विश्वामित्राने वैदिकांच्या धार्मिक सृष्टीला शह देऊन एक प्रतिसृष्टी निर्माण केली होती
ग्रंथनामा - झलक
रवींद्र इंगळे चावरेकर
  • 'सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास' या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 02 April 2021
  • ग्रंथनामा झलक सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास रवींद्र इंगळे चावरेकर

रवींद्र इंगळे चावरेकर संशोधित 'सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास' या हस्ताक्षर प्रकाशन गृहाकडून प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

सुमेरूयन वैदिक आगमन काळ (इ.स.पूर्व ३१०१) ते ब्राह्मण ग्रंथ काळ (इ.स.पूर्व १३५०) या अंदाजे १७६० वर्षांत  संपूर्ण समाजाला आणि समूहाला समतावादाने एकत्र सांधणारी एक विचारधारा दिसते. ही विचारधारा म्हणजे ‘ऊर्जा ब्रह्मवाद’ होय. आज या ऊर्जा ब्रह्मवादी विचारसरणीवर वैदिक व्यवस्था आपली मालकी सांगत असली, तरी या विचारधारेत दोन वेगवेगळे प्रवाह आहेत.

१. ऊर्जा ब्रह्मवादी

२. मंत्र ब्रह्मवादी

यातील पहिला संप्रदाय हा वैश्विक ऊर्जेला कः सोम हिरण्यगर्भ वा ऊर्जा ब्रह्म वा अरूष नावाने संबोधतो. तसेच या संप्रदायाला शुक्ल यजुवादी वा परावादी संप्रदाय असेही संबोधले गेले आहे. दुसरा संप्रदाय हा वेदमंत्रांना ब्रह्म मानतो. मेध, सोम, काम, दाम आणि भ्रम या पंचसूत्रीवर भर देतो. या संप्रदायाच्या अनुयायांना कृष्ण यजुवादी संप्रदायी अथवा परावादी संप्रदायी मानले गेले आहे. वास्तवात यातील ऊर्जाब्रह्माने संपूर्ण समाजाला समतेने एकत्र सांधले, तर मंत्र ब्रह्माने समाजाला विभाजित केले. या दोन संप्रदायामध्ये प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत सतत संघर्ष होत आला आहे. वैश्विक ऊर्जेला केंद्र करून ज्यांनी आपली मांडणी केली, त्यांनी विश्वाचे स्वरूप जाणावे व अंतिमत: हे सर्व वैश्विक ऊर्जेतून निर्माण होते, वैश्विक ऊर्जेतच जाऊन मिळते; परिणामी ही वैश्विक ऊर्जा अपरिवर्तनीय, अनंत, सर्वव्यापी आहे आणि ऊर्जा हीच ब्रह्म आहे, असे लोकांना समजावून द्यावे. अशा प्रकारची तात्त्विक यंत्रणा खर्‍या ऊर्जा ब्रह्मवाद्यांद्वारे स्वीकारण्यात आली.

या संप्रदायाच्या तत्त्वचिंतक मुनींनी पूर, नगर अथवा गावांमध्ये वस्तीला न राहता अरण्यात जाऊन चिंतन करावे. गावातील लोकांना ऊर्जा ब्रह्मवादाचे मार्गदर्शन करावे. या मुनींसाठी इंद्रिय संयमाची आचारपद्धती ठरवण्यात आली. अशा या लोकांचे तत्त्वचिंतनाचे ग्रंथ म्हणजे तत्कालातील आरण्यके होत. जे वास्तवरूपात आज उपलब्ध नाहीत. या मूळ आरण्यकांचे वैदिकीकरण झालेले ग्रंथ म्हणजे आजचे उपलब्ध उपनिषदे होत आणि हाच ऊर्जा ब्रह्मवाद्यांचा खरा ब्राह्मण संप्रदाय आहे. आज जो मुनी संप्रदाय म्हणून मांडण्यात येतो, यापेक्षा मंत्रांना ब्रह्म मानणार्‍यांचा ऋषि संप्रदाय आहे. त्यांचे वाङ्मय वेदब्राह्मणोपनिषदस्मृतीपुराणसूत्रटीका हे होत.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.facebook.com/aksharnama/posts/2780841678893566

..................................................................................................................................................................

अर्थात या आजच्या उपलब्ध उपनिषदांमध्येही मुनी परंपरेतील ऊर्जा ब्रह्मवादाचे अनेक श्‍लोक उपलब्ध होतात, हेही नाकारता येत नाही. वास्तवात उप+निषद्  (उप म्हणजे गौण, निषद् म्हणजे कर्मकांड) उपनिषद म्हणजे गौण स्वरूपाचे कर्मकांड ज्यात संग्रहित केले गेले आहेत, ते ग्रंथ होत. यात ब्रह्म हे मुनी परंपरेतील आहे, परंतु या ब्रह्माविषयीचे कर्मकांड वैदिकांनी अहिंसक स्वरूपात स्वीकारले म्हणून ते गौण झाले. कारण वेदांमधील कर्मकांड हे मेधप्रधान आहेत, म्हणजेच हिंसक आहेत. साहजिकच या उपनिषदातील कर्मकांड अहिंसक म्हणून गौण ठरले. यांच्या समन्वयासाठी महाभारताची रचना झाली आहे. या महाभारतात अहिंसा परमो धर्मा:। धर्महिंसा तदैवच। म्हणजे अहिंसा हा श्रेष्ठांचा धर्म आहे, तर धर्मासाठी हिंसा करणे हा देवांचा धर्म आहे. अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे. त्याचे प्रात्यक्षिक गीतेमध्ये कृष्णयजु म्हणजे ऋषींचा प्रतिनिधी कृष्ण तर शुक्लयजु मुनींचे प्रतिनिधी पंडूपुत्र पांडव आहेत. गीता ही कृष्णयजु प्राधान्याने सांगण्यात आली आहे. यात हिंसा ही प्रधान करण्यात आलेली आहे. आपले आप्त नातेवाईक वा बंधू असले, तरी धर्मासाठी त्यांचा वध केला पाहिजे. म्हणजे धर्म हिंसा तद् देव च कारण धर्मासाठी हिंसा करणे हा देवांचा धर्म आहे, असे शिकवणारी गीता हीच महाभारतात समाविष्ट करण्यात आली आहे.

याचा अर्थ यातील ऊर्जाब्रह्म हे मूळचे मुनी संप्रदायातील ऊर्जाब्रह्मवादी ब्राह्मणांचे आहे, तर मंत्रब्रह्मवादी ब्राह्मणांनी त्याचे वैदिकीकीकरण करून त्याला निर्गुण निराकार ब्रह्म आणि त्यांचे अहिंसक कर्मकांड निर्माण केले; आजच्या उपलब्ध उपनिषदामध्ये संकलित केले. हा इतिहास समजावून घेण्यासाठी वेदोत्तर काळात निर्माण झालेला ऊर्जा ब्रह्मवादी (वेदान्त= वेदांचा अंत. म्हणजे वेदातील मेधीय कर्मकांडाचा अंत करणार्‍या) तत्त्वज्ञानाचा आढावा घ्यावा लागेल. तसेच हा ऊर्जा ब्रह्मवाद प्रस्थापित करणार्‍या विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीचा विचार करावा लागेल. विश्वामित्रापासून सुरू झालेल्या या मुनी परंपरेतील ऊर्जा ब्रह्माचे नेमके स्वरूप आणि आचाराचा शोध घेणे गरजेचे आहे.

मुनी परंपरेतील ऊर्जा ब्रह्मवाद्यांच्या मते, देश, काल व वस्तू, योनी यांनी सीमित होणारे अनित्य, परिवर्तनशील, गुणरहित, दोषयुक्त, ज्ञानरहित, परतंत्र असे जे जे आहे, ते सर्व अल्प होय. याउलट अनादी, अनंत, नित्य, शुद्ध व मुक्त जे आहे ते ब्रह्म होय अशी ऊर्जा ब्रह्मवादाची धारणा आहे. यालाच त्यांनी भूमा म्हटले आहे. यो वै भूमा तदमृतमथ यदल्प तन्मर्त्यम् (छांदोग्य) म्हणजे जो भूमा आहे, तो अमृत आणि जे अल्प ते मर्त्य होय.

याचा अर्थ ब्रह्म  हे अविनाशी व मृत्युच्या पलीकडे असलेले या विश्वातील तत्त्व आहे, असे ऊर्जा ब्रह्मवादी मानतात. अशा या अविनाशी तत्त्वाचा जगाला उपयोग काय? तर ब्रह्म: जगजन्मस्थितीलय कारणत्वं। (तैतरिय) म्हणजे जगताच्या जन्म, स्थिती व लयाला कारण असणे हे ब्रह्माचे तटस्थ लक्षण होय. तर अस्थूलम् अनणु अर्‍हस्वं अदीर्घम् (बृहदा.) म्हणजे ब्रह्म हे स्थूल नाही, अणू नाही, र्‍हस्व नाही आणि दीर्घही नाही. (ही सर्व लक्षणे वैश्विक ऊर्जेचीच आहेत) अशा या ऊर्जा ब्रह्माचे स्वरूप जाणणे, हेच ऊर्जा ब्रह्मवाद्यांनी आपल्या ब्रह्मविद्येच्या विचारधारेचे उद्दिष्ट मानले होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ऊर्जा ब्रह्माचे हे स्वरूप जाणणे हाच त्यांचा ज्ञानमार्ग होता. आयुष्याचा अर्थ उलगडण्यासाठी ऊर्जा ब्रह्माचे वास्तव स्वरूप समजणे गरजेचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. वरील विवेचनाधारे असे म्हणता येईल की, ज्याच्यापासून भुते जन्मतात, जन्मलेली भुते जीव धारण करतात आणि शेवटी त्यातच विलीन होतात. असे स्थूल, अणू, र्‍हस्व, दीर्घ नसलेले तरीही जगाच्या उत्पत्ती, स्थिती, लयाला कारणीभूत असलेले सर्वव्यापी अमृततत्त्व (मृत न होणारे) म्हणजे ब्रह्म होय. हीच या ऊर्जा ब्रह्मवाद्यांची धारणा होती. आता मूळ प्रश्‍न असा निर्माण होतो की, अशी ब्रह्ममय वस्तू मानवी अनुभूतीत आहे काय? की ज्याचा साक्षात्कार ब्रह्मवाद्यांना झाला होता. या ब्रह्माचे स्वरूप वर्णन करताना इशावास्योपनिषद असे म्हणते, 

ऋचा 

पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते।

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्टते ॥ (इशावास्योपनिषद, १)

अन्वय
पूर्णम अद:पूर्णम् इदं पूर्णात पुर्णम उद्च्य ते 

पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम् इव अवशिष्ट ते

शब्दार्थ

पूर्णम = ते पूर्ण, अद = गिळंकृत करणे, पूर्णम् = पूर्णास, इदं = या, पूर्णात = त्या पूर्णातून, पुर्णम = हे पूर्ण, उद्च्यते = प्रकट होते, पूर्णस्य = ते पहिले पूर्ण, पूर्णम = या पूर्णाचा, आदाय = स्वीकारणे, घेणे, पूर्णम् = त्या पूर्णाची  इव=खरेच, अल्पत्व, अवशिष्ट = उरलेले बाकीचे, ते = ते

त्या पूर्णाने हे पूर्ण गिळंकृत केले. जे त्या पूर्णातूनच प्रकट झालेले आहे किंवा या पहिल्या पूर्णाने या दुसर्‍या पूर्णाचा स्वीकार केला, तरी ते पूर्ण खरोखरच शिल्लकच असते.

आता मूळ प्रश्‍न असा निर्माण होतो की, या विश्वात मानवी अनुभवात असे काही पूर्ण आहे काय? की ज्यातून दुसरे पूर्ण काढले तरी, पहिले पूर्ण ते पूर्णच राहील. या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीच द्यावे लागेल. अशी मानवी अनुभवातील वस्तू म्हणजे वैश्विक ऊर्जा होय. वैश्विक ऊर्जा हे पहिले पूर्ण आणि नामधारी सजीव, निर्जीव सृष्टी हे दुसरे पूर्ण. उदा- नामधारी सृष्टीतील झाड अथवा माणूस हे दोघेही आपापल्या ठिकाणी परिपूर्णच असतात, परंतु हे पहिल्या म्हणजे वैश्विक ऊर्जेच्या चेतनेतूनच निर्माण झालेले असतात. म्हणजे पहिल्या पूर्णातून हे दुसरे पूर्ण निर्माण झाले. परंतु पहिले पूर्ण घटत नाही, ते आहे तेवढेच राहते. या शिवाय झाड नष्ट झाले किंवा माणूस मृत पावला, तरी पहिले पूर्ण पूर्णच असते. याचा अर्थ त्या पूर्णाने हे पूर्ण गिळंकृत केले, जे त्या पूर्णातूनच प्रकट झालेले आहे. किंवा या पूर्णाने त्या पूर्णाचा स्वीकार केला, तरी ते पूर्ण खरोखरच शिल्लक असते. अर्थात हा ऊर्जा ब्रह्मवादी संप्रदाय हा मूलत: वैश्विक ऊर्जेशीच संबंधित संप्रदाय होता. त्यामुळे आजही ब्रह्म, ईश्वर आणि वैश्विक ऊर्जा यांच्या लक्षणांत फरक आढळत नाही. उदा-

१. परमेश्वर अथवा ब्रह्मापासूनच सर्व विश्व निर्माण होते, तरी तो दशांगुळे शिल्लकच राहतो. वैश्विक ऊर्जेतूनच या दुसर्‍या पूर्णाची म्हणजे सजीव, निर्जीव सृष्टीची निर्मिती होते;  तरीही पहिले पूर्ण म्हणजे वैश्विक ऊर्जा पूर्णच राहते, ती कमी होत नाही.

२. ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. वैश्विक ऊर्जा ही घनरूप, वायुरूप, द्रवरूप, तरंगरूप अशीच आहे, म्हणजे वैश्विक ऊर्जाही निर्गुण, निराकारच आहे.

३. ब्रह्म हे सर्वव्यापी आहे. वैश्विक ऊर्जाही सर्वव्यापीच आहे, म्हणजे येथील सजीव आणि निर्जिवांमध्ये ही वैश्विक ऊर्जा विराजमान असते.

४. मृत्यूनंतर सजीव, निर्जीव त्या परमेश्वर वा ब्रह्माशीच एकाकार होतात. दुसर्‍या पूर्णाच्या विनाशानंतर त्यांच्यातील ऊर्जा या पहिल्या पूर्ण ऊर्जेत (वैश्विक ऊर्जेतच) मिसळून जाते.

५. या परमेश्वर वा ब्रह्मापासूनच पुन्हा जीव जन्म धारण करतो. या एकाकार वैश्विक ऊर्जेतूनच पुन्हा एक नवे पूर्ण आकारित होते.

याचा अर्थ असा की, अशा या वैश्विक ऊर्जेलाच ऊर्जा ब्रह्मवाद्यांंनी ब्रह्म संबोधले आहे. ऊर्जा ब्रह्म हे जगत्कारण आहे; तेही याच अर्थाने आहे. म्हणजे या ऊर्जेपासूनच सर्व भुतांचा जन्म होतो. ऊर्जेमुळेच हे विश्व जीवधारण करते आणि त्यातच लीन होते. ही ऊर्जा स्थूलही आहे, अणूही आहे, ती र्‍हस्व आहे, तशीच दीर्घही आहे. हीच उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारणीभूत होते. या ऊर्जेचा प्रकाश आणि अंधार हे दोनही रूपे सर्वव्यापी व अविनाशी आहेत. म्हणजे ऊर्जा ही अविनाशी व अमृत आहे, म्हणूनच ब्रह्मविद्येत या ऊर्जा ब्रह्माचे वर्णन करताना ऊर्जा ब्रह्मवादी म्हणतात,

श्लोक

तेजोमयोतेजोमय:काममयोकाममय:क्रोधमयक्रोधमय:।
धर्ममयोधर्ममय:सर्वमयस्तद्ददेतत् इंदमयोदोमय:॥  (योगचुडामणी)

अन्वय

तेजोमयो अतेजोमय:काममयो अकाममय: क्रोधमय अक्रोधमय:।

धर्ममयो अधर्ममय: सर्वमय तत  ददे तत् इध्ंदमयो अदोमय:॥

शब्दार्थ

तेजोमयो = तेजयुक्त, अतेजोमय = तेजविरहित, काममयो = कामयुक्त, अकाममय = कामविरहित, क्रोधमय = क्रोधयुक्त, अक्रोधमय = क्रोधविरहित, धर्ममयो = धर्मयुक्त, अधर्ममय = धर्मविरहित, सर्वमय = सर्वव्यापी, तत = त्यापासून, ददे = प्रदान होते, तत् = विस्तृत, इध्ंदमयो = कायम प्रदीप्त असलेली ऊर्जा, अदोमय = गिळंकृत करणारी

ते तेजोमय-अतेजोमय, काममय-अकाममय, क्रोधमय-अक्रोधमय, धर्ममय व अधर्ममय, ते सर्वव्यापी आहे. त्यांच्यापासून सतत प्रदीप्त स्वरूपातील ऊर्जा मिळत राहते, जी काहीही गिळंकृत करणारी असते.

वैश्विक ऊर्जाही तेजोमय आहे. ती वस्तूच्या संपर्कात आली तरच प्रकाश रूपात प्रकट होते. म्हणजे ती तेजोमयही आहे आणि अतेजोमयही आहे. ती वासनाविरहित आहे, पण वस्तूमध्ये तिचा प्रवेश झाला की ती काममयही होते. म्हणून ती काममय व अकाममय आहे. ती जीवनाला पोषक आहे, तशीच संहारकही आहे. म्हणून क्रोधमय आहे तशी अक्रोधमयही आहे. तिचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ती धर्ममय आहे आणि विनाशासाठी वापर केल्यास ती अधर्ममयही आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, ब्रह्मवाद्यांना जे ब्रह्म अपेक्षित होते, ते ऊर्जामय ब्रह्म होते.

ऋचा 

ज्योतिर्मय तदग्रं स्वाछवाच्य बुध्दीसुक्ष्मत: 

ददृशुर्ये महात्मानो यस्सं वेद संवेदवित्  (योगचुडामणी, ८१)

अन्वय

ज्योतिर्मय तद अग्रं स्वाच्छ वाच्य बुद्ध सुक्ष्मत: 

द दृश सूर्ये महात्मानो यस्सं वेद संवेदवित्  

शब्दार्थ

ज्योतिर्मय = ज्योतीप्रमाणे, तद = त्याचे, अग्रं = टोक, स्व = स्वत:ला, आच्छ = आच्छादित करणे, वाच्य = वाणी, बुद्धी = बुद्धी, सुक्ष्मत = सूक्ष्म, द = देणारा, दृश = प्रत्यक्षात, सूर्ये = सूर्य, महात्माणो = महात्म्यांनो, यस्सं = याला, वेद = जाणा, संवेदवित् = अनुभवाद्वारे

त्याचे शिखर ज्योर्तिमय आहे. त्याने स्वत:लाच आच्छादित केले आहे. तो एवढा सूक्ष्म आहे की, त्याचे वर्णन बुद्धी वा वाणीद्वारे करता येत नाही. तर हा देणारा दृष्य रूपात सूर्य आहे. हे महात्म्यांनो! याला अनुभवानेच जाणा.

ऊर्जेचे हे स्वरूप जाणणे, हाच उर्जा ब्रह्मवादी मुनी परंपरेचा ज्ञानमार्ग होता. हा या ऊर्जामय ब्रह्मचा शोध घेणारा वास्तववादी संप्रदाय होता. पुढे जसजसे प्रश्न बिकट निर्माण होत गेले, तसतसे या ऊर्जाब्रह्माविषयी चिंतन होत गेले. ब्रह्मवादी म्हणतात, हे ब्रह्म मायेने झाकलेले आहे, या प्रश्‍नाच्या विचारात असे म्हणता येते की, ऊर्जा  तेव्हाच प्रकाशमान होते, जेव्हा ती वस्तू (मॅटर) च्या संपर्कात येते. निर्वातात ऊर्जा झाकलेलीच असते. कारण प्रकाशाला स्वत:चे अस्तित्व नाही. तो ज्या वस्तूवर पडेल तिथेच प्रकटेल, अन्यथा निर्वातात ऊर्जारूप अस्तित्वात असेल जे चक्षुला दिसणार नाही. ऊर्जेचे हे रूप म्हणजे मायेने झाकलेले ऊर्जा ब्रह्म होय.

ब्रह्मवादाचे हे ऊर्जारूप ब्रह्म म्हणजे जगत्कारण असलेली ऊर्जाच होय, यात शंका नाही. अशा या जगत्कारण ऊर्जेचे ज्ञान मिळवणे, हा वास्तववादी दृष्टिकोन या ऊर्जा ब्रह्मवादी संप्रदायाचा होता. कारण एकदा या ज्ञानमार्गाने जाऊन सृष्टीचे आदीरूप ऊर्जेचे ज्ञान झाले म्हणजे, आपोआपच जीवनाची नश्वरता व वास्तवरूपाची मानवाला जाणीव होते. तसेच अतिरेकी भोगवादापासून माणूस अलिप्त होतो. या विचारधारेतूनच वेदांमध्ये नसलेला एक नवा आचारमार्ग या संप्रदायाने स्वीकारला आणि तो म्हणजे संन्यासमार्ग होता. जो अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या आचारपद्धतीवर आधारित होता. या आचारपद्धतीमध्ये कर्मकांडाला वाव नव्हता. चिंतन आणि मननाने या सृष्टीचे आदितत्त्व जाणणे, त्याचे ज्ञान करून घेणे, जीवनाची नश्वरता जाणून विराजमान सृष्टीतील चैतन्य व आनंदाशी सहजाणीव निर्माण करणे. मनाची ही चैतन्यमय, आनंदमय अवस्था म्हणजेच मोक्ष अशी या संप्रदायाची विचारधारा होती. जनमाणसांसाठी हे आकलन कठीण असले तरी, त्यांनी ऊर्जारूपात वावरावे, म्हणजे आनंदात राहावे त्यासाठी त्यांनी अत्यंत सोपी अशी आचारपद्धती दिली होती. ती अशी,

श्लोक

वचसा तज्जपेन्नित्यं वपुषा तत्समभ्यसेत्।

मनसा तज्जपेन्नित्यं तत्परं जोतिरोमिति॥

(योगचुडामणी)

अन्वय

वचसा तज जपेन नित्य वपुसा तत्सम अभ्यसेत्।

मनसा तज जपेन नित्य तत पर जोतिरोम इति॥

शब्दार्थ

वचसा = वाणीने, तज = त्याचा, जपेन = जप करावा, नित्यं = नेहमी, वपुसा  =देह शरीर, तत्सम = त्याच्याप्रमाणे, अभ्यसेत् = चिंतन करणे, मनसा = मनाने, तज = त्याचा, जपेन = जप करावा, नित्यं = नेहमी, तत = विस्तृत, परं = मोक्ष, जोतिरोम = प्रकाशमान, इति = वर सांगितल्याप्रमाणे

वाणीने सतत त्याचा (वैश्विक ऊर्जेचा चैतन्याचा) जप करावा. देह  देखील त्याच्यासारखाच चैतन्यमय आहे, याचे चिंतन करावे. मनाने देखील त्याचाच जप करावा आणि वर सांगितल्याप्रमाणे हा प्रकाशमान (आनंदमय) मोक्ष प्राप्त करावा.

असा हा कर्मकांड विरहित आचारमार्ग प्रदान केला होता. अर्थात देह, मन, वाचा या संपूर्ण इंद्रिसंवेद्य मार्गांनी त्याचेच चिंतन मनन करावे आणि त्या ऊर्जेचे स्वरूप समजावून घ्यावे, म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठेही कर्मकांडाला स्थान नाही. मनाची अशी आनंदमय अवस्था या संप्रदायाने मानली आहे; जी प्रकाशमान चैतन्यमय आनंदमय आहे. मनाची ही अवस्था म्हणजेच मोक्ष होय, असे हा संप्रदाय मानत होता.

अशा प्रकारे वैश्विक ऊर्जेचे वास्तविक रूप जाणून ज्योतिर्मय (आनंदमय) अवस्थेत रममाण होऊन यथार्थ ज्ञान प्राप्त करावे. मोक्षमय अवस्था अनुभवावी) आणि त्यासाठी भावे हि विद्यते देव: तस्मात भावो हि कारणम् भावना ही देवांचा निवास आहे आणि हे जाणण्याचा आधारही भावनाच आहे. त्यासाठी स्वरेण सल्लयेद्योगी स्वरात तल्लीन होणे हा मार्ग आहे. याचा अर्थ काव्यातील तल्लीनता हीच ब्रह्मविद्येत प्रधान आहे. म्हणजे सर्व कर्मकांडाचा त्याग करून त्या ऊर्जामय ब्रह्माच्या चिंतन, मननात लीन होणे, त्याचे स्वरूप जाणणे, आपल्या अनुभूती काव्यमय करणे, मनाची ही आनंदमय स्थिती म्हणजे मोक्ष होय. चिंतनाने आपण स्वत: ऊर्जामय आहोत, हे जाणले म्हणजे मनाची ब्रह्ममय अवस्था निर्माण होते. साहजिकच हे विश्व नश्वर आहे याचे ज्ञान झाले म्हणजे, वैदिक भोगवादी प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून, उपासक निवृत्ती मार्गाचा स्वीकार करतो. मनाच्या काव्यमय अनुभूतीत आनंदमय स्थितीत जगत राहतो. संन्यास मार्गाचा स्वीकार करतो. ही विचाधारा जी ब्रह्मकाळात निर्माण झाली, परंतु हा ऊर्जाब्रह्मवाद मंत्र ब्रह्मवादात बदलला गेला आणि नवनव्या संकल्पना या संप्रदायात विराजमान झाल्या. उदा-

श्लोक

क्रिया इच्छा तथा ज्ञानं ब्राम्ही रौद्री च वैष्णवीl

त्रिधा मात्रास्थितिर्यत्रं तत्परं ज्योतिरोमिति ॥

अन्वय

क्रिया इच्छा तथा ज्ञान ब्राह्मी रौद्री च वैष्णवी ।

त्रिधा मात्रा स्थिति यत्र तत पर जोतिरोम इति ॥

शब्दार्थ

क्रिया = विचार, इच्छा = इच्छा, तथा = तसेच, ज्ञानं = ज्ञान, ब्राम्ही = ब्रह्मशक्ती, रौद्री = गौरीच = आणि वैष्णवी = लक्ष्मी, त्रिधा = तीन प्रकारे मात्रा = रूपांतर स्थिति = निवास करणे, यत्रं = जेथेतत = विस्तृत, परं = मोक्ष जोतिरोम = प्रकाशमान, इति = वर सांगितल्याप्रमाणे 

ऊर्जा ब्रह्मवादातील विचार, इच्छा तसेच ज्ञान यांना ब्रह्मशक्ती, गौरी आणि लक्ष्मी या तीन प्रकारे शक्तीत रूपांतर करून जेथे या शक्ती निवास करतात, तिथेच प्रकाशमान मोक्ष असतो. (असे सांगावे.)

अशा प्रकारे वास्तविक,अनुभवनिष्ठ तात्त्विकता दैवी स्वरूपात बदलली गेली, तसेच सामाजिक विभाजनाचाही प्रारंभ झाला. याचा स्पष्ट पुरावा देताना तैतरिय उपनिषद म्हणते,

श्लोक

यतोवा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ती।

यत्प्रयत्न्यभिसंरविशन्ति तव्दिजिज्ञासस्व तद् ब्रह्म॥ (तैतरिय)

अन्वय

यतोवा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ती

यत प्रयत्न्य अभिसर विशन्ति तद  द्विज जिज्ञास स्व तद् ब्रह्म

शब्दार्थ

यतोवा = सर्वव्यापी, इमानि = आणि जे, भूतानि = सर्व भूतमात्रांना, जायन्ते = जन्माला घालते, येन = असे जातानि = निर्माण झालेले, जीवन्ती = जीवधारण केलेले, यत = नियंत्रित करणे, प्रयत्न = कर्माद्वारे, अभिसर = नोकर, विशन्ति = शिवारकरी वैश्य, तद = तसेच, द्विज = द्विज संबोधून,जिज्ञास = जाणण्याची इच्छा असणारे, स्व = स्वत:ला, तद = तसेच, ब्रह्म = ब्रह्माला 

हे जे सर्वव्यापी (ऊर्जा ब्रह्म )आहे, जे सर्व भूतमात्रांना जन्माला घालते, या धारणेने जे जन्मधारण करतात. जीवन जगतात, अशांना नियंत्रित करून कर्माच्या कृतिद्वारे शिवारकर्‍यांना वैश्य करून नोकर करावे व ऊर्जाब्रह्मवादी ब्राह्मणांना (द्विज संबोधून) स्वत:ला व ब्रह्माला जाणणारे (द्विज ) ब्राह्मण संबोधावे.

अशी या ब्रह्मवादाची कृष्ण यजुवाद्यांनी वाताहत केलेली दिसून येते. तसेच या मंत्रब्रह्मवादी कृष्णपक्षीयांनी स्वतःचा समावेश या श्रमणी शुक्‍ल ऊर्जाब्रह्मवादीत करून या ऊर्जाब्रह्माला निर्गुण, निराकार ब्रह्मात बदललेले स्पष्ट दिसते.

अशा या ऊर्जा ब्रह्मवादी संप्रदायाचा आद्य प्रणेता विश्वामित्र होय. याबद्दलचे दाखले प्रत्यक्ष ऋग्वेदच सादर करतो. वैदिक विचारधारा साक्षी आहे की, विश्वामित्राने एक प्रतिसृष्टीची रचना केली होती. पण या प्रतिसृष्टीचे स्वरूप वैदिक व्यवस्था अलौकिक व विकृत अंगाने अन्वयीत करते.

वास्तवात विश्वामित्राची ही प्रतिसृष्टी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाची होती. मेरूयन वैदिक व्यवस्थेविरूद्ध मेध, सोम, काम, दाम, भ्रम या पंचसूत्रीच्या विरोधात पहिले बंड पुकारणारा विश्वामित्र हाच असल्याचे दिसते. वैदिक विजयानंतर जेव्हा अगस्तीने आर्य आणि दास अशा दोन वर्णात प्रथमत: विभागणी केली आणि वशिष्ट हा सिंधुचा राजा झाला. त्यातूनच मेध, सोम, काम, दाम व भ्रमप्रधान व्यवस्था वैदिकांकडून उभारली गेली. तेव्हाच विश्वामित्राने दासांचे एकत्रिकरण करून व दासांना राजसुय यज्ञाद्वारे राज्याभिषेक करून त्यांना राजे जाहीर केले. या एकत्रीकरणानंतर वैदिक व्यवस्थेसोबत जे त्यांचे युद्ध झाले, तेच दासराज्ञ (दाशराज्ञ= दहा राजांचे नव्हे, तर दास राजांचे युद्ध) युद्ध होय. या बंडाचा व प्रतिसृष्टीचा रचियता एक व्यक्ती असला, त्याचे नाव आज जरी विश्वामित्र म्हणून पुराणात येत असले, तरी विश्वामित्र हा एक व्यक्ति नाही. वेदांमध्ये विश्वामित्र हा समूहवाचक म्हणजे संप्रदाय वाचकच संबोध आहे.

या विश्वामित्राच्या नावावर ऋग्वेदाचे संपूर्ण तिसरे मंडल आहे, ते एकट्या विश्वामित्राचे नाही, तर विश्वामित्र संप्रदायातील अनेकांनी ते रचले आहे, असे मानावे लागते. या संपूर्ण ऋग्वेदामध्ये विश्वामित्र संप्रदायात ऋ. मं, ३ सूक्‍त ५३. ऋचा ७, ९.१२ या तीनच ऋचा विश्वामित्र संप्रदायाच्या मूळ पुरुषाचे वर्णन करताना दिसतात. (यात त्याच्या नावाचा संदर्भ येत नाही.) अन्यथा इतरत्र विश्वामित्र हा एक संप्रदाय समुदाय स्वरूपातच व्यक्त होताना दिसतो. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत, 

ऋचा

इमे भोजा अिंगरसो विरूपा दिवस्पुत्रासो असुरस्य वीरा:।

विश्वामित्राय ददतो मघानि सह स्त्रसावे प्रतिरन्त आयु:॥ (ऋ, ३.५३.७)

अन्वय

इमे भोज अंगिरसो विरूपा दिवस्पुत्र आसो असुरस्य वीरा

विश्वामित्र आय ददतो मघानि सहस्त्र सावे प्रतिर अंन्त आयु

शब्दार्थ

इमे = या, भोज = भोजन, अंगिरसो = अग्नीला, विरूपा = विरूप, दिवस्पुत्र = सूर्यपुत्र, आसो = आसन, असुरस्य = असुरातील, वीरा = पराक्रमी, विश्वामित्र = विश्वामित्राने, आय = उत्पन्न, ददतो = प्रदान केले, मघानि = मगधातील माग पुजार्‍यांना, सहस्त्र = शेकडो, सावे = सर्वात हितकर, प्रतिर=पैलतीर, अंन्त = शेवटी, आयु = आयुष्य

(विश्वामित्राने) या भोजन देणार्‍या (मेधीय) अग्नीला व सूर्यपुत्रांना विरूप केले व असुरांतील पराक्रमींना आसनावर विराजमान केले. विश्वामित्राने सर्व उत्पन्न, मगधातील माग पुजार्‍यांना प्रदान केले व शेकडो लोकांना आयुष्याच्या शेवटी, मृत्यूनंतर एक सर्वात हितकर असे (ऊर्जा ब्रह्मवादाचे) पैलतीर निर्माण करून दिले.

ऋचा

महां ऋषिर्देवजा देवजूतो। स्तभ्यनात्सिन्धुमर्णवं नृचक्षा ।

विश्वामित्रो यदवहत्सुदासमप्रियायत कुशिकेभिरिन्द्र :।। (ऋ, ३.५३.९)

अन्वय

महा: ऋषि देव ज देवजुतो अस्त अभ्यनात सिंधुम अर्णव नृ उचक्षो  

विश्वामित्रो यद वहत सुदासम प्रिय आयत कुशिक इभिर इंद्र 

शब्दार्थ

महा = महान, ऋषि = ऋषी, देवज = देव म्हणून जन्मलेले, देवजुतो = देवयज्ञ करणारे, अस्त = शेवट, अभ्यनात = पूर्वीपासून राहणारे, सिंधुम = सिंधुवासी, अर्णव = समुद्र, नृ = मानव, उचक्षा = आंधळे, विश्वामित्रो = विश्वामित्रांनी, यद = जो, वहत = बैल, सुदासम = सुदासांना, प्रिय = आवडता (शेतीसाठी), आयत = दीर्घ, कुशिक = नांगरधारी, इभिर = हत्ती (अहिकुलीन), इंद्र = राजा

महान ऋषी, देव म्हणून जन्मलेले, देवयज्ञ करणारे यांचा अस्त करून पूर्वीपासून जे सिंधुवासी होते, अशा आंधळ्या मानवी समूहांना विश्वामित्राने, जो (मेधयज्ञात बळी दिला जाणारा बैल होता) तो शिवारकर्‍यांना शेतीसाठी प्रिय करून दिला. आणि दीर्घ काळापासून जे नांगरधारी अहिकुलीन लोक होते त्यांना राजा केले.

ऋचा

ययीमे रोदसी उभे अहमिन्द्रमतुष्टवम्।विश्वामित्रस्य रक्षति बह्मदं भारतं जनम् ॥ (ऋ, ३.५३.१२)

अन्वय

यया इमे रोदसी उभे अहम इंन्द्र तुष्टवम् विश्वामित्रस्य रक्षति ब्रह्मद भा रत जनम

शब्दार्थ

यया = अश्वमेध, इमे = हे, रोदसी = पृथ्वी व आकाश, उभे = दोन्ही, अहम इंन्द्र = अहंकारी इंद्र, तुष्टवम् = संतुष्ट करणे, विश्वामित्रस्य = विश्वामित्राने, रक्षति = रक्षण करणे, ब्रह्मद = ऊर्जा ब्रह्मद्वारे, भा = तेज, रत = रममाण होणे, जनम = लोकसमूह

हे अश्वमेध करणारे, पृथ्वी आणि आकाश दोन्ही ठिकाणी, अहंकारी इंद्रालाच संतुष्ट करीत होते. परंतु विश्वामित्राने ऊर्जा ब्रह्ममार्गाद्वारे या लोकांना तेजात रममाण करून रक्षण केले.

ऋचा

विश्वामित्रा अरासत ब्रह्मन्द्राय व्रज्रिणे करदिन्न: सुराधर:॥  (ऋ, ३.५३.१३)

अन्वय

विश्वामित्र अरासत ब्रह्म एद्राय वज्रिणे करदिन्न सुराधर 

शब्दार्थ

विश्वामित्र = विश्वामित्राने, अरासत = नि:शब्द, ब्रह्म = ऊर्जेला, एद्राय = राजांचे, वज्रिणे = शस्त्र, करदिन्न = कर देणारे, सुराधर = या दारू गाळणार्‍यांना (सोमरस प्राशन करणारे वैदिक)

विश्वामित्राने नि:शब्द ऊर्जा ब्रह्माला राजांचे शस्त्र करून या सुराधर (वैदिकांना) कर देणारे केले.

या विश्वामित्राने आपल्या प्रतिसृष्टीत इष्टी नावाचा अहिंसक होम आणला; ज्यात मेधाऐवजी धान्यांच्या आहुती देण्यास प्रारंभ झाला. तात्पर्य, विश्वामित्रालाच परम इष्टी प्रजापती अशी उपाधी प्राप्त आहे. तसेच या परमेष्ठी प्रजापतीनेच हिरण्यगर्भ सूक्त मांडून ज्याच्या गर्भात हिरण्य म्हणजे ज्योती किंवा प्रकाश आहे, अशा अणुप्रधान विश्वाच्या रचनेची नवी मीमांसा सादर केली. याने वैदिकांनी निर्माण केलेल्या आर्य आणि दास या दोनही वर्णाला एकत्र करून पूर्वीचा अहि म्हणजे महत्ती कुळालाच अहि म्हणजे नाग नावाचा नवा संबेाध प्रदान करून, हे सर्व वैदिकेतर लोक एकत्र जोडून घेतले. राजसूय यज्ञ निर्माण करून दासासुरांपैकी पराक्रमी राजांना राज्याभिषेक केला; यातून जे युद्ध उभे राहिले तेच दासराज्ञ युद्ध होय. अशा अनेक घटना या विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीत घडलेल्या आहेत. विश्वामित्रापासूनच हा श्रमण संप्रदाय प्रारंभ होतो आणि शुन:शेप, याज्ञवल्क्य, बुद्ध, महावीर ते संतांपर्यंतही या विश्वामित्रीय ऊर्जा ब्रह्मवादी संप्रदायाचे अस्तित्व या ना त्या रूपात आढळून येते. (जिज्ञासूंनी प्रस्तुत लेखकाचा ‘सिंधुकालीन इतिहासाचे वास्तव’ या ग्रंथातील विश्वामित्राची प्रतिसृष्टी यावरील सविस्तर विवेचन वाचावे.)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

याचा अर्थ विश्वामित्राने वैदिकांच्या धार्मिक विरोधात बंड पुकारून त्यांच्या मेध, सोम, काम, दाम, भ्रम, प्रजापती, इंद्र आणि स्वर्गादी सर्व उपभोगवादी व्यवस्थांना विरोध केला होता. यातून वैदिकेतरांसाठी नवी धार्मिक व्यवस्था उभारली होती, तीच त्याची प्रतिसृष्टी होती, यात शंका राहत नाही. हा सर्व इतिहास सुमेरूयन वैदिकांचा आगमन काळ (इ. स. पूर्व ३१०१) ते ब्राह्मण ग्रंथ काळ (इ. स. पूर्व १३५०) अशा १६५० वर्षातील या वैदिक आणि ब्रह्मवादी यांच्यात घडलेल्या घडामोडीचा हा इतिहास आहे. पुढे ब्राह्मणग्रंथ काळात वैदिकांनी वेदमंत्रांना ब्रह्म संबोधून स्वत:चा समावेश ब्राह्मण वर्णात करून घेतला आणि ऊर्जा ब्रह्माला अलौकिक ब्रह्म करून सादर केले.

याचा अर्थ विश्वामित्राने वैदिकांच्या धार्मिक सृष्टीला शह देऊन एक प्रतिसृष्टी निर्माण केली होती. विश्वामित्राच्या या  प्रतिसृष्टी  निर्मितीचा प्रारंभ हा साधारणत: इ. स. पूर्व २००० च्या आगेमागे झाला आणि इ. स. पूर्व १३५० पर्यंत ६५० वर्ष टिकला. विश्वामित्र मुनींच्या या प्रतिसृष्टीतच किलाकर लिपी ऐवजी या ब्रह्मवादी संप्रदायाने सिंधुकालीन मारअंकी लिपीचा विकास करून नवी लिपी घडवली. अशा लिपीला त्यांनी ब्रह्मवाद्यांची लिपी म्हणून ब्राह्मी असा संबोध दिला.

याचा अर्थ विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीत या मारअंकी लिपीच्या अधिष्ठानावर ब्राह्मीद्वारे मारअंकीचेच प्रथमत: पुनरुज्जीवन घडवले गेले. आपल्या ऊर्जा ब्रह्मवादाचे तत्त्वज्ञान संकलित करणारी, त्या तत्त्वज्ञानाचे रक्षण करणारी लिपी म्हणून या लिपीला ब्राह्मी संबोधन दिले गेले. ऋग्वेदातील अनेक दाखल्यावरून आणि आरण्यके, उपनिषदांवरून विश्वामित्रानेच ही ऊर्जा ब्रह्मवादी प्रतिसृष्टीची उभारणी केल्याचे स्पष्ट होते. विश्वामित्राने सिंधुकालीन मारअंकी लिपीला संस्कारित करून आपल्या प्रतिसृष्टीमध्ये ब्राह्मी म्हणून स्वीकारले.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......