बुद्धीने ‘प्रखर’, विचाराने ‘पक्के’, मात्र धैर्यात पूर्ण ‘उणे’ अशा प्रकारचे ‘मॉरिस ब्लान्शो’ फ्रान्स काय, युरोप काय, भारतातसुद्धा पैदा होतात!
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
जयदेव डोळे
  • मॉरिस ब्लान्शो आणि ‘डेस्परेट क्लॅरिटी’चे मुखपृष्ठ
  • Wed , 30 September 2020
  • ग्रंथनामा दखलपात्र मॉरिस ब्लान्शो by Maurice Blanchot डेस्परेट क्लॅरिटी Desperate Clarity

हुकूमशाहीचा काळ आहे. सेन्सॉरशिप लागू झालेली आहे. लेखक, विचारवंत, कलावंत आदींवर कडक नजर आहे. कोणी सरकारवर टीका केली की, तुरुंग अन छळकोठडी आहेच तयार. अशा वेळी एका समीक्षकाने काय करावे? साहित्याचा उहापोह, साहित्यकृतींची समीक्षा या खेरीज काय? तो काही फार धाडसी नाही. पत्रकार म्हणून तो काही फार करू शकलेला नाही. पण लिखाण-वाचन करण्यावाचून पर्याय काय? लेखकाने स्वत:शी इमान राखून लेखन करत राहावे की अवतीभवती जे चाललेय त्याला अनुषंगून? मुळात लेखकाने परिस्थितीची खबर घेतलीच पाहिजे का? लेखकाने न्यायनिवाडा करत राहिले पाहिजे का?

असे खूप काही प्रश्न आणि शंका एका फ्रेंच समीक्षकाला व पत्रकाराला पडल्या होत्या. फ्रान्समध्ये १९४० ते १९४४ या काळात एका लष्करशहाचे सरकार स्थापन झाले होते. त्याला हिटलरची फूस होती. त्यामुळे फ्रान्सनेसुद्धा ज्यूविरोधी कायदेकानून सुरू केले. डावे लेखक, विचारवंत यांची धरपकड सुरू केली. कोणाकोणाला मृत्युंदडही ठोठावला. पत्रकार, समीक्षक मोठ्या संकटात सापडले. अशांपैकी एक होते मॉरिस ब्लान्शो. त्यांनी त्या काळात जे लेखन केले, त्याचा इंग्रजी अनुवाद मायकेल होलांद यांनी केला आहे. पुस्तकाच नाव ‘डेस्परेट क्लॅरिटी’ असे असून ते २०१४ साली न्यू यॉर्कच्या फोर्डहॅम युनिर्व्हसिटी प्रेसने प्रकाशित केले आहे. अभिव्यक्तीवर आणि राजकीय कार्यावर बंदी आली असताना लेखक-समीक्षक यांनी काय करावे अथवा जे केले ते अभ्यासाचा विषय असल्याने एका विद्यापीठाने हा लेखसंग्रह काढला आहे.

फ्रान्सचे लोकशाही सरकार घालवून सत्तेत बसलेल्या लष्करी अधिकाऱ्याने फ्रान्सची राजधानीही व्हिची या ठिकाणी हलवली होती. म्हणून या सरकारचे वर्णन ‘व्हिची सरकार’ असे केले जाते. ‘ऑक्युपेशन’ अर्थात कब्जा असेही तो काळ गणला जातो. ब्लान्शो यांनी या काळाशी वास्तव म्हणून जुळवून घेतले होते. ज्यू द्वेष असो की हुकूमशाही ब्लान्शो यांनी आपला त्यांच्याशी काही संबंध नसल्याचे मनाशी ठरवून टाकले होते. एखादा लेखक इकडचा की तिकडचा या दृष्टीने ते लेखकाकडे पाहातच नव्हते. चालू घडामोडीविषयी ब्लान्शो पूर्ण उदास असत. त्यांच्या मते लेखकाने एका शांत, गप्प अवस्थेत असावे, मात्र ती अवस्था लेखकाचे सुरक्षित आवरण काढून घेते आणि ती कोसळून पडते. ती सभोवतालचे जग, काम, विषय यांवर आघात करत भाषेमधून साऱ्याची गुंफण करते. हा जो बदल असतो तो पायाभूत असतो. कारण तो साहित्य, राजकारण आणि विचार यांचा मिलाफ करणाऱ्या मूल्यव्यवस्थेशी भिडतो. तो मेळ विस्कळीत करतो. एकच एक मानवी आदर्शवत मूल्य विश्वाचे संचालन करते, हा ग्रहही तो उधळून लावतो. फ्रान्सचे अस्तित्व देश म्हणून अदृश्य झाल्याने ब्लान्शो यांच्या आदर्श वाङ्मयीन पूर्णत्वाच्या कल्पनेला लाभलेले सुरक्षित कवच गळून पडले. १९४२ पर्यंत तर लेखक म्हणून अंतहिन दिशांच्या टप्प्यावर माघार झालेली. व्यक्तीमात्र म्हणून स्वत्वप्रधानता अधांतरी होऊन बसलेली. ही जी संकटोउदभव परिस्थिती आहे, तीमधून फ्रान्सच्या पराभूत स्थितीचा पालट होऊन जाईल आणि इतिहासाची कल्पना व वैश्विकता बदलून जाईल, असा त्यांचा दृष्टीकोन आहे.

ब्लान्शो यांची ही भूमिका तशी तकलादू आहे. स्थितीपालट होताना वाट बघत बसणे एवढीच लेखकाची कशी काय अवस्था असते? हुकूमशहा जी हत्याकांडे करत असतात आणि असंख्य विरोधकांना तुरुंगात डांबत असतात, ती लेखक-समीक्षक फक्त पाहत बसणार की काय? किंबहुना इतरांबरोबर लेखकालाही अभिव्यक्तीवरील बंधने सोडवी लागतात, हे तो कसे जाणत नाही? अनुवादक व प्रस्तावना लेखक होलांद यांनी एवढे विवेचन करून ब्लान्शो यांची बाजू सावरून धरलेली आहे. कारण प्रत्यक्ष प्रतिकारात सामील न झालेले हे समीक्षक महाशय एका साप्ताहिकात असे काही परीक्षणात्मक-परिचयात्मक व स्वतंत्र लेखन करत राहतात की, त्यांच्या निष्ठांवर शंका घेता येत नाही. म्हणजे ज्यूद्वेष्ट्या लेखकांची साहित्यकृती टाळून अशांची समीक्षा करायची की, जीमधून पूर्वीच्या फ्रान्सची मूल्ये जागवता येतील. एका साप्ताहिकाचा अधिकारी लेखक म्हणून अन्य स्फोटक विषय हाताळायचे असेही ते करत होते असे होलांद सांगतात.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : कृषी विधेयके : शेतकऱ्यांचे हित साधणार की माती करणार?

..................................................................................................................................................................

सिम्बॉलिझम, रोमँटिसिझम, मोपासाँ, नायकत्व, अस्तित्ववाद, कादंबरी इ. अनेक विषयांवरील २८ लेख या पुस्तकात आहेत. नाझीवादाचा बडगा लेखक, कवी, पत्रकार, विचारवंत, कलावंत अशांना युरोपात बसला होता. बरेच जण परदेशी पळून गेले. काहींनी प्रतिकार केला. काही मारले गेले.

भारतात १९७५ ते १९७७ या काळात आणीबाणी होती. त्या वेळी अगदी अशीच परिस्थिती होती. २०१४ ते आजपर्यंत तशीच परिस्थिती आहे. किती लेखक आणि पत्रकार, विचारवंत आणि समीक्षक प्रतिकारात सामील झाल्याचे दिसते? आणीबाणी दोनच वर्षे होती. आज सहा वर्षे झाली आणि पुढेही हेच वातावरण राहील असे दिसत असताना किती लेखक मुस्कटदाबी, दहशत, हिंसा आणि द्वेषमय प्रतिक्रिया यांची दखल घेऊन काही मांडणी करत आहेत?

मी ‘अक्षरनामा’ध्ये गेल्या तीन महिन्यांत सहा पुस्तक परीक्षणे केली. ती परिचयच म्हटली पाहिजेत. कारण मी काही समीक्षक नाही. भारतामधील हिंदुत्ववादी राजकीय विचार कसा आहे आणि तो सत्ता कशी हाताळतो हा त्यांचा विषय. यातील पाच कादंबऱ्या होत्या. २०१९ साली आलेल्या अजून दोन कादंबऱ्या (नयनतारा सहगल व गीता हरिहरन) हाती घ्यायच्या आहेत. वाचून ठेवल्यात. एक कादंबरी ऐंशीच्या दशकातील होती. तेवढे सोडता मोदींच्या काळावर काही साहित्य लिहिलेले सापडते का, याचा शोध घेताना एवढीच पुस्तके (म्हणजे चार) सापडली. अजूनही काही असतील. इंग्रजीत ती मिळाली. हिंदीत एकही नाही. मराठीतही नाही. बाकीच्या भाषा कळत नाहीत म्हणून तिथे काही प्रकाशित झाले काय, ते अज्ञात आहे.

‘हंस’ व ‘आलोचना’ या हिंदी वाङ्मयविषयक नियतकालिकांत संपादकीय विद्यमान सत्ताधारी विचारधारेविरुद्ध असतात. कविता, कथा अथवा समीक्षा, संस्मरणे आदी नाही. मी अर्थात त्यांचा नियमित वाचक नसल्याने ठामपणे काही सांगता येत नाही. ‘इंडिया टुडे वार्षिकी’मध्ये एखादी मुलाखत, एखादे भाष्यवजा लेखकीय मत सध्याच्या असहिष्णू, हिंसक, लोकशाहीविरोधी आणि धर्मद्वेष्ट्या वातावरणाबद्दल असते. परंतु कथा वा अन्य साहित्य नसते. इंग्रजी भाषेव्यतिरिक्त हिंदी व मराठी या भाषांत आताचे वातावरण आनंदी, उत्साही आणि पवित्र आहे की काय? इतके कसे हे लेखक आणि कवी बेशुद्ध व बेफिकीर?

पण आणीबाणीवेळी हे लोक असेच नव्हते का वागले? तेव्हाचे प्रस्थापित असोत की बंडखोर, सारेच तर लेखण्या टोपणबंद करून बसले होते. ना नेमाडे, ना देसाई, ना शिरवाडकर, ना कुलकर्णी. स्वातंत्र्य चळवळीतही साने गुरुजी, चोरघडे, बापट, बोरकर, माडगूळकर असे मोजकेच.

म्हणजे वास्तवाकडे दुर्लक्ष, चालू घडामोडींकडे कानाडोळा हे लेखकादी वाङमयोउत्पादकांचे वैशिष्ट्य असते की काय? कोणी म्हणेल कोणत्याही घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया द्यायला तो काय पत्रकार असतो का? पत्रकार म्हणून सोडा हो, नागरिक म्हणून तरी काही मनात उमटते की नाही? तसे बघितले तर सामान्य नागरिकसुद्धा आपल्या अशा जबाबदाऱ्या राजकीय म्हटल्या जाणाऱ्या माणसांवर ढकलून मोकळा होत असतो. मग कार्यकर्ते आणि नेते स्वातंत्र्य मिळवतात, सत्तेत बसतात, सत्तेतून बाजूला होतात आणि पुन्हा सत्तेत आले की, ती हातून निसटू नये यासाठी सारा बंदोबस्त करून ठेवतात. त्यात लेखक, कवी, समीक्षक, पत्रकार, विचारक यांना गप्प करणे आले किंवा कैद करणेही आले. साऱ्यात आधी नाहीशी होतात ती नागरी स्वातंत्र्ये आणि नागरी हक्क. त्याची कितपत कल्पना नागरिकांना असते, सांगता येत नाही. लेखक किंवा कवी चटकन सामान्य नागरिकाच्या कुडीत शिरून आपली अनभिज्ञता अथवा असहाय्यता व्यक्त करू शकतोच की!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’त लागोपाठ सहा पुस्तक परिचय माझ्या नावे प्रकाशित (प्रकाशमान झालेल्या काचेत वाचताना सारेच प्रकाशित होत असते, नाही का?) झाल्यावर माझ्या महाविद्यालयीन काळातील एका मैत्रिणीने ‘सध्या राजकारणावर लिहिणे थांबवलेस की काय?’ असा सवाल केला. शंकाच ती. त्यामुळे मी बुचकळ्यात पडलो. मुद्दाम सारी पुस्तके संघ व हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, नेते यांचे राजकारण पडताळणारी निवडलेली. त्यातील मराठी वाचकांना माहीत असणारी कमीच. मराठीत हा विषय घेऊन लिहिलेल्या कथा-कादंबऱ्या-आत्मचरित्रे यावर लिहिलेले लेख मी माझ्या ‘आरेसेस’ या पुस्तकात घेतलेले आहेत.

पुस्तक परीक्षण-परिचय-समीक्षा एक निरुपद्रवी आणि अराजकीय विषय असतो, असा समज मराठी साहित्यविश्वात कधीचाच पसरलेला आहे. मुंबई व पुणे येथून निघणाऱ्या वृत्तपत्रांनी साप्ताहिक सदरे सुरू करून त्यात पुस्तकांची ओळख आणि प्रचार यांसारखे लेखन छापल्याने हा समज रुजला. साप्ताहिके, मासिके इत्यादी ठिकाणी थोडी पृष्ठसंख्या जास्त लाभत असल्याने तिथे जरा विस्ताराने लिहिले जायचे. तरीही लिहिणाऱ्याच्या वकुबानुसार पुस्तकाचे मर्म वाचकांना कळू शकते. अन्यता नुसताच फाफटपसारा. माझा प्रत्येक पुस्तक परिचय चालू राजकारणाशी जोडूनही तो वाचला मात्र तसा गेला नाही.

समीक्षा कठोर असावी, परीक्षण सखोल असावे आणि परिचय नेमका असावा अशी अपेक्षा. पण चार-दोन साहित्यविषयक नियतकालिकं सोडता असा लेखनभेद कोठेही आढळत नाही. भरपूर वाचन करून ज्याला एक विशाल दृष्टी लाभली आहे, अशा व्यक्तीला समीक्षा-परीक्षण करण्यास सांगितले जाई. तो एखाद्याचा व्यवसायही असे आणि आवडही. परंतु एक सबंध पान वृत्तपत्राने पुस्तक व्यवहाराला वाहिल्यावर त्यात एकाच वेळी चार-पाच परिचय द्यायचे म्हणजे वेळ आणि शब्द यांची बंधने पाळणे आले. साहजिकच एखाद्या खेळाच्या धावत्या वर्णनाचे स्वरूप त्या लेखनाला येऊ लागले. त्यामधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी अनेक पैलू नाहीसे होऊ लागले. फॅशन शोमधील तरुण-तरुणी भराभरा ‘कॅट वॉक’ करत काही तरी दाखवून जात असल्याचाही भास त्या पानाला येत चालला. चित्रपट परीक्षणाचीही अशीच गत. सगळीकडे वृत्तपत्रांनी चटपटीत, थोडक्यात आणि भिंतीवरच्या पोस्टरसारखी अवस्था अशा लिखाणाची करून सोडली.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मराठीचे प्राध्यापक तर या भयंकर लेखनप्रकारात अगम्य अन तांत्रिक भाषेसह उतरलेले दिसतात. ठीक आहे. परंतु त्यांनाही फार काही सखोल चर्चा साहित्य, लेखन, जगातील घडामोडी या अनुषंगाने करणे जड जाते. ते तरी बिचारे काय करणार? त्यांचा राजकीय विचारांचा अवयव तमाम संस्थाचालक चिरडून टाकतात. मगच त्यांना नोकरीवर घेतात. हे संस्था चालक पूर्णवेळ राजकारण करत असतात. त्यांच्यापैकीच काही जण देशातील विचार व उच्चारस्वातंत्र्य त्या अवयवासारखेच चुरगाळून टाकण्यात सामील असतात. असेही म्हणता येईल की, त्यांच्या अशा स्वातंत्र्यहरणामुळे या बिचाऱ्या मराठी अध्यापकांना ना चांगली समीक्षा करता येते, ना परीक्षणे. त्यांची स्वतंत्र समीक्षा काही संग्रह करण्याएवढी प्रकाशकांना वाटत नाही. त्यामुळे कोणी कितीही मर्मभेदक वाचक असला तरी त्याला जगापुढे येता येत नाही.

देशावर राज्य करणारी राजकीय विचारधारा हळूहळू (आणि कधी एका झपाट्यातही) नागरिकांचे स्वातंत्र्यहरण करत जाते आणि त्यातून समाज घडत जातो. काय, किती, कसे, कधी कुठे बोलायचे याची काळजी करत तो अभिव्यक्ती करू लागलो. सरकार म्हणजे देश अन देश म्हणजे राज्य करणारा पक्ष असा समज राज्यकर्ते तसेच त्यांचे भक्त, भाडोत्री भाट आणि भांडवलदार पसरवतात. टीका, समीक्षा, कोणाचीही, कशाचीही असो, ती होऊच नये असे वातावरण तयार होते. मग मॉरिस ब्लान्शो फ्रान्स काय, युरोप काय, भारतातसुद्धा पैदा होतात. बुद्धीने ‘प्रखर’, विचाराने पक्के मात्र धैर्यात पूर्ण ‘उणे’ अशा प्रकारचे!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......