अजूनकाही
‘चोखामेळा : संत, कवी आणि माणूस’ हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. माधव पुटवाड यांचे पुस्तक नुकतेच बीज प्रकाशन गृह, शेगावतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक दा. गो. काळे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
विठ्ठलाच्या अस्तित्वाला, त्याच्या एकंदरीत असण्याला केंद्र मानून अठरापगड जातींना एकत्र करणारा ‘महासमन्वय’ म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याची मुळं बहुजनांच्या आध्यात्मिक हिताच्या मानवीय व्यवहारात गुंतलेली आहेत. विशेषतः या सबंध आध्यात्मिक व्यवहाराला सर्जनशीलतेची जोड मिळालेली आहे. आपण वारकरी संप्रदायाची संपूर्ण परंपरा तपासली तर या परंपरेतील कवितेत जातिवास्तवातून आलेल्या दैन्य-दुःखाची आणि अन्याय-पीडनाची धगच व्यक्त झालेली दिसते. त्यातून चोखामेळासारखा आपली स्वतंत्र भाषा घडवणारा कवीमनाचा माणूसही सुटला नाही. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेली अभिव्यक्ती म्हणजे व्यवस्थेला न विचारता येणाऱ्या प्रश्नांचे पांडुरंगाजवळ केलेले ‘कॅथार्सिस’ म्हणता येईल. त्या अमूर्त अशा जाणिवेतून त्यांना पडलेल्या प्रश्नांची उकल न झाल्याने त्यांची कविता अधिक अद्भुत, अलौकिक ओढीकडे झुकलेली दिसते.
आधुनिक काळात झालेल्या प्रबोधनामुळे इहवादासारख्या नव्या संकल्पना अधिक ठळक झाल्या. घडलेल्या मन्वंतरातून प्राप्त झालेल्या चिकित्सेच्या आधारे संतांच्या कवितेतील प्रक्षिप्त मांडणीला विरोध सुरू झाला आणि त्यातून संतकवितेविषयी नवनवीन विश्लेषणे आणि अर्थनिर्णयने पुढे आली. एकप्रकारे संतसाहित्य हा वाद-विवादांचा विषय बनला. इतिहासाची साधने अनुपलब्ध असल्यामुळे संतसाहित्यावर भाष्य करणे आव्हानात्मक ठरते. असे असले तरी संहितेचे वाचन निरनिराळ्या पद्धतीने करून आणि विविध प्रकारच्या तर्क, अनुमानांच्या आधारे आधुनिक काळात नवीन मांडणी होत आली.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
बऱ्याचदा विशिष्ट प्रकारच्या सांस्कृतिक प्रभुत्वामुळे शोषितांच्या सांस्कृतिक इतिहासाचा दस्तऐवज उपलब्ध होत नाही. त्यामुळे बहुजन चळवळींना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे काही वेळा आपलाच वारसा नाकारण्याचाही प्रकार घडतो. संत चोखामेळा यांनादेखील वारसा म्हणून स्वीकारावे की स्वीकारू नये, असा प्रश्न आधुनिक पर्यावरणात निर्माण झाला. मात्र असा प्रश्न निरर्थक ठरतो. कारण तत्कालीन काळाच्या परिप्रेक्ष्यातच संतसाहित्याच्या विद्रोहाचा अन्वयार्थ लावावा लागतो. तसे काही चांगले प्रयत्नही साठोत्तरी काळात दिसून येतात. संतसाहित्याचा पुनर्विचार करून त्याबाबत चिकित्सक अर्थनिर्णयनांची एक परंपरा निर्माण झाली. या परंपरेच्या पार्श्वभूमीवर आलेली एक मांडणी म्हणून प्रस्तुत पुस्तकाकडे बघता येईल.
संत चोखामेळा हा एक सांस्कृतिक वारसा आहे. त्यांच्या रूपाने अतिशय प्रतिभासंपन्न असा एक कवी मराठीला लाभला आहे. मात्र तत्कालीन परिस्थिती लक्षात न घेता अनाठायी विद्रोही अपेक्षा बाळगून त्यांना नाकारणे हे चुकीचे ठरते. तसा अविवेकी निर्णय घेणे, हे एक प्रकारे सांस्कृतिक करंटेपण ठरू शकेल. असे करणे म्हणजे एकप्रकारे सबंध वारकरी परंपराच प्रक्षिप्त म्हणून नाकारण्यासारखे ठरेल. असे होणे योग्य नाही, याचे अवधान बाळगून डॉ. माधव पुटवाड यांनी प्रस्तुत पुस्तकातून उपलब्ध अंभगांच्या आधारे चोखामेळा यांच्या माणूस असण्याची, कवी असण्याची आणि संत असण्याची एक विवेकनिष्ठ मांडणी केली आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ही मांडणी संतसाहित्याचे पुनर्वाचन करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि नव्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरू शकेल. संतसाहित्याचा मौलिक वारसा अविवेकाने नाकारण्याऐवजी आस्थेने त्यांचे अंतरंग समजून घेण्यासाठी ही मांडणी नवी दृष्टी देईल. भौतिक जीवनातील शोषणाविरूद्धचा लढा हा तत्कालीन भक्ती आंदोलनाच्या रूपात कसा समजून घ्यावा, याची दृष्टी प्रस्तुत पुस्तक वाचकांना देऊ शकेल, असा विश्वास वाटतो.
‘चोखामेळा : संत, कवी आणि माणूस’ – डॉ. माधव पुटवाड
बीज प्रकाशन गृह, शेगाव, जि. बुलडाणा
पाने – ६०, मूल्य – १०० रुपये
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment