सतत झगडत, भांडत राहणारा, बंडखोर आणि विसाव्या वर्षापासून ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत वेगळी व्हिजन-जीवनदृष्टी असणारा लेखक
ग्रंथनामा - झलक
विलास खोले
  • ‘भालचंद्र नेमाडे : व्यक्ती, विचार आणि साहित्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 18 September 2020
  • ग्रंथनामा झलक भालचंद्र नेमाडे : व्यक्ती Bhalchandra Nemade - Vyakti Vichar Aani Sahitya विचार आणि साहित्य भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade हिंदू Hindu

‘भालचंद्र नेमाडे : व्यक्ती, विचार आणि साहित्य’ हे प्रा. विलास खोले यांनी संपादित केलेले पुस्तक नुकतेच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबईतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला खोले यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

अखिल भारतीय पातळीवरचा साहित्यातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात भालचंद्र नेमाडे यांना लाभला. लेखक म्हणून हा जसा त्यांचा व्यक्तिशः गौरव आहे, तसाच तो मराठी भाषेचाही गौरव आहे. सर्व मराठी भाषकांना आनंद व अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. मराठीच्या वाट्याला आलेला हा चौथा पुरस्कार. वि. स. खांडेकर (१९७४), वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज (१९८७), गो. वि. ऊर्फ विंदा करंदीकर (२००३) या तिघांच्या नंतर हा मान नेमाडे यांना मिळाला आहे. २५ एप्रिल २०१५ रोजी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कारप्रदान सोहळा पार पडला. या घटनेमुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात आनंदाची व अभिमानाची लहर उमटली.

कादंबरी, समीक्षा, कविता, भाषाभ्यास, संतसाहित्याभ्यास इत्यादी क्षेत्रांतील भालचंद्र नेमाडे यांची कामगिरी सुप्रसिद्ध आहे. परंपरेपेक्षा सर्वस्वी वेगळी व मौलिक अशी साहित्यनिर्मिती आणि साहित्यविचार करणारे लेखक असा नेमाडे यांचा लौकिक आहे. तसेच एक माणूस, एक लेखक, अध्यापक व संशोधक या सगळ्या भूमिकांशी निष्ठावंत राहून कार्य करण्याचा त्यांचा स्वभाव सर्वज्ञात आहे. राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या साहित्यविषयक उपक्रमांना चालना देण्याचे कार्य ते गेली कित्येक वर्षे करत आले आहेत. वयाच्या पंचविशीत ‘कोसला’ लिहून मराठी कादंबरीच्या इतिहासाला वेगळे वळण लावणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांनी २०१० साली ‘हिंदू’ ही महाकाव्यात्म कादंबरी लिहून कादंबरीवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. या लेखकाच्या वाङ्मयीन, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा सामग्ऱ्याने मागोवा घ्यावा, त्यांची निर्मितिशीलता, त्यांची जीवनदृष्टी आणि त्यांचे कार्य यांचा साकल्याने परिचय घडावा, अशा उद्देशाने प्रस्तुत ग्रंथाची सिद्धता केली आहे.

भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेल्या ‘हिंदू’ या कादंबरीच्या अनुषंगाने त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या मनात व त्यांच्या लेखनात देशीवादाचे जे आत्यंतिक प्रेम आहे, त्या देशीवादाचा मूर्तीमंत आविष्कार घडवणारी ही कादंबरी आहे. ज्ञानपीठ दिले जात असताना केलेल्या भाषणात नामवरसिंह यांनी देशीवादाने समकालीन लेखकांना खूप धीर व आत्मविश्वास दिला असा आवर्जून उल्लेख केला, हे या संदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे. नेमाडे यांना लेखन करताना भारतीय साहित्यपरंपरेचा कधीही विसर पडला नाही. मराठी साहित्यपरंपरेची त्यांची जाण तर त्यांच्या लेखनातून सातत्याने व्यक्त होत आली, हे ‘हिंदू’ वाचत असताना कुठल्याही वाचकाला विशेषत्वाने जाणवते. आतापर्यंत ‘हिंदू’च्या एक लक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. हिंदी, कन्नड भाषांत तिची भाषांतरे झाली आहेत आणि इंग्लिशमध्येही तिचे भाषांतर करण्याचे काम सुरू आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

२.

नेमाडे यांचे वैशिष्ट्य हे, की वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीही ते कार्यरत आहेत. त्यांच्यावर टीका करून झाली, अजूनही अधूनमधून होतेय. परंतु त्यामुळे ते थांबलेले, बिचकलेले, नाउमेद झालेले नाहीत. नेमाडे हे एकमेव असे साहित्यिक आहेत की, जे अजूनही न थांबता अतिशय गंभीरपणाने व विचारपूर्वक लिहिताहेत आणि विचारप्रतिपादनही करताहेत. ‘हिंदू’ या कादंबरीचा दुसरा भाग त्यांनी पुरा करत आणला आहे. तो लवकरच वाचकांच्या हाती पडावा अशी अपेक्षा आहे. ते संस्थात्मक काम करताहेत, लोकांना, लेखकांना मदत करताहेत. भाषेच्या वाढीसाठी, विकासासाठी, बोलींच्या जतनासाठी काम करताहेत. साहित्य अकादमीच्या माध्यमातून त्यांनी मराठी भाषेची सेवा तर केलीच, खेरीज अन्य भाषांच्या व साहित्याच्या अभिवृद्धीसाठी ते धडपड करत राहिले. याकडे सर्वांचे लक्ष वेधणे हे मला माझे कर्तव्य वाटते.

त्यांची तुलना करायची असेल तर अन्य भाषांतील अजूनही काम करत असणाऱ्या लेखकांशी करावी लागेल. सतत झगडत, भांडत राहाणाऱ्या लेखकांशी करावी लागेल. बंडखोर असणारा हा लेखक आहे, हे त्यांचे अंग महत्त्वाचे आहे. विसाव्या वर्षापासून ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत वेगळी व्हिजन-जीवनदृष्टी असणारा हा लेखक आहे. साहित्य अकादेमी हिचे वर्णन ‘National Academy of Letters’ असे केले जाते. तथापि तिच्या स्थापनाकाली जेवढ्या पंधरा घटनामान्य भाषा होत्या, त्या भाषांपुरतेच काम ती करते. ती सर्वांची, सर्व लहान-मोठ्या सोळाशे भाषांची असावी आणि निदान तिच्या खर्चाचा, कार्यक्रमांचा काही भाग लहानलहान जमातींच्या मौखिक भाषांचाही असला पाहिजे - हे नेमाडे यांचे मत त्यांनी भूतपूर्व अध्यक्ष अनंतमूर्ती यांना पत्राने कळवले होते.

त्यांच्या या मताला सर्वांचा पाठिंबा मिळाला. तथापि त्याची कार्यवाही करण्यासाठी नेमाडे यांना बरेच सव्यापसव्य करावे लागले. त्याचा परिणाम होऊन आता अकादेमी सर्वांना ‘आपली’ वाटू लागली आहे. मंत्र्यांपर्यंत जाऊन धडपडण्याचे निदान तीन-चार प्रसंग तरी नेमाडे यांच्या साहित्य अकादेमीच्या कारकिर्दीत आले. नेमाडे साहित्य अकादेमीच्या कार्यकारिणीवर काम करू लागल्यापासून त्यांनी लहानलहान Non-Scheduled भाषांमधल्या आयुष्य वाहून घेणाऱ्या लोकांना फेलोशिप देणे, भाषासन्मान देणे असे उपक्रम सुरू केले. त्यानंतरच्या काळात केवळ हिंदी-मराठी-बंगाली इत्यादींपुरतेच नाहीत, तर लडाखी, अहिराणी, वारली, बंजारा भीली, संथाली इत्यादी लहान लहान एकवीस भाषांमधील लोकांचाही गौरव करण्यासाठी, त्यांना भाषासन्मान मिळावा यासाठी बरीच धडपड केली. त्यामुळे छोट्या दुय्यमतिय्यम समजल्या जाणाऱ्या भाषांसाठीही नवनवे कार्यक्रम गेल्या आठ-नऊ वर्षांपासून सुरू झाले. उदा. ग्रामालोक फेस्टिवल- Folkdances, Folk songs, Folk Theatre इत्यादी. आसामातल्या दोनशे भाषांपैकी सहा मौखिक भाषांमधील (मिझो, खासी, गारो इत्यादी) classics निवडून ती सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा मोठा प्रकल्प त्यांनी स्वतः एकट्याने एकट्याच्या बळावर चार वर्षे तडीस नेला. त्याचप्रमाणे हे उपक्रम पुढे चालू राहावेत यासाठी अंदाजपत्रकातही कायमची तरतूद व्हावी, यासाठी अपरंपार प्रयत्न केले व त्यांत त्यांना यश आले. विशेषतः पूर्वोत्तर भारतातले छोट्या भाषा बोलणारे लोक आणि देशभरातल्या जमाती यांच्यातील लेखक-कवींचा उत्तर-पश्चिम आणि दक्षिण विभागीय लेखकांशी दरवर्षी संवाद व्हावा, असे कार्यक्रम नेमाडे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय यशस्वी झाले.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘होय, हे पोलिटिकल स्टेटमेंट!’ - डॉ. भालचंद्र नेमाडे

..................................................................................................................................................................

मोठमोठे लेखकही तांत्रिक कारणांनी अकादेमी पुरस्कारांपासून वंचित राहतात, यास्तव सर्व भाषांमधून अशा लेखकांची यादी करून त्यांना पुरस्कार दिला जावा असा निर्णय घेण्यासाठी नेमाडे यांनी अतिशय परिश्रम केले. मराठीच्या संदर्भात ज्यांच्यासाठी हा खटाटोप त्यांनी केला ते अरुण कोलटकर मात्र दुर्दैवाने नेमके तेव्हाच वारले. पूर्वी साहित्य अकादेमीचा एकच पुरस्कार होता. आता युवा, बालसाहित्यकार आणि भाषांतरकार यांना स्वतंत्र पुरस्कार सर्व भाषांमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी समारंभपूर्वक दिले जातात. पुरस्कारांची कार्यपद्धती सुधारण्याचा उपक्रमही नेमाडे यांनी केला. यामुळे त्यांना काही प्रमाणात वाईटपणाही घ्यावा लागला. बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, भाऊ पाध्ये आणि दिलीप चित्रे यांना दरमहा मोठी फेलोशिप मिळावी यासाठी नेमाडे यांनी अतिशय प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी या लेखकांवर मेहनतपूर्वक स्वतंत्र लेखनवजा शिफारशी पाठवल्या होत्या. त्याही आता यथावकाश छापल्या जातील आणि त्या वाचल्या म्हणजे त्यांद्वारे अत्यंत वस्तुनिष्ठ समीक्षेचे नमुने मराठी अभ्यासकांना उपलब्ध होतील.

‘Makers of Indian Literature’ या मालिकेत अनेक मोठमोठे लेखक आजपर्यंत बाजूला राहिले. अशा सर्व भाषांतल्या मोठमोठ्या ‘राहून गेलेल्या’ लेखकांची यादी तयार करून त्यांच्यावर अग्रक्रमाने लिहावयाचा ठराव नेमाडे यांनी मंजूर करून घेतला. त्याचा फायदा मराठीतील विनोबा भावे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर इत्यादी वीस-पंचवीस तरी लेखकांसाठी झाला.

यांसारखी अनेकानेक साहित्योपयोगी कामे व उपक्रम नेमाडे यांनी भरपूर वेळ खर्च करून राबवले. दहा-बारा वर्षे साहित्य अकादेमीचे काम मराठी भाषेच्या प्रेमामुळे व तीवरील निष्ठेमुळे नेमाडे यांनी मनापासून पार पाडले. किंबहुना पुढील कार्यकर्त्या व्यक्तींना मार्गदर्शक ठरतील असे अनेकानेक कार्यक्रम त्यांनी केले. हे सहसा कोणाच्याही लक्षात येत नाही म्हणून येथे ही नोंद मुद्दाम केली आहे. त्यांच्या साहित्यनिर्मितीची पृथगात्मता आणि साहित्यक्षेत्रातील उपक्रमशीलता लक्षात घेऊन अगदी अलीकडे त्यांना दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांपैकी कोलकात्याच्या भारतीय भाषापरिषदेचा ‘कोलकाता कृतित्व समग्र सन्मान २०१९’ हा दीड लक्ष रुपयांचा आहे आणि नाडियादच्या संस्थेचा ‘गोवर्धनराम त्रिपाठी पुरस्कार’ हा एक लक्ष रुपयांचा आहे.

३.

जीवनाविषयीचा, समाजाविषयीचा, माणसाच्या जगण्याविषयीचा खोलवर जाऊन विचार केला पाहिजे, हे नेमाडे यांच्या ललित असो, की वैचारिक असो, लेखनामधून जाणवत राहाते. ‘हिंदू’मधून तर या जबाबदारीची जाणीव तीव्र प्रमाणात होते. साकल्याने जीवनाचा विचार करणारा नायक यारा कादंबरीच्या केंद्रस्थानी ठेवून समग्र जीवनाचा उभा-आडवा पट नेमाडे यांनी रेखाटला आहे. तो पाहताना त्यांचा नायक कसा व किती प्रगल्भ होत गेला आहे आणि लेखक म्हणून नेमाडे यांच्या लेखनालाही किती समग्रता प्राप्त झाली आहे ते ध्यानात येते. त्यांच्या साहित्यातून समकालीन व पूर्वकालीन जीवनसरणीवर व साहित्यावर जो अभिप्राय व्यक्त झाला आहे तो चिंतनीय आहे. तो कोणाला पटो, न पटो, साकल्याने विचार करताना तो टाळून पुढे जाता येत नाही. त्यांनी जी कादंबरीचिकित्सा केली, त्यांनी देशीवादाविषयी जी भूमिका मांडली, त्यांनी नीतिवादाचा जो आग्रह धरला, वेगवेगळ्या काळात जी साहित्यनिर्मिती झाली, तिच्या मर्यादा स्पष्ट करताना त्यांनी प्रच्छन्न रंजनवादाचा जो रहस्यभेद केला, त्या त्यांच्या मर्मग्राही मांडणीचे सामर्थ्य लक्षात न घेता कोणाही समंजस विचारवंतास पुढे जाता येणार नाही. त्यांनी जी मूल्यव्यवस्था मांडली, साहित्याच्या धर्माची जी उभारणी केली ती दिशादर्शक आहे व साहित्याच्या आकलनास व मूल्यमापनास साहाय्यभूत होणारी आहे. अस्सल साहित्याचे अंगभूत गुण स्पष्ट करणारी आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : साहित्यनिर्मिती ही झपाटणारी सुखद क्रिया आहे. पण ती बाळंतपणासारखी वेदनादायीदेखील आहे! लिहिताना मी एक स्त्री, माता होण्याचा अनुभव घेतो!

..................................................................................................................................................................

नेमाडे यांच्या आकलनाचा पल्ला अतिशय विस्तृत आहे. प्राचीन साहित्य-संस्कृती- इतिहास-समाजशास्त्र-तत्त्वज्ञान यांपासून अभिजात पाश्चात्य साहित्य-साहित्यतत्त्वविचार- संगीत-कलास्वाद-पुरातत्त्वशास्त्र-मानववंशशास्त्र इत्यादी विविध ज्ञानक्षेत्रांत त्यांच्या प्रतिभेचा अप्रतिहत संचार सुरू असतो. त्यांच्या ललित लेखनात येणारे संदर्भ आणि त्यांच्या समीक्षात्मक-वैचारिक लेखनातून व्यक्त होणारी मर्मदृष्टी हा त्यांच्या प्रतिभेइतकाच व्यासंगाचाही परिपाक आहे. कादंबरीकार हा ज्ञानवान असावा लागतो, तरच तो श्रेष्ठत्वास पोचतो, हे नेमाडे यांच्याकडे पाहिले म्हणजे ध्यानात येते. त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. एकंदर जीवनव्यवहाराचे जे ज्ञान त्यांना आहे ते, आणि साहित्य व सांस्कृतिक व्यवहाराची जी समज आहे, ती अपवादात्मक स्वरूपाची आहे, ती त्यांच्या मूळ साहित्यकृतींत सामावलेली आहे. त्यांचा मूल्यविचार लेखक म्हणून ते जी जबाबदारी मानतात तीतून स्फुरलेला आहे.

‘कोसला’, ‘चांगदेवचतुष्टय’ आणि ‘हिंदू’ हे नेमाडे यांचे कादंबरीलेखन वरवर पाहाता वेगळे भासत असले तरी त्या सर्वांत एक सलगता आहे. ग्रामीण, नागर, महानगरी अशा कोणत्याही वर्गवारीत न बसणाऱ्या या कादंबऱ्यांतून नेमाडे यांनी व्यापक अर्थाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचा खोलवर शोध घेतला आहे. या कादंबऱ्यांतील लहान-मोठ्या व्यक्तिरेखा भिन्न भिन्न जातीजमातींचे सांस्कृतिक संदर्भ प्रकट करणाऱ्या आहेत. त्यांमधून मानवी जीवनाचे, सामाजिक स्तरभेदांचे आणि सांस्कृतिक व्यवहारांचे अंतरंगदर्शन घडत राहाते. स्वतःला श्रेष्ठ समजून इतरांकडे तुच्छतेने पाहणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठितांच्या दांभिक वर्तनाचा परिस्फोट घडवणारे अनेकविध प्रसंग या कादंबऱ्यांनी साकार केले आहेत. या कादंबऱ्यांनी सातपुड्याचा परिसर, नर्मदा-तापीचा भवताल, खानदेश, पुणे, नगर, औरंगाबाद या शहरांतला प्रदेश आणि मुंबईचे पर्यावरण आपल्या अंतरंगात सामावून घेतले आहे. खेडे आणि शहर यांमधील मूलभूत अंतर सूचित करता करता तिथल्या समाजजीवनाच्या, चालीरीतींच्या, जातीजमातींच्या, स्थानिक राजकारणाच्या, व्यक्तिगणिक बदलणाऱ्या बोलीभाषेच्या आणि निसर्गसान्निध्याच्या नाना तऱ्हा आंतरिक वैशिष्ट्य व्यक्त करतील, अशा रीतीने मांडल्या आहेत. या दृष्टीने पाहिले म्हणजे मराठीत संस्कृतिनिष्ठ कादंबरी लिहिणारा एकमेव कादंबरीकार म्हणून भालचंद्र नेमाडे यांचे नाव घ्यावे लागते.

एकीकडे समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञानादी ज्ञानशाखांचा व्यासंग आणि दुसरीकडे ललित लेखक म्हणून त्यांना लाभलेली निर्मितिशीलता यांचा परिणाम त्यांच्या महाकाव्यात्म कादंबरीवर खोलवर झाला आहे. त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्यांच्यातील या सामर्थ्याचा चांगला गौरव झाला आहे, याचा मराठी भाषकांना निश्चितच अभिमान वाटेल.

४.

अशा समर्थ लेखकाच्या लेखनाची चिकित्सा करणारे लेख प्रस्तुत ग्रंथात चार विभागांत सादर केले आहेत. नेमाडे यांच्या प्रतिभेची अनेकांगी रूपे स्पष्ट करणारे लेख या ग्रंथासाठी जाणकार अभ्यासकांनी लिहिले आहेत.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : भाषा सर्वांचा सारखा हक्क मानणारी सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होतो!

..................................................................................................................................................................

एके काळी ‘ललित’ मासिकात ‘स्वागत’ या सदरासाठी स्वतः भालचंद्र नेमाडे यांनी स्वतःविषयी केलेले लेखन (जे आज सहजी उपलब्ध नाही ते) येथे आवर्जून दिले आहे. त्यामधून त्या काळच्या तरुण नेमाड्यांचे चित्र स्पष्ट होते. प्रतिभा नेमाडे यांच्या मुलाखतीतून उलगडले गेलेले ‘घरातले नेमाडे’ हे व्यक्तिदर्शन मराठीत पहिल्यांदाच घडते आहे. अंजली नेर्लेकर यांच्याशी झालेल्या संवादातून भालचंद्र नेमाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बहुविध पैलू प्रकट झाले आहेत. पहिल्यांदाच प्रसिद्ध होणाऱ्या या दोन्ही मुलाखती वाचकांना रोचक व उद्बोधक वाटतील.

नेमाडे यांच्या वैचारिक भूमिकेचा ऊहापोह करणारे प्राची देशपांडे, श्रुती तांबे, ज्ञानदा देशपांडे, अभय टिळक, अशोक बाबर, वसंत आबाजी डहाके, निशिकांत मिरजकर यांचे लेख नेमाडे यांच्या विचारविश्वाचा मागोवा घेणारे आहेत. अविनाश सप्रे यांनी वर्णन केलेली भालचंद्र नेमाडे यांची मराठी कादंबरीच्या क्षेत्रातील कामगिरी; नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीचे आकलन व्यक्त करणारे विलास खोले, प्राची गुर्जर-पाध्ये, अजय देशपांडे यांचे लेख; नेमाडे यांच्या कादंबऱ्यांतील निवेदक यारा विषयाची प्रतिभा कणेकर यांनी केलेली चर्चा; वसंत पाटणकर यांनी स्पष्ट केलेले नेमाडे यांच्या कवितेचे विशेष; आणि नेमाडे यांच्या समीक्षेविषयीचा हरिश्चंद्र थोरात यांचा अभिप्राय या सर्वांमधून नेमाडे यांच्या एकंदर साहित्यिक कार्यकर्तृत्वावर उत्तम प्रकाश पडतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ग्रंथाचा चौथा भाग नेमाडेरांच्या साहित्यकृतींच्या भाषांतरांसंबंधीचा आहे. ‘कोसला’च्या भाषांतरासंबंधी सुधाकर मराठे यांनी, ‘हिंदू’च्या अनुवादासंबंधी गोरख थोरात यांनी आणि नेमाडे यांच्या कवितेविषयी प्रदीप गोपाळ देशपांडे यांनी मांडलेली निरीक्षणे प्रस्तुत ग्रंथाच्या मौलिकतेत भर घालतात. एक लेखक म्हणून नेमाडे यांचा राजशेखर शिंदे यांनी घेतलेला वेध आणि रणधीर शिंदे यांनी उलगडलेले नेमाडे यांच्या लोकप्रियतेचे रहस्य नेमाडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सप्रमाण दर्शन घडवतात.

ग्रंथाच्या अखेरीस दिलेल्या नेमाडे यांच्या तपशीलवार व्यक्तिपरिचयातून नेमाडे यांची संपूर्ण कारकीर्द ध्यानात येते. त्यांच्यासंबंधीचे व्यक्तिविषयक लेख आणि त्यांच्या साहित्यकृतींच्या भाषांतरासंबंधीची मीमांसा ही या ग्रंथाचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. एक लेखक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी मराठी मानसात अतिशय कुतूहल आहे. त्यांचे लौकिक जीवन, त्यांच्या सवयी, त्यांचे स्वभावविशेष आणि त्यांच्या ठिकाणचा अंगभूत अतीव प्रेमळपणा याचे दर्शन त्यांच्या संबंधीच्या लेखनातून घडते. त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद त्या कृतींच्या भाषांतरांच्या मागणीतून व्यक्त होतो. त्यांच्या विचारविश्वाची व त्यांच्या सिद्धांतनाची मनमोकळी चिकित्सा भालचंद्र नेमाडे यांच्यावरील संबंधित लेखांतून प्रकटली आहे. तीही नेमाडे यांच्या समग्र आकलनाच्या दृष्टीने साहाय्यकारी ठरेल. या सर्वांमुळे प्रस्तुत ग्रंथाला भालचंद्र नेमाडे यांच्याविषरीच्या परिपूर्ण ग्रंथाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

..................................................................................................................................................................

‘भालचंद्र नेमाडे : व्यक्ती, विचार आणि साहित्य’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5224/bhalchandra-Nemade-Vyakti-Vichar-ani-Sahitya

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Sun , 27 September 2020

नेमाडे यांच्या कार्यास व अथक परिश्रमास अभिवादन. त्याची बरीचशी मते मला पटंत नाहीत. मात्र तरीही त्यांच्या धडपडीचा आदर आहे.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......