अजूनकाही
पुरोगामी विचारवंत, नाट्यसमीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पाताई भावे यांचं ३ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत निधन झालं. आज त्यांची जयंती. त्यानिमित्ताने आज साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘पुष्पा भावे : विचार आणि वारसा’ हा गौरवग्रंथ प्रकाशित होत आहे. याचे संपादन गणेश विसपुते, वैशाली रोडे यांनी केले आहे. त्यांनी या ग्रंथामागची भूमिका स्पष्ट करणारे संपादकीय लिहिले आहे. त्याचे हे पुनर्मुद्रण....
..................................................................................................................................................................
विसाव्या शतकात महाराष्ट्रानं मोठी सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं पाहिली. पारतंत्र्याचा काळ, स्वातंत्र्य आंदोलन, मोठ्या संघर्षानंतर आणि बलिदानांनंतर मिळालेलं स्वातंत्र्य, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तीसंग्राम, आणीबाणीचा काळ आणि प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात शतकाच्या अखेरच्या टप्प्यावर उजव्या शक्तींचं फोफावणं. या काळातल्या प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्रात सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांत दिशादर्शक धुरीणत्व देणारी सक्षम फळी होती आणि त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या जागल्यांचा मोठा समूदाय सतत कार्यरत राहू शकला. वैचारिक स्पष्टता, आपल्या मतांचा निर्भीड उच्चार आणि लोकशाहीवादी मूल्यांवर अढळ निष्ठा असलेला सच्चा स्वर पुष्पा भावे यांच्या रूपानं सत्तरच्या दशकापासून महाराष्ट्रात लाभलेला होता. सामाजिक-राजकीय जनआंदोलनं, वंचित-दलित-कष्टकऱ्यांचे संघर्ष, साहित्य, संस्कृती, स्त्रीवादी विचारांच्या चळवळी, अशा अनेक क्षेत्रांमध्ये पुष्पाताईंनी आघाडीवर राहून काम केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. एकाच व्यक्तिमत्त्वाला लाभलेले हे विविध पैलू होते.
ज्याला महाराष्ट्राचा नवोदयाचा काळ म्हटला जातो, त्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाच्या सांध्यावर मराठी समाजात जे नेतृत्व निर्माण झालेलं होतं, त्यातले अनेक जण मुळात शिक्षण, कायदे, अर्थशास्त्र किंवा या प्रकारच्या पार्श्वभूमीतून आलेले असले तरी ते त्या त्या क्षेत्रांपुरते सीमित राहून काम करणारे नव्हते. न्यायाधीश अर्थशास्त्रावरची पुस्तकं लिहीत होते, भाषांतरं करत होते, मराठी भाषेसाठी अविरत काम करत होते, प्राध्यापक-शिक्षक-लेखक आणि सगळेच वेगवेगळ्या प्रकारे विविध सामाजिक-राजकीय आंदोलनांमध्ये सामील होत होते. एकच व्यक्ती अनेक क्षेत्रांमध्ये आपलं बौद्धिक कसब दाखवू शकत होती, जणू ती त्या काळाची निकड होती.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
स्वातंत्र्यानंतर नवनिर्मितीची स्वप्नं आणि अपेक्षाभंग अशी दोन टोकं पुष्पाताईंच्या पिढीनं पाहिली. साहित्य-संस्कृती-सामाजिक क्षेत्रांमध्ये अनेक नव्या गोष्टींची उभारणी होत होती आणि ही पिढी त्या सगळ्या घटनांना प्रत्यक्ष साक्षीदार होती. पुष्पाताईंनी विद्यार्थिदशेपासून हा सगळा काळ डोळसपणे पाहिला-अभ्यासला होता. त्यामुळे विसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यावर जेव्हा त्या सार्वजनिक आयुष्यात सक्रिय होऊ लागल्या, तेव्हा त्यांच्या पाठीमागे हा सगळा वारसा होता आणि तो त्या जाणून होत्या.
महाराष्ट्राला त्यांची ओळख सुस्पष्ट वैचारिक भूमिका असलेल्या आणि लोकशाही आणि समतेच्या मूल्यांना सर्वोपरी मानणाऱ्या निर्भीड विचारवंत, विद्यार्थिप्रिय अध्यापक आणि संस्कृतीसमीक्षक अशी होतीच, पण त्यांच्या व्यक्तित्त्वाला अनेक पैलू होते. आपले विचार नेमकेपणे पोहचवणारं प्रभावी वक्तृत्त्व त्यांना लाभलं होतं. पण त्याचबरोबर त्या जमिनीवरील लढ्यांशी-चळवळींशीही जोडलेल्या होत्या. गेल्या सहा दशकात त्यांचा अनेक संस्थांशी-चळवळींशी त्यांचा सक्रिय संबंध होता. नागरी समाजात सतत सतर्क आणि जागं राहून लोकशाहीवादी मूल्यांसाठी संघर्षशील अशीच आपली भूमिका त्यांनी ओळखली असल्यानं लोकलढ्यांतल्या कितीतरी लहान-मोठ्या चळवळी, कार्यकर्त्यांची शिबिरं, आंदोलनं, यांत त्यांचा कृतीशील सहभाग होता. प्रस्तुत ग्रंथातील अनेक लेखांतून त्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
स्त्रीप्रश्न, स्त्रीवाद आणि स्त्रियांच्या चळवळी यांतही त्यांनी महाराष्ट्रात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातळीवरील स्त्रीवादी अभ्यासकांच्या संघटनेतही त्या सक्रिय होत्या. स्त्रीवादाची सैद्धांतिक मांडणी करत असतांनाच स्त्रीप्रश्नावर प्रत्यक्ष आंदोलनांमध्येही त्या उतरलेल्या आपल्याला दिसतात. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे दर दोन वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘साहित्य संवाद’ या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमाचं २०१९ सालचं मुख्य सूत्र ‘स्त्रीवाद, स्त्रीवादी लेखन आणि स्त्रीवादी चळवळी’ असं असावं अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार या दोन दिवसीय परिषदेची आखणी झाली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या या परिषदेला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला होता.
नाटक हा त्यांच्या तीव्र आस्थेचा विषय होता. त्यांचं सुरुवातीचं लेखन या नाट्यप्रयोगांविषयीच होतं. सत्तरच्या दशकात मराठी रंगभूमी बदलत होती, तेव्हा या बदलांचा चिकित्सक अर्थ पुष्पाताईंच्या लेखनातून स्पष्ट होत होता. आणि त्यातून त्या काळात प्रायोगिक नाटकात नवं काही करू पाहणाऱ्यांना केवळ भानच नव्हे तर बौद्धिक पातळीवर समर्थनही मिळत होतं. हे लेखन करताना त्यांची दृष्टी केवळ विवेचनात्मक नव्हे, तर तिला बळकटी देणाऱ्या सिद्धान्तांसह मूल्यचौकट देणारी होती. त्यांचं हे लेखन प्रसंगी परखड वाटलं असलं तरी ते न्याय्य समीक्षाच करणारं होतं, हे आज त्यांच्या त्या दशकांतल्या लेखनाकडे पाहताना लक्षात येतं. नाट्यशास्त्र हा विषय महाराष्ट्रात अधिक गांभीर्यानं घेतला जावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी मराठवाडा विद्यापीठात नाटक विभाग सुरू करण्याचा आग्रह धरला होता.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पुष्पाताईंच्या कामाचा पट एवढा वाढत गेल्यानं त्यांच्या हातून व्हावं, तेवढ्या प्रमाणात लेखन होऊ शकलं नाही. त्यांचा ज्यांना सहवास लाभला, ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष ऐकलं, ज्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालं, चर्चा करण्याच्या संधी मिळाल्या त्यांना याची रुखरुख वाटत राहील. प्रस्तुत ग्रंथात त्यामुळेच पुष्पाताईंचं निवडक लेखन द्यावं असं आम्ही ठरवलं.
२०२० या आपत्तीनं जगालाच ग्रासलेल्या वर्षात ३ ऑक्टोबर २०२० रोजी पुष्पाताईंचं निधन झालं. हा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या कुटुंबावरचा मोठा आघात होता. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या अध्यक्ष आणि ‘मायमावशी’च्या सल्लागार संपादक होत्या. त्यांचं मार्गदर्शन आणि नैतिक पाठबळ असणं ही आमच्यासाठी मोलाची गोष्ट होती. त्यांच्याप्रती आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्मृतीग्रंथाची निर्मिती करावी ही कल्पना गजानन खातू यांची. भाईंनी केलेली सूचना सगळ्यांनाच पटली आणि ती प्रत्यक्षात येऊ शकली.
पुष्पाताईंनी मागे ठेवलेला विचार आणि वारसा यांमुळे समकालातल्या प्रश्नांना भिडण्याचं बळ आपल्याला आणि येत्या पिढ्यांना मिळावं आणि रवींद्रनाथांनी मांडलेली ‘भारताची कल्पना’ (आयडिया ऑफ इंडिया) बळकट होण्यासाठी सगळ्या लोकशाहीवादी प्रयत्नांना ऊर्जा मिळावी हीच अपेक्षा आहे.
‘पुष्पा भावे : विचार आणि वारसा’ – संपादक गणेश विसपुते, वैशाली रोडे,
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, वडघर,
मूल्य – ४०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment