‘वेटिंग आहे राव!’ : नायकाच्या वधूशोधाची आणि खाद्यभ्रमंतीची रंजक आणि वाचनीय दीर्घकथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘वेटिंग आहे राव!’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Thu , 15 April 2021
  • ग्रंथनामा शिफारस वेटिंग आहे राव! स्वागत पाटणकर पुणे कांदेपोहे खाद्यपदार्थ

‘वेटिंग आहे राव’ या पुस्तकाचा नायक आणि लेखक हे दोघेही मूळचे पुण्यातील आहेत. लेखकाने पुणे शहर आणि पुण्यातील उत्तमोत्तम खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणे या दोन महत्त्वाच्या संकल्पना हे पुस्तकात लिहीत असताना डोक्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे स्थानिक संदर्भ आणि खाद्यपदार्थांची भरपूर तपशीलवार वर्णने हा या पुस्तकाचा गाभा आहे. परिणामी पुण्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या जीवनाला समोर ठेवून लिहिल्या गेलेल्या या कल्पित लिखाणात लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचे अस्तित्व जाणवत राहते. पुस्तकाचे स्वरूप दीर्घकथेचं आहे, जिची विभागणी काही प्रकरणांमध्ये केलेली आहे. लिखाणात कल्पित कथा सांगणं हा प्रमुख हेतू असला तरी यातील खाद्यपदार्थांची वर्णनं, क्रिकेटचे संदर्भ, त्याला असलेला नॉस्टॅल्जियाचा गंध यातून दिसणारी एक लालित्यपूर्ण शैली अस्तित्वात आहे. लेखक स्वागत पाटणकर यांनी यापूर्वी क्रिकेटविषयक स्तंभलेखन केलेलं आहे, हा संदर्भही त्यांची लेखनशैली आणि लेखकाच्या आयुष्यातील घटकांचा इथल्या लेखनात असलेला समावेश या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे ज्यांना लेखनाची अशी — (लेखक आणि नायक दोघांच्याच्या) आयुष्यातील घटनांना नॉस्टॅल्जिया आणि विनोदाच्या साहाय्याने समोर मांडणारी — शैली आवडत नाही, त्यांना हे पुस्तक कितपत आवडू शकेल, हे सांगणं कठीण आहे.

‘अरेंज मॅरेज’ या संकल्पनेला भारतीय समाजात आणि महाराष्ट्रात महत्त्वाचे स्थान आहे. वयाच्या पंचविशी-तिशीच्या आसपास मुला-मुलींच्या लग्नाच्या विचारांना कमी-अधिक फरकाने प्रत्येक घरात सुरुवात होते. त्यामुळे स्थानिक-सांस्कृतिक तसेच जीवनमानाचे संदर्भ (आणि विनोदी मांडणीचा फरक) सोडल्यास सदर पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेली संकल्पना ही शंभरातील नव्व्याण्णव व्यक्तींच्या आयुष्यात घडणारी आहे, असे म्हणता येऊ शकते. ज्यात ‘कांदेपोहे’ या शब्दाला सांस्कृतिकदृष्ट्या एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त झालेला आहे आणि आता कथानायकाचा संबंध या कांद्यापोह्यांशी आला आहे. लेखकाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, गबरू हा नायक आता तीस वर्षांचा घोडा झालेला असल्याने त्याने लग्न करणे ही काळाची गरज बनलेली आहे. घरातील सदस्य आणि सोसायटीतील पाटील काकांच्या (टोमण्यांचा समावेश असलेल्या) सल्ल्याचा अंतिम परिणाम म्हणून गबरूने लग्न करण्याचे मनावर घेतले आहे. लग्नाच्या निमित्ताने विवाह विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यापासून ते ‘स्थळ’ म्हणून आलेल्या मुलींच्या भेटी घेणाऱ्या गबरूची कथा म्हणजे ‘वेटिंग आहे राव!’ची मध्यवर्ती संकल्पना. 

दोन व्यक्तींच्या विवाहामुळे दोन कुटुंबं एकत्र येतात, मात्र त्याआधी इतर अनेक कुटुंबांचा एकमेकांशी संबंध येतो. त्यात वधू किंवा वर शोधत असताना जात-धर्म यांपासून ते वय, उंची, वजनापर्यंत इतर अनेक गोष्टींना महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे लग्नसंस्थेतील हा व्यवहार बराच गुंतागुंतीचा आणि त्याच वेळी चित्तवेधक बनतो. ‘वेटिंग आहे राव!’मध्ये यातील सगळेच मुद्दे येतात असे नाही. कारण, पुण्यात राहणाऱ्या आणि पुण्यातच स्थळ शोधणाऱ्या गबरूचे स्वतःचे असे काही विचार असले तरी त्यात जातिव्यवस्थेचा लढा किंवा सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्या आणि परिमाणांना उधळून लावण्यासारख्या विचारांचा समावेश नाही. त्याचा मित्रपरिवार विभिन्न प्रकारच्या व्यक्तीविशेषांचा समावेश असलेला असला तरी त्याच्या कुटुंबातील कायमची सदस्य बनणे अपेक्षित असलेल्या भावी पत्नीच्या भूमिकेबाबत तो मातृभाषा आणि जातीपासून ते सौंदर्याचे आणि मुख्य म्हणजे खाद्यपदार्थांच्या आवडीचे निकष लावतो. हे निकष लावल्याने तो पूर्णतः चूक ठरत नाही, कारण यामागे त्याच्या सभोवतालचा आणि जडणघडणीचा मोठा भाग असतो. यातील काही निकष त्याच्या घरच्यांनी आणि समाजाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ठरवून दिलेले असतात, तर उरलेल्या निकषांमागे त्याच्या स्वतःच्या आवडी-निवडीचा आणि समाधानाचा विचार असतो. त्यामुळे जग बदलण्याचा आविर्भावच इथे नसल्याने नायकापुढे उद्भवणाऱ्या समस्या, त्याचा सगळ्या घटनाक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्याशी उपरोक्त गंभीर मुद्द्यांचा संबंध तसा येत नाही. याउलट गबरूच्या सभोवतालात आणि त्याच्या भावविश्वात असलेला विनोदाचा अंतर्भाव हा इथला स्थायीभाव असल्याने या दीर्घकथेची मांडणी एकुणातच विनोदाकडे झुकलेली आहे. 

शाब्दिक कोट्या आणि प्रसंगनिष्ठ विनोद करणे, समोर उद्भवलेले प्रसंग/समस्या आणि अपेक्षित असलेली आदर्श परिस्थिती यामधील विसंगती अशा गोष्टींकडे विनोदी दृष्टिकोनातून पाहणे — हा गबरू या मुख्य पात्राच्या स्वभावाचा स्थायीभाव. त्यामुळे गबरूच्या निवेदनात घडणाऱ्या (किंवा घडून गेलेल्या) घटनांवरील, समोर येणाऱ्या पात्रांवरील विनोदी टिप्पण्यांमुळे विनोदाचा अंतर्भाव होतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे या विनोदाचे स्वरूप काहीसे कणेकरांच्या शैलीचे आहे. सोबत निवेदक असलेल्या नायकाचा तिरकस दृष्टिकोन आणि तक्रारवजा सूर यातूनही इथे विनोदनिर्मिती होते. 

‘स्थळ पाहणे’ या कृतीतील पुनरावृत्ती, अनेक महिने खर्ची घालूनही काहीच प्रगती न होणे आणि या सगळ्यातून पदरी येणाऱ्या निराशेला ‘वेटिंग आहे राव!’मध्ये महत्त्व आहे. त्यामुळे सुरुवातीच्या प्रकरणांमधील विनोदासोबतच कथानकात आणि नायकाच्या निवेदनात निराशा, त्रागा या भावनाही समाविष्ट झाल्याने कथन सातत्याने विनोदी राहत एकसुरी होत नाही. उलट लग्नासाठी मुलगी शोधणे, या गोष्टीचे नायकाच्या स्वभावावर आणि वावरावर घडणारे बदल पाहून त्याच्याशी भावनिक बंध निर्माण होऊन त्याला यश मिळावे, ही भावना वाढीस लागते. कथानायकाला तो जे काही करू इच्छितो, त्यात यश मिळावे, ही भावना वाचकाच्या मनात निर्माण होणे, यात कुठल्याही कलाकृतीचे यश मानता येते. ‘वेटिंग आहे राव!’मध्ये ही गोष्ट साध्य होते. 

‘स्थळ पाहायला जाणे’ या पुनरावृत्तीचा समावेश असलेल्या कृतीमध्ये एका विशिष्ट अशा यांत्रिकतेचा समावेश आहे. याखेरीज समोरच्या अनोळखी मुलाचे किंवा मुलीचे परीक्षण करून त्याच्या किंवा तिच्याविषयी मत बनवणे, ही गोष्ट कुणाही विचारशील व्यक्तीला खटकेल अशीच आहे. हे मुद्दे गबरूला खटकत असले तरी सुरुवातीच्या काळात या गोष्टी केल्यावाचून पर्याय नसतो. त्यामुळे कथेच्या काही प्रकरणांमध्ये या स्वतःला खटकणाऱ्या गोष्टी करत असताना सगळ्या प्रसंगांकडे विनोदी नजरेने पाहणं घडतं. मात्र, पुढे जाऊन औत्सुक्यातून निर्माण झालेला पूर्वीचा उत्साह ओसरल्याचे दिसते. अपेक्षाभंगासोबतच स्वतःच्या मतांविषयी आलेल्या स्पष्टतेमुळे विनोदाचा भाग बाजूला पडून स्थळ पाहण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या नकार देण्याच्या कृती गबरूकडून घडतात. आधुनिक जगणे आणि जुन्या परंपरांमध्ये होणारी ओढाताण, परंपरा आणि आधुनिकता यातील हव्या त्या गोष्टी सोयीस्करपणे स्वीकारण्याचा दृष्टिकोन इथे दिसतो. त्या अर्थानेही इथल्या नायकाचे सामान्यत्व अधोरेखित होते. कारण, काय करायचे आणि काय नाही, यामध्ये त्याचा गोंधळ उडालेला असतो.

‘अरेंज मॅरेज’मधून नात्याची सुरुवात करत असताना समोरच्या व्यक्तीकडून काय अपेक्षा ठेवाव्यात आणि कुठले निकष लावावेत, ही या गोंधळाची पहिली पायरी. पुढे मनातील (आदर्श) जोडीदार आणि प्रत्यक्षातील/वास्तवातील व्यक्ती यामध्ये दिसणाऱ्या तफावतीमुळे कथानायकाच्या मनामध्ये निर्माण होणारी अस्पष्टता, ही दुसरी पायरी. त्यामुळे विनोदासोबत इतर बऱ्याचशा संकल्पनांच्या रूपात भावनिक-मानसिक स्तरावरील गुंतागुंतदेखील अस्तित्वात आहे. शिवाय, ज्याचे वर्णन ‘तिशीतील घोडा’ म्हणून केले जाते त्या गबरूला अपेक्षित-अनपेक्षितरीत्या त्याच्या मैत्रिणींकडून मिळालेल्या सल्ल्यांमुळे त्याच्या मनातील गोंधळ दूर होण्यासोबत कथानकात एक तिऱ्हाईत, तर्कशुद्ध आणि मुख्य म्हणजे स्त्रीलिंगी पात्राकडून येणारा दृष्टिकोनही येतो. त्यामुळे ‘अरेंज मॅरेज’ या प्रकाराकडे केवळ पुरुषी नजरेतून नव्हे, तर काहीशा संतुलित दृष्टिकोनातून पाहिले जाते, असे म्हणता येते. सांगायचा उद्देश हा की, निवेदक एक पुरुष असल्याने पुरुषी दृष्टिकोन वगळता इतर दृष्टिकोनांचे अस्तित्व काहीसे कमी असले तरी ते अजिबातच नाही, असेही नाही! 

भविष्याची आणि सुखी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने पाहत असताना केलेली वर्तमानाची मांडणी कथानकात दिसते. नायकाच्या वर्तमानात त्याच्या भूतकाळाला महत्त्व असल्याने निवेदनात भविष्यातील स्वप्नांसोबतच भूतकाळातील आठवणींचाही समावेश होतो. कथानायकाच्या जीवनात खाद्यपदार्थ आणि खाद्यपदार्थ मिळण्याच्या जागांना महत्त्वाचे स्थान आहे. गबरूच्या मनातील अनेक आठवणी आणि भावना या थेट खाद्यपदार्थांशी निगडीत असल्याने अनेक पदार्थ, त्या त्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या जागांची वर्णने त्याच्या कथनात येतात. या वर्णनांमध्ये आठवणींचा एक विशिष्ट असा दर्प तर आहे, पण सोबतच डोळ्यासमोर ठळक चित्र उभे करण्याची दृश्यात्मकतादेखील आहे. त्यामुळे तपशीलवार वर्णनांमुळे जशा इथल्या जागा नजरेसमोर निर्माण होतात, अगदी त्याच तऱ्हेने खाद्यपदार्थ देखील समोर तरळून जातात. कथानकात वर्णिलेल्या जागांना भेट देण्याची आणि उल्लेख केलेले पदार्थ खाण्याची इच्छा मनात निर्माण होते, हेही इथल्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आणि इथल्या दृश्यात्मक वर्णनांचे यश! 

नायकाच्या खाद्यभ्रमंतीच्या निमित्ताने केलेली जागांची वर्णने ही गोष्ट जशी इथली जमेची बाजू आहे, तशीच काही अंशी खटकणारी देखील आहे. अतितपशीलवार वर्णनांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास हे पर्यटनाविषयीचे पुस्तक वाटावे, असे काही अंश पुस्तकात आहेत. इतके की, ‘वेटिंग आहे राव!’ पुण्यात (आणि पुण्यानजीकच्या परिसरात) खाद्यभ्रमंती करू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त पुस्तिका ठरू शकते! एकीकडे तपशीलवार वर्णने इथल्या नायकाच्या पाल्हाळ लावत बोलण्याच्या शैलीला अनुसरून योग्य ठरतात, तर दुसरीकडे ती मुख्य आशयापासून लक्ष विचलित करणारी ठरतात. त्यामुळे बरेचसे तपशील कल्पित गोष्ट सांगणाऱ्या या पुस्तकात असायलाच हवे होते का, असा प्रश्न उद्भवतो. हा मुद्दा बऱ्याच अंशी व्यक्तीनिष्ठ असला तरी काही ठिकाणी असे अकारण तपशील लक्ष विचलित करतात, हेच खरे. 

या पुस्तकाची मांडणी देखील त्यातील आशयाइतकीच इंटरेस्टिंग आहे. दीर्घकथेच्या प्रत्येक नव्या प्रकरणाच्या सुरुवातीला — डाव्या पानावर — एक रेखाटन आणि त्यासोबत येणारे कल्पक शीर्षक अशी मांडणी केलेली आहे. अशी मांडणी असलेले हे काही पहिले पुस्तक नाही. मात्र, साधी, तरीही प्रभावी मांडणी अस्तित्त्वात असल्याने या मुद्द्याचा वेगळा उल्लेख करणे गरजेचे आहे. इथली रेखाटने तशी अगदी साध्यासोप्या प्रकारची, कृष्ण-धवल स्वरूपाची असली तरी त्या त्या प्रकरणातील सारांश बहुतांशी सर्वच रेखाटनांमध्ये अचूकपणे प्रतिबिंबित होतो. प्रकरणांच्या नावांमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय किंवा जागांचा (किंवा दोन्हींचा) उल्लेख केला जातो. ज्यात कथानायक आणि लेखक दोन्हींची शाब्दिक करामती करण्याची प्रवृत्ती आणि पुस्तकातील आशयात समाविष्ट असलेल्या नॉस्टॅल्जियाचे दर्शन होते. 

वर उल्लेखलेल्या काही उणिवांकडे पाटणकर यांचा कथनात्म लेखनातील पहिला प्रयत्न म्हणून दुर्लक्ष करता येणे शक्य आहे. एकदा या दोषांकडे दुर्लक्ष करता आले की, कथेतील घटनाक्रमाच्या मजेशीर मांडणीचा आस्वाद घेता येतो. कारण, काही उणीवा सोडल्यास, ‘अरेंज मॅरेज’ करायचे म्हणून मुलगी पाहणे — या एका सर्वश्रुत संकल्पनेची काहीशा पलायनवादी स्वरूपाची, हलक्याफुलक्या प्रकारची मांडणी करणारी ही दीर्घकथा रंजक आणि वाचनीय आहे! 

‘वेटिंग आहे राव!’ – स्वागत पाटणकर,

रसिक आन्तरभारती, पुणे,

मूल्य – २५० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......