उर्दूच्या चेहऱ्यावर लोकसंस्कृतीचं सौम्य तेज झळाळतंय. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत्येय
ग्रंथनामा - झलक
अंबरीश मिश्र
  • ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 22 October 2020
  • ग्रंथनामा झलक चौकात उधळले मोती Choukat Udhalale Moti अंबरीश मिश्र Ambarish Mishra

पत्रकार-साहित्यिक अंबरीश मिश्र यांचं उर्दू शेरो-शायरीची ओळख करून देणारं ‘चौकात उधळले मोती’ हे नवंकोरं पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला मिश्र यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

गजल-उर्दू हा भावबंध सुंदर नि शक्तिमान आहे. गजलमुळे उर्दूला भरून पावल्याचं सुख मिळालं. दखनी उर्दूशी योग्य वेळी फारकत घेऊन दिल्लीनं गजलचा आपला एक स्वतंत्र ढाचा तयार केला. दक्षिणेचा भर अध्यात्मावर होता; दिल्लीच्या कवींनी प्रणय-श्रृंगार, मीलन-ताटातूट, राग-लोभ, युद्ध, राजकारण, निसर्ग असे ऐहिक विषय निवडले.

मुसहफ़ी ग़ुलाम हमदानीसारखे शायर एकेकदा विनोदाचा आधार घेतात. उल्लू प्रेमवीरांची खिल्ली उडवताना हमदानी म्हणतो :

बाल अपने बढ़ाते हैं किस वास्ते दीवाने

क्या शहर-ए-मुहब्बत में हज्जाम नहीं होता?

(प्रेमात पागल झालात म्हणून केस कशासाठी वाढवायचे? प्रेमाच्या शहरात न्हावी नसतो काय?)

ज़फ़र ज़ताअली आणि शाह हातिम हे सतराव्या शतकातले कवी. ह्यांच्या शायरीत उपरोध नि उपहास आहे, करकरीत टोमणेसुद्धा. ज़ताअलीच्या नावावर तर अश्लील - अगदी पोर्नोग्राफी - कविताही आहेत. ह्या मंडळींचं म्हणणं होतं की, शायरीनं सेक्युलर असावं, धर्माच्या दलदलीत अडकू नये.

कट्टरवाद्यांना ही शायरी मान्य नव्हती. त्यांच्या लेखी हा सरळसरळ धर्मद्रोह होता - blasphemy. १८३०नंतर ‘वहाबी’ चळवळीनं उत्तरेत काहीसा जोर पकडला. सैय्यद अहमद बरेलवी, शाह इस्माईल ह्या वहाबी पुढाऱ्यांना इस्लामचं शुद्ध नि मूळ स्वरूप लोकांसमोर यावं, असं वाटत होतं. परंतु, वहाबी चळवळीचा जनसामान्यांवर फार परिणाम झाला नाही. लोक कवींच्या बाजूनं होते. कविमंडळींचा दबदबा होता. माळी नि पाणक्यांनासुद्धा उर्दू शेर तोंडपाठ असायचे. कवींमुळे लोकही मुल्ला-मौलवींविषयी साशंक झाले.

देव हा खाजगी अनुभव आहे - अतिशय खोल, प्रसन्न आणि स्वायत्त. हा विचार गजलच्या माध्यमातून मीर, मोमिन, दाग़ देहलवी, सौदा, मिर्झा ग़ालिब ह्यांनी प्रभावीपणे मांडला. ग़ालिब म्हणतो :

मस्ज़िद के ज़ेर-ए-साया एक घर बना लिया है

यह बंदा-ए-कमीना हमसाया-ऐ-ख़ुदा है

(मशिदीच्या सावलीत मी घर बांधलंय; मी एक नीच माणूस, पण पहा, मी देवाच्या सहवासात राहतोय.)

देवासमोर उभं राहण्याची माझी लायकी नाही, असं ग़ालिब म्हणायचा. ह्याचा अर्थ तो देवमाणूस होता. त्याला देवाशी थेट टाका जुळवायचा होता; मध्यस्थ नको होता. हा सूफ़ीयाना विचार होता. दक्षिणेची कठोर साधना उत्तरेला मानवली नसती. उर्दू कवींनी सूफ़ी गूढवादाला ऐहिक सुखदु:खाची जोड दिली. मानवी संवेदनांची धग मिळाल्यामुळे गजल उत्कट आणि सेन्श्युअस झाली; आर्तता हा तिचा स्थायिभाव झाला. कर्मकांडावर आधारित कोती धर्मभावना मागे पडली. गजलमुळे उत्तरेच्या मातीत माणुसकी आणि जीवनसन्मुख, आनंदी वृत्ती ही नैतिक मूल्यं रुजली.

मीर तकी ‘मीर’ हा दिल्ली स्कूलचा पहिला मोठा गजलकार. त्यानं गजल चांगली कसून बांधली; शेरच्या दोन ओळींत एक अख्खा नि सर्वंकष जीवनानुभव ओवण्याचं तंत्र मीरमुळे उर्दूला मिळालं. त्यानं गजलचा आशय आणि आकृतिबंध निश्चित केला. मीरच्या उर्दू गजला वाचून मिर्झा ग़ालिब फारसीचा हेका सोडून उर्दूकडे वळला, असं म्हणतात.

गजलनं दिल्लीचं संगोपन केलं. जवळजवळ दोनशे वर्षं एक शहर अक्षरश: कवितेच्या वैभवात लोळत होतं. हे अद्भुत म्हटलं पाहिजे. १७०० ते १९०० अशी दोन शतकं ‘गजल-दिल्ली’ ह्या द्विपदीभोवती उत्तर भारताचं जनजीवन फिरत होतं. (पुढे विसाव्या शतकात ‘नाटक-महाराष्ट्र’ असं एक समीकरण तयार झालं आणि गजलप्रमाणे तेही देशपातळीवर गाजलं.)

१८००नंतर उर्दूचा व्याप झपाट्यानं वाढला. १८०३ साली पवित्र कुराणचं पर्शियनमधून उर्दूत भाषांतर झालं. ही एक अपूर्व सांस्कृतिक घटना होती. आग्रा, कलकत्ता (आता कोलकाता) आणि दिल्ली महाविद्यालयांतल्या प्राध्यापकमंडळींनी कायदा आणि वैद्यकशास्त्राचे उर्दू शब्दकोष तयार केले; फारसीचे विद्वान डॉ. जॉन गिलख्रिस्ट (१७५९-१८४१) यांनी उर्दू व्याकरणावर ग्रंथ लिहिला. तो आजदेखील वाखाणला जातो.

दिल्लीच्या मीर काजिम अली जवान ह्यांनी ब्रज भाषेतलं ‘शाकुंतल’ उर्दूत आणलं; मुन्शी निहालचंद लाहोरींनी ‘गुलबकावली’ फारसीत आणलं; मजहर अलीखाँ वला ह्यांनी ‘वेताळ पंचविशी’चा उर्दूत अनुवाद केला. लालू लालजी ह्या आग्ऱ्यातल्या गुजराती ब्राह्मणानं १८११ साली ब्रज भाषेच्या व्याकरणाचा उर्दू अनुवाद प्रसिद्ध केला.

इमाद बख़्श नसीह हा लखनौचा फार मोठा शायर. त्यानं उर्दूला लखनवी वळण लावलं. पुढे, मीर बाबर अली अनीस आणि मिर्झा सलामत अली डबीर ह्यांनी लखनवी शैलीत श्रेष्ठ शायरी लिहिली. उर्दू साहित्यात लखनौ आणि लाहोर स्कूलला एक आगळं महत्त्व आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

१८३०नंतर ‘दिल्ली महाविद्यालय’ हे उर्दूचं एक प्रमुख ठाणं झालं. उर्दू ही आधुनिक शिक्षणाची भाषा व्हावी, म्हणून प्यारेलाल आशुब (हा राजा तोरडमलचा वंशज होता.), नज़ीर अहमद, मौलाना झकाउल्ला, मौलाना मोहम्मद हुसैन आज़ाद, मास्टर रामचंद्र, पंडित धरम नारायण ह्यांनी पुष्कळ कष्ट घेतले. हे सगळे विद्वान दिल्ली महाविद्यालयाचे पदवीधर; नंतर त्याच कॉलेजात शिकवू लागले. मौलाना झकाउल्ला हे ज्ञानाच्या क्षेत्रातलं मोठं नाव; मौलानासाहेबांनी एकूण १४७ पुस्तकं लिहिली; पैकी ८६ गणित या विषयावर आहेत, तर १८ पुस्तकं भूगोल-इतिहासाची आहेत.

दिल्ली महाविद्यालयात शेक्सपिअरची नाटकं, बर्क आणि पोपचे निबंध, मिल्टनचं ‘पॅरडाईज लॉस्ट’ अशा अभिजात साहित्यकृतीही शिकवल्या जात. तर दुसरीकडे, महाविद्यालयाच्या पौर्वात्य विभागातर्फे उर्दू, अ‍ॅरेबिक आणि पर्शियन साहित्य-संस्कृतीचे वर्ग भरायचे. विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असायची. नव्या विज्ञानाला उर्दूनं लाजता नये, ही दिल्ली कॉलेजची भूमिका होती. कलकत्त्याचं ‘फोर्ट वुइल्यम कॉलेज’ आणि ‘आग्रा कॉलेज’ ह्या दोन संस्थांनीदेखील उर्दूला ज्ञानाची गोडी लावली.

ह्याच काळात उर्दू वर्तमानपत्रं आणि मासिकं निघू लागली. ग़ालिबला वर्तमानपत्र वाचण्याची आवड होती. दिल्लीच्या ‘जाम-ए-जहाँ-नुमा’च्या बातम्या बर्‍याचदा खोट्या असतात, अशी तक्रार तो करतो. ‘संपादकमहोदय आज एक खोटी बातमी छापतात आणि दोन आठवड्यांनंतर ती बातमी खोटी असल्याचा खुलासा छापण्याची वेळ त्यांच्यावर येते,’ असं तो एका पत्रात म्हणतो. ‘जाम-ए-जहाँ-नुमा’च्या संपादकाचा प्रांजळपणा आज विरळाच म्हणायचा!

१८५७नंतर मुन्शी नवल किशोरनी ‘अवध अख़बार’ पेपर सुरू केला. वर्षभरातच ‘अवध पंच’ सुरू झाला. मद्रासहून (आता चेन्नई) ‘शम्स-अल-अख़बार,’ तर लाहोरहून ‘अख़बार-ए-आम’ ही वर्तमानपत्रं सुरू झाली. नज़ीर अहमद हे ब्रिटिश शासनातले वरिष्ठ महसूल अधिकारी. साहित्यवर्तुळात ते दिप्टी (म्हणजे डेप्युटी) म्हणून  ओळखले जात. दिप्टीसाहेबांनी उर्दूतली पहिली कादंबरी लिहिली.

‘ज़माना’ (कानपूर), ‘अदीब’ (अलाहाबाद), ‘दिलगुज़र’ (लखनौ), ‘हज़ार दास्ताँ’ (लाहोर) ही एकोणिसाव्या शतकातली काही महत्त्वाची वाङ्मयीन मासिकं.

उर्दू मोठी व्हावी, म्हणून हिंदू-मुसलमान खांद्याला खांदा लावून झटले. उर्दू भाषा मुसलमानांची की हिंदूंची हा तेव्हा प्रश्नच नव्हता. ते लचांड ब्रिटिशांनी १८५७नंतर आणलं. त्या आधी हिंदू-मुस्लीम ऐक्य हेच उर्दूचं बळ होतं. दंगेधोपे होत असत, परंतु त्यामुळे जातीय सलोख्याची मूळ मांडणी कधी विस्कटली नाही.

वास्तविक, १८१६ आणि १८३४ साली रथयात्रा काढण्यावरून दिल्लीत हिंदू-जैन तणाव झाला होता. काही वेळा शिया-सुन्नी बखेडेही होत असत. ‘अठराव्या-एकोणिसाव्या शतकात उत्तर भारतातले हिंदू-मुसलमान सामंजस्यानं राहत असत. दोन्ही धर्मांतले भाविक नेमानं पीर, मजार आणि दर्ग्यावर जायचे,’ असं विख्यात इतिहासकार बिपिन चंद्र ह्यांनी ‘कम्युनलिज्म इन मॉडर्न इंडिया’ ह्या ग्रंथात नमूद केलंय. रामलीलेची मिरवणूक आपल्या महालावरून जावी, अशी बादशाह ज़फ़रची सक्त सूचना असे; शाही सज्जात बसून तो प्रभू रामाचा सोहळा पाहत असे. ‘शौकरंग’ या नावानं बादशाह ज़फ़रनं ख़याल नि ठुमऱ्या रचल्याहेत.

ब्रजनारायण चकबस्त, तिलोकचंद महरूम, दयाशंकर नसीम ह्या हिंदू कवींना मुसलमान कवी मोठा मान द्यायचे. अठराव्या शतकात आनंदराम मुख्लिस हे कवी दर्जेदार शायरी लिहायचे. विसाव्या शतकात फिराक गोरखपुरी, आनंद नारायण मुल्ला, कमर जलालाबादी ह्या हिंदू कवींनी उत्तम उर्दू रचना लिहिल्या. दुसरीकडे, डॉ. राही मासूम अली रज़ा हे हिंदी लेखक म्हणून मान्यता पावले. ‘महाभारत’ मालिकेचे संवाद डॉ. रज़ा ह्यांनी लिहिलेत. मुन्शी हरगोपाल तफ़्ता हे मिर्झा ग़ालिबचे पट्टशिष्य होते; तर शिवजी राम ब्राह्मण ह्या कवीला ग़ालिब आपला मुलगा मानायचे.

उर्दूवर जेवढा हक्क मुसलमानांचा तेवढाच हिंदूंचा. उर्दूवर मुसलमानांनी जेवढं प्रेम केलं, तेवढंच हिंदूंनी केलं. धर्म, जात, पंथ हा सवालच नव्हता; असं समीक्षक शम्सुर्रहमान फ़ारुकी म्हणतात.

एक आठवण सांगतो. विख्यात अभिनेत्री नर्गिसला (होय, ‘मदर इंडिया’तली नर्गिस.) दोन भाऊ होते - अन्वर हुसैन आणि अख़्तर हुसैन. अख़्तरसाहेबांचा नि माझा चांगला परिचय होता. ते उत्तम फुटबॉलपटू होते. मुंबईच्या कूपरेज मैदानावर लहान मुलांना फुटबॉल शिकवायचे. अधूनमधून मी त्यांच्या घरी जायचो. मरीन ड्राइव्हला राहायचे.

अख़्तरसाहेबांची मुलगी नर्गिसबाईंना ‘बूआ’ म्हणायची. ‘बूआ’ म्हणजे आत्या. थेट हिंदी शब्द. तर दुसरीकडे काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या इंदिरा गांधी आपल्या आत्येला, विजयालक्ष्मी पंडितांना ‘फुप्पी’ म्हणायच्या. ‘फुप्पी’ हा उर्दू शब्द. हिंदी हिंदूंची आणि उर्दू मुसलमानांची ही ब्याद ब्रिटिशांनी आणली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................. 

उर्दूच्या भरभराटीत लखनौच्या नवलकिशोर प्रेसचा खूप मोठा वाटा आहे. मुन्शी नवलकिशोरांचं शिक्षण उर्दूत झालं. तरुणपणी ते लाहोरला एका प्रेसमध्ये काम करू लागले. त्यांच्या प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावावर प्रसन्न होऊन प्रेसच्या मालकानं आपल्याकडचा एक जादाचा हँडप्रेस त्यांना बक्षीस म्हणून दिला. नवलकिशोरांनी १८५८ साली लखनौत स्वत:चा छापखाना टाकला.

पवित्र कुराणाची स्वस्त, परंतु दर्जेदार आवृत्ती छापून ती दीड रुपयांत भाविकांना उपलब्ध करून द्यावी, असं मुन्शी नवलकिशोरांनी ठरवलं. योजना प्रमाणाबाहेर यशस्वी झाली. ग़ालिबचं पुष्कळ लिखाण नवलकिशोर प्रेसनं छापलंय. १८७१च्या सुमारास मुन्शींकडे एकूण २,१०० कर्मचारी होते आणि प्रेसचा टपालाचा वार्षिक खर्च पन्नास हजार रुपये होता! छापखान्याला कागदाचा तुटवडा भासू नये म्हणून मुन्शीजींनी पेपरचा कारखाना टाकला. हे सगळं उर्दूमुळे घडून आलं.

उर्दूच्या सौंदर्यावर काही ब्रिटिश अधिकारीही भाळले. जॉर्ज प्युएक हा अधिकारी उर्दूत काव्य रचत असे. त्यानं स्वत:साठी ‘शोर’ हे उपनाम निवडलं होतं. जनरल जोसफ बेन्स्ली हा लष्करातला मर्द गडी ‘फना’ नावानं गजला लिहायचा, तर अ‍ॅलेक्झांडर हीथरली उर्दू साहित्यात ‘आजाद’ म्हणून ओळखला जातो.

हळूहळू हमामखाना, चबुतरा, हवेली, चोबदार, हुक्का, मज़ार, पालकी हे शब्द ब्रिटिशांच्या सवयीचे झाले.

दिल्लीचा रेसिडेन्ट वुइल्यम फ्रेजर हा उर्दू-फारसीचा व्यासंगी होता; त्याच्याकडे दुर्मीळ अ‍ॅरेबिक-फारसी ठांथांचा संठाह होता. व्हिक्टर जॅकमाँ ह्या फ्रेंच अधिकाऱ्याचे फ्रेजरशी उत्तम संबंध होते. जॅकमाँनं आपल्या मित्राचं मोजक्या शब्दांत सुरेख वर्णन केलंय :

‘खरं तर फ्रेझर हा योद्धा गडी. आजही त्याच्या अंगावर भाले नि तलवारींच्या जखमांच्या खुणा आहेत. त्याच्या जीवनशैलीमुळे तो नेटिवांना आपलासा वाटतो. फ्रेजरनं आत्तापावेतो जवळजवळ ८४ सिंहांची शिकार केलीये...त्यानं सहा-सात कायदेशीर लग्नं केलीयेत. परंतु त्याच्या बायका एकाच घरात राहतात आणि आपापल्या मर्जीप्रमाणे वागतात. पर्शियाच्या सम्राटाला जेवढी अपत्यं आहेत, तेवढीच बहुधा फ्रेजरला असतील. ती हिंदू किंवा मुसलमान आहेत. मुलं आपापल्या मातांचा धर्म पाळतात.’ (‘द मेन हू रुल्ड इंडिया’ : फिलिप मेसन)

हे एखाद्या मोगल नवाबाचं वर्णन नाही काय?

टॉमस मेटकाफ हा दिल्लीचा उच्च अधिकारी घरी पायघोळ लेंगा, लांब कुर्ता नि त्यावर झगा अशा वेषात असायचा. दिल्लीच्या हवामानाचा विचार करता हा पोशाख योग्यच म्हणावा लागेल; परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलदारांना मोगलांचा प्रभाव टाळता आला नाही हेही खरंच. मेटकाफनं दिल्लीच्या बाहेर मेहरौलीला एक बंगला बांधला होता. त्याला ‘दिलखुश’ हे नाव दिलं होतं.

स्थानिक प्रजेला आपलंसं करताना कैक इंग्रज अंमलदारांनी मोगल जीवनसंस्कारांचा खुबीदारपणे उपयोग केला. त्यामुळे हे अधिकारी लोकप्रिय झाले. मेटकाफच्या अंत्ययात्रेला एक लाख लोक हजर होते, असं ग़ालिबनं लिहून ठेवलंय.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मोगल-इंग्रज दिल्लीत आमने-सामने आले. लष्करी सामर्थ्य नि मुत्सद्देगिरीत इंग्रज नक्कीच वरचढ होते; मोगल बादशाह दुर्बल होता; परंतु पर्शियन संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. तिच्या केंद्रस्थानी उर्दू होती, गजल होती.

इंग्रजांनी १८०३च्या सप्टेंबरात दिल्लीचा रीतसर ताबा घेतला. शाह आलम नामधारी बादशाह झाला; परंतु शाह आलमनं लॉर्ड लेक ह्या इंठाज लष्करप्रमुखाला ‘खाँदौराँ, खाँबहादूर सिपाहसलार’ ही मानाची पदवी प्रदान केली, तेव्हा कुठे दिल्ली-आग्ऱ्याच्या आम लोकांनी इंग्रजांचा अंमल मान्य केला. म्हणजे शाह आलमनं ठरवलं, म्हणून इंठाजांना दिल्लीत मानानं प्रवेश करता आला. दिल्लीचा दुबळा, नामधारी बादशाह जगातल्या बलाढ्य शक्तीला legitimacy बहाल करतो!

इंग्रजांच्या नजरेत बादशाह हा गैरलागू झाला होता; एक मुका बाहुला. लोकांसाठी मात्र तो बादशाहच होता. इंग्रजांनी ज्या दिल्लीवर ताबा मिळवला, ती ‘राजकीय’ दिल्ली होती; सांस्कृतिक दिल्लीवर बादशाहचा ताबा होता.

थोडक्यात, शाह आलम इंग्रजांना सांगतोय की ‘अहो लॉर्डसाहेब, तुम्ही माझं साम्राज्य हिसकावून घेतलं. त्याचं काय एवढं? माझी उर्दू, माझी हिंदी, माझ्या ठुमऱ्या-दादरे, माझी इंडो-पर्शियन संस्कृती, माझे सण-उत्सव, खाणं-पिणं हे सगळं तर माझ्यापाशीच आहे. राज्य म्हणजे नश्वर देह. संस्कृती म्हणजे आत्मा. तो अविनाशी, अवध्य आहे.’ गांधी इंग्रजांना हेच सांगत होते, ‘तुम्ही भारतावर राज्य करताय म्हणजे बाह्य गोष्टींवर. भारताचा आत्मा चिरडणं तुम्हांला शक्य नाही.’

हे पौर्वात्य तत्त्वज्ञान आहे. उपनिषदं, बौद्ध-जैन, इस्लाम, शैव, सूफ़ी अशा अनेक उभ्या-आडव्या धाग्यांचं हे नॅरटिव इंग्रजांना समजणं कठीण होतं. त्यांना राजकारण, युद्ध, कायदा नि प्रशासन ह्या बाबी उत्तम समजत होत्या. त्यांच्याकडे एल्फिन्स्टन, मनरो, मेटकाफ, सर हेन्री लॉरेन्स असे कर्तबगार अधिकारी होते. गाणी गाणारे, कविता रचणारे, भर दरबारात कथ्थक नृत्य करणारे, कवी आणि तत्त्वज्ञांच्या सहवासात अहोरात्र रमणारे हिंदुस्थानी राजे इंग्रज अंमलदारांना कळले नाहीत.

इंग्रजांना शिष्टाचार कळतो - politesse. पौर्वात्य संस्कृतीला grace समजते. हा दोन संस्कृतींतला मूल्यसंघर्ष होता. ह्यांत भाषांचा बळी गेला. १८५७नंतर इंग्रजांनी धूर्त, वसाहतवादी डाव टाकला. उर्दू आणि हिंदीवरून अतिशय गलिच्छ राजकारण सुरू झालं. ह्यात उर्दूला बराच मार बसला. तिच्या पायाखालची जमीनच हादरली.

निदा फ़ाज़ली दोन सणसणीत ओळींत उर्दूचं दु:ख सांगतात :

सब मेरे चाहनेवाले हैं मेरा कोई नहीं

मैं भी इस देश में उर्दू की तरह रहता हूँ

२.

उर्दू ही भारतीय भाषा आहे; भारतात तिचा जन्म झाला, इथल्या गाव-कसब्यांत, चौकांत नि बाजारात ती लहानाची मोठी झाली. इथल्या डोंगर-पठारांवर ती धावली, खेळली; नदीकाठी बसून तिनं बुडणाऱ्या सूर्याशी हितगुज केलं. आकाशातले तारे मोजले.

उर्दूच्या चेहऱ्यावर लोकसंस्कृतीचं सौम्य तेज झळाळतंय. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत्येय.

भारत-मोगल आणि ब्रिटन-मोगल हे इतिहासातले महत्त्वाचे टप्पे उर्दूशिवाय अपुरेच राहिले असते. उर्दूनं ह्या दोन भिन्न संस्कृतींमध्ये संवादकाची भूमिका उत्तम प्रकारे बजावली. ती विचारविनिमयाचं, देवाणघेवाणीचं माध्यम झाली.

उर्दू भले सरंजामशाही वातावरणात वाढली असेल; पण तिनं जीर्ण, बुरसटलेली मूल्यव्यवस्था ठामपणे नाकारली. माणुसकी जपली. मीर तकी मीर, ज़ौक, मिर्झा ग़ालिब ह्यांच्या गजलांत आधुनिक अनुभूती आहे. ग़ालिबचा हा शेर पहा :

दरिया-ए-मआसी तुनुक-आबी से हुआ ख़ुश्क

मेरा सर-ए-दामन भी अभी तर न हुआ था

(पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे पापाची नदी पहा कशी आटली; माझ्या शेल्याचं फक्त टोकच तेवढं भिजलंय.)

उर्दू काव्य म्हणजे रोगट रोमँटिसिज्म असा आपल्याकडे बऱ्याच लोकांचा समज आहे. तो निराधार आहे. उर्दूत protest literature पुष्कळ आहे.

कवी हा मुळात विद्रोही असतो - subversive असतो. तो किडलेल्या समाजव्यवस्थेविरुद्ध उभा राहतो. हा विचार उर्दूत अठराव्या शतकातच रुजला होता. फारसी-तुर्की साहित्यात ही परंपरा बाराव्या शतकात रूढ झाली. तिला ‘शहर अशोब’ असं म्हणतात. दिल्लीकर कवींनी ही परंपरा उर्दूत आणली.

नादिरशाहच्या आक्रमणानंतर दिल्लीचा विध्वंस झाला. अनेक कवी संतापले. त्यांनी तत्कालीन व्यवस्थेवर खरमरीत टीका केली. हा आक्रोश शहर अशोब परंपरेतला होता. मीर म्हणतो :

अब खराबा हुआ जहानाबाद

वर्ना हर एक कदम पे यहाँ घर था

(दिल्लीचा पुष्कळ विध्वंस झालाय; अन्यथा इथे प्रत्येक पावलावर एक घर होतं)

सत्ताधीशांना धारेवर धरताना मीर म्हणतो :

जिस सर को ग़ुरूर आज है याँ ताजवरी का

कल जिस पे यहीं शोर है फिर नौहागरी का

(आपल्या डोक्यावर राजमुकुट आहे म्हणून फुकाचा गर्व करू नकोस; उद्या मरणाचा विलाप ऐकण्याची वेळ येईल.)

कवी सौदानं दुसऱ्या आलमगीर बादशाहला एकदा फटकारलं होतं :

इस ज़माने का जो देखा तो है उलटा इन्साफ़

गुर्ग आज़ाद रहे और हो शुबाँ पहरे में

(काय काळ आलाय पहा - लांडगे मोकळे हिंडताहेत आणि शेळ्यांवर पहारा!)

सौदाचा हा आणखी एक मार्मिक शेर :

किसी गदा ने सुना है ये एक शहा से कहा

करूं मैं अर्ज़ गर इस को न सरसरी जाने

अमूर-ए-मुल्की में अव्वल है शाह को ये लाजमि

गदा निवाज़ी-ओ-दरवेश परवरी जाने

(एक गरीब माणूस राजाला उद्देशून म्हणतो : ‘एक विनंती करतो, तुम्ही ऐकणार असाल तर उत्तम प्रशासनाचा पहिला नियम हा की, राजानं गरीब आणि अनाथांची काळजी घेतली पाहिजे.’)

शहर अशोब परंपरेमुळे उर्दू गजलला सामाजिक आशयाची डूब मिळाली. आत्मनिष्ठ वृत्तीचा बुरखा झुगारून उर्दू भाषा समकालीन विषयांना, सामाजिक-राजकीय संक्रमणाला भिडू शकते, हे सिद्ध झालं. हस्तक्षेप (intervene) करणं, ही कवितेची जबाबदारी असते. गजलनं ती उत्तम प्रकारे पार पाडली.

दुसरं, गजल म्हणजे फक्त गुल-बुलबुल किंवा शमा-परवाना हा गैरसमज बऱ्याच प्रमाणात दूर झाला. शहर अशोब परंपरेच्या बळावरच अकबर इलाहाबादी, डॉ. मोहम्मद इ़क्बाल, फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांनी पुढे ‘राजकीय’ कविता लिहिल्या. त्यामुळे उर्दू कविता खऱ्या अर्थानं आधुनिक झाली. एकेकदा अलंकारयुक्त, दुर्बोध शैलीचा अतिरेक होतो हेही खरं. पण म्हणून उर्दू भाषेला कमी लेखण्याचं कारण नाही. अपचन झालं म्हणून कोणी धान्याच्या गोदामाला आग लावत नाही.

विसाव्या शतकातल्या कैक उर्दू कवींनी शहर अशोब शैलीत मौल्यवान रचना केल्या आहेत. हिंदी सिनेमातदेखील अशी आर्त विलापगीतं आहेत. उदाहरणार्थ, ‘सीने में जलन आँखों में तूफान-सा क्यूँ है’ ही शहरयार यांची ‘गमन’ चित्रपटातली गजल आणि ‘घरौंदा’ चित्रपटातलं गुलज़ारांचं ‘एक अकेला इस शहर में / आब-ओ-दाना ढूँढता है, आशियाना ढूँढता है’ हे गीत. ‘प्यासा’तलं ‘जला दो, जला दो, जला दो यह दुनिया; यह दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है’ हे साहिरचं गाणं म्हणजे शहर अशोब शैलीतलं अभिजात शोक-गीत!

गजलमुळे उर्दू थेट लोकांकडे गेली. मुशायऱ्यांना हजारो लोक... शिपाई, वाणी, शिक्षक, खानसामा, मजूर हजर असायचे. ह्यामुळे लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकटी मिळाली.

३.

आजचे उर्दू लेखक समकालीन विषयांवर विलक्षण ताकदीनं लिहिताहेत. हे लिखाण कसदार आणि आधुनिक आहे. अहमद फ़राज़ - पाकिस्तानातले - असं म्हणायचं; त्यांना भारतीय संस्कृतीचं समग्र भान होतं. मंजूर एहतेशामसारखे लेखक हिंदीत लिहिताहेत. परवीन शाकिरच्या गजला दोन्हीकडे ऐकल्या-गायल्या जातात. जावेद अख़्तरांचा ‘तरकश’ कवितासंग्रह आधी देवनागरीत प्रसिद्ध झाला हे विशेष.

अलीकडच्या काही वर्षांत ‘रेख़्ता फाउंडेशन’तर्फे दिल्लीत दरवर्षी गजलचा उत्सव होतो. तीन दिवस हजारो रसिक हजर असतात. पुस्तकांची मोठी विक्री होते. युवा वर्गाचा उत्साह ओसंडून जात असतो. हे चित्र मनाला दिलासा देणारं आहे. मराठीच्या नशिबात असं सुख आहे काय?

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

उर्दू काव्यात काही गोष्टी धूसर असतात. कैकदा स्त्री-पुरुष भेद हा सुस्पष्ट अन् नि:संदिग्ध नसतो. स्त्री ही बऱ्याचदा पुरुष मानली जाते. ही ambiguity मला लोभस वाटते. हा मधुराभक्तीचा प्रभाव आहे. बाईचा पुरुष करून बहार उडवून टाकू, हा मोह शेक्सपिअरलाही झाला.

मोगल सल्तनतीचा अस्त आणि ब्रिटिशांचा उदय ह्या संक्रमणाच्या आणि विलक्षण धकाधकीच्या काळात उर्दू भरभराटीस येते; एका मोठ्या जनसमूहाला अभिव्यक्तीची ताकद देते, ही मला थोर गोष्ट वाटते.

माझ्या मनातली उर्दू कशी दिसते ते सांगतो. ग़ालिबचाचाचं बोट धरून ती लाल किल्ल्याच्या उद्ध्वस्त बागेत उभी आहे; उदास संधिप्रकाशात दोघांचे क्लांत चेहरे उजळून निघालेत. ग़ालिब उर्दूला म्हणतो :

मेरी किस्मत में ग़म गर इतना था

दिल भी यारब कई दिये होते

(माझ्या नशिबात इतकं दु:ख होतं तर तेवढीच हृदयंही का दिली नाहीस?)

उर्दू चाचाला बिलगते.

..................................................................................................................................................................

‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5245/Choukat-Udhalale-Moti

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......