गरिबांकडे अतिशय कमी साधनं असल्यामुळे आर्थिक दृष्टीनं पाहता त्यांच्या अस्तित्वाविषयी काहीच शिकण्यासारखं नाही, असा त्याचा अर्थ काढला जातो
ग्रंथनामा - झलक
अभिजित बॅनर्जी-एस्थर डुफ्लो
  • ‘गरिबीचे अर्थकारण’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 April 2021
  • ग्रंथनामा झलक गरिबीचे अर्थकारण Poor Economics अभिजित बॅनर्जी Abhijit Banerjee एस्थर डुफ्लो Esther Duflo

अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ असलेल्या अभिजित बॅनर्जी-एस्थर डुफ्लो यांचं जागतिक पातळीवर गाजलेलं ‘पुअर इकॉनॉमी’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाकडून ‘गरिबीचे अर्थकारण’ या नावाने मराठीत येत आहे. अतुल कहाते यांनी हा मराठी अनुवाद केला आहे. या पुस्तकाची झलक दाखवणारी प्रस्तावना...

..................................................................................................................................................................

वयाच्या सहाव्या वर्षी एस्थरनं मदर टेरेसांवर आधारित असलेलं एक चित्ररूपी पुस्तक वाचलं. त्या काळी ‘कलकत्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात प्रचंड दाटीवाटी असल्यामुळे तिथल्या प्रत्येक रहिवाशासाठी सरासरी १० चौरस फूट एवढीच जागा उपलब्ध असल्याचा उल्लेख या पुस्तकात होता. त्यामुळे ‘हे शहर म्हणजे बुद्धिबळाचा एखादा अजस्त्र पट असावा; त्यामध्ये प्रत्येक रहिवाशासाठी जमिनीवर ३ फूट लांब आणि ३ फूट रुंद असे कप्पे आखलेले असावेत आणि अशा प्रत्येक कप्प्यात एक रहिवासी प्याद्यासारखा कोंबलेला असावा’ असं दृश्य तिच्या मनावर कोरलं गेलं. ‘आपल्याला या संदर्भात काही करता येईल का?’ असा विचारही तिच्या मनात येऊन गेला.

एमआयटीमध्ये पदवीचं शिक्षण घेत असताना वयाच्या २४ व्या वर्षी एस्थरनं कलकत्त्याला भेट दिली. विमानतळावरून टॅक्सीनं शहराकडे जात असताना जिथे बघावं तिथे झाडं, गवताळ भाग, पादचारी मार्ग अशा मोकळ्या जागा दिसल्यामुळे ती जरा निराशच झाली. त्या चित्ररूपी पुस्तकामध्ये अगदी ठळकपणे रेखाटण्यात आलेलं विदारक दृश्य कुठे होतं? त्यामधले सगळे लोक कुठे होते? गरीब लोक कुठे राहतात, हे आपल्या वयाच्या सहाव्या वर्षी अभिजितला माहीत होतं. कलकत्त्यामधल्या त्याच्या घराच्या मागच्या भागामध्ये असलेल्या मोडक्यातोडक्या झोपड्यांच्या वस्त्यांमध्ये ते राहायचे. त्यांच्या मुलांना मनसोक्त खेळण्यासाठी नेहमीच भरपूर वेळ असावा असं वाटायचं आणि जो खेळ खेळू त्यात ते अभिजितला पराभूत करायचे. गोट्या खेळायला म्हणून अभिजित तिथे कधी गेला, तर खेळ संपताना ही मुलं त्या गोट्या जिंकून आपल्या खिशांत घालून निघून जायची. अभिजितला त्यांचा हेवा वाटत असे.

गरिबांकडे अशा साचेबद्ध प्रकारे बघण्याचा हा प्रकार गरिबी अस्तित्वात असल्यापासूनचा आहे. सामाजिक विश्लेषणात आणि साहित्यामध्ये आलटून-पालटून गरिबांचं वर्णन करताना ते आळशी किंवा कामसू, प्रामाणिक किंवा चोरट्या प्रवृत्तीचे, चिडखोर किंवा शांत, परावलंबी किंवा आत्मनिर्भर असतात असं वर्णन असतं. साहजिकच, गरिबांविषयीच्या अशा दृष्टिकोनांवर विसंबूनच त्यांच्यासंबंधीची धोरणं आखली जातात. त्यात ‘गरिबांसाठी मुक्त बाजारपेठा’, ‘मानवी हक्कांना खूप महत्त्व देणं’, ‘आधी संघर्षाशी मुकाबला करा’, ‘सगळ्यांत गरीब असलेल्यांना आधी पैसे द्या’, ‘विदेशी मदतीमुळे विकास ठप्प होतो’, अशी अनेक प्रकारची – सुलभीकरणातून जन्मलेली - उत्तरं असतात. या सगळ्या संकल्पनांमध्ये काही प्रमाणात सत्य असतं; पण सर्वसामान्य गरीब पुरुष किंवा स्त्री यांच्या आशा-आकांक्षा आणि शंका, मर्यादा आणि स्वप्नं, समज आणि गोंधळ यांचा त्यात विचार केलेला नसतो. जर गरीब लोक त्यात असतीलच, तर त्यांच्याविषयी एखादा आशादायक प्रसंग किंवा एखादी दु:खद घटना यांचा वापर करून अशा प्रसंगा/घटनेला नाट्यमयता दिली जाते. त्यांचं आपल्याला कौतुक वाटावं किंवा त्यांच्याविषयी आपल्याला कीव वाटावी, असं काहीसं त्यात असतं; पण त्यांना नेमकं काय हवं आहे, याविषयी त्यांचंच मत जाणून घेण्याची तरतूद मात्र त्यात नसते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गरिबांच्या अर्थशास्त्राविषयीचं काम करणारे अर्थतज्ज्ञ बरेचदा याची गल्लत ‘गरीब’ अर्थशास्त्राशी करतात. म्हणजेच गरिबांकडे अतिशय कमी साधनं असल्यामुळे आर्थिक दृष्टीनं पाहता त्यांच्या अस्तित्वाविषयी काहीच शिकण्यासारखं नाही, असा त्याचा अर्थ काढला जातो. या तज्ज्ञांच्या या अशा दृष्टिकोनामुळे जागतिक पातळीवरच्या (म्हणजेच सर्वत्र आढळणाऱ्या) गरिबीविरोधातला लढा एकदम कमकुवत होऊन जातो. हे प्रश्न सोपे असून त्यांची उत्तरंही सोपी आहेत असं मानलं जातं. गरिबीशी लढण्यासाठीच्या धोरणांमध्ये एकदम क्षणार्धात चमत्कार घडवू शकणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो; पण प्रत्यक्षात हे चमत्कार कधी घडतच नाहीत. खरोखरची प्रगती साधावयाची असेल, तर ‘गरीब लोक म्हणजे कुठल्या तरी चित्रकथेमधली पात्रं नसून आपण त्यांची आयुष्यं समजून घेतली पाहिजेत’ ही जाणीव आपल्याला व्हायला हवी. त्यांच्या आयुष्यात खूप क्लिष्टता असते आणि त्यातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. गेली १५ वर्षं आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमची पार्श्वभूमी शैक्षणिक असल्यामुळे आम्ही काही गृहीतकं मांडतो आणि उपलब्ध असलेल्या माहितीशी ती ताडून बघतो. असं असलं, तरी आमच्या कामाच्या स्वरूपामुळे आम्ही अनेक दशकांपासून काही गैरसरकारी संघटनांचे सदस्य, सरकारी बाबू, आरोग्यदूत आणि अल्प-मुद्दलाची कर्ज देणारे लोक, अशा अनेक जणांबरोबर प्रत्यक्ष काम केलं आहे. त्यामुळे खेड्यापाड्यांमधल्या गरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांना प्रश्न विचारणं आणि माहिती गोळा करणं आम्हाला शक्य झालं. तिथे भेटलेल्या लोकांनी दयाळूपणा दाखवला नसता, तर हे पुस्तक लिहिणं अशक्यच झालं असतं. बहुतेक वेळा आम्ही तिथे अचानकपणे जाऊनसुद्धा त्यांनी आम्हाला पाहुण्यांसारखं आदरानं वागवलं. आमच्या प्रश्नांचा हेतू त्यांना समजत नसला, तरी त्यांनी विस्तारानं आणि न कंटाळता आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

ही माहिती घेऊन आमच्या कार्यालयांमध्ये आम्ही तिचं विश्लेषण करायचा प्रयत्न करत असू. अशा वेळी आम्हाला भारून गेल्यासारखं होई; तसंच, गोंधळात पडल्यासारखंही वाटत असे. आम्हाला प्रत्यक्षात मिळत असलेली माहिती प्रामुख्यानं पाश्चिमात्य जगानं तयार केलेल्या संकल्पना आणि प्रारूपं यांच्याशी जुळवताना अक्षरश: नाकीनऊ येत असत. प्रत्यक्ष पुराव्यांमुळे या संकल्पना पार धुडकावून लावण्याची वेळ आमच्यावर अनेकदा आली. पण तसं काही करण्यापूर्वी या संकल्पना बिनकामाच्या का ठरत आहेत आणि त्यांच्यामध्ये सुयोग्य बदल कशा प्रकारे केले पाहिजेत, यांवर मात्र आम्ही सातत्यानं काम करत राहिलो. या घुसळणीतूनच हे पुस्तक जन्मलेलं आहे. गरीब लोक कसे राहतात, याची सुसंगत मांडणी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आमचा भर जगभरातल्या सगळ्यांत गरीब लोकांवर आहे. जगभरातल्या सगळ्यांत गरीब ५० देशांमध्ये दारिद्र्यरेषेची व्याख्या ‘प्रतिदिन प्रतिव्यक्ती १६ भारतीय रुपयांपेक्षा कमी रक्कम’ अशी आहे. (ही सर्व आकडेवारी २००५च्या विनिमय दरावर आधारित आहेत.) सध्याच्या विनिमय दरानुसार या सोळा रुपयांचा अर्थ ३६ अमेरिकी सेंट्स एवढा होतो. अर्थात, गरीब देशांमध्ये स्वस्ताई असल्यामुळे तिथल्या लोकांना ते विकत घेत असलेल्या वस्तू अमेरिकेत विकत घ्यायच्या झाल्या, तर मात्र त्यासाठी ९९ सेंट्स लागतील. म्हणूनच, गरीब लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल, तर आपण मायामी (Miami) किंवा मॉडेस्टो (Modesto) येथे दिवसाचा (राहण्याव्यतिरिक्तचा) खर्च ९९ सेंट्स एवढाच करू शकतो असं समजू. अर्थातच, भारतामध्ये हे अजिबात सोपं नाही. भारतात एवढ्या पैशांमध्ये १५ छोटी केळी किंवा दुय्यम दर्जाचे साडेचारशे ग्रॅम (०.४५३६ kg) तांदूळ येतील. एवढ्यावर कुणी आपला संपूर्ण दिवसभराचा उदरनिर्वाह कसा काय चालवू शकेल? असं असलं, तरी २००५ साली जगामधले १३ टक्के म्हणजे ८६.५० कोटी लोक अशाच प्रकारे जगत होते.

तरीही, इतकं दारिद्र्य नशिबी असलेले लोकसुद्धा बहुतेक सगळ्या बाबतींमध्ये आपल्यासारखे आहेत, ही यामधली आश्चर्याची गोष्ट मानली पाहिजे. त्यांच्या आणि आपल्या इच्छा-आकांक्षा, तसंच, कमकुवत दुवे हे सगळं एकसारखंच असतं. गरीब लोकांची तर्कबुद्धी आपल्यासारखीच असते. उलट, त्यांच्यासमोरचे पर्याय खूपच कमी असल्यामुळे ते उपलब्ध पर्यायांमधल्या योग्य पर्यायाच्या निवडीविषयी खूप काळजी घेतात. निव्वळ आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच त्यांना तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञांसारखं (नियमबद्ध) वागणं भाग पडतं. असं असलं, तरी त्यांच्या आणि आपल्या आयुष्यांमध्ये काडीमात्र साम्य नसतं. आपल्या आयुष्यामधल्या बहुतेक गोष्टी आपण पार गृहीत धरणं आणि त्याविषयी फार विचार न करणं, ही आमच्या व गरिबांच्या आयुष्यातील फरकाची प्रमुख कारणं आहेत.

९९ सेंट्सवर दिवस काढणं म्हणजेच ओघानं पुरेशी माहिती उपलब्ध नसणं किंवा ही माहिती माहीत नसणं हे ओघानं आलंच. वर्तमानपत्रं, टीव्ही, पुस्तकं या सगळ्यांसाठी पैसे लागतात. साहजिकच, उरलेलं जग ज्या गोष्टी गृहीत धरतं, त्या गोष्टी या गरीब लोकांना समजूच शकत नाहीत. उदाहरणार्थ, आपल्या मुलांना गोवर होऊ नये म्हणून त्यांना आपण गोवरप्रतिबंधक लस दिली पाहिजे हे त्यांना कुठून समजणार? जगामधल्या सगळ्या व्यवस्था आणि योजना गरिबांसाठी नाहीतच असाही त्याचा अर्थ होतो. बव्हंशी गरीब लोकांना नोकरी नसल्यामुळे पगार नसतो आणि पगार नसल्यामुळे त्यातून आपोआप काही रक्कम वळती होऊन त्यांच्या निवृत्तीवेतनाची सोय होण्याचाही प्रश्न नसतो. ठळक मोठ्या अक्षरांत छापलेलंच मुळात वाचता येत नसताना अत्यंत छोट्या टाइपात छापलेलं वाचण्याचा प्रयत्न करण्यासारखा हा प्रकार आहे. ज्या माणसाला धडपणे वाचतासुद्धा येत नाही, त्यानं ज्यांच्या नावांचा उच्चारसुद्धा करता येणं कठीण आहे, अशा आजारांची यादी असलेल्या आरोग्यविमा योजनांचा अर्थ कसा लावायचा?

याचाच अर्थ असा, की गरीब लोकांना आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा खराखुरा वापर करणं आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी तरतूद करणं यांसाठी कमालीची मेहनत, दांडगी इच्छाशक्ती, जबाबदारी घेण्याची तयारी - हे सगळं लागतं. यामुळेच आपण ज्या बारीकसारीक गोष्टींचा, अडचणींचा आणि चुकांचा विचारसुद्धा करत नाही, अशा अनेक गोष्टी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

दारिद्र्यापासून सुटका करून घेणं सोपं नाही. तरीही, गरिबांच्या बाबतीमधल्या निरनिराळ्या शक्यता, तसंच, त्यांना नेमकेपणानं होऊ शकणारी मदत यांच्यामुळे त्यांच्या परिस्थितीत व जगण्यात आश्चर्यकारकरीत्या बराच फरक पडू शकतो. याची दुसरी बाजू म्हणजे, चुकीच्या अपेक्षा, विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टींवर अविश्वास दाखवणं आणि वरवर बारीकसारीक वाटत असलेल्या अडचणी, या गोष्टी विलक्षण धक्के देऊ शकतात. योग्य बटण दाबण्याचा खूप फायदा होऊ शकतो; पण नेमकं कुठलं बटण योग्य आहे, हेच कळणं कठीण असतं. तसंच, असं एकच एक बटण सगळे प्रश्न सोडवू शकत नाही हेसुद्धा नमूद केलं पाहिजे.

लोक काय खरेदी करतात, त्यांच्या मुलांच्या शाळांविषयी ते काय करतात, त्यांच्या स्वत:च्या तसंच कुटुंबीयांच्या आरोग्याविषयी ते काय करतात, आपल्याला किती मुलं व्हावीत हे ते कसं ठरवतात, अशा मुद्द्यांनी आम्ही प्रकरणांची सुरुवात केली आहे. त्यानंतर बाजारपेठा आणि संस्था गरिबांसाठी कशा प्रकारे काम करतात, याकडे आम्ही वळतो. यात कर्ज, बचत, विमा, अशा गोष्टींचा समावेश आहे. सरकारची गरिबांना कुठे मदत होते आणि कुठे ती होत नाही यांवर आम्ही प्रकाश टाकला आहे. पुस्तकात वारंवार आम्ही त्याच मूळ प्रश्नांकडे वळलो आहोत. गरिबांना आपलं आयुष्य सुधारण्याची संधी आहे का आणि त्यात त्यांना कोणत्या अडचणी येतात? या सगळ्याची (सुधारणेची) सुरुवात करणंच त्यांना अवघड होतं; का अशी सुरुवात केल्यानंतर त्यात पुढे वाटचाल करणं त्यांना जड जातं? हे सगळं खूप महागडं का असतं? लोकांना यातून होणाऱ्या फायद्यांची पुरेशी जाणीव असते का? आणि तशी जाणीव नसेल, तर त्याविषयी जाणून घेणं त्यांना एवढं अवघड का होऊन बसतं?

गरिबांची आयुष्यं आणि त्यांच्याकडे असलेले पर्याय या गोष्टी जागतिक पातळीवरच्या गरिबीशी लढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ‘गरिबीचे अर्थकारण’ हे पुस्तक या विषयीच आहे. उदाहरणार्थ, लघुकर्जाची संकल्पना जग बदलून टाकणारी आहे, अशी आशा वाटण्यापासून ही संकल्पना का उपयुक्त आहे, हे समजण्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. बहुतेक वेळा फायद्यापेक्षा नुकसानकारकच ठरणारी आरोग्यसेवाच गरिबांच्या वाट्याला का येते हे यातून कळू शकतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

वर्षानुवर्षं शाळेत शिकूनसुद्धा गरिबांची मुलं प्रत्यक्षात काहीच का शिकत नाहीत, याचा बोध आपल्याला त्यातून होऊ शकतो. गरिबांना आरोग्यविमा का नको असतो, याची आपल्याला त्यातून जाणीव होऊ शकते. याखेरीज अलीकडच्या काळात जादू घडवू शकतील असं मानल्या जाणाऱ्या कित्येक संकल्पना पूर्णपणे अयशस्वी का ठरल्या आहेत, हेसुद्धा आपल्याला उमगू शकतं. याखेरीज आपल्याला कुठे आशेची किरणं दिसू शकतात, हेसुद्धा प्रस्तुत पुस्तक सांगतं.

नावापुरत्या दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाचे खरोखर चांगले परिणाम कसे होऊ शकतात, विम्याची विक्री अधिक चांगल्या प्रकारे कशी केली पाहिजे, शिक्षणात खूप काही करण्यापेक्षा मोजक्या गोष्टी करणंच कसं हितावह ठरू शकेल, आर्थिक वृद्धीसाठी चांगल्या दर्जाच्या नोकऱ्यांची गरज का असते, अशा अनेक मुद्द्यांना हे पुस्तक स्पर्श करतं. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, आशा ही अतिशय गरजेची का असते आणि ज्ञानावाचून काहीच का साध्य होऊ शकत नाही, या गोष्टींविषयी हे पुस्तक सांगतं. समोर अशक्यप्राय आव्हान दिसत असूनही आपण प्रयत्न का सोडता कामा नयेत यावर भर देतं. यश नेहमीच खूप दूर आहे असं वाटत असलं, तरी दर वेळी ते खरंच इतक्या दूर असतं असं नाही!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......