अधीर नि आतूर दिल्ली का छोकरा... वयाला न शोभणारी आव्हानं बेधडकपणे स्वीकारणारा... प्रारंभालाच यशाचं मांद्य शरीरावर चढल्याने बहकलेला गुलछबू-गोबरा क्रिकेटपटू... ही विरोट कोहलीची अर्थातच भूतकाळातली तीन रूपं. पण वर्तमानातला विराट याहून पूर्णपणे वेगळा आहे. त्याचं हे वेगळपण क्रिकेटपटू विनायक राणे यांनी ‘विराट’ या नव्या-कोऱ्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडलं आहे. हे पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यातील हे एक प्रकरण...
..................................................................................................................................................................
सगळं कसं मनासारखं घडत होतं. एका मागोमाग स्पर्धा, त्या स्पर्धांमधलं यश, जोडीला येणारं ग्लॅमर, हातात खुळखुळणारा पैसा, मीडियामधली हवेत तरंगायला लावणारी प्रसिद्धी, या म्हणायला सुखद भासणाऱ्या अवस्थांतून विराट आता जाऊ लागला होता. ही निसरडी पायवाट होती. आत्ममग्नतेचा, आत्मप्रेमाचा धोका संभवत होता. तशातच, त्यानं बारावीतच शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.
मनोमन ठरवलं, आता क्रिकेट एके क्रिकेट. ते स्वाभाविकही होतं. या खेळामुळे त्याचं नाव होऊ लागलं होतं. युवा संघानं त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकल्यानं पुढे त्याला आयपीएलचा करारदेखील लाभला होता.
मात्र २००८चा आयपीएलचा पहिला मोसम विराटसाठी अपयश देणारा ठरला. पण विराटच कशाला, राहुल द्रविडचं नेतृत्व लाभलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा हा संपूर्ण संघच त्या स्पर्धेत कमी पडला होता. संघात खूप मोठे मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते, आजही आहेत. काही भारतीय, काही परदेशी. त्याचं आकर्षण नवागत विराटला होतंच. पण, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मलाही खेळायचं आहे, ही भावना त्याला सर्वाधिक सुखावणारी होती; पण याच दरम्यान एका क्षणी त्याचा पाय घसरला. त्याचं खंबीर मन खचलं. तो मोहाला बळी पडला. हा मोह होता, आयपीएल लढतींनंतर रंगणार्या रंगारंग पार्ट्यांचा. विराट याचं वर्णन करतो- ‘मी कुठे ना कुठे त्यांच्यात वाहवत गेलो. तो माझ्या कारकिर्दीतील सर्वात निराशाजनक कालावधी होता.’
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आपल्याला दर्जेदार खेळाडूंसह एकाच संघातून खेळण्याचा मान मिळाला आहे, याचा अतिव आनंद, तो आनंद साजरा करण्यासाठी स्पर्धेदरम्यान रोज रंगणाऱ्या नाइट पार्ट्यांमधला सहभाग यामुळे विराट काही काळापुरती एकाग्रता गमावून बसला. आपण कोणता दृष्टिकोन घेऊन या खेळात आलो, याचा काही काळ का होईना, त्याला विसर पडला. मग काय भरकटलेल्या, बेधुंद, बेभान झालेल्या विराटचे किस्से मीडियात प्रसृत होऊ लागले. ‘पराभूत सामन्यात विराटचा त्रागा!’, ‘तापट विराटचा पत्रकारांशीच पंगा...’, ‘विराटनं पत्रकारांना सुनावलं’ अशा बातम्या सर्रास येऊ लागल्या. त्या वेळी आयपीएलच्या पहिल्या मोसमात विराटसाठी बेंगळुरूने वीस लाखांची बोली लावली होती. ही रक्कम त्या वेळी मोठीच होती. या सगळ्यामुळे त्याच्या डोक्यात हवा गेली, हे त्या वेळी अनेक जाणकारांचं निरीक्षण होतं.
विराटनं जे टॅटू आपल्या अंगावर गोंदवले आहेत, त्याची स्वतःची एक ओळख आहे. त्यामागे विराटची एक गोष्ट आहे; पण पठ्ठ्याला हे स्वतः समजून घ्यायलाही वेळ लागला. पूर्वी हे टॅटू तो फक्त फॅशन म्हणून गोंदवून घेत होता. खेळपट्टीवर फलंदाजी करताना दिसत नव्हतं, एवढं पदलालित्य पार्ट्यांमध्ये थिरकताना त्याच्या नृत्यात दिसू लागलं होतं. नव्हे, आताच्या ‘ब्रँड न्यू’ विराटनं स्वतः एका मुलाखतीत उघड केलं, की, त्याचं दारू पिणं तेव्हा प्रमाणाबाहेर वाढलं होतं. आयपीएलदरम्यान फक्त मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेर हॉटेलात, पत्रकार परिषदेत झालेल्या त्याच्या शाब्दिक बाचाबाचीच्या बातम्या सातत्यानं येऊ लागल्या होत्या. त्या वेळीस आलेल्या एका वृत्तानुसार रॉयल चॅलेंजर्स संघातील सीनियर खेळाडूंप्रमाणे आपल्यालाही बिझनेस क्लासचं तिकीट द्यावं, असा हट्ट विराटनं धरल्याचं लोकांपुढ्यात आलं होतं. आज आता, वाल्याचा वाल्मिकी झाल्यानंतर, विराट आपला तो मस्तवालपणा खुल्या दिलानं मान्य करताना दिसतो. यालाही अर्थातच एक जिगर लागते.
परंतु, तेव्हा असंही घडलं नाही, की त्या वेळी वाहवत चाललेल्या विराटला कोणी रोखलं नाही. प्रशिक्षक शर्मासरांनी परिस्थिती ओळखून वेळोवेळी त्याची कानउघाडणी करण्याचा प्रयत्न केला, पण, एरवी शर्मासरांचा एकेक शब्द झेलणारा विराट त्या वेळी मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. ‘टीकाकार, बोलणारे बोलतच राहतील. मी त्यांना मानत नाही’, असं सांगून टाळाटाळ करत होता. त्या वर्षी विराटनं १३ लढतींमधील १२ डावांत अवघ्या १६५ धावा केल्या होत्या. ज्यात ३८ धावांची खेळी, त्याची सर्वोत्तम खेळी होती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
खरं तर त्यानं त्या वेळी वनडे, कसोटी अशा संघांत स्थान मिळवलं होतंच. मात्र गरज होती, ती त्यानं मैदानावरच्या खेळात आणि मैदानाबाहेरच्या जगण्यात गांभीर्य आणण्याची. अशा बिकट परिस्थितीत दिवस आणि क्रिकेटचा मोसम सरत होता; हे स्पष्टच होतं, हा विराटचा पडता काळ होता. खेळामध्ये, त्यातही विशेषतः कोट्यवधी भारतीयांचा जीव की प्राण असलेल्या क्रिकेट खेळात अपेक्षांचं भलंमोठं ओझं घेऊन खेळताना भल्याभल्यांना बॅडपॅच तसा चुकत नाही, पण कारकिर्दीच्या अगदी प्रारंभालाच विराटच्या तो वाट्याला आल्यानं त्याच्या आसपासच्या हितचिंतकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. आणखी एक मोहरा गळून पडणार की काय, अशा शंका गडद होत असतानाच २०१२चा क्रिकेट मोसम विराटच्या कारकिर्दीत वेगळं वळण घेऊन आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात त्याच्या धावांना गती मिळू लागली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो प्रभावी ठरलाच, पण श्रीलंकेविरुद्ध शतक त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला कलाटणी देणारंही ठरलं. पुढे पार पडलेल्या आशिया कपमध्ये त्यानं भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा धावांचा ओघ आता आयपीएलमध्येही दिसेल, असं विराटनं त्यावेळी गृहित धरलं. तो आयपीएलमध्येही आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला. सगळं आपल्या मनासारखं होईल, असं त्याला वाटलं. मात्र तसं काहीच घडलं नाही.
त्यावर्षीच्या आयपीएलमध्ये विराट निष्प्रभ ठरला. साहजिकच विराटवर चहुबाजूंनी टीका झाली. ती टीका त्याच्या जिव्हारी लागली. तो मनापासून दुखावला. त्याचा आत्मविश्वास पहिल्यांदा डळमळीत होताना दिसला. हा विराटसाठी दुःस्वप्नांचा काळ होता. कारकिर्दीतील या टप्प्याबाबत विराट कोणताही आडपडदा न ठेवता नंतरच्या काळात मीडियाशी बोलला. त्यानं त्या वेळी हेदेखील कबूल केलं की, २०१२पर्यंतच्या आयपीएल मोसमापर्यंत त्याच्या खाण्या-पिण्यालाही म्हणावी तशी शिस्त नव्हती. विराटनं हेदेखील मान्य केलं की, त्यावेळी त्याचं दारू पिणंही वाढलं होतं. आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये बेधुंद होणं नित्याचं झालं होतं. जणू कारकीर्द समुद्राच्या वाळूप्रमाणे मुठीतून निसटून जाऊ लागली होती.
आयपीएलच्या त्या अपयशी मोसमानंतर विराट घरी परतला, तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटली. तो म्हणतो, ‘मी अंघोळ करून बाहेर आलो. स्वतःला आरशात बारकाईनं न्याहाळलं. माझे गोबरे गाल जरा जास्तच वर आले होते. खरं तर अॅथलिट म्हणून माझी हनुवटी, माझी जॉ-लाइन प्रकर्षानं दिसायला हवी होती, पण गोबर्या गालांमुळे चेहरा गोलमटोल झाला होता. त्याला सूज आली होती म्हणा ना. पोटाचा नगारा नव्हता; पण आहे, त्या पोटाला नगार्याचं रूप प्राप्त होण्याची शक्यता दाट होत चालली होती. मी व्यावसायिक खेळाडू आहे. मी असा बेढब कसा काय दिसू शकतो? मी इतका बेपर्वा कसा होऊ शकतो? हे प्रश्न मी स्वतःला विचारले. ती संबंध रात्र अस्वस्थतेत गेली. आपण स्वतःहून गाळात चाललोय. स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतोय, याची जाणीव मला प्रकर्षांनं झाली. पण, जशी रात्र सरली. नवा दिवस उगवला. या दिवसाची सकाळ मला आंतरबाह्य बदलवणारी ठरली. मी ठाम निश्चयाने उठलो. हा निश्चय होता, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा. त्याच इराद्याने मी फिजिओ, तसंच आहारतज्ज्ञांशी संपर्क साधत वेळापत्रक आखून घेतलं. खाण्यापिण्याच्या अनारोग्यकारक सवयी टाकून दिल्या. महत्त्वाचं म्हणजे, स्वतःशी, स्वतःच्या शरीर-मनाशी अंत्यस्थ संवाद साधला. सराव आणि व्यायामाच्या वेळापत्रकात आणि पद्धतीत जाणीवपूर्वक बदल केला.’ याचाच अर्थ, तळ गाठलेल्या, पण मुळातच निर्धारू मनोवृत्तीच्या विराटनं बेफिकीर विराटवर जाणीवपूर्वक मात केली.
विश्वास बसत नसेल, तर एकदा विराटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला भेट द्या. सुरुवातीपासूनच्या त्याच्या पोस्ट बघा, ही व्यक्ती खेळाडू आणि माणूस म्हणून किती बदललेली आहे, याचा एखाद्याला सहज अंदाज येईल.
नाही म्हणायला, २०११पर्यंत विराट सरावात झोकून देत मेहनत करत होता. क्षेत्ररक्षणाच्या सरावातील त्याची हिरिरी, नेटमधील सरावात तासन्तास केलेली फलंदाजी आणि घोटवून घेतलेलं तंत्र हे सारं व्यवस्थित, लक्ष केंद्रित करूनच सुरू होतं; पण या सगळ्यात कमतरता होती, ती जिममधील शिस्तबद्ध व्यायामाची आणि आहारावरील कटाक्षाची. या दोन गोष्टी अंगीकारल्यास जात्याच अष्टपैलू क्रीडापटू असलेल्या विराटमध्ये स्वयंशिस्त येणारच होती. पण, हे कठोर वेळापत्रक सुरू झाल्यावर पहिले सहा महिने विराटला खूपच जड गेले; पण हळूहळू, जिममध्ये व्यायाम करताना केलेली दोन-दोन तासांची मेहनत, नियमबद्ध नि आरोग्यदायी आहार, हे अंगवळणी पडत गेलं. किंबहुना, पुढे पुढे विराटला याच जीवनशैलीत रस वाटू लागला. ट्रेनिंग म्हणजे फक्त मैदानातला सराव नव्हे, तर त्यात जिममधील मेहनत आणि आहाराचाही समावेश असतो, हे विराटला उमगलं. खरं तर त्याच्या जवळच्या व्यक्तींनी अरबट-चरबट खाण्यावरून त्याला सावध केलं होतं. शरीर जाडपणाकडे झुकत असल्यानं मैदानावर तो काहीसा संथ होत असल्याचंही त्याला लक्षात आणून दिलं होतं. पण जोपर्यंत मनापासून एखादी गोष्ट करण्याची प्रेरणा मिळत नाही, आपल्या चुकांची जाणीव करून देणारा तो निर्णायक क्षण येत नाही, तोवर काहीच होऊ शकत नाही, हेही विराटला पुरतं ठावूक होतं. त्याच्या सुदैवानं, आरशात जेव्हा त्यानं स्वतःला न्याहाळलं, तेव्हा तो निर्णायक क्षण आला. स्वतःच्या असण्याची लाज वाटून तो ओशाळला आणि त्यातून नव्या विराटनंही जन्म घेतला. आयुष्यात कुठे थांबावं हे कळणाऱ्या प्रगल्भ माणसाप्रमाणेच विराटनं बदलाचा क्षण अचूकपणे ओळखला!
आयसीसीनं २०१९च्या वर्ल्डकपदरम्यान रोहित शर्माची एक छोटीशी मुलाखत घेतली होती. त्यात त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता, संघात असा कोणता खेळाडू आहे जो, सर्वाधिक वेळ जिममध्ये असतो? आणि रोहितचं उत्तर होतं- आमचा कर्णधार विराट कोहली! ही सगळी मेहनत तो फिट राहण्यासाठी करतो आहे. गंमत वाटेल; पण युवराजसिंगसारख्या जिंदादिल आणि तेवढ्याच गुणी क्रिकेटपटूचा किस्सा विराटनं सांगितला आहे. युवी खरोखरच गुणांची खाण; पण फोकस आणि फिटनेसच्या अभावामुळे हा खेळाडू मागे पडला अन् २०१९च्या जूनमध्ये निवृत्त झाला. खूपच विचित्र योगायोग होता हा. म्हणजे, ज्या युवराजनं कॅन्सरसारखा जीवघेणा आजार वागवत, २०११चा वर्ल्डकप मॅन ऑफ सिरीज हा किताब मिळवून कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर गाठलं होतं. तोच २०१९च्या वर्ल्डकपची धामधूम सुरू असताना इकडे भारतात निवृत्तीची घोषणा करत होता. याच युवराजने एकदा त्याची तारीफ करणार्या विराटला प्रेमानं समजावलं होतं. म्हणाला होता, ‘बाबा रे, तुला जर खरोखर मोठा क्रिकेटपटू व्हायचं असेल तर तू मला अजिबात फॉलो करू नकोस. यापेक्षा तू सचिन तेंडुलकरला फॉलो कर. त्याला आदर्श मानून वाटचाल करशील तर खूप मोठा होशील.’
मागे एकदा, भारताचा जलदगती गोलंदाज आणि प्रमुख पाहुणा म्हणून लहानग्या विराटला स्वतःच्या हस्ते बक्षीस देणाऱ्या आशिष नेहरानं एका मुलाखतीत म्हटलं होतं, की, ‘स्पर्धा जिंकल्यानंतर संघात मिठाईचा एक छोटासा पुडा आणला जातो. प्रत्येक खेळाडू आनंदचा क्षण म्हणून मिठाईचा एक किंवा अर्धा तुकडा तोंडात टाकतो. विराट याला अपवाद आहे. तो अनेकांना आपुलकीनं भरवतो; पण स्वतः मात्र त्या मिठाईचा कणही चाखत नाही. दौऱ्यावर असताना विरंगुळा म्हणून खेळाडू मध्येच पिकनिक ठरवतात, अशा प्रसंगी कधी हॉटेलमध्ये खाणं होतं. तर कधी आम्ही संघातील सगळेच एखाद्या पबमध्ये आनंद साजरा करायला जातो. विराट ते सगळं मनापासून एन्जॉय करतो; पण वेळ होताच, सोबत आणलेल्या डब्यातील सॅलेड खाऊनच त्याची पेटपूजा होते. त्याच्या अशा या क्रिकेटशी एकनिष्ठ राहण्याचं, बांधिलकीचं मला नेहमीच अप्रूप वाटतं.’
अर्थातच, आहार-विहार, यम-नियम हे सारं विराट खूप गांभीर्यानं घेतो. तो म्हणतो, ‘माझ्या शरीराचा ढाचा वेगळा आहे. मी लोकेश राहुल, हार्दिक पंड्या यांच्यासारखा मुळातच शिडशिडीत नाही. त्यांनी एक दिवस डाएटला सुट्टी दिली आणि दुसर्या दिवशी जिममध्ये एक तास जास्त काढला, तर फिट्टम्फाट होतात. माझं तसं नाही. मी नेहमीचं चमचमीत जेवण खाल्लं, तर माझं वजन झटपट वाढतं. माझी ती प्रकृती आहे. त्यामुळे ते जर टाळायचं, तर निग्रहाला पर्याय नाही. आता खरं तर या नियमबद्ध जगण्याचीच मला इतकी सवय झालीय की, तर मला माझं आखीवरेखीव डाएटच आवडतं. आता, ते सोडून इतर काही खाल्लं तर मलाच चुकल्यासारखं होतं.’
मागे ‘सरबजीत’ या सिनेमासाठी अभिनेता रणदीप हुडा याला निम्म्याहून अधिक वजन कमी करण्यास भाग पडलं होतं. पण ते साधलं कसं, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं कसं, असा जेव्हा त्याला प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला होता की, मनातल्या मनात कल्पनेतच जेवून मी ही किमया साध्य करत असे. पण, विराटनं तर असंही कधी केलं नाही. तरीही त्याला असं मनातल्या मनात खाण्याबाबतही विचारण्यात आलं; पण तो ‘नाही’, असं उत्तर देऊन मोकळा झाला. कारण, आता त्याच्या मनातही चमचमीत पदार्थांना स्थान नाही. बटर चिकन हा दिल्लीकर आणि अस्सल पंजाब्यांचा वीक पॉइंट. विराटसाठी मात्र, आता खाण्याच्याबाबतीत असे कोणतेही वीक पॉइंट उरलेले नाहीत. तसं पंजाबी म्हटलं की, चमचमीत खाणं आणि गाणं हे ओघानंच आलं. पण, विराटच्या यादीतून चमचमीत खाण्यावर जाणीवपूर्वक फुली मारली गेली आहे; त्यातही विराट हा अशा काळात वाढलेला क्रिकेटपटू आहे, जिथे फास्टफूड, डिस्को, पब, ब्रिस्टो हे एका वर्गासाठी सर्वसंमत बदल आहेत. परंतु, त्या जाळ्यात न अडकता, विराटनं स्वतःला त्यापासून जाणीवपूर्व रोखलं, जे खरोखरच अवघड होतं. खरं तर आताही त्याची पावलं थिरकतात; पण आपल्या अगदी जवळच्या मित्रांच्या लग्नात. तेदेखील खूप खासगीतच.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
विराटचं हे रूप युवराजसिंग, झहीर खान यांच्या लग्नात अनेकांनी अनुभवलं. तो दोघांच्याही लग्नात बेभान होऊन नाचला होता. पण तेवढंच. एरवी, आपल्या दैनंदिनीतल्या प्रत्येक मिनिट नि सेकंदांचा हिशेब ठेवत त्यानुसार आखलेलं व्यायाम नि सरावाचं वेळापत्रक, तेवढाच महत्त्वाचा असलेला आराम आणि झोपेचंही वेळापत्रक, कटाक्षानं पाळायचं, हे सारं आता विराटनं साधलं आहे. ऑलिम्पिकदरम्यान आपण चिनी अॅथलिटच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक ऐकतो, वाचतो. त्यांनी खेळासाठी केलेल्या त्यागवृत्तींबद्दल वाचतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे आघाडीचे क्रिकेटपटू त्यांच्या फिटनेसबाबत किती सजग असतात तेदेखील, आपल्या सगळ्यांच्या वाचनात येतं; पण आता या परदेशी गुणवत्तेचं कौतुक करण्याचा जमाना सरला आहे. आता विराटनं व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून या परदेशी गुणवत्तेलाही मागे टाकून जागतिक क्रिकेटच्या मैदानात नाव कमावलं आहे. परदेशी वृत्तपत्रांमध्ये आता रकाने भरून विराटच्या तंदुरुस्त जीवनशैलीचं कौतुक केलं जातंय.
विराटच्या याच फिटनेस आणि खेळातील सातत्यामुळे अगदी पाकिस्तानातही विराटचे कट्टर चाहते आहेत. ‘विराट कोहली हा आज आमच्याकडील अनेक युवा खेळाडूंचा आदर्श आहे. ते विराटची शैली आणि मैदानातली देहबोली आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत’ असे कौतुगोद्गार पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानने २०१९च्या इंग्लंड वर्ल्डकप दरम्यान काढले, ही घटना तर अगदीच ताजी आहे. ‘सलाम क्रिकेट २०१९’ या कार्यक्रमादरम्यान युनूस म्हणाला होता, की, ‘विराट आमच्याकडे खूप लोकप्रिय आहे. त्याच्यासारखा फिटनेस आज सगळ्यांना हवा आहे. आमच्या तरुण फलंदाजांना विराटसारखी फलंदाजी करायची आहे.’ साहजिकच आहे, विराटने घेतलेल्या मेहनतीचं फलित जसं त्याच्या कामगिरीतून मैदानात दिसतं. तसंच ते त्याच्या पाठीराख्यांच्या वाढत्या संख्येतूनही दिसतं. तसं पाहता, शेजारी पाकिस्तानशी आपली खुन्नस जुनीच. त्याला तशी कारणंही आहेत. त्यामुळे उभय देशांतल्या नागरिकांनी एकमेकांच्या गुणवत्तेचं खुल्यादिलाने कौतुक करण्याचे प्रसंग क्वचितच येतात. निःशंकपणे ते निमित्त विराटनं पाकिस्तानला मिळवून दिलं. एकेकाळचा पार्टीबॉय विराट आता, संबंध क्रिकेटविश्वाचा आदर्श बनला...
विराट - विनायक राणे, अक्षर प्रकाशन, मुंबई, मूल्य - १७५ रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment