वनराज भाटिया : भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीतात वावरणारा अवलिया
संकीर्ण - श्रद्धांजली
अंजली अंबेकर
  • वनराज भाटिया (३१ मे १९२७-७ मे २०२१)
  • Wed , 12 May 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली वनराज भाटिया Vanraj Bhatia श्याम बेनेगल Shyam Benegal सरदारी बेगम Sardari Begum तमस Tamas अंकुर Ankur

१ मार्च २०१७ रोजी एनसीपीए, मुंबई येथे ‘ट्रिब्यूट टू वनराज भाटिया’ असा कार्यक्रम असल्याचं  नोटिफिकेशन आलं आणि ते वाचून लगोलग ‘बुक माय शो’वर जाऊन त्याचं तिकीट बुक केलं. भाटियांनी दिलेलं श्याम बेनेगल किंवा गोविंद निहलानी यांच्या चित्रपटांचं संगीत भावलेलंच होतं, परंतु मी जेव्हा नॉन फिल्मी चित्रपट संगीताकडे वळले, तेव्हा त्यांचे ‘म्युझिक टुडे’ या कंपनीकडून आलेले ‘म्युझिक फॉर मेडिटेशन’ किंवा ‘एलेमेंट्स ऑफ अर्थ’सारखे अल्बम्स ऐकले आणि त्यांच्या संगीतप्रवासाकडे जाणीवपूर्वक बघायला लागले. मग त्यांचं पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील योगदान, ‘अग्निवर्षा’सारखा ऑपेरा किंवा रंगभूमीचे अध्वर्यु इब्राहिम अल्काझी यांच्या नाटकांना दिलेलं संगीत असा तो व्यापक संगीत प्रवास उलगडायला लागला. त्यांच्या या कार्यक्रमाला जाण्यामागे या सगळ्या सुरांच्या ‘यारो रिव्हिजिटेड’ प्रेरणा होत्या.

भाटियांच्या या ट्रिब्यूट कार्यक्रमात सहभागी होणार होते उस्ताद झाकीर हुसेन आणि तुषार भाटिया. या दोघांनीही भाटियांच्या विविध संगीत रचना सादर केल्या. नव्वदीच्या घरांतील भाटिया आवर्जून त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. एनसीपीएच्या ऑडिटोरियममध्ये स्टेजच्या एकदम समोर बसलेले गोरेपान भाटिया कायम आठवणीत राहिले. त्यांच्या चित्रपट संगीताची स्वरधारा संगीतकार तुषार भाटियाने सादर केली होती, तर ग्रँड फिनालेमध्ये स्वतः उस्ताद झाकीरजी, सोबत सितारवादक निलाद्री कुमार, बासरीवादक राकेश चौरसिया आणि झुबीन बालापोरीया (की बोर्ड प्लेयर) यांनी भाटियांनी संगीत दिलेल्या ‘३६ चौरंगी लेन’ या चित्रपटातील एक संगीतरचना सादर केली. या कार्यक्रमानंतर भाटिया या संगीतकाराचा फार वाद्यांचा कलकलाट नसलेला, शांत निरामय जगण्याकडे घेऊन जाणाऱ्या प्रेरणांचा वाद्यमेळ पुन्हा नव्याने जाणवून घ्यावासा वाटला.

भाटियांनी सर्वांत सातत्याने आणि सर्वाधिक काम केलं ते श्याम बेनेगल या भारतातील महत्त्वाच्या दिग्दर्शकासोबत. त्यांचं भाटियांच्या संगीताबद्दल फार समर्पक वाक्य आहे. ते म्हणतात- “Vanraj Bhatia is the only person anywhere who has written music for the works ranging from Shakespear to the Mahabharata.” बेनेगलांना भारतातील समांतर चित्रपट चळवळीतील एक महत्त्वाचा दिग्दर्शक मानलं जातं. त्याच फळीतील गोविंद निहलानी, अपर्णा सेन, गिरीश कार्नाड, कुंदन शाह, कुमार शाहनी ते थेट विधू विनोद चोप्रापर्यंत सगळ्यांसोबत त्यांनी काम केलं. त्या अर्थाने ते ‘साऊंड ऑफ पॅरलल’ किंवा ‘न्यू वेव्ह सिनेमा’च होते.

असा हा संगीत प्रवास खऱ्या अर्थानं मुंबईच्या शास्त्रीय संगीतातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘देवधर स्कुल ऑफ म्युझिक’पासून झाला. मुंबईतच जन्माला आलेल्या भाटियांनी फॅार्मल शिक्षण  घेत असतानाच, त्या काळातील मुंबईतील जवळपास सगळ्या संगीत गुरूंकडे संगीत शिक्षण घेतलं होतं. त्यांनी दिलेल्या मुलाखतींमधून ते याचा आवर्जून उल्लेख करायचे.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

कच्छी व्यापाऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या या मुलाची पावलं उद्योगधंद्याकडे न वळता देवधर ‘स्कुल ऑफ म्युझिक’कडे वळली. अगदी शालेयजीवनातच त्यांची भारतीय आणि पाश्चात्य संगीताशी ओळख झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी Tchaikovsky या रशियन संगीतकाराची ‘piano concert no.1’ ही रचना ऐकली आणि त्यांचा पाश्चात्य संगीताकडे ओढा वाढला. त्यांचा पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील दिग्गज मोत्झार्ट, बीथोवन, शुबर्ट, चॉपिन आणि ब्राह्मस यांच्या संगीताशी  लंडनला संगीत शिकायला जाण्यापूर्वीच परिचय झाला होता.

पुढे भाटिया लंडनच्या ‘रॉयल अकॅडेमी ऑफ म्युझिक’मध्ये संगीत शिकले, त्यांना रॉकफेलर स्कॉलरशिप मिळाली. आणि फ्रेंच शासनाचीही स्कॉलरशिप मिळून त्यांना पॅरिसमध्ये Nadia Boulengar या विसाव्या शतकातील अनेक महत्त्वाच्या संगीतकारांना संगीत शिकवणाऱ्या गुरूकडे सलग पाच वर्षे पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. आपल्या समकालीन संगीतकारांच्या तुलनेत, आपलं ॲकेडेमिक शिक्षण आणि संगीताचं शिक्षण अधिक आहे, याचा भाटियांना सार्थ अभिमान वाटायचा.

भारतात परत आल्यावर भाटियांच्या संगीत प्रवासाची सुरुवात जाहिरातीसाठींच्या जिंगल्सपासून झाली. त्या वेळी जाहिराती किंवा त्यासाठीच्या जिंगल्स हा अगदी नवीन प्रकार होता. ‘शक्ती सारी मिल्स’ या जाहिरातीसाठी जिंगल्स करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांनी भाटियांचे नाव सुचवले. त्यामुळे जाहिराती संगीतबद्ध करणारे भाटिया भारतातील पहिले संगीतकार ठरले. पुढे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सात हजाराहून अधिक जिंगल्स संगीतबद्ध केल्या. ‘लिरिल’, ‘गार्डन वरेली’ आणि ‘ड्युलक्स’ हे त्यापैकी काही महत्त्वाचे ब्रॅण्ड्स. पुढे चित्रपट संगीतात प्रस्थापित झालेल्या अनेक संगीतकारांच्या कारकिर्दीची सुरूवात जिंगल्सपासून झालेली दिसते. पण जिंगल्स तयार करणं हाही सांगीतिक प्रतिभेचाच आविष्कार आहे, त्यामुळे त्याच्याकडेही तितक्याच आदरानं बघायला हवं, ही धारणा भाटियांनीच स्पष्ट केली.

सुरुवातीचा काही काळ भाटिया दिल्ली विद्यापीठातील ‘वेस्टर्न म्युझिकॉलॉजी’ विभागात संगीत अध्यापनाचंही काम करायचे. या काळात त्यांना जपानसारख्या अनेक देशांत जाण्याची संधी मिळाली आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत जाणून घेण्यासाठी त्यांना त्याची मदत झाली. ‘मर्चंट-आयव्हरी’ या नावानं उदयाला आलेल्या फिल्म प्रोडक्शन कंपनीनं सुरुवात केलेल्या पहिल्या चित्रपटाचं संगीत  (The Householder, 1963) उस्ताद अली अकबर खान यांचं होतं, परंतु त्याच्या श्रेयनामावलीत ‘इन्सिडेंटल म्युझिक - वनराज भाटिया’ असा उल्लेख आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

तिथून त्यांचा जिंगल्स, लघुपट यांच्यासोबत चित्रपटसंगीताचाही खऱ्या अर्थानं प्रवास सुरू झाला. भाटियांनी चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली, तेव्हा तत्कालीन हिंदी चित्रपटसंगीताचा ताल आणि सूर वेगळा होता. व्यावसायिक चित्रपटांच्या साच्यामध्ये ठोकताळे मांडून त्याप्रमाणे संगीताची रचना केली जायची. तो हिंदी चित्रपटसंगीताचा उत्तम काळ होता आणि अनेक उत्तम मेलडीअस संगीताची रचना केली जात होती. पण त्या चित्रपटांची आणि त्या अनुषंगानं संगीताची एक दिशा ठरून गेली होती. त्यानंतर जेव्हा चित्रपटांची परिभाषा बदलण्याची गरज भासू लागली आणि श्याम बेनेगल किंवा गोविंद निहलानींसारख्या नवीन दिग्दर्शकांनी चित्रपटांत नवीन कथा-कल्पना आणल्या. चित्रपटाची भाषा रोमँटिसिसमपासून वेगळी वास्तवाच्या जवळ आणून ठेवणारी झाली. नवीन देहबोली, कॅमेरा वर्क किंवा अभिव्यक्ती, संकलनाची नवीन परिभाषा येत गेल्या… तेव्हा त्या सगळ्यांना आपल्या कवेत घेणाऱ्या संगीताची स्वाभाविक गरज निर्माण झाली.

चित्रपटांत गाणं असलं तरी ते कथेच्या ढाच्यात बसायला हवं आणि बसत नसेल तर कथेला अधिक परिणामकारक असणारं पार्श्वसंगीतही पुरेसं आहे, हा नवीन पॅरामीटर उदयाला आला. त्यात भाटियांसारखा भारतीय आणि पाश्चात्य संगीतात पारंगत असणारा, चित्रपटाची ध्वनिभाषा समर्पकपणे दृश्य भाषेत रूपांतरित करणारा संगीतकार भारतीय चित्रपटसृष्टीला मिळाला. भारतीय मेलडी आणि वेस्टर्न हार्मनीचा सुंदर मिलाफ त्यांच्या संगीतात ऐकायला मिळतो. त्यात लोकसंगीतापासून संस्कृतमधील मंत्र, ऑपेराज, भारतीय आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत असे अनेक प्रयोग केलेले दिसतात.

श्याम बेनेगल आणि वनराज भाटिया, हे दोघंही चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वी जाहिरातक्षेत्रात काम करायचे. त्यामुळेच त्यांची एकमेकांशी ओळख झाली. बेनेगल यांनी भाटियांनी केलेली ‘शक्ती सारी मिल्स’ची जिंगल ऐकून त्यांना ‘अंकुर’(१९७४)चं संगीत करण्याविषयी विचारलं आणि तिथून त्यांचा एकत्रित कलात्मक प्रवास सुरू झाला. त्या दोघांनी सुमारे १७ चित्रपट एकत्र केले. त्यांची तुलना प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक फेदेरिको फेलिनी आणि संगीतकार निनो रोता यांच्या एकत्रित कारकिर्दीसोबत केली जाते. भाटिया यांच्या संगीत कारकिर्दीत बेनेगलांचा उल्लेख करणं त्यामुळेच अपरिहार्य आहे.

बेनेगलांचे सुरुवातीचे चित्रपट ‘अंकुर’ (१९७४), ‘निशांत’ (१९७५) आणि ‘मंथन’ (१९७६) हे ग्रामीण पार्श्वभूमी असणारे होते. तेव्हा त्या चित्रपटसंगीतात प्रामुख्याने सतार, बासरी आणि सारंगीचा या वाद्यांचा वापर केलेला दिसतो. ‘मंथन’मध्ये प्रीती सागर या गायिकेने गायलेलं ‘मेरो गांव काथा पारे’ लोकप्रिय झालं आणि त्याचा अमूलच्या जाहिरातीत चपखल वापर करण्यात आला. ‘भूमिका’ (१९७७) या चित्रपटाचा काळ १९३०-५०मधील होता. आर. सी. बोराल यांनी न्यू थिएटर्ससाठी केलेलं संगीत अशी त्याचं संगीत करताना साधारण प्रेरणा होती. भाटिया त्यातल्या ‘सावन के दिन आए’ या गाण्यासाठी ट्रम्पेट आणि ‘तुम्हारे बिन जी ना लागे’ या गाण्यासाठी जलतरंग या वाद्यांचा सुरेख वापर केला.

पुढे ‘सरदारी बेगम’ (१९९६)मधील गाणी चित्रपटसंगीताचा वेगळा इतिहास लिहिणारी ठरली. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या, शुभा जोशी आणि आरती अंकलीकर यांनी गायलेल्या ठुमऱ्यांनी सरदारीचं संगीत अविस्मरणीय झालं. ‘सरदारी बेगम’साठी त्यांनी तबला, हार्मोनिअम आणि सारंगी या तीनच  वाद्यांचा प्रामुख्यानं वापर केला आहे. ‘मम्मो’ (१९९४)साठी अगदी ऐनवेळी गुलजारांनी लिहिलेल्या ‘ये फासले तेरी गलियों के’ या गाण्याच्या मधल्या पॉजमध्ये वाजवलेलं व्हायोलिन जगजितसिंग यांच्या आवाजासह फाळणीची वेदना आपल्या मनात अधिक गडद करते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तेच धर्मवीर भारती यांच्या साहित्यकृतीवर आधारित ‘सुरज का सातवा घोडा’ (१९९२) या चित्रपटासाठी वसंत देवांनी लिहिलेल्या राग यमनमधील ‘ये शामे, सब की शामे’बाबत म्हणावं लागेल. ‘सुसमन’ (१९९७) या चित्रपटात फारसं कुणाला माहीत नसणाऱ्या के. व्ही. कुरुविला या गायकांकडून ‘तेरो हरी नाम’ हे भजन गाऊन घेतलं, तर गोव्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ‘त्रिकाल’ (१९८५) या चित्रपटातील संगीतात मेंडोलिनचा सुरेख वापर केला आहे.

‘मंडी’ (१९८३) या चित्रपटांतील ‘चुभती हैं ये तो निगोडी’ हे १००हून अधिक वर्षांपूर्वी लिहिलेलं गाणं आशा भोंसले गाणार होत्या, परंतु त्यातले काही शब्द आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्यांनी या गाण्याचं रेकॉर्डिंग तीन वेळा रद्द केलं. तेव्हा भाटियांनी ज्येष्ठ उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांना आशाताईंना समजावून सांगण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी त्या गाण्याचा आशय समजावून सांगितल्यावर आशाताईंनी हे गाणं गायलं.

अपर्णा सेनच्या ‘३६ चौरंगी लेन’ (१९८१) या चित्रपटात पाश्चात्य चॉपिनच्या सुरावटीत भारतीय राग ‘मिया का मल्हार’ अलगद मिसळून जातो. त्यात भाटिया यांनी एकीकडे सुनीता रॉय, उषा उत्थुप, अलिशा चिनॉय, शेरॉन प्रभाकर आणि प्रीती सागर यांसारख्या गायकांना प्रथम संधी दिली, तर दुसरीकडे लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांसारख्या प्रथितयश गायिकांकडून ही महत्त्वाची गाणी गाऊन घेतली. कुमार साहनीच्या ‘तरंग’ (१९८४) या चित्रपटांत रघुवीर सहाय यांच्या कवितेवर आधारित सात मिनिटांचं ‘बरसे घन सारी रात’ हे गाणं लता मंगेशकरांच्या आवाजात आहे. ते भारतीय चित्रपट संगीतातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी एक आहे. ते लताबाईंनी एका टेकमध्ये गायलेलं आहे. त्यात एक तबला, पन्नास स्ट्रिंग्स आणि एक सारंगी याव्यतिरिक्त कुठलंही वाद्य नाही. हे गाणं एका तालात कसं बनलं, याचं आश्चर्य वाटून लताबाई रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये परत ते ऐकण्यासाठी आल्या होत्या.

लताबाई आणि आशाताई यांचा एक नियम असायचा की, जोपर्यंत त्या रेकॉर्डिंग करून स्टुडिओच्या बाहेर पडत नसत, तोपर्यंत ते गाणं ऐकायला कुणालाही परवानगी नसे. पण या गाण्याला मात्र त्यांनी अपवाद केला. कुमार साहनी यांना हे गाणं राग मांड आणि जोगियामध्ये, तेही विलंबित बारा मात्रातच हवं होतं. परंतु त्यात भाटियांनी सुरुवातीला आणि शेवटी भीमपलासीच्या आलापी वापरल्या आहेत. तेव्हा ते गाणं जोगिया, मांड आणि भीमपलास यांचा अद्भुत संगम म्हणून तयार झालं. कुमार साहनी यांच्या ‘कसबा’ या चित्रपटाची मध्यवर्ती थीम बीथोवनच्या पथेटिक पियानो सोनाटावरून प्रेरित होती. त्याच्या कथेच्या पार्श्वभूमीची आर्तता त्यावरून अधिक स्पष्ट होत गेली.

भाटियांनी गोविंद निहलानींच्या ‘तमस’ (१९८७)साठी दिलेलं संगीतही असंच महत्त्वपूर्ण आहे. भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला सांप्रदायिक कलह, ही या चित्रपटाची कथा. त्याच्या संगीतासाठी भाटियांनी वेगळा प्रयोग केला. हिंदू आणि शीख संप्रदायाच्या लोकांविषयीची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनी तेजपाल सिंग आणि सुरिंदर सिंग (सिंग बंधू) या शबड (शीख संगीत) आणि शास्त्रीय गायक असणाऱ्या गायकांकडून पारंपरिक गीतं आणि भजनं गाऊन घेतली. सांप्रदायिक दंग्यांच्या काही प्रसंगांत राग सिंध भैरवीचा परिणामकारक वापर केला आहे. या चित्रपटासाठी भाटियांना चित्रपट संगीतासाठीचं पहिलं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं.

‘अंकुर’ (१९७४) पासून सुरू झालेला चित्रपट संगीताचा त्यांचा प्रवास ‘हल्ला बोल’ (२००८) या चित्रपटापर्यंत सुरू होता. त्यात केवळ चित्रपटांतील गाणीच नव्हे तर असंख्य चित्रपटाचं पार्श्वसंगीत त्यांनी केलं. भारतातील दूरदर्शनयुगातील पहिली मालिका ‘खानदान’चं संगीत त्यांनी केलं. त्याचबरोबर ‘वागले की दुनिया’, ‘बनेगी अपनी बात’ किंवा ‘नकाब’सोबत बेनेगलांच्या ‘यात्रा’ आणि ‘भारत एक खोज’सारख्या मालिकांचं संगीत केलं. सोबत ‘नेहरू’, ‘टाटा स्टील’ किंवा ‘बाँबे एट स्टेक’सारख्या अनेक लघुपटांना संगीत दिलं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भाटियांनी चित्रपट, जिंगल्स किंवा दूरदर्शन मालिका यांच्यासह इब्राहिम अल्काझी, अलेक पदमसी, अमल अलाना आणि शांता गांधी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या रंगकर्मींनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनाही संगीत दिलं आहे. या सोबतच सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे ‘भगवदगीता’, ‘म्युझिक फॉर मेडिटेशन’ आणि ‘एलेमेंट्स ऑफ अर्थ’ यांसारख्या अनेक स्वतंत्र संगीत अल्बम्सची रचना केली. ‘चेंबर म्युझिक’, ‘व्होकल म्युझिक’, ‘म्युझिक फॉर सोलो पियानो’ आणि ‘अग्निवर्षा’सारखा ऑपेराही त्यांच्या संगीत खात्यांत जमा आहे.

हे सगळं  कवेत न येणारं संगीत कर्तृत्व वनराज भाटिया या संगीत अवलियाचं आहे. ते भारतातील अशा मोजक्या कलावंतांपैकी होते, ज्यांचं अकॅडेमिक ज्ञान, मिळालेल्या फेलोशिप्स आणि स्कॉलरशिप्समधून त्यांनी पाश्चात्य संगीताबद्दलची खोलवर जाण प्राप्त केली आणि ती अलगद आपल्या भारतीय संगीतात मिसळून संगीताला नवीन आयाम दिला आणि अनोखे परिमाण प्राप्त करून दिले.

त्यांना राष्ट्रीय पुरस्कारासोबतच संगीत नाटक अकादमी आणि ‘पदमश्री’ सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. मरणोत्तरही काही पुरस्कार दिले जातीलच. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची योग्य दखल घेतली गेली नाही किंवा ते आर्थिक विपन्नावस्थेत गेले, अशा आशयाच्या बातम्या प्रसारित झाल्या. अगदी कवेत न मावणारं संगीत कर्तृत्व असणाऱ्या कलावंताचं असं व्हावं, हे त्याच्यापेक्षा आपलं दुर्दैव अधिक आहे.

भाटियांसारख्या कलावंताला त्याच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरेसं श्रेय मिळालं नसेलही, आपल्यासाठी मात्र ते आयुष्यभर पुरेल इतका संगीत खजिना मागे ठेवून गेले आहेत.

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com                                                                   

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......