प्रेमाच्या अमृते रसना ओलावली (व्हलप्चस ते उमामी ते काहीतरी ‘निराकार’पर्यंत)
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 26 August 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध कामुक Voluptuous उमामी Umami

शब्दांचे वेध : पुष्प पाचवे

“The asparagus appeared. They were enormous, succulent, and appetizing. The smell of the melted butter tickled my nostrils as the nostrils of Jehovah were tickled by the burned offerings of the virtuous Semites. I watched the abandoned woman thrust them down her throat in large voluptuous mouthfuls, and in my polite way I discoursed on the condition of the drama in the Balkans.”

काही काही शब्द, वाक्ये, उगीचच मनात दीर्घ काळ रेंगाळत राहतात. काही तर अमीट ठसा उमटवून जातात. वर उदधृत केलेल्या इंग्रजी परिच्छेदातला ‘व्हलप्चस’ किंवा ‘व्हलप्शस’ (voluptuous) हा शब्द तसाच आहे. मी प्री-युनिव्हर्सिटी म्हणजे आजच्या अकरावीच्या वर्गात असताना ४८ वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा वाचला होता. आम्हाला इंग्रजीच्या क्रमिक पुस्तकात विल्यम समरसेट मॉमची ‘The Luncheon’ ही कथा अभ्यासासाठी होती, त्यात हा शब्द होता. त्या पुस्तकातले आज बाकीचे इतर काही फारसे आठवत नाही, पण मॉमची ही गोष्ट आणि त्यातही, त्यात त्याने केलेली ही शब्दरचना का कोण जाणे, मला कायमची स्मरणात राहिली.

‘Voluptuous mouthfuls’ म्हणजे तोंड भरून घेतलेले मोठमोठे घास (म्हणजे लचके तोडणे ज्याला म्हणतात तसे!), असे एवढेच त्या वेळी आमच्या इंग्रजीच्या सरांनी सांगितले होते. मराठी शाळेच्या इंग्रजी माध्यमातून मॅट्रिक झाल्यामुळे तोवर माझे अवांतर इंग्रजी वाचन फार कमी झाले होते. मॅट्रिकनंतर मी खऱ्या अर्थाने इंग्रजी वाचनाला सुरुवात केली. साहजिकच तेव्हा इंग्रजीचा शब्दसंग्रहसुद्धा मर्यादितच होता. त्यामुळे ‘voluptuous’ या शब्दाला आणखी काही कंगोरे असतील, हे तेव्हा माझ्या लक्षातही येणे शक्य नव्हते.

पण पुढे एक-दोन वर्षांतच मी वुडहाऊसच्या प्रेमात पडलो आणि त्याचा शब्दनशब्द समजून घेण्याच्या नादात पुढची काही वर्षे अफाट इंग्रजी वाचन केले. त्यामुळे ‘voluptuous’ या शब्दाला असलेली कामुक अर्थच्छटादेखील लक्षात आली. या शब्दाचे शब्दकोशात असे अर्थ सांगितले आहेत : १) Having strong sexual appeal (‘a voluptuous woman’'); २) (of a woman's body) having a large bosom and pleasing curves (‘Hollywood seems full of voluptuous blondes’); आणि ३) Displaying luxury and furnishing gratification to the senses (‘Lucullus spent the remainder of his days in voluptuous magnificence’). मॉमने त्याचा आणखी एका अनोख्या प्रकारे वापर केला. ही कथा वाचताना त्या बाईचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि तिने त्या ‘अ‌ॅस्परॅगस’ (शतावरी)चे आधाशासारखे कसे लचके तोडले असतील, याची आपण कल्पना करू शकतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

‘Voluptuous’ला इंग्रजीत बरेच प्रतिशब्द आहेत : luscious, delectable, scrumptious, इत्यादी. गंमत म्हणजे बहुतांश पुरुषांसाठी ऐहिक उपभोगाच्या ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात (स्त्री आणि चमचमीत भोजन) त्यासाठी हे शब्द पर्याय म्हणून वापरले जातात. पण रसना आणि वासना तृप्त करणारी असा अर्थ ‘voluptuous’मधून जितक्या ताकदीने व्यक्त होतो, तितका तो अन्य शब्दांतून होत नाही. ‘Voluptuosus’ या मूळ लॅटिन शब्दापासून (जो ‘voluptas’ किंवा ‘pleasure’ - सुख - पासून बनला) प्राचीन फ्रेंच भाषेत ‘voluptueux’ हा शब्द तयार झाला आणि तिथून त्याने मध्यकालीन इंग्रजीत ‘voluptuous’ बनून प्रवेश केला. मराठीत आपण त्याचे संदर्भानुसार ‘कामुक’, ‘ऐहिक’, ‘विलासी’, ‘आकर्षक’, असे भाषांतर करू शकतो.

विलासी खाण्यापिण्याच्या आणि श्रृंगाराच्याबाबत युरोपातले राजेरजवाडे, अमीर-उमराव काय किंवा भारतातले काय, कोणीच कमी नव्हते. (आजचे नवश्रीमंत लोकही काही कमी नाहीत!). अशा लोकांना इंग्रजीत ‘voluptuary’, ‘epicurean’, ‘hedonist’ (a person addicted to luxury and pleasures of the senses) अशा विविध नावांनी ओळखले जाते. Charles Maurice de Talleyrand-Périgord (तालिरां) या नावाचा एक फ्रेंच राजकारणी दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेला. तो आजही इतर गोष्टींपेक्षा त्याच्या विलासी जेवणावरच्या प्रेमासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे एक गाजलेले वाक्य आहे : “Show me another pleasure like dinner which comes every day and lasts an hour.” (रोज मिळणारे आणि प्रत्येक वेळी एक तासभर टिकणारे दुसरे काही सुख असेल तर ते मला दाखवा). तालिरां हा स्त्रीलंपटदेखील होता. म्हणून तो खऱ्या अर्थाने ‘voluptuary’ (चैनी आणि विषयासक्त) होता. फार दूरचा इतिहास बघण्याची गरज नाही. भारतात आजच्या पंजाबातली कपूरथला आणि पटियाला ही एके काळी संस्थाने होती. तिथले महाराजे त्यांच्या अशाच ऐय्याशीबद्दल (कु)प्रसिद्ध होते. पेशवाईतल्या थाटामाटाच्या जेवणावळीसुद्धा अपार गाजल्या होत्या. ग. दि. माडगूळकरांनी त्यांची ही खुमासदार कविता या शाही मेजवान्यांवरच तर लिहिली नसेल ना?

काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती

धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले

आले लोणचे बहु मुरलेले, लिंबू कागदी रसरसलेले

किसुन आवळे मधुर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले

खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले

चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनचि त्यांचे भरले

(ही कविता या ठिकाणी वाचता येईल.)

जे नुसतेच आधाशासारखे खादाडी करतात त्यांना इंग्रजीत ‘ग्लटन’ (glutton) म्हणतात. मात्र ‘चवीने खाणार त्याला देव पण देणार’ अशीही म्हण आहे. चवीचवीने खाणाऱ्यांचे ‘गुर्मे’ (gourmet) आणि ‘गुर्मांड’(gourmand) असे दोन भेद आहेत. पट्टीचे खवय्ये दोघेही असतात, पण ‘gourmet’ माणूस रसिकतेने, नज़ाकतीने खातो. तो अतिरेक होऊ देत नाही, तर ‘gourmand’ पोटाला तड लागेपर्यंत खातो.

खऱ्या जगात अनेक ‘celebrity chefs’ होऊन गेलेत आणि आहेत पण. (एकेकाळी आपण मराठी - हिंदीत यांना स्वयंपाकी, खानसामा, बावर्ची, आचारी, बल्लव, अय्या, पंडत, महाराज, रसोईया, अशा विविध नावांनी ओळखत होतो. इंग्रजीत ‘कुक’ (cook) म्हटले की काम भागायचे. आता संजीव कपूरला किंवा तरला दलालला कोणी कुक म्हणून दाखवा बरे! त्यांचे समर्थक ‘कुकूच कू’ करून तुम्हाला टोचायला धावत सुटतील. आज ही सगळीच्या सगळी संबोधने जवळपास अप्रचलित झाली असून आता एकच नाव (सर्वांना पुरून) उरले आहे – ते म्हणजे ‘शेफ’ (chef). फ्रेंचांनी जागतिक पाकगृहांवर मिळावलेला हा विजयच आहे.)

काल्पनिक जगात मात्र दोनच शेफ आजच्या घटकेला प्रसिद्ध आहेत - एक म्हणजे आपले ‘झी मराठी’ टीव्ही चॅनेलचे अभिजीत राजे, आणि दुसरा आहे पी. जी. वुडहाऊसच्या जीव्हज् - वूस्टर या ग्रंथमालिकेतला आनातोल. अभिजीत राजेचे ‘शेल्फ लाईफ’ (Shelf life) म्हणजे उपयुक्ततेचा अवधी किती असेल हे सांगता येत नाही, पण अनातोल हा अजरामर आहे. आनातोल खराखुरा फ्रेंच आहे. आपले नशीब आजमावण्यासाठी तो इंग्लंडला आला आणि बर्टी वूस्टरच्या डेलिया आत्त्याच्या घरी जो शिरला, तो तिथेच कायमचा स्थिरावला. डेलियाच्या परिवारातल्या सर्वांचाच तो लाडका आहे - पण त्याचा निस्सीम भक्त आहे बर्टी वूस्टर. आनातोलने शिजवलेल्या खास खास फ्रेंच पाककृतींवर बर्टी जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. म्हणूनच डेलिया त्याला ब्लॅकमेल करू शकते. ‘माझे काम कर, नाहीतर तुला मी आनातोलच्या डिशेस खायला घरी येऊ देणार नाही’, अशी तिने नुसती धमकी द्यायचा अवकाश, की बर्टी सुतासारखा सरळ होतो आणि आत्त्याचे काम करतो (मग ते कितीही दुष्कर का असे ना!). बर्टीच्या मते आनातोल हा देवाने (माणसातल्या) वैश्वानराला दिलेली देणगी आहे. (God's gift to gastric juices). बर्टी हा तालिरांच्या विरुद्ध आहे. तो चवीचवीने खाणारा ‘गुर्मे’ (gourmet) आहे, क्वचित ‘gourmand’ पण आहे; मात्र तो ‘glutton’ खचितच नाही आणि ‘voluptuary’ तर नाहीच नाही.

इंग्रजांनी फ्रेंच लोकांचा अतोनात दुस्वास केला. (आजही करतात.) या दोन्ही देशांमधले वैर ऐतिहासिक आहे, अगदी हजार वर्षांहून अधिक काळापासूनचे. अनेक बाबतीत इंग्रज त्यांच्या पुढे गेलेत. पण एका बाबतीत मात्र फ्रेंचांनी इंग्रजांना चारही मुंड्या चित केलेले आहे - ते म्हणजे पाकक्रिया. म्हणूनच फ्रेंच शेफ स्वयंपाकघरात असणे, त्याच्याकडून विलासी काँटिनेंटल पदार्थ करून घेणे, फ्रेंच वाईन्स पिणे, हा इंग्रजांसाठी आपला घरंदाजपणा, आपले वैभव, आपली सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्याचा एक मापदंड ठरला आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : वात्सल्य, पान्हा, पदर, अंकल, आण्टी आणि बरेच काही…

..................................................................................................................................................................

इंग्रजांचा स्वयंपाक ‘bland’ म्हणजे सपक, अळणी, फिका असतो. तर फ्रेंच भोजन म्हणजे गदिमांनी वर्णिलेली रुचकर पंगतच असते जणू. मात्र फ्रेंच पदार्थांची नावे फॅन्सी म्हणजे उगीचच वेगळी, खोटी चमक धमक असलेली असतात. त्या नावांना भुलून जाण्यात काही अर्थ नाही - पंचतारांकित हॉटेलात गेल्यावर ‘Hors d’oeuvres’ (ओदव्र्ह ओ-द-व्र्ह) या शब्दांचा उच्चारही ज्याला करता येत नसेल त्याने सरळ ‘क्षुधावर्धक’ पदार्थ (appetisers) मागवावेत. टमेटो सूप वगैरे. (मराठी ‘टमाट्या’ला इंग्रजीत ‘टमेटो’ म्हणायचे की ‘टोमॅटो’ हा मूळ इंग्रजी भाषिकांसाठीही वादाचा विषय आहे.

‘You Say 'Tomato', I say 'Tomato' हे गाणे जरूर ऐका. इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये एकाच शब्दाचे कसे भिन्न उच्चार होतात, यावरचे हे विनोदी भाष्य आहे.

फ्रेंच शेफ आपले पदार्थ स्वादिष्ट आणि चविष्ट व्हावेत म्हणून त्यात कोणते सिक्रेट मसाले टाकतात, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! विविध प्रकारच्या ‘spices’, ‘condiments’ आणि ‘sauces’च्या भरोशावरच तर त्यांचे पाकविश्व साकार होते. पण त्यांना आपल्या भारतीय पदार्थांची सर नाही बुवा. सगळ्या जगातल्या मानवप्राण्यांना एकाच प्रकारच्या स्वादकलिका किंवा रुचिज्ञानकलिका (जिभेच्या पृष्ठभागावर असणाऱ्या, पदार्थाची चव ओळखणाऱ्या ज्ञानपेशी अथवा ‘taste buds’) मिळाल्या असतानाही असे डावे-उजवे का होत असेल?

..................................................................................................................................................................

हेही वाचा : वाईट किंवा अपशब्दांची भीती वाटणे म्हणजे ‘कॅकोलोगोफोबिया’

..................................................................................................................................................................

स्वाद, रसना, चव, रुची सर्वत्र सारख्याच प्रकारच्या असतात. त्यांची नावे मात्र भाषांपरत्वे बदलत जातात, असे आपण आत्ता-आत्तापर्यंत समजत होतो. गोड (sweet), खारट (salty), आंबट (sour), कडू (bitter), तिखट (hot, pungent) आणि तुरट (astringent), या सहा चवी आयुर्वेदामुळे आपल्याला ठाऊक होत्या. मात्र आता आधुनिक पाश्चात्य विज्ञानाने या समजुतीत बदल करवला आहे. आजच्या शास्त्रज्ञांनी तिखट (hot, pungent) आणि तुरट (astringent) या चवींना नाकारले आहे. (जशी प्लुटो ग्रहाची २००६ मध्ये नवग्रहांच्या रांगेतून पदावनती करण्यात आली, तसेच.) त्यांच्या मते (sweet), खारट (salty), आंबट (sour), कडू (bitter) आणि उमामी (umami) या पाचच प्रकारच्या चवी आहेत.

हो, उमामी. आता हा कोणता नवा स्वाद आहे, असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर अगदी साधे आहे. ‘उमामी’ (umami) हा मूळचा जपानी शब्द आहे आणि जपान्यांना ही चव आधीपासूनच माहीत होती म्हणे! पाश्चात्य शास्त्रज्ञांना हे जेव्हा कळले, तेव्हा ते एकमुखाने ओरडले, यूरेका, नवा शोध. नवी चव. आणि मग इंग्रजी भाषेत भर पडली एका नव्या शब्दाची – ‘उमामी’.

स्वाती केळकर म्हणतात की, “उमामी उर्फ चमचमीत (savoury, सेव्हरी) ही चव अजि-नो-मोतो कंपनीच्या जपानी शास्त्रज्ञांनी शोधली आहे. या ब्रॅंडनेमचा जपानी भाषेतला अर्थ ‘चवीचे मूळ’ असाही होतो. नूडल्स करताना त्यात सोया सॉस आणि मोनो सोडियम ग्लुटामेट उर्फ अजि-नो-मोतो घातल्यामुळे नूडल्स चटपटीत म्हणजेच उमामी होतात.” तर विकीपिडिया असे सांगते की, “A loanword from the Japanese, umami can be translated as ‘pleasant savory taste.’ This neologism was coined in 1908 by Japanese chemist Kikunae Ikeda from a nominalization of umai ‘delicious’. ”

आता मला एक कळत नाही; दीड-दोनशे वर्षं भारतात राहूनही इंग्रजांना आपल्या चमचमीत (savoury सेव्हरी) पदार्थांना आपलेसे करता आले नाही, आपल्या तिखटाला तर ‘हॉट, हॉट’ (hot hot) आणि ‘हट-हट’ करत त्यांनी हात हात दूर ठेवले, मात्र जपानने तशीच चव दाखवल्यावर ते एवढे का खुश झाले असतील? आणि तुरट चवीने तरी त्यांचे काय बिघडवले असेल? (तिकडे इंग्लंडमध्ये याच गोऱ्यासाहेबांची आजची पिढी समोसा, कचोरी, करी, बाल्टी चिकन, अशा झणझणीत पदार्थांवर तुटून पडते, ती बाब वेगळी!)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रडयर्ड किपलिंगच्या ‘In the Rukh’ या नावाच्या कथेमध्ये एका जर्मन माणसाच्या तोंडी एक वाक्य आहे, त्याची मला आठवण आली- “Muller’s deep voice was coming out of the darkness behind the firelight as he bent over the shoulders of his pet cook. ‘Not so much sauce, you son of Belial! Worcester sauce he is a gondiment and not a fluid.”

हे ‘gondiment’ (खरा शब्द condiment) म्हणजे सीजनिंग, मसाला, इत्यादी. एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपली आई, आजी जे काही तरी चिमूटभर रसायन त्यात घालते ना, ते. या रसायनाला इंग्रजीत ‘condiment’ भलेही म्हणा, पण मराठीत यापलीकडचेही आणखी काही तरी एक खास आहे. हे ‘काहीतरी’ निराकार असते, अदृश्य असते. माझ्या आईच्या ‘हातची चव’ तू केलेल्या या पुरणपोळीला नाही, असे बायकोला ठासून (किंवा घाबरत घाबरत) इंग्रजीत तुम्ही कधी सांगितले आहे का? मी तरी नाही, कारण त्या ‘हातची चव’चा इंग्रजी भाषेत अनुवाद होऊ शकत नाही. ही ‘हातची चव’ म्हणजेच ते ‘काहीतरी खास’, निराकार, अदृश्य, अवर्णनीय. ‘प्रेमाच्या अमृते रसना ओलावली’ असे म्हणतात, ते अमृत हेच असेल का?

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vikram Kulkarni

Wed , 26 August 2020

Enjoyed the latest from Harshawardhan. This one about the Voluptuous fits nicely into the the genre he has devised in which interesting info , titbits are provided in entertaining fashion..! A Umami combination indeed ! Looking forward to more !!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......