अजूनकाही
‘परिवर्तनवादी विचारप्रवाह’ हा डॉ. व्ही. एल. एरंडे व डॉ. नारायण कांबळे यांचा लेखसंग्रह नुकताच ‘शब्दशिवार प्रकाशना’ने प्रकाशित केला आहे. या संग्रहात महात्मा फुले, महर्षि शिंदे, डॉ. आंबेडकर, गाडगेमहाराज, शाहू महाराज, रा. ना. चव्हाण, यशवंतराव चव्हाण यांच्यावरील लेख आहेत. या पुस्तकाला ज्येष्ठ महावीर जोंधळे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
विचार समजून घेणे आणि वर्तमानातील प्रवाह समजून घेणे ही परिवर्तनाच्या प्रवाहातील पहिली महत्त्वाची गोष्ट असते. वर्तनाला विचारांचा पाया लाभल्याशिवाय वाट चालता येत नाही. हातात उजेड आहे, डोळ्यांत दृष्टी आहे, परंतु गोंधळलेल्या अवस्थेत कोणत्या वाटेवरून चालायचे, त्यासाठी चालत राहणे आणि पुढे जाणे यासाठी मार्गदर्शक ग्रंथ म्हणून या पुस्तकाची नोंद महत्त्वाची ठरते. या पुस्तकाच्या पानापानांवर समतेच्या श्रद्धेचा निष्ठेने केलेला जागर दिसून येतो. ही कृतज्ञतापूर्वक विचारांची केलेली पेरणी आपल्या अनंत पिढ्यांना अंत:करणातून परिवर्तनाची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी मेंदूला सशक्त करण्याची ऊर्जा देते.
हे पुस्तक ज्या विचारवंतांच्या, प्रबोधनाच्या वाटेवरील दीपस्तंभांच्या जीवनविचारांनी ओतप्रोत भरलेले आहे, ते महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि.रा. शिंदे, छत्रपती शाहू महाराज, अण्णा भाऊ साठे, संत गाडगेमहाराज, रा. ना. चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राला घडवणारे द्रष्टे विचारवंत आहेत. त्यांच्या विचारांनी आजचा महाराष्ट्र पुरोगामी झाला, असे ते शिल्पकार आहेत. विचारांचे कृतीच्या पातळीवरील दर्शन ज्यांच्या जीवनकार्यात दिसते, असे हे प्रबोधनकार आहेत. परिवर्तनाचा हा विचारप्रवाह आज आम्ही आमच्या मनोभूमीवरती वळवला नाही, तर आपल्या पिढीचे अतोनात नुकसान ठरलेलेच आहे. ज्या त्या काळात समाजसुधारकांच्या जीवनचरित्राला, विचारचरित्राला जवळून अभ्यासावे लागते. वरवरच्या उथळपणाने आम्ही आमचा पाया हरवून बसतो आणि शेवटी शिल्लक उरते ते फक्त लोंबकळणे. ही लटकणारी वर्तमानातील माणसांची अवस्था मूळातून सुधारक समजून न घेतल्याचे परिणाम आहेत.
धमचिकित्सा काय आहे, शिक्षण आणि आरक्षणाचे धोरण राबवणारे शाहू महाराज कसे होते, धमर्सुधारणेचा विचार तुम्ही कसा करणार आहात, धम्मक्रांती तुम्ही कशी समजून घेणार आहात, जाती अंताचा मूळ विचार कसा केला गेला, मानवमुक्तीचा आणि राष्ट्रवादाचा प्रखर पुरोगामी विचार कोणता होता, या सर्व प्रश्नांची उत्तरे हा ग्रंथ आपणास देतो. समाजाचे परिवर्तन हे समता व सामाजिक न्यायाच्या आधारे झाले पाहिजे आणि माणसाला माणूस म्हणून त्याचे मूल्य प्राप्त झाले पाहिजे, यासाठी अखंडपणे झीज सोसणारा कणा या सर्वांच्या कार्याने आपल्या व्यवस्थेला प्राप्त झाला. नाहीतर कणा हरवलेल्या लुळ्यापांगळ्यांसारखी आपली गत झाली असती. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी विचारांच्या बळावर लढले पाहिजे, याचा ध्यास घेऊन महात्मा फुले ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंतची ही महान क्रांतिकारकांची पिढी उभी होती. ज्ञान बंदी घालणाऱ्या व्यवस्थेच्या मुळाशी सुरुंग पेरून ज्ञानाच्याच उजेडात चालायचे आहे, हा त्यांचा जीवनध्यास माणसाच्या जगण्याशी संबंधित प्रत्येक घटकावर अभ्यास करून त्या जीवन जाणिवेला लख्ख करण्यात ते यशस्वी झाले. अंधारात चाचपडणाऱ्यालाच या उजेडाची किंमत कळू शकते. ज्यांचे डोळे भयाण अशा थक्क उजेडाने दिपून गेलेले आहेत, त्यांच्याही डोळ्यांत उद्या अंधारच अंधार दाटणार आहे. म्हणून वेळीच हा वारसा आपल्या जीवनदृष्टीत सामावून घ्यावा लागेल. विचारधारेचा हा पिंड अंगी बाणवावा लागेल. त्यासाठीच हा परिवर्तनवादी विचारप्रवाह खळाळून वाहतो आहे.
सभोवतालच्या भावविश्वात शोषित, वंचित घटकाबाबत कमालीची अनास्था व उदासीन वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जगण्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वि.रा. शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारप्रवाहाची पुनर्मांडणी करावी लागेल, याचेही महत्त्व येथे अधोरेखित होताना दिसते आहे.
आधुनिक मनोवृत्ती लादल्या गेलेल्या अज्ञानात बुडण्यात आनंद मानणारी आहे. मेंदूला घासून-पुसून घेण्याची प्रक्रिया या काळात बंद होताना दिसते आहे. ज्ञानाचा, ज्ञानाधिष्ठित भूमिकेचा स्पर्श या मेंदूला होताना दिसत नाही. जागृतीची स्पंदने मग कधी निर्माण होणार हा प्रश्न आहे. या भयावह कालखंडात, अशा गोंधळलेल्या कालखंडात या पुस्तकातील महत्त्वाच्या विचार ओळी सांगतात- “अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही जन्मणार नाहीत, म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानाला अत्यंत आवश्यकता आहे.”
काळाच्या त्या पातळीवर मांडलेला हा विचार आहे. आजच्या काळाच्या या पातळीवर आपण शिक्षणाची सक्ती केली. शिक्षण मोफतही केले, परंतु या शिक्षण व्यवस्थेतच अंधाराचे एक जग निर्माण होताना दिसते आहे. त्यांच्याही अज्ञान जगाला जागे करण्यासाठी हा प्रवाह मनोबल देईल. आजच्या शिक्षणव्यवस्थेत आपण या सर्व मूल्यांचा पुस्तकात अवलंब करतो, परंतु पुस्तकाच्या बाहेर जेव्हा व्यावहारिक जीवनात जगतो, तेव्हा शिक्षकांपासून ते समाजातील विविध स्तरांतील प्रत्येक माणसांपर्यंत शिक्षणाने दिलेल्या मूल्यांकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टीच संपल्याचे जाणवते.
जाते फिरते आहे, त्यात कुणीतरी घास भरवते आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत समाज नावाचे मूल्य भरडून निघते आहे. कुणाच्या तरी व्यवस्था टिकण्यासाठी अख्खा समाज आज स्वत:ला भरडून घेण्यास हसत हसत तयार होताना दिसतो आहे. त्याला स्वत:च्या भरडण्याची जाणीवही होत नाही. अशा वेळी तो व्यवस्थेच्या विरोधातला हुंकार तरी टाकेल का?
त्या हुंकारासाठी, त्या क्रांतीसाठीही या पुस्तकातील महान माणसांच्या कार्याची विविधांगी ओळख सर्वस्पर्शी आहे. आज धमचिकित्सा म्हटले की, आपले तोंड बंद असते. शिक्षण आणि आरक्षणाचे काय चालले आहे, समाज सुधारणा फक्त फोटोपुरतीच उरली की काय, मानवमुक्ती काय आहे, क्रांतिकारक जन्माला येण्यावर या भूमीत बंदी आहे का? समाजप्रबोधनाचे नवे हत्यार कुठल्या अडगळीला पडलेले आहे? या सर्व शोधासाठी आपण तयार व्हावे म्हणून आणि म्हणूनच हा विचारप्रपंच आपल्यासमोर येतो आहे.
‘आंबेडकरवाद’ ही वैचारिक बैठक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर समग्र दलित चळवळीची व राजकारणाची नव्याने पुर्नमांडणी करण्याची गरज आहे. चळवळीचे राजकीय समाजशास्त्र व राजकीय अर्थशास्त्र यांचे सूक्ष्मपणे अवलोकन करून बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य चळवळीत निर्माण होण्याची गरज आहे. मुळात नव्याने एक चळवळ उभी राहण्याची गरज आहे. चळवळींनी पांघरून घेतले की, लुटारूंचे साम्राज्य फोफावते. आपण त्या साम्राज्यासाठी जन्माला आलो आहोत काय, याची एक अस्वस्थता मनात चमकून जाते. समग्र समूहाच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्थानाची मुहूर्तमेढ, समग्र सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ ‘मुक्ती कौन पथे’च्या विचारधारेत उभे राहूनच आपल्याला पुढे न्यावी लागेल.
सहानुभूती शून्य समाजात आजही मानवमुक्तीचा लढा पुढे न्यायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी वाट दाखवली, त्या वाटेकडे आपण निदान पाहतो तरी का आणि कसे पाहतो, याचे या पुस्तकातील ‘धम्मक्रांतीनंतरची दलित चळवळ : एक चिकित्सा’ हे चिंतन मोलाचे आहे. राष्ट्रवादी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीची जी वाट दिली, ती वाट देताना त्यांनी इतर कोणताही धर्म न स्वीकारता भारतीय परंपरेतील व संस्कृतीतील बौद्ध धमार्चाच स्वीकार केला, हे लक्षात घेतले पाहिजे.
स्वातंत्र्याशी व राष्ट्रीय भावनेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ नये, हा घटना समितीत दिलेला इशारा आजच्या राज्यकर्त्यांनी देखील विचारात घेण्यासारखा आहे. जातीअंत आणि बहुजनवादी विचार यावर आधारित राजकारण करणे हे यशवंतराव चव्हाणांच्या विचार व कार्याचे प्रमुख सूत्र होते याचाही विचारगाभा इथे प्रखरतेने तरळून जातो. सुधारणेचा कळस गाठताना आपल्या कृतीतून संत गाडगेबाबांनी आपल्याला एक आदर्शपाठच घालून दिलेला आहे. असा संत-महात्मा आपण आपल्या जीवनाला बिलगून घेणार आहोत की नाही? त्यांच्या कार्याची ओळखही मग आपली वहिवाट स्पष्ट करून टाकते. त्याचेही मुक्तचिंतन यात आले आहे. महर्षी वि. रा. शिंदे यांचे वैचारिक वारसदार यांच्या कार्याचा पट रा. ना. चव्हाण यांच्यावरील लेखात विस्तृत मांडली आहे. प्रबोधनाचे वारसादार कसे असतात आणि त्यांच्या कामाची पद्धत पुढे कशी न्यायची असते, त्याचे उत्तम उदाहरण रा. ना. चव्हाण यांच्या लेखातून पाहायला मिळते.
डॉ. व्ही. एल. एरंडे आणि नारायण कांबळे यांच्या विचारकक्षा अभ्यासनीय आणि संदर्भांकित आहेत. विचारांचा धागा पुढे गुंफत नेताना प्रत्येक महापुरुषाच्या सामर्थ्याला एका लेखामधून कवेत घेणे ही अवघड बाब. परंतु नेमकेपणाच्या बांधीव शैलीतून त्यांनी हे सामर्थ्य मोठ्या कष्टाने पेलले आहे. हे पुस्तक म्हणजे महान पुरुषांच्या कार्याची आणि विचारांची लेणी आहेत. अनुक्रमणिकेतील प्रत्येक शीर्षकाला न्याय देत आणि महापुरुषांच्या विचारकार्याला समजून घेत पुढे पुढे नेणारा हा प्रवाह परिवर्तनवादी माणसांच्या जीवन जाणीवेला जागा करणारा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे.
पुन: पुन्हा विचारांवर घासून घेणे ज्यांना जमते त्यांनाच प्रवाहीत होता येते. पायाभूत विचारांचा आवेग समजून घेऊन परिवर्तनाच्या दिशेने वाहणे जमण्यासाठी तत्त्वाचे खूप मोठे बळ अंगी असावे लागते. त्या बळावरच आपण उभे राहावे यासाठी हा लेखनाचा अट्टाहास आहे. विचारवंतांच्या सामर्थ्याला पुन्हा पुन्हा मन, मेंदूत आणि शेवटी कृतीत आणण्यासाठीच हा परिवर्तनवादी विचारप्रवाह आहे.
‘परिवर्तनवादी विचारप्रवाह’ - डॉ. व्ही. एल. एरंडे व डॉ. नारायण कांबळे
शब्दशिवार प्रकाशन, पुणे
मूल्य - २७५ रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment