‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ हे सीमाप्रश्नाबाबतचे पुस्तक नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे संपादन दीपक कमल तानाजी पवार यांनी केले आहे. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिना’पासून रोज ‘अक्षरनामा’वर क्रमश: प्रकाशित करत आहोत. आज शिवसेना आणि सीमाप्रश्न याविषयी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लिहिलेला मजकूर...
..................................................................................................................................................................
सीमाप्रश्न म्हणजे मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. महाराष्ट्र-कर्नाटक यांतील वादग्रस्त भाग महाराष्ट्रात यावा, महाजन कमिशनने केलेला अन्याय दूर व्हावा, यासाठी शिवसेना मनापासून या विषयावर सतत बोलत असे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र समितीची संपूर्ण महाराष्ट्र समिती झाली, परंतु समितीने या प्रश्नावर तीव्र आंदोलन केले नाही. किंबहुना, महाराष्ट्रात मुंबई आल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती हळूहळू निस्तेज होऊ लागली, म्हणून महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या मराठी माणसाला चेतवण्याचे काम आवश्यक होते. शिवसेनाप्रमुखांनी हे अचूक ओळखले आणि ऑक्टोबर महिन्यात बेळगाव-कारवारच्या सीमाभागातील जनतेच्या मागणीस पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रभर ‘काळा दिन’ पाळण्याचे आवाहन मराठी जनतेला एक पत्रक काढून केले. त्या दिवशी घराघरावर काळे झेंडे लावावेत आणि दंडावर व छातीवर काळ्या फिती लावाव्यात, असा आदेश शिवसैनिकांना देण्यात आला. ‘असहाय्य, एकाकी, हताश सीमाभागातील जनतेच्या पाठीशी आता महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे’ असे शिवसेनाप्रमुखांचे मत झाले.
बाळासाहेबांच्या आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार बेळगाव परिसरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगावातील दुकाने, बाजारपेठा व कारखाने पूर्णपणे बंद झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमंत्रणावरून शिवसेनाप्रमुख त्या दिवशी बेळगावात आले होते. त्यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. सुमारे चार हजार सायकलस्वारांच्या फेरीत ते मोटारीतून निघाले. त्या वेळी त्यांच्याबरोबर एकीकरण समितीचे नेते सर्वश्री बा. रं. सुंठणकर, बाबुराव ठाकूर, बळवंतराव सायनाक वगैरे मंडळी होती. बेळगावच्या जाहीर सभेत बोलताना श्री. सुंठणकर म्हणाले, “बाळासाहेब, बेळगावची दहा लाख जनता मोठ्या अपेक्षेने-आशेने आपल्याकडे पाहत आहे. आपण म्हणालात, हा प्रश्न रस्त्यावर सोडवावा लागेल. तेव्हा आमच्या लोकांना केवढा आनंद झाला म्हणून सांगू. बाळासाहेब, आपण मराठी माणसांची अस्मिता जागी केली आहे, चैतन्य निर्माण केले आहे. आम्ही संपूर्ण विश्वास आपल्यावर टाकत आहोत.”
..................................................................................................................................................................
हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
१२ वर्षे सीमाप्रांतासाठी जिद्दीने लढा देणारे आमदार श्री. सायनाक, श्री. सुंठणकर आणि श्री. बाबुराव ठाकूर या त्रिमूर्तीची भाषणे झाल्यानंतर बेळगावकर जनतेला आशेचा दिलासा देताना बाळासाहेब म्हणाले, “पुढल्या वर्षी तुम्हांला ‘काळा दिवस’ साजरा करावा लागणार नाही. ते अश्रू पुसा आणि चला माझ्याबरोबर. जर तोडलेला सीमाभाग जोडला गेला नाही, तर त्याचे भयंकर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाहीत. कारण लोकशाहीचे सर्व मार्ग संपले, आता हा प्रश्न रस्त्यावर येऊन सोडवावा लागेल.”
बाळासाहेबांच्या सभेनंतर मुंबईत ठिकठिकाणी सभा सुरू झाल्या. या सभांमध्ये शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेबांच्या तोफा धडाडू लागल्या. अभ्युदयनगर, काळाचौकी येथे सभा झाली आणि शिवाजी पार्कवरही प्रचंड सभा घेण्यात आली. स्वत: शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवेदन सादर केले आणि हा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवावा असा आग्रह धरला.
ठिकठिकाणच्या सभांमधून श्री. बाळासाहेब ठाकरे मराठी लोकांना म्हणत असत, “महाराष्ट्राला मुंबई मिळाली म्हणून आपण खूश राहता नये. सीमाभाग कसा पेटलाय ते पाहा. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी महाराष्ट्रात येईतो आपण जंग-जंग पछाडले पाहिजे. तिथल्या बायांची तडफ काय सांगू तुम्हाला! छातीवर बंदूक रोखून एका मातेला विचारलं, “मुलगा कुठे आहे?” तिने खणखणीत जबाब दिला, “सांगत नाही. चालव गोळी! तुझी गोळी आरपार गेली तरी सांगणार नाही.” पाहा, गोळीला भीत नाही! हा प्रश्न सुटत नाही म्हणजे काय? इथे मला हिटलरचं उदाहरण द्यावंसं वाटतं. हिटलरला सुभाषबाबू भेटायला गेले, तेव्हा त्यांना हिटलरनं विचारलं, “तुम्ही किती लोक आहात?” सुभाषबाबू म्हणाले, “चाळीस कोटी.” हिटलरनं पुन्हा विचारलं, 'ब्रिटिश किती आहेत?' सुभाषबाबूंनी सांगितले, “दहा ते पंधरा लाख!” त्यावर हिटलर म्हणाला, “बस्स, चाळीस कोटी लोक नुसते चिडून त्यांच्या अंगावर चालून जाल तरी ब्रिटिशांना देशाबाहेर जावं लागेल!” तसंच आमचं आहे. आम्ही फुटून गेलो आहोत म्हणून हा प्रश्न सुटत नाही. शिवसेनेवर, माझ्यावर मेहेरबानी म्हणून नव्हे, परंतु महाराष्ट्रासाठी म्हणून एक व्हा. घाटी-कोकणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, शहाण्णवकुळी-ब्याण्णवकुळी, मराठा-मराठेतर हे सारे भेद गाडून टाका आणि बेळगावकरांसाठी ज्या वेळी खरोखर लढण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्ही काय कराल, त्याचा कौल द्या. २६ जानेवारीची मुदत आहे. एकदा वाटाघाटी होऊन जाऊ द्या! समाधानकारक निर्णय लागला नाही तर मग बाहेर पडावं लागेल. राष्ट्रीय संपत्तीची हानी आम्ही करणार नाही. पण, ज्या-ज्या वेळी दिल्लीचे नेते येतील, त्या-त्या वेळी सबंध मुंबईभर त्यांच्या गाड्यांसमोर आडवे पडा! त्यांना कळू द्या! प्रतापगड मोर्चात तुम्ही थंडीत कुडकुडत जी हिंमत दाखवलीत, ती पुन्हा दाखवा! पुण्याला इंदिराजींचा लालभाईंनी आणि ताईंनी अपमान केला. आपल्याला अपमान करायचा नाही, पण न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राला रस्त्यावर यावंच लागलं तर त्याला इलाज नाही. महाराष्ट्राचे सारे प्रश्न रस्त्यावरच सोडवले जातात. तुमची ताकद बेळगावकरांच्या पाठीशी आहे याचा निर्वाळा द्या. जय हिंद जय महाराष्ट्र!”
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
परळ शाखेच्या वाढदिवसाच्या दिवशी कामगार मैदानावरील सभेत बाळासाहेबांनी पुन्हा एकदा सीमाप्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याची घोषणा केली. येता प्रजासत्ताक दिन हा, सीमाप्रदेशातील प्रजेच्या हक्कासाठी लढण्याची प्रतिज्ञा करण्याचा दिवस म्हणून शिवसेना पाळणार आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “हा प्रश्न केव्हा सोडवणार हे जोपर्यंत केंद्रामधील सरकार सांगत नाही, तोपर्यंत काँग्रेस नेत्यांना व केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही. त्यांचे मुंबईचे रस्ते रोखून धरायचे असा शिवसेनेने संकल्प सोडला आहे. या मार्गाशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही.”
शिवसेनाप्रमुखांच्या या इशाऱ्याचा अर्थच असा की, आता सीमाप्रश्नावर मुंबई पेटल्याशिवाय राहणार नाही.
सीमाप्रश्न आंदोलन! मुंबई पेटली
शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सीमाप्रश्नावर या वर्षी शिवसेनेचे तीव्र आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाची आग एवढी पेटली की, साऱ्या देशात शिवसेनेचा प्रकाश पडला. शिवसेनेची खरी ओळख म्हणजे सीमाप्रश्नावर केलेले तीव्र आंदोलन. मात्र हे आंदोलन करण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांनी केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवण्याची पूर्णपणे संधी दिली. २० जानेवारी रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना शिवसेनाप्रमुखांनी पत्र पाठवले. त्या इंग्रजी पत्राचे हे मराठी भाषांतर :
मा. इंदिराजी,
अत्यंत जड अंत:करणाने मी हे पत्र आपल्याला लिहीत आहे. असे पत्र आपल्याला लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी ही माझी मोठी व्यथा आहे.
सीमाभागांतील मराठी बांधवांच्या भावनांचा उद्रेक आता सर्व महाराष्ट्रभर फैलावू पाहत आहे. केंद्र सरकारने याबाबतीत तात्काळ निश्चित पावले टाकून न्यायाला साजे-शोभेशी या प्रश्नाची सोडवणूक करून दिली पाहिजे. यासाठी शिवसेनेने असा निर्धार केला आहे की, यापुढे आपण पंतप्रधान, आपले उपपंतप्रधान, वा कोणीही केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे म्हैसूरचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे अध्यक्ष, यांना २६ जानेवारी १९६९ नंतर मुंबई शहरात पाऊल टाकताच कडवा विरोध करायचा. या श्रेष्ठींपैकी जो कोणी येथे येईल, त्याला शिवसेनेचे स्वयंसेवक ठिकठिकाणी त्यांच्या मार्गावर आडवे पडून, त्यांच्या मोटारी अडविल्यावाचून राहणार नाहीत. केंद्रीय श्रेष्ठींविरुद्ध पुकारलेला ‘मुंबई बंद’चा कार्यक्रम, केंद्र सरकार सीमाप्रश्नाबाबत तोंड उघडून त्याच्या सोडवणुकीची मुदत ठरवीपर्यंत वाढत्या निर्धाराने चालवला जाईल.
महाशया पंतप्रधानजी, सीमावाद न्याय्य मार्गाने सोडवला जाईल, अशी आपण मराठी जनतेला वारंवार आश्वासने दिली आहेत. लोकशाही मार्गाने आपण हा प्रश्न लोकेच्छेनुसार सोडवाल अशी आशा सीमावासी गेली १२ वर्षे आपल्या उराशी बाळगून बसले आहेत. आपण, आपले अधिकारी आश्वासन पूर्ण करून सीमावासी मराठी जनतेचा आपल्याबद्दलचा विश्वास आणि आदर सार्थ कराल, तसेच त्यांनी बाळगलेला लोकशाही पद्धतीवरील विश्वास अनाठायी नव्हता एवढे सिद्ध कराल, अशी शिवसेनेला अजूनही आशा आहे.
आपला नम्र,
बाळ ठाकरे
(शिवसेनाप्रमुख)
महिला आघाडीचे इंदिराजींना निवेदन
२० मे १९६९ रोजी एक सुंदर केशरी शामियाना इंदिराजींच्या रस्त्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील नंदादीप उद्यानाजवळ उभारण्यात आला. रवींद्र सरोवरप्रमाणे आणि बेळगाव-कारवार सीमावाद या विषयीचे निवेदन इंदिराजींना देण्यात आले. बरोबर दुपारी दोन वाजता इंदिराजींची गाडी हळूहळू येऊन शामियान्याजवळ थांबली. शिवसेनेच्या नेत्या अँड. चुरी व सौ. (डॉ.) गुप्ते त्यांना सामोऱ्या गेल्या. त्यांनी इंदिराजींना शिवप्रभूंना पुष्पहार घालण्याची विनंती केली. त्यांनी ती मानली. उपस्थित महिला महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन सारा परिसर दणकावून टाकीत होत्या. इंदिराजींनी निवेदन स्वीकारले व गाडी पुढे गेली. कार्यकर्त्यांच्या मनात एवढाच प्रश्न आला की, मोरारजींना हे करता आले नसते का?
विराट मोर्चा
२५ जुलै १९६९ रोजी शिवसेनेने एक प्रचंड मोर्चा सीमाप्रश्नावर काढला. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मोर्चा मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेला. या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर श्री. सुंठणकर होते आणि आमदार सायनाकही होते. मोर्चा शांतपणे पार पडला आणि मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा एकदा सीमाप्रश्नावर चर्चा होऊ शकली. सभागृहात शिवसेनेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हेही शिवसेनाप्रमुखांच्या भावनेशी सहमत झाले आणि त्यांनी केंद्राला इशारा दिला की, ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सीमाप्रश्न न सुटल्यास आम्ही आमचा मार्ग चोखाळू.’
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने सीमाप्रश्न सुटेपर्यंत सतत प्रयत्न करण्याचे बेळगावच्या जनतेला अभिवचन दिले आहे. १९६९चे वर्ष हे खऱ्या अर्थाने सीमाप्रश्नाला गती देणारे वर्ष ठरले.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न
प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा सीमाप्रश्नाबाबत महत्त्वाच्या घटना घडल्या. महाराष्ट्राच्या सीमाभागात कानडी-मराठी संघर्ष पेटला! संकेश्वर येथे शिवछत्रपतींच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली असता, तीवर चपला फेकल्या गेल्या व चपलांचा हार घातला गेला, असे बेळगावच्या ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केले. असे काही घडले नाही हे पोलिसांचे म्हणणे, परंतु यावर विश्वास कोण ठेवणार? बेळगावात अश्रुधूर आणि लाठीमार झाला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करण्यात आली. मराठी भाषिकांवर संघटित हल्ले सुरू झाले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. एस. एम. जोशी यांनी १ जूनपासून सीमा आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले.
मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे आमदार श्री. छगन भुजबळ यांनी कन्नड भाषा सक्तीच्या निषेधार्थ ४ जून १९८६ रोजी बेळगावात सत्याग्रह केला. सत्याग्रहानंतर अश्रुधूर, दगडफेक सुरू झाली. एका पोलिसाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. वातावरण तंग झाले.
बेळगावात शिरून सत्याग्रह करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवार व त्यांच्याबरोबरच्या सत्याग्रहींना प्रतिबंध केला जाईल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, श्री. शरद पवार यांनी असे जाहीर केले की, सीमाभागातील कानडी सक्तीच्या निषेधार्थ सत्याग्रह अटळ आहे. कित्तूर चन्नमा चौकात कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असूनही श्री. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दीडशे सत्याग्रहींच्या तुकडीने सर्वांना चकवून सत्याग्रह केला. तेथे जमलेल्या मराठी भाषिकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीचे अध्यक्ष श्री. एस. एम. जोशी व शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री. एन. डी. पाटील यांनाही निपाणी येथे अटक करण्यात आली. गोळीबार झाला आणि दोन सत्याग्रही ठार झाले. १३ मे १९८६ रोजी निपाणी, बेळगाव, कोल्हापूर येथे जाळपोळ व लुटालूट झाली. सीमाभागात जागोजागी कानडी-मराठी संघर्ष सुरू झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सीमाप्रश्न सामोपचाराने सुटावा, असे कोल्हापूरच्या बिंदू चौकातील जाहीर सभेत बोलताना आवाहन केले. मात्र पंतप्रधानांनी सीमाप्रश्नी कालमर्यादा घालून घेणे अशक्य असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. रामकृष्ण हेगडे यांना वातावरण चिघळवू नका, असा सल्ला दिला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
श्री. मधु दंडवते यांच्या मध्यस्थीने श्री. शंकरराव चव्हाण आणि श्री. रामकृष्ण हेगडे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या पातळीवर एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने मराठी व कानडीची कोठेच सक्ती होणार नाही हे पाहावे असे ठरले.
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र ‘मी सत्याग्रहात भाग घेणार नाही, कारण माझा सत्याग्रहावर विश्वास नाही’ असे ठामपणे सांगितले.
ठाण्याचे महापौर श्री. सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शंभर शिवसैनिकांनी सत्याग्रहात भाग घेतला. शिवसेनानेते श्री. छगन भुजबळ व इतर सर्व सत्याग्रहींची प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या जामिनावर कर्नाटक राज्यात मुक्तता झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. रामकृष्ण हेगडे यांनी डिसेंबरपर्यंत कानडीची सक्ती पूर्णपणे मागे घेणार, असे जाहीर केले. तसेच पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांनी सीमाप्रश्नातून मार्ग काढण्यासाठी लोकसभेचे अधिवेशन संपल्यावर दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावून घेऊ, असे जाहीर केले.
सीमाप्रश्नाबाबत संतप्त होऊन ‘मार्मिक’ने एका पाठोपाठ एक असे तीन अग्रलेख लिहिले – ‘शंकरराव, खंबीर रहा!’, ‘महाराष्ट्राची मशाल’, ‘हेगडेंचे नागडे अत्याचार’. बाळासाहेबांनी जाहीर केले की, हेगडे यांची अस्मानी-सुलतानी हाणून पाडल्याखेरीज राहणार नाही. परंतु, पतप्रधानांनी या प्रश्नात मध्यस्थी केल्यामुळे सीमाभागाचे आंदोलन तूर्त तरी थांबले.
..................................................................................................................................................................
मनोहर जोशी यांच्या ‘शिवसेना : काल – आज – उद्या’ (प्रबोधन गोरेगाव, मुंबई) या ग्रंथातून साभार.
..................................................................................................................................................................
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प - संपादक - दीपक कमल तानाजी पवार, महाराष्ट्र सरकार, मुंबई, मूल्य - २०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment