पश्चिम बंगालमधला मतसंग्राम
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘Didi As Durga? Mamata Banerjee With Twelve Arms’ या २०१६ सालच्या व्हिडिओतील एक चित्र
  • Sat , 20 March 2021
  • पडघम देशकारण ममता बॅनर्जी Mamata Banerjee तृणमूल काँग्रेस Trinamool Congress ‌भाजप BJP

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा सुरू झालेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी तर प्रचाराचा धुरळा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे बघितलं तर चुरस दिसतेय. ही निवडणूक स्वाभाविकपणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आणि खूपशी निर्णायकदेखील आहे. सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात त्या यशस्वी होतात की नाही, याकडे देशातल्या राजकीय निरीक्षकांचं, तसंच भाजपविरोधी एकत्र येऊ इच्छितात, त्या पक्षांचंसुद्धा लक्ष तिकडे लागलेलं आहे. याचं कारण भाजपसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तोंड देऊन जर ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक जिंकली, तर भाजपेतर आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून त्यांचं नाव अग्रक्रमानं समोर येऊ शकतं. पण जर त्या निवडणूक हरल्या तर त्यांच्या बाजूंनी सहानुभूतीची फार मोठी लाट राहील. कारण पुन्हा तेच, त्यांच्या विरोधात भाजपसारखा सर्वार्थानं बलाढ्य पक्ष होता.

ममता बॅनर्जी यांना देशातील भाजपेतर बहुतेक सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, स्टॅलिन,  अखिलेश यादव, तेजस्वी यादव... अशी देशभरातील दिग्गज नेते मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत, पण एक लक्षात घेतले पाहिजे की, हा पाठिंबा केवळ सांकेतिकच आहे. कारण तेजस्वी यांचा थोडाफार अपवाद वगळता पश्चिम बंगालमध्ये हे पक्ष किंवा या नेत्यांची किमान शक्तीही नाही.

ममता बॅनर्जी यांचा राजकीय इतिहास संघर्षाचा आहे. डाव्या आघाडीशी प्रदीर्घ काळ संघर्ष करून आणि त्यासाठी भाजप-काँग्रेस असं ‘तळ्यात मळ्यात’ करून ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये त्यांची सर्व शक्ती एकवटली आणि २०११मध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वप्रथम सत्ता प्राप्त झाली. नेमकं सांगायचं झालं तर ३४ वर्षांचं डाव्या आघाडीचं सरकार पायउतार झालं. तेव्हा ममता बॅनर्जी यांचा हा संघर्ष नेत्रदीपक राजकीय आदर्श मानला जात होता.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, पश्चिम बंगालमधलं राजकारण आणि सत्ताकारण हे नेहमी प्रतिष्ठेच्या मुद्दयावर चालतं. जसं आपल्याकडे निवडणूक आली की, मराठीचा प्रश्न उफाळून येतो किंवा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उफाळून येतो, तसं पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण होत असतात. ममता बॅनर्जी यांनीदेखील मी या ‘मातीची मुलगी‘ आहे, असा जोरदार प्रचार करत २०११च्या निवडणुकीमध्ये विजय संपादन केलेला होता. आताही पश्चिम बंगालची कन्या मीच आहे, अशी हाक त्यांनी दिली आहे आणि त्यांच्या या हाकेला बंगाली जनता सध्या तरी चांगला प्रतिसाद देतेय, असं दिसून येतंय.

पण यावेळेची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आतापर्यंत तुल्यबळ नसलेला भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये खंबीरपणे पाय रोवून उभा असल्याचं दिसतं आहे. शिवाय डावी आघाडी, काँग्रेस आहे आणि अन्य स्थानिक जे काही उमेदवार असतात ते आहेत, पण ते निष्प्रभ आहेत. म्हणून ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस विरुद्ध नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्ष अशीच ही सरळ लढत आहे.

त्यातही अजून एक गंमत आहे. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रादेशिक पातळीवर भाजपचा कोणताही प्रभावी चेहरा नाही. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेले आहेत. म्हणजे एका देशाचा पंतप्रधान विरुद्ध एका राज्याचा मुख्यमंत्री अशीही विषम लढाई आहे. संघटित भाजपला धनाची कमतरता नाहीये. भाजपची निवडणूक लढवण्याची तयारी नेहमीच अडीच-तीन–चार वर्षं आधीपासून सुरू होते, तशीच ती पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली आहे. पण ममता बॅनर्जी याही काही लेच्यापेच्या नेत्या नाहीयेत. त्यांची नाळ तिथल्या मातीशी, लोकांशी घट्ट आहे. त्यांनी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. अगदी सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसांसाठी त्या उपलब्ध असतात. त्यांच्या राहणीमानात डामडौल नाही. त्यांना सत्तेचा माज नाही. त्यांनी २०११पासूनच्या कालखंडामध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे आणि पश्चिम बंगालमधल्या जवळजवळ सर्वच गावांमध्ये त्यांचा संपर्क आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याप्रमाणे डाव्या आघाडीशी संघर्ष करून ममता बॅनर्जींना यांनी नेतृत्त्व आणि स्थान निर्माण केलं, त्या संघर्षाला हिंसेची धार आहे. त्याचा उपयोग आता त्यांना भारतीय जनता पक्षाशी लढत देताना होणार आहे. कारण भाजपला ‘ठोश्यास ठोसा’ देण्याची क्षमता ममता बॅनर्जींमध्ये आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची धमक त्यांच्यात आहे. ममता बॅनर्जींचा स्वभाव हट्टी आहे. (या स्वभावाची तक्रार तत्कालीन पंतप्रधान दस्तुरखुद्द अटलबिहारी वाजपेयींनी त्यांच्या आईकडे केली होती.) त्यांचा स्वभाव ‘हट्टी‘ म्हणण्यापेक्षा  ‘जिद्दी‘ आहे, म्हणणं जास्त समर्पक आहे आणि या जिद्दीमुळेच त्या आजवर इथवर प्रवास करू शकलेल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

त्यांचा कारभार काहीसा एककल्लीही आहे. कुठलीही भूमिका घेताना त्या अगदी ‘तारस्वरात‘ (म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या!) बोलत असतात. सर्वसामान्य नेत्याचं हे वागणं आवडतं असतं आणि अशा वागण्याची मोहिनी पडत असते, हेही तेवढंच खरं. त्या कलावंत आहेत, त्यामुळे अभिजनांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.

पण अशात ममता बॅनर्जींचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्याचं कारण त्या पक्षाच्या एकमेव नेत्या आहेत. हा जसा त्यांच्याबद्दल उणेपणाचा मुद्दा आहे, तसंच तेच त्यांचं बलस्थानसुद्धा आहे. निवडणुकांमध्ये एखादा मुद्दा अकारण किंवा सकारणही गाजत असतो आणि तो कुठला असेल हे कधीच सांगता येत नाही. माझ्या ‘डायरी‘ या पुस्तकात आपल्या महाराष्ट्रातील एका विधानसभा निवडणुकीचा अनुभव दिलेला आहे. त्यात एका प्रख्यात उमेदवाराला त्याच्या गॉगलमधून समोरचा माणूस ‘आरपार’ दिसतो, अशी अफवा अचानक पसरली आणि त्यांच्या सभेला स्त्रिया सोडाच पण पुरुषसुद्धा येणं बंद झालं.

भाजपच्या दृष्टीकोनातून अनपेक्षितपणे प्रतिकूल घटना आणि तृणमूल काँग्रेसच्या दृष्टीने सकारात्मक घडलेली आहे. (आंधी‘ चित्रपटाची इथं अनेकांना आठवण होईल.) नुकताच एका सभेमध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाला. पण तो हल्ला असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलेलं नाहीये; ती सुरक्षा व्यवस्थेतील त्रूट होती, असा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे. त्या वादात जायला नको, कारण ‘निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं असतं, असा आरोप पूर्वी काँग्रेसच्या काळात होत असे, आता भाजपच्या राजवटीत होतो. त्याबाबत वस्तुस्थिती जेव्हा समोर येईल तेव्हा येईल, पण तूर्तास पश्चिम बंगालमधील माझे जे काही स्त्रोत आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, त्याचा भाजपच्या संदर्भात काहीसा नकारात्मक संकेत गेलेला आहे. निवडणुकीत शेवटच्या क्षणी दोन-अडीचशे मते जरी इकडची तिकडे फिरली तरी त्याचा फार मोठा परिणाम होतो. शेवटी विजय महत्त्वाचा असतो. तो दहा हजार मतांनी मिळाली की, दहा मतांनी हे फारसं महत्त्वाचं नसतं.

शिवाय आणखी एक मुद्दा असा आहे की, २०१४नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याचं धाडस जसं राहुल गांधींनी दाखवलं (ते कितपत प्रभावी ठरलं हा मुद्दा वादाचा आहे.), तसंच अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध बंडाचं निशाण फडकण्याचं धाडस ममता बॅनर्जी यांनी दाखवलेलं आहे. चिट फंड घोटाळा असो की, अन्य काही मुद्दा असो. केंद्र सरकारच्या संस्थांना त्यांनी तिथं हस्तक्षेप करू द्यायला नकार दिला. हे असं सगळं जास्त अनुकूल  आणि काहीसं उणं वातावरण सध्या ममता बॅनर्जी यांच्या बाजूनं आहे. त्यांना सत्ताप्राप्तीची पुन्हा संधी आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. अर्थात मी असं विधान केल्याबरोबर भाजपचे ट्रोल खवळतील हा भाग वेगळा. असो.

आता भाजपकडे वळूयात. भाजप एक राष्ट्रीय आणि सर्वार्थानं बलदंड पक्ष आहे. पश्चिम बंगाल काबीज करण्याची भाजपची योजना जुनी आहे. भारताच्या पूर्व भागातील काही राज्यात भाजपनं सत्ता संपादन केलेली आहे. पश्चिम बंगाल राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीकोनातून प्रमुख राज्य आहे. याचं कारण या राज्यात लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१९च्या निवडणुकीत त्या ४२ पैकी १८ जागा जिंकण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ४०.२ इतकी आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताप्राप्तीची ईर्षा त्यांच्यात आहे. पण भाजपच्या मतांच्या टक्केवारीमध्ये पश्चिम बंगालमध्ये सतत चढउतार आढळून येतो. २०११च्या निवडणुकीत भाजपला ४ टक्के, तर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली, २०१६च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मतांची ही टक्केवारी १० टक्क्यांवर आली, हा चढउतार आव्हानात्मक आहे.

पण वर उल्लेख केल्याप्रमाणे भाजप निवडणुकीची तयारी अतिशय प्रदीर्घ काळापासून करतो. शिवाय भाजपचं अशातलं छोट्या जाती-जमाती, उपजाती-पोटजाती एकत्र करून भक्कम मोळी बांधण्याचं सूत्र आहे. जे उत्तर प्रदेशात दिसलं, ते महाराष्ट्रात १९९५च्या निवडणुकीत दिसलं. तोच फार्म्युला पुन्हा आता वापरला जाईल. २०१७पासूनच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणारे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. याचा अर्थ  भाजप अशा पद्धतीची काही एक सूत्रबद्ध रचना करून, बांधणी करून, रणनीती आखून ही निवडणूक लढवण्याची तयारी करत असणार, हे अगदी स्पष्ट आहे.

आणखी एक मुद्दा असा की, भाजपच्या राजकारणाचा भर नेहमीच ध्रुवीकरणावर राहिलेला आहे. ‘वन व्हर्सेस ऑल‘ अशा पद्धतीचं निवडणूक जिंकण्याचं ते धोरणात्मक सूत्र असतं.  त्याचा ते खूप अभ्यास करतात आणि त्याची पद्धतशीर बांधणी करतात. त्यांच्या संघटनात्मक बांधणीच्या चिकाटी व चातुर्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पश्चिम बंगालमध्ये विविध अंदाजानुसार २८ ते ३० टक्के मुस्लीम मतं आहेत आणि ती साहजिकच निर्णायक ठरतात. या निवडणुकीत हे मतांचं ध्रुवीकरण कसं केलं जातं... ही  २८ ते ३० टक्के विरुद्ध बाकीची मतं आणि त्यातली भाजपच्या पारड्यात किती पडतात किंवा पाडून घेतली जातात, यावरसुद्धा त्यांचं यश अवलंबून आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देशाच्या अनेक राज्यांमध्ये असला तरी तो पश्चिम बंगालमध्ये तितकासा नसावा असं मला वाटतं. शिवाय नेहमीप्रमाणे उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये नाराजी आहे. (तशी ती तृणमूलमध्येदेखील आहे; निवडणुकीत ती सर्वच पक्षात निर्माण होते.) तृणमूलचे जे अनेक लोक सोडून पक्षात आले, त्यांना भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल पक्षाच्या केडरमध्ये थोडीशी नाराजी आहे. पण अशा बातम्या आम्ही पत्रकार नेहमीच देत असतो, पण त्याचा परिणाम आधी काँग्रेसच्या मतांवर हाेत नसे आणि आता भाजपवर होत नाही, हे वास्तव नाकरण्यात अर्थ नाही.  

माझी जर माहिती अचूक असेल आणि माझ्या स्त्रोतांनी योग्य माहिती दिली, असं आपण जर गृहीत धरलं तर भाजपला पश्चिम बंगालमधील ही विधानसभा निवडणूक जिंकण्याची आशा नाहीये. २०१९च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि डाव्यांची मतं पुन्हा भाजपकडे वळली, तर मात्र सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती असतील, अन्यथा ८० ते ९० जागा जिंकून भाजप सभागृहातला मुख्य विरोधी पक्ष असेल.

तरी याचा एक दीर्घ फायदा भाजपला होणार आहे आणि तो म्हणजे यापुढे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजप अशी सरळ लढाई राहील. कारण काँग्रेस नेस्तनाबूत झाल्यातच जमा आहे. आता डावेही नेस्तनाबूत होतील. तेव्हा या निवडणुकीतून भाजप प्रमुख विरोधी पक्ष झाला, तर राज्याच्या राजकारणात पकड घट्ट होईल आणि पुढच्या निवडणुकीत भाजपला  सत्ता प्राप्त करता येईल, अशी आजची स्थिती आहे.

अर्थात हे सगळं ‘जर-तर’ आहे. प्रत्यक्षात निकाल काय लागतील तोवर वाट बघायला हवी...

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......