आशियापर्यंतचा प्रदेश, भारत आणि मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, स्पेन आणि सहारा वाळवंटाचा काही भाग यांचा समावेश असलेले हे बृहत जगत या मार्गांमुळे आणि पसरलेल्या जाळ्यामुळे जोडले गेले होते.
साम्राज्ये आणि शहरे
आशियातील साम्राज्ये इतर राज्यांशी विविध मार्गांनी अनुबंध आणि संपर्क प्रस्थापित व्हावे, यासाठी प्रोत्साहन देत असत. पुष्कळदा त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाच्या सीमारेषा एकमेकांत मिसळून गेलेल्या असत आणि त्यामुळे वेगवेगळे प्रदेश आणि समाज अनपेक्षितपणे एकत्र येत. कुशाण, अफगाण आणि मोगल यांनी जी राज्ये स्थापन केली त्यांनी महाकाय हिमालयाच्या दोन्ही बाजूंच्या प्रदेशात यशस्वी राज्यकारभार सांभाळला. दक्षिण भारतातील चोला राज्याने आरामार उभे करून श्रीलंका, जावा आणि सुमात्रा ही बेटे काबीज केली आणि भारत व आग्नेय आशिया यांना राजकीयदृष्ट्या जोडले. चंगीझखानाने गवताळ प्रदेश आणि चीनमधील शेतीखालील मोठे प्रदेश या दोहोंवर राज्य केले. निरंतर राज्यकारभारमुळे वेगवेगळ्या पर्यावरणाच्या प्रदेशांमध्ये व्यापाराला चालना दिली गेली; म्हणजे गवताळ प्रदेशातून भारतात घोडे पाठवले जात, दक्षिण चीनकडून उत्तर चीनकडे भात पाठवला जाई आणि दमास्कसवरून अफगाणिस्तानात लोखंड येत असे. मोठी साम्राज्ये सर्वत्र चालणारी, ‘चिनी रोख’ किंवा ‘चांदीचे दिरहम’ यांच्यासारखी चलने जारी करत, आणि वजन-मापेही प्रमाणित केलेली असत. विश्वसनीय पत्रव्यवहारासाठी त्यांनी बर्याचदा डाकव्यवस्थाही कार्यान्वित केली असल्याचे लक्षात येते. अब्राहम बेन यीजू हा मंगलोरहून पत्र पाठवू शकत होता आणि महिन्याभरात ते कैरोला पोहोचेल, याची त्याला खात्री होती. इब्न बतुताने भारताच्या पश्चिम किनार्यावरून दिल्लीला पाठवलेले त्याचे परिचय-पत्र दिल्लीला व्यवस्थित पोहोचले आणि दोन महिन्यात त्याला त्याचे उत्तरही मिळाले.
दिल्ली, बीजिंग, बगदाद, विजयनगर यासारखी राजधांनीची शहरे शानदार असली (आणि युरोपातील तत्कालीन शहरांपेक्षा कितीतरी मोठी असली) तरी, मध्यम आकाराची शहरेही तितकीच महत्त्वाची होती, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. साधारणपणे एखाद्या प्रांतातील एखाद्या मध्यम आकाराच्या शहरात राहणारे एखादे घराणे प्रबळ होत गेले आणि पुढे त्यातून ही साम्राज्ये आकाराला येत गेली. या घटनाक्रमात ही मध्यम आकाराची शहरे त्या प्रांतांच्या राजधान्या झाल्या. एखादे साम्राज्य लयाला जाते, तेव्हा त्यातून छोटी प्रांतिक राज्ये उदयाला येतात आणि त्यांच्या राजधान्या असलेल्या मध्यम आकाराच्या शहरांचे महत्त्व अबाधित राहते. या काळातही या प्रांतिक राजधान्या नुसत्या तग धरून राहिल्या असे नव्हे, तर त्यांची भरभराटही झाली. मागणी, ज्ञानार्जन आणि आश्रय यांच्यासाठी ही शहरे दीर्घकालीन आधारस्तंभ ठरली.
शहरे मोठी असो अथवा लहान त्यांना अन्न, वस्त्र, इंधन आणि निवारा यांची गरज तेव्हाही होती. या शहरातील श्रीमंत लोक आशियाई जगतातील अत्याधुनिक वस्तूंची मागणी करत. चिनी शहरांमधील श्रीमंतांकडून आफ्रिकेतील आणि आग्नेय आशियातील हस्तिदंताला सतत मागणी असे. या हस्तिदंतापासून धार्मिक मूर्त्या, लेखण्या, पंखे, पेट्या बनवल्या जात आणि लाकडी वस्तूंच्या सजावटीसाठीही त्याचा वापर होत असे. त्यांची सुगंधी धुपाची मागणी पुरी करण्यासाठी आग्नेय आशिया आणि भारतातून चंदनाची लाकडे व वनस्पती जात असे. मध्य पूर्व, भारत आणि आग्नेय आशिया येथून येणार्या उंची रंगीत कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे नवनवीन वनस्पतीजन्य रंगद्रव्यांच्या शोधांना आणि त्यांच्या व्यापाराला चालना मिळाली.
ही शहरे व्यापाराच्या वेगळ्या संधी आणि कुशल कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार्या इतर उद्योगांचीही केंद्रे होती. पुस्तके, कलाकृती, उत्तम कापड, आधुनिक वाद्ये, दागिने आणि शास्त्रीय उपकरणे येथे तयार होत आणि या उत्पादनांना आशियाई जगतात सर्वत्र मागणी होती. दमास्कसने पोलाद व त्यापासूनची उत्पादने यांना कलात्मकता आणि उत्पादकता यांच्या बाबतीत उच्च स्थानी नेऊन ठेवले होते. आशियाई जगतातील व्यापारी ही उत्पादने सर्व भागात घेऊन जात. येथे बनलेल्या तलवारी इंडोनेशियात जशा दिसत, तशाच त्या बाबराच्या मध्य आशियातही दिसत. चीनमध्ये चिनी मातीची भांडी प्रचंड संख्येत बनवली जात आणि त्यांना फिलिपीन्स, जपानपासून आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यापर्यंत सर्वत्र मागणी असे.
दरबारी आणि राजकीय संस्कृती
उच्चभ्रू संस्कृती जोपासणार्या ह्या शहरांमध्ये आणि दरबारांमध्ये बरेच साम्य होते. बृहत आशियाई जगतात राजांकडून वापरली जाणारी प्रतीकचिन्हे साधारणपणे सारखीच होती. यांत छत्र, चामरे, नगारे, शिंगे आणि रत्नजडित शस्त्रे यांचा समावेश होता. मानाची वस्त्रे देण्याचे समारंभही सारखेच होते. सातव्या शतकात मध्य आशियातील राजाने यात्रेकरू ह्युएन त्संगचा सन्मान; मानाची वस्त्रे प्रदान करून केला होता. दोनशे वर्षांनंतर इब्न फद्लानने त्याच्या फसलेल्या राजनैतिक मोहिमेत बगदादच्या अब्बासिद खलिफाने पाठवलेली मानाची वस्त्रे अल्मिशला प्रदान केली होती. चारशे वर्षांनंतर, इब्न बतूताला मध्य पूर्वेतील सुलतानांकडून, ख्रिश्चन कॉंस्टँटिनोपलमध्ये आणि मुस्लीम आफ्रिकी सहारातही मानाची वस्त्रे मिळाली होती. शंभर वर्षे उलटल्यानंतर चिनी जहाजांनी ज्या राज्यांना भेटी दिल्या होत्या, तेथील राजांना त्यांनी मानाची वस्त्रे असलेले नजराण पेश केले होते. सोळाव्या शतकात बाबराला त्याच्या प्रबळ चुलत्यांकडून सन्मानवस्त्रे मिळाली होती आणि नंतर काबूल व दिल्ली येथे विजय मिळवल्यावर त्यानेही त्याच्या सेनानींचा मानाची वस्त्रे देऊन सन्मान केला होता. मानाच्या वस्त्रांप्रमाणेच पान-सुपारी असलेले मानाच विडे देण्याची रीतही सर्वत्र प्रचलित होती. यात राजाचे श्रेष्ठत्व अधोरेखित कले जात असे. आपल्या मर्जीस पात्र झालेल्या माणसाला राजा स्वतःच्या हाताने विडा बनवून देत असे आणि घेणारा माणूस सर्वांसमक्ष अत्यंत आदबीने त्याचा स्वीकार करत असे. मध्य पूर्वेपासून चीनपर्यंतचे सर्व राजे भेटीस आलेल्या राजदूतांना, आपल्या उमरावांना, सैनिकांना, पाहुण्यांना आणि आपल्याच कुटुंबातील व्यक्तींना मानाची वस्त्रे, विडे किंवा दोन्ही देत असत. या समारंभांचा उद्देश; देणारा आणि घेणारा यांच्यातील नाते दृढ करणे, हा असे आणि उपस्थित दरबारी या नात्याला मान्यता देत.
मोठ्या साम्राज्यांनी उभी केलेली दरबारी संस्कृती प्रादेशिक पातळीवर तर अंगिकारली गेलीच; पण स्थानिक जाती-जमातींमध्येही रुजत गेली. भारत जिंकून अफगाण आणि मध्य-आशियातून आलेल्या लोकांनी येथे सलतनती उभ्या केल्यानंतर त्यांनी स्वीकारलेली पर्शियाची संस्कृती भारतातील सगळ्या मुलुखांमधील उच्चभ्रू लोकांमध्येही स्थिरावली. चिनी संस्कृती याच पद्धतीने हळूहळू व्हिएतनामच्या प्रतिष्ठितांमध्ये पसरली. बर्मी दरबारी रिवाजांनी; पारंपारिक वांशिक रिवाजांची जागा घेतली.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
बहुतांश आशियात राजकीय संस्कृतीत सामायिक इनामे आणि दरबारी शौकांचा समावेश असे. स्वर्गीय सुख आणि पृथ्वीवरील सुख यांच्यात एक नाते आहे, अशी लोकांची भावना होती. त्यांच्या दृष्टीने या सुखांमध्ये द्वैत नव्हते, तर ती एकच होती. या पुस्तकातील प्रवाशांपैकी बरेच जण उमराव घराण्यांमधून आलेले होते. ते शाही शौकांमध्ये दंग असत. बाबराने बागा उभ्या केल्या होत्या, त्यांचे नामकरण केले होते आणि त्यांचा आनंद उपभोगला होता. त्याने अत्यंत खुलेपणाने स्वतःच्या मद्य आणि गांजा सेवनाबद्दल लिहिले आहे आणि मद्यप्राशनाच्या मेजवान्यांमधून निर्माण होणार्या मैत्रभावाचे कौतुक केले आहे. इब्न बतूता आणि बाबराकडे गुलाम आणि स्त्री-पुरुष अंगवस्त्रे होती. उंची कपडे वापरणे हा आशियाई जगतातील मोठा शौक होता. इब्न बतूता आणि बाबराला आपल्या कपड्यांविषयीची जाण होती आणि एखादे उंची कापड कोठून आले असावे, याविषयीची अचूक माहिती त्यांना होती.
राजाबरोबर शिकारीवर जाणे, हा आणखी एक मोठा आवडता दरबारी शौक होता. अशी सामूहिक शिकार करणे, हे उमरावांच्या ऐक्याचे द्योतक होते आणि लढाईचा सराव केल्यासारखेही होते. शांतीच्या काळात खेळलेल्या शिकारींचे उल्लेख बाबराच्या आठवणींमध्ये ठळकपणे येतात. मेजवान्यांमध्ये उमराव उंची खाद्यपदार्थांचे एकत्र सेवन करत आणि चर्चा करत. काही जण पाकक्रियेवरील पुस्तके लिहीत. संगीत आणि नृत्य हे करमणुकीचे प्रकार नित्याचे होते. ग्रंथकार, कवी, चित्रकार आणि सुलेखनकार अशा बुद्धिवंतांना आणि कलाकारांना आश्रय देणे हाही उमरावांच्या शौकांचा भाग होता. इतर करमणुकीचे प्रकारही प्रचलित होते. उदाहरणार्थ, स्पेनपासून चीनपर्यंत बुद्धिबळ खेळले जायचे. मा हूआनच्या वेळचा चीनमधील पर्शियाचा राजदूत मोठा बुद्धिबळपटू होता आणि त्याला बीजिंगमध्ये प्रतिस्पर्धीही सहज मिळत.
बौद्धधर्म आणि इस्लाम
बौद्धधर्म आणि इस्लाम या मोठ्या आणि व्यापक धर्मांचा आशियाई जगताला मोठा फायदा झाला. दोन्ही धर्मांनी मानवाच्या वैश्विक गरजांचा विचार केला होता आणि वंश, प्रदेश, भाषा किंवा लिंग यांचा विचार न करता धर्म स्वीकारण्याची इच्छा असलेल्या कोणालाही त्याच्या व्यक्तिगत निष्ठेचा विचार करून त्याला धर्मात घेतले जात असे.
दोन्ही धर्मांमध्ये ज्ञानप्राप्तीसाठी आणि धर्मशिक्षणासाठी दूरचा प्रवास करावा लागे आणि हा प्रवास सुकर व्हावा, यासाठी त्याला संस्थात्मक सोयी उपलब्ध करून द्याव्या लागत. बौद्धधर्माच्या भरभराटीच्या काळात मध्य आशिया, अफगाणिस्तान, भारत, आग्नेय आशिया चीन, जपान आणि कोरियात मठांची साखळी, विश्रामगृहे आणि प्रार्थनास्थळे अशा सोयी उभ्या राहिल्या होत्या. इस्लामच्या आश्रयदात्यांनी स्पेन, उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व, मध्य आशिया, भारत या भागांमध्ये आणि आग्नेय आशिया आणि चीनमधील काही ठिकाणी मदरसे आणि विश्रामगृहे उपलब्ध करून दिली होती. या संस्थांमुळे भक्तांना घरापासून हजारो मैल दूर निवारा मिळत असे आणि इतरांबरोबर प्रार्थना करता येत असे. दोन्ही धर्मांमध्ये विश्रामगृहे बांधणे, व्यापार्यांसाठी बाजार बसवणे आणि सावलीसाठी रस्त्याच्या कडेने वृक्ष लावणे ही धर्मकार्येच मानली जात होती.
आपल्या समाजातील माणसांचे संबंध सलोख्याचे रहावेत या हेतूने दोन्ही धर्मांनी कायदे आणि न्यायव्यवस्था स्थापन केली होती. ‘शरिया’ कायदा आणि ‘बौद्ध नियमावली’ यांच्या आधारे दूरच्या प्रदेशातील समाजही वादांवर तोडगे काढू शकत होता आणि परदेशी लोकांनाही त्या कायद्यांमध्ये सामावून घेऊ शकत होता.
नवनवीन संकल्पनांवर चर्चा व्हावी आणि त्यांचा सर्वत्र प्रसार व्हावा, यासाठी दोन्ही धर्मांनी एक संस्थात्मक रचना तयार केली होती. सातव्या शतकात चीनमधून निघून, मध्य आशिया ओलांडून, दक्षिण भारतापर्यंत केलेल्या आपल्या संपूर्ण प्रवासात ह्युएन त्संग सर्वत्र ठराविक विषयांवरच चर्चा करत होता. आग्नेय आशियातही त्याला त्याच विषयांवर चर्चा होताना आणि तेच ग्रंथ प्रमाण मानताना दिसले असते. सातशे वर्षांनंतर इब्न सीनाच्या ग्रंथांवरील चर्चा आणि त्यांची समीक्षा अफगाणिस्तानापासून स्पेनपर्यंत होत होती.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ख्रिश्चन धर्माने युरोपात जसे अधिराज्य गाजवले, तसे इस्लाम किंवा बौद्धधर्माला गाजवता आले नाही. याचे कारण म्हणजे या दोन्ही धर्मांना धर्मप्रचारासाठी बराच खटाटोप करावा लागला आणि लहान मोठ्या स्थानिक श्रद्धांशी स्पर्धा करावी लागली. उदाहरणार्थ, दोन्ही धर्मांना भारतातील ब्राह्मणी हिंदूधर्मातील विविध पंथ, पर्शियातील पारशी धर्म, आग्नेय आशिया व मध्य आशियातील परंपरागत श्रद्धा आणि चीनमधील कन्फ्युशियस आणि दाओ तत्त्वज्ञान यांच्याशी स्पर्धा करावी लागली. परस्परविरोधी धर्मतत्त्वांच्या मंथनातून लढाया, धार्मिक छळ, वरचेवर उफाळून येणारे रूढीवाद आणि कधीकधी एका प्रकारच्या धर्मश्रद्धांनी दुसर्या धर्मश्रद्धांना गाडून टाकणे, असे प्रकार होणे स्वाभाविकच होते. असे होऊनही या स्पर्धेतून माणसाचे समाजातील स्थान आणि या विश्वातील स्थान याविषयीचे प्रगल्भ तत्त्वचिंतन आणि चर्चा सर्वत्र होत राहिली. विविध श्रद्धांच्या छेदबिंदूंमधून तत्त्वज्ञानाच्या नव्या संकल्पनांचा उदय झाला.
प्रवास आणि व्यापार
प्रवासाला पूरक अशा संस्था, दरबारांमधील आणि प्रशासनातील साधर्म्य यांच्यामुळे चांगली नोकरी आणि समाजात स्थान मिळवण्यासाठी माणसे दूरच्या प्रदेशात जाऊ शकत होती. इब्न बतूताला स्पेन, मध्य आशिया आणि भारतातील काझी आणि धर्मगुरू भेटले होते, आणि मक्केत त्याला मोरोक्कोहून आलेला त्याच्या वडिलांचा मित्र भेटला होता. सैनिकांनाही नोकरीच्या व्यापक संधी मिळत होत्या. मध्य आशियात असताना बाबराने आपल्या सैनिकांना मुक्त करून, स्वतः आशियाई जगताच्या उत्तर भागात दूरवर पसरलेल्या आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातील चीनमधील एका नातेवाईकाकडे नोकरीसाठी जाण्याचे ठरवले होते. दिल्ली जिंकल्यावर बाबराने आपल्या मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि इराक येथील नातेवाईकांना पैसे पाठवले होते.
सर्वांत जास्त प्रवास व्यापारी करत. विविध व्यापारी समाज दूरवर पसरलेले होते. उदाहरणार्थ, गुजराती व्यापारी श्रीलंका आणि आग्नेय आशियात आणि अर्मेंनियाचे व्यापारी मध्य आशियात पसरले होते, तर चिनी व्यापारी बंगालमध्ये आणि अरब व्यापारी ग्वांगचाऊमध्ये व्यापार करत होते. लग्न, घटस्फोट, मालमत्तेची मालकी आणि वारसाहक्क अशा रोजच्या घटना त्या त्या समाजातर्फे नियमित केल्या जात असत. ते कोठेही स्थिरावलेले असले तरी ज्यू लोक ज्यू कायदाच मानत आणि त्याचे पालन करत. मर्यादांचे उल्लंघन करणार्याला बहिष्कृत व्हावे लागे आणि मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागे. मंगलोरमध्ये असताना ज्यू नसलेल्या गुलाम मुलीशी लग्न केल्याचे परिणाम अब्राहम बेन यीजूला भोगावे लागले होते. एडनपासून कँटनपर्यंत पसरलेले मुस्लीम व्यापारी शरिया कायद्याचे पालन करत आणि त्यासाठी त्यांच्याकडे त्यांची स्वतःची न्यायालये, काझी असत. आणि पुराव्यावर आधारित निवाडे दिले जात. आपल्या देशाचे कर आणि व्यापाराचे नियम सोडले तर, इतर कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय व्यापारी व्यापार करू शकत. हे नियमही फारसे त्रासदायक नसत. बहुतेक सगळ्या शेतजमिनी उमरावांना वाटल्या गेलेल्या असल्या, तरी उत्पन्नासाठी व्यापारातून मिळणारे कर हवेच असत. प्रत्येक बंदराला आणि राज्यांना स्पर्धक असत. भारताबरोबरच्या व्यापारासाठी एडनला होर्मोजशी स्पर्धा करावी लागे. मलबार किनार्यावरून चालणार्या मसाल्यांच्या व्यापारात कालिकतला कोचीन, मंगलोर, कन्नोर, आणि आणखी दहा-बारा बंदरांशी स्पर्धा करावी लागेल. एखाद्या बंदराबद्दल व्यापारी असमाधानी असतील, तर ते एकट्याने किंवा सामूहिकरित्या दुसर्या बंदराकडे जात. पोर्तुगीजसुद्धा हे स्थलांतर थांबवू शकले नाहीत. राज्याचा हस्तक्षेप मर्यादित असल्यामुळे व्यापार्यांना संरक्षण नसे आणि त्यांना सागरी मार्गांवर चाचेगिरीला आणि खुश्कीच्या मार्गांवर लूटमारीला तोंड द्यावे लागे. भारताच्या पश्चिमी किनारपट्टीचा उत्तरेकडील भाग, जपानच्या जवळचा भाग आणि मलॅकाची सामुद्रधुनी असे काही भाग कित्येक शतके चाच्यांसाठी नंदनवन असल्यासारखेच होते.
एकूणच व्यापार्यांबाबत आणि ते आणत असलेल्या नव्या वस्तू आणि नव्या कल्पनांबद्दल खुलेपणा होता. अधिकृत चिनी विचारसरणी व्यापाराच्या विरुद्ध होती आणि बंदरे आणि अंतर्गत व्यापार करणार्यांवर निर्बंध असावेत असे मत मांडणारी होती. असा दृष्टिकोन असूनही हस्तिदंत आणि सुगंधी धुपाची आयात थांबली नव्हती आणि लोखंड, रेशीम आणि चिनी मातीच्या भांड्यांची निर्यातही थांबली नव्हती. त्याचबरोबर नव्या वनस्पती, औषधे आणि नव्या कल्पनांविषयीची उत्सुकताही कमी झाली नव्हती. आशियाई जगतात सगळीकडे प्रचलित असलेल्या राजांसाठीच्या सल्लापुस्तिकांमध्ये राजाने नव्या कल्पना आणि दुसरीकडच्या बातम्यांमध्ये रुची दाखवावी असा सल्ला दिलेला असे. पुढे उदधृत केलेला सल्ला, हा अकराव्या शतकातील पर्शियातिल पुस्तिकेतील आहे-
‘‘ज्या प्रमाणे जगात इतरत्र घडणार्या घटनांची आणि इतर राजांच्या कामगिरीची माहिती तुम्हाला दिली जाते, त्याचप्रमाणे आपल्या देशाविषयी आणि आपल्या जनतेच्या आणि सुरक्षारक्षकांच्या एकूण अवस्थेविषयी जाणून घेणे हे तुमचे कर्तव्य आहे.’’
या राजांच्या सल्लापुस्तिकांमध्ये प्रवासाचे समर्थन केले आहे. त्यांत व्यापार्यांच्या भूमिकेचे कौतुक केले असून त्यांचे स्वागत करणे आणि त्यांचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे असे म्हटले आहे.
व्यापाराला महत्त्व होतेच. व्यापाराची व्याप्ती आणि वैविध्य या गोष्टींचा बृहत आशियाई जगतातील जनतेवर परिणाम झाला होता. उष्णकटिबंधातील मसाल्याचे पदार्थ आणि औषधे उत्तर भारतात, पश्चिमेला मध्य पूर्वेत आणि पूर्वेला चीनमध्ये जात होती. या औषधी वनस्पतींचे शोध शहरांमधील हकीम-वैद्यांनी लावले नव्हते किंवा त्यांना आणणार्या व्यापार्यांनीही लावले नव्हते. त्यांचे शोध अरण्यवासीयांनी आपल्या अरण्यातील वनस्पतींवर प्रयोग करताना लावले होते. बृहत आशियाई जगतात केवळ दरबारी आणि व्यापारीच नव्हते तर हे जगत आग्नेय आशिया आणि श्रीलंकेतील अरण्ये आणि मलबार किनार्यालगतच्या डोंगररांगामध्ये पसरलेले होते.
धर्मांची व्याप्ती वाढवण्यात व्यापाराचा मोठा सहभाग होता. धर्माचरणासाठी लागणारी साधने आणि ग्रंथ समुद्रमार्गे आणि तांड्यांच्या मार्गे तिबेट, मध्य आशिया, आग्नेय आशिया आणि चीनला जात.
अतिशय अनोख्या वस्तूंपासून अतिशय सामान्य वस्तूंपर्यंत सर्वांचा व्यापार चालत होता. एकीकडे आफ्रिकेतून चीनच्या दरबारासाठी जिराफ पाठवण्याची कसरत केली जात होती, तर दुसरीकडे थायलंडच्या किनार्यावर तयार होणारी माशांची खळ आणि स्वयंपाकाची चिनी बनावटीची लोखंडी भांडी आग्नेय आशियाच्या बेटांवर फायद्यात विकल्या जाणार्या गोष्टी होत्या. भारत, चीन आणि आग्नेय आशियात सामान्य असलेला भात, गवताळ प्रदेशात श्रीमंती अन्न बनला. प्रत्येक जहाजावर आणि प्रत्येक तांड्यात साध्या प्रापंचिक वस्तूंपासून अत्यंत मौल्यवान वस्तूंपर्यंतचा सगळा माल समाविष्ट असे. व्यापाराचे महत्त्व आणि सातत्य याचे महत्त्व अधोरेखित करायचे झाल्यास असे म्हणता येईल की, विविध लोक त्यांच्या भागात तयार होणार्या व्यापारयोग्य वस्तूंवरून ओळखले जाऊ लागले. गवताळ प्रदेश घोडे, मेंढ्या आणि गुरे यांच्या वाढीसाठी योग्य होता. या नैसर्गिक अनुकूलतेमुळे तेथून भारतात दरवर्षी हजारो घोडे पाठवले जात, कारण भारतात घोड्यांची पैदास होत नसे. भारतातील अमीर उमरावांसाठी घोडा हा प्रतिष्ठेचा द्योतक होता. घोड्यांच्या विक्रीतून मिळणार्या पैशातून गवताळ प्रदेशातील लोक अंगरख्यांसाठी किमती कापड आणि शस्त्रांसाठी पोलाद आयात करत आणि कालौघात त्यावरच त्यांची संस्कृती विकसित झाली.
नवप्रवर्तन
बृहत आशियाई जगतात सर्वत्र नवप्रवर्तनाविषयी अस्वस्थ आणि अविश्रांत अशी ओढ होती. राजकारणात राजवटींनी नोकरशाही आणि करप्रणाली यांच्यात प्रयोग करून पाहिले. त्यांनी नवीन चलन वापरात आणली आणि जिंकलेल्या लोकांना नवीन कायद्याच्या चौकटीत बसवले. मध्य पूर्वेपासून चीनपर्यंत राजांसाठी सल्लापुस्तिका तयार केल्या. राजे त्यांनी पाठवलेली राजनैतिक शिष्ठमंडळ परतण्याची आतूरतेने वाट पहात. कारण त्यांना स्वीकार करण्याजोग्या इतर राज्यांमधील नव्या इमान-वचनांच्या समारंभांची किंवा लष्करी संगठनाच्या संदर्भातील नव्या संकल्पनांची माहिती मिळत असे. भातशेतीसाठी जलसिंचन किंवा राज्यातील विविध भागांना जोडणारे रस्ते बांधणे अशा आर्थिक विकासाच्या योजना ही सरकारे राबवत असत.
एकजातीय आणि प्रादेशिक स्वरूपाच्या सैन्याच्या मर्यादा ईजिप्तपासून चीनपर्यंतच्या सर्व राजांना माहीत होत्या. त्यांनी गुलामांची सैन्य, धर्माधारीत सैन्य आणि कैद्यांचे सैन्य उभे करण्याचे यशस्वी प्रयोग केले. चंगीझखानाने एका जमातीवर आधारित सैन्याची परंपरा मोडली आणि वेगवेगळ्या जमाती एकत्र करून सैन्य उभे केले.
सन १३०० पर्यंत तरी मध्य पूर्व, भारत आणि चीन, विज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन संशोधनात आघाडीवर होते. नवनवीन वनस्पती दरबारांमध्ये येत असत. त्यापैकी काहींची माहिती आणि त्यांची चित्रे इब्न सीना सारख्यांच्या वैद्यकावरील ग्रंथांमध्ये समाविष्ट झाली, तर काहींना राजे आणि अमीर-उमरावांच्या मुदपाकखान्यात स्थान मिळाले. राजे आणि अमीर-उमराव त्यांच्या बागांमध्ये नव्या वनस्पती उगवण्याचा प्रयत्न करत. काबूलमध्ये भारतीय संत्र्यांची लागवड आपण प्रथम केली, असा उल्लेख बाबराने त्याच्या आठवणींमध्ये मोठ्या गर्वाने केला आहे. चीनमध्ये शोध लागलेल्या लसीकरणासारख्या कित्येक नव्या वैद्यकीय उपचार पद्धती विकसित झाल्या.
गणित आणि खगोलविज्ञानातील प्रगती लक्षणीय होती. भारतात संख्यापद्धतीचा शोध लागला. भारत आणि मध्य पूर्वेत बीजगणित, शंकुच्छेदासारख्या आकारांची भूमिती आणि अगदी प्राथमिक स्वरूपातील कलनशास्त्राचाही (उहीेपेश्रेसू) विकास झाला. कित्येक दरबारांमध्ये खगोलशास्त्रीय निरीक्षणे आवर्जून चर्चिली जात.
या हजार वर्षांच्या कालखंडात व्यापारातही नवीन संकल्पना राबवल्या गेल्या. व्यापार्यांनी उपयुक्त वाटणार्या वनस्पती आपल्याबरोबर केवळ आणल्या नाहीत, तर त्यांच्या लागवडीचे प्रयत्न व्हावेत यासाठी वित्तीय सहाय्यही दिले. ज्यू व्यापार्यांनी भारतातून ऊस आणला आणि नाईलच्या काठाने त्याची लागवड सुरू केली. भारतापासून इंडोनेशियापर्यंत आंबा आणि मिर्यांची लागवड होऊ लागली आणि तेथे त्यांना नगदी पिकांचे स्वरूप आले. व्यावसायिकांनी नव्या बाजारपेठा विकसित केल्या आणि गुजराथी छापील कापड, बगदादी फरशा, खिलाफतीतील चांदीची नाणी, चिनी मातीची भांडी, दमास्कसच्या तलवारी आणि चिनी रेशीम यांच्यासारख्या महाग वस्तूंच्या स्वस्तातील प्रतिकृती बनवायला सुरुवात केली.
आत्मनिरीक्षण
युरोपात ज्या काळात स्वतःविषयीच्या जाणिवांचा विचारही नव्हता, त्या काळात आशियाई जगताने आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षणही केले होते. विशेषतः चीन आणि मध्य पूर्वेत चरित्र आणि आत्मचरित्र यांचे पीकच येत होते. आयुष्य कसे जगले जात होते आणि नैतिकतेने कसे जगायला हवे, याविषयी भारतात अक्षरशः हजारो पुस्तके लिहिली गेली होती. प्रेमातील दुःखे आणि सौंदर्याची क्षणभंगुरता, यावर कविता रचल्या जात होत्या. चित्रकारांनी त्यांचे जग आणि त्यातील अनोखेपणा चितारला होता. चीनमध्ये आणलेला जिराफ, लिखाणात आणि चित्रात दिसून येतो. इतिहास आणि भूगोल याविषयी असंख्य ग्रंथ लिहिले गेले.
दररोज होणारे बदल किंवा शतकांमध्ये होणारे बदल आणि राजकीय उलथापालथ यांच्यापुढे टिकून राहणारे बृहत आशियाई जगत टणक होते. बगदादची अधोगती झाल्यावर रे, बाल्ख, बुखारा आणि गझनी यासारख्या नव्या केंद्रांमधून व्यापार सुरू झाला. अरब व्यापार्यांनी इस्लाम स्वीकारला तेंव्हा त्यांनी व्यापारीमार्गांवर मशिदी बांधल्या आणि त्यांच्या नवीन धर्माचे अनुसरण सुरू केले. ज्यू, अर्मेंनियन, गुजराती, मलय, येमेनी, तामीळ, अरब आणि चिनी या समुदायांमधून प्रबळ व्यापारी कधी यश तर कधी अपयश मिळवत राहिले. हजार वर्षांच्या या कालखंडाचा साकल्याने विचार केला तर, असे लक्षात येते की, या कालखंडात आधी एकीकरण झाले, ज्ञान आणि ज्ञानी लोकांचे संचारण झाले आणि सुरुवातीपेक्षा शेवटी शेवटी मोठे नवप्रवर्तन झाले.
युरोपीय वसाहतवादी विजय
‘टोपीवाले’ अशा नावाने ओळखले जाणारे ‘युरोपीय’ ही एक वेगळीच उपज होती आणि ते आपल्याबरोबर वेगळ्याच गृहितांना घेऊन आले होते, हे आशियातील बर्याच लोकांच्या लक्षात आले होते. कित्येक शतके युरोप, आशियाई जगताच्या काठावरच होता. तसे व्हेनीस, जेनोआ आणि प्राग या शहरांच्याद्वारे युरोपचे आशियाबरोबर व्यापारी संबंध होते. शिवाय इब्न फद्लानला दिसल्याप्रामाणे रशियाच्या नद्यांमधून दूर अंतराचा व्यापारही चालत होता. परंतु, बौद्धिक चर्चा, धार्मिक वादविवाद, कौटुंबिक बंधने, व्यापारी भागीदार्या, राजनैतिक मोहिमा, दरबारी नोकरशाही, मानसन्मानांचे रीतिरिवाज, काव्य, संगीत, कपड्यांचे ढंग आणि कला यांच्या बाबतीत कोणतीही देवाणघेवाण, युरोप आणि आशियात होत नव्हती.
युरोपीय जेव्हा आशियात आले, तेव्हा त्यांनी स्वतःला व्यापारी आणि त्याचबरोबर त्यांच्या राजांचे प्रतिनिधी असल्याचे घोषित केले आणि आपण थेट त्यांचेच ताबेदार आहोत, असेही जाहीर केले. हे नवीन आणि अनपेक्षित होते. आशियाई जगतातील कोणत्याही व्यापार्याने कधीही त्यांच्या राजाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. अब्राहम बेन यीजू कैरोवरून आलेला असला तरी आपण ईजिप्तच्या राजाचे इमानदार प्रतिनिधी, अशी त्याने कधी कल्पनाही केली नसेल. युरोपिय व्यापारी शस्त्रसज्ज होते. जरी आपल्या तांड्यांच्या आणि जहाजांच्या रक्षणासाठी आशियाई व्यापार्यांनी भाडोत्री सैनिक ठेवलेले असले तरी ते लढायांमध्ये क्वचितच सहभागी झाले होते.
युरोपखंडात आणि भूमध्य समुद्रात युरोपीय लोकांनी शतकानुशतके व्यापाराला लढायांची जोड दिली होती आणि तोच शिरस्ता ते आशियात घेऊन आले होते. व्यापारात आणि तोङ्गा घडवण्यात असलेला राजाचा थेट सहभाग, हा फायदेशीर राजकारणाचा भाग समजाला जात होता. सरतेशेवटी युरोपीय लोकांनी आपण पोर्तुगीज किंवा इंग्लिश आणि ख्रिश्चन असल्याची जाणीव स्वतःबरोबर आणली. जरी इस्लामी पंथांमध्ये धर्माच्या अन्वयार्थावरून लढाया झाल्या असल्या किंवा इस्लामचा प्रसार होत असताना बौद्ध संस्थांवर हल्ले झाले असले, तरी युरोपीयांच्या ख्रिश्चन असण्याबाबतच्या भावना वेगळ्या आणि अधिक तीव्र होत्या. अब्राहम बेन यीजूच्या व्यापारी समूहात हिंदू, गुजराती आणि मुस्लिमांचा समावेश होता. आशियाई जगतासाठी युरोपीय पुर्णपणे बाहेरचे होते. वेगळ्या वंशाच्या आणि जातीतल्या स्थानिक लोकांना हुशारी असूनही युरोपीयांनी कधी चांगल्या हुद्दयावर नेमले नाही. वरिष्ठ हुद्दे हे युरोपातून आलेल्या गोर्या लोकांसाठी राखीव असत. युरोपीयांचे मानसन्मानाचे समारंभ वेगळे होते आणि आशियाई लोकांप्रमाणे त्यात मानाची वस्त्रे देण्याची पद्धत नव्हती.
व्यावहारिकदृष्ट्या या युरोपीयांच्या दृष्टीकोनामुळे त्यांचे विजय स्थानिक सेनानीचे न समजले जाता, त्यांच्या राजाचे समजण्यात येऊ लागले. कोणत्याही युरोपीय माणसाने (बोर्निओच्या राजा ब्रुकचा अपवाद वगळता) आशियात स्वतंत्र राज्य स्थापन केले नाही. बाबरापेक्षा हे खूपच वेगळे होते. त्याला माहीत होते की, आपले राज्य आणि सैन्य राखण्यासाठी आपल्या विजयातील काही हिस्सा त्याला त्याच्या सेनानींना आणि कुटुंबाला देणे आवश्यक होते. खिलाफतीत, चिनी साम्राज्यात आणि मुघल साम्राज्यात सेनांनींनी आपल्या जिंकलेल्या प्रदेशांमध्ये स्वतःची राज्ये आणि साम्राज्ये उभारली. युरोपीयांनी व्यावसायिक व्यापारी संस्था, राजनिष्ठा आणि अधिकृत सैन्य या गोष्टींचा चांगला मेळ घातला होता आणि जिंकलेला प्रदेश सैन्याधिकार्याच्या मालकीचा होणार नाही, याची काळजी घेतली होती.
हे सगळे एका रात्रीत घडले नव्हते, पण आशियाई लोकांच्या एक गोष्ट मात्र लक्षात आली होती. ऐन लढाईच्या वेळी जसे आशियातील एखाद्या सैन्यातील लाच खाल्लेल्या एखाद्या सेनानीचे सैन्य फुटून शत्रूला जाऊन मिळत असे, तसे युरोपीय सैन्याच्या बाबतीत घडत नसे. युरोपीय सेनानी मारला गेला तरी त्याचे सैन्य फुटत नसे. आशियाई निरीक्षकांच्या हेही लक्षात आले की, युरोपीयांनी केलेले तह सेनानीच्या नावाने न करता त्यांच्या राजाच्या नावाने केलेले असत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
शिस्तबद्ध सैन्यरचनेची उपयुक्तता आणि देशाप्रती निष्ठा या जमेच्या बाजू असूनही युरोपीयांचे आशियातील विजय आणि वसाहतीकरण फारच धीम्या गतीने झाले, असे मुद्दाम नमूद करावे असे वाटते. भारतातील सर्वात प्रबळ सत्ता बनण्यासाठी इंग्लंडला एकोणीसाव्या शतकापर्यंत झगडावे लागले. हॉलंडला आग्नेय आशियातील बेटे आणि श्रीलंकेत लवकर यश मिळाले, पण ते त्यांचे साम्राज्य या बेटांपलिकडे वाढवू शकले नाहीत. पूर्वेचा गवताळ प्रदेश रशियाने सतराव्या शतकात जिंकला. धर्मयुद्धांचा कालखंड सोडला तर मध्य पूर्वेतील युरोपीय हस्तक्षेप ही खरेतर एकोणीसाव्या शतकातील घटना म्हणायला हवी. पूर्व आशियातील विजय ही विसाव्या शतकातील घटना आहे आणि भारताइतके वसाहतीकरण चीनचे कधीच झाले नाही.
युरोपीयांच्या विजयांच्या नंतरही हे विस्तीर्ण, आतून जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून असलेले आशियाई जगत वसाहतींच्या अंमलाखालीही टिकून राहिले. युरोपीयांचे प्राबल्य असूनही दरवर्षी अरबी जहाजे गुजराथी कापड घेऊन आफ्रिकेला जात होती आणि तेथून सोने घेऊन परत येत होती. चिनी व्यापारी ‘कोलकाता’ या नव्या ब्रिटिश बंदरावर आले होते. हजारो घोडे अजूनही मध्य आशियातून भारतात येत होते. वसाहतवादी सत्तेने अगदी धीम्या गतीने स्थानिक राजकीय व्यवहार आपल्या ताब्यात घेतले आणि आपल्या देशाला हितावह होईल, अशा पद्धतीने त्यांनी आशियाई अर्थव्यवस्था वळवली.
..................................................................................................................................................................
‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होते…’ या डॉ. स्टुअर्ट गार्डन यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5317/Jevha-ashiya-mhanjech-jag-hota
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment