नाना पटोलेंच्या मार्गावरील पाचरी!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर 
  • नाना पटोले
  • Sat , 13 February 2021
  • पडघम राज्यकारण नाना पटोले Nana Patole काँग्रेस Congress भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah

सर्वांशी जुळवून घेणार्‍या सौम्य वृत्ती अन संयमी असणार्‍या बाळासाहेब थोरात यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून आक्रमक प्रतिमा असणार्‍या नाना पटोले यांची अपेक्षेपणे नियुक्ती झाली आहे. पटोले यांची या पदी नियुक्ती व्हावी, या बातम्या चालवून चालवून प्रकाश वृत्तवाहिन्यांना नाही, पण त्या बातम्या ऐकून/बघून प्रेक्षकांना मात्र जाम कंटाळा आलेला होता हे नक्की. त्यामुळे ‘वृत्तवाहिन्यांनी छळले होते, पटोले यांनी सुटका केली’ असंच बातम्या ऐकणाऱ्यांना वाटलं असणार! पटोले यांची नियुक्ती करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी एकीकडे राजकीय चातुर्य दाखवलं आहे, तर दुसरीकडे नाना पटोले यांना मुक्तपणे काम करता येणार नाही, अशी पाचरही मारून ठेवली आहे.

कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष नियुक्त करणं ही राजकीय प्रक्रिया असते. त्यामुळे त्यात पक्षाची स्थिती, येणार्‍या निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीसोबतच जात आणि धर्म आणि त्या व्यक्तीची प्रतिमा हे मुद्दे प्रभावी ठरतात. राज्याच्या सत्तेत असूनही काँग्रेसचं फार काही वजनबिजन सरकारात आहे, असं चित्र नाही. खरं सांगायचं तर, सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ अशी आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना डावललं जातं वगैरे तक्रारी अधूनमधून ऐकायला येतातच, पण विरोधी पक्षात असण्यापेक्षा सरकारात बसणं केव्हाही चांगलं अशी ती अगतिकता आहे!

निवडणुकांचे निकाल हा निकष लावायचा झाला तर पक्षाचं राजकीय अस्तित्व राज्यात मुळीच सुदृढ नाही आणि सर्वदूर पाळंमुळं अजूनही घट्ट असली तरी काँग्रेस पक्षाला मरगळ आलेली आहे. शिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष चांगलाच कोंडीत सापडलेला आहे. राज्यातल्या मराठा मतदारांवर पकड मिळवण्यासाठी (महा)राष्ट्रवादी (म्हणजे मराठ्यांचा पक्ष असंच समीकरण आहे!) आणि भारतीय जनता पक्षात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी बहुजन वर्गावर डोळा ठेवत राज्यात पक्षाची फेरबांधणी करण्याचा काँग्रेस पक्षाचा मानस असावा, असे नाना पटोले यांच्या नियुक्तीवरून स्पष्ट दिसतं आहे.

पटोले पूर्व विदर्भातले. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुकळी हे त्यांचं गाव. महाविद्यालयीन जीवनापासूनच ते तसे चळवळे आहेत. पदव्युत्तर शिक्षण घेताना ते काँग्रेसप्रणित एनएसयूआय या संघटनेचे सदस्य  होते. ‘अरे’ ला ‘कारे’नं जबाब देण्याची त्यांची सवय तेव्हापासूनची आहे. सध्या वयानं साठीच्या आतले (जन्म ५ जून १९६३) असलेले पटोले यांनी राजकारणात प्रवेश केला तो १९८०च्या जिल्हा परिषद निवडणुकीत. तेव्हापासून आजवरचा त्यांचा राजकीय प्रवास अनेक वाटावळणाचा आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

अपक्ष, काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस अशी ही राजकीय वळणं आहेत. या प्रवासात जय आणि पराजयाचे चढ-उतारही भरपूर आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या राजकारणातील एक दिग्गज, उद्योगपती आणि राष्ट्रवादीचे एक बडे नेते प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्याच पारंपरिक भंडारा मतदारसंघातून पटोले यांनी पराभवाची धूळ चाखायला लावली आहे. ‘जायंट किलर’ म्हणून तेव्हाच जर नरेंद्र मोदी यांच्या सरकारात मंत्रीपद मिळालं असतं, तर  पटोले यांनी भाजपचा त्याग केला असता असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

बहुजन आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आक्रमक असणारा नेता अशी पटोले यांची प्रतिमा आहे. भारतीय जनता पक्षात राहून नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेणं हे काही सोपं काम मुळीच नव्हे. आठवा – लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह, शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा प्रभृती. पटोले यांनी मात्र ते धाडस दाखवलं आणि बंडखोर म्हणून त्यांची प्रतिमा नव्यानं उजळली.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघातून भाजपचे ‘हेवी वेट’ नितीन गडकरी यांना पाच लाखांनी पराभूत करण्याची घोषणा केल्यावर तर त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. महाराष्ट्रभर नाव माहिती नसलेले पटोले एकदम राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तरी एव्हाना महाराष्ट्र काँग्रेसला एक आक्रमक आणि बहुजन नेता मिळाला होता. हा चेहरा आज ना उद्या राज्य काँग्रेसचं नेतृत्व करणार हे स्पष्टच होतं.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपद सोपवताना पटोले यांचे पंख आधीच कापून ठेवले आहेत. प्रदेशाध्यक्षाला राज्यात विभागवार एक सहायक सहकारी ही कल्पना कितीही आदर्शवादी असली तरी पक्ष चालवण्याच्या दृष्टीनं ती कटकटीची आहे, कारण हा प्रत्येक विभागवार कार्यकारी अध्यक्ष त्याच्या विभागाच्या पोळीवर जास्तीत जास्त तूप कसं ओढून घेता येईल, याचाच विचार करणार हे उघड आहे.

यातील आणखी एक अडचण म्हणजे खुद्द पटोले यांना पक्ष राज्यभर वाडी आणि तांड्यापर्यंत कसा पसरलेला आहे, याची सखोल माहिती नाही, कारण इतक्या व्यापक आणि सूक्ष्म पातळीवर कोणत्याच पक्षाच्या संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव नाही. भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची एकाधिकारशाही आहे, हा आरोप राजकीय म्हणून ठीक आहे; मात्र काँग्रेस पक्षातही अधिकारांचं दिल्लीत इतकं केंद्रीकरण झालेलं आहे की, तालुका अध्यक्ष नियुक्त करण्याचे अधिकारही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला एकमतानं (!) देण्याचा रोग काँग्रेस पक्षाला जडलेला आहे. आणि या रोगावर कोणतंही औषध नाही. यावर पटोले कसे मात करतात, त्यावर त्यांच्या मर्जीची स्वतंत्र टीम उभारून पक्षाला उभारी देण्याचे त्यांचे मनोरथ पूर्ण होणं अवलंबून आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पटोले यांची प्रतिमा आक्रमक, बंडखोर असणं आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणं या वेगळ्या बाबी आहेत. प्रतिमा प्रतिसाद मिळवून देऊ शकते, पाठिंबा नाही. पाठिंबा मिळवण्यासाठी शून्यातून प्रयत्न सुरू करावे लागतात आणि ते अखंड असतात.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकातील सलग पराभवामुळे काँग्रेस पक्षात मरगळ आणि कार्यकर्त्यात नैराश्य आलेलं आहे. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पटोले यांना अगदी तालुका पातळीपर्यंत दौरे करावे लागतील, कार्यक्रम घ्यावे लागतील, रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. दौरे आणि कार्यक्रमासाठी भरपूर निधी लागेल आणि काँग्रेस पक्षाची तर तिजोरी आटलेली आहे. शिवाय प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यानं रस्त्यावर उतरण्याची सवयच राहिलेली नाही.

दिल्ली ते गल्ली पातळीपर्यंत काँग्रेसच्या भरवशावर लाखो नेत्यांची आर्थिक साम्राज्यं उभी ठाकली, पण यापैकी पक्षाच्या कोषात कुणीही घसघशीत परतफेड टाकलेली नाही. काँग्रेसचे हे बहुसंख्य मनसबदार त्यांच्या मतदारसंघात पक्षापेक्षा जास्त प्रभावी आणि त्यांची घराणेशाही हाही एक मुद्दा आहे. त्या साम्राज्याची एक वीट जरी ढासळण्याची शक्यता निर्माण झाली, तर यापैकी बहुसंख्य मनसबदारांच्या पक्षीय निष्ठा डळमळीत होतात, असाच आजवरचा अनुभव आहे. 

शिवाय गांधी घराण्याने प्रचाराची धुरा घ्यावी आणि त्या प्रचाराला आलेली विजयाची फळं आपण चाखावी, अशा ऐदीपणाच्या सवयीचं ग्रहण काँग्रेस पक्षाला लागलेलं आहे. ते किमान महाराष्ट्रापुरतं तरी सोडवण्यात यश आलं, तरच पटोले यांच्या कारकिर्दीला यश बघता येईल.

संघटनात्मक काम करण्याचं भाजपचं मॉडेल पटोले यांनी नीट अभ्यासावं आणि काँग्रेस विचाराची एक नवी रचना उभी करण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसी विचाराची प्रभावी व्यवस्था उभी राहिली आणि त्यातून विश्वासाचा पूल पुन्हा बांधला गेला तर पक्षापासून दुरावलेले मुस्लीम, मागासवर्गीय, आदिवासी पुन्हा जोडले जाऊ शकतात. त्यातूनच ‘व्होट बँके’त घसघशीत वाढ होऊ शकते. अर्थात ही प्रक्रिया दीर्घ आहे आणि त्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठा संच, संयम तसंच चिकाटी लागेल. काँग्रेस पक्ष इतक्या गांभीर्यानं कोणत्याच पातळीवर राजकारण करण्याच्या मन:स्थितीत अलीकडच्या दोन अडीच दशकांत दिसलेला नाही, हाही एक मुद्दा आहेच.

प्रदेशाध्यक्ष म्हणून अशी एक नाही तर अनेक पाचरी पटोले यांच्या मार्गावर आहेत. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यावर केवळ टीकेसाठी टीका करून किंवा वाचाळवीरपणा करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा शांतपणे आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न पटोले यांना करावा लागणार आहे. अन्यथा भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा एक नेता काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आला आणि गेला, यापेक्षा वेगळी काही नोंद राज्य काँग्रेसच्या इतिहासात होणार नाही!

वर केलेल्या प्रतिपादनाला किंचित छेद देणारा एक मुद्दा आहेच. कुणाल पाटील, प्राणिती शिंदे या तरुण चेहर्‍यांच्या निवडीचं स्वागत करायला हवं. सुशीलकुमार शिंदे आणि रोहिदास पाटील या दिग्गज नेत्यांचे हे (आशादायी) वारस आहेत. दाजी उपाख्य रोहिदास पाटील हे एक बडे, पण सतत डावलले गेलेले काँग्रेस नेते. आता त्यांच्या वारसदाराला जर पुढे आणण्याचं काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी ठरवलं असेल तर त्याकडे झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून बघायला हवं. प्रणिती शिंदे गेल्या दहा वर्षांत पक्षासाठी ‘समृद्ध अडगळ’ वाटत आणि सोलापूरपुरत्या मर्यादित होत्या. वडिलांचा वारसा आणि गुणांच्या आधारे प्रणिती शिंदे यांनीही या संधीचं सोनं करायला हवं. राजकारणात संधी वारंवार मिळत नसते, हे या दोघांनीही लक्षात ठेवायला विसरायला नको.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......