कोणत्याही देशाची, समाजाची वैचारिक, बौद्धिक व सांस्कृतिक पातळी काय असते याचा शोध घ्यायचा असल्यास तेथील व्यंगचित्रं पाहायची असतात!
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांचं एक व्यंगचित्र
  • Tue , 03 November 2020
  • पडघम माध्यमनामा कार्टून व्यंगचित्र Cartoon वर्तमानपत्र Newspaper पत्रकारिता Journalism

१६ ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये महंमद पैगंबर यांच्याविषयीच्या एका व्यंगचित्रावरून एका शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी एका चर्चवरही हल्ला करून काहींना ठार मारण्यात आले. २०१५मध्ये फ्रान्समधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाने अशाच प्रकारे महंमद पैगंबर यांच्याविषयीची व्यंगचित्रं प्रकाशित केली होती. त्यावरून संतप्त होऊन काही मुस्लिमांनी या साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करून तेथील अनेक व्यंगचित्रकारांना ठार केले होते. म्हणजे गेली पाच वर्षं फ्रान्समध्ये व्यंगचित्रं हा अतिशय स्फोटक, वादग्रस्त विषय बनवला आहे.

‘हाल’ हे ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांचं प्रसारमाध्यमांच्या वागण्याबोलण्यावरचं तिसरं पुस्तक (‘समाचार’, ‘खबर’ ही दोन आधीची) ६ जानेवारी २०११ रोजी म्हणजे ‘दर्पण दिनी’ प्रकाशित झालं. यात ‘अव्यंग चित्रांना प्राधान्य’ हा मराठी वृत्तपत्रांतल्या व्यंगचित्रांविषयी एक लेख आहे. हा लेख २००९-२०१४ दरम्यान नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ‘व्यंगचित्रे व वृत्तपत्रे’ या शीर्षकाखाली संपादित स्वरूपात होता.

फ्रान्समध्ये व्यंगचित्रावरून जे हल्ले झाले, त्या पार्श्वभूमीवर मराठी वृत्तपत्रांतल्या व्यंगचित्रांच्या स्थितीगतीविषयीचा हा लेख लेखकाच्या पूर्वपरवानगीसह… (मूळ लेख २००९ साली लिहिला गेलेला आहे.)

..................................................................................................................................................................

आर. के. लक्ष्मण हे नाव माहिताय?

विकास सबनीस माहिताय काय करायचे ते?

वैजनाथ दुलंगे हे नाव ऐकलंय कधी?

मनोहर सप्रे बहुधा नसतीलच माहीत?

प्रशांत कुलकर्णी यांच्याविषयी काय मत आहे तुमचं?

असू दे. असू दे. इतकं काही शरमून जायला नको या प्रश्नांची उत्तरं सांगता येत नाहीत म्हणून. तुम्ही विशीतले असाल तर खरोखरच तुमचं अज्ञान क्षम्य आहे. तुम्ही तिशीतले असाल तर दोन नावं निश्चित जाणत असाल. हां, चाळीस-पन्नास वर्षांच्या वाचकांना मात्र कदाचित सगळी नावं ठाऊक असतील. ‘केसरी’, ‘सकाळ’ अशा बड्या वृत्तपत्रांत ही मंडळी व्यंगचित्रकार म्हणून काम करायची आणि करतेही. यातले सबनीस, सप्रे यांची निवृत्ती झालीय. दुलंगे, कुलकर्णी अजून कार्यरत आहेत. लक्ष्मण यांना काही वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाल्याने त्यांच्या हातावर परिणाम झालाय. तरीही ते कार्यरत आहेत, मात्र धार गमावून. सध्याचे दुलंगे सोडले तर कोणताही व्यंगचित्रकार दैनिकाच्या प्रथम पृष्ठावर झळकत नाही. लक्ष्मण एकेकाळी पहिल्या पानाचे नायक होते. आता ते आतल्या पानावर आढळतात. कुलकर्णींचेही तसंच. व्यंगचित्र काढणं वार्धक्य व आजार यामुळे जमत नसलेलं आणखी एक मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळ ठाकरे. हे नाव मात्र विशीतल्या मुलामुलींना माहीत असणार; पण तेदेखील शिवसेनेमुळे. सेनाप्रमुख हे एक व्यंगचित्रकार असल्याचं ९९ टक्के मुलांना माहीत नसणार. बाळासाहेब व्यंगचित्रं काढण्याचं थांबवून किमान १६-१७ वर्षे झाली असावीत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

प्रश्न कोण कोणाला ठाऊक असण्याचा नाही. का नाही याचा आहे. वृत्तपत्रांना वाचक नसतो असं म्हणायचा मुद्दाच नाही. तो वाढतोच आहे. तीही वाढतच आहेत. व्यंगचित्रकारांची नावं अनेकांना सध्या माहीत नसतात याचं खरं कारण आहे, अशा चित्रांची जागा जाणं! पहिल्या पानावरचं कितीतरी वर्षांचं त्यांचं ठिकाण हललं आहे. काहींनी त्यांचा मुक्काम आतमध्ये कुठंतरी ढकलून टाकला आहे किंवा कायमचा हलवून टाकला आहे. फार वर्षं नाही झाली, प्रत्येक रविवारी दैनिकाच्या पहिल्या पानांवर व्यंगचित्रांची एक चौकट प्रसिद्ध व्हायची. एकात चार चित्रं असत. नाही तर एकच मोठं म्हणजे तीन कॉलमी छापून येई. लक्ष्मण, सबनीस हे तर म.टा., लोकसत्ता यांच्या प्रथम पृष्ठावर असतच. त्यांचं अनुकरण जिल्हा वा प्रादेशिक पत्रांच्या पहिल्या पानावर होई. रविवार पुरवणीइतकंच या पत्रांच्या पानावरच्या तीन कॉलमी व्यंगचित्रांचं आवर्जून वाचन होई.. आता मराठीत असं कोणी छापत नाही. त्याची कारणे दोन. पहिलं, रंगीत छपाईचं तंत्र प्रगत, स्वस्त आणि सहज झालं. दुसरं, टेलिव्हिजनमुळे हलती, चालती, बोलती व्यंगचित्रं २४ तास बघायला मिळू लागली. रंगीत छपाई तशी अजूनही जिल्हा स्तरावर परवडणारी नाही. क्वचितच ती केली जाते; पण बड्या पत्रांनी स्पर्धा जिंकण्यासाठी तिचा वापर सुरू करताच आकर्षक, नावीन्यपूर्ण, कल्पक रंगीत छायाचित्रं प्रथम पृष्ठावर मिरवू लागली. काळ्या रेषांची ओबडधोबड, खरखरीत व्यंगचित्रं डोळ्यांना सुसह्य वाटेनाशी झाली. रंगीत छायाचित्र छापायला घेतलं की, उजव्या-डाव्या कोपऱ्यात रंगीत जाहिरात छापायचीही सोय झाली. रंगीत जाहिरात म्हणजे चौपटपाचपट पैसा. नुसत्या रंगीत छायाचित्राचा खर्च परवडण्याजोगा नसे. जाहिरातदारांना रंग सोयीचा असे. मूळच्या रूपारंगात वस्तू लोकांना बघायला मिळू लागली.

खलास! व्यंगचित्राचं मानाचं, पहिल्या पानावरचं, घडीच्या वरचं आणि मधोमध असलेलं स्थान गेलं. अगदीच वाचकांना सुनंसुनं वाटू नये आणि त्यांचं आवडतं ठिकाण नष्ट होऊ नये म्हणून अशा जंगी व्यंगचित्रांची जागा आत ढकलली गेली; पण एकदा सत्ता गेलेला मुख्यमंत्री दुसऱ्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून गेला की, जसा पत गमावून बसतो, तसं हे होऊन बसलं. रविवारची, खळबळजनक घटनेची व्यंगचित्रांमधून घेतलेली हजेरी आस्ते आस्ते कमी होत गेली. काही वृत्तपत्रांनी व्यंगचित्रंही रंगीत करून बघितली; पण काळ्यापांढऱ्याची सर त्यांना येईना. काय गंमत आहे बघा. कॉमिक्सचा रंग या छपाईतल्या प्रगतीमुळे आणखी खुलू लागला. पण दैनिकांच्या पहिल्या पानावरचे व्यंगचित्र मावळत चाललं. त्याच दैनिकात वेगवेगळी कॉमिक्स छापली जाऊ लागली. मोठ्यांसाठी, छोट्यांसाठी, उद्योगपतींसाठी, महिलांसाठी; पण जे व्यंगचित्र खरंखुरं त्या दैनिकाची ओळख होतं, ते मागं पडलं. टीव्हीनं स्थिर व्यंगचित्रांना चलतचित्रांचा बाज आणून दिला खरा, पण त्याचं गिऱ्हाईक लहान पोरं जास्त होती. त्यांनी व्यंगचित्रांचा असा कितीसा चाहता आपल्याकडे ओढून नेला असणार? पण ज्या पिढीला अ‍ॅनिमेशन माहीत नव्हतं, ती व्यंगचित्रांच्या प्रेमात असणार हे अगदी स्वाभाविक. जिला वयाच्या सहाव्या महिन्यापासून टीव्हीवरच्या कॉमिक्सचा खेळ कळू लागतो तिला व्यंगचित्रांची ओढ कशी असणार? ती फार तर कॉमिक्स या अ‍ॅनिमेशनच्या दुसऱ्या प्रकारची चाहती होणार. स्थिर आणि एकाच जागेवर, सारख्याच आकारात, सारख्याच पात्रांतून रोज भेटायला येणारं व्यंगचित्र या पिढीला का म्हणून आवडावं?

व्यंगचित्रांना वयाचं बंधन नसतं. चित्र कळावं, रेषा समजावी, दर्जा उमजावा असं त्यात काही अटीतटीचं नसतं. व्यंगावर असलेला त्यामधला भर म्हणजे एखाद्या चेहऱ्याची खुबी अथवा खास गोष्ट अथवा अतीव वेगळेपण ठळकपणे टिपून जगाला दाखवतं ते व्यंगचित्र. चेहराच पाहिजे असं नव्हे. सवय, प्रथा, वर्तन, पक्ष, विचार, धोरण, निर्णय असं वाटेल ते व्यंगचित्र म्हणजे न्यून दाखवण्याचा किंवा तूट सांगण्याचा प्रयत्न नसतो. त्याचं खरं ध्येय मतप्रदर्शन असतं. भाष्य हा त्याचा सारांश. व्यंगचित्र गंमतीदार असतं; पण मजेमजेतून केलेले ते एक भाष्य असतं. विसंगती टिपलेली वा विरोधाभास ठळक केलेला, असं ते असतं. वर्तमानातले प्रश्न, चालू विषयातले मुद्दे आणि वाद यांचा तिथं आपल्या पद्धतीनं समाचार घेतलेला असतो. व्यंगचित्र सफाईदार नसतं ते यामुळेच. म्हणजे निदान त्याचा डौल सौंदयपूर्ण, रेखीव आणि मोहक नसतो. एक प्रकारचा खडबडीतपणा आणि अर्धपक्वपणा त्यात असतो. हुबेहूबपणा त्यात अगदी थोडा असतो. व्यक्तिमत्त्वे ओळखू येण्याइतपत. भर असतो तो विचित्र काढण्यावर. भाष्य, टीका, मर्मावर बोट अशा गोष्टींतून त्याचं महत्त्व ठरत असतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

बहुधा हेच कारण व्यंगचित्रांच्या म्हणजे राजकीय व्यंगचित्रांच्या दुष्काळामागं आहे. वृत्तपत्रांमधलं व्यंगचित्र म्हणजे विषय चालू घडामोडींचा, प्रचलित राजकारणाचा आलाच. काही व्यंगचित्रकार सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक विषयांचे भाष्यकार असतात. बहुतेक सर्व दिवाळी अंकांमध्ये अशा व्यंगचित्रांची उधळण असते. अतिशयोक्ती, विपर्यास यांचा आधार या व्यंगचित्रांना असतो. ती बऱ्याचदा निरुपद्रवी असतात. अंतर्मुख करून जातात. मात्र राजकीय व्यंगचित्रं रोखठोक भाष्य करणारी असतात. कोणाची का असेना, तिचं विद्रूप समाजाला दाखवणं हे तिचं कर्तव्य असतं. हसत हसत घेतलेला तो एक चिमटा असतो. त्याची परतफेडही हसूनच करायची असते आणि सावरून घ्यायचं असतं. परंतु विद्यमान काळ अशा मनमोकळ्या, खेळीमेळीच्या, खिलाडूवृत्तीच्या टीकाटिप्पणी न स्वीकारणारा झालेला आहे. सहिष्णुता गमावून बसलेला आजचा समाज आणि त्याचे राज्यकर्ते झाले आहेत. म्हणूनच राजकीय व्यंगचित्रांनी पहिल्या पानावरचं स्थान गमावलेलं आहे. नव्हे, या वातावरणानं ते त्यापासून हिरावून घेतलं आहे. कोणाही कोणाचं शारीरिक व्यंग काढायचं नसतं. पूर्वी आंधळ्या, लंगड्या, थोट्या अशा हाका मारून बोलावलं जाई. आता तसं होत नाही. व्यंगं जशी शारीरिक असतात, तशी वर्तणुकीत, सार्वजनिक व खाजगी जीवनात, स्वभावात असतात. त्यांच्यावर हसणं क्षम्य आहे. कारण ते व्यंग नैसर्गिक नसून स्वार्थासाठी अथवा फसवणुकीसाठी स्वीकारलेला तो एक पवित्रा असतो. तो उघडकीस आला म्हणून चिडायचं कारण नसतं. उलट वर्तन शुद्ध करण्याचा आणि समाजाला होणारा त्रास घटवण्याचा तो एक उपाय असतो. त्याला कधी खट्याळपणा लाभतो तर कधी खोचकपणा, पण असतो एक तो निरोगी अन आल्हाददायक अनुभव. आता सुधारा, असा त्यांचा इशारा असतो.

पहिल्या पानावरच्या व्यंगचित्रांना राजकारण हा मोठाच खुराक. सत्तेच्या पटावरचे रागलोभ, हेवेदावे, डावप्रतिडाव असे कैक पैलू व्यंगचित्रकाराला दिसत असतात. तो तसा सामान्य माणसाचा प्रतिनिधी असतो. खुसखुशीत पण लागट अशी टिपणी करणं त्याचं काम. राजकारण आपल्या जीवनाला वेढून उरणारं एक प्रकरण आहे. लोकशाही म्हटली की ते असणारच. ते जास्तीत जास्त स्वच्छ आणि हितकारक व्हावं असं प्रत्येक जण चाहतो. तसं होत नाहीसं पाहिलं की व्यंगचित्रकार त्याच्या ब्रशमधून भाष्य करतो. त्याचं हे कृत्य वर्तमानपत्राच्या मूळ उद्दिष्टांच्या अनुरूपच असतं. राज्य करणाऱ्यांना वठणीवर आणून त्यांच्या चुका दाखवणं अशी बरीचं कामं या ‘चौथ्या’ खांबाला करायची असतात.

गेल्या काही वर्षांत झालं असं की, (स्पष्टच सांगायचं तर ‘लोकमत’, ‘सकाळ’ ही दैनिकं राजकीय सत्तेची घटक बनल्यापासून म्हणजे त्यांचे मालक दर्डा व पवार राज्याच्या राजकारणात महत्त्वाकांक्षी बनल्यापासून) पुढारी मंडळींना आपलं एक वृत्तपत्र असावं अशी इच्छा झाली व त्यांनी भराभर ती पुरी करूनही टाकली. भांडवलदारांची जी दैनिकं होती, त्यांचे संपादकही राजकीय महत्त्वाकांक्षांनी पछाडले. त्यातले एक भारतकुमार राऊत राज्यसभेत शिवसेनेचा भगवा फडकावतात तर दुसरे कुमार केतकर काँग्रेस व सोनिया गांधी यांच्या प्रचाराचं काम करतात. बाकी, सबंध महाराष्ट्रात बिगर राजकीय असं एकही दैनिक नाही. तसं कोणीच राहू शकत नाही; पण तमाम पत्रांनी आपापल्या राजकीय निष्ठा जेवढ्या बटबटीत केल्या, तेवढ्या त्या नाजूकही करून ठेवल्या. राजकीय नेत्यांचा थेट संबंध असल्यानं आणि त्या नेत्यांचा सर्वच पक्षांशी संबंध असल्यानं कोणाची थट्टा, विडंबन अथवा गंमतदेखील आता करणं दुरापास्त झालं आहे. फक्त स्तुती आणि सुखावणाऱ्या गोष्टींनी आता वर्तमानपत्रं भरलेली असतात. एका दैनिकाचा एक व्यंगचित्रकार सांगत होता, रोज त्याला सात-आठ व्यंगचित्रं काढून ती मुख्य उपसंपादक किंवा वृत्तसंपादक यांना दाखवावी लागतात. ते मग कोणते चित्र कोणाला दुखावेस, कोणाचा राग ओढवून घेईल असे निर्णय करून त्यातलं निरुपद्रवी असले त्याची निवड करतात. दैनिकाचा मालक सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यानं तर प्रत्येक व्यंगचित्र फुंकून फुंकून छापलं जातं.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : भारतीय वृत्तपत्रे आपली ‘विश्वासार्हता’ बुलेट-ट्रेनच्या वेगाने गमावत आहेत...

..................................................................................................................................................................

महाराष्ट्राचा काय विरोधाभास आहे पाहा. व्यंगचित्रकारानं स्थापन केलेला राजकीय पक्ष सर्वाधिक असहिष्णू आहे. बाळ ठाकरे यांनी सर्वांची यथेच्छ टिंगल उडवावी, मात्र त्यांची किंवा त्यांच्या पक्षाला प्रिय असणाऱ्या विषयांची कोणी उडवायची नाही. केलीच तर त्याला मारहाण होते. मुख्य म्हणजे यांच्या मालकीचं दैनिकच पहिल्या पानावर व्यंगचित्र छापत नाही. ठाकरे अथवा शिवसेनाच काय, कोणताच राजकीय पक्ष व त्याच्या जवळचं दैनिक सहिष्णू राहिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या जातीय संघटनांचं संख्याबळ वाढत चाललं आहे. मात्र त्यांच्यावर व्यंगचित्र कोणी काढू धजत नाही. कारण लगेच काढणाऱ्याची जात पाहिली जाऊन आरोपांची बरसात होईल.

व्यंगचित्र हे एक चांगलं राजकीय भाष्य असतं याचा विसरच महाराष्ट्राला पडण्याची भीती वाटते. आता सेना-भाजप युती सत्तेवर आली की मग बघायला नको. ते कोणतीही टीका राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या दरवाज्यात उभी करणार! कोणी नि:पक्ष मनानं व्यंगचित्र काढण्याची शक्यताच उरणार नाही. हिटलर म्हणजे स्वत:च्या प्रतिमेला इतकं जपे की, त्याला विडंबन सहन होत नसे. त्यानं व्यंगचित्रकारांवर अघोषित बंदीच घातली होती. सारे हुकूमशहा व्यंगचित्रकारांना घाबरतात. किंबहुना आत्ममुग्ध, आत्मरत माणसं आपल्या व्यक्तिमत्त्वाची मोडतोड होऊ नये याची फार काळजी घेत असतात. नेहरू व्यंगचित्रकारांना प्रोत्साहन देत असत. शंकर नावाच्या प्रसिद्ध व्यंगचित्रकाराकडील मूळ प्रती ते मागवून घेत व घरी जतन करत. गांधी व हिटलर हे दोनच राजकीय पुढारी सर्वांत जास्त व्यंगचित्रांमधून चितारले गेले असतील. जगातल्या बहुतेक वृत्तपत्रांत, नियतकालिकांत या दोघांची असंख्य व्यंगचित्रं सापडतील; पण गांधींना त्याचं काही वाटत नसते. हिटलर मात्र खवळून जाई.

मग सध्याचे पुढारी हिटलर आहेत काय? असहिष्णुतेच्या बाबतीत खचितच आहेत. मुंडे, देशमुख अनेकांची टर उडवत असतात. मात्र त्यांची व्यंगचित्रं आजवर कोणी काढल्याचं दिसलं नाही. कदाचित व्यंगचित्रकारांना त्यांच्यात काही वैशिष्ट्यपूर्ण आढळलं नसेल. पण त्यांचे मित्र असलेले मालक, संपादक त्यांना कशाला व्यंगचित्रामधून नामोहरम करतील? व्यंगचित्रकारांना आज स्वातंत्र्य नाही.

२६ ऑगस्ट रोजी ‘आयबीएन-लोकमत’ आणि ‘झी २४ तास’ यावर बाळ ठाकरे यांची मुलाखत प्रक्षेपित झाली. सुधीर गाडगीळ यांनी विचारल्यावर ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराची नोकरी करताना कधीच कोणाचा हस्तक्षेप ‘फ्री प्रेस जर्नल’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकांत झाला नाही असं सांगितलं. एकदा तर त्यांनी राजीनामा दिला म्हणून संपादक एस. सदानंद स्वत: ठाकरे यांच्या घरी त्यांना विनवणी करायला आल्याची आठवण ठाकरे यांनी सांगितली.

आत्ताची परिस्थिती कशी आहे? व्यंगचित्रकाराला कायमचं घरी पाठवायचा विचारच मालक करत असतात, असं वाटतं. व्यंगचित्रकारांना बसण्याचं योग्य ठिकाण नाही. स्टुडिओ दिला जात नाही. अन्य कोणत्याही सुविधा, मान, भत्ते दिले जात नाहीत. संपादकांची जशी मानहानी करण्यात आली आहे, तशीच व्यंगचित्रकारांची केली गेली आहे. भाष्यकार कोणीही राहो, त्याचा अपमान सध्या जाणीवपूर्वक वृत्तपत्रात केला जातो. आज किती वृत्तपत्रांत पूर्ण वेळचा व्यंगचित्रकार आहे? दिल्लीत काही वृत्तपत्रं सोडली तर कोठेही नाही. आता व्यंगचित्रकारांच्या जागी सजावटकार बसलेले आढळतात. त्यांचं काम जाहिरातींची पानं आणि अन्य काही सजवायचं. तोही एक चित्रकारच असतो. कलावंत असतो. पण त्याला भाष्य करायची परवानगी नाही.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

राज्यघटनेनं सर्व भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यात चित्रकार, व्यंगचित्रकार आहेतच; परंतु आज भारतात हिंदुत्ववादी, इस्लामी संघटना धर्मावर भाष्य खपवूनच घेत नाहीत. चित्रांचं सोडा, धार्मिक पुस्तकांमधलं एखादं प्रकरण नाट्यरूपांतरित झालेलं त्यांना चालत नाही. लगेच तोडफोड होते. त्याची धास्ती बहुधा वृत्तपत्रांनी घेतली. त्यामुळेही पहिल्या पानावरचं ‘पॉलिटिकल कार्टून’ गायब झालं.

‘हिंदू’ नावाचं चेन्नईतलं वृत्तपत्र तीनच कॉलमी व्यंगचित्र छापतं. ते आवर्जून राजकीय असतं. मात्र अग्रलेखाच्या पानावर. कदाचित त्यांची व्यंगचित्राला मानाची जागा देण्याची अशी कल्पना असावी. चला, निदान आहे तरी. ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘एशियन एज’, ‘डेक्कन क्रॉनिकल’ ही नेहमी बघण्यात येणारी दैनिकं असं तीनेक कॉलमी व्यंगचित्र छापतात; पण त्यांचं प्रथम पृष्ठावरचं स्थान हटलं ते हटलंच.

कोण काय छापतो याचा हा आढावा नाही. कोणत्याही देशाची, समाजाची वैचारिक, बौद्धिक व सांस्कृतिक पातळी काय असते याचा शोध घ्यायचा असल्यास तेथील व्यंगचित्रं पाहायची असतात. जसे संपादक सामान्य जनतेच्या मनातल्या भावनांचे भाष्यकार असतात, तसे व्यंगचित्रकारही असतात. स्वातंत्र्य, लोकशाही, समता यांचा अत्युच्च आविष्कार चित्रकार, लेखक कसा करतात त्यावर त्या देशाची भावी वाटचाल ठरते. सत्ताधाऱ्यांना बजावणारे कोणीच नसतील तर देश खड्ड्यात जायला वेळ लागत नाही.

खड्ड्यांवरची व्यंगचित्रेही थोडक्यात असंच बजावत असतात. खड्डे हे रस्त्यावरचं व्यंग. तसं व्यंग उघडं करून दाखवणं म्हणजे लाजच काढणं की, त्या कारभाराची. पण कारभारी म्हणतात, आमचं व्यंग दाखवू नका. त्याजागी जे जे अव्यंग आहे, ते सुंदर चित्रांचं, छान छान, विधायक, प्रगतीपथावरच्या ठिकाणांचं किंवा कसलंच राजकीय भाष्य न करणाऱ्या प्रसंगांचं होत आहे.

व्यंगचित्रकार प्रत्येकाचा सच्चा मित्र असतो. तो खरंखुरं सगळं तोंडावर सांगतो. त्याचं तोंड दाबणं म्हणजे आपल्या चुका सांगणाऱ्यांची मुस्कटदाबीच. पण तोंड दाखवायला त्याला ठेवलाय तरी कुठं या माध्यमांनी? आजचे तरुण-तरुणीच भिंतीभिंतीवर यांची कार्टुन्स लावू लागतील तेव्हाच उघडतील यांचे डोळे! तशा चळवळीचे दिवस लवकर येवोत. धडधाकट युवांकडून भारतीय लोकशाहीतली व्यंगं भरपूर निघोत.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा