अजूनकाही
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रदीर्घ मुलाखत पर्यावरण विषयाचे अभ्यास, पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी टाळेबंदीच्या काळात घेतली होती. फेसबुक लाइव्हवरील या मुलाखतीचं ‘बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे येत आहे. १६ ऑक्टोबर २०२० रोजी मनोविकास लाइव्ह उपक्रमातंर्गत ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील हा काही अंश...
..................................................................................................................................................................
आपण कुठल्या तरी अनुभवाचे वाहक असतो. मी एरवी अत्यंत, अनेक दोषांनी भरलेला माणूस आहे. मी स्खलनशील आहे, माझ्या हातून चुका होतात, मी सामाजिक चौकटीतपण बसत नाही वगैरे सगळं खरं आहे. परंतु लिहिताना एखादा क्षण असा येतो की, मी काहीतरी छान लिहून जातो. मी हे माझ्यातल्या लेखकाबद्दल सांगतोय. तर असा तो लखलखता क्षण येऊन जातो, तिथं संपूर्ण आसमंत उजळून जातो. तुमचं मन उजळून जातं, तुमचं मन उदात्त होतं. हे कसं होतं? मला नेहमी वाटत आलंय की, आपण वाहक असतो. एक अनुभव वाट्याला येतो आणि त्याच्यातून मला हे जाणवतं. तेव्हा स्वतःचा विसर पडतो. इतका त्या अनुभवाशी एकाकार होतो लेखक. त्याच्यातून मी हे लिहिलं. तर याचा अर्थ असा की, जीवन माझ्या भेटीला आलं आणि मला एक क्षण स्वच्छ करून गेलं. ते मी आता लोकांना सांगतोय. आता तो एक क्षण असेल आणि दिसायला तो अनुभव लहान असेल. अनुभव लहान असो की मोठा, मायक्रोस्कोपिक पद्धतीनं जीवन तुमच्या वाट्याला आलेलं असतं. रेणूमध्ये अणु असतो तो.
तुला सांगतो, मुक्तिबोधांच्या (शरद्चन्द्र मुक्तिबोध) तीन फार सुंदर कादंबर्या आहेत. कादंबरीत्रय आहे ते. मराठी साहित्यातील थोर ऐवज. फारसं कोणी त्या वाचत नाही. कारण त्या खूप चांगल्या आहेत. पण त्या खूप दुर्लक्षित आहेत. मला फार आश्चर्य वाटतं. त्यातल्या एका (‘सरहद्द’) कादंबरीमध्ये बिशू मोठा होतो आणि रस्त्यावरून दिशाहीन भटकत असताना त्याला एक अतिशय जख्ख म्हातारी भिकारीण आपलं गाठोडं हातात घेऊन, पाय ओढत जाताना दिसते. रस्त्यावरचे सगळे तिची चेष्टा करतात. कोणी गाठोडं हिसकावून घेतं, कोणी ते फेकून देतं, कोणी तिच्यावर ओरडतात. मुलं दगड मारतात. ती खाली बसून रडते, तरी तिचं गाठोडं कोणीही देत नाही. ती म्हातारी म्हणजे तिथल्या सगळ्यांच्या नाना प्रकारे गंमतीचा विषय आहे. शेवटी ती रडतरडत कसंबसं आपलं बोचकं घेऊन तिथून निघून जाते. बिशू बेकार आहे, तो इकडे तिकडे फिरतो आहे. तो हे सगळं पाहतो. रात्री उशिरा ११-११:३० वाजता सगळं सुनसान झालेलं असताना घरी जाताना तो एका गल्लीतून जातो. तर तिकडून ती म्हातारी गाठोडं घेऊन येताना दिसते. बिशू जवळ आल्यानंतर ती म्हातारी सवयीनं म्हणते, “कुछ दे दो बेटा.” तेव्हा बिशू खिसे चाचपत म्हणतो, “मेरे पास तो कुछ भी नहीं है, माँ.” त्याक्षणी तिच्या हातातलं बोचकं गळून पडतं. दोन्ही हात आशीर्वादासाठी उंच करून ती म्हणते, “नहीं है तो क्या हुआ बेटा? दुधो नहाओ, पूतो फलो”. असा आशीर्वाद देऊन ती पुढे जाते.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
आता हे लख्खकन काहीतरी चमकवून जातं. आतल्याआत कुठेतरी लागून जातं. भव्यतेची जखम मनाला होते. ती क्षुद्र भिकारीण क्षणात आदिमाया होते. जगदंबा. हा क्षण मला अलौकिक वाटतो. संपूर्ण कादंबरी ह्या एका क्षणाने उजळून जाते. आता मला असं वाटतं हा अनुभवक्षण लहान आहे. भव्यदिव्य असं काही नाही. परंतु तुमचं सगळं अंतरंग उजळून टाकणारा असा तो एक अनुभव आहे. जीवन तुमच्या भेटीला आलेलं आहे. तेव्हा अनुभवांत छोटा-मोठा असा भेद करू नये. जो अनुभव आलाय तो जीवनाचाच एक आविष्कार आहे. आणि जीवनापुढे मी कोण? जीवन इतकं भव्य, इतकं असीम, इतकं सर्वव्यापी आहे.
ह्या जीवनाला सर्वांगाने कवेत घेणारा कोणी लेखक आहे का जगात? शेक्सपियर खूप मोठा आहे, पण तो सर्वांगाने लिहीत नाही. प्रत्येक नाटकात जीवनाची काहीतरी एक नवीन बाजू मांडतो. पण सर्वांगाने? फक्त एक व्यास असे दिसतात की, ज्यांनी जीवनाला सर्वांगाने कवळलं आहे. आमच्यासारखे आपलं इकडं तिकडं कवडसा दिसतो, त्या कवडशाबद्दल लिहितात. तर हे एकदा लक्षात आल्यानंतर, मी माझ्या जीवनापेक्षा म्हणजे मी मला आलेल्या अनुभवापेक्षा मोठा आहे असं म्हणण्याची हिंमत माझ्यात राहणार नाही. अनुभवासमोर मी लहानच असतो, कारण तो जीवनाचा आविष्कार आहे.
जगातल्या सगळ्या शहाण्या लेखकांना, मी लेखकांना नाही म्हणत आहे, शहाण्या लेखकांना म्हणत आहे. म्हणजे विशेषण आवश्यक आहे. तर सगळ्या शहाण्या लेखकांना कळतं की, आपण अपुरे पडतो. अनुभवासमोर आपण अपुरे पडतो. अनुभव जितका जास्त खोल, जितका विश्वव्यापी, जितका जास्त मोठा, तितके आपण अपुरे पडत जातो. याचं कारण असं की, आमच्याजवळ जे माध्यम आहे ते शब्द किंवा शब्दांचं आहे. आता काही अनुभव असे असतात की, ते कॉस्मिक अनुभव असतात, वैश्विक अनुभव असतात आणि ते आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या प्रदेशातले, बाहेरचे असतात. संवेदनांच्या पातळीवरचे किंवा त्याच्याही पलीकडचे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
त्याला मी अध्यात्म हा शब्द वापरत नाही, कारण आपल्याकडे अध्यात्म हा शब्द वापरला की, अनेक लोकांना अंगावर पाल पडल्यासारखं वाटतं. परंतु एक असा अज्ञात प्रदेश आहे, जिथे काय घडतं आहे, काय चाललेलं आहे, ते मला माहीत नाही. मात्र तिथे जे काही आहे, त्या प्रचंड अशा काही अनुभवांबद्दल मला लिहायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. याचं कारण शब्द माणसाच्या बुद्धीने निर्माण केलेले आहेत. माणसाची बुद्धी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत शब्द जाणार. त्याच्यापलीकडे ते जातच नाहीत. कसे जाऊ शकतील? पलीकडे अज्ञाताचा हा एवढा अफाट समुद्र पसरलेला आहे! ज्याला नाव नाही. इनडिफायनेबल, अनस्पेसिफायबल. त्याची व्याख्या करता येत नाही. असा अनुभवांचा जो मोठा समुद्र आहे, तिथे शब्दांची एवढीशी नाव घेऊन पुढे जाता येत नाही. पण तिथे गाणं जातं. कारण शब्द कृत्रिम आहेत. ते बुद्धीने निर्माण केलेले आहेत आणि बुद्धीच्या पल्याड शब्द जाऊच शकत नाहीत.
माणसाच्या बुद्धीची झेप किती असू शकते? कमीच असते. परंतु इंट्युइशनची झेप प्रचंड असते. गाणार्यांचा जो सूर आहे, तो कृत्रिम नाही ना! आविष्कारासाठी त्याच्याइतकी नैसर्गिक गोष्टच नाही जगात. त्याला कुठलाही संकेत जुळलेला नाही. शब्दाला संकेत जुळलेला आहे. उद्या दगड म्हटलं तर दगडाला दहा संकेत जुळलेले आहेत. आता किती वर्षं? १५०० वर्षांची मराठी. त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाच्या अवतीभोवती एकेक असोसिएशन्स असतात, अनेक संकेत जुळलेले असतात. ते संकेत दूर करून शब्दाच्या मूळ अर्थाकडे मला जाता येत नाही ही एक गोष्ट. किंवा तो संकेत घेऊनच ते शब्द पुढे जातात, तेव्हा वाचणार्याच्या मनात मला पाहिजे तो परिणाम होईलच याची खात्री नसते. शिवाय अमूर्तता शब्दांत पकडणं महाकठीण. पण कोमल ऋषभ लावला की, त्याच्याभोवती कुठलेही संकेत नाहीत, कोमल ऋषभ हा फक्त कोमल ऋषभ आहे. तीव्र मध्यम लावला की फक्त तीव्र मध्यम आहे. कसलेही मानवी अनुभव त्याला चिकटून येत नाहीत. पण हे सगळे स्वर एकत्र आले की, ते बुद्धीच्या पलीकडचा जो प्रदेश आहे तिथं जातात. त्या प्रदेशात आपल्याला घेऊन जातात.
म्हणून मला सगळ्या गाणार्यांचा नेहमी हेवा वाटतो, चांगलं गाणार्यांचा. कुमारांचं गाणं ऐकताना, मुकुलचं गाणं ऐकताना! अमीरखाँसाहेब माझे भयंकर आवडते आहेत. मला नेहमी वाटत आलंय की, अमीरखाँच्या गाण्याची लय आपल्या लिखाणाला असावी. एक मोठा बडा ख्याल!
..................................................................................................................................................................
‘बोलिले जे... संवाद एलकुंचवारांशी’ या पुस्तकाच्या पूर्वनोंदणीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5244/Bolile-Je-Sanwad-Elkunchwaranshi
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment