जॉर्ज फर्नांडिस १९४० ते २०१० अशा दीर्घ काळाचे सक्रीय साक्षीदार आहेत
ग्रंथनामा - झलक
निळू दामले
  • ‘सुसाट जॉर्ज’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 11 September 2020
  • ग्रंथनामा झलक सुसाट जॉर्ज Susat George निळू दामले Nilu Damle जॉर्ज फर्नांडिस George Fernandes

प्रसिद्ध पत्रकार निळू दामले यांचं ‘सुसाट जॉर्ज’ हे पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखकानं लिहिलेलं प्रास्ताविक आणि पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

चरित्र नावाचा एक दीर्घ काळापासून रूढ असलेला साहित्यप्रकार आहे. त्यात एखाद्या व्यक्तीचं सगळं जीवन चितारलेलं असतं. त्या व्यक्तीचं व्यक्तिगत जीवन, खाजगी जीवन, सार्वजनिक जीवन, व्यक्तीचे विचार, कर्तृत्व, व्यक्तीच्या वादग्रस्त बाजू इत्यादी गोष्टी चरित्रात सविस्तर असतात. त्यात खूप म्हणजे खूपच माहिती आणि पुरावे असतात. व्यक्ती जेवढी मोठी, तेवढा चरित्राचा आकार वाढत जातो. काही चरित्रांचे आकार अनेक खंड, हजारो पानं एवढाही असतो.

प्रोफाईल हे चरित्र नसतं. प्रोफाईल हे व्यक्तीचं स्केच असतं. प्रोफाईलमध्ये व्यक्तीचे महत्त्वाचे ठळक पैलू येतात. तेही मोजक्या रेषांचे फटकारे मारून तयार केलेल्या स्केचसारखे.

असंही म्हणत येईल की, प्रोफाईल हे पत्रकारीच्या जवळचं असतं. किंवा असंही म्हणता येईल की, ते साहित्य आणि पत्रकारी यांच्या सीमेवर असतं. त्यात माहिती असते, त्यात पुरावे असतात; पण त्यांची रचना अशा रीतीनं केलेली असते की, त्यात खूप अवकाश शिल्लक राहातो, वाचकाला स्वत:ला भरून काढता येईल असा.

माहिती पत्रकारीची आणि शैली साहित्याची.

अशा लेखनाचा परिचय इंग्रजी वाचकांना आहे. अलीकडच्या काळात खूप गाजलेले पत्रकार रिसझार्ड कापुश्‍चिन्सकी यांनी इराणचा शहा, खोमेनी, राजे हेले सेलासी यांची प्रोफाईल्स या शैलीत केली आहेत. पत्रकारी पद्धतीचं लिखाण असूनही कापुश्‍चिन्सकी यांना साहित्याचं नोबेल देण्याचं ठरलं होतं, त्यांचं निधन झाल्यानं ते हुकलं.

काळ वेगानं बदलतोय. वाचक आता नाना प्रकारे वाचतात, नाना प्रकारे मजकूर पहातात. मजकूर पाहायची सवय लागलीय आणि पटापट पुढं सरकायची सवय लागलीय. वाचक आणि लेखक एकाच काळात जगत असल्यानं लेखनाचं रूपही बदलतंय.

चरित्रंही लिहिली जातात, लिहिली जातील, लिहिली जायला हवीत. त्यांच्या सोबत प्रोफाईल्सही व्हायला लागलीयत.

कागदावर छापलेली पुस्तकं होताहेत, सेलफोन टॅबवर वाचायचं साहित्य निर्माण होतंय आणि कॉमिकच्या रूपात कादंबर्‍या वाचायला आणि पहायला मिळू लागल्याहेत.

‘सुसाट जॉर्ज’ हे एक प्रोफाईल आहे, असं म्हणावं.

..................................................................................................................................................................

जॉर्ज फर्नांडिस हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व होतं. ते १९४० ते सुमारे २०१०पर्यंतच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक वातावरणात घडले. त्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर होता, त्या वातावरणावर त्यांचा होता.

१९४० हा स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात आल्याचा काळ होता. जात आणि धर्म हे भारतीय समाजाला कप्प्यात घालणारे घटक आटोक्यात ठेवून स्वातंत्र्य चळवळ पुढं सरकत होती. परकीय राजकीय जोखडातून मुक्त झालो की, सुखी होऊ असं भारतीय माणसाला वाटत होतं. लोकांची आपलं दुःखं केवळ राजकीय पारतंत्र्यामुळंच आहे, अशी समजूत असावी. फुले आर्थिक आणि जातींचा प्रश्न मांडून गेले. रानडेंनी सामाजिक आणि आर्थिक विषय मांडला. आंबेडकर जातीय अन्यायाकडं लक्ष वेधत होते. आगरकरांनी सामाजिक सुधारणा व्हाव्यात असं म्हटलं. हे सारं घडलं असलं तरी जात, धर्म, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था हेही घटक आपल्याला दुःखी ठेवतात याकडं भारतीय माणसाचं दुर्लक्ष झालं होतं. आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवूया, मग पुढलं पुढं पाहू असा विचार भारतीय माणूस करत असावा. त्यामुळं ब्रिटिशांना हाकलून देण्यावर भर होता. कम्युनिष्ट, गांधीवादी, समाजवादी, भांडवलवादी असे विचार करणारे गट स्वातंत्र्य आंदोलनाच्या अवतीभोवती होते, परंतु स्वातंत्र्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशी असावी असा विचार पक्का झाला नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस, नेहरू, पटेल, गांधी इत्यादी माणसं देशाचं भलं करतील, असं बहुसंख्य लोकांना वाटत होतं. 

..................................................................................................................................................................

हेही वाचा : जॉर्ज फर्नाडिस : एकवचनी, एकबाणी

..................................................................................................................................................................

स्वातंत्र्य मिळालं. नेहरूंनी समाजवादी, मिश्र अर्थव्यवस्था अंगीकारली. त्यांनी उत्पादनासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी उपक्रम उभारले. धरणं, पोलाद निर्मिती इत्यादी. या उपक्रमात खूप गुंतवणूक झाली, पण तिची फळं मिळायला खूप वर्षं लागणार होती. १९४७ पासून ते चीनच्या युद्धापर्यंत म्हणजे १९६२ पर्यंतच्या काळात जनतेच्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी आवश्यक वस्तूंचं उत्पादन पुरेसं झालं नाही. वस्तूंची टंचाई झाली. महागाई झाली. टंचाई असली की, भ्रष्टाचार येतोच. त्यामुळे आणि इतर स्वतंत्र कारणांसाठी भ्रष्टाचार फोफावत गेला, भ्रष्टाचारानं राजकीय जीवन आणि सरकारी यंत्रणा व्यापली.

स्वातंत्र्य मिळालं की, सारं काही ठीक होईल ही सामान्य माणसाची भाबडी कल्पना १९६० नंतर धुळीस मिळाली. धड पायाभूत गोष्टीही तयार झालेल्या नाहीत आणि दैनंदिन गरजाही धड भागत नाहीत, अशा स्थितीत जनता वैतागली. आंदोलनं सुरू झाली. आर्थिक विकासाचे सरकारनं केलेले प्रयत्न अपुरे ठरत होते, लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या आणि त्या पूर्ण होत नव्हत्या.

१९६५-६६ सालापर्यंत देशात विरोधी पक्ष संघटित झाले. स्वातंत्र्य काळात दबलेल्या लोकभावना विविध राजकीय पक्षांच्या रूपात फोफावल्या. कम्युनिष्ट (शेका, लाल निशाण गट, शेतकरी कामगार पक्ष, नक्षलवादी इ.छटाही), समाजवादी, हिंदुत्ववादी (जनसंघ) हे तीन मुख्य प्रवाह होते. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक दोषांमुळं, केंद्रीय नेतृत्वाच्या हातात पक्षाची सत्ता केंद्रीत झाल्यानं काँग्रेसमधून माणसं बाहेर पडू लागली, त्यातल्याच काही लोकांनी स्थानिक पक्ष निर्माण केले, वाढवले. दोन द्रमुक, तेलुगु देसम, शिवसेना, गणसंग्राम परिषद, पटनाईकांचं बिजू दल, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस अशा रीतीनं प्रादेशिक पक्ष तयार होत गेले. स्थानिक संस्कृती आणि वेगळेपणही या पक्षांतून प्रकट होत गेलं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

१९६७च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसेतर पक्ष आणि स्थानिक पक्षांनी काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभव पत्करायला लावला, विरोधी आघाड्या तयार करून सत्ता हस्तगत केली. विरोधी पक्षाच्या आव्हानाला तोंड देण्याच्या नादात इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. त्यातून वातावरण  चिघळलं, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली फुटीर काँग्रेस, समाजवादी, जनसंघ हे मोठे पक्ष एकत्र झाले. त्यातून १९७७ मध्ये देशातलं पहिलं बिगर काँग्रेस सरकार केंद्रात स्थापन झालं.

१९६७ आणि १९७७मध्ये विरोधी पक्षांच्या हातात सत्ता गेली खरी, पण देशाची परिस्थिती सुधारली नाही. विरोधी पक्षांच्या खिचडीकडं पर्यायी धोरणं नव्हती, अर्थव्यवस्था सुधारण्याचं कसब आणि क्षमता नव्हती. त्यामुळं कधी विरोधी पक्षांची खिचडी, तर कधी काँग्रेसनं तयार केलेली खिचडी अशी सरकारं तयार होत राहिली. देशाचे आर्थिक आणि सर्वच प्रश्न लोंबकळत राहिले. १९९१मध्ये बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीत नाईलाजानं काँग्रेसनं आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण स्वीकारलं. पण त्यात नाईलाजच जास्त होता, आर्थिक धोरण काँग्रेसनं मनापासून स्वीकारलं नव्हतं, ते अमलात आणण्याचे निरलस प्रयत्न काँग्रेसनं केले नाहीत.

काँग्रेसला पर्यायी देशव्यापी पक्ष हवा असं जनता म्हणत असे. समाजवादी, फुटीर काँग्रेसी, कम्युनिष्ट इत्यादी पक्षांना देशव्यापी पर्याय देणं जमलं नाही. जनसंघानं सावधपणे, नीट आखणी करत, इतर पक्षांचा परांचीसारखा वापर करत करत केंद्रात सत्ता मिळवली. १९९८ ते २००४ सालापर्यंत भाजपनं इतर पक्षांची मदत घेत घेत स्वतःची ताकद वाढवली. काँग्रेसनं निकराचा प्रयत्न करून २००४ साली कशीबशी सत्ता मिळवली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुस्तकाचा विषय असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी १९९८ ते २००४ पर्यंत भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. २०१०पर्यंत काँग्रेनं कशीबशी सत्ता टिकवली. २००४ सालापासून जॉर्ज फर्नांडिस यांची प्रकृती ढासळू लागली. त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदींनी भाजपला निर्णायक बहुमत मिळवून दिलं आणि २०१९च्या निवडणुकीत ते बहुमत आणखी वाढवलं. परंतु या घटनामध्ये २००४ सालापासून फर्नांडिस यांचा वाटा नगण्य होता.

१९४० ते २०१० या काळात भारताची आर्थिक परिस्थिती संथ गतीनं चालली, रोजगार-विषमता-गरिबी या समस्या शिल्लक राहिल्या, त्यात थोडासा फरक पडला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या सांस्कृतिक-जातीय-धार्मिक समस्या या काळाच्या उत्तरार्धात उफाळल्या. सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीनं वरील सर्व समस्या सोडवायचा आणि सुटू न द्यायचा प्रयत्न करत राहिले.

१९४० ते १९४७ ते २०१० हा काळ भारतीय इतिहासातला तीव्र घडामोडींचा काळ ठरला. सेक्युलर आणि सांस्कृतिक या दोन घटकांत समाजाच्या समस्या विभागता येतात. या दोन्ही बाबतीत जॉर्ज आग्रही होते, बोलत होते, पोटतिडिकीनं वागत होते.

१९४० ते १९९६ या काळात जॉर्ज सामान्यतः समाजवादी होते, काँग्रेसविरोधी होते, जनसंघविरोधी होते. १९९६ साली समता पार्टी स्थापन करून जॉर्जनी भाजप या पक्षाबरोबर वाटचाल सुरू केली. म्हणजे त्यांचा काँग्रेस विरोध टिकला, जनसंघ-भाजप विरोध मावळला.

जॉर्ज फर्नांडिस १९४० ते २०१० अशा दीर्घ काळाचे सक्रीय साक्षीदार आहेत.

..................................................................................................................................................................

‘सुसाट जॉर्ज’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5226/Susat-George

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......