२०व्या शतकात ‘उदारमतवाद’ भांडवली जगाचा प्रमुख आधार बनत गेला आणि आता २१व्या शतकात तो एका निर्जीव कलेवराच्या रूपात जगतो आहे!
ग्रंथनामा - झलक
दत्ता देसाई
  • ‘नव‘उदार’ जगाचा उदयास्त’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 10 July 2020
  • ग्रंथनामा Grnathnama झलक दत्ता देसाई Datta Desai नव‘उदार’ जगाचा उदयास्त Navudar Jagacha Udyasta

सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक दत्ता देसाई यांचे ‘नव‘उदार’ जगाचा उदयास्त : विचार, व्यवस्था आणि ‘स्वप्नां’चे अर्थ-राजकारण’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. द युनिक फाउंडेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकामागची लेखिकाची भूमिका...

विसाव्या शतकातला  उदारमतवाद, आंतरराष्ट्रीयवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, फासीवाद, जागतिकीकरण आणि नवउदारमतवाद यांनी बनलेला सप्तकोन एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच का ढासळायला लागला आहे, याची गंभीर चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे. करोनाने तर उदारमतवादी, नवउदारमतवादी जगाचा ज्यामच बट्ट्याबोळ करून टाकलाय, असं बोललं जातं आहेच. त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

..................................................................................................................................................................

विसाव्या शतकाचा उधाणणारा विलोभनीय विकास हा दशकानुदशके जणू एखाद्या सप्तरंगी पोपटाप्रमाणे भासत होता. पण आता त्याचे रंग फिके पडले आहेत, विटू लागले आहेत, काळवंडत चालले आहेत. पृथ्वीगोलावरील मानवसमाजाचा या शतकात अफाट विस्तार आणि अकल्पनीय विकास झाला. या विकासगोलाचा प्रमुख आधार होता एक सप्तकोन - उदारमतवाद, आंतरराष्ट्रीयवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, फासीवाद, जागतिकीकरण आणि नवउदारमतवाद यांनी बनलेला.

विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ‘उदारमतवाद’ हा उत्तरोत्तर वाढत्या प्रमाणावर भांडवली जगाचा प्रमुख आधार बनत गेला आणि लोकशाहीशी जोडून बहरत गेला. पण पाहता पाहता या शतकाच्या उत्तरार्धात त्याची पडझड सुरू झाली आणि आता एकविसाव्या शतकात तर तो आत्मा गमावलेल्या एका निर्जीव कलेवराच्या रूपात जगतो आहे. उदारमतवाद आणि राष्ट्र-राज्ये रेखीवपणे आकार घेत असताना म्हणजे १९व्या शतकाच्या मध्यावर राष्ट्रा-राष्ट्रांमधील संबंधांचा पद्धतशीर म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार व्यापकपणे प्रत्यक्षात येऊ लागला. विसाव्या शतकात तो परस्परावलंबन आणि सर्व तणाव व संघर्षांसह एक ‘स्वाभाविक’ वास्तव बनला.

विश्व-समाजाची अधिक ठोस मांडणी करणारा विचार याच काळात जन्माला आला, तो म्हणजे कामगारवर्गीय आंतरराष्ट्रीयवाद. या विचाराने विसाव्या शतकाच्या प्रारंभी समाजवादी प्रवाहात विविध वाद घडवले आणि रशियन समाजवादी क्रांतीच्या निमित्ताने तो वेगाने वैश्विक बनत गेला. वाढती कामगारवर्गीय चळवळ व समाजवादी देशांचा वाढता विस्तार यातून हा दुसऱ्या महायुद्धानंतर काही दशके प्रभावी राहिला. तसेच युद्धविरोधी चळवळ, अलिप्ततावादी देशांचा गट आणि नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मागणी या रूपात एक वेगळा आंतरराष्ट्रीयवाद उदयाला आला. मात्र विसाव्या शतकाच्या अखेरीकडे येताना हे दोन्ही विचार निस्तेज होत गेले आणि जेव्हा त्यांची सर्वाधिक गरज होती, अशा ‘जागतिकीकरणा’च्या पर्वात ते जणू जागतिक चर्चाविश्वातून लुप्तच झाले. आता जगात - मुख्यतः भांडवली-उदारमतवादी - ‘आंतरराष्ट्रीय’वादच प्रभावशाली आहे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी घडलेली एक अभूतपूर्व घडामोड म्हणजे रशियातील समाजवादी क्रांती. या शतकात पाहता-पाहता एकतृतीयांश जग समाजवादी मार्गाने वाटचाल करू लागले आणि त्याने स्वतःसह संपूर्ण जगाच्या भांडवली विकासाला, उदारमतवादाला आणि राष्ट्रवादाला वेगळे वळण व विविध आयाम दिले, त्यांना अधिक समृद्ध केले. पण या शतकाच्या अखेरीकडे येताना समाजवादाचे हे प्रतिमान बऱ्याच देशांत थेट कोसळत गेले, तर काही देशांत ते आतून बदलत गेले. आज काही अपवाद वगळता या व ‘समाजवादी’ देशांमध्ये नवभांडवलशाहीचे राज्य सुखेनैव सुरू आहे.

एकोणिसाव्या शतकात युरोप-अमेरिकेत राष्ट्रवाद व्यवस्थित प्रस्थापित झाला होता. तेव्हापासून आणि विशेषतः विसाव्या शतकाच्या प्रारंभी हा प्रगत देशांचा राष्ट्रवाद आक्रमक आणि वर्चस्ववादी रूपात उभा ठाकला होता. तर जगभरच्या वासाहतिक प्रदेशांमध्ये राष्ट्रवाद हा राष्ट्रीय मुक्तीचा आणि मानवी स्वातंत्र्याचा मार्ग, माध्यम व साधन म्हणून उभारी धरत होता. हे शतक जगभरच्या वसाहती देशांनी स्वतंत्र होण्याचे शतक ठरले. पण या शतकभराच्या वाटचालीनंतर आता प्रगत देश आणि विकसनशील देश, पूर्वाश्रमीचे समाजवादी देश आणि नवविकसित देश अशा सर्वच देशांमध्ये तो संकुचित आणि नकारात्मक रूप धारण करतो आहे. आपापल्या मानवसमाजांना नवे काही देण्याची त्याची क्षमता आता संपुष्टात आली आहे.

दोन महायुद्धांच्या आणि जागतिक महामंदीच्या कोंडीमध्ये सापडलेल्या युरोपात फासीवाद (fascism) या एका नव्या कल्पनाप्रणालीने जन्म घेतला. साम्राज्यवादी विस्तारासाठी धडपडणाऱ्या आक्रमक, हिंस्त्र व ‘पर’द्वेष्ट्या राष्ट्रवादाचा वापर करणारी ही घडामोड होती. या नव्या सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय घडामोडीने आधुनिक मानवी मूल्यांना पायदळी तुडवले आणि भांडवली सत्ताकारणाचे भीषण व अधःपतित दर्शन घडवले. काही वेळा समाजवाद या शब्दाचा वापर करत समाजवादी व्यवस्थेला आणि उदारमतवादी लोकशाहीचा वापर करत उदारमतवादाला व लोकशाहीलाच तिने आव्हान उभे केले. जगातल्या तमाम उजव्या, आक्रमक व संकुचित धर्म-वंशवादी प्रवाहांना त्याने ज्वालाग्राही इंधन पुरवले.

दुसऱ्या महायुद्धाच्या पाठोपाठ ‘फासीवादी’ सत्तांचे उच्चाटन झाले आणि फासीवाद संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र गेल्या काही दशकांत ही विचारसरणी ‘नवफासीवादा’च्या रूपात पुन्हा डोके वर काढते आहे. अगदी उदारमतवादी लोकशाहीची प्रदीर्घ परंपरा असलेल्या प्रगत राष्ट्रांमध्येही ती प्रभावी होताना दिसते आहे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत वसाहतवाद आणि साम्राज्यवाद या रूपात जागतिक बनणाऱ्या भांडवलशाहीने या शतकाच्या उत्तरार्धात आणि खास करून अखेरीकडे, ‘जागतिकीकरण’ नावाच्या वादळी बदलाचे रूप घेतले. जगभरातील सर्व राष्ट्रांच्या, प्रदेशांच्या, मानवसमूहांच्या आणि अगदी प्रत्येक व्यक्तीच्या अमाप विकासाची आणि स्वप्नपूर्तीची, जागतिक लोकशाहीची आणि विश्वबंधुत्वाची भाषा करणाऱ्या या वादळाचे पाहता-पाहता वावळटीत रूपांतर झाले आणि ते विरूनही जाऊ लागले. हे वादळ विकासाचे होते की विनाशाचे होते की, विनाशकारी विकासाचे असेही प्रश्न उपस्थित झाले. पण फुटणारे ‘बुडबुडे’, वित्तीय महाअरिष्ट, व्यापारयुद्धे आणि संकुचित राष्ट्रवाद यांनी जागतिकीकरणाचा हा महाबुडबुडादेखील फुटला.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कल्याणकारी राज्य या कल्पनेविरुद्ध साधारण तेव्हापासूनच नवउदारमतवाद नावाचा विचार डोके वर काढू लागला. हा मोकाट बाजारवादी अर्थविचार ऐंशीच्या दशकापासून प्रभावी झाला. गेली सुमारे पाच दशके तो जगावर राज्य गाजवत राहिला आहे. या नवउदारमतवादाने जगाला अफाट उत्पादनवाढ, नवी गतिमान तंत्रवैज्ञानिक क्रांती आणि तणावपूर्ण जीवनशैली दिली. पण त्याने ना विकासाचे नवे प्रतिमान दिले, ना उदारमतवादाला आणि भांडवली विकासाला त्यांनी स्वतःच तयार केलेल्या खातेऱ्यातून बाहेर काढले. उलट त्यांचे सारेच आर्थिक-राजकीय व सामाजिक प्रश्न त्याने आणखी तीव्र केले.

विसाव्या शतकाअखेरीस नव‘उदार’ जगात प्रवेश करता-करता एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच, या साऱ्यांच्या प्रगतिशील आशयाची विविध रूपांत आणि वेगवेगळ्या तऱ्हांनी जी पडझड आणि वाताहत झाली, जो ऱ्हास आणि जी अवनती झालेली दिसू लागली, ती अगदी न बघवण्याइतकी आहे! ‘फासीवादा’ने या अधःपतनाचे एकदा गाठलेले टोक आता ‘नवफासीवादा’च्या रूपात पुन्हा प्रकटले आहे.

या नव‘उदार’ जगाचे हे असे का झाले? विसाव्या शतकीय या सर्व घटितांची जी परस्परपूरकता होती आणि जे परस्परविरोध होते, त्यांची जी गाभाभूत वैशिष्ट्ये होती आणि वेगळेपण होते, त्यांच्यातील जे आंतरसंबंध आणि अंतर्विरोध होते, ते कशा स्वरूपाचे होते की, ज्यामुळे हे सारेच कोसळत गेले?

या कल्पनाप्रणालींनी, त्यांच्या सामाजिक व्यवहारांनी आणि त्यांच्या समाज-संघटन पद्धतींनी जगड्व्याळ स्वरूपाचे प्रश्नही निर्माण केले आणि तेही ‘न भूतो...’ अशा स्वरूपाचे. त्यांनी नव्या मानुष जगाविषयीच्या आकांक्षा आणि अनिश्चितता उंचावल्या. खऱ्या स्वातंत्र्याधिष्ठित जगाकडे जाण्याची शक्यता आणि अपरिहार्यता जागवली. त्यासाठीची भरभराट आणि अरिष्टग्रस्तता हे दोन्हीही समोर उभे केले. आणि या नव‘उदार’ जगापुढचा पर्याय कोणता हा प्रश्नही समोर आणला.

हे प्रश्न केवळ सुटे प्रश्न नसून ते वर्तमान व्यवस्थेच्या व्यापक कोंडीचा भाग आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा, या कोंडीचा आणि पर्यायाच्या दिशेचा विचार करण्यासाठी अर्थातच या कल्पनाप्रणालींचा आणि त्याच्याही संबंधित सामाजिक घडामोडींचा धावता पण समीक्षात्मक आढावा घेणे गरजेचे आहे.

कोणत्याही देशाचा विचार हा जगाच्या संदर्भात आणि वरील पार्श्वभूमीवर करणे हे आजच्या युगात तर अगदी अपरिहार्य झाले आहे. कारण राष्ट्र, राष्ट्र-राज्य आणि राष्ट्रवाद या आधुनिक घडामोडींना प्रथमपासूनच जागतिक आयाम राहत आला आहे. पण आज, विशेषतः लोकशाहीवादी-डाव्या-परिवर्तनवादी प्रवाहांसमोर विविध जन विभागांच्या हक्कांसाठी लढायचे की, नवे राष्ट्र उभे करायचे, देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी चळवळी करायच्या की, क्रांतिकारक राजकारणाची कास धरायची, आपल्या राष्ट्रात आमूलाग्र परिवर्तन घडवायचे की विश्व-मानवसमाजासाठी क्रियाशील व्हायचे असे प्रश्न पुन्हा उभे होताहेत.

या क्रमात या प्रवाहांसमोर ‘भाकरी’ की ‘चंद्र’ असा प्रश्न उपस्थित होत असल्यास नवल नाही. कोट्यवधी शोषित-वंचित-दडपलेल्या जनसमूहांचे मूलभूत जगणे आणि हक्क यांसाठी जगभर आणि भारतात चाललेल्या लढाया पाहता नव्या राष्ट्राचे, आणि विश्वसमाजाचे स्वप्न (Dream), दृष्टीस्वप्न (Vision) किंवा मनोराज्य (Utopia) पाहण्याला काही वाव तरी आहे का, असे वाटण्यासारखीच स्थिती आज आहे.

हे प्रश्न आता केवळ वैचारिक वा ‘तात्त्विक’ राहिलेले नाहीत. ते आता आजच्या वास्तवातील साक्षात आव्हाने बनले आहेत. वास्तविक पाहता असे द्वैत उभे होण्याची गरज नाही. कारण द्विधावस्था निर्माण करणारा काळ हाच ‘भाकरी’ आणि ‘चंद्र’ यांना एकत्र गुंफणारे नवे दृष्टीस्वप्न घडण्याचा व घडवण्याचा काळ असतो. नव्या जाणिवेने सर्व शोषितांचे आणि आम जनतेचे नवे दृष्टीस्वप्न घडवण्याचा हा काळ असतो. इतिहासाने हे अनेकदा दाखवून दिले आहे.

गेल्रा काही दशकांत ‘जागतिक’ आणि ‘राष्ट्रीय’ यांचे एक नवे समीकरण आकार घेत आहे. जागतिकीकरणाच्या या पर्वाचा प्रारंभ होताना ज्यांनी जोरकसपणे जागतिकीकरणवादी भूमिका घेतली त्या अमेरिका (यूएस), ब्रिटन व अन्य युरोपीय राष्ट्रे यांमधील काही वर्गशक्ती आज संकुचित व आक्रमक ‘राष्ट्रवादी’ भूमिका घेताना दिसत आहेत.

तर या बदलांना तिसऱ्या जगात आणि आपल्या येथेही वेगवेगळे प्रतिसाद दिले जात आहेत. एकीकडे जागतिकीकरणाच्या तथाकथित विरोधात फुगवलेला धर्मवादी वा ‘सांस्कृतिक’ - खरे तर दांभिक - राष्ट्रवाद हा प्रत्यक्षात पारराष्ट्रीय (transnational) मक्तेदारी भांडवलाच्या डोक्यावर छत्रचामर धरतो आहे आणि तो परद्वेष्टा, आम जनहिताविरुद्ध आक्रमक तसेच विशिष्ट जनविभागांविरुद्ध हिंसक बनतो आहे.

दुसरीकडे जागतिकीकरणातील नवउदारमतवादाला विरोध करणारे काही परिवर्तनवादी प्रवाह वा व्यक्ती ‘मागे फिरून’ उदारमतवादाला व प्रस्थापित राष्ट्रवादाला बिलगण्याचे प्रयत्न करताहेत. जागतिकीकरणामुळे अनेक जनविभागांचे जे सीमांतिकरण (marginalisation) व अपवर्जन (exclusion) होत आहे त्याविरोधात ‘समावेशन’ (inclusion) म्हणजे प्रचलित विकासात आणि संस्कृतीत या जनविभागांचा समावेश करणे हाच केवळ राष्ट्रवादाचा गाभा असावा, असाही आग्रह काही पुरोगामी धरत आहेत. यातूनच विद्यमान बाजाराधिष्ठित विकासाला प्रतिकार करण्यासाठी कल्याणकारी राज्याच्या (आपल्या येथे ‘नेहरूवादी’) प्रतिमानाकडे पुन्हा परत वळण्याची गरज मांडली जात आहे. धर्मवादी वा सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रत्युत्तर म्हणून जुन्या उदारमतवादी वा सर्व-धर्म-समभाव छापाच्या ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्रवादाला आवाहन केले जात आहे.

थोडक्यात, एकतर सत्ताधारी-उजव्या शक्ती या ‘राष्ट्र प्रथम’ अशी भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न दुय्यम ठरवत आहेत आणि तिच्या आकांक्षा दडपत आहेत. त्याविषयी प्रश्न, टीका वा संघर्ष करणाऱ्यांना थेट ‘राष्ट्रद्रोही’च ठरवले जात आहे. किंवा जागतिकीकरणाच्या अंतर्विरोधांचा वेध घेऊन पुढे झेपावण्याऐवजी हे जागतिकीकरण अटळ आहे असे म्हणून मध्यममार्गी प्रवाहांकडून ‘जैसे थे’वादी तडजोड केली जात आहे. किंवा, गतकाळातील उदारमतवादी ‘राष्ट्रवादी’ वैचारिक-विकासात्मक आधारांना कसेबसे लटकून राहण्याची धडपड केली जात आहे.

जागतिक संदर्भात राष्ट्रवादाचा प्रश्न आज जे वेगळे वळण घेतो आहे, त्यातून नव्या बदलांचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्न आहे. तसेच राष्ट्रवादाचे आणि राष्ट्र या घटिताचे भवितव्य काय असणार, राष्ट्र हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संघर्षांचा आणि बदलांचा ‘आखाडा’ म्हणून अजूनही अर्थपूर्ण आहे का? की जागतिकीकरणाने तो कालबाह्य केला आहे? राष्ट्रवादाचा आशय आणि त्याची भावी दिशा काय असावी?

गेल्या शतकात ‘समाजवाद’ हा राष्ट्रवादाचा आशय म्हणून विकसित केला गेला. त्यातून ‘एका राष्ट्रात समाजवाद’ (Socialism in One Country) अशी भूमिकाही सोविएत रशियात घेतली गेली. पण यातून काही तणाव आणि प्रश्नही निर्माण झाले. ‘समाजवादी राष्ट्रवाद’ आणि ‘समाजवादी आंतरराष्ट्रीयवाद’ असे वादही लढवले गेले. त्याची, आणि हे दोन्हीही कोसळण्याची, पुनरावृत्ती टाळायची असेल तर राष्ट्रवाद आणि समाजवाद यांचा विचार आता कसा केला पाहिजे? असे अनेक प्रश्न समोर येताहेत. एकूणच जागतिक पातळीवर आजवरचा उदारमतवाद, राष्ट्रवाद आणि नवउदारमतवाद-जागतिकवाद (Globalism) हे त्याचे उत्तर आहे की त्यापलीकडचे नवे काही धुंडाळले पाहिजे असाही प्रश्न आहे.

मात्र या समस्यांचा वेध घेण्यासाठी जागतिकीकरणाची चर्चा व समीक्षा ही ‘राष्ट्रवादी’ भूमिकेतून करणे पुरेसे ठरेल का असाही प्रश्न आहे. तर नवफासीवादाचे, ‘अस्मितावादा’चे (उदा. नवहिंदुत्ववाद) आणि नवउदारमतवादाचे विश्लेषण व समीक्षा हे ‘उदारमतवाद’ पायाभूत मानून करणे पुरेसे ठरेल का हाही प्रश्न आहे. तसेच विद्यमान भांडवली राजकीय अर्थव्यवस्थेची पायाभूत गृहीततत्त्वे हीच भूमिदृष्टी (standpoint) ठेवून या साऱ्यांची समीक्षा केली तर तीही भविष्यवेधी ठरेल का असाही प्रश्न आहे. हे लक्षात घेऊन या प्रस्थापित कल्पनाप्रणालींच्या ‘पलीकडे’ जाणाऱ्या भूमिकेतून इथे चर्चा व समीक्षा करण्याचा उद्देश आहे. त्यातूनच पर्यायाची दिशा सांगणारे काही ठळक मुद्दे वा सूत्रे आपल्याला गवसू शकतील.

..................................................................................................................................................................

‘नव‘उदार’ जगाचा उदयास्त’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5209/Navudar-Jagacha-Udyast

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......