माजी वनाधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर यांचे ‘बिबट्या आणि माणूस’ हे पुस्तक नुकतेच ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्रातील व्याघ्रप्रकल्पाचे एक अध्वर्यू विश्वास सावरकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना... मानवी वस्तीतील बिबट्याचा आढळ आणि एकूणच मानव-बिबट्या यांच्यातील संघर्षाच्या निमित्ताने बिबट्याविषयीची अतिशय रंजक, अदभुत आणि चित्तथरारक माहिती देताना वन्यप्राण्यांबरोबरचं सहजीवन सुखावह होण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याचीही चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे.
..................................................................................................................................................................
चार्लस डार्विन व आल्फ्रेड रसेल वॉलेस या दोन ब्रिटिश वैज्ञानिकांनी १८५८मध्ये प्रथमच जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला व त्यानंतर डार्विनने १८५९मध्ये त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ ‘ओरिजिन ऑफ स्पीशिज....’ प्रकाशित केला. त्याविषयी विसाव्या शतकात बोलताना ॲलडो लिओपोल्ड, अमेरिकेतील फॉरेस्ट सर्व्हिसमधील एक अतिशय बुद्धिमान ज्येष्ठ वन अधिकारी म्हणाले की, जो सिद्धांत मागच्या कोठल्याही पिढीला अवगत नव्हता; पण आत्ता ज्याची समज आपल्याला प्राप्त झाल्यानंतर पृथ्वीतलावरील मानवेतर प्राणी, जे पृथ्वीवरील आपले सहप्रवासी आहेत त्यांच्याबाबत आपल्या मनात एका जवळच्या नात्याची सद्भावना जागृत होणे आवश्यक आहे. सृष्टीचा अब्जावधी वर्षांचा अद्भुत चमत्कार जाणून आपल्याला मोठा अचंबा वाटायला हवा व त्यायोगे ‘जगा व जगू द्या’ ही आपल्या जीवनाची धारणा असली पाहिजे.
निसर्गाच्या या जादूनगरीत जगण्यासाठी लेखकाने वन अधिकारी होणे पसंत केले व त्यांना आलेले चित्तथरारक अनुभव त्यांच्या लेखणीतून उतरले आहेत. हे आयुष्य अद्भुतरम्य आहे व त्याच वेळी अतिशय खडतरदेखील आहे. पण ज्यांनी या मार्गाला स्वेच्छेने स्वीकारले आहे, त्यांच्याकरता पुढे ठाकणारी आव्हाने त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने रुची आणतात व त्यांना वन्य प्राण्यांची व माणसांचीदेखील ओळख पटते.
जंगलाची जगावेगळी भाषा आहे. पशुपक्ष्यांच्या व प्राण्यांच्या आवाजातले गूढ, जमिनीवर प्राण्यांच्या दिसणाऱ्या पावलांच्या व इतर खाणाखुणा, झाडांवरची घरटी व ढोली, मृत्यू पावलेल्या प्राण्यांचे अवशेष आणि बरेच काही शिकण्यासारखे आहे. जंगलातील गुपिते उलगडण्यासाठी निसर्गाशी समरस होणे जरुरीचे असते. त्यासाठी जंगलात नेहमी खूप चालणे व त्यासोबत तीक्ष्ण निरीक्षणशक्ती, संवेदनशील कान व नाक असणे आवश्यक असते. आधुनिक तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे, परंतु आपल्या आकलनशक्तीशी - जर वापरली तर - त्याची तुलना होऊ शकत नाही.
याचे एक उदाहरण म्हणजे वन खात्याची टिंगल करण्यासाठी १९८०च्या सुमारास वाघाच्या पंज्यावरून लिंग ओळखणे, वयाचा अंदाज बांधणे म्हणजे प्रौढ की उपवयस्क, वाघांच्या संख्येचा अंदाज बांधणे इत्यादी कसे अतिशय चूक आहे, अशास्त्रीय आहे, लोकांची फसवणूक करणे आहे, अशी टीकेची झोड काही भारतीय व त्यांच्या मित्र पक्षातील परकीय शास्त्रज्ञांनी उठवली व स्वतःचे तंत्रज्ञान किती उत्तम आहे हे दाखवण्याचा सपाटा चालवला. वन विभागाने या टीकेसमोर माघार घेऊन ‘शास्त्रीय पद्धत’ अवलंबायला सुरुवात केली, पण यामध्येही चुका होऊ शकतात हे मानले पाहिजे.
२००३मध्ये भारतीय वन्यजीव संस्थेने वाघाच्या पंज्यावर अवलंबित असलेल्या तंत्रात थोडा बदल करून सिद्ध केले की पंज्यांवरून गोळा केलेली माहिती ही प्रचलित विज्ञानांनुसार व सांख्यिकी शास्त्रानुसार ९८ टक्के अचूक असू शकते! अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नाला ‘रॉकेट सायन्स’ असे संबोधण्याची पद्धत आहे, परंतु जैविक उत्क्रांती व त्यासोबत जोडलेली संपूर्ण आधुनिक विज्ञाने अजूनही असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यापासून खूपच लांब आहेत, तेव्हा अशा विज्ञानांशी रॉकेट सायन्सची, ते अति कठीण गोष्टींचे शिखर आहे, या कल्पनेने तुलना करणे अतिशय हास्यास्पद आहे.
सध्या काही अपवाद सोडले तर वन्यजीवांबद्दल व वनांविषयी आम जनसमुदायात तुच्छता, असहिष्णुता, भीती व त्यांना नष्ट करण्याची प्रवृत्ती दिसते. वने ही नैसर्गिक वनस्पती व वन्य प्राण्यांची वसतिस्थाने आहेत. दुर्दैवाने वने व आर्थिक विकासाच्या प्रक्रिया या उभयतांत छत्तीसचा आकडा आहे. महेश रंगराजन यांनी २००१मध्ये भारतातील वन्य प्राण्यांच्या इतिहासावर लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे की, १८७५ ते १९२५ या ५० वर्षांच्या कालावधीत सरकारने रेल्वे मार्ग, रस्ते, शेतीसाठी जमीन, कारखाने व इतर विकासाची पावले उचलण्यासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी ‘हिंस्त्र’ वन्य पशूंना ते विकासाचे शत्रू आहेत असे ठरवून, स्थानिक जनतेला बक्षिसापोटी पैसे देऊन त्यांना ठार मारण्यासाठी मुभा दिली होती. या प्रोत्साहनाने ८०,००० वाघ, १००,००० बिबटे बळी गेले.
याची सरकारी दप्तरी नोंद आहे, कारण मारलेल्या प्राण्यांच्या शेपट्या नेमून दिलेल्या सरकारी कार्यालयात पुरावा म्हणून दाखल केल्यावर त्याकरिता पैशांचा मोबदला देण्यात येत असे. या व्यतिरिक्त व्हीआयपी व अन्य शिकाऱ्यांमधील अहमहमिकेतून असंख्य पक्षी व प्राणी मारले गेले होते, ते आकडे वेगळे आहेत. तात्पर्य हे की, एकूण किती संख्येने किती जातीचे वन्य प्राणी बळी पडले असतील, याचा पूर्ण हिशेब लावणे अशक्य आहे. त्यावेळी इंग्रजांचे सरकार होते.
स्वातंत्र्यानंतरही १९७२पर्यंत काही प्रमाणात शिकारीसाठी परवाने देण्यात येत असत. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ (वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट १९७२), त्यात वेळोवेळी झालेले बदल व वन संवर्धन अधिनियम १९८० (फॉरेस्ट काँझर्वेशन ॲक्ट १९८०) या दोन कायद्यांमुळे वन्य प्राण्यांना व जंगलांना बरेच संरक्षण जरूर मिळाले. कायद्याने शिकार बंद झाली. वन जमिनी वेगळ्या उपयोगासाठी हस्तांतर करण्यास कडक नियम करून अंकुश लावला गेला. पण तरीही कायद्यातून पळवाट काढणे चालूच आहे.
वन्य जीवांची आंतरराष्ट्रीय पातळीवर बेकायदा चाललेली तस्करी ही मोठी समस्या आहे. त्यात भर म्हणून मानव-वन्यप्राणी संघर्ष बिकट परिस्थितीकडे वाटचाल करत आहे. याची काही प्रमुख कारणे आहेत. भारतातली वेगाने वाढणारी लोकसंख्या १९४७मध्ये ३६ कोटी होती, तर सध्या ती १२० कोटींवर पोहोचली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी योग्य उपाय योजले गेले नाहीत. परिणामी वाढणारी खेडी व शहरे, तथाकथित विकासाच्या गरजा, खाणकामे, शेतीमध्ये पिकांचा होणारा बदल व त्याच जोडीला येणारी संकटे, वाढते कारखाने, धरणे, ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प, नवीन रस्ते व रेल्वे मार्ग इत्यादींसाठी न थांबणारी वाढत्या जमिनीची गरज जंगले कापून भागवली जात आहे. वेठीला धरणारे राजकारण व ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या म्हणीप्रमाणे जंगलावर होणारे अतिक्रमण, एक ना अनेक कारणांनी वने अनेक तुकड्यांत खंडमय झाली आहेत. नैसर्गिक अधिवासांचा विध्वंस झाल्याने वन्य प्राणी आणि मानव यांचं सहजीवन संघर्षमय झालं आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे हा फार मोठा गैरसमज आहे. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रे व त्या जवळच्या अरण्यात वाघांची संख्या थोडीफार वाढली असेल, पण त्यांच्यावरील मोठा धोका कायम आहे. उसाच्या शेतात असलेल्या बिबट्यांच्या संख्येतील वाढ अपवादात्मक आहे, पण वनांमध्ये प्राण्यांची व त्यांच्या प्रजातींची संख्या दिवसेंदिवस खालावत आहे. वन विभागाचे महत्त्व सर्व सरकारी खात्यांच्या रांगेत अगदी कमी महत्त्वाचे मानले गेले आहे. दर वर्षी देशाच्या निधीतून नगण्य निधी वन विभागाच्या वाट्याला येतो. वनांमुळे जीवनावश्यक पाणी, त्यायोगे पिकणारे अन्न व विकास यांसाठी आवश्यक असणारा पाण्याचा प्रचंड पुरवठा देशाला मिळत असला तरी वनांच्या उपेक्षेची कोणालाच खंत नाही.
आजतागायत वनांची व त्यायोगे वन्य प्राण्यांची कशी वाट लावली गेली आहे, याचे बोलके आकडे भारत सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ एनव्हायर्नमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज’च्या नोंदीमध्ये आहेत. आजघडीला १३००० चौरस किलोमीटर वनक्षेत्र अतिक्रमणाखाली आहे. वेगाने वाढणाऱ्या ‘विकासाच्या’ गरजांनिमित्त कधी न थांबणाऱ्या वन जमिनीच्या वाटपाचा मोठा भार हा वेगळा आहे हे विसरता कामा नये. विकास सर्वांनाच हितकारक आहे, पण जरूर त्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकासाच्या कोठल्याही प्रक्रियेची निसर्गाच्या संरक्षणासाठी व अखंडता राखण्यासाठी जेव्हा सांगड घातली जाईल, तेव्हाच तो खरा विकास समजला जाईल. पण असे निर्णय खर्चिक होतील या सबबीवर त्याकडे कानाडोळा करण्यात येतो.
गुंतागुंतीच्या आकडेवारीत न शिरता महाराष्ट्रातील वन आच्छादनाची अथवा फॉरेस्ट कव्हरची परिस्थिती डेहराडूनमध्ये स्थित असलेल्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एफ.एस.आय.) इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०१७मध्ये नमूद केलेली पाहता असे आढळते की, कायद्याने घोषित केलेल्या एकूण ६१,५७९ चौरस किलोमीटर वन क्षेत्रातील ५०,६८२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर वन आच्छादन आहे. त्यापैकी एक शतांश चौ.कि.मी. (एक हेक्टर)पेक्षा जास्त, पण एक चौरस कि.मी.पेक्षा लहान अशा आकाराचे एकूण २,३५,०८७ वन जमिनीचे तुकडे आहेत. त्यांची एकूण व्याप्ती १८,५०६ चौ.कि.मी. आहे, म्हणजे एकूण वन आच्छादनाचा ३६.५१ टक्के हिस्सा; १ चौ.कि.मी.पेक्षा मोठे पण १० चौ.कि.मी.पेक्षा लहान असे ५,६६६ तुकडे १४,१४८ चौ.कि.मी. वनक्षेत्र व्यापतात (२७.९२ टक्के). १० चौ.कि.मी.पेक्षा मोठे पण १०० चौ.कि.मी.पेक्षा लहान या आकाराचे ३८० तुकडे ९४७८ चौ.कि.मी. क्षेत्रावर विखुरलेले आहेत (१८.७० टक्के). १०० चौ.कि.मी.पेक्षा मोठे पण ५०० चौ.कि.मी.पेक्षा लहान असे २२ तुकडे आहेत (८.३१ टक्के); ५०० चौ.कि.मी.पेक्षा मोठे पण १००० चौ.कि.मी.पेक्षा लहान आकाराचे चार तुकडे आहेत (५.१८ टक्के) व १००० चौ.कि.मी.पेक्षा मोठा पण ५००० चौ.कि.मी. लहान असा फक्त एकच विभाग आहे (३.३८ टक्के). ही खंडमय वने शहरे, गावे, शेत जमिनी, रस्ते, ओसाड जमिनी, रेल्वे मार्ग, खाणी व कारखाने यांनी विभागली गेली आहेत. यामुळेच माणसे व वन्यप्राण्यांची गाठभेट पडण्याची शक्यता त्यामुळे खूपच वाढते. या व्यतिरिक्त वन उपजांचा बेदरकारीने उपयोग करताना जे काही वन उरले आहे, त्या वनांच्या प्रतीचा व पुनरुज्जीवनाच्या क्षमतेचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे.
अशा परिस्थितीत वन्य प्राणी जातील कोठे? त्यांची संख्या व प्रजाती दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर उपाय म्हणून अभयारण्यांची, राष्ट्रीय उद्यानांची व व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांची (संरक्षित क्षेत्रे), उपलब्ध जंगलांच्या दुव्यांमार्फत अथवा कॉरिडॉरच्या व्यवस्थापनाद्वारे इतर वन खंडांशी जोडणी साधणे; ज्यायोगे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात (हॅबिटॅट) वाढ होईल अशी योजना आहे. त्यासाठी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करून सहभाग मिळवणे व जोडलेल्या वनांच्या रचनेत जरूर तो बदल यथोचित धोरण व तंत्रज्ञानानुसार करणे आवश्यक आहे. पण हे वाटते तितके सोपे नाही.
एफ.एस.आय.च्या रेकॉर्डप्रमाणे भारतात दरवर्षी सरासरी ५५ टक्के वने आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. अपवाद सोडला तर वनातील गौण उपज गोळा करण्यासाठी, पाळीव पशूंचे चारण (गवत व त्यासारख्या वनस्पती) वाढवण्यासाठी किंवा वन खात्याच्या शत्रुत्वापायी लोक मुद्दाम आगी लावतात. जंगलातील अनेक जातींच्या वनस्पतींची फळे, फुले, पाने, साली, डिंक, मुळे इत्यादी गोळा करताना या वनस्पतींच्या भवितव्याचा विचार होत नाही कारण असा उपज गोळा करण्यासाठी वनांतील स्थानिक रहिवासी व बाहेरून आलेल्या लोकांमध्ये अटीतटीची स्पर्धा चालू असते. अशा परिस्थितीत कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवल्या जातात. मौल्यवान इमारती लाकडांचे वृक्ष व इतर जातीचे मौल्यवान वृक्ष व वनस्पती यांची अवैध तोड व तस्करी होत असते, त्याचप्रमाणे अनेक वन्य वनस्पतींचे भवितव्य धोक्यात आहे.
भारतातील पाळीव पशूंची संख्या सन २०१९मध्ये ५३.६० कोटीपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या संख्येवर योग्य मार्गाने आळा घालण्यासाठी कोठलेही धोरण अस्तित्वात नाही. या पैकी ५० टक्के तरी गाई, म्हशी, बकऱ्या, मेंढ्या वन जमिनीवर अनिर्बंधपणे चरतात व त्यायोगे वन्य तृणभक्षी प्राण्यांचे खाद्य व अशा प्राण्यांच्या जाती व संख्या नष्ट होत चालल्या आहेत. परिणामी मांसाहारी वन्य प्राण्यांचे नैसर्गिक खाद्य कमी होत आहे, त्यांच्या अधिवासांची अतिशय नासधूस होत आहे, मानव वन्य प्राण्यांच्या घरात घुसला आहे तेव्हा हे सर्व प्राणी आता जाणार कोठे? वाघ, बिबटे, सिंह (गुजरात), लांडगे नाईलाजाने जंगलात चरणाऱ्या पाळीव प्राण्यांवर उदरनिर्वाह करतात. काही वेळा माणसे-ज्यांना वन्यप्राण्यांच्या स्वभावधर्माची काडीमात्र ओळख नसते व शिकण्यात रुचीही नसते-योगायोगाने सामोरी आली तर स्वतःच्या बचावासाठी प्राणी हल्ला करू शकतात, माणसे जखमी होऊ शकतात व कधीकधी प्राणहानी होते. पण अनेकदा अशा प्रसंगात प्राण्यांनी माघार पत्करलेली असते. याची कधीही वाच्यता होत नाही. कोठल्या परिस्थितीत लहान मुलांवर किंवा मोठ्या व्यक्तींवर क्वचित बिबट्याचा हल्ला होऊ शकतो व असे प्रसंग कसे टाळता येतील, याची समज पुस्तकात दिलेली आहे.
लेखकाने या पुस्तकात बिबट्या हा प्राणी कसा आहे, त्याचा माणसाशी संघर्ष का व कसा होत आहे, बिबट्याचे घर कसे हरवले आहे व त्याचा निवारा परत मिळवण्यासाठी चाललेल्या धडपडीत समाजाने त्याला कसे खलनायक ठरवले आहे, याचे चित्र उत्तमरीत्या रेखाटले आहे. मोठ्या मांसाहारी वन्यप्राण्यांमध्ये बिबट्या सर्वांत सुंदर आहे. काही इंग्रज लेखकांनी त्याला ‘लबाड’ अशी उपाधी दिली आहे हे दुर्दैवी आहे. प्राण्यांच्या जगात कोणीही लबाड नसतो; फक्त माणसांमध्ये लबाडी आढळून येते. बिबट्या हुशार आहे. नवीन परिस्थितीचे त्याला लगेच आकलन होते. घराच्या व खाद्याच्या शोधात निर्वासित झालेले बिबटे पुणे, मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातदेखील दाखल झालेले आहेत. लोकांपासून बचाव करण्यासाठी कोणाच्या घरात चुकून अडकणे, भक्ष्याचा पाठलाग करताना कठडा नसणाऱ्या विहिरीत पडणे, चोरट्यांनी काही दुसऱ्या प्राण्यांना बेकायदेशीररीत्या पकडण्यासाठी लावलेल्या फासामध्ये अडकणे असे एक ना अनेक प्रसंग बिबट्याच्या आयुष्यात घडत असतात. अशाच काही कठीण परिस्थितीत सुटका करतानाचे बिबट्यांचे व अन्य काही प्राण्यांचेही आलेले चित्तथरारक अनुभव लेखकाने या पुस्तकात उत्तम प्रकारे मांडले आहेत.
महाराष्ट्राच्या जुन्नर जिल्ह्यात शेतीमध्ये झालेल्या परिणामकारक बदलाने स्थानिक लोकांचा बिबट्याबरोबर वेगळाच संघर्ष सुरू झाला आहे. हा महत्त्वाचा विषय कुकडोलकरांनी या पुस्तकात हाताळला आहे. ज्या शेतजमिनीत पूर्वी हंगामी पिके घेतली जात असत त्या जमिनींवर धरणे व कालव्यांमुळे उसाची शेती सुरू झाली, साखरेचे कारखाने उभे राहिले. विसाव्या शतकाचे अखेरपर्यंत जेथे बिबटे दिसणे मुश्किल होते तेथे बिबट्यांचा राबता सुरू झाला. उसाच्या शेतात मिळणारा आसरा, पाळीव जनावरांचा व इतर लहान वन्य प्राण्यांचा भक्ष्य म्हणून कधी न पडणारा तुटवडा, व मुबलक पाणी अशा प्राथमिक गरजा पुरवल्या गेल्याने जन्म घेणाऱ्या पिलांची संख्या वाढू लागली. अनेक नाले व लपण्याच्या जागा उपलब्ध असल्याने प्रौढत्वात पदार्पण करणारे बिबटे अनेक किलोमीटर दूर सुखरूप प्रवास करून योग्य निवाऱ्याच्या ठिकाणी रुळू लागले. शेतात वावरणाऱ्या माणसांना नेहमी पहाणे, त्यांच्या आवाजाची सवय होणे, व जवळपास चाललेली कामे यामुळे बिबट्यांच्या मनातील माणसांबद्दलची भीती थोडीफार चेपली. भक्ष्याच्या शोधात, खेड्यांच्या सान्निध्यात व ऊस कापताना, पिलांचे रक्षण करताना व स्वसंरक्षणासाठी माणसांवर बिबट्यांचे हल्ले झालेले आहेत, माणसे जखमी झालेली आहेत, काहींचे प्राण गेलेले आहेत व काही बिबटे मृत्युमुखी पडले आहेत.
असे प्रसंग येऊ नयेत म्हणून वनखात्याने अनेक उपाययोजना केल्या आहेत. सापळे लावून बिबट्यांना पकडणे, जे बिबटे उत्तम स्थितीत आहेत त्यांना महाराष्ट्रातील इतर वन विभागात ज्या जंगलात नैसर्गिक भक्ष्य आहे अशा ठिकाणी दूरवर सोडणे. रेडिओ कॉलरमार्फत काही बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ज्ञान अर्जित करणे व त्या ज्ञानाचा उपयोग करणे इत्यादींचा समावेश आहे.
जुन्नरजवळ माणिकडोह येथे जखमी बिबट्यांची देखभाल करण्यासाठी, पोरक्या पिलांचे संगोपन करण्यासाठी, व पकडलेल्या उत्तम प्रकृतीच्या बिबट्यांना दूरच्या जंगलात सोडण्याच्या आधीचे निरीक्षण करण्यासाठी व जरूर त्या प्रक्रियेसाठी बिबटघर तयार केलेले आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतदेखील असा उपक्रम काहीशा लहान प्रमाणात केला गेला आहे. पकडलेल्या बिबट्यांची उत्तम देखभाल करणारे व्हेटर्नरी सर्जन हे देशातल्या सर्वोत्तम कुशल व्हेटर्नरी डॉक्टरमध्ये गणले गेले आहेत. एका अर्थाने जुन्नर हे बिबट्यांची समस्या सोडवण्याच्या शिक्षणाचे विश्वविद्यालय झाले आहे. या समस्या कोठल्या परिस्थितीत व कशा हाताळाव्या हे पुस्तकात स्पष्ट केले आहे.
बिबट्यांप्रमाणे ऊस शेतीने वाघांच्या बाबतीतही काही ठिकाणी अशाच समस्या उभ्या केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील उत्तर खेरी व दक्षिण खेरी जिल्ह्यातील दुधवा टायगर रिझर्वभोवती जेथे उंच गवत, काही साल वृक्ष व पाणथळी जागा ज्यांना ‘बगार’ म्हणतात, अशी अघोषित वने होती तेथे १९४८ नंतर उसाची शेती उभी राहिली पण बगारी व त्यात उभी असलेली उंच गवताची छोटी बेटे तशीच राहिली. स्वॉम्प डीअर, हॉग डीअर, रानडुक्कर व इतर तृणभक्षी वन्य प्राणी या बेटांच्या व उभ्या असलेल्या उसाच्या पिकांच्या आसऱ्याने राहू लागले होते. वाघांनीही तेथे आसरा घेतला. माणसांच्या सोबत पाळीव प्राणी होतेच. ऊस व उंच गवत यात वाघांना फरक आढळला नाही. वाघांची कुटुंबे उसात राहू लागली व साहजिकच माणसांबरोबर संघर्ष सुरू झाला. १९७७ नंतरच्या दीड वर्षांत ७० पेक्षा अधिक माणसे वाघांच्या हल्ल्याला बळी पडली. दोन माणसांचे झालेले खूनदेखील वाघांच्या माथी मारण्यात आले. वाघ किती मारले गेले याचा हिशेब नाही, परंतु ७ वाघांना कायद्याने नरभक्षक घोषित करण्यात आले व त्यांना ठार मारण्यात आले.
१९८०च्या मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात तथाकथित नरभक्षक वाघांची समस्या जाणण्यासाठी या क्षेत्रात मी काही स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेतली. एका शेतावरील झोपडीच्या बाहेर जवळच्या झाडाच्या सावलीत एक बाज होती. बाजेच्या जवळील हलक्या धुळीत एका वाघिणीच्या पावलांचे दोन दिशांना जाणारे व येणारे ठसे दिसत होते. काही ताजे होते. एका वृद्ध शेतकऱ्याने माझे स्वागत केले. मी वाघांबद्दल त्याला विचारल्यावर शेतकरी म्हणाला की, मी लहान असल्यापासून येथे वाघ पहात आलो आहे. ते कोठे राहातात व कधी व कोठे फिरतात, हे कळल्यावर तो टाइम व वाघांच्या खाणाखुणा पाहून तशा जागा जर टाळल्या तर काही धोका नसतो. माझ्या झोपडीच्या जवळ जी बगार दिसते आहे, तेथे एक वाघीण रहाते. सध्या अतिशय उकाड्यामुळे मी रात्री बाहेरच या बाजेवर झोपतो. रात्री, बेरात्री किंवा पहाटे बाजेच्या जवळून तिची ये-जा चालू असते, पण तिचा मला काहीच त्रास नाही किंवा तिचे भय वाटत नाही. तिच्यामुळे येथील चोर, दरोडेखोर येथे फिरकत नाहीत. मी तिला माझी मुलगी मानतो. त्या गृहस्थाचा वाघिणीवरचा व वाघिणीचा त्याच्यावरचा दृढ विश्वास मला खूपच काही शिकवून गेला. जिम कॉर्बेटने वाघाला ‘उदार मनाचा सद्गृहस्थ’ अशी उपमा दिली आहे यात नवल नाही. तात्पर्य हे की, स्थानिक माणसांनी अशा प्राण्यांच्या हालचाली व स्वभाव जाणून घेण्याचा प्रयास केला तर कटू अनुभव खूपच प्रमाणात कमी करणे शक्य आहे.
बिबट्या किंवा वाघामुळे जर कोणी व्यक्ती दुर्दैवाने मृत्यू पावते, तेव्हा त्या प्राण्याला नरभक्षक म्हणून जाहीर करून नष्ट करावे असा तगादा लावला जातो. वाघ किंवा बिबट्या नरभक्षक होणे हे अगदी अपवादात्मक असते, हे मत देशातील आतापर्यंतच्या नरभक्षक वाघांच्या व बिबट्यांबाबत सर्वांत अनुभवी असणाऱ्या जिम कॉर्बेटने नमूद केले आहे. नरभक्षक कसा ओळखावा हे त्याने व लेखकाने स्पष्ट केले आहे.
भारत शेतीप्रधान देश आहे. शेतकरी अनेक कष्ट करून जनसमुदायाला अन्न पुरवतात. शेतकरी किती संकटात आहेत हे सर्वांना ज्ञात आहे. त्यातील एक म्हणजे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान. या पुस्तकात लेखकाने शेतीला नुकसान पोहोचवणारे रानडुक्कर, नीलगाय, काळवीट, चिंकारा या व्यतिरिक्त घनदाट अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानाजवळील शेतीचे नुकसान करणारी चितळ, सांबर, गवा या जातींच्या वन्यप्राण्यांची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेली पावले, वन खात्याने मार्गी लावलेले कार्य व त्याव्यतिरिक्त आणखी काय करता येईल हेही नमूद केले आहे.
जनतेला योग्य माहिती पुरवणे ही माध्यमांची जबाबदारी असली तरी अनेकदा सनसनाटी बातम्या देण्याच्या हव्यासापायी, प्रत्यक्ष जे घडले आहे त्याला तिखटमीठ लावून, स्वघोषित तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधून काहीतरी वेगळेच मांडले जाते. त्यामुळे गैरसमज पसरत जातात. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. याबाबत माध्यमांशी योग्य संवाद साधणे जरुरीचे आहे, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा पुस्तकात नमूद करण्यात आला आहे.
पुस्तकाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे वन विभाग, त्याच्या कार्याची विभागणी, वनविभागास अनुसरून असणारे कायदे, भारतीय संविधानातील तरतुदी, जरूर ती मदत देण्याची सरकारची धोरणे, त्याबाबत असलेल्या तरतुदी व कार्यपद्धती याची इत्थंभूत माहिती लेखकाने नमूद केलेली आहे. वनकर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात करण्याची सुधारणा व त्याचे महत्त्व यावर भर दिला आहे. वन्य प्राण्यांबाबत वन विभागाला आलेल्या सर्व समस्या यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी विभागाने सक्षम असणे जरुरीचे आहे, हे नमूद केले आहे.
उदाहरणार्थ, कायद्याने ठार मारण्यासाठी घोषित केलेल्या प्राण्यासाठी भाडेकरू शिकाऱ्याला पाचारण करणे व त्याने नंतर घातलेल्या घोळाला सोडवत राहणे ही नामुष्कीची गोष्ट आहे. त्यासाठी वनविभागाने स्वतःच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून स्नायपर उभे करणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनासाठी वेगळ्या धोरणाची आवश्यकता आहे, ही महत्त्वाची सूचना लेखकाने केली आहे.
लेखकाने प्रकट केलेले विचार व माहिती वाचकांसाठी व जनतेसाठी खूपच महत्त्वाची आहे. हे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत.
देशाचा विकास होणे हे सर्वांच्या हिताचे आहे, परंतु हा विकास निसर्गाशी व पर्यावरणाशी निगडित असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रचलित तंत्रज्ञानामध्ये बदल करून नव्या ज्ञानाचा उपयोग करणे व त्याप्रमाणे खर्चाच्या अंदाजपत्रकामध्ये आमूलाग्र बदल करणे, याची आवश्यकता आहे. निसर्ग व पर्यावरणाची निगा राखणे कधीच स्वस्त असणार नाही. अर्थशास्त्रज्ञांचे व त्या विभागाचे प्रचलित विचार बदलले पाहिजेत. असे केले नाही तर जनतेला व देशाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. वने व वन जमिनी, आच्छादित असो किंवा नसोत त्या पर्यावरणाच्या दृष्टीने अमूल्य आहेत. विकासासाठी, शेतीसाठी व माणसांच्या सर्व गरजांसाठी पाण्याची गरज आहे. वनांमुळे पर्जन्यमानाचे प्रमाण व निरोगी पर्यावरण राखण्यासाठी अतिशय मदत होते. वने व वन्यप्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत हे जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताने स्पष्ट केले आहे. त्यांचा अब्जावधी वर्षांचा एकत्र प्रवास पृथ्वीतलावर झाला आहे. मानव त्यांच्यानंतर कोट्यवधी वर्षांनी भूतलावर आला आहे. पाणलोट क्षेत्रे वनांमुळे जिवंत राहतात व नद्या-नाल्यांमधून पाणी वाहते, जमिनीत खोलवर भूजलाचा साठा होतो. वनांशिवाय धरणे ओस पडतील, शेतातील पिके नष्ट होतील व आपल्या आयुष्याचा ऱ्हास होईल. झाडे लावून वनांची निर्मिती करणे कधीच शक्य नाही. मानव जंगले निर्माण करू शकत नाही. वनीकरण ही एक जमिनीवर झाडांचे व इतर वनस्पतींचे काही प्रमाणात आच्छादन करण्याची प्रक्रिया आहे. त्याने मृद्संधारण जरूर होऊ शकते, पण त्याने वने ही खऱ्या अर्थाने कधीच निर्माण होत नाहीत. आम जनतेच्या मनात वने व वन्यप्राण्यांबाबत गैरसमज किंवा तिरस्कार जरी असला, तरी मानवाच्या भवितव्यासाठी जी वने सध्या हयात आहेत ती जतन करणे अत्यावश्यक आहे. याला दुसरा पर्याय नाही.
..................................................................................................................................................................
‘बिबट्या आणि माणूस’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5199/Bibatya-ani-manus
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment