करोना आणि लॉकडाऊनला आपण कसे सामोरे गेलो, याचा आडवा छेद
ग्रंथनामा - झलक
गौरी कानेटकर
  • ‘जग थांबतं तेव्हा...’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 August 2020
  • ग्रंथनामा झलक करोना Corona लॉकडाउन Lockdown जग थांबतं तेव्हा Jag Thanbata Tevha गौरी कानेटकर Gauri Kanetkar

करोना संसर्ग आणि लॉकडाऊनला आपण कसे सामोरे गेलो याचा आरसा समोर धरणार्‍या, एका पत्रकाराने आपल्या समाजाचा आडवा छेद दाखवणार्‍या नोंदी, असं स्वरूप असलेलं ‘जग थांबतं तेव्हा...’ हे पत्रकार गौरी कानेटकर यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला कानेटकर यांनी लिहिलेलं हे मनोगत....

..................................................................................................................................................................

२०२० सालातले मार्च अखेर ते जुलै असे चार महिने आपण एक अभूतपूर्व काळ अनुभवत होतो. एक विषाणू जगभर लोकांना संसर्ग देत पसरतोय, लाखो लोक मृत्युमुखी पडलेत, त्याच्या भीतीने सगळे देश लॉकडाऊन मोडमध्ये गेलेत, जग ठप्प झालंय, असा अनुभव आपल्यापैकी कुणालाच याआधी आला नव्हता.

दुसरं महायुद्ध ही अलीकडच्या काळातली सर्वांत संहारक आणि मानवजातीवर सर्वाधिक परिणाम करणारी घटना होती असं मानलं जातं; पण तरीही जगाच्या कानाकोपर्‍यात त्या महायुद्धाचे प्रत्यक्ष परिणाम झाले नव्हते. त्यानंतरच्या सत्तर वर्षांत शीतयुद्धं झाली, नागरी युद्धं पेटली, दहशतवाद फोफावला, विविध रोगांच्या-विषाणूंच्या अनेक साथी येऊन गेल्या; पण या सर्व घडामोडी एखाद्या देशापुरत्या-काही देशांपुरत्या किंवा फार तर एखाद्या खंडापुरत्या मर्यादित होत्या. आफ्रिकेतल्या रोगाचा भारतातल्या खेड्यापाड्यांशी संबंध आला नव्हता, किंवा सीरियातल्या नागरी युद्धाची झळ दक्षिण अमेरिकेतल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली नव्हती.

त्या अर्थाने करोनाचा प्रसार अभूतपूर्व होता. जगातल्या जवळपास सर्व देशांमध्ये करोनाने शिरकाव केला. कोणत्या ना कोणत्या प्रकारे जगातल्या प्रत्येक माणसाच्या जगण्यावर करोनाचा किंवा त्याला रोखण्यासाठी केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झाला. अमेरिकेतल्या बड्या मल्टिनॅशनलच्या सीईओंपासून मुंबईत पाणीपुरी विकणार्‍या यूपीच्या भय्यापर्यंत सार्‍यांना करोनाने ग्रासलं.

भारतात मार्चमध्ये रुग्णांचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं आणि हे वादळ आपल्याकडेही थडकणार, हे नक्की झालं. तेव्हाच आजवर कधीही न अनुभवलेलं घडतं आहे, याची जाणीव होत होती. एकेक व्यवहार बंद होत चालले होते. त्या वेळी सर्वांचीच पहिली प्रतिक्रिया होती- असं कसं होऊ शकतं? सगळा देशच बंद म्हणजे काय? जग बंद पडलं तर हातावर पोट असलेली माणसं काय करणार? करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायला आपली व्यवस्था पुरी पडणार का? असे किती तरी प्रश्न अचानक समोर येऊन ठेपले होते. आमचे मुख्य संपादक सुहास कुलकर्णी यांनी मला सुचवलं, “आपल्या आसपास जे घडतंय ते अभूतपूर्व आहे. आपल्यासह सर्व जगाला आणि मानवजातीला व्यापून टाकणारं आहे. या प्रसंगाला एक व्यक्ती म्हणून आपला प्रतिसाद कसा असतो, एक समाज म्हणून त्याला आपण कसे सामोरे जातो आणि आपलं सरकार त्याला कसं तोंड देतं याचं डॉक्युमेंटेशन करण्याची ही चांगली संधी आहे. या घडामोडींची जमेल तशी नोंद ठेवणं, हे पत्रकार म्हणून आपलं काम आहे. तू लिहितेस का बघ.”

मला कल्पना आवडली. त्यानंतर दोन दिवसांत लॉकडाऊन जाहीर झाला. मग नोंदी लिहिण्याचा विचार पक्का झाला आणि मी लिहायला लागले- या नोंदीचं पुढे काय होईल याचा विचार न करता. मधल्या काळात अनेकदा माझी गाडी बंद पडायची. हे आपण कशाला करतोय, हे वाचून कुणाला काय मिळणार आहे, सगळ्यांना सगळं माहीत आहेच, मग आपण वेगळं काय लिहितोय, असे प्रश्न पडायचे. पण सुहास कुलकर्णींनीच ‘डॉक्युमेंटेशन म्हणून लिही, बाकी विचार करू नकोस,’ असं समजावत मला लिहितं ठेवलं. नोंदी पूर्ण झाल्यावर त्या वाचून त्यात सुधारणा सुचवल्या आणि त्याचं पुस्तक करूयात, असा आग्रह धरला. त्यामुळेच हे पुस्तक पूर्ण झालं.

करोना संकटाच्या काळात माध्यमांमधून आपल्यावर बातम्यांचा, माहितीचा, आरोप-प्रत्यारोपांचा आणि उलटसुलट तर्कांचा एवढा भडिमार झाला आहे की, करोना हा शब्दही आता नकोसा वाटतो आहे. या विषयाबद्दल नको तेवढं माहीत झालं असताना आणखी एक पुस्तक कशाला, असं कुणाला वाटू शकतं. पण करोना काळात घरी येणारा एखाद-दुसरा पेपर (तोही कधी येत होता, कधी नव्हता), टीव्हीवरच्या बातम्या आणि व्हाट्सपवरून फिरणारे खरे-खोटे संदेश, एवढ्यापुरतेच वाचकांचे माहितीस्रोत मर्यादित होते. पण त्यापलीकडे देशातली-जगातली अनेक माध्यमं-पत्रकार करोना आणि लॉकडाऊनसंदर्भातल्या बातम्या खोलात जाऊन देत होते. तज्ज्ञांच्या मुलाखती येत होत्या. नवनवी संशोधनं बाहेर पडत होती. अशी माहिती खंगाळून त्यातले महत्त्वाचे मुद्दे नोंदवण्याचा प्रयत्न इथे केला आहे. मी पत्रकार असल्याने या नोंदीचा भर करोनाबाबतच्या शास्त्रीय माहितीपेक्षा सामाजिक परिणामांवर जास्त आहे.

दुसरं असं, की लॉकडाऊनचा आणि अनलॉकिंगचा काळ आपल्यासाठी सध्या ताजा आहे. त्या काळात काय घडलं, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे; पण आणखी काही वर्षांनी करोनाचा हा हल्ला काहीसा विस्मृतीत जाईल, तेव्हा त्या काळात काय घडलं होतं, हे कळण्यासाठी या नोंदी उपयोगी ठरतील असं वाटतं. एरवी, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत आपल्याकडे डॉक्युमेंटेशनचं प्रमाण फार कमी आहे, अशी खंत नेहमी व्यक्त केली जाते. ती कमतरता भरून काढण्याचा हा खारीचा प्रयत्न.

या नोंदी तीन-चार स्तरांवर लिहिल्या आहेत. एक, माझ्या आसपास, घरीदारी, शेजारी आणि माझ्या मनात घडणार्‍या वैयक्तिक गोष्टी. दुसरा प्रकार आहे तो आपल्या समाजात, मी राहते त्या पुणे शहरात, महाराष्ट्रात आणि देशात घडणार्‍या गोष्टी. आणि तिसरा थोडाफार संदर्भ आहे, तो जागतिक घडामोडींचा. करोनाकाळात आपण व्यक्ती म्हणून कसे वागलो-आपल्यावर त्याचा काय परिणाम झाला, समाज म्हणून आपली प्रतिक्रिया काय होती-समाजावर कसा परिणाम झाला आणि सरकारी पातळीवर या संकटकाळाला कसा प्रतिसाद दिला जात होता, असेही तीन स्तर या नोंदींमध्ये आहेत.

१८ मार्च ते ३१ जुलै अशा जवळपास चार महिन्यांमध्ये लिहिलेल्या या नोंदी आहेत. लिखाणाचा फॉर्म डायरीसारखा असल्याने एका अर्थाने लॉकडाऊन काळातल्या घुसमटीला वाट करून देण्याचा तो एक मार्गही होता. त्यामुळे आसपास घडणार्‍या घटनांवरची माझी मतंही मी या नोंदींमध्ये नोंदवली आहेत, मनात उमटणारे प्रश्न नोंदवले आहेत. त्यात काही घटनांचा उल्लेख राहिलेला असू शकतो. काही घटना मनाला भिडल्यामुळे जास्त अधोरेखित झाल्या असण्याची शक्यता आहे. कदाचित कुठे तपशिलात काही चूक झालेली असू शकते.

दुसरी गोष्ट म्हणजे इथे नोंदवलेली मतं पूर्ण वैयक्तिक आणि उत्स्फूर्त आहेत. त्यापैकी काही मतं वाचकांना पटणारही नाहीत. पण एका सर्वसामान्य व्यक्तीने तिच्या मर्यादांसह केलेल्या या नोंदी आहेत, याची जाणीव वाचकांनी ठेवावी, ही विनंती. या विषयावर पुढे अनेक जण नक्कीच सखोल आणि विविधांगी लिहितील. पण मी जे लिहिलं त्याचाही डॉक्युमेंटेशनसाठी उपयोग व्हावा, एवढाच या पुस्तकामागचा मर्यादित हेतू आहे.

..................................................................................................................................................................

‘जग थांबतं तेव्हा...’ - गौरी कानेटकर

समकालीन प्रकाशन, पुणे

पाने - २१६, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5215/Jag-Thambte-Tevha

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......