हे पुस्तकं वाचून वन्यजीवांवर प्रेम करणाऱ्यांची मानसिकता, त्यामागची संवेदनशीलता याची ओळख होईल!
ग्रंथनामा - झलक
मृणालिनी चितळे
  • ‘रंगुनी रानात साऱ्या’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 August 2020
  • ग्रंथनामा झलक रंगुनी रानात साऱ्या Ranguni Ranat Sarya मृणालिनी चितळे Mrunalini Chitale

राजेश ठोंबरे या जगावेगळ्या माणसाबरोबर रानावनात पिरून उलगडलेला त्याचा जीवनकार्यपट म्हणजे ‘रंगुनी रानात साऱ्या : राजेश ठोंबरे सखा वन्यजीवांचा’ हे पुस्तक. राजहंस प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लेखिकेने लिहिलेले हे मनोगत...

..................................................................................................................................................................

‘मेळघाटावरील मोहर’ हे डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांच्यावर मी लिहिलेलं पुस्तकं प्रसिद्ध झालं. त्यानंतर डॉक्टर कोल्हे यांचे मित्र डॉक्टर अविनाश सावजी मला भेटायला आले, तेव्हा म्हणाले, “तुम्ही एकदा राजेश ठोंबरेला भेटा आणि त्याच्यावर लिहा. तो सर्पमित्र आहे.” सर्पमित्र म्हणल्यावर मी दुर्लक्ष केलं. ‘सर्पमित्र’ हे एक मिथक आहे असा माझा समज होता. ज्या प्राण्याला आपल्या माणसाला ओळखण्याइतपतसुध्दा बुद्धी नाही, तो प्राणी कुणाचा मित्र कसा होणार? उलट ‘सापाला कितीही दूध पाजले तरी तो गरळच ओकणार’ यासारखे विचार मला पटले होते.

साप हाताळताना झालेले मृत्यू, गमवावा लागलेला शरीराचा अवयव अशी उदाहरणं माझ्या परिचित व्यक्तींच्या संदर्भात घडली होती. त्यामुळे मी या विषयाकडे वळण्याची शक्यता नव्हती. परंतु डॉ. सावजी यांनी राजेश ठोंबरे यांच्या मुलाखतीच्या काही सीडीज मला पाठवल्या. त्या मी पहिल्या. राजेश ठोंबरे या व्यक्तीविषयी माझ्या मनात कुतूहल जागं झालं. त्यांना निदान एकदा भेटून यायचं असं मी ठरवलं. वेळ ठरवून मी आणि माझे पती चिंतामणी चाळीसगावला गेलो. तीन दिवस आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी ज्या वस्त्यांमध्ये काम केलं आहे, त्या गौताळा भागात फिरलो, लोकांना भेटलो.

राजेश यांचं काम समजून घेताना लक्षात यायला लागलं की, आपल्या समाजसेवेच्या कल्पना किती साचेबद्ध आणि शहरी आहेत ते. शिक्षण, आरोग्य, दारिद्रय निवारण अशा क्षेत्रांत झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्ती मला माहीत होत्या, परंतु वन्यजीवांपासून माणसांना वाचवण्यासाठी आणि माणसांपासून वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी काम करणारी, नुसतं काम करणारी नाही तर ते आणि तेवढंच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे, असं समजून जगणारी व्यक्ती राजेश यांच्या रूपानं मला पहिल्यांदा भेटत होती.

साप या प्राण्याविषयी राजेशच्या नजरेतून जाणून घेताना लक्षात आलं की, आपल्या देशात साप चावून फार मोठ्या प्रमाणात माणसं मरतात आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारला जाणारा दुसरा कुणी वन्यजीव नसावा.

पुस्तक लिहायचं ठरविल्यावर याचा प्रत्ययही आला. पुण्याजवळच्या गावकोस या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही सहलीला गेलो होतो. तिथं काम करणाऱ्यांपैकी एकाची चार वर्षांची मुलगी अतिशय चुणचुणीत होती, त्यामुळे आमच्या लक्षात राहिली. सहाएक महिन्यांनी आम्ही परत तिथं गेलो असता, साहजिकच तिची चौकशी केली. तेव्हा ती साप चावून गेल्याची माहिती तिच्या आईनं दिली. पुण्याच्या इतक्याजवळ असून तिला वेळेवर उपचार उपलब्ध होऊ शकले नाहीत, हे वास्तव पचवणं अवघड गेलं.

दुसरा प्रसंग डेक्कन जिमखाना परिसरात भर वस्तीत घडलेला. माझ्या मैत्रिणीच्या घरात साप शिरला. तिनं तिच्या नातवाची क्रिकेटची बॅट घेतली आणि जागच्या जागी त्याला ठेचून टाकलं. या दोन्ही प्रसंगातील कठोर वास्तव केवळ राजेश यांच्याशी झालेल्या परिचयामुळे मला तीव्रतेनं जाणवलं. एकीकडे साप चावून माणसं मरत आहेत आणि दुसरीकडे घरात शिरलेला साप विषारी आहे का, बिनविषारी हे ओळखता न येण्यातील अज्ञान आहे किंवा तो आपणहून हल्ला करत नाही, हे माहीत असूनही साप दिसला की मारून टाकण्याची रुजलेली मानसिकता आहे.

या पार्श्वभूमीवर ‘साप वाचवा, माणसं वाचवा’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या राजेशच्या कामाचं वेगळेपण आणि आवशक्ता प्रकर्षानं जाणवली.

त्यांच्याशी संवाद साधताना ‘साप’ या प्राण्यानं त्यांच्या जगण्याचा फार मोठा भाग व्यापला आहे, हे जाणवत होतं. त्याच वेळी माणूस म्हणून ते कसे घडत गेले, स्वत:ला घडवत गेले हे जाणून घेणं औचित्यपूर्ण ठरलं. घरच्या गरिबीमुळे झालेली अन्नान्नदशा. हातातोंडाची गाठ पडावी म्हणून त्यांनी शोधलेले अतर्क्य मार्ग. पुजाऱ्याच्या घरात वाढत असताना स्वतंत्रपणे जपलेली नास्तिक विचारधारा. लोकाधारावर घर चालवताना मनात येऊ न दिलेली मिंधेपणाची भावना आणि कितीतरी... त्यांच्या कामाखेरीजची त्यांची ही जीवनवैशिष्ट्ये मला तितकीच वेगळी वाटली. जगापुढे यावीत इतकी महत्त्वाची वाटली.

राजेश यांच्या कामाचा आवाका समजून घेण्यासाठी मी वारंवार चाळीसगावला गेले. कुणाच्या घरात पकडलेला साप लवकरात लवकर त्याच्या अधिवासात सोडायची त्यांची तळमळ पाहिली. कुणाही जखमी प्राणीपक्ष्याकडे पहायची त्यांची संवेदनशील वृत्ती अनुभवली. त्यांच्या घरातील गच्चीत गुण्यागोविंदाने नांदणारे चौदा कुत्रे पाहून अवाक झाले. त्यांच्या बरोबर डोंगरदऱ्यांमध्ये भटकले.

राजेशबरोबर केलेल्या भटकंतीमुळे विविध स्तरांतील अनेक माणसं भेटली. गौताळा भागात जाण्यासाठी घाटातील अवघड वळणं पार करत आम्ही डोंगर पठारावर पोचलो, तेव्हा संध्याकाळची वेळ होती. इथे कुणी राहत आहे का नाही अशी शंका यावी अशी ती जागा होती. पाच-पंचवीस घरांच्या वाड्या-वस्त्या. परत दोन वस्त्यांमध्ये भरपूर अंतर. ‘दादा’ तिथं पोचल्याचं कळलं आणि बघता-बघता आमच्या भोवती माणसं गोळा झाली. प्रत्येक घरातील कुणाला ना कुणाला साप चावल्याचा अनुभव आला होता. त्यातील प्रत्येकाला आम्हाला काही ना काही सांगायचं होतं.

२२-२३ वर्षांच्या गोपीबाईला डोक्यावर हंडा घेऊन जाताना हिरवा घोणस चावला होता, तर ग्यानबाला मण्यार चावल्यावर चाळीसगावला नेताना इतके झटके यायला लागले की, मोटरसायकल पडेल का काय असं वाटायला लागलं. बेबीताईनं चार वेळा साप चावल्याचा अनुभव घेतला होता, तर बारकूच्या घरातील पाच जणांना दंश केला होता. त्यातील बहुतेक जणांनी शर्ट फाडून वा दुपट्टा गुंडाळून जागच्या जागी प्रथमोपचार करून मग चाळीसगावला धाव घेतली होती. तिथं पोचण्यासाठी कुणी कांदे भरलेला ट्रक आडवला होता, तर कुणी तिसऱ्याची मोटरसायकल वापरली होती. वाहन करून ही माणसं दवाखान्यात न जाता प्रथम दादाच्या घरी जायची. कारण थेट दवाखान्यात गेलं तर भरती करून घेतील याची शाश्वती नसायची. दादा दंश झालेली जागा पाहून उपचार करायचा, दवाखान्यात न्यायचा... काय सांगू आणि कितीकिती सांगू असं त्यांना झालं होतं. ‘दादा म्हणजे आमचा मायबाप आहेत, देव आहेत.’ असे उल्लेख तर वारंवार येत होते.

गौताळाच्या पठारावर सर्पदंशाचा जिवंत अनुभव सांगणारी माणसं मला भेटली, तर पाटणादेवी अभयारण्य परिसरात निसर्गाचं अनाघ्रत रूप अनुभवता आलं. तिथं जाताना गाडीमध्ये बरणीत बंदिस्त केलेला नाग बरोबर होता. त्याला त्याच्या अधिवासात सोडायचं होतं. त्याच्यासाठी एक चांगलंसं झाड पाहून गाडी थांबवली. झाडाजवळ जाऊन राजेशनं बरणीचं झाकण उघडलं. नागोबानं हळूच डोकं बाहेर काढून सभोवार सावधपणे बघितलं. मग फणा काढला आणि झपकन समोरच्या फांदीवर झेप घेतली. बघता-बघता झाडाच्या वरच्या टोकाला तो पोचला. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? सरसरत तो खाली उतरला नि झाडालगतच्या पाला-पाचोळ्यात दिसेनासा झाला.

राजेशच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याच्या भावना होत्या. त्यांच्याबरोबर फिरताना त्यांचा फोन अखंड वाजत होता. सर्पदंश झाला म्हणून सल्ला विचारण्यासाठी दूरदूरहून फोन येत होते. एक फोन आला तो केदारकुंड धबधब्यात कुणी मुलगा पडला आहे ही घटना सांगण्यासाठी. राजेशनं फोनवर संपर्क करण्यापूर्वी कैलासगुरुजी तिथं पोचले असल्याचं कळलं. कैलासगुरुजी म्हणजे त्या भागातील राजेशच्या खास मर्जीतले वनमजूर. राजेशचा उजवा हात. अर्ध्या तासात मुलाला बाहेर काढल्याचा फोन आला. मुलाचा मित्र फोनवरून राजेशना विचारायला लागला की, त्याचा हात फार दुखतोय तर त्याला प्यायला थोडी दारू देऊ का आणि दुखावलेल्या भागाला लावू का? राजेशनं त्याला कॉम्बिफ्लाम द्यायला सांगून डॉक्टरांकडे घेऊन जायचा सल्ला दिला. फोनवरच संभाषण ऐकताना एकीकडे आमची करमणूक होत होती आणि त्याच वेळी राजेश ‘सार्वजनिक काकां’ची भूमिका कशी निभावून नेत आहेत याची प्रचिती येत होती.

केदारकुंडचा विषय निघाला म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरची एक व्हिडिओ क्लिप दाखवली. पाटणादेवी परिसरातील धवलतीर्थ धबधब्याच्या डोहात एक मुलगा पडल्याचं कळलं, तेव्हा राजेश आणि कैलासगुरुजी त्याच परिसरात असल्यामुळे ताबडतोब तिथं पोचले. ते तिथं पोचले तेव्हा १०-१२ मुलं आरडाओरडा करत होती. त्यांच्यातील एकजण धबधब्याच्या वरच्या बाजूला चढत असताना डोहात पडला होता. आजूबाजूला महिला आणि मुली रडत होत्या. प्रसंगावधान राखून वनपाल आणि इतर लोकांनी दोर आणून दिला. कैलासगुरुजींच्या कमरेला दोर बांधून त्यांना डोहात उतरवले. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे त्यांना काठावरसुद्धा उभे राहणे अवघड जात होते. दोन-तीन वेळा डुबी मारून डोहाच्या तळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना प्रचंड दम लागत होता. अखेरीस पंचवीस फूट उंच आणि जाड बांबूच्या आधारानं ते २-४ वेळा तळाशी गेले आणि अखेरीस मुलाचे प्रेत घेऊन वर आले. वरच्या मंडळींनी प्रेत काठावर आणले. सगळीकडे नि:शब्द शांतता पसरली. प्रेत ताब्यात घेऊन मंडळी मार्गस्थ झाली. गुरुजी काकडत होते. त्यांना धाप लागली होती. अशा वेळी कुणी धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा नसते. पण कुणी साधी चौकशीही केली नाही. राजेशनी त्यांना कोरडा टॉवेल दिला. त्यांच्या कमरेचा दोर सोडला. त्यांच्या पाठीवर ते थोपटत राहिले. तो व्हिडिओ म्हणजे निरपेक्ष सेवेचं उदाहरण होतं.

२०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मी चाळीसगावला असताना वरखेड परिसरात नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत होता. वन्यजीव रक्षक या नात्यानं राजेश त्याला पकडण्याच्या मोहिमेत वनखात्याला सहकार्य करत होते आणि लोकांना सूचना देण्यासाठी गावोगाव फिरत होते. त्यांचा फोन नेहमीसारखा सतत चालू होता. कुणी विहिरीपाशी बिबट्या पाहिला म्हणून चार दिवस शेतावर फिरकला नव्हता. वीज फक्त रात्री उपलब्ध होत असल्यामुळे त्याला विहिरीवरचा पंप चालू करताना सोबतीला राजेश हवे होते, तर एकजण बिबट्या दिसता क्षणी वनखाते त्याला गोळ्या का घालत नाही, म्हणून राजेशना जाब विचारत होता. ते त्यांना शांतपणे उत्तर देत होते. ती प्रश्नोत्तरं ऐकताना मनात प्रश्न येत होता की, माणूस आणि वन्यजीव या दोघांमध्ये सामंजस्य निर्माण होऊन ‘जगा आणि जगू द्या’ अशी मनोभूमिका तयार होण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडत आहेत का? का अशी अपेक्षा करणं हे निव्वळ कल्पनारंजन आहे? किती देशातील लोकांना आज अशा समस्यांशी सामना करावा लागत असेल? या सगळ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळणं अवघड आहे.

वस्तुस्थिती आहे ती अशी की, आज आपल्या देशात तरी सर्पदंश, वन तस्करी आणि बिबट्याचे हल्ले या संबंधीच्या अनेक घटना घडत आहेत. पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यातील मोजकेच प्रसंग पुस्तकात घेतले आहेत, परंतु त्यातील भयावहता आणि आव्हान आजही संपलेले नाही, ही जाणीव मनाला अस्वस्थ करत राहिली. हे प्रश्न सोडवण्यासाठी वनखाते त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेच; परंतु या प्रयत्नांएवढीच गरज आहे ती लोकांच्या मनात खोलवर रुतलेली भीती दूर करण्याची आणि त्यांना मदतीचा हात देण्याची. त्यासाठी त्यांच्या सोबत राहणं, त्यांना भेटणं, समज-गैरसमज दूर करणं हे आपलं जीवितकार्य समजून लोकांना शिक्षित करण्याचं राजेशचं काम अव्याहत चालू आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भात सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी राजेंद्र धोंगडे यांनी काढलेले उदगार मला खूप महत्त्वाचे वाटतात.

ते म्हणाले, ‘‘राजेशचं काम, कामावरील विश्वास आणि कामामधील पारदर्शकता यामुळे समोरच्याच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. ज्यांच्यासाठी तो काम करतो त्यांना तो ‘आपला माणूस’ वाटत असतो आणि त्याच वेळी शासकीय यंत्रणेलासुद्धा तो आपल्यातील एक वाटतो. त्यामुळे वेळ आली तर सामान्य माणसालाच नाही तर अधिकाऱ्यांनाही ‘तुम्ही चुकता आहात’ असं सांगण्याची हिंमत त्याच्याजवळ आहे.’’

आजच्या काळात राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि शिक्षणक्षेत्रापासून पर्यावरणापर्यंत गढूळलेलं वातावरण असताना गरज आहे, ती कुणीही व्यक्ती करत असलेल्या कामाला नैतिक अधिष्ठान असण्याची. राजेश यांनी केलेलं काम किती उत्तुंग आहे, त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत याचं मूल्यांकन करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं ते काम करत आहेत, त्या मागची प्रमाणिक वृत्ती आणि कळकळ मला खूप महत्त्वाची वाटली.

जेव्हा प्रथम मी राजेशविषयी ऐकलं, तेव्हा त्यांना भेटायला मी फारशी उत्सुक नव्हते, परंतु त्यांना भेटल्यानंतर जगण्याविषयीचे मला अनभिज्ञ असलेले कितीतरी आयाम माझ्या पुढे उलगडत गेले.

हे पुस्तक राजेश ठोंबरे या एका व्यक्तीवरचं नाही, तर ज्याला भीती, आळस आणि किळस माहीत नाही, अशा एका अफलातून वृत्तीवरचं आहे. ज्याच्याकडे संशोधनाची दृष्टी आहे, परंतु संधी मिळाली नाही म्हणून उमेद न हरवू देता चालत राहण्याच्या जिद्दीवरचं आहे. साप, बिबट्या, वाघ यासारख्या वन्यजीवांना समजून घेण्याविषयीचं आहे.

हे पुस्तकं वाचून त्यांच्याविषयी वाटणारी भीती कमी होईल असा माझा दावा नाही, परंतु त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची मानसिकता, त्यामागची संवेदनशीलता याची ओळख होईल एवढं नक्की.

..................................................................................................................................................................

‘रंगुनी रानात साऱ्या : राजेश ठोंबरे सखा वन्यजीवांचा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी -

https://www.booksnama.com/book/5217/Ranguni-Ranat-Sarya

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Niphad Deepak

Sat , 12 September 2020

manapasun like


Rajkranti walse

Tue , 25 August 2020

very good


Vividh Vachak

Mon , 24 August 2020

खूप भावणारा आणि वाचनीय लेख.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......