पुस्तकाचे पान हे रस्त्यावरच्या एखाद्या नाक्यासारखे असते. तिथली सारी पात्रे वाचकाच्या आगमनाची वाट पाहत असतात. फक्त वाचकाला आईसारखे काळ-वेळ ओलांडत तिथे जाता आले पाहिजे...
ग्रंथनामा - जागतिक पुस्तक दिन
रवींद्र कुलकर्णी
  • लेखक रवींद्र कुलकर्णी यांच्या आई
  • Fri , 23 April 2021
  • ग्रंथनामा जागतिक पुस्तक दिन World Book Day २३ एप्रिल 23 April ययाती वि. स. खांडेकर इरावती कर्वे युगान्त महाभारत पु. ग. सहस्त्रबुद्धे व्यंकटेश माडगूळकर नरहर कुरुंदकर

माझे वाचनाचे खूळ आईकडून आलेले आहे, याची मला आता खात्रीच होत आली आहे. घरात मी आधी पुस्तके आणायला सुरुवात केली की आईने या प्रश्नाचे उत्तर ‘मी’ असे आहे. तिच्या मनात पहिल्यापासूनच ते असावे आणि मी पुस्तके आणू लागताच तिच्या वाचनाच्या नादाला जागा मिळाली.

ती कर्नाटकातल्या जमखंडीतून महाराष्ट्रात आली. लग्नाआधी ती कन्नड शाळेत शिक्षिका होती. सारे शिक्षण कन्नडमधून झालेले असले तरी मराठी भाषा तिला अपरिचित नव्हती. जमखंडीत कन्नड-मराठी असे मिश्र वातावरण होते. तिथल्या कन्नड भाषेला मराठी टोन आहे आणि मराठीला कन्नड हेल आहे. गणेशोत्सवातदेखील मराठी आणि कन्नड असे मिश्र कार्यक्रम होत. मात्र तिला लग्नाआधी सफाईदारपणे मराठी वाचता येत नसावे. सासरी मराठीकडे झुकणारे वातावरण होते. डोंबिवलीत कन्नड भाषिकांची संख्या बऱ्यापैकी होती. तिथे कर्नाटक संघाचे लहानसे वाचनालय होते. तिकडून ती काही घेऊन येई. पण त्यात काही फारसे दर्जेदार नसावे. त्या वाचनालयात शिवराम कारंथ, वा. सी. बेंद्रे अशा काही अभिजात कन्नड साहित्यिकांची छायाचित्रे लावलेली होती. त्यांचे अभिजातपण तेव्हा काही मला समजत नसे. त्यांची पुस्तकेदेखील तिथे नसावीत. कारण तिच्याकडून कारंथ-बेंद्रे अशी नावे ऐकलेली मला आठवत नाहीत. दुय्यम-तिय्यम दर्जाचे साहित्य तिथे असावे, पण वाचणाऱ्याला त्याची भूक भागणे आवश्यक असते. त्यामुळे तिथले काही ती वाचत राही.

मराठी माध्यमात शिकणाऱ्या आम्हा भावंडांमुळे मराठीची तिला सवय होत गेली आणि कन्नड वाचन मागे पडले. तरीही मराठी पुस्तके तिने स्वत:हून वाचनालयातून आणली नाहीत. पण नंतर वाचनाचे खूळ मला लागले आणि मी जे आणे त्यातले काही ती वाचत राही. शाळेत असताना वि. स. खांडेकरांचे वेड अनेकांप्रमाणे मलाही होते. ते लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे पाठ्यपुस्तक होते. त्यात दरवर्षी त्यांच्या लेखनातले काही ना काही असे. एका ठराविक इयत्तेपर्यंत त्यांच्या कादंबऱ्यांतले उतारेच्या उतारे माझ्या वह्यांत दिसत असत. त्यात त्यांना नुकतेच ‘ज्ञानपीठ’ मिळाले होते. ‘कांचनमृग’, ‘क्रौंचवध’, ‘अमृतवेल’ अशा त्यांच्या कादंबऱ्या वाचण्याचा मी सपाटाच लावला होता. त्यातले मराठी सोपे होते. आईला ते जमू लागले व आवडूही लागले. त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीची परायणे तिने केली.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अनेक वर्षांनी नरहर कुरुंदकरांचा ‘ययाती’वरचा लेख हाताला लागला. त्यात खांडेकरांचा ‘ययाती’ महाभारतातल्या मूळ ‘ययाती’पेक्षा कसा वेगळा आहे, हे त्यांच्या शैलीत सांगितले आहे. उलट काही बोलायला त्यांनी जागाच ठेवली नव्हती. तो लेख मी तिला वाचायला दिला. त्यानंतर ‘ययाती’चे तिचे वेड कमी झाले. त्यानंतर अनेक वर्षांनी तिने ते एकदा परत वाचायला घेतले होते, पण ती त्यात रमली नाही. थोडे वाचून ते तिने सोडून दिले. जुने ‘ययाती’ तिने हाताळून सैल होऊन गेले होते. म्हणून मी नवीन आणले, तर ते तसेच पडून राहिले.

उत्तर कर्नाटकाला पु. ल. देशपांडे अपरिचित नव्हते. मुंबई-पुण्याकडचा माणूस पु.ल. जास्त सहज एन्जॉय करतो, तसे तिनेही केले. पण त्यातलेदेखील त्यांचे ‘ऑफ बीट’ लेख तिला जास्त आवडतात. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधल्या नंदा प्रधानसारखे. त्यांच्या विनोदी लेखांपेक्षा भावूक वर्णन करणारे लेख अजूनही ती कधीतरी वाचते. त्यांच्या ‘गुण गाईन आवडी’बरोबरच ‘वंगचित्रे’ आणि ‘गांधी’देखील तिला पसंत आहे. व्यंकटेश माडगूळकरांची गोडी लागावी म्हणून ‘करुणाष्टक’ तिला दिले. ते तिने आवडीने वाचले, तेही अनेकदा. त्यांच्या प्राणीविषयक लेखनात मात्र मी प्रयत्न करूनदेखील ती रमली नाही. ‘सिंहांच्या देशात’ थोडे वाचले आणि सोडून दिले. त्यांचेच ‘चित्रे आणि चरित्रे’ तर फक्त चाळले. गो. नी. दांडेकरांचेही असेच झाले. ‘स्मरणगाथा’ आणि ‘भ्रमणगाथा’ वाचले आणि त्यांच्या निसर्गाची वर्णने असलेल्या कादंबऱ्यांवर तिने फुली मारली. ‘स्मृतिचित्रे’ तिने वाचले आणि जवळ केले. पण ‘आहे मनोहर तरी’ थोडे वाचले आणि सोडून दिले.

श्री. ज. जोश्यांनी आनंदीबाईंवर लिहिल्यामुळे तिला ते पसंत आहेत. पंडिता रमाबाई आणि आनंदीबाई जोशी या तिच्या रोल मॉडेल असाव्यात असे मला वाटते. सरोजिनी वैद्यांच्या ‘संक्रमण’ या पुस्तकातले त्यांच्यावरले लेख बऱ्याचदा ती वाचत असते. लग्नानंतर पुढे शिकायला मिळेल असे सासरच्यांनी आईला कबूल केले होते, मात्र त्याकडे नंतर दुर्लक्ष झाले, असे एकदा पुसटसे तिने बोलून दाखवले आणि मला तिच्या ‘संक्रमण’वरच्या प्रेमाचा उलगडा झाला.

तिला आवडलेल्या पुस्तकांबद्दलदेखील माझे आणि तिचे एक-दोन वाक्यांपलीकडे बोलणे होत नाही. मी अंदाजाने पुस्तक सुचवतो आणि तिच्या हातात देतो. कधी तिला त्यातले एखादे आवडते. मला ते कळण्याचे साधन म्हणजे ती फोनवरून बहिणींशी बोलताना त्याचा उल्लेख थोडक्यात करते आणि नंतर ते अनेकदा वाचत असते. ‘विश्रब्ध शारदा’मधली आनंदीबाई जोशींनी गोपाळरावांना लिहिलेली पत्रे तिने वाचली आणि त्याबद्दल बहिणीला सांगताना मी ऐकले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

मी एखादे पुस्तक वाच असा आग्रह केला आणि जर तिला पहिल्या काही पानांत नाही आवडले तर ती वाचत नाही. स्वभावाने खट आहे. शिक्षिका म्हणून राहिली असती तर मुख्याध्यापक झाली असती! एकमेकांच्या वाचनावर आमचे लक्ष असते. आजकाल माझा वेळ पुस्तकांपेक्षा मोबाईलवर जास्त जातो, हे तिने माझ्या वाचनाचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीला ऐकवले.

‘महाभारत’ हा मात्र तिच्या आवडीचा विषय आहे. एकेकाळी ती ‘मृत्युंजय’ वाचत असे, पण नंतर ‘महाभारत - एक सूडाचा प्रवास’, ‘व्यासपर्व’ हे तिला पसंत पडले. ती रमली मात्र इरावतीबाईंच्या ‘युगान्त’मध्ये. तिने ते पहिल्यांदा वाचून ३०-३५ वर्षे तरी झाली असावीत. आजही ते पुस्तक दर दोनेक महिन्याने तिच्या हातात आठवडाभर तरी बघतो. एकदा मी तिला विचारले, ‘त्यातले तू सारखे काय वाचतेस?’ ती म्हणाली, ‘युगान्त म्हणजे काय, हे त्यात सांगितले आहे, ते!’ हे त्यातले शेवटचे प्रकरण आहे. शिवाय त्यातल्या गांधारी आणि द्रौपदी या तिच्या आवडत्या व्यक्तिरेखा आहेत, असेही ती म्हणाली. एक, नवरा आंधळा म्हणून स्वत:चे डोळे बांधून घेणारी, तर दुसरी आपल्या नवऱ्याचे डोळे उघडावेत म्हणून प्रयत्न करणारी! परस्परविरोधी आणि एकमेकांच्या विरोधी पक्षात असलेल्या या दोन्ही व्यक्तिरेखा आईला भावतात, हे ऐकून मला वाटते की, बरोबर-चूक किंवा चांगले-वाईट याच्या पलीकडचे तिला काही कळलेले आहे.

एकदा पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे निबंध वाचताना तिने ते मध्येच मिटले आणि म्हणाली, “यात म्हटले आहे की, रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची वनवासात जाण्याची आज्ञा पाळण्याऐवजी त्याला अटक केली असती. मलाही नेहमी नेमके हेच वाटायचे.” रिव्हिलेशनची चमक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तरळून गेली. पु.गं.चे आणि तिचे खरे होते. स्वत:च्या बापाला अटकेत टाकायचा मक्ता फक्त मुघलांनी घ्यावा असे थोडेच आहे?

श्री. ज. जोशी यांच्या ‘पुणेरी’तले किंवा वि. द. घाटे यांच्या ‘पांढरे केस हिरवी मने’ यातले विसाव्या शतकाच्या मध्यातले मराठी जग मी आणि तिने कधी अनुभवले नव्हते, पण वाचताना आम्हाला त्याची कल्पना येईल इतके ते जवळ होते. मला आवडणाऱ्या आणि तिला मान्य असणाऱ्या अशा मराठी पुस्तकांचे विश्व आता जवळपास विलयाला गेले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मराठीतल्या नवीन लेखकाचे पुस्तक क्वचित आणतो. लॉकडाऊनमध्ये दीपक घारे यांनी लिहिलेले लिओनार्दोचे चरित्र मी तिला दिले. ते मला आवडले होते. पण तिने ते फक्त पाहून ठेवून दिले. ते जग तिचे नव्हते. ती आता ऐंशीच्या घरात आहे. काळ आणि वेळेचा अध्येमध्ये गोंधळ होतो. डॉक्टर म्हणाले- वयपरत्वे मेंदूतल्या रक्तवाहिन्या आक्रसल्या आहेत. परवा पुस्तकांच्या कपाटात काही उलथापालथ करत होती. काय शोधते आहेस असे विचारले असता म्हणाली, ‘अरे, येथे भाव्यांचे गुलाबी कव्हरचे पुस्तक होते!’ ‘काय पाहिजे त्यातले?’ मी त्रासिक स्वरात विचारले. ‘त्यात फाळणीच्या दंगलीत सापडलेल्या एका स्त्रीची कथा होती.’ मला तर काही आठवत नव्हते. म्हटले जरा टोकून पहावे- “काय नाव होते पुस्तकाचे?” माझ्याकडे न पाहता ती म्हणाली, ‘रेशीमधागे!’ मी मुकाट्याने उठलो आणि पुस्तक शोधून दिले.

हे सगळे अनुभवताना वाटते की, या वाचनाचा परीघ वाढायला हवा होता. ‘स्मृतिचित्रे’मधून बालकवींच्या कवितेकडे किंवा ‘महाभारता’कडून ‘भगवदगीते’चा हात पकडून तत्त्वज्ञानाच्या प्रांतात शिरता आले असते. वाचनाचा प्रवास ‘माझे’ जीवन ते मानवी-जीवन असा होता होता राहिला. पु. भा. भावे तिचे आवडते कथाकार, पण त्यांना सोडून तिने इतर कथाकार वाचले नाहीत. तिने वाचायलाच फार उशिरा सुरुवात केली. भाषा बदलल्याचाही फरक पडला. तरुण असताना तिला कोणी वाचन समजावणारी व्यक्ती भेटायला हवी होती. तिने महाविद्यालयात न जाण्याचा आणि नंतर नोकरी न करण्याचा परिणाम साऱ्या कुटुंबावर झाला. तरीही तिला वाचताना पाहिल्यावर लक्षात येते की, असले अतिशय मर्यादित आणि चाकोरीतले वाचनदेखील व्यक्तीचे अंतस्थ जीवन कितीतरी समृद्ध करते. पुस्तकाचे पान हे रस्त्यावरच्या एखाद्या नाक्यासारखे असते. तिथली सारी पात्रे वाचकाच्या आगमनाची वाट पाहत असतात. फक्त वाचकाला काळ-वेळ ओलांडत तिथे आईसारखे जाता आले पाहिजे...

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......