मनोहर सोनवणे यांच्या कथांना जागतिकीकरणाचा व्यापक संदर्भ आहे. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला सामाजिक-सांस्कृतिक आशयाची डूब आहे
ग्रंथनामा - झलक
अंबरीश मिश्र
  • ‘ब्रॅंड फॅक्टरी’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 March 2021
  • ग्रंथनामा Granthnama झलक ब्रॅंड फॅक्टरी Brand Factory मनोहर सोनवणे Manohar Sonawane अंबरीश मिश्र Ambarish Mishra जागतिकीकरण Globalization

ज्येष्ठ पत्रकार-संपादक मनोहर सोनवणे यांचा ‘ब्रँड फॅक्टरी’ हा कथासंग्रह नुकताच विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला ललितलेखक अंबरीश मिश्र यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

‘ब्रँड फॅक्टरी’ हा मनोहर सोनवणे यांचा पहिलाच कथासंग्रह. सोनवणे यांनी मोजकं, परंतु कसदार लिखाण केलंय. ‘एक शहर सुनसान’ (१९९५) हा कवितासंग्रह आणि ‘सदरा बदललेली माणसं’ (२०११) हा ललितगद्यसंग्रह; तसंच अनुवाद, संपादन आणि बातमीदारी अशी त्यांची घसघशीत कारकीर्द आहे. जवळजवळ १२ वर्षं सोनवणे ‘युनिक फीचर्स’ या प्रतिष्ठित माध्यम संस्थेत कार्यकारी संपादक पदावर होते. त्याचप्रमाणे त्यांनी ‘अनुभव’ या दर्जेदार मासिकाचे संपादक म्हणून काम केलं. गेल्या चाळीसेक वर्षांतल्या सामाजिक-राजकीय नि आर्थिक घडामोडींचे ते साक्षीदार आहेत.

पूर्वप्रकाशित अशा एकूण ११ कथांचा हा संग्रह आहे. ‘कार्ल मार्क्सचा डोळा’ या कथेचं साल आहे  १९७९, तर ‘ब्रँड फॅक्टरी’ ही कथा अगदी अलीकडची, ‘पुणे पोस्ट’च्या २०२० दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झालीए. ‘ब्रँड फॅक्टरी’ वाचून संपवल्यावर कथाकार म्हणून सोनवणे यांचा प्रवास कसा घडला ते समजून येतं. कथा या वाड़्मयप्रकाराच्या शक्यता आणि शक्ती पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेत सोनवणे मन:पूर्वक गुंतलेत ही बाब लक्षणीय आहे.

सोनवणे यांच्या कथांना जागतिकीकरणाचा व्यापक संदर्भ आहे. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला सामाजिक-सांस्कृतिक आशयाची डूब आहे. कथांचा विचार करण्यापूर्वी जागतिकीकरणाचा परामर्श घेतला पाहिजे.

गेली तीसेक वर्षं जागतिकीकरणाची अपूर्व धकाधक सुरू आहे. प्रागैतिहासिक काळातल्या एखाद्या अजस्त्र प्राण्याप्रमाणे ते सगळंच गिळू पाहतंय. उत्क्रांतीच्या उलथापालथीत डायनॉसॉर हा प्राणी सृष्टीच्या साखळीतून बाहेर फेकला गेला. निसर्गाने आपलीच निर्मिती स्वहस्ते नष्ट केली.

जागतिकीकरण मात्र माणसाच्या बुद्धीची पैदास आहे. ती विनाश तर पावणार नाहीच; परंतु जो जो माणुसकीचा ऱ्हास होईल आणि स्वार्थाचा पारा वर वर जाईल, तो तो जागतिकीकरण निरनिराळी नि भेसूर रूपं घेऊन मानवी संस्कृतीचे लचके तोडेल, असं वाटतं.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मनुष्यप्राण्याला प्रगतीची ओढ असते अन् त्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो; सामाजिक-आर्थिक नि राजकीय तत्त्वज्ञान रचतो. जागतिकीकरणाला कसलंच सामाजिक-राजकीय नॅरटिव नव्हतं. धनाची लालसा म्हणजे प्रगती या एकाच गृहीतकावर जागतिकीकरणाचा डोलारा उभा करण्यात आला. युरोप-अमेरिकेच्या साम्राज्यशाही नि वसाहतवादी राजकारणाचा नवा, स्मार्ट अवतार म्हणजे जागतिकीकरण.

संचय ही मानवाची मूळ प्रेरणा आहे. परंतु, ती आटोक्यात ठेवली पाहिजे. कार्ल मार्क्स आणि म. गांधी हेच सांगत होते. मार्क्सची मांडणी पाश्चात्य क्लासिकल विचारपद्धतीवर आधारलेली आहे, तर गांधींचा विचार भारताच्या प्राचीन, प्रगल्भ आणि लोक-संस्कृतीतून स्फुरलेल्या निरामय, निकोप शहाणपणातून आला होता.

संचयाचा अतिरेक संस्कृतीला मारक ठरू शकतो, बेसुमार स्वार्थामुळे बळी तो कान पिळी हे जगाचं सूत्र ठरेल, असं दोघांचं प्रतिपादन होतं. जागतिकीकरणाने हेच केलं. जागतिकीकरणामुळे भारताच्या स्थानिक संस्कृतींचं सपाटीकरण झालं.

जागतिकीकरणाचे फायदे सांगता येतील. पायाभूत सोयींमुळे लोकांचं राहणीमान सुधारलं. ज्ञान-तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि उद्योगाची नवनवी क्षेत्रं खुली झाली. समाजात एक खुलेपणा आला. नवी मूल्यं रुजली. पर्यावरण, जेंडर जस्टिस, स्त्री-पुरुष संबंध, एलजीबीटी, सामाजिक न्याय या प्रश्नांवर जनमत तयार झालं. ऐहिक सुखाची इच्छा बळावली हेदेखील समाजाच्या निरोगीपणाचं लक्षण मानलं पाहिजे. परंतु, आपलं सांस्कृतिक भावजीवन उद्ध्वस्त झालं. निसर्गाचं अपरिमित नुकसान झालं.

जागतिकीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या आपल्या नेत्यांचं आश्चर्य वाटतं. जागतिकीकरणामुळे भारताचा विकास होईल, असं या नेतेमंडळींना खरंच वाटत होतं काय? नव्या आर्थिक धोरणाचे तोटे त्यांच्या लक्षात आले नाहीत काय? की त्यांच्यावर पाश्चात्य देशांचं दडपण होतं? घराच्या अंगणात चार बिया टाकल्या की, झाड आपोआप आकाशाला भिडेल, हे स्वप्नरंजन झालं. भाबड्या आशावादावर देशाची अर्थव्यवस्था चालत नसते. जागतिकीकरणासाठी जमीन नांगरणं गरजेचं होतं. ते झालं नाही. म्हणून भारतीय समाज एकदम वर्दळीवर आला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आजही कैकदा सरकारी खात्यातले सर्वर डाऊन असतात. अनेक कार्यालयांत बाबा आदमच्या काळातले संगणक बसवलेत. नागरिकांना सतत हेलपाटे घालावे लागतात. याला स्ट्रक्चरल रिफॉर्म म्हणतात काय? सत्तेत असताना परदेशी गुंतवणुकीचे गोडवे गायचे आणि विरोधी पक्ष म्हणून विदेशातले प्रकल्प बंद पाडायचे, ही आपल्या राजकारणाची अवस्था आहे. जात, धर्म, पंथ, नद्यांचं पाणी या प्रश्नांवर माणसं रस्त्यावर येतात नि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करतात, खूनखराबा करतात. आपण राहतो आहोत १३व्या शतकात, आपले नेते सरंजामी वृत्तीचे आणि आपल्याला स्वप्नं पडताहेत २२व्या शतकाची. आपले सगळेच दुवे कच्चे आहेत.

२.

ही अलम दुनिया म्हणजे आपल्या वडिलांची इष्टेट आहे, हे युरोपचं (आता अमेरिकेचं) लाडकं सुभाषित आहे. पाश्चात्य देश याच गुर्मीत वागताहेत आणि मन मानेल तशी जगाची पुनर्मांडणी करताहेत. अनेक स्थानिक संस्कृतींचा नाश करून आणि इन्का, अॅज्टेक अशा मूळ जनसमूहांचं शिरकाण करून गोऱ्या लोकांनी तिथल्या संपत्तीवर ताबा मिळवला. या बेबंद लुटालुटीमुळे वसाहतवादाला आयतं भांडवल नि कच्चा माल मिळाला आणि औद्योगिक क्रांतीने बाळसं धरलं.

औद्योगिक क्रांतीमुळे मोठे शोध लागले. माणसाला अनेक सोयी मिळाल्या. जगणं सुखमय झालं. परंतु, भांडवलशाहीचा दैत्य मोकाट फिरू लागला. भांडवलशाहीच्या जोरावर युरोपियन राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या मर्जीनुसार जगाचा नकाशा बदलला. देशांच्या सीमा नक्की केल्या. हा देश घे तुला, हा देश माझा, अशी चोख वाटणी झाली. भारताची फाळणी हे प्रकरणही यातलंच. आणि आता जागतिकीकरण.

औद्योगिक क्रांतीला प्रबोधनाचा संदर्भ होता, तर जागतिकीकरण हा स्वार्थ नि लोभाचा आसुरी खेळ होता. आजदेखील हा नंगानाच सुरू आहे. करोनाच्या लशींचा भला मोठा साठा आपल्याच ताब्यात असावा म्हणून अमेरिका, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स वगैरे बलाढ्य राष्ट्रं मोठी खटपट करताहेत, असं नुकतंच वाचलं. जनसंख्येच्या प्रमाणानुसार लशींचं वाटप केलं पाहिजे, हे तत्त्व या राष्ट्रांना मान्य नाही. म्हणजे गरीब आणि विकसनशील देश तोट्यात राहणार.

ब्रिटिशांमुळे आपल्याला पाश्चात्य विद्या मिळाली वगैरे गोष्टी ठीक आहेत; परंतु, या उपकाराची दुसरी बाजू भयंकर होती. इंग्रजांनी आपली लोकसंस्कृती चिरडून टाकली. दुर्गाबाई भागवत म्हणायच्या की, परकीय आक्रमणांमुळे आणि शेकडो वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारताची sexuality विझून गेली. स्वत:हून काही करण्याची सृजनशक्ती आपण हरवून बसलो आहोत. आपल्याला एक चमत्कारिक खचलेपण आलंय अन् ते आजही आपल्या जगण्यावर एखाद्या चिक्कट तवंगाप्रमाणे पसरलंय. म्हणून जागतिकीकरणाच्या हल्ल्यासमोर आपण टिकाव धरू शकलो नाही.

३.

मनोहर सोनवणे यांच्या कथांना या जागतिकीकरणाचं नेपथ्य आहे. जागतिकीकरणामुळे भारताच्या सांस्कृतिक भावजीवनाला कीड लागली. शेकडो शतकांचं शहाणपण पोरकं झालं. महापुराच्या तडाख्यात सापडलेल्या झोपडीप्रमाणे देशाची अवस्था झाली.

सोनवणे यांच्या कथांच्या केंद्रस्थानी माणूस आहे. देशभर प्रचंड उलथापालथ होत असताना माणसात, त्याच्या/तिच्या कळत-नकळत झालेले बदल; एकीकडे नव्या युगाची आशा तर दुसरीकडे सर्वदूर बेदिली; आपल्या वाट्याला आलेल्या सुख-दु:खाचा माणसाने लावलेला अर्थ; निरर्थकतेच्या बोगद्यातून सुरू असलेला नि कधीही न संपणारा जीवनप्रवास; सतत धारेला लागलेले सामाजिक-आर्थिक नि सांस्कृतिक व्यवहार; एकीकडे जगण्याला भिडण्याची जिद्द तर दुसरीकडे हतबलता; स्वप्नांचं गाठोडं खांद्यावर टाकून माणसांची अंतहीन वणवण; श्रेयस-प्रेयस यांच्यातला झगडा, असा एक मोठा पट सोनवणे वाचकांसमोर मांडतात.

सोनवणे यांच्या लिखाणात प्रचारकी थिल्लरपणा नाही. ते तटस्थ आहेत अन् संवेदनशीलही. त्यामुळे ‘ब्रँड फॅक्टरी’ला कलात्मक मूल्य प्राप्त झालंय, यात शंका नाही.

जागतिकीकरणाचा धोका ज्यांच्या लक्षात आलाय, ते आपलं सत्त्व नि स्वत्व टिकवण्यासाठी झुंज देताहेत. तर दुसरीकडे, अज्ञानापायी एक मोठा जनसमूह जागतिकीकरणाच्या पिठूर चांदण्यात न्हाऊन निघण्याचं स्वप्न पाहतोय. सोनवणे यांच्या कथांत दोन्ही प्रकारची माणसं एक चरचरीत, अक्राळविक्राळ सत्य घेऊन वाचकासमोर हजर होतात. त्यांच्या जीवनलीला वाचून आपण कधी सुन्न होतो, तर कधी आपल्याला मौज वाटते. तर कधी सगळंच अर्थशून्य वाटू लागतं.

अनेकदा सोनवणे यांची शैली चित्रदर्शी वाटते. उदाहरणार्थ, ‘कार्ल मार्क्सचा डोळा’ कथेतला हा परिच्छेद :

‘‘हळूहळू मला अंधूक अंधूक दिसू लागलं. ती बारा बाय दहाची खोली होती. डोळ्याच्या आतला भाग कदाचित एखाद्या खोलीसारखा असूही शकतो. खोलीत अंधार होता. अंधूक अंधूक दिसत होतं. एक छोटंसं काचेचं कपाट दिसलं, अगदी आमच्या घरातल्या माझ्या कपाटासारखं! (आमची खोलीही बारा बाय दहाचीच होती.) कपाटात अनेक जुनी पुस्तकं होती, काही वह्या, दोन-चार कपडे इतकंच सामान दिसत होतं. पलीकडे एक लहान कॉट, तिच्या थोडं पुढे भिंतीत एक कोनाडा- ते देवघर होतं आणि त्यात दोन-चार देव. आणखी थोडंसं पुढे एक लहान मोरी आणि तिच्या अलीकडे दोन हात लांबीचा ओटा व त्यावर फरफरणारा एक स्टोव्ह - त्याच्या बर्नरमध्ये नाकात नथ घातल्यासारखा एक आकडा कोंबलेला. बाजूला एक मांडणी, तिच्यात मांडलेला खराखुरा संसार, म्हणजे अॅल्युमिनियमची चार-पाच, एक-दोन पितळेची भांडी आणि एक स्टीलचा डबा. खोलीच्या बारा फूट उंच भिंतीवर चारी बाजूंनी ठोकलेल्या फळ्या आणि त्यावर मांडलेले पत्र्याचे आणि अॅल्युमिनियमचे डबे!”

‘ब्रँड फॅक्टरी’ या कथेतल्या मोहन प्यारेला जीवनाचा अर्थबिर्थ नकोय. त्याचं जगणं हे एक मोठं विडंबन आहे आणि हे त्याला समजत नाहीए. वरवर हलकीफुलकी वाटणारी ही कथा जागतिकीकरणाचं विदारक रूप स्पष्ट करते.

‘रेणूची गोष्ट’ या कथेतला बाबासाहेब भंडारी हा कामगार नेता दीर्घ काळ लक्षात राहतो. प्रामाणिक, नि:स्पृह नि व्यासंगी बाबासाहेब आस्ते आस्ते कॉर्पोरेट संस्कृतीच्या कपटी कारस्थानाचे बळी ठरतात. संप मोडून काढण्यासाठी कंपनीचे अधिकारी त्यांना खड्याप्रमाणे दूर करतात आणि कामगार युनियन एका भ्रष्ट माणसाच्या हातात सोपवतात.

अर्चना ही ‘वेलकम टू कस्टमर केअर’ या कथेतली मुख्य व्यक्तिरेखा. जागतिकीकरणाच्या रेट्यात सापडलेल्या तरुण पिढीची प्रतिनिधी. अर्चना मूळ कोल्हापूरची; पुण्यातल्या एका कॉल सेंटरमध्ये ती काम करत्येय. अमेरिकेतल्या ग्राहकांशी बोलताना ती स्टेला होते. स्टेला की अर्चना? अर्चना की स्टेला? घरचे संस्कार की पब-संस्कृती? अर्चना रोज द्वंद्वात सापडते.

नोकरीची अट म्हणून अर्चना प्रोफेशनल विनयाने फाडफाड इंग्रजी बोलते. पण कोल्हापूरी भाषेची रांगडी ढब ती विसरू शकत नाही. एक मन अधूनमधून कोल्हापूरकडे धाव घेतं. तर डोक्याला हेडफोन लावला की, दुसरं मन अमेरिकेच्या दिशेनं झेपावतं. कोल्हापूर, पुणे, पेन्सिल्व्हानिया... अर्चनाच्या मनात कायम गोंधळ सुरू असतो.

अर्चनाला अखेरीस स्वत:चा सूर सापडतो. ती पब-संस्कृतीला ठाम नकार देते नि आपल्या मित्राला म्हणते, “...मी काकूबाई नाही! हो. मी याच जगात राहते. याच काळाची आहे मी. व्हेरी मच इन धिस वर्ल्ड. व्हेरी मच मॉडर्न! आय हॅव माय लाइक्स, डिसलाइक्स...माय चॉइसेस... मला माझं संवेदन आहे.” कथा संपते आणि अर्चनाचा ‘स्व’-प्रवास सुरू होतो.

सोनवणे यांनी मोजक्या शब्दांत (आणि कॉल सेंटरचं जार्गन वापरून) कथेची रचना केलीए. फिजिकल आणि वर्च्युअल या छाया-प्रकाशाच्या खेळामुळे कथेला एक वेगळंच परिमाण लाभलंय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘अधांतर’ कथेतला नायक ग्रामीण भागातला आहे. एकीकडे त्याला आधुनिक शिक्षणाची ओढ आहे; परंतु तंत्रज्ञानाधिष्ठित समाजाशी सलगी केल्याने गावाशी बेईमानी होईल, अशी धास्ती त्याला वाटत असते. दोन एकर जमिनीचा तुकडा विकून त्याचं शिक्षण पुरं करायला दादा तयार आहे. पण ‘अधांतर’चा नायक मधल्यामधे लोंबकळतोय. छोट्या छोट्या प्रसंगांतून कथेला रूपाकार देण्याचं कसब सोनावण्यांकडे आहे. त्यामुळे प्रत्येक कथा उठावदार झालीए.

‘ब्रँड फॅक्टरी’त नाना स्वभावाची पात्रं आहेत : सरळमार्गी, चतुर, तर काही बेरकी आहेत; सज्जन आहेत, मुर्ख आहेत. अन् सगळे गोंधळलेले आहेत. आजूबाजूचं वास्तव पाहून भेलांडून गेलेत. जो तो धास्तावलेला; प्रत्येकाला आधारासाठी एक काडी हवीए. कथासंग्रह वाचून संपवल्यावर वाटतं की, ही माणसं वीसेक वर्षांनंतर पुन्हा भेटतील तर किती बरं होईल. हे ‘ब्रँड फॅक्टरी’चं यश आहे.

जगात सतत नवं घडत असतं. तत्त्वज्ञ, इतिहासकार, शास्त्रज्ञ वगैरे मंडळी या परिवर्तनाची आपापल्या परीने शास्त्रीय समीक्षा करत असतात. लेखक शास्त्राच्या पलीकडे जातो आणि वास्तवाची कलात्मक पुनर्रचना करतो; सामाजिक-राजकीय वास्तवाला जीवनानुभवाचा समग्रपणा देतो. सोनावणे यांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडलीए.

ब्रॅंड फॅक्टरी - मनोहर सोनवणे

विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे,

पाने – १९०, मूल्य – २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......