‘कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’
ग्रंथनामा - आगामी
रविराज गंधे
  • ‘माध्यमयात्रेतील माणसं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Thu , 17 December 2020
  • ग्रंथनामा आगामी माध्यमयात्रेतील माणसं Madhyamyatretil Mansa रविराज गंधे Raviraj Gandhe

प्रसिद्ध पत्रकार रविराज गंधे यांचं ‘माध्यमयात्रेतील माणसं’ हे दूरदर्शनच्या काळातल्या सहवास मिळालेल्या मान्यवर व्यक्तींविषयींचं पुस्तक २५ डिसेंबर रोजी ग्रंथालीतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला गंधे यांनी सुरुवातीला सविस्तर प्रास्ताविकपर लेख लिहिला आहे. त्याचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१.

माध्यम आणि लेखनक्षेत्रात मी केलेल्या कामगिरीचा वाटा छोटासाच आहे. दूरदर्शनच्या नोकरीमुळे मुंबईतील वास्तव्यात मला असंख्य प्रतिभावान कलावंत, लेखक, पत्रकार-संपादक-कवी, विचारवंत, समाजसेवक, राजकारणी, गायक, संगीतकार अशी विविध क्षेत्रांतली गुणी मित्रमंडळी भेटत गेली, त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याशी मनसोक्त सुखसंवाद झाला. माणसांचं एक सुंदर शक्तिमान जग पाहण्याची आणि त्यांना वाचण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे या गुणी आणि कर्तृत्वशाली मंडळींनी माझ्यातला लेखक, कलावंत हेरला, त्याला प्रोसाहन दिलं. माझी मलाच नव्याने ओळख करून दिली. मी संपन्न आणि समृद्ध होत गेलो.

मुंबईत कारकिर्द सुरू झाल्यानंतर दूरदर्शन निर्माता, लेखक, पत्रकार या नात्याने साहित्य, कला, संगीत संगीत क्षेत्रातल्या असंख्य मोठ्या दिग्गज मंडळींच्या ओळखी झाल्या. माझ्या ‘अमृतवेल’ या कार्यक्रमात अनेक दिग्गज साहित्यिकांच्या मुलाखती मी प्रसारित केल्या. एकदा सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांना मी ‘श्रावण रंग’ या कार्यक्रमात श्रावणाच्या कविता वाचायला आमंत्रित केले होते. पाडगावकर यांनी आपल्या खास शैलीत कविता, गप्पा ऐकवत कार्यक्रम रंगवला. ध्वनीचित्र मुद्रण झाल्यावर मी त्यांना गाडीपर्यंत सोडवायला गेलो. तेव्हा माझा हात हातात घेऊन ते म्हणाले- “रविराज! ‘अमृतवेल’ कार्यक्रम तुम्ही किती प्रेमाने करता हो! मजा आली! एकदा घरी या गप्पा मारायला!” असं आमंत्रण देऊन ते गाडीत बसले आणि काहीतरी आठवल्यासारखं करत गाडीच्या खिडकीची काच खाली करत, त्यांनी मला अतिशय निरागसपणे विचारलं, “गंधे! तुम्ही सातच्या आधी येणाऱ्यापैकी आहात की सातनंतर येणाऱ्यापैकी?” कवी जसा प्रतिभावान असतो, तसा तो मिश्कीलही असतो.

पु. ल. देशपांडे एनसीपीएमध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना मी एकदा त्यांची मुलाखत घ्यायला धडकलो. पुलंशी तासभर झालेल्या दिलखुलास गप्पा हा एक अवर्णनीय आनंद होता. गप्पांच्या ओघात मी त्यांना माझ्या लेखनाविषयी सांगताच, एकदम आठवून ते उद्गारले, “अच्छा म्हणजे ‘सत्यकथे’त ‘भिरभिर’ ही कथा लिहिणारे गंधे तुम्हीच का?” हे वाक्य ऐकताच मी उडालो. पुलंनी आपली कथा वाचल्याचा गोड धक्का मला बसला होता.

गप्पांच्या शेवटी न राहून मी त्यांना तुम्ही दूरदर्शनची नोकरी का सोडली, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, ‘दोन-तीन वर्षं मी खूप आवडीने काम केलं. नंतर मला असं जाणवायला लागलं की, सरकारी नियमांमध्ये माझ्यातल्या कलावंतांचं स्वातंत्र्य नष्ट व्हायला लागलं आहे. मुळात मी परफोर्मिग आर्टिस्ट आहे. माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळावं म्हणून मी नोकरी सोडली.’

.................................................................................................................................................................

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

.................................................................................................................................................................

दूरदर्शनच्या प्रारंभीच्या काळात स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक कमलेश्वर १९८०च्या दशकात काही काळ दूरदर्शनचे महासंचालक होते. ‘परिक्रमा’ हा त्यांचा प्रचंड गाजलेला कार्यक्रम. आपल्या कार्यकाळात मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांचे वर्चस्व न जुमानता कार्यक्रमविषयक अनेक निर्णय त्यांनी अमलात आणले. वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी दूरदर्शन आणि त्यांच्या साहित्याविषयी मनसोक्त गप्पा झाल्या. त्या दरम्यान ते मला म्हणाले, “रविराज! तुमच्या प्रश्नांची यादी मला द्या. तुमच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहून आठवडाभराने मी तुम्हाला पाठवतो.” राष्ट्रीय कीर्तीच्या एका मोठ्या लेखकाने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे गांभीर्याने लिहून १२ पानांची त्यांच्या सुवाच्च अक्षरात लिहिलेली ती एकटाकी मुलाखत आजही माझ्या संग्रही आहे. आपल्या कामावर आणि निष्ठा व प्रेम असणाऱ्या माणसाचं हे दर्शन विलोभनीय होतं!

सई परांजपे यांच्या घरी वेळ ठरवून मुलाखतीसाठी पोहोचलो. पुस्तक, सिनेमांच्या प्रोजेक्ट्सच्या फायली अशा पसार्‍यात सई काम करत बसल्या होत्या. महिनाभरापूर्वी मी त्यांना काय प्रश्न विचारणार याची यादी करून पाठवली होती. ती त्यांना काही केल्या सापडेना. हिरमुसल्या  होऊन त्या म्हणाल्या, “मी शोधून ठेवते आणि आपण नंतर कधीतरी बोलूयात का?” मी शांतपणे माझ्या खिशातून प्रश्नांच्या यादीची दुसरी प्रत काढली आणि त्यांच्यासमोर ठेवली. त्या एकदम खुश होऊन म्हणाला, “अरे वा! तुम्ही खरे पत्रकार दिसता! नंतर आमच्या मस्त गप्पा रंगल्या.

विजय तेंडुलकर माझे आवडते लेखक. प्रचंड सामाजिक आणि राजकीय भान असलेला प्रतिभाशाली माणूस. दूरदर्शनवर त्यांनी ‘दिंडी’ नावाची एक तळागाळातल्या लोकांच्या मुलाखतींची मालिका सादर केली होती. दूरदर्शनमध्ये त्या वेळी ते प्रोड्युसर-एमेरीटस या मानाच्या पदावर काम करत होते. त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी जवळपास दोन महिने त्यांना  फोन करत होतो. कार्यक्रमाचे दौरे सिनेमाचं लिखाण, शूटिंग यातून त्यांना  वेळ काढणं कठीण जात होतं. अखेरीस एक दिवशी त्यांनी मला मुलाखतीसाठी घरी बोलावलं. सिनेमा, साहित्य, दूरदर्शन, नाटक अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दूरदर्शनवर त्यांनी सादर केलेल्या ‘दिंडी’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतल्या उपेक्षित, शोषित वर्गातल्या माणसांच्या सुंदर भावस्पर्शी मुलाखती असत. त्यात व्हिज्युअल्स वगैरे फारशी नसत. मी त्याविषयी त्यांना विचारता ते म्हणाले, ‘रविराज मला असं वाटतं की, बोलणारा माणूस हे सगळ्यात मोठं व्हिज्युअल असतं.’ दृश्य भाषेची इतकी सुंदर आणि सोपी भाषा त्यांनी सहजरित्या सांगितली.

२.

दूरदर्शनच्या नोकरीमुळे विविध प्रसंगी कार्यक्रमांच्या ध्वनी-चित्र मुद्रणाच्या निमित्ताने निवडणुकांच्या वेळी अनेक मंत्री, राजकीय नेते मंडळी यांची नेहमी दूरदर्शन केंद्रावर गाठभेट होत असे. परंतु त्या वर्तुळात माझा फारसा वावर नव्हता. काही धडाडीच्या कार्यक्षम कला- साहित्यप्रेमी राजकीय मंडळींबरोबर एकत्र काम करण्याचा योग मात्र आला. त्याची नोंद करावी असे मला आवर्जून वाटतं. अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे देशातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित एक लघुपट मी तयार केला होता. त्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील अभ्यासू तडफदार कार्यक्षम नेते खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी परिचय झाला.

फिल्मच्या निमित्ताने मुंबई प्रवरानगर इथं यांच्यासमवेत फिल्म संदर्भात अनेक बैठका, चर्चा होत असत. अनेक संस्थांचे अध्यक्षपद सांभाळणाऱ्या बाळासाहेबांची सतत मुंबई–दिल्ली-प्रवरानगर अशी धावपळ चालू असे. त्यांच्याभोवती नेहमी माणसांचा आणि कार्यकर्त्यांचा गराडा असे. एकदा स्क्रिप्ट वाचनाच्या निमित्तानं मी त्यांच्याबरोबर पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करत होतो. स्क्रिप्टविषयी चर्चा झाल्यानंतर इतरत्र गप्पा सुरू झाल्या, तेव्हा मी त्यांना सहज विचारलं- ‘दिल्लीतील राजकारण, संस्थांचा कारभार, माणसांची गाऱ्हाणी, कारखान्याची-शिक्षणसंस्थांची कामं इतकं सगळं तुम्ही शांतपणे कसं सांभाळता?’ तेव्हा हसून ते मला म्हणाले- “मी पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हा एकदा मी आणि यशवंतराव चव्हाण दोघं विमानाने दिल्लीला जात होतो. तेव्हा हाच प्रश्न मी चव्हाणसाहेबांना विचारला, तेव्हा यशवंतराव मला म्हणाले- ‘बाळासाहेब मी समोरच्या माणसाला समजेल एवढं आणि उमजेल इतकंच बोलतो. त्याच्यापेक्षा जास्त जर बोललो तर समोरच्या माणसाचा गोंधळ उडतो आणि मग काम होत नाही. हा मंत्र तू लक्षात ठेव म्हणजे तुला त्रास होणार नाही.’ ” केवढं मोठं आणि साधं सत्य सांगून गेले यशवंतराव! असे अनेक किस्से, गप्पा बाळासाहेबांच्या सहवासात रंगत असत.

मी ‘सह्याद्री’ वाहिनीवरून निवृत्त झाल्यावर ‘जागर पर्यावरणाचा’ ही पर्यावरणविषयक मालिका ‘सह्याद्री’ वाहिनीवर सादर केली. मालिका सुरू झाल्यानंतर दोन-तीन एपिसोड झाल्यानंतर एका एपिसोडला तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुलाखतीसाठी मी आमंत्रित केलं. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणविषयक योजनांवर ते छान बोलले. माझ्या कार्यक्रमाची कल्पना आणि सादरीकरण त्यांना आवडलं. तेव्हा मी त्यांना हा कार्यक्रम शासनाच्या पर्यावरण विभागाने प्रायोजित करावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी तात्काळ खात्याच्या सचिवांना सूचना देऊन मालिका प्रायोजित करण्याचे आदेश दिले आणि मालिकेला सामाजिक वनीकरण विभागाचे ५२ भागांसाठी प्रायोजकत्व मिळाले.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : आधुनिक ‘भारतीय राजकीय विचारा’तले मराठी विचारवंतांचे योगदान स्पष्ट करणारा ग्रंथ

..................................................................................................................................................................

यशवंतराव गडाख हे आमच्या नगर जिल्ह्यातलं साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीवर असलेलं रसिक प्रिय राजकीय व्यक्तिमत्त्व! स्वतः लेखक असलेले गडाखसाहेब यांच्या नगरमधील साहित्य संमेलन आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्वी अनेक वेळेला गाठीभेटी होत असत. माझं लिखाण कुठे प्रसिद्ध झालं की, ते आवर्जून फोन करून आवडल्याचे कळवत. साहित्यिकांचा आणि साहित्याचा लळा जिव्हाळा राजकारणाच्या धगीत त्यांनी आवर्जून जोपासला हे विशेष.

कला-साहित्याची उत्तम जाण असलेले, अनेक साहित्यविषयक, सांस्कृतिक आणि संगीतविषयक कार्यक्रमांचं सातत्याने आयोजन करणारे गोरेगावमधील अग्रगण्य राजकीय नेते सुभाष देसाई यांच्या ‘प्रबोधन’मधील साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अधूनमधून गाठीभेटी होत असतात. एकदा स्टेशन रोडवरील पेपर स्टॉलवर मी पेपर विकत घेत होतो. त्या वेळी देसाईसाहेब आपल्या शेकडो शिवसैनिकांच्या बरोबर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये रस्त्याने जात होते. मला पाहताच त्यांनी रॅली भर रस्त्यात प्रचारफेरी थांबवली. रस्त्यामध्ये जवळजवळ पाचशे सहाशे शिवसैनिक अचानक थांबले. एक शिवसैनिक धावत धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘साहेबांनी तुम्हाला बोलवले आहे.’ मी तिकडे जाताच आनंदाने त्यांनी माझा हात हातात घेऊन अभिनंदन केले आणि म्हणाले, “रविराज आत्ताच तुमचं ‘माध्यमरंग’ पुस्तक वाचलं. काय सुंदर लिहिलं हो तुम्ही माध्यमाविषयी! अप्रतिम!” स्टेशन रोडचा ट्रॅफिक दोन मिनिटे थांबून त्यांनी माझ्या पुस्तकाला दिलेली दिलखुलास दाद अगदी सुखावून गेली.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे अधून मधून टीवी सेंटरला ध्वनि-चित्र मुद्रणासाठी येत, तेव्हा त्यांची भेट होई. साहित्य-कलाविषयक आवड असलेल्या नीलमताई ‘अमृतवेल’ कार्यक्रम पाहत असत. माझा पुस्तक परिचय त्यांना आवडत असे. त्यांनी मला दिलेल्या त्यांच्या ‘विधानसभा व माझे कामकाज’ या पुस्तकाचा मी माझ्या कार्यक्रमात सविस्तर परिचय केला होता. राजकीय क्षेत्रातल्या अशा काही मंडळींच्या संवेदनशील आणि रसिकतेचा अनुभव विरळा!

३.

माध्यमात काम करताना जरी तुमचा विविध क्षेत्रांतील लोकप्रिय व्यक्ती, सेलिब्रिटीज आणि बड्याबड्या माणसांमध्ये वावर असला किंवा तुमचे व्यक्तिगत स्नेहसंबंध असले तरी तुमचा स्वतःचा असा खास जिवलग मित्रमंडळींचा एक खजिना असतो. अशा मित्रांबरोबर सुखसंवाद साधून भावभावनांना रितं करण्याची, वैचारिक देवाण-घेवाण करण्याची आपल्या सर्वांचीच एक नितांत गरज असते. अशा मित्रांबरोबरच्या गप्पा-मैफिली, सहवास एकत्र केलेल्या कामांच्या आणि प्रवासाच्या आठवणी आपल्याला सदैव ताजंतवानं ठेवतात. अशा असंख्य मित्ररूपी लखलखणारे हिरे आपल्या खजिन्यात असतात. अशा मित्रांपैकी कुणाकुणाची अन किती नावं घ्यावी?

जवळपास चार दशकांचा माध्यम आणि लेखनक्षेत्रातला प्रवास, शेकडो कार्यक्रम, असंख्य माणसं, अनेक घटना- प्रसंग, पुरस्कार, सत्कार समारंभ, जाहीर भाषणं, गुणी मंडळींचा, मित्रांचा सहवास आणि स्नेह, देश-विदेशातील प्रवास अशा अनेकविध रंगीबेरंगी गोष्टींचा सुंदर कॅलिडोस्कोप माझ्या नजरेसमोरून सरकत आहे. त्यातील मनोहारी रंग पाहून माझं मलाच आश्चर्य वाटतं. हे सारं आपण केलं की, कुणी तरी आपल्याकडून करून घेतलं? आयुष्यातील आठवणींच्या चांदण्यात मी जेव्हा जेव्हा हरवतो, तेव्हा माझ्या ओठांवर ना. धों. महानोर यांच्या कवितेतील या ओळी येतात- ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......